नमस्कार!
केम छो! (तुम्ही सगळे कसे आहात?)
मॉरिशसचे आदरणीय पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस, गुजरातचे उत्साही मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, मनसुख भाई मांडविया, महेंद्रभाई मुंजपरा, देश-विदेशातील सर्व राजनैतिक अधिकारी, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि तज्ञ, आणि सभ्य स्त्री-पुरुषांनो !
जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेत मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपण अनेकदा पाहिले आहे की विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक शिखर परिषदा होत असतात आणि विशेषतः गुजरातने तर ही परंपरा खूपच व्यापक पद्धतीने पुढे नेली आहे. पण असे पहिल्यांदाच घडत आहे, जेव्हा आयुष क्षेत्रासाठी अशी गुंतवणूक शिखर परिषद होत आहे.
मित्रांनो,
अशा गुंतवणूक शिखर परिषदेची कल्पना मला अशा वेळी सुचली जेव्हा संपूर्ण जगात कोरोनामुळे खळबळ उडाली होती. त्या काळात आयुर्वेदिक औषधे, आयुष काढे आणि अशा प्रकारची अनेक उत्पादने लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास कशी मदत करत होती हे आपण सर्वजण पाहत होतो आणि परिणामी कोरोनाच्या काळापासून भारतातून हळदीची निर्यात अनेक पटींनी वाढली होती. हा त्याचाच पुरावा आहे. या काळात आधुनिक औषध कंपन्या आणि लस उत्पादकांनी , योग्य वेळी गुंतवणूक मिळाल्यावर कशा प्रकारे मोठी कामगिरी केली हेही आपण या काळात पाहिले आहे . आपण एवढ्या जलद गतीने कोरोनावर स्वदेशी लस विकसित करू शकू याची कोणी कल्पना तरी करू शकले असेल का ! नवोन्मेष आणि गुंतवणूक कोणत्याही क्षेत्राची क्षमता अनेक पटींनी वाढवतात. आता आयुष क्षेत्रातील गुंतवणूक अधिकाधिक वाढवण्याची वेळ आता आली आहे. आजचा प्रसंग, ही शिखर परिषद , त्याची एक उत्तम सुरुवात आहे.
मित्रांनो ,
आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि नवोन्मेषच्या अगणित संधी आहेत. आयुष औषधे, पूरक पोषके आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात आपण आधीच अभूतपूर्व तेजी पाहत आहोत. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, 2014 पूर्वी, आयुष क्षेत्रातली उलाढाल 3 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होती, ती वाढून आज 18 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचली आहे. जगभरात आयुष उत्पादनांची मागणी ज्या प्रकारे वाढत आहे, ती पाहता येत्या काही वर्षांत ही वाढ अधिक नवी उंची गाठणार आहे. पौष्टिक पूरक आहार असो, औषधांचे पुरवठा साखळी व्यवस्थापन असो, आयुष-आधारित निदान साधने असोत किंवा टेलिमेडिसिन असोत, सर्वत्र गुंतवणूक आणि नवोन्मेषाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
मित्रांनो ,
पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने विकसित केलेल्या एका आयुष्मान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. स्टार्टअप चॅलेंजमध्ये तरुणांमध्ये जो उत्साह दिसून आला आहे तो खूपच उत्साहवर्धक आहे आणि तुम्ही सर्व माझे तरुण मित्र तर जाणताच की , एकप्रकारे भारताच्या स्टार्टअप क्षेत्राचा हा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. भारतात आज युनिकॉर्नचे युग आहे. 2022 मध्येच, खरे तर 2022 सुरू होऊन अजून चार महिनेही पूर्ण झालेले नसताना , 2022 मध्येच, आतापर्यंत भारतातील 14 स्टार्ट-अप्सचा युनिकॉर्न क्लबमध्ये समावेश झाला आहे. मला पूर्ण खात्री आहे की लवकरच आमच्या आयुष स्टार्ट अप्समधून युनिकॉर्न निर्माण होतील.
