महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी, मुंबई समाचारचे व्यवस्थापकीय संचालक एच. एन. कामा जी, मेहेरवान कामा जी, संपादक निलेश दवे जी, या वृत्तपत्राशी संबंधित सर्वजण, भगिनी आणि सज्जनहो!
निलेशभाई जे बोलले, त्याबद्दल सर्वप्रथम मी माझा विरोध व्यक्त करतो, मी भारताच्या भाग्याचा निर्माता आहे, असे त्यांनी सांगितले, परंतु भारताचा भाग्य विधाता ही जनता जनार्दन आहे, 130 कोटी देशवासी आहेत,मी केवळ एक सेवक आहे.
मला वाटते, जर आज मी आलो नसतो तर बरंच काही गमावलं असतं कारण इथून पहाताना मला जवळपास सगळेच प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत.एवढ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली यापेक्षा विशेष भाग्याची गोष्ट कोणती असू शकते. तिथून अनेक हात उंच करत नमस्कार करत आहेत.
या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या द्विशतकी वर्धापनदिनानिमित्त सर्व वाचक, पत्रकार आणि मुंबई समाचारचे कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन!!या दोन शतकांमध्ये अनेक पिढ्यांचे आयुष्य,त्यांच्या चिंता मुंबई समाचारने मांडल्या आहेत. मुंबई समाचारने स्वातंत्र्य चळवळीलाही आपला आवाज दिला आणि त्यानंतर स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांनाही वयोगटातील वाचकांपर्यंत पोहोचवले. भाषेचे माध्यम नक्कीच गुजराती होते, तरीही चिंता राष्ट्राची होती.परकीयांच्या प्रभावाखाली या शहराचे नाव बॉम्बे झाले, बंबई झाले,तेव्हाही या वृत्तपत्राने आपला स्थानिक संपर्क सोडला नाही, आपला मुळांशी असलेला संबंध तोडला नाही. तेव्हाही ते सामान्य मुंबईकराचे वर्तमानपत्र होते आणि आजही तेच आहे - मुंबई समाचार! मुंबई समाचारचे पहिले संपादक मेहरजीभाई यांचे लेख त्यावेळीही मोठ्या आवडीने वाचले जात. या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील प्रामाणिकपणा संदेहनीय नसतो.महात्मा गांधी आणि सरदार पटेल मुंबई समाचारच्या बातम्या वारंवार उद्धृत करत असत.आज येथे जे टपाल तिकीट, प्रकाशित झाले आहे, जे पुस्तक प्रकाशित झाले आहे, जो माहितीपट दाखविण्यात आला आहे, त्यांच्या माध्यमातून तुमचा हा अद्भुत प्रवास देशभरात आणि जगात पोहोचणार आहे.
मित्रांनो,
आजच्या युगात एखादे वृत्तपत्र 200 वर्षे प्रसिद्ध होत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.आपण लक्षात घ्या, हे वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा रेडिओचा शोध लागला नव्हता, टीव्हीचा तर प्रश्नच नाही.गेल्या 2 वर्षात,आपण सर्वांनी 100 वर्षांपूर्वी पसरलेल्या स्पॅनिश फ्लूवर अनेकदा चर्चा केली आहे; पण हे वृत्तपत्र त्या जागतिक महामारीच्याही,100 वर्षांआधी सुरू झालेले होते.झपाट्याने बदलणाऱ्या काळात जेव्हा अशी माहिती समोर येते, तेव्हा आपल्याला मुंबई समाचारला 200 वर्षे पूर्ण झाली याचे महत्त्व अधिक वाटते.मुंबई समाचारला 200 वर्षे पूर्ण झाल्याचा आणि भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा योगायोगही याच वर्षात घडला आहे,हे अत्यंत सुखद आहे.त्यामुळे आज या निमित्ताने आपण भारतीय पत्रकारितेचे उच्च मानदंड,,देशभक्तीच्या चिंतेशी निगडित पत्रकारिता ही तर साजरी करत आहोतच, पण हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची शोभा देखील वृध्दींगत करत आहे.तुम्ही ज्या मूल्यांना धरून, ज्या संकल्पांसह ही वाटचाल केलीत,ते पाहून देशाला जागृत करण्यासाठी सुरू केलेला तुमचा हा महायज्ञ असाच अखंड चालू राहील याचा मला विश्वास वाटतो.
