भारत माता की, जय
भारत माता की, जय
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र जी, येथील लोकप्रिय आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माझे मित्र जयराम ठाकुर जी, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जुने सहकारी सुरेश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, खासदार , आमदार , हिमाचलचे सर्व लोकप्रतिनिधि. आज माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस देखील आहे आणि त्या विशेष दिवशी या देवभूमीला प्रणाम करण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठे जीवनाचे सौभाग्य काय असू शकते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुमचे खूप-खूप आभार मानतो.
आताच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधीचे पैसे हस्तांतरित झाले आहेत, त्यांना पैसे मिळाले ही आहेत, आणि आज मला शिमल्याच्या या भूमीवरून देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे सौभाग्य लाभले आहे. ते शेतकरी देखील शिमलाची आठवण काढतील , हिमाचलची आठवण काढतील, या देवभूमीची आठवण काढतील. मी या सर्व शेतकरी बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन करतो, अनेक-अनेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो ,
हा कार्यक्रम शिमला इथे आहे , मात्र एक प्रकारे हा कार्यक्रम आज संपूर्ण भारताचा आहे. आमची इथे चर्चा सुरु होती की सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कसा आणि कोणता कार्यक्रम करायचा. तेव्हा आपले नड्डा जी, जे हिमाचलचेच आहेत, आपले जयराम जी; यांच्याकडून एक प्रस्ताव आला आणि दोन्ही प्रस्ताव मला खूप आवडले. या आठ वर्षांच्या निमित्ताने मला काल कोरोना काळात ज्या मुलांनी आपले आई-वडील दोन्ही गमावले, अशा मुलांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मला काल मिळाली. देशातील त्या हजारो मुलांची देखभाल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि काल मी त्यांना थोडे पैसे डिजिटली पाठवले. आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त असा कार्यक्रम होणे मनाला खूप समाधान देतो, आनंद देतो.
आणि मग माझ्यासमोर प्रस्ताव आला की आपण एक कार्यक्रम हिमाचलमध्ये करूया, तेव्हा मी डोळे झाकून करून होकार दिला. कारण माझ्या जीवनात हिमाचलचे स्थान इतके मोठे आहे, इतके मोठे आहे , इतके मोठे आहे आणि आनंदाचे क्षण जर हिमाचलमध्ये येऊन व्यतीत करण्याची संधी मिळत असेल तर ती गोष्टच वेगळी. म्हणूनच आज मी म्हणालो, आठ वर्षांनिमित्त देशाचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आज शिमलाच्या भूमीवर होत आहे , जी कधी माझी कर्मभूमि होती, माझ्यासाठी जी देवभूमी आहे, माझ्यासाठी जी पुण्यभूमी आहे. तिथे आज मला देशवासियांशी या देवभूमीवरून बोलण्याची संधी मिळाली , ही माझ्यासाठी आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. मित्रांनो ,
130 कोटी भारतीयांचा सेवक म्हणून काम करण्याची तुम्ही सर्वांनी मला जी संधी दिली , मला जे सौभाग्य लाभले आहे , सर्व भारतीयांचा जो विश्वास मला मिळाला आहे, आज मी जे काही करू शकलो आहे, दिवस-रात्र धावू शकतो, तेव्हा असा विचार करू नका की मोदी करतात, असे समजू नका की मोदी धावत आहेत. हे सगळे तर 130 कोटी देशवासियांच्या कृपेने होत आहे, आशिर्वादाने होत आहे, त्यांच्यामुळे होत आहे , त्यांच्या ताकदीने होत आहे. कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने मी कधीही स्वतःला त्या पदावर पाहिले नाही, कल्पना देखील केली नाही, आणि आजही करत नाही की मी कुणी पंतप्रधान आहे. जेव्हा फाईलीवर सही करतो, एक जबाबदारी असते, तेव्हा तर मला पंतप्रधानांचे दायित्व म्हणून मला काम करायचे असते. मात्र त्यानंतर जशी ती फाईल तिथून जाते, मी पंतप्रधान नसतो, मी केवळ आणि केवळ 130 कोटी देशवासियांच्या कुटुंबाचा सदस्य बनतो. तुमच्याच कुटुंबाचा सदस्य म्हणून , एक प्रधान सेवक म्हणून जिथे कुठे असतो, काम करत असतो आणि यापुढेही कुटुंबाचा सदस्य म्हणून, कुटुंबाच्या आशा-आकांक्षामध्ये सहभागी होणे , 130 कोटी देशवासियांचे कुटुंब , हेच सगळे माझ्या आयुष्यात आहे. माझ्या आयुष्यात तुम्हीच सगळे सर्व काही आहात आणि हे आयुष्य देखील तुमच्यासाठीच आहे.
आणि जेव्हा आमचे सरकार आपली आठ वर्ष पूर्ण करत आहे, तेव्हा आज मी पुन्हा एकदा या देवभूमीवरून माझ्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो, कारण संकल्प पुन्हा पुन्हा आठवत रहायला हवा, संकल्प कधीही विसरता कामा नये, आणि माझा संकल्प होता, आज आहे, आणि यापुढेही राहील. ज्या संकल्पासाठी लढत राहीन, ज्या संकल्पासाठी तुम्हा सर्वांबरोबर चालत राहीन आणि म्हणूनच माझा हा संकल्प आहे भारतवासीच्या सन्मानासाठी, प्रत्येक भारतीयाची सुरक्षा , प्रत्येक भारतीय कसा समृद्ध होईल, भारतीयांना सुख-शांततापूर्ण जीवन कसे मिळेल, या एकच भावनेने गरीबातील गरीब असेल, दलित असेल, पीड़ित असेल, शोषित असेल, वंचित असेल, दूर-सुदूर जंगलांमध्ये राहणारे लोक असतील, डोंगरमाथ्यावर राहणारे एखाद-दोन कुटुंबे असतील , या सर्वांच्या कल्याणासाठी जितके जास्त काम करू शकतो, ते करत असतो, हीच भावना घेऊन आज मी पुन्हा एकदा या देवभूमीवरून स्वतःला संकल्पित करतो.
मित्रांनो ,
आपण सर्वांनी मिळून भारताला त्या उंचीवर घेऊन जाऊ , जिथे पोहचण्याचे स्वप्न स्वातंत्र्यासाठी स्वतःचे सगळे काही समर्पित करणाऱ्या लोकांनी पाहिले होते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात भारताच्या अतिशय उज्वल भविष्याच्या विश्वासासह , भारताची युवा शक्ति, भारताची नारीशक्ति, यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी आज तुमच्यासमोर आलो आहे.
मित्रांनो ,
आयुष्यात जेव्हा आपण मोठ्या लक्ष्यांच्या दिशेने पुढे वाटचाल करतो, तेव्हा अनेकदा हे पाहणे देखील गरजेचे असते की आपण कुठून निघालो होतो, कुठून सुरुवात केली होती. आणि जेव्हा ते आठवतो, तेव्हाच तर हिशेब लागतो की कुठून निघालो आणि कुठे पोहचलो , आपला वेग कसा होता,आपली प्रगति कशी होती, आपली उपलब्धि काय होती. जर आपण 2014 पूर्वीचे दिवस आठवले , ते दिवस विसरू नका मित्रांनो, तर कुठे आजच्या दिवसाचे मोल समजेल. आजची परिस्थिती पाहिली , तर समजेल मित्रांनो , देशाने खूप मोठा पल्ला गाठला आहे.
2014 पूर्वी वृत्तपत्रात बातम्या असायच्या, ठळक बातम्या असायच्या, टीव्हीवर चर्चाही व्हायची. आणि कशाबद्दल असायचे तर लूटमार, भ्रष्टाचार, घोटाळे, घराणेशाही, नोकरशाही, रखडलेल्या अडकलेल्या भरकटलेल्या योजनांबद्दल. मात्र आता काळ बदलला आहे,आज सरकारी योजनांमधून मिळणाऱ्या लाभांची चर्चा होते. सिरमौर इथून एखादी समादेवी सांगते की मला हे लाभ मिळाले आहेत. हा शेवटच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो.
गरीबांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या खात्यात पोहचण्याची चर्चा व्हायची, आज जगात चर्चा होते भारताच्या स्टार्टअपची, आज चर्चा होते, जागतिक बँक देखील चर्चा करते भारताच्या व्यवसाय सुलभतेची, आज भारतातील निर्दोष नागरिक चर्चा करतात, गुन्हेगारांना लगाम घालण्याच्या आपल्या ताकदीची , भ्रष्टाचार विरोधात शून्य सहनशीलतेसह पुढे जाण्याची आज चर्चा होते.
2014 पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा आवश्यक भाग मानला होता, तेव्हाच्या सरकारने भ्रष्टाचारा विरोधात लढण्याऐवजी त्याच्यासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा देश पाहत होता की योजनांचे पैसे गरजूंपर्यंत पोहचण्यापूर्वीच लुटले जातात. मात्र आज चर्चा जन-धन खात्यांमधून मिळणाऱ्या लाभांची होत आहे. जनधन-आधार आणि मोबाइल यातून बनलेल्या त्रिशक्तिची होत आहे. पूर्वी स्वयंपाकघरात धूर सहन करणे नाईलाज होता, आज उज्ज्वला योजनेमुळे सिलेंडर मिळवण्याची सोय आहे. पूर्वी उघड्यावर शौचाला नाईलाजाने जावे लागायचे, आज घरात शौचालय बांधून सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य आहे. पूर्वी उपचारांसाठी पैसे गोळा करावे लागायचे, आज प्रत्येक गरीबाला आयुष्मान भारतचा आधार आहे. पूर्वी तिहेरी तलाकची भीती होती, आता आपल्या अधिकारांसाठी लढाई लढण्याचा उत्साह आहे.
मित्रहो
2014 च्या पूर्वी देशाच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटत असे, आज सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक याचा अभिमान वाटतो. आमच्या सीमा पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आहेत. पूर्वी देशाचा ईशान्य भाग असंतुलित विकासामुळे, भेदभावामुळे दुखावला गेला होता, दुःखी होता. आज आपला इशान्य प्रदेश आपल्या हृदयाशी जोडला गेला आहे आणि आधुनिक पायाभूत सुविधांशीसुद्धा जोडला जात आहे. सेवा, सुशासन आणि गरीबांच्या कल्याणासाठी बनवल्या गेलेल्या आमच्या योजनांमुळे लोकांच्या दृष्टीने सरकारचा अर्थच बदलून टाकला आहे. आता सरकार म्हणजे मायबाप नाही, तो जमाना गेला, आता सरकार सेवक आहे, सेवक, जनता जनार्दनाचा सेवक. आता सरकार जीवनात दखल देण्यासाठी नाही तर जीवन सोपे करण्यासाठी काम करत आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही विकासाचे राजकारण देशाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. विकासाच्या याच आशेमुळे लोक पुन्हा स्थिर सरकार निवडून देत आहे आणि डबल इंजिनचे सरकार निवडून देत आहे.
मित्रहो,
आपण नेहमी ऐकत असतो की सरकार येते, सरकार जाते, परंतु सिस्टीम तीच राहत असते. आमच्या सरकारने या सिस्टीमला गरिबांच्या बाबतीत जास्त संवेदनशील बनवले, व्यवस्थेमध्ये सातत्याने सुधारणा केल्या. पीएम आवास योजना असो, शिष्यवृत्ती देणे असो, किंवा निवृत्तीवेतन योजना, तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही भ्रष्टाचाराला कमीत कमी वाव ठेवला आहे. यापूर्वी प्रश्न हे कायमच्या समस्या असल्यासारखे मानले जात होते, त्या प्रश्नांना आम्ही कायमचा तोडगा देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण हे लक्ष्य असेल तेव्हा काम कसे होते त्याचे एक उदाहरण आहे ते म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना. आता मी जे म्हणत होतो, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यामध्ये थेट 21 हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत.
मित्रहो,
आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे होत आहे. त्यांच्या सन्मानासाठीच हा निधी आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये अशाच प्रकारे थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून आम्ही देशवासीयांच्या खात्यांमध्ये बावीस लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम ट्रान्सफर केली आहे आणि पूर्वी शंभर रुपये पाठवले तर आधी 85 पैसे गायब होऊन जात असत. जेवढे पैसे पाठवले तेवढे संपूर्णपणे योग्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाठवले गेले आहेत.
मित्रहो,
आज या योजनेमुळे सव्वा दोन लाख करोड रुपयांची गळती थांबवली गेली आहे. यापूर्वी हेच सव्वा दोन लाख करोड रुपये मध्यस्थांच्या हातात जात असत. या थेट लाभ हस्तांतरण योजनेमुळे देशात सरकारी योजनांचा गैरफायदा घेणारी नऊ कोटींपेक्षा अधिक खोटी नावे आम्ही यादीतून हटवली आहेत. आपण कल्पना करा, खोटी नावे चढवून गॅस सबसिडी, मुलांच्या शिक्षणासाठी पाठवलेली फीस, कुपोषणमुक्तीसाठी पाठवला गेलेला पैसा सर्व काही लुटण्याचा एक उघड-उघड खेळच देशात चालत होता. देशातील गरिबांबाबत हा अन्याय होत नव्हता का? जी मुले उज्वल भविष्याची आशा बाळगतात त्या मुलांवर हा अन्याय नव्हता? हे पाप नव्हते का? जर कोरोना काळात ही 9 कोटी बनावट नावे कागदपत्रात असती तर गरिबांना सरकारच्या प्रयत्नांचा लाभ मिळू शकला असता का?
मित्रहो,
जेव्हा गरिबांना दररोज करावा लागणारा संघर्ष कमी होतो, जेव्हा तो शक्तीशाली होतो तेव्हा तो आपली गरिबी दूर करण्यासाठी नव्या ऊर्जेनिशी कामाला लागतो. याच विचारांसह आमचे सरकार पहिल्या दिवसापासून गरिबाला शक्तीशाली करण्याच्या कामी लागले आहे. आम्ही त्याच्या जगण्यातील हर एक चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज देशातील तीन कोटी गरिबांकडे त्यांचे स्वतःचे पक्के आणि नवीन घर आहे. जिथे आज ते राहायलासुद्धा लागले आहेत. आज देशातील 50 कोटींपेक्षा जास्त गरिबांकडे पाच लाख रुपयांपर्यंतच्या विनामूल्य इलाजाची सुविधा आहे. आज देशातील 25 कोटींहून अधिक गरिबांकडे 2-2 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि टर्म विमा आहे, विमा आहे. आज 45 कोटी गरिबांच्याकडे जनधन खाते आहे.
मित्रहो,
आज मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की देशात अपवादानेच असे कुटुंब असेल जे सरकारच्या कोणत्याही योजनेशी जोडले गेलेले नाही, त्या योजनेचा त्याला फायदा होत नाही. आम्ही दूर दूर पर्यंत जाऊन लोकांना लस दिली आहे. देश जवळपास दोनशे कोटी लसमात्रांच्या रेकॉर्ड करण्याच्या स्तरावर जाऊन पोहोचत आहे आणि मी जयरामजींचे अभिनंदन करतो की करोना काळात ज्याप्रकारे त्यांच्या सरकारने काम केले आणि हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी लसीकरण एवढ्या वेगाने चालवले. हिंदुस्थानात सर्वात आधी लसीकरणाचे काम पूर्ण करणाऱ्यांमध्ये जयरामजींचे सरकार वरच्या स्थानावर आहे. मित्रहो, आम्ही गावात राहणाऱ्या सहा कोटी कुटुंबांना स्वच्छ पाण्याच्या जोडणीशी जोडले आहे, नल से जल.
मित्रहो,
आम्ही 35 कोटी मुद्रा कर्ज देऊन गावातील आणि छोट्या शहरातील करोडो युवकांना स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिली आहे. मुद्रा कर्ज घेऊन कोणी टॅक्सी चालवत आहे, कोणी शिवणकामाचे दुकान टाकत आहे तर एखादी मुलगी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. फेरीवाले, ठेले, हे काम करणाऱ्या साधारण 35 लाख मित्रांना पहिल्यांदाच बँकेकडून कर्ज मिळाले आहे. आपले काम वाढवण्याचा मार्ग मिळाला आहे. आणि ही जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, ज्यामध्ये बँकेकडून 70 टक्के पैसा मिळवणाऱ्यामध्ये 70 टक्के आमच्या माता भगिनींचा समावेश आहे. त्या आज नवउद्योजक बनून लोकांना रोजगार देत आहेत.
मित्रहो,
इथे हिमाचल प्रदेशातील प्रत्येक घरातून, अगदी एखादे कुटुंब अपवाद असेल की त्या कुटुंबातील कोणीही सैनिक नाही. ही शूरवीरांची भूमी आहे ही वीरमातांची भूमी आहे, ज्या आपल्या कुशीतून अशा शूरवीरांना जन्म देतात जे मातृभूमीच्या रक्षणासाठी 24 तास स्वतः मेहनत करतात.
मित्रहो
ही सैनिकांची भूमी आहे, सैनिक कुटुंबांची भूमी आहे. आधीच्या सरकारने त्यांच्याबरोबर कशा तऱ्हेने वर्तणूक ठेवली होती, वन रैंक वन पेंशन या नावाखाली कशाप्रकारे फसवले होते ते येथील लोक कधीही विसरू शकत नाहीत. आता आम्ही एका माजी सैनिक बरोबर बोलत होतो. त्यांचे जीवन सैन्यात गेले आहे. आम्ही आल्यानंतर त्यांना स्वतःचे पक्के घर मिळाले. मित्रहो, त्यांना निवृत्त होऊन सुद्धा तीस-चाळीस वर्षे होऊन गेली आहेत.
मित्रहो,
सैनिकांचे कुटुंबीय आमच्या संवेदनशीलतेला जास्त चांगले समजू शकतील. हे आमचे सरकार आहे. ज्यांनी चार दशके ज्याची वाट बघितली जात होती ती पेन्शन लागू केली. आमच्या माजी सैनिकांना एरिअर्सची रक्कम दिली. हिमाचल प्रदेशात प्रत्येक कुटुंबाला याचा खूप मोठा फायदा झाला आहे.
आमच्या देशामध्ये कित्येक दशके वोट बँकेचे राजकारण झाले आहे. आपली आपली वोट बँक बनवण्याच्या राजकारणाने देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. आम्ही वोट बँक उभारण्यासाठी नाही तर नवीन भारत उभारण्यासाठी काम करत आहोत. जेव्हा राष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्येय्य असते, जेव्हा आत्मनिर्भर भारत हे लक्ष्य असते, जेव्हा 130 कोटी देशवासीयांची सेवा आणि त्यांचे कल्याण हे उद्दिष्ट असते, तेव्हा वोटबँक बनवली जात नाही. सर्व देशवासीयांचा विश्वास जिंकून घेतला जातो. म्हणूनच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या भावनेने पुढे मार्गक्रमण करत आहोत. सरकारी योजनांचा लाभ सगळ्यांना मिळावा, प्रत्येक गरिबाला मिळावा, कोणीही गरीब त्यापासून वंचित राहू नये आता हाच सरकारचा विचार आहे आणि याच भावनेने आम्ही काम करत आहोत.
आम्ही शंभर टक्के लाभ देण्याचा आणि शंभर टक्के लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. लाभार्थी भरपूर असावेत, सर्वांना लाभ मिळावा, यासाठी कार्य केले जात आहे. शंभर टक्के सबलीकरण म्हणजे भेदभाव संपुष्टात येणार, शिफारस, तुष्टीकरण अशा गोष्टी होणार नाहीत. शंभर टक्के सशक्तीकरण म्हणजे प्रत्येक गरीबाला सरकारी योजनांचा पूर्ण लाभ मिळणे होय.
जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशामध्ये या दिशेने चांगले काम होत आहे, हे जाणून मला खूप चांगले वाटले. प्रत्येक घराला नळाव्दारे पाणी योजनेमध्येही हिमाचलने 90 टक्के काम पूर्ण केले आहे. किन्नौर, लाहौल-स्पिती, चंबा, हमीरपूर या सारख्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के योजनांचे काम करण्यात यश मिळाले आहे.
मित्रांनो,
मला चांगले आठवतेय, 2014 च्या आधी ज्यावेळी आपल्यामध्ये येत होतो, त्यावेळी म्हणत होतो की, भारत जगाबरोबर नजर खाली करून नाही तर, नजरेला नजर भिडवून बोलेल. आज भारत, नाइलाजाने मैत्रीचा हात पुढे करीत नाही. ज्यावेळी नाइलाजाने हात पुढे केला जातो, तो अशा कारणासाठी असतो की, समोरच्याला आपण मदत करणार आहोत. कोरोना काळामध्येही आपण 150 पेक्षा जास्त देशांना औषधे पाठवली, लस पाठवली. यामध्ये हिमाचल प्रदेशच्या औषध निर्मिती केंद्रांनी मोठी भूमिका बजावली आहे.
भारताने सिद्ध करून दाखवले की, आपल्याकडे क्षमताही आहे आणि आम्ही कार्यही करू शकतो. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही आता हे मान्य केले आहे की, भारतामधली गरीबी कमी होत आहे. लोकांकडे आता सुविधा वाढल्या आहेत. म्हणूनच भारताला फक्त आपल्या लोकांची आवश्यकता पूर्ण करायची आहे असे नाही तर लोकांमध्ये जागृत झालेल्या आकांक्षाही आपण पूर्ण करायच्या आहेत.
आपल्याला 21 व्या शतकातल्या मजबूत भारतासाठी, आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला परिश्रम करायचे आहेत. एक असा भारत निर्माण करायचा आहे, की ज्याची ओळख अभाव असलेला देश म्हणून नाही तर आधुनिक असणारा देश म्हणून निर्माण झाली पाहिजे. एक असा भारत, ज्यामध्ये स्थानिक उत्पादक, स्थानिक मागणी तर पूर्ण करतातच आणि जगाच्या बाजारपेठेमध्येही आपल्या विक्री करतात. एक असा भारत, जो आत्मनिर्भर असेल, जो आपल्या लोकलसाठी व्होकल असेल. ज्याला आपल्या स्थानिक उत्पादनाचा अभिमान वाटत असेल.
आपल्या हिमाचलचे तर हस्तशिल्प, इथली वास्तुकला, अशीच खूप प्रसिद्ध आहे. चंबाचे धातूकाम, सोलनची पाइन कला, कांगडाची मिनिएचर चित्रकला वेगळी त्यामुळे हे पाहण्यासाठी येणारे पर्यटक तर आश्चर्यचकीत होतात. अशी उत्पादने, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली पाहिजेत. बाजारपेठांची शान वाढविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.
तसे पाहिले तर बंधू आणि भगिनींनो, हिमाचलच्या स्थानिक उत्पादनांचा चकचकाट आता तर काशी बाबा विश्वनाथ मंदिरापर्यंत पोहोचला आहे. कुल्लूमध्ये बनविलेली, आमच्या माता-भगिनी बनवितात, कुल्लूमध्ये बनविण्यात आलेली ‘पूहलें’ कडाक्याच्या थंडीच्या दिवसात काशी विश्वनाथ मंदिराच्या पूजारी आणि सुरक्षा रक्षकांची मदत करते. बनारसचा खासदार या नात्याने मी भेट देण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या लोकांचे विशेष आभार व्यक्त करतो.
मित्रांनो,
गेल्या आठ वर्षांच्या प्रयत्नांचे जे परिणाम आता दिसून येत आहेत, त्यामुळे माझ्या मनामध्ये खूप मोठा विश्वास निर्माण झाला आहे. आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपल्या भारतावासियांच्या दृष्टीने कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य आहे, असे अजिबात नाही. आज भारत जगातला सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. आज भारतामध्ये विक्रमी परदेशी गुंतवणूक होत आहे. आज भारताने निर्यातीचे नवेनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. आठ वर्षांपूर्वी स्टार्ट अप्स उद्योग देशात कुठेही नव्हते. आज आपण जगामध्ये तिसरी मोठी स्टार्ट अप परिसंस्था निर्माण केली आहे. जवळ-जवळ दर आठवड्याला हजार कोटी रूपयांची कंपनी आपले युवक तयार करीत आहेत. आगामी 25 वर्षांच्या विराट संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी देश नवीन अर्थव्यवस्थेसाठी नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती वेगाने करीत आहे.
आपण एकमेकांना पूरक, समर्थन-पाठिंबा देणारी बहुस्तरीय संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या अंदाजपत्रकामध्ये जी पर्वतमाला योजनेची घोषणा केली आहे, त्या योजनेमुळे हिमाचल सारख्या डोंगराळ प्रदेशामध्ये संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल. इतकेच नाही, तर आम्ही ‘व्हायब्रंट ब्रॉर्डर व्हिलेज’ यासारख्या योजनेसाठीही अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे सीमेवरच्या गावे चांगली व्हायब्रंट बनतील, पर्यटकांनाच्या दृष्टीने आवडती स्थाने बनतील. अनेक क्रियाकलापांचे केंद्र ही गावे बनतील. सीमेला लागून असलेल्या गावांच्या विकासासाठी भारत सरकारने एक विशेष योजना तयार केली आहे. या व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज योजनेचा लाभ माझ्या हिमाचलच्या सीमावर्ती गावांना स्वाभाविक रूपाने मिळणार आहे.