मित्रांनो ,
भारतात वनौषधींचा खजिना आहे आणि हिमालय तर यासाठी ओळखला जातो, ते एक प्रकारे आपले 'हिरवे सोने' आहे. आपल्याकडे असे म्हटले जाते की, 'अमंत्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधं।' म्हणजे असे कोणतेच अक्षर नाही ज्यापासून मंत्र सुरू होत नाही, आणि असे कोणते मूळ नाही, औषधी वनस्पती नाहीत, ज्यापासून औषध तयार होत नाही. या नैसर्गिक संपत्तीचा मानवतेच्या हितासाठी उपयोग करण्यासाठी, आमचे सरकार वनौषधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनास सातत्याने प्रोत्साहन देत आहे.
मित्रांनो ,
वनस्पती आणि औषधी झाडांचे उत्पादन, शेतकर्यांचे उत्पन्न वृद्धिंगत करण्याचे आणि उपजीविकेचे उत्तम साधन ठरू शकते. यामध्ये रोजगार निर्मितीलाही भरपूर वाव आहे. परंतु, अशा वनस्पती आणि उत्पादनांची बाजारपेठ अत्यंत मर्यादित, विशेषीकृत असल्याचे आपण पाहिले आहे. औषधी वनस्पतींच्या उत्पादनाशी संबंधित शेतकऱ्यांना बाजारपेठेशी सहज जोडण्याची सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकार आयुष ई-मार्केट प्लेसच्या आधुनिकीकरण आणि त्याच्या विस्तारावरही वेगाने काम करत आहे. या पोर्टलद्वारे, वनस्पती आणि औषधी झाडांच्या लागवडीशी संबंधित शेतकरी आयुष उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांशी जोडले जातील.
मित्रांनो ,
आयुष उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठीही गेल्या काही वर्षांत अभूतपूर्व प्रयत्न करण्यात आले आहेत. इतर देशांसोबत आयुष औषधांना परस्पर मान्यता देण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांत विविध देशांसोबत 50 हून अधिक सामंजस्य करार केले आहेत. आमचे आयुष तज्ज्ञ भारतीय मानके ब्युरोच्या सहकार्याने ISO मानके विकसित करत आहेत. यामुळे आयुषसाठी 150 हून अधिक देशांमध्ये मोठी निर्यात बाजारपेठ खुली होईल. त्याचप्रमाणे एफएसएसएआयने गेल्या आठवड्यात त्यांच्या नियमनात 'आयुष आहार' नावाची नवी श्रेणीदेखील जाहीर केली आहे. यामुळे वनस्पतीजन्य पौष्टिक पूरक उत्पादकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळेल. मला अजून एक गोष्ट जाहीर करायची आहे, भारत एक विशेष आयुष चिन्ह बनवणार आहे, ज्याची जागतिक ओळख असेल. हे चिन्ह भारतात तयार झालेल्या सर्वोच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर लावले जाईल. हे आयुष चिन्ह आधुनिक तंत्रज्ञानाच्या तरतुदींनी सुसज्ज असेल. यामुळे जगभरातील लोकांना दर्जेदार आयुष उत्पादनांची ग्वाही मिळेल. नुकतीच स्थापन झालेली आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद या उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देईल आणि परदेशी बाजारपेठा शोधण्यात मदत करेल.
मित्रांनो ,
आज मी तुमच्यासमोर आणखी एक घोषणा करत आहे. आमचे सरकार, देशभरात आयुष उत्पादनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संशोधन आणि निर्मितीला चालना देण्यासाठी आयुष पार्क्सचे जाळे विकसित करणार आहे. हे आयुष पार्क्स देशातील आयुष उत्पादनाला नवी दिशा देतील.
मित्रांनो ,
आपण पाहत आहोत की , आज जगातील अनेक देशांसाठी भारत हे वैद्यकीय पर्यटनासाठी एक अतिशय आकर्षक ठिकाण बनले आहे. ही गोष्ट लक्षात घेता वैद्यकीय पर्यटनात गुंतवणुकीच्या भरपूर संधी असल्याचे दिसून येते. केरळमधील पर्यटन वाढवण्यात पारंपारिक औषधांनी कशी मदत केली हे आपण पाहिले आहे. हे सामर्थ्य संपूर्ण भारतात आहे, भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. 'हील इन इंडिया' या दशकातील सर्वात मोठा ब्रँड बनू शकतो. आयुर्वेद, युनानी, सिद्ध अशा विद्यांवर आधारित वेलनेस सेंटर्स खूप प्रचलित होऊ शकतात. देशात झपाट्याने विकसित होत असलेल्या आधुनिक कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यास आणखी साहाय्य करतील. परदेशी नागरिक, मी म्हटल्याप्रमाणे, आज भारत हे आरोग्य पर्यटनासाठी एक आकर्षक ठिकाण बनत आहे, त्यामुळे जे परदेशी नागरिक आयुष उपचारांचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सरकार आणखी एक पाऊल उचलत आहे. लवकरच, भारत एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे. यामुळे लोकांना आयुष उपचारांसाठी भारतात येणेजाणे सुलभ होईल.
मित्रांनो,
आत्ता आपण आयुर्वेदाविषयी बोलत आहोत, त्यामुळे मला आज आपल्या सर्वांना एक खूप महत्वाची माहिती द्यायची आहे. आमचे मित्र आणि केनियाचे माजी राष्ट्रपती राइना ओडिंगा जी आणि त्यांची कन्या रोजमेरी यांच्याविषयी मी आपल्याला काही सांगू इच्छितो. ‘‘रोजमेरी, आपण इथेच आहात? होय, त्या इथेच गुजरातमध्ये आहेत. रोजमेरी गुजरातमध्ये आपले स्वागत आहे.’’ रोजमेरी यांचा अनुभव अतिशय रोचक आहे. याविषयीच मला आपल्याशी जरूर बोलायचे आहे. रोजमेरीचे वडील- ओडिंगा हे माझे खूप चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी ओडिंगा मला दिल्ली येथे भेटण्यासाठी आले होते. तो रविवारचा दिवस होता आणि आम्हीही बराच वेळ गप्पा मारायच्या असे ठरवले होते. कारण आम्ही एकमेकांना खूप दिवसांनी भेटत होतो. त्यावेळी त्यांनी मला रोजमेरीच्या आयुष्यात आलेल्या संकटाविषयी सांगितले. ओडिंगा मला म्हणाले, रोजमेरीला डोळ्यांचा थोडा त्रास होता, त्यामुळे तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बहुतेक तिला मेंदूचा ट्यूमर झाला होता आणि तो काढून टाकण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली गेली होती, त्यामुळे रोजमेरीला आपली दृष्टी गमवावी लागली होती. तिला दिसत नव्हते. आता आपण कल्पना करू शकता, आयुष्याच्या या टप्प्यावर जर डोळे- दृष्टी गेली तर कोणीही माणूस हताश होईल, निराश होईल. आणि अशा वेळी तर एक पिता आपल्या कन्येच्या उपचारासाठी काहीही करणारच आहे. त्याचप्रमाणे ओडिंगा यांनी आपल्या कन्येच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी, तिला दृष्टी मिळावी म्हणून अक्षरशः संपूर्ण जगातल्या नेत्रतज्ज्ञांना दाखवले. जगातला कोणताही असा मोठा देश राहिला नाही की, त्यांनी रोजमेरीला तिथे घेवून उपचार केले नाहीत. परंतु रोजमेरीला काही दृष्टी पुन्हा आली नाही. अखेर त्यांच्या प्रयत्नांना भारतामध्ये यश आले, हे विशेष! त्यांनी भारतामध्ये येवून आयुर्वेदाचे उपचार सुरू केले. आणि रोजमेरीला पुन्हा एकदा दृष्टी प्राप्त झाली. आज ती चांगल्या प्रकारे सर्व काही पाहू शकते. दृष्टी आल्यानंतर ज्यावेळी तिने पहिल्यांदा आपल्या मुलांना डोळे भरून पाहिले, तो क्षण तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर, सुवर्ण क्षण होता. ही गोष्ट ओडिंगा मला सांगत होते. आजच्या या शिखर परिषदेमध्ये रोजमेरी याही सहभागी झाल्या आहेत, याचा मला अतिशय आनंद वाटत आहे. या कार्यक्रमासाठी तिच्या भगिनीही आल्या आहेत. या भगिनी पारंपरिक औषधांविषयी सध्या शिकवण्याचे काम करतात. बहुतेक त्या आपला अनुभव उद्या तुमच्याबरोबर सामायिक करतील .
