रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे आणि नव्याने बांधकाम केलेल्या डेमू/मेमू शेडचे केले लोकार्पण
“ईशान्येच्या या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल”
“नव्या भारताची उभारणी करण्यासाठी गेली 9 वर्षे अभूतपूर्व कामगिरीची ठरली आहेत”
“आमच्या सरकारने गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे”
“पायाभूत सुविधा सर्वांसाठी आहेत आणि त्या भेदभाव करत नाहीत, पायाभूत सुविधांचा विकास हाच खरा सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता आहे”
“पायाभूत सुविधांच्या विकासाचे सर्वात मोठे लाभार्थी पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्ये आहेत”
“भारतीय रेल्वे वेगासोबत मने, समाज आणि संधींना जनतेशी जोडणारे एक माध्यम बनले आहे”

नमस्कार,

आसामचे राज्यपाल श्रीमान गुलाब चंद कटारिया जी, मुख्यमंत्री भाई हेमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सदस्य अश्विनी वैष्णव जी, सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, निशीथ प्रमाणिक जी, जॉन बारला जी, अन्य मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. 

आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम, 

आज ईशान्येकडील राज्यांना आपली पहिली स्वदेशात निर्मित वंदे भारत एक्स्प्रेस मिळत आहे. पश्चिम बंगालला जोडणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. दुसरे काम, आसाम आणि मेघालयमधील जवळपास सव्वा चारशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तिसरे काम, लामडिंगमध्ये नव्याने बांधलेल्या डेमू मेमू कार्यशाळेचे लोकार्पण देखील आजच करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांसाठी मी आसाम आणि मेघालयसह ईशान्येकडील सर्व राज्ये तसेच पश्चिम बंगालच्या माझ्या मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

गुवाहाटी - जलपायगुड़ी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आसाम आणि पश्चिम बंगाल यांच्यातील अनेक शतकांचे जुने संबंध आणखी दृढ करेल. यामुळे या भागात येणे जाणे आणखी जलद गतीने करता येईल. यामुळे महाविद्यालयात, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या युवक मित्रांनाचीही सोय होईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी वाढतील.

ही वंदे भारत एक्स्प्रेस माता कामाख्या मंदिर, काझिरंगा, मानस राष्ट्रीय उद्यान, पोबितोरा वन्यजीव अभयारण्य यांना जोडणारी आहे. या सोबतच मेघालयमधील शिलॉंग, चेरापुंजी आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि पासीघाटापर्यंत देखील पर्यटकांची सुविधा वाढवणारी आहे.

बंधू आणि भगिनींनो,

याच आठवड्यात केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. मागची नऊ वर्षे भारतासाठी अभूतपूर्व यशाची होती, नव्या भारताच्या निर्मितीची होती. कालच देशाला स्वतंत्र भारताची भव्य दिव्य आधुनिक संसद प्राप्त झाली आहे. ही संसद भारताच्या हजारो वर्ष जुन्या लोकशाहीच्या इतिहासाला आपल्या समृद्ध लोकशाहीच्या भविष्याला जोडणारी आहे.

मागच्या नऊ वर्षात आपण काही अशा क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे ज्याबाबत यापूर्वी कल्पना करणे देखील कठीण होते. 2014 पूर्वीच्या दशकात इतिहासातील घोटाळ्यांचे विक्रम मोडीत निघत होते. या घोटाळ्यांमुळे सर्वात जास्त नुकसान देशातील गरिबांचे झाले होते, देशातील अशा क्षेत्रांचे नुकसान झाले होते जे विकासात मागे पडले होते.

आमच्या सरकारने गरीब कल्याणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. गरिबांच्या घरांपासून ते महिलांसाठी शौचालय बांधण्यापर्यंत, पाण्याच्या पाईपलाईन पासून वीज जोडणी पर्यंत, गॅस पाईपलाईन पासून एम्स वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत, रस्ते, रेल्वे, जलमार्ग, बंदरे, विमानतळ, मोबाईल संपर्क सुविधा, या सर्व क्षेत्रात आम्ही संपूर्ण शक्ती लावून काम केले आहे. 

आज भारतात होत असलेल्या पायाभूत सुविधा उभारणीच्या कामाची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. कारण याच पायाभूत सुविधा आपले जीवन सुलभ बनवत असतात. याच पायाभूत सुविधा रोजगाराच्या संधी निर्माण करतात. याच पायाभूत सुविधा गरीब, दलित, मागास, आदिवासी अशा प्रत्येक वंचिताला सशक्त बनवतात. या पायाभूत सुविधा सर्वांसाठी आहेत, समान रूपाने आहेत, कुठल्याही भेदभावाशिवाय आहेत. आणि म्हणूनच पायाभूत सुविधा निर्माण करणे एका प्रकारे खरा सामाजिक न्याय आहे, खरी धर्मनिरपेक्षता आहे.