मित्रांनो,
आज ज्यावेळी आपण जगातल्या सर्वश्रेष्ठ डिजिटल पायाभूत सुविधा बनविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहोत. आपल्या देशभरामध्ये आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणाचे काम केले जात आहे. आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मोहिमे अंतर्गत जिल्हा आणि प्रभाग स्तरावर गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य दक्षता सुविधा आम्ही तयार करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, या दिशेने काम सुरू आहे. आणि इतकेच नाही तर गरीब माता आपल्या मुलाला अथवा मुलीला आता डॉक्टर बनवण्याचे स्वप्नही पूर्ण शकणार आहे. आधी तर अशी परिस्थिती होती की, जर त्या मुला-मुलीचे शाळेत इंग्रजी शिक्षण झाले नसेल तर त्या अपत्याला डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच रहायचे. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षण आपण मातृभाषेतून मिळावे, यासाठी प्रोत्साहन देत आहोत. यामुळे गरीबातल्या गरीबाचे मूल, गावांतली मुलेही डॉक्टर बनू शकतील. आणि म्हणूनच त्याला इंग्रजीचे गुलाम होण्याची गरज पडणार नाही.
मित्रांनो,
देशामध्ये एम्ससारख्या उत्कृष्ट संस्थांचा व्याप्ती देशाच्या दूर-दुर्गम राज्यांपर्यंत वाढविण्यात येत आहे. बिलासपूरमध्ये निर्माण होत असलेले एम्स हे याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आता हिमाचलवासियांना चंदीगढ अथवा दिल्ली येथे जाण्याची गरज पडणार नाही.
मित्रांनो,
हे सर्व प्रयत्न हिमाचल प्रदेशाच्या विकासालाही वेग देण्याचे काम करीत आहे. ज्यावेळी अर्थव्यवस्था मजबूत असते, रस्ते संपर्क यंत्रणा, इंटरनेट संपर्क व्यवस्था, आरोग्य सेवा सुधारणा होते, त्यावेळी पर्यटनालाही प्रोत्साहन मिळते. भारत आपल्याकडे ज्या पद्धतीने ड्रोनचे उत्पादन वाढवत आहे, ड्रोनचा वापर वाढवत आहे, त्यामुळे सुदूर-दुर्गम क्षेत्रातल्या, हिंदुस्तानमधले जे दुर्गम, पोहोचण्यासाठी अवघड भाग आहेत, त्यांना ड्रोन सेवेचा खूप मोठा लाभ मिळणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या आठ वर्षांमध्ये स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षासाठी म्हणजेच 2047 साठी भक्कम आधार तयार झाला आहे. या अमृतकाळामध्ये सिद्धीसाठी एकच मंत्र आहे, - सबका प्रयास! सर्वांनी कामामध्ये सहभागी व्हावे आणि सर्वांनी पुढे मार्गक्रमणा करावी. याच भावनेने आम्ही कार्यरत आहोत. कितीतरी दशकांनंतर आणि कितीतरी पिढ्यांनंतर आपल्या पिढीला हे सौभाग्य मिळाले आहे. म्हणूनच, चला तर मग, या आपण संकल्प करू या. आपण सर्वजण मिळून, सर्वांच्या प्रयत्नांनी - ‘हम सबका प्रयास‘ च्या आवाहनामध्ये आपल्या सर्वांची सक्रीय भागीदारी असली पाहिजे. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
याच विश्वासाने आज हिमाचलने जो आशीर्वाद दिला आहे. आणि देशाच्या प्रत्येक विभागातून आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले, जोडले गेलेले लोक आहेत. आज संपूर्ण हिंदुस्तान सिमल्याला जोडला गेला आहे. कोट्यवधी -कोट्यवधी लोक आज जोडले गेले आहेत. आज मी सिमल्याच्या भूमीवरून त्या कोट्यवधी देशवासियांबरोबर संवाद साधत आहे. मी त्या कोट्यवधी देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम रहावेत, आपण आणखी जास्त काम करीत रहावे, रात्रंदिवस कार्यरत रहावे, अगदी आपले प्राण ओतून काम करीत रहावे. अशा एका भावनेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादासह मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अगदी मनापासून- हृदयापासून धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जयघोष करावा -
भारत माता की -जय !
भारत माता की -जय !!
भारत माता की -जय !!!
खूप- खूप धन्यवाद !!