नमस्कार!
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रमेश पोखरियाल निशंक जी, देशाचे शिक्षणमंत्री संजय धोत्रे जी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करणार्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरी रंगन जी, त्यांच्या चमुचे सन्माननीय सदस्य, या विशेष परिषदेत भाग घेणारे सर्व राज्यातील विद्वान, मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्व जण आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या क्षणाचा एक भाग होत आहोत. नवीन युगाच्या निर्मितीची बीज असणारा हा क्षण आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 21 व्या शतकाच्या भारताला एक नवीन दिशा देणार आहे.
मित्रांनो, गेल्या तीन दशकांत जगातील प्रत्येक क्षेत्र बदलले आहे. प्रत्येक व्यवस्था बदलली आहे. आपल्या जीवनातील क्वचितच असे एखादे क्षेत्र असे जे या तीन दशकांत बदलेले नाही. परंतु ज्या मार्गावर समाज भविष्याकडे वाटचाल करतो, आपली शिक्षण प्रणाली, ती अजूनही जुन्या पद्धतीनुसारच चालू होती. जुन्या फळ्याला बदलण्या इतकीच जुनी शिक्षण प्रणाली बदलणे महत्त्वाचे होते. जसे प्रत्येक शाळेत एक सूचना फलक (पिन-अप बोर्ड) आहे. आपण सर्व आवश्यक कागदपत्रे, शाळेचे आदेश, मुलांनी काढलेली चित्रे इ. सर्व त्या फलकावर लावतो. हा फलकही काही काळाने भरतो. त्या फलकावर , आपल्याला नवीन वर्गाच्या नवीन मुलांची नवीन चित्रे लावण्यासाठी बदल करावेच लागतात .
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण नवीन भारत, नवीन अपेक्षा, नवीन आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी देखील एक शक्तिशाली माध्यम आहे. त्यामागे चार-पाच वर्षांचे कठोर परिश्रम, प्रत्येक क्षेत्रातील लोक, प्रत्येक शाखा, प्रत्येक भाषेने रात्रंदिवस कार्य केले आहे. परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता खरी कामे सुरू झाली आहेत. आता आम्हाला प्रभावी पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचे आहे. आणि आम्ही हे काम एकत्र करू. मला माहित आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर आपल्यातील बर्याच जणांच्या मनात बरेच प्रश्न येत आहेत. हे शिक्षण धोरण काय आहे? हे कसे वेगळे आहे? यातून शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थेत काय बदल होईल? या शिक्षण धोरणात शिक्षकासाठी काय आहे? विद्यार्थ्यांसाठी काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काय करावे, कसे करावे? हे प्रश्न बरोबर आहेत आणि आवश्यक देखील आहेत. आणि म्हणूनच या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आणि यावर मार्ग शोधून काढण्यासाठी आपण आज सगळे या कार्यक्रमामध्ये जमलो आहोत. मला सांगण्यात आले आहे की तुम्ही सर्वांनी काल दिवसभर या गोष्टींवर मंथन केले आणि चर्चा केली.
शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार शिक्षण साहित्य तयार करावे, मुलांनी त्यांचे स्वतःचे खेळण्यांचे संग्रहालय तयार करावे, पालकांसाठी शाळेत एक सामुदायिक ग्रंथालय असावे, चित्रांसह बहुभाषिक शब्दकोष असावा, शाळेत किचन गार्डन असावे, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे, अनेक नवीन कल्पना समोर आल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी सुरु केलेल्या या मोहिमेमध्ये आमचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उत्साहाने सहभागी होत आहेत याचा मला आनंद आहे.
काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी मायजीओव्ही पोर्टलवर देशभरातील शिक्षकांकडून सूचनाही मागवल्या होत्या. आठवड्याभरात 15 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचना राष्ट्रीय शिक्षण धोरण अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्यात मदत करतील. या विषया बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण मंत्रालय अनेक कार्यक्रम राबवित आहे.
मित्रांनो, कोणत्याही देशाच्या विकासाला गती देण्यात तरुण पिढी आणि युवा ऊर्जा यांची मोठी भूमिका आहे. पण त्या तरुण पिढीची निर्मिती बालपणापासूनच सुरू होते. त्या मुलाच्या बालपणावारच भविष्यातील जीवनातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मुलांचे शिक्षण, त्यांना मिळणारे वातावरण हे भविष्यकाळात तो एक माणूस म्हणून कसा बनेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असेल हे मोठ्या प्रमाणात निश्चित होते. म्हणूनच, राष्ट्रीय शिक्षण धोरणात मुलांच्या शिक्षणावर खूप भर दिला आहे. प्री-स्कूलमध्ये, जाणारी मुलं पहिल्यांदाच आई-वडिलांची काळजी आणि आणि घराच्या आरामशीर वातावरणाबाहेर जाऊ लागतात. हा तोच पहिला टप्पा असतो जेव्हा मुलांना त्यांच्या संवेदना, त्यांची कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास सुरुवात होते. यासाठी अशा शाळा, अशा शिक्षकांची आवश्यकता जे मुलांना मजेशीर शिक्षण, खेळकर शिक्षण, क्रीयाकल्प आधारित शिक्षण आणि शोध आधारित शिक्षणाचे वातावरण प्रदान करेल.