मित्रांनो,
मुंबई समाचार हे केवळ बातम्यांचे माध्यम नाही, तर तो वारसा आहे. मुंबई समाचार हे भारताचे दर्शन आहे, भारताची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक वादळानंतरही भारत कसा अविचलपणे उभा राहिला आहे, याची झलकही आपल्याला मुंबई समाचारच्या बातम्यांमधून पाहायला मिळते.काळानुसार भारताने वेळोवेळी प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बदलले आहे, परंतु आपल्या मूलभूत तत्त्वांना आणखी मजबूत केले आहे.मुंबई समाचारच्या बातम्यांनीही प्रत्येक नवीन बदल स्वीकारला आहे.प्रथम आठवड्यातून एकदा अशी सुरुवात करत, आठवड्यातून दोनदा,नंतर दररोज आणि आता डिजिटल, अशाप्रकारे या वृत्तपत्राने प्रत्येक युगातील नवीन आव्हानांशी चांगले जुळवून घेतले आहे.आपल्या मुळांशी जोडून रहात, आपल्या मुळांचा अभिमान बाळगत, बदल कसा स्वीकारत जावा याचे, मुंबई समाचार हे उत्तम उदाहरणआहे.
मित्रांनो,
मुंबई समाचारचा जेव्हा आरंभ झाला तेव्हा गुलामगिरीचा अंधार गडद होत चालला होता. अशा कालखंडात गुजरातीसारख्या भारतीय भाषेत वृत्तपत्र सुरू करणे इतके सोपे नव्हते. मुंबई समाचारने त्या काळात भाषिक पत्रकारितेचा विस्तार केला.त्याच्या यशाने त्यांना माध्यम बनवले.केसरी आणि मराठा साप्ताहिकांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची धार तीव्र केली. सुब्रमणियम भारती यांनी त्यांच्या कविता, त्यांच्या लेखनातून परकीय सत्तेवर प्रहार केला.
मित्रांनो,
गुजराती पत्रकारिता हेही स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रभावी माध्यम बनले होते. फर्दुनजींनी गुजराती पत्रकारितेचा भक्कम पाया रोवला. गांधीजींनी त्यांचे पहिले वृत्तपत्र इंडियन ओपिनियन दक्षिण आफ्रिकेतून सुरू केले, जुनागढचे प्रसिद्ध मनसुख लाल नाजर त्याचे संपादक होते.यानंतर पूज्य बापूंनी नवजीवन या गुजराती वृत्तपत्राचे संपादक म्हणून प्रथमच सूत्रे हाती घेतली, जी इंदुलाल याज्ञिकजींनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.एकेकाळी ए डी गोरवाला यांचे ओपिनियन वृत्तपत्र दिल्लीतील सत्तेच्या प्रांगणात खूप लोकप्रिय होते.आणीबाणीच्या काळात सेन्सॉरशिपमुळे, बंदी असताना त्याच्या सायक्लोस्टाईल प्रती प्रकाशित झाल्या.स्वातंत्र्याचा लढा असो की लोकशाहीची पुनर्स्थापना, पत्रकारितेने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यातही गुजराती पत्रकारितेची भूमिका उच्च दर्जाची आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत काळातही भारतीय भाषा महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.आपण जी भाषा जगतो, ज्या भाषेत आपण विचार करतो, त्या भाषेतून आपल्याला राष्ट्राची सर्जनशीलता वाढवायची आहे.हा विचार करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वैद्यकीय अभ्यास, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास स्थानिक भाषेतून करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.या विचारातून भारतीय भाषांमधून जगातील सर्वोत्तम सामग्री निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
मित्रांनो,
भाषिक पत्रकारितेने, भारतीय भाषांमधील साहित्याने स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.पूज्य बापूंनीही आपले म्हणणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारितेला प्रमुख आधारस्तंभ बनवले होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओला आपले माध्यम बनवले होते.
मित्रहो,
आज अजून एका गोष्टीबद्दल मी आपल्याशी बोलू इच्छितो. आपल्याला माहितीच आहे की हे वृत्तपत्र फर्दुनजी मर्जबान यांनी सुरू केले आणि याच्यावर संकट आले तेव्हा याला कामा कुटुंबीयांनी सांभाळून घेतलं. या कुटुंबाने या वृत्तपत्राला एका नवीन उंचीवर नेलं. ज्या उद्देशाने ते सुरू केलं गेलं होतं ते उद्दिष्ट मजबूत केलं.
मित्रहो,
भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो. इथे जो कोणी आला तो छोटा असो किंवा मोठा , कमजोर असो किंवा शक्तिशाली , सर्वांना भारत मातेने आपल्या कुशीत फळण्याची फुलण्याची भरपूर संधी दिली. आणि याचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण पारशी समुदायापेक्षा दुसरे कुठले नाही . जे कधीकाळी भारतात आले होते ते आज आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात सशक्त करत आहेत. स्वातंत्र्याचे आंदोलन ते भारताचे नवनिर्माण या सर्व क्षेत्रात पारशी बंधू भगिनींचे योगदान फार मोठे आहे. संख्येने पाहिलं तर हा समुदाय देशातील छोट्या समुदायांपैकी एक आहे . एका प्रकारे तो मायक्रो मायनॉरिटी म्हणजेच अगदी सूक्ष्म अल्पसंख्याक आहे . परंतु सामर्थ्य आणि सेवा या बाबी विचारात घेतल्या तर हा खूप मोठा समाज आहे. भारतीय उद्योग , राजकारण, समाजसेवा, न्यायसंस्था, क्रीडा आणि पत्रकारिता एवढेच नव्हे तर लष्कर सेनेच्या प्रत्येक विभागात पारशी समुदायाची एक छाप दिसून येते. मित्रहो , हीच भारताची परंपरा आहे, हीच मूल्यं आहेत जी आपल्याला श्रेष्ठता बहाल करतात.
मित्रहो
लोकशाहीत लोकप्रतिनिधी असो, राजकारणी पक्ष असो, संसद असो, न्यायपालिका असो प्रत्येक घटकाची आपली आपली अशी भूमिका आहे. आपली आपली निश्चित भूमिका आहे . या भूमिकेला सातत्याने जागणे खूप आवश्यक आहे. गुजरातीत एक म्हण आहे 'जेणू काम तेणू थाय बीजा करे तो गोता खाय'. म्हणजेच ज्याचे जे काम आहे ते त्यानेच करायला हवे. राजकारण असो, माध्यम असो किंवा दुसरे इतर कोणतेही क्षेत्र सगळ्यासाठी ही म्हण लागू आहे. वृत्तपत्रांचे , माध्यमांचे काम म्हणजे बातम्या पोचवणे. लोकशिक्षण करणे, समाज आणि सरकार यांच्या मध्ये काही कमतरता असतील तर त्या समोर आणण्याचे काम आहे. टीका करण्याचा माध्यमांना जेवढा अधिकार आहे तेवढीच सकारात्मक बातम्या समोर आणण्याची जबाबदारीही आहे. गेल्या वर्षात माध्यमांमधील एका मोठ्या वर्गाने राष्ट्रहिताशी संबंधित समाज हिताशी संबंधित मोहिमांना मोठ्या संख्येने आपले म्हंटले त्याचा सकारात्मक अनुभव आज देशाला येत आहे . स्वच्छ भारत मोहीमेमुळे यामुळे देशातील गावांचे आणि गरिबांचे जीवन सुधारत आहे त्यात नक्कीच प्रसारमाध्यमातील काही लोकांनी मोठी भूमिका बजावली आहे, प्रशंसनीय भूमिका बजावली आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारत आज जगात अग्रगण्य आहे. लोक शिक्षणाची जी मोहीम माध्यमांनी राबवली त्यामुळे देशाला मदत झाली. आपल्याला आनंद वाटेल की डिजिटल जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये 40% वाटा फक्त हिंदुस्तानचा आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना कालखंडात ज्या प्रकारे पत्रकार मित्रांनी राष्ट्रहितासाठी एका कर्मयोग्याप्रमाणे काम केले त्याला नेहमी लक्षात ठेतले जाईल. भारतात माध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळे भारताला शंभर वर्षातील या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी भरपूर मदत मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील माध्यमे आपली सकारात्मक भूमिका आणखी विस्तारतील याचा याची मला खात्री आहे. हा देश वादविवाद आणि चर्चा या माध्यमातून पुढे जाणारा समृद्ध रिवाज असलेला देश आहे. हजारो वर्ष आपण निरोगी वादविवाद , निरोगी टीका व योग्य तर्क याला सामाजिक व्यवस्थेचा भाग बनवलं आहे . आपण खूप कठीण सामाजिक विषयांवरसुद्धा उघडपणे व्यवस्थित चर्चा केली आहे. हाच भारताचा रिवाज आहे जो आपल्याला सशक्त करायचा आहे.
मित्रहो,
मी आज मुंबई समाचारच्या व्यवस्थापक, पत्रकारांना खास एक आग्रह करू इच्छितो. आपल्याकडे दोनशे वर्षाची जी अर्काईव्ह्ज आहेत ज्यामध्ये भारताच्या इतिहासाच्या अनेक वळणांची नोंद आहे. त्यांना देशाच्या आणि जगाच्या समोर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. माझी सूचना आहे की मुंबई समाचारने आपला हा पत्रकारितेचा खजिना वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकांच्या रुपात देशाच्या समोर आणण्याचा जरूर प्रयत्न करावा. आपण महात्मा गांधीच्या बाबतीत जे वार्तांकन केले, स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जे वार्तांकन केले , भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चढउताराला ज्या बारकाईने समजून घेतलेत आणि समजावून दिलेत हे सर्व आता फक्त वार्तांकन नाही. हे असे क्षण आहेत त्यांनी भारताचे भाग्य बदलण्यात मोठी भूमिका निभावली आहे . म्हणून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचे एक मोठे माध्यम, एक मोठा खजिना कामासाहेब, आपल्यापाशी आहे आणि देश त्याची वाट बघतो आहे. आपल्या इतिहासात भविष्यातील पत्रकारितेसाठी एक मोठा धडा आहे . या दृष्टीने आपण जरूर प्रयत्न करा आणि आज दोनशे वर्ष, मी आधी सांगितलं की या प्रवासाने कितीतरी चढ-उतार पाहिले असतील आणि दोनशे वर्षांपर्यंत नियमित चालणे हीसुद्धा आपल्या एक मोठी ताकद आहे. या महत्त्वाच्या क्षणी आपण सर्वांनी मला आमंत्रण दिले ,आपल्या सर्वांशी बोलण्याची एक संधी दिलीत. एवढ्या मोठ्या विशाल समुदायाची भेट घेण्याची संधी मिळाली आणि, मी केव्हा तरी इथे मुंबईत एका साहित्याच्या कार्यक्रमात आलो होतो. बहुधा आमचे सूरज भाई दलाल यांनी मला बोलावले होते त्या दिवशी मी म्हटले होते की मुंबई आणि महाराष्ट्र हे गुजराती भाषेचे माहेरघर आहे . पुन्हा एकदा मुंबई समाचारला दोनशे वर्ष झाल्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कामा परिवाराने राष्ट्राची मोठी सेवा केली आहे. आपला पूर्ण परिवार अभिनंदनाला पात्र आहे आणि मी मुंबई समाचारच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. कामा साहेबांनी जे काही सांगितले ते फक्त शब्द नव्हते . दोनशे वर्षे एका घरात पिढ्यान् पिढ्या एक वृत्तपत्र नियमित वाचले जात असेल, पाहिले जात असेल, ऐकले जात असेल तर ही त्या वृत्तपत्राची एक मोठी ताकद आहे आणि ती ताकद त्याला देणारे आपण सर्वजण आहात म्हणून मी गुजराथ्यांच्या या सामर्थ्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. मी नाव घेत नाही आजही एक देश आहे जिथे एका शहरात, मी परदेशातली गोष्ट सांगतो आहे, सर्वात जास्त सर्क्युलेशन असणारे वृत्तपत्र गुजराती आहे. म्हणजे याचा अर्थ असा की गुजराती लोकांना लवकर लक्षात येतं की कोणत्या गोष्टीत कुठे ताकद आहे . चला तर मग या आनंददायी संध्याकाळसोबत खूप खूप धन्यवाद.