मित्रांनो,
21 व्या शतकातला भारत, संपूर्ण जगाला आपला अनुभव, आपले ज्ञान, आपल्याकडे असलेली माहिती सामायिक करीत पुढे जावू इच्छित आहे. आमचा वारसा, अखिल मानवतेसाठी असलेल्या वारशाप्रमाणे आहे. आम्ही वसुधैव कुटुम्बकम मानणारे लोक आहोत. आम्ही जगाच्या वेदना कमी करण्यासाठी कृतसंकल्प राहण्याचा संकल्प करणारे लोक आहोत. ‘सर्वे सन्तु निरामयाः’ हा तर आमचा जीवनमंत्र आहे. आमचे आयुर्वेद म्हणजे हजारो वर्षांची परंपरा, हजारो वर्षांच्या तपस्येचे प्रतीक आहे. आणि आम्ही तर रामायणातून ऐकत आलो आहोत की, लक्ष्मण ज्यावेळी बेशुद्ध पडले होते, त्यावेळी हनुमानजी हिमालयात गेले आणि त्यांनी तिथून जडी-बुटी आणली. आत्मनिर्भर भारत त्यावेळीही होता. आयुर्वेदाच्या समृद्धीमागे एक प्रमुख कारण म्हणजे त्याचा असलेला मुक्त स्त्रोत मॉडल आहे. आज डिजिटल जगामध्ये मुक्त स्त्रोताविषयी खूप मोठी चर्चा केली जाते. आणि काही लोकांचे म्हणणे आहे की, ही गोष्ट त्यांनीच शोधून काढली आहे. मात्र त्यांना माहिती नाही की, या मातीमध्ये हजारो वर्षांपासून मुक्त स्त्रोताची परंपरा आहे. आणि आयुर्वेद पूर्णपणे त्या मुक्त स्त्रोतांच्या परंपरेतूनच विकसित होवू शकला आहे. ज्या युगामध्ये ज्यांना कोणाला वाटलं, ज्यांनी घेतला, ते सर्वजण आयुर्वेदाबरोबर जोडले गेले. याचा अर्थ एक प्रकारे आयुर्वेद विकासाची चळवळ हजारो वर्षांपासून चालू आहे. नव-नवीन गोष्टी आयुर्वेदाबरोबर जोडल्या गेल्या आहेत. यासाठी बंधन कोणतेच नाही. नवीन विचारांचे त्यामध्ये स्वागत केले जाते. काळाबरोबरच वेगवेगळ्या विव्दानांचे अनुभव, त्यांचा अभ्यास, यामुळे आयुर्वेदाला अधिक मजबूत बनवले आहे. आजच्या काळामध्येही आपण आपल्या पूर्वजांकडून शिकू शकतो आणि त्याच बौद्धिक मुक्ततेच्या भावनेने हे काम केले गेले पाहिजे. पारंपरिक औषधांविषयाशी संबंधित ज्ञानाचा विकास आणि विस्तार कधी शक्य आहे, याचे उत्तर शोधताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, आपण याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. देश-काल- परिस्थितीअनुसार त्यामध्ये लवचिकता आणली पाहिजे.
