माननीय मंत्रीगण, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य व्यावसायिक आणि जगभरातले मित्रहो,
नमस्कार,
कोविन जागतिक परिषदेसाठी विविध देशातून इतक्या मोठ्या संख्येने तज्ञ सहभागी झाले आहेत हे पाहून मला आनंद झाला आहे. जगभरात या महामारीमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले अशा सर्वाप्रती मी शोक व्यक्त करतो. शंभर वर्षात अशी महामारी झालेली नाही. कोणतेही राष्ट्र, मग ते कितीही सामर्थ्यवान असले तरीही ते एकटे राहून अशा प्रकारच्या या आव्हानाचा मुकाबला करू शकत नाही हे अनुभवाने स्पष्ट केले आहे. मानवता आणि मानव हितासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करायला हवे आणि पुढची वाटचाल मिळून करायला हवी हा कोविड-19 महामारीने दिलेला सर्वात मोठा धडा आहे. आपण परस्परांकडून शिकायला हवे आणि आपल्या उत्तम पद्धतीबाबत एकमेकांना मार्गदर्शनही करायला हवे. महामारीच्या सुरवातीपासूनच, या लढ्यात भारत, आपले सर्व अनुभव, तज्ञांचे ज्ञान आणि संसाधने जागतिक समुदायासमवेत सामाईक करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व अडथळ्यातूनही आम्ही जास्तीत जास्त बाबी जगासमवेत सामाईक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जागतिक पद्धतीतून आणि प्रथामधून शिकण्यासाठी आम्ही उत्सुक राहिलो आहोत.
मित्रहो,
कोविड-19 विरोधातल्या आपल्या लढ्यात तंत्रज्ञान हा अविभाज्य भाग आहे. सुदैवाने सॉफ्टवेअर हे असे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये संसाधनांची मर्यादा नाही. म्हणूनच तांत्रिक दृष्ट्या साध्य झाल्यावर लगेचच आम्ही कोविड ट्रॅकिंगआणि ट्रेसिंग अॅप ओपन सोर्स केले. सुमारे 200 दशलक्ष वापरर्कर्त्यांसह हे आरोग्य सेतू अॅप, विकासकांसाठी सहज उपलब्ध पॅकेज आहे. भारतात वापर होत असल्याने वेग आणि प्रमाण यासाठी वास्तव जगात याची कसोटी झाली आहे याबाबत आपण निश्चिंत राहा.
मित्रहो,
महामारीवर यशस्वी मात करण्यासाठी लसीकरण ही मानवतेसाठी आशा आहे. लसीकरणाचे धोरण आखताना अगदी सुरवातीपासूनच आम्ही भारतात पूर्णपणे डिजिटल दृष्टीकोन स्वीकारण्याचा निर्णय घेतला.आजच्या जागतिकीकरण झालेल्या जगाला महामारी पश्चात पूर्वपदावर यायचे असेल तर असा डिजिटल दृष्टीकोन आवश्यक आहे.
लसीकरण झाले आहे हे सिद्ध करणे लोकांना शक्य असले पाहिजे. हा पुरावा सुरक्षित आणि विश्वासार्ह असायला हवा. आपले लसीकरण कुठे, कधी आणि कोणाकडून झाले आहे याची नोंद लोकांकडे असली पाहिजे. देण्यात आलेली मात्रा मौल्यवान आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक मात्रेवर देखरेख आणि लसी वाया जाण्याचे प्रमाण कमी राहावे यासंदर्भात सरकारची काळजी आहे. संपूर्णपणे डिजिटल दृष्टीकोन असल्याशिवाय हे सर्व शक्य नाही.
मित्रहो, संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे असे भारतीय संस्कृती मानते. या तत्वज्ञानाचे मुलभूत सत्य या महामारीने अनेक लोकांना जाणवले. म्हणूनच कोविड लसीकरणासाठी आमचा मंच, ज्याला आम्ही कोविन म्हणतो, हा मंच ओपन सोर्स करण्यासाठी तयार करण्यात येत आहे. लवकरच तो कोणत्याही आणि सर्व देशांना उपलब्ध होईल. आजची परिषद म्हणजे आपणा सर्वाना या मंचाची ओळख करून देण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. या मंचाद्वारे भारताने कोविड प्रतिबंधक लसीच्या 350 दशलक्ष मात्रा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही एका दिवसात 9 दशलक्ष लोकांना लस दिली.
त्यांना काही सिद्ध करण्यासाठी कागदाचे तुकडे बाळगण्याची आवश्यकता नाही. हे सर्व डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. सर्वात उत्तम म्हणजे सॉफ्टवेअर कोणत्याही देशाच्या स्थानिक आवश्यकतेनुसार सुधारित करता येऊ शकते. आजच्या परिषदेत आपल्याला खूप तांत्रिक माहिती प्राप्त होईल. सुरवात करण्यासाठी आपण सर्व जण उत्सुक आहात याची मला खात्री आहे आणि यासाठी मी आपणाला ताटकळत ठेऊ इच्छित नाही. म्हणूनच आजच्या फलदायी चर्चेसाठी आपणा सर्वाना माझ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. ’एक वसुंधरा, एक आरोग्य’ हा दृष्टीकोन घेऊन या महामारीवर मानवता निश्चितच मात करेल.
धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद !