जलजीवन अभियानांतर्गत यादगीर बहुग्राम पेयजल पुरवठा योजनेची केली पायाभरणी
नारायणपूर डाव्या कालव्याचे - विस्तार नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन
एनएच-150 सी च्या बादादल ते मरादगी एस आंदोला पर्यंतच्या सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाच्या 65.5 किमी कामाची केली पायाभरणी
"या अमृतकाळात आपल्याला विकसित भारत निर्माण करायचा आहे"
"देशातील एक जिल्हा जरी विकासाच्या मापदंडात मागे राहिला तरी देशाचा विकास होऊ शकत नाही"
“शिक्षण असो, आरोग्य वा संपर्क व्यवस्था असो, कामगिरीच्या बाबतीत यादगीर हा आकांक्षित जिल्ह्यांच्या कार्यक्रमातील अव्वल 10 जिल्ह्यांमधे आहे”
"डबल इंजिन सरकार सुविधा आणि संचयाच्या दृष्टिकोनातून काम करत आहे"
"यादगीरच्या सुमारे 1.25 लाख शेतकरी कुटुंबांना पीएम किसान निधीतून सुमारे 250 कोटी रुपये मिळाले आहेत"
"छोटे शेतकरी हे देशाच्या कृषी धोरणाचे सर्वोच्च प्राधान्य"
"डबल-इंजिन सरकारने, पायाभूत सुविधा आणि सुधारणांवर भर देत केलेल्या प्रयत्नांमुळे कर्नाटक गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे"

भारत माता की–जय !

भारत माता की–जय !

कर्नाटकचे राज्यपाल श्री थावरचंद गेहलोतजी, मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री भगवंत खुबा जी, कर्नाटक सरकारचे मंत्रीगण, खासदार तसच आमदार आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो!

कर्नाटक दा, एल्ला, सहोदरा सहोदरियारिगे, नन्ना वंदानेगड़ू!(कर्नाटकच्या माझ्या बंधू-भगिनींनो नमस्कार) जिथे जिथे माझी नजर पोहोचतेय, तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत. हेलिपॅडसुद्धा चारी बाजूंनी खचून भरलं आहे. आणि इथेही मी मागच्या बाजूला पाहतोय चारी बाजूंनी या भव्य मंडपाच्या बाहेर हजारो लोक उन्हातान्हात उभे आहेत. आपलं प्रेम, आपले आशीर्वाद, आम्हा सर्वांची खूप मोठी ताकद आहे.

मित्रहो,

यादगीरला समृद्ध इतिहास आहे.  रट्टिहल्लीचा प्राचीन किल्ला आपल्या भूतकाळाचं, आपल्या पूर्वजांच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे.  आपल्या परंपरेशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या वारशाशी निगडीत, अनेक भाग, अनेक ठिकाणं आपल्या या प्रदेशात आहेत.इथे  सुरापूर राजवटीचा वारसा आहे. महान राजा व्यंकटप्पा नायक यानं आपल्या स्वराज्य आणि सुशासनानं हा वारसा देशभरात ख्यातकीर्त केला होता.  या वारशाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मी आज कर्नाटकच्या विकासाशी निगडित हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प आपल्याकडे सुपूर्द करण्यासाठी म्हणजेच लोकार्पण करण्यासाठी आणि नव्या प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी आलो आहे. आत्ताच इथे पाणी आणि रस्ते विकासाशी निगडित अनेक मोठमोठ्या प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण झालं आहे. नारायणपूर धरणाच्या डाव्या किनारी कालव्याचा विस्तार आणि आधुनिकीकरणामुळे, यादगीर, कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.यादगीर ग्राम बहुपाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील लाखो कुटुंबांना पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या कर्नाटकमध्ये येत असलेल्या पट्ट्यावरसुद्धा आज काम सुरू झालं आहे.  यामुळे यादगीर, रायचूर आणि कलबुर्गीसह या संपूर्ण प्रदेशात लोकांचं जीवन सुलभ आणि सुकर होईल आणि येथील उद्योग तसंच  रोजगारालाही मोठी चालना मिळेल.  या सर्व विकासप्रकल्पांसाठी कर्नाटकातील यादगीरच्या सर्व जनतेचं खूप खूप अभिनंदन!  मी बोम्मई जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचेही खूप अभिनंदन करतो.  उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी ज्या वेगानं काम होत आहे ते कौतुकास्पद आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.  आता देश पुढील 25 वर्षांसाठीचे नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी आगेकूच करत आहे.  ही 25 वर्षे देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अमृत काळ आहेत, प्रत्येक राज्यासाठी तो अमृत काळ आहे.  या अमृतकाळात आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे.  जेव्हा देशातील प्रत्येक नागरीक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य या अभियानात सहभागी होईल तेव्हाच भारताचा विकास होऊ शकेल. शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा उद्योगात काम करणारा मजूर असो, प्रत्येकाचं आयुष्य जेव्हा सुखकर  होईल, तेव्हाच भारताचा विकास होऊ शकेल. जेव्हा शेतात पीक चांगलं येईल आणि कारखान्यांची संख्या वाढून  भरभराटही होईल, तेव्हाच भारताचा विकास होईल.

 

आणि मित्रांनो,

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण गेल्या दशकांतील वाईट अनुभवातून, चुकीची धोरणं-आडाखे यामधून काही तरी शिकू आणि चुकांची पुनरावृत्ती टाळू.  उत्तर कर्नाटकातील यादगीरचं उदाहरण आपल्यासमोर आहे.  या क्षेत्राचं सामर्थ्य कुणाहून कमी नाही.  एवढं सामर्थ्य असूनही विकासाच्या प्रवासात हा प्रदेश खूप मागे राहिला.  यादगीरसह अनेक जिल्हे मागास घोषित करून आधीच्या सरकारांनी जबाबदारीतून आपलं अंगं काढून  घेतलं होतं.  या भागाच्या मागासलेपणामागील कारणं काय, या भागाचं मागासलेपण कसं दूर होईल, यावर साधा विचार करायलाही आधीच्या सरकारांकडे वेळ नव्हता, त्यासाठी काही प्रयत्न करायचं तर बाजूलाच राहिलं. रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची जेव्हा वेळ होती, तेव्हा त्या वेळी सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षांनी मतपेढीच्या राजकारणावर जोर दिला.  या जातीचं मत, त्या धर्माचं मत, आपल्यालाच कसं मिळेल याच दृष्टीनं फक्त प्रत्येक योजना आणि प्रत्येक कार्यक्रम आखले गेले.  यामुळे कर्नाटकला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं, आपल्या संपूर्ण प्रदेशाला याचा फटका बसला, माझ्या आपणा सर्व बंधू-भगिनींचं नुकसान झालं आहे.

मित्रहो,

आमच्या सरकारचं प्राधान्य मतपेढीच्या राजकारणाला नाही, आमचा प्राधान्यक्रम आहे, विकास, विकास आणि विकास! 2014 मध्ये तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिले, माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली.  मला माहीत आहे की देशातील एकही जिल्हा जोपर्यंत विकासाच्याबाबतीत मागासलेला राहील तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकणार नाही. त्यामुळेच मागील सरकारनं मागास घोषित केलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाची ईच्छा आम्ही रुजवली, विकासाच्या आकांक्षेला आम्ही खतपाणी घातलं.  आमच्या सरकारनं यादगीरसह देशातील अशा 100 हून जास्त जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम सुरू केला.

आम्ही या जिल्ह्यांमध्ये सुशासनावर जोर दिला, चांगल्या राज्यकारभारावर भर दिला. विकासाच्या प्रत्येक पैलूवर काम सुरू केलं. यादगीरसह सर्व आकांक्षी जिल्ह्यांना याचा लाभदेखील मिळाला आहे. आज पहा, यादगीरनं लहान मुलांचं शंभर टक्के म्हणजेच सर्व लहान मुलांचं लसीकरण करून दाखवलं आहे. यादगीर जिल्ह्यातल्या कुपोषित मुलांचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे. या जिल्ह्यातील शंभर टक्के म्हणजे सर्वच गावं रस्त्यांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत.

इथल्या ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल सेवा पुरवण्यासाठी सार्वजनिक सेवा केंद्र आहेत. शिक्षण असो, आरोग्य असो, संपर्क व्यवस्था असो, यादगीर जिल्ह्यानं आपल्या कामगिरीनं पहिल्या दहा सर्वोच्च आकांक्षी जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. आणि त्यामुळेच इथल्या लोकप्रतिनिधींचं, जिल्हा प्रशासनाच्या चमूचं   मी माझ्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. यादगीर जिल्ह्यात आज नवनवीन उद्योग येत आहेत. इथे फार्मा पार्क म्हणजेच औषध निर्मिती केंद्र उभारायलासुद्धा केंद्र सरकारनं मान्यता  दिली आहे.

