वाराणसी कॅन्टॉन्मेंट स्थानक ते गोडोलिया दरम्यान प्रवासी रोपवे प्रकल्पाची केली पायाभरणी
जल जीवन मिशन अंतर्गत 19 पेयजल योजनांचे लोकार्पण
“काशीने लोकांचे पूर्वग्रह चुकीचे ठरवले आणि शहराचा कायापालट करण्यात यश मिळवले."
“गेल्या 9 वर्षात गंगा घाटांच्या परिसराच्या कायापालटाचा प्रत्येकाने अनुभव घेतला आहे”
“गेल्या 3 वर्षात देशातील 8 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे”
“भारताच्या अमृत काळातील विकासाच्या प्रवासात प्रत्येक नागरिकाचे योगदान राहील आणि कोणीही मागे पडणार नाही यासाठी सरकार झटत आहे”
“उत्तर प्रदेश राज्यातील विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या पैलूंची भर घालत आहे”
“उत्तर प्रदेश निराशेच्या छायेतून बाहेर पडले आहे आणि आता आकांक्षा आणि अपेक्षांच्या मार्गावर आगेकूच करत आहे”

हर-हर महादेव!

तुम्हा सर्वांना माझा प्रणाम…

(आप सब लोगन के हमार प्रणाम बा..)

उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी, राज्य सरकारातील मंत्रिगण, आमदार, अन्य मान्यवर आणि माझ्या काशीचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!

नवरात्रीचा पवित्र काळ सुरु आहे,   आज माता चंद्रघंटाच्या पूजेचा दिवस आहे. आज या पवित्र शुभ प्रसंगी मी तुम्हा सर्वांसोबत काशीच्या भूमीवर आहे हे माझे भाग्य आहे.  माता चंद्रघंटाच्या आशीर्वादाने बनारसच्या सुख-समृद्धीत आज आणखी एक अध्याय जोडला जात आहे. आज येथे सार्वजनिक वाहतूक रोपवेची पायाभरणी करण्यात आली.  बनारसच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या इतर प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही झाली. यामध्ये पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, गंगाजीची स्वच्छता, पूर नियंत्रण, पोलीस सुविधा, क्रीडा सुविधा, अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.  आज आयआयटी बीएचयू येथे 'सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन मशीन टूल्स डिझाइन'ची पायाभरणीही करण्यात आली आहे.  म्हणजे बनारसला आणखी एक जागतिक दर्जाची संस्था मिळणार आहे.  या सर्व प्रकल्पांसाठी बनारसच्या जनतेचे आणि पूर्वांचलच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन.

बंधू आणि भगिनींनो,

काशीच्या विकासाची आज देशभर आणि जगभर चर्चा होत आहे. जो कोणी काशीत येत आहे, तो येथून नवी ऊर्जा घेत आहे. तुम्हाला आठवत असेल, 8-9 वर्षांपूर्वी जेव्हा काशीच्या लोकांनी आपल्या शहराचा कायापालट करण्याचा संकल्प केला होता तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होती.  बनारसमध्ये बदल होणार नाही, काशीतील लोक यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते.  पण काशीवासीयांनी, तुम्ही सर्वांनी आज आपल्या मेहनतीने प्रत्येक शंका चुकीची सिद्ध केली आहे.

मित्रांनो,  

काशीमध्ये आज प्राचीन आणि आधुनिक अशी दोन्ही स्वरुप एकाच वेळी पाहायला मिळत आहेत. भारतात आणि परदेशात मला भेटणारे लोक सांगतात की ते विश्वनाथ धामच्या पुनर्निर्माणाने कसे मंत्रमुग्ध झाले आहेत. गंगा घाटावर झालेले काम पाहून लोक प्रभावित झाले आहेत.  अलीकडेच, जेव्हा आपल्या काशीतून जगातील सर्वात लांब नदीतील क्रूझ सुरू झाली तेव्हा त्याबद्दल बरीच चर्चा झाली. एक काळ असा होता जेव्हा गंगाजीतून अशा प्रवासाचा विचार करणेही अशक्य होते.  पण बनारसच्या लोकांनी हेही केले. तुमच्या या प्रयत्नांमुळे एका वर्षात 7 कोटींहून अधिक पर्यटक काशीत आले.  आणि मला सांगा, हे 7 कोटी लोक जे इथे येत आहेत, ते बनारसमध्येच मुक्काम करत आहेत, कधी पुरी कचोरी खातात, कधी जिलेबी-लौंगलताचा आस्वाद घेत आहेत, कधी लस्सी पीत आहेत, तर कधी ठंडाईचा आनंद लुटत आहेत.  आणि आपले बनारसी पान, इथली लाकडी खेळणी, या बनारसी साड्या, कालिन कामासाठी 50 लाखांहून अधिक लोक दर महिन्याला बनारसला येत आहेत. महादेवांच्या आशीर्वादाने हे खूप मोठे कार्य झाले आहे. बनारसला येणारे हे लोक बनारसच्या प्रत्येक कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन घेऊन येत आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत.

मित्रांनो,

8-9 वर्षांच्या विकासकामांनंतर ज्या वेगाने बनारसचा विकास होत आहे, त्याला आता नवी गती देण्याची वेळ आली आहे. आज शहराच्या पर्यटन आणि सुशोभिकरणाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. रस्ते असो, पूल असो, रेल्वे असो, विमानतळ असो, संपर्क व्यवस्थेच्या सर्व नवीन साधनांमुळे काशीला जाणे खूप सोपे झाले आहे.  पण आता एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आता हा रोपवे येथे बांधला जात असल्याने काशीतील सुविधा आणि काशीचे आकर्षण दोन्ही वाढणार आहे.  रोपवे बांधल्यानंतर बनारस कॅंट रेल्वे स्थानक आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधील अंतर अवघे काही मिनिटांचे होईल. त्यामुळे बनारसच्या लोकांची सुविधा आणखी वाढणार आहे. त्यामुळे कँट स्थानक ते गौदोलियादरम्यान होणारी वाहतूक कोंडीची समस्याही बरीच कमी होणार आहे.

मित्रांनो,

आसपासच्या शहरांतून, इतर राज्यांतूनही लोक वेगवेगळ्या कामांसाठी वाराणसीत येतात.  वर्षानुवर्षे ते वाराणसीच्या एका भागात येतात, काम संपवून रेल्वे किंवा बस स्थानकावर जातात. बनारस फिरण्याची त्यांची इच्छा असते. पण विचार करतात, एवढी वाहतूक कोंडी आहे, कोण जाणार?  ते उरलेला वेळ स्थानकावरच घालवणे पसंत करतात. अशा लोकांनाही या रोपवेचा मोठा फायदा होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

हा रोप-वे प्रकल्प केवळ वाहतूकीचाच प्रकल्प नाही. कँट रेल्वे स्थानकाच्या वरच रोपवे स्थानक बांधले जाईल, जेणेकरून तुम्ही लोक त्याचा थेट लाभ घेऊ शकाल. स्वयंचलित जिने, लिफ्ट, व्हील चेअर रॅम्प, स्वच्छतागृह आणि वाहनतळ यांसारख्या सुविधाही तेथेच उपलब्ध असतील.  रोपवे स्थानकांवर खाण्यापिण्याच्या सुविधा आणि खरेदीची सुविधाही असेल.  ते काशीमधील व्यवसाय आणि रोजगाराचे आणखी एक केंद्र म्हणून विकसित होईल.