मित्रांनो,
कालच जामनगरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध वैश्विक केंद्राचा शिलान्यास करण्यात आला आहे. याचा अर्थ गुजरातच्या भूमीवर जामनगरमध्ये विश्वातले पहिले पारंपरिक औषधाचे केंद्र बनणे, म्हणजे हा प्रत्येक हिंदुस्तानीसाठी, प्रत्येक गुजरातीसाठी अभिमानाचा विषय आहे. आणि आज आपण पहिल्या आयुष नवोन्मेषी आणि गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये सहभागी होत आहोत; हा एका दृष्टीने चांगला-शुभारंभ आहे. सध्याच्या काळात भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणजेच भारताचा अमृत महोत्सवाचा काळ सध्या सुरू आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी 25 वर्षांचा काळ आपला असणार आहे. या आपल्या अमृत काळामध्ये जगाच्या कानाकोप-यांमध्ये पारंपरिक औषधांना सुवर्णकाळ येणार आहे. आज एकप्रकारे जगभरामध्ये पारंपरिक औषधाच्या, एका नवीन युगाचा आरंभ झाला आहे. मला विश्वास आहे की, वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषेदेमुळे आयुष क्षेत्रामध्ये गुंतवणूक, व्यापार आणि नवोन्मेषी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत. या महात्मा मंदिरामध्ये एक दांडी कुटीर आहे. महात्मा गांधी परंपरागत औषधोपचाराचे प्रणेता होते. त्यामुळे मला असे वाटते की, आपण सर्वांनी वेळ काढून जरूर दांडी कुटीरला भेट द्यावी. माझा आग्रह आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये महात्मा गांधी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. आयुर्वेदाबरोबरच ही मिळणारी एक संधी आपण वाया जावू देवू नये. आज मी आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला देवू इच्छितो. जागतिक आरोग्य संघटनेचे आपले महासंचालक टेड्रोस माझे खूप चांगले मित्र आहेत आणि ज्यावेळी ते भेटतात, त्यावेळी एक गोष्ट आवर्जुन सांगतात की, ‘‘मोदीजी, असं आहे पहा, मी जो काही आहे तो, मला जे काही लहानपणी शिकवले होते, त्यामुळे आहे. भारतातले शिक्षक आमच्याकडे शिकवायला होते. माझ्या संपूर्ण आयुष्यावर भारतीय शिक्षकांचा खूप प्रभाव आहे, त्यांची भूमिका फार महत्वाची होती. त्यामुळे भारताशी जोडले जाताना मला त्याचा अभिमान वाटतो. आज सकाळी ते मला भेटले त्यावेळी ते म्हणाले की, हे पहा, मी तर पक्का गुजराती बनलो आहे. त्यामुळे तुम्ही माझे नाव आता गुजराती ठेवा, आत्ताही ते व्यासपीठावर पुन्हा मला आठवण करून देत - विचारत होते की, भाई माझे नाव काही निश्चित केले की नाही? म्हणून मी आज महात्मा गांधी यांच्या या पवित्र भूमीवर माझ्या या घनिष्ठ मित्राला गुजराती या नात्याने तुलसीभाई असे नाव देत आहे. तुळस- असे एक रोप आहे की, आजची पिढी या रोपाला, झाडाला विसरून चालली आहे. मात्र पिढ्यान् पिढ्या भारतामध्ये प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोप लावणे, त्याची पूजा करणे, ही परंपरा पाळली जात आहे. तुळशीचे रोप म्हणजे भारताच्या आध्यात्मिक वारशाचा महत्वपूर्ण भाग आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी आयुर्वेदाविषयी शिखर परिषद होत आहे त्यामध्ये तुलसीभाई हे नाव देत आहे. दिवाळीनंतर आपल्या देशामध्ये तुळशीच्या विवाहाचा मोठा समारंभ केला जातो. याचा अर्थ आयुर्वेदाशी जोडली गेलेली ही तुळस आहे आणि आता गुजराती नाव निश्चित करायचे आहे, म्हणून त्यामध्ये - ‘भाई’ हा शब्द आला पाहिजे. आणि म्हणूनच तुमचा गुजरातीविषयी असलेला आपलेपणा पाहून आणि तुम्ही प्रत्येकवेळी काही ना काही गुजराती बोलण्याचा प्रयत्न करीत असता, तुमच्या गुरूजनांनी दिलेल्या ज्ञानाविषयी, त्यांच्याविषयी तुम्ही सातत्याने श्रद्धाभाव व्यक्त करीत असता, या महात्मा मंदिराच्या पवित्र भूमीवर आपल्याला ‘तुलसीभाई’ असे संबोधण्यास विशेष आनंद होत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या दोन्ही मान्यवरांनी या महत्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याबद्दल, त्यांचे खूप-खूप आभार व्यक्त करतो. खूप- खूप धन्यवाद !!