बंधू आणि भगिनिंनो,

जलसुरक्षा हा असा विषय आहे, जो 21 व्या शतकातील भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक आहे.  भारताचा विकास साधायचा असेल, तर सीमा सुरक्षा, किनारी सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा यांच्याप्रमाणेच जलसुरक्षेशी संबंधित आव्हानांवरसुद्धा मात करावी लागेल.

दुहेरी इंजिनचं सरकार(केंद्र आणि राज्यात एकाच पक्षांचं सरकार), सुविधा आणि जमेचा विचार करूनच काम करत आहे.  2014 मध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली तेव्हा 99 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून रखडलेल्या अवस्थेत होते.  आज यापैकी सुमारे 50 योजना पूर्ण झाल्या आहेत.  आम्ही जुन्या योजनांवरही काम केलं आणि आमच्याकडे आधीपासून असलेल्या साधनसंपत्तीचा अधिक विस्तार करण्यावरही भर दिला.

उर्वरीत कर्नाटकातही अशा अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे.  नद्या जोडून कोरड्या दुष्काळग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात आहे.  नारायणपूर धरणाच्या डाव्या किनारी कालवा प्रणालीचा विकास आणि विस्तार हा देखील या धोरणाचाच एक भाग आहे.  आता जी नवी व्यवस्था निर्माण झाली आहे, त्यात नव्या तंत्रज्ञानाची भर पडल्यानं साडेचार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.  आता कालव्याच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पुरेसं पाणी पुरेशा वेळेत पोहोचू शकणार आहे.

 

मित्रांनो,

आज देशात पर ड्रॉप मोअर क्रॉप वर, सूक्ष्म सिंचनावर अभूतपूर्व भर दिला जात आहे. गेल्या सहा-सात वर्षात, 70 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणली गेली  आहे. कर्नाटकातदेखील या क्षेत्रात खूप चांगले काम झाले आहे. आज कर्नाटकात, सूक्ष्म सिंचनाशी संबंधित ज्या प्रकल्पांवर काम सुरू आहे, त्यामुळे, पाच लाख हेक्टर भूमीला लाभ होणार आहे.

दुहेरी इंजिनाचे सरकार, भूजल पातळी उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. अटल भूजल योजना असो, अमृत सरोवर अभियानाअंतर्गत, प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव बनवण्याची योजना असो किंवा मग कर्नाटक सरकारच्या आपल्या काही योजना असोत, यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

दुहेरी इंजिनाचे सरकार, कसे काम करु शकते, याचे उत्तम उदाहरण आपल्याला जलजीवन अभियानातही दिसते आहे. साडे तीन वर्षांपूर्वी, जेव्हा हे अभियान सुरू झाले होते, तेव्हा देशातील 18 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी केवळ तीन कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळजोडण्या होत्या. आज देशातील जवळपास, आणि हा आकडा लक्षात घ्या- आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो होतो, तेव्हा तीन कोटी घरांमध्ये आणि आज सुमारे 11 कोटी ग्रामीण कुटुंबांकडे घरात, नळाने पाणीपुरवठा होतो आहे.

म्हणजे  आमच्या सरकारने देशातल्या आठ कोटी नव्या ग्रामीण कुटुंबांपर्यंत पाईपने पाणी पोहोचवले आहे. आणि यात कर्नाटकमधील 35 लाख ग्रामीण कुटुंबांचा समावेश आहे.

मला अतिशय आनंद आहे, की यादगीर आणि रायचूरच्या प्रत्येक घरातील या योजनेच्या व्याप्तीची सरासरी, कर्नाटक आणि संपूर्ण देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. आणि जेव्हा नळाने घरात पाणीपुरवठा सुरू होतो ना, त्यावेळी माता-भगिनी मोदीला खूप आशीर्वाद देतात. प्रत्येक दिवशी जेव्हा नळाने पाणी येते, तेव्हा, मोदीसाठी त्यांच्या आशीर्वादाचा प्रवाहही सुरू होतो. आज ज्या योजनेची पायाभरणी झाली आहे, त्यामुळे यादगीर इथे घरोघरी  नळाने पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाला आणखी गती मिळणार आहे.