मित्रांनो,

बनारसची हवाई संपर्क व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेनेही आज मोठे काम झाले आहे. बाबतपुर विमानतळावर आज नवीन एटीसी टॉवरचे लोकार्पण करण्यात आले आहे.  आत्तापर्यंत देशातून आणि जगातून येणाऱ्या 50 हून अधिक विमानांची येथे हाताळणी होते. नवीन एटीसी टॉवर उभारल्याने ही क्षमता वाढणार आहे.  त्यामुळे भविष्यात विमानतळाचा विस्तार करणे सोपे होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो,

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत काशीमध्ये सुरू असलेल्या कामांमुळे सुविधांमध्येही वाढ होईल आणि वाहतुकीची साधनेही चांगली होतील.  काशीतील भाविक आणि पर्यटकांच्या छोट्या-छोट्या गरजा लक्षात घेऊन तरंगती जेट्टी बांधण्यात येत आहे.  नमामि गंगे मिशन अंतर्गत गंगेच्या काठावरील शहरांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मोठे जाळे निर्माण झाले आहे.

गेल्या 8-9 वर्षात तुम्ही गंगेच्या बदललेल्या घाटांचे साक्षीदार आहात. आता गंगेच्या दोन्ही बाजूला पर्यावरणाशी संबंधित एक मोठी मोहीम सुरू होणार आहे.

गंगेच्या दोन्ही बाजूंच्या 5 किलोमीटरच्या परिसरात नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणाही करण्यात आल्या आहेत.  खते असो की, नैसर्गिक शेतीशी निगडीत  इतर मदत, यासाठी नवनवीन केंद्रे उभारली जात आहेत.

मित्रांनो,

बनारससह संपूर्ण पूर्व उत्तर प्रदेश हे कृषी आणि कृषी निर्यातीचे मोठे केंद्र बनत असल्याचा मला आनंद आहे.  आज वाराणसीमध्ये फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतुकीशी संबंधित अनेक आधुनिक सुविधा निर्माण झाल्या आहेत. आज बनारसचा लंगडा आंबा, गाझीपूरची भेंडी आणि हिरवी मिरची, जौनपूरचा मुळा आणि खरबूज परदेशी बाजारपेठेत पोहोचू लागले आहेत. या छोट्या शहरांमध्ये पिकवलेली फळे आणि भाजीपाला लंडन आणि दुबईच्या बाजारपेठेत पोहोचत आहे.  आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, जितकी जास्त निर्यात होईल तितका पैसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल.आता कारखियांव फूड पार्कमध्ये बांधण्यात आलेले एकात्मिक पॅकहाऊसमुळे शेतकरी आणि बागायतदारांना खूप मदत होणार आहे. आज येथे पोलीस दलाशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.  यामुळे पोलीस दलाचा आत्मविश्वास वाढेल, कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील, याचा मला विश्वास आहे.

मित्रांनो,

विकासाचा जो मार्ग आम्ही निवडला आहे त्यामध्ये सोयीसुविधाही आहेत तसेच संवेदनशीलताही आहे.  या भागात पिण्याच्या पाण्याचे एक आव्हान राहिले आहे.

आज येथे पिण्याच्या पाण्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण झाले असून नवीन प्रकल्पांचे कामही सुरू झाले आहे. गरिबांच्या समस्या कमी करण्यासाठी आपले सरकार 'हर घर नल से जल' अभियान राबवत आहे.  गेल्या तीन वर्षांत देशभरातील 8 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचू लागले आहे. काशी आणि आसपासच्या गावातील हजारो लोकांना याचा लाभ मिळाला आहे.  बनारसच्या लोकांना उज्ज्वला योजनेचाही खूप फायदा झाला आहे. सेवापुरी येथील नवा बॉटलिंग प्रकल्प देखील या योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करेल.  यामुळे पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा सुलभ होईल.

मित्रांनो,

आज केंद्रात जे सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये जे सरकार आहे, ते गरिबांची काळजी घेणारे सरकार आहे, गरिबांची सेवा करणारे सरकार आहे. आणि तुम्ही लोक भले पंतप्रधान म्हणाल, सरकार म्हणाल, पण मोदी स्वतःला  तुमचे सेवकच समजतात.  या सेवा भावनेने  मी काशीची , देशाची  आणि उत्तर प्रदेशची सेवा करत आहे. काही वेळापूर्वी  सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा झाली.  काहींना दृष्टी मिळाली, तर काहींना सरकारच्या  मदतीने उदरनिर्वाहासाठी मदत मिळाली.स्वस्थ दृष्टी, समृद्ध काशी अभियान आणि आता मला एक गृहस्थ भेटले आणि ते सांगत होते –साहेब, निकोप दृष्टी, दूरदृष्टीसाठी सुमारे एक हजार लोकांवर मोतीबिंदूचे मोफत उपचार झाले आहेत. मला समाधान आहे की ,आज बनारसच्या हजारो लोकांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे.  2014 पूर्वीचे दिवस तुम्हाला आठवत असतील, बँक खाती उघडताना घामाघूम होत असे. सर्वसामान्य कुटुंब बँकांकडून कर्ज घेण्याचा विचारही करू शकत नव्हती.  आज अगदी गरीब कुटुंबाचेही जन धन बँक खाते आहे.  त्याच्या हक्काचे, सरकारी मदतीचे पैसे आज थेट त्याच्या बँक खात्यात येतात. आज छोटे शेतकरी असो, छोटे व्यापारी असो किंवा आपल्या भगिनींचे बचत गट असो, प्रत्येकाला मुद्रा सारख्या योजनांतर्गत सहज कर्ज मिळते.  आम्ही पशुपालक आणि मत्स्यपालकांना किसान क्रेडिट कार्डशी जोडले आहे.रस्त्यावरील विक्रेते,पदपथावर  काम करणाऱ्या आपल्या मित्रांना पहिल्यांदाच पीएम स्वनिधी योजनेद्वारे बँकांकडून कर्ज मिळू लागले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात विश्वकर्मा मित्रांच्या मदतीसाठी पीएम विश्वकर्मा  योजना आणण्यात आली आहे. अमृतकाळामध्‍ये प्रत्‍येक भारतीयाने विकसित भारत घडवण्‍यात योगदान द्यावे, कोणीही मागे राहू नये, असा प्रयत्‍न आहे.

बंधू आणि भगिनींनो,

काही वेळापूर्वी मी खेलो बनारस स्पर्धेतील विजेत्यांशीही संवाद साधला.  यामध्ये एक लाखांहून अधिक तरुणांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेतला.मी माझ्या बनारस लोकसभा मतदारसंघातील सर्वांचे यासाठी अभिनंदन करतो. बनारसच्या तरुणांना खेळण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी येथे नवीन सुविधाही विकसित केल्या जात आहेत. सिगरा स्टेडियमच्या पुनर्विकासाचा टप्पा-1 गेल्या वर्षी सुरू झाला.आज टप्पा-2 आणि टप्पा-3 ची पायाभरणीही झाली आहे.  त्यामुळे येथे विविध खेळांच्या आणि वसतिगृहांच्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.आता वाराणसीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमही बनणार आहे.  हे स्टेडियम तयार झाल्यावर काशीचे आणखी एक आकर्षण वाढेल.

बंधू आणि भगिनींनो,

आज उत्तर प्रदेश विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन आयाम प्रस्थापित करत आहे.  उद्या म्हणजेच 25 मार्च रोजी योगीजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी योगीजींनी उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला आहे.  निराशेच्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडून उत्तर प्रदेश आशा आणि आकांक्षेच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. जिथे सुरक्षितता आणि सुविधा वाढतात, तिथे समृद्धी येणे निश्चितच असते.  आज उत्तर प्रदेशात हेच घडत आहे.  आज येथे प्रत्यक्षात आलेले हे नवे प्रकल्प समृद्धीचा मार्गही बळकट करतात. अनेक   विकासकामांसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.खूप खूप शुभेच्छा. हर-हर महादेव ! 

धन्‍यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.