बंधू आणि भगिनींनो,

पायाभूत सुविधा निर्माणाचा लाभ सर्वात जास्त ज्यांना झाला आहे, तो म्हणजे पूर्व भारत आणि ईशान्य भारताला. आपल्या भूतकाळातील अपयशावर पांघरून घालण्यासाठी काही लोक म्हणतात की यापूर्वीही ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप काम झाले होते. अशा लोकांचे सत्य ईशान्येकडील लोक खूप चांगल्या प्रकारे जाणतात. या लोकांनी ईशान्यकडील राज्यातील जनतेला पायाभूत सुविधांसाठी देखील अनेक दशके वाट पाहायला लावली आहे. या अक्षम्य अपराधामुळे ईशान्येकडील राज्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नऊ वर्षांपूर्वी पर्यंत जी हजारो गावे आणि करोडो परिवार वीज जोडणीपासून वंचित राहिले, त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने ईशान्येकडील राज्यातील कुटुंबे होती. टेलिफोन, मोबाइल संपर्क सुविधेपासून वंचित राहिलेल्यांमध्ये देखील ईशान्येकडील राज्यातील लोकांचे प्रमाण अधिक होते. चांगले रस्ते, रेल्वे, विमानतळ या संपर्क सुविधांचा अभाव देखील ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात होता. 

बंधु आणि भगिनींनो,

जेव्हा सेवाभावाने काम केले जाते तेव्हा बदल कशाप्रकारे घडतात याची साक्षीदार  ईशान्येकडील रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. मी ज्या वेग, व्याप्ती आणि हेतूबद्दल बोलतो त्याचाही हा पुरावा आहे. तुम्ही कल्पना करा, देशातील पहिली रेल्वेगाडी 150 वर्षांपूर्वी मुंबई महानगरातून धावली. त्याच्या तीन दशकांनंतर आसाममध्येही पहिली रेल्वेगाडी धावली होती.

त्या गुलामगिरीच्या काळातही आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल असो, प्रत्येक प्रदेश रेल्वेने जोडलेला होता.  मात्र, तेव्हाचा हेतू जनहिताचा नव्हता. त्यावेळी इंग्रजांचा  हेतू काय होता, या संपूर्ण प्रदेशाची संसाधने लुटण्याचा.  येथील नैसर्गिक संपत्तीची लूट करण्याचा. स्वातंत्र्यानंतर ईशान्येतील परिस्थिती बदलायला हवी होती, रेल्वेचा विस्तार व्हायला हवा होता.  पण ईशान्येकडील बहुतेक राज्ये रेल्वेने जोडण्याचे काम आम्हाला 2014 नंतर करावे लागले.

बंधु आणि भगिनींनो,

तुमच्या या सेवकाने ईशान्येतील लोकांच्या संवेदनशीलतेला आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या 9 वर्षांतील देशातील हा  सर्वात मोठा आणि लक्षणीय बदल आहे, जो विशेषतः ईशान्येने अनुभवला आहे.  ईशान्येकडील रेल्वेच्या विकासासाठीची आर्थिक तरतूदही पूर्वीच्या तुलनेत गेल्या 9 वर्षांत अनेक पटींनी वाढले आहे. 2014 पूर्वी ईशान्येच्या रेल्वेसाठीची सरासरी तरतूद  सुमारे अडीच हजार कोटी रुपये होते.  यावेळी ईशान्येच्या रेल्वेसाठीची तरतूद 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.  म्हणजेच सुमारे 4 पट वाढ झाली आहे. सध्या मणिपूर, मिझोरम, नागालँड, मेघालय आणि सिक्कीम या राज्यांच्या राजधान्यांना देशाच्या इतर भागांशी जोडण्याचे कामही वेगाने सुरू आहे. लवकरच ईशान्येतील सर्व राजधान्या ब्रॉडगेज जाळ्याने जोडल्या जाणार आहेत.  या प्रकल्पांवर एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.  यावरून भाजप सरकार ईशान्येच्या कनेक्टिव्हिटीसाठी किती कटिबद्ध आहे हे दिसून येते.

बंधु आणि भगिनींनो,

आज आपण ज्या प्रमाणात काम करत आहोत, ज्या गतीने काम करत आहोत, ते अभूतपूर्व आहे.  आता ईशान्येत पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने नवीन रेल्वे मार्गिका टाकल्या जात आहेत. ईशान्येकडील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आता पूर्वीच्या तुलनेत 9 पटीने वेगाने होत आहे.  ईशान्येकडील रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण गेल्या 9 वर्षांत सुरू झाले आणि आता ते 100% उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वेगाने होत  आहे.

बंधु आणि भगिनींनो,

वेगासोबतच आज भारतीय रेल्वे मने, समाज आणि संधींना जनतेशी जोडणारे एक माध्यम बनत आहे. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर भारतातील पहिला ट्रान्सजेंडर चहा स्टॉल उघडण्यात आला आहे.  समाजाकडून आपल्याला चांगली वागणूक मिळेल, अशी अपेक्षा असणाऱ्या या मित्रांना  सन्मानाचे जीवन देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे 'एक स्थानक, एक उत्पादन' योजनेअंतर्गत ईशान्येकडील रेल्वे स्थानकांवर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.  ते व्होकल फॉर  लोकलला बळ देत आहेत. त्यामुळे आपले स्थानिक कारागिर, कलाकार, शिल्पकार, अशा मित्रांना नवी बाजारपेठ मिळाली आहे.  ईशान्येकडील शेकडो स्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे. संवेदनशीलता आणि गतीच्या संगमानेच ईशान्य भारत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल.  विकसित भारत घडवण्याचा मार्ग बळकट होईल.

वंदे भारत आणि इतर सर्व प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government