जल जीवन अभियानाचा आणखी एक फायदा मला आपल्याला सांगायचा आहे. एका अध्ययनातून असे समोर आले आहे, की भारतात जल जीवन अभियानामुळे, दरवर्षी आपण सव्वा लाखपेक्षा अधिक मुलांचे  आयुष्य वाचवू शकतो. आपण कल्पना करु शकता, सव्वा लाख बालके, दरवर्षी मृत्यूच्या जबड्यात जाण्यापासून वाचले तर परमेश्वर देखील आपल्याला आशीर्वाद देतो मित्रांनो,आणि जनता जनार्दनाचाही आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, दूषित पाण्यामुळे, आपल्या मुलांच्या आयुष्यावर किती मोठे संकट होते. आणि आता मात्र, आमच्या सरकारने आपल्या मुलांचे आयुष्य वाचवले आहे.

बंधू आणि  भगिनींनो,

हर घर जल अभियान दुहेरी इंजिनाच्या सरकारच्या दुहेरी लाभाचेही उदाहरण आहे. दुहेरी इंजिन म्हणजे दुहेरी कल्याण. दुहेरी गतीने विकास, कर्नाटकला यामुळे कसा लाभ मिळतो आहे, हे तर आपण सर्वांना माहितीच आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देते. तर कर्नाटक सरकारने यात 4000 रुपये आणखी जोडले आहेत.  ज्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होईल.इथे यादगीर मधल्या देखील, सुमारे सव्वा लाख शेतकरी कुटुंबांना पीएम किसान निधी योजनेअंतर्गत सुमारे 250 कोटी रुपये मिळाले आहेत.

 

 

मित्रांनो,

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. तर इथे कर्नाटक सरकार, विद्या निधी योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबांतील मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार, महामारी आणि इतर संकटांच्या काळातही जलदगती विकासासाठी पावले उचलत आहे. तर राज्य सरकार या पावलांचा लाभ घेत, कर्नाटकला देशातील गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनवण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे.

केंद्र सरकार विणकरांना मुद्रा योजनेअंतर्गत, मदत देत आहे. तर, कर्नाटक सरकारने महामारीच्या काळात त्यांचे कर्ज माफ केले होते. म्हणजे कळले ना, डबल इंजिन म्हणजे डबल बेनिफिट, दुहेरी लाभ ! 

मित्रांनो,

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, त्यानंतरही जर कुठली व्यक्ती अशा लाभांपासूम वंचित असेल, कोणते क्षेत्र वंचित असले, तर आमचे सरकार, अशा वंचितांना सर्वाधिक प्राधान्य देत आहे. आणि वंचितांना प्राधान्य, हाच आम्हा सर्व लोकांच्या कार्य करण्याचा मार्ग आहे. संकल्प आहे, मंत्र आहे. आपल्या देशात, अनेक  दशके कोट्यवधी छोटे शेतकरी देखील सुखसुविधांपासून वंचित राहिले आहेत. सरकारच्या धोरणांच्या आखणीत, त्यांच्याकडे लक्षही दिले गेले नाही.

आज हाच छोटा शेतकरी, देशाच्या कृषी धोरणात प्राधान्यस्थानी आहे. आज आपण शेतकऱ्याला यंत्रांसाठी  मदत करत आहोत, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे त्याला घेऊन जात आहोत. नॅनो युरियासारखी आधुनिक खते उपलब्ध करुन देत आहोत. तर दुसरीकडे नैसर्गिक शेतीलाही प्रोत्साहन देत आहोत. आज छोट्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहेत. छोटे शेतकरी, तसेच भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी, पशुपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासाठीही मदत केली जात आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज जेव्हा मी यादगीर इथे आलो आहे, तेव्हा कर्नाटकच्या श्रमिक शेतकऱ्यांचे आणखी एका गोष्टीसाठी मी आभार व्यक्त करतो. हा  प्रदेश डाळींसाठी प्रसिद्ध प्रदेश मानला जातो. इथल्या डाळी देशभर पाठवल्या जातात. गेल्या सात-आठ वर्षात जर भारताने, डाळींसाठी आपले परदेशांवरील अवलंबित्व कमी केले आहे, तर त्यात, उत्तर कर्नाटकच्या शेतकऱ्यांची खूप मोठी भूमिका आहे. 

केंद्र सरकारने देखील, या आठ वर्षात शेतकऱ्यांकडून 80 पट अधिक डाळ  किमान हमीभावानुसार खरेदी केली आहे. 2014 च्या आधी , जिथे  डाळ उत्पादक शेतकऱ्यांना काही शे कोटी रुपये मिळत असत,तिथे आमच्या सरकारने मात्र, 60 हजार कोटी रुपये दिले आहेत.

आता देश अन्नधान्यात आत्मनिर्भरता आणण्यासाठी देखील विशेष अभियान चालवत आहे. याचा लाभ देखील कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. आज जैवइंधन, इथेनॉल उत्पादन आणि त्याचा उपयोग करण्यासाठी, आज देशभरात खूप मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. सरकारनेपेट्रोल मध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्टही वाढवले आहे. यामुळे देखील कर्नाटकच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो,

एक आणखी खूप मोठी संधी आज जगात निर्माण होते आहे, ज्याचा लाभ कर्नाटकच्या शेतकऱ्यांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे. भारताच्या आग्रहाला मान देत, संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष, जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटकमध्ये ज्वारी आणि नाचणी यासारख्या भरड धान्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या या पौष्टिक भरड धान्याची पैदास वाढवण्यासाठी आणि जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दुहेरी इंजिनाचे सरकार कटिबद्ध आहे. मला विश्वास आहे, की कर्नाटकचे सरकार देखील त्यात अग्रगण्य भूमिका पार पाडेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

उत्तर कर्नाटकातील आणखी एका आव्हानावर मात करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. हे आव्हान आहे-दळणवळणाचं. शेती असो, उद्योग असो किंवा मग पर्यटन असो. सर्वांसाठी हे दळणवळण-वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. आज जेव्हा देश या वाहतूक व्यवस्थेशी संबंधित पायाभूत सुविधांवर भर देतो आहे, अशावेळी, दुहेरी इंजिनाचे सरकार असल्यामुळे, कर्नाटकलाही त्याचा अधिक लाभ मिळतो आहे. सूरत-चेन्नई आर्थिक कॉरिडॉरचा लाभदेखील, उत्तर कर्नाटकच्या एका खूप मोठ्या भागाला मिळणार आहे. देशातील दोन मोठ्या बंदर शहरांशी जोडले गेल्यामुळे, या संपूर्ण क्षेत्रात नव्या उद्योगांच्या संधी निर्माण होणार आहेत. उत्तर कर्नाटकमधील पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे इथे पोहोचणे देखील, देशबांधवांसाठी अधिक सोपे होणार आहे. यामुळे इथे युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

 

पायाभूत सुविधा आणि सुधारणांवर सरकारच्या दुहेरी इंजिनामुळे कर्नाटक राज्याला गुंतवणूकदार पसंती देत आहेत. ही गुंतवणूक भविष्यात आणखी वाढणार आहे, कारण भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात उत्साह आहे.

या उत्साहाचा पुरेपूर लाभ उत्तर कर्नाटकलाही मिळेल, याची मला खात्री आहे. या प्रदेशाचा विकास सर्वांसाठी समृद्धी घेऊन येवो, अशी सदिच्छा व्यक्त करत पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि अशा अनेक विकास योजनांसाठी तुमचे अभिनंदन करतो.

भारत माता की–जय!

भारत माता की–जय!

भारत माता की–जय!

खूप खूप  धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually

Media Coverage

UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
President of the European Council, Antonio Costa calls PM Narendra Modi
January 07, 2025
PM congratulates President Costa on assuming charge as the President of the European Council
The two leaders agree to work together to further strengthen the India-EU Strategic Partnership
Underline the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA

Prime Minister Shri. Narendra Modi received a telephone call today from H.E. Mr. Antonio Costa, President of the European Council.

PM congratulated President Costa on his assumption of charge as the President of the European Council.

Noting the substantive progress made in India-EU Strategic Partnership over the past decade, the two leaders agreed to working closely together towards further bolstering the ties, including in the areas of trade, technology, investment, green energy and digital space.

They underlined the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA.

The leaders looked forward to the next India-EU Summit to be held in India at a mutually convenient time.

They exchanged views on regional and global developments of mutual interest. The leaders agreed to remain in touch.