मला माहित आहे की तुम्ही असा विचार करत असाल की कोरोनाच्या या काळात हे सर्व कसे शक्य आहे? ही गोष्ट विचार करण्यापेक्षा अधिक दृष्टीकोनाची आहे. आणि कोरोनामुळे निर्माण झालेली हि परिस्थिती कायम स्वरूपी अशीच तर राहणार नाही. मुले पुढच्या इयत्तेत जात असताना त्यांच्या मनात अधिक शिकण्याची भावना निर्माण झाली पाहिजे, मुलांचे मन विकसित केले पाहिजे, त्यांच्या मेंदूने शास्त्रोक्त आणि तार्किकदृष्ट्या विचार करण्यास सुरवात केली पाहिजे, त्यांच्यामध्ये गणितीय विचार आणि वैज्ञानिक स्वभाव विकसित झाला पाहिजे, हे फार महत्वाचे आहे. आणि गणितीय विचारसरणी म्हणजे केवळ गणिते सोडवणे इतकेच मर्यादित नाही, हा विचार करण्याचा एक मार्ग आहे. आम्हाला मुलांना हे शिकवायचे आहे. प्रत्येक विषय, जीवनाचे पैलू गणितीय आणि तार्किकदृष्ट्या समजून घेण्याचा दृष्टीकोन विकसित झाला तर मेंदू वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विश्लेषण करू शकेल. हा दृष्टीकोन, मनाचा आणि मेंदूचा विकास खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्यातील कार्यपद्धतींकडे जास्त लक्ष दिले गेले आहे. तुमच्यापैकी अनेक जण, अनेक मुख्याध्यापक असा विचार करत असतील की आम्ही तर आधीपासूनच आमच्या शाळेत हे सर्व करत आहोत. परंतु बर्याच शाळा आहेत जेथे असे होत नाही. समान भावना आणणे देखील आवश्यक आहे. हे देखील एक मोठे कारण आहे, ज्यामुळे मी तुमच्याशी एवढ्या तपशीलात बोलत आहे.
मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जुन्या 10 +2 ऐवजी 5 +3 +3 + 4 चा काळजीपूर्वक समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बालसंगोपन आणि शिक्षण हा पाया आहे. आज, जर आपण पाहिले तर, प्री-स्कूलचे खेळकर शिक्षण केवळ शहरातील खासगी शाळांपुरते मर्यादित आहे. ते आता खेड्यात पोहोचेल, गोरगरीबांच्या घरात पोहोचेल, श्रीमंत असो, गाव-शहर असो, सर्व मुलांपर्यंत पोहोचेल. धोरणाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्यावाढीचा विकास याकडे राष्ट्रीय मिशन म्हणून पहिले जाईल. प्राथमिक भाषेचे ज्ञान, संख्यांचे ज्ञान, मुलांमध्ये सामान्य लेख वाचण्याची आणि समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास करणे फार महत्वाचे आहे. मुलाने पुढे जाऊन शिकण्यासाठी वाचले पाहिजे, त्यासाठी सुरुवातीला वाचायला शिकणे आवश्यक आहे. वाचायला शिकणे ते शिकण्यासाठी वाचणे हा विकास प्रवास फाऊंडेशनल पायाभूत साक्षरता आणि गणना माध्यमातून पूर्ण होईल.
मित्रांनो, तिसऱ्या इयत्ते नंतर मुलांना एका मिनिटात सहजपणे 30 ते 35 शब्द वाचता आले पाहिजेत हे आम्हाला सुनिश्चित करायचे आहे. आपण याला तोंडी वाचन प्रवाह म्हणतो. जर आपण या मुलांना या पातळीवर आणण्यास सक्षम केले, त्यांना घडवू शकलो, शिकवू शकू तर भविष्यात त्या विद्यार्थ्याला इतर विषय समजण्यास अधिक सुलभता येईल. मी यासाठी तुम्हाला काही सूचना देतो. ही लहान मुलं आहेत. वर्गात त्यांचे 25-30 मित्र असतील. तुम्ही त्यांना सांगा, तुम्हाला किती जणांची नावे माहित आहेत … ती तुम्ही सांगा. नंतर त्यांना विचार तुम्ही किती वेगाने नावं सांगू शकता, नंतर त्यांना सांगा तू वेगाने सांग आणि त्याला तिथे उभे राहण्यास सांगा. किती प्रकारची प्रतिभा विकसित होण्यास प्रारंभ होईल आणि त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी वाढेल … समवयस्कांची नावे लिहिल्यानंतर…. त्यांना त्यांचे फोटो दाखवून ते ओळखण्यास शिकवू शकतो. आपल्या स्वतःच्या मित्रांना ओळखायला शिकणे… याला शिकण्याची प्रक्रिया म्हणतात. यामुळे पुढील वर्गात विद्यार्थ्यांवरील आणि शिक्षकांवरचा भार कमी होईल.
तसेच, मोजणी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारखी मूलभूत गणिते ही सर्व मुले सहजपणे समजू शकतील. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिक्षण हे पुस्तके आणि वर्गाच्या भिंतींमधून बाहेर पडून आणि वास्तविक जगाशी, आपल्या जीवनाशी, आसपासच्या वातावरणाशी जोडले जातील. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कथेतून वास्तविक जगातून मुले कशी शिकू शकतात याचे एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. असे सांगितले जाते की ईश्वरचंद्र विद्यासागर आठ वर्षांचे होईपर्यंत त्यांना इंग्रजी शिकवले नव्हते. एकदा ते वडिलांसोबत कोलकत्याला असताना वाटेत त्यांना रस्त्याच्या कडेला इंग्रजीत लिहिलेले मैलाचे दगड दिसले. त्याने आपल्या वडिलांना विचारले की हे काय लिहिले आहे. त्यावेळी वडिलांनी त्यांना सांगिलते की यावर कोलकाता किती दूर आहे हे सांगण्यासाठी इंग्रजीत आकडे लिहिले आहेत. या उत्तरामुळे ईश्वरचंद्र विद्यासागरच्या बाल मनात उत्सुकता आणखी वाढली. ते विचारतच राहिले व त्याचे वडील त्या त्या मैलाच्या दगडांवरील आकडे सांगत राहिले. आणि कोलकाता येथे पोचल्यावर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी इंग्रजी मोजायला शिकले. 1,2,3,4… 7,8,9,10 हा जिज्ञासाचा अभ्यास आहे, जिज्ञासेसह शिकण्याची आणि शिकवण्याची शक्ती!
मित्रांनो, शिक्षणाला जेव्हा आजूबाजूच्या वातावरणाशी जोडले जाते तेव्हा त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या संपूर्ण जीवनावर होतो, त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर देखील होतो. उदाहरणार्थ, जपानकडे पहा, तिथे शिनरीन-योकू ची पद्धत आहे. शिनरिन म्हणजे जंगल किंवा वन आणि योकू म्हणजे स्नान . म्हणजेच वन-स्नान. तेथे विद्यार्थ्यांना जंगलात नेले जाते किंवा जिथे बरीच झाडे-झुडपे आहेत अशा ठिकाणी नेण्यात येते, जिथे मुलांना नैसर्गिकरित्या निसर्गाचा अनुभवायला मिळेल. झाडे-झुडपे, फुलांना ऐकायला पाहायला, स्पर्श करायला, सुगंध घ्यायला मिळेल. यामुळे मुलं निसर्ग आणि वातावरणाशी जोडली जातात आणि त्यांच्या समग्र विकासाला चालना मिळते . मुलेही याचा आनंद घेतात आणि एकत्र बर्याच गोष्टी शिकत असतात. मला आठवते जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो .. तेव्हा एक कार्यक्रम राबविला जात असे. आम्ही सर्व शाळांना माहिती दिली …. आम्ही सांगितले की सर्व शाळांची मुले त्यांच्या गावातील सर्वात जुना वृक्ष …. सर्वात जास्त वय असलेले झाड कोणते आहे ते शोधा. यासाठी मुलांना सगळीकडे जावे लागले, गावाच्या सभोवतालची सर्व झाडे पहावी लागतील, शिक्षकांना विचारावे लागले. आणि प्रत्येकाने हे मान्य केले की हे झाड खूप जुने आहे आणि नंतर मुले शाळेत आल्यावर त्यावर गाणी लिहायची , निबंध लिहायचा.
परंतु त्या प्रक्रियेत, त्यांना बरीच झाडे बघावी लागली, सर्वात जुने झाड शोधावे लागले. त्यामुळे ते बर्याच गोष्टी शिकल्या आणि हा प्रयोग खूप यशस्वी झाला. एकीकडे मुलांना वातावरणाविषयी माहिती मिळाली, तसंच त्यांना त्यांच्या खेड्यांविषयी बरीच माहिती मिळवण्याची संधीही मिळाली. आपल्याला अशा सोप्या आणि नाविन्यपूर्ण पद्धती विकसित कराव्या लागतील. हे प्रयोग आमच्या नवीन युग शिक्षणाचा मुलमंत्र असले पाहिजेत – Engage, Explore, Experience, Express आणि Excess lम्हणजेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्रियाकलाप, कार्यक्रम, प्रकल्पांमध्ये व्यस्त रहावे. स्वत: नुसार ते समजून घ्यावे. या विविध घटना, प्रकल्पांना आपला अनुभव आणि दृष्टीकोनानुसार समजून घ्या. हा त्यांचा वैयक्तिक अनुभव किंवा एकत्रित अनुभव असू शकतो. मग मुले विधायक मार्गाने व्यक्त करणे शिकतात. या सर्व गोष्टी एकत्रित केल्याने पुन्हा उत्कृष्ट होण्याचा मार्ग तयार होतो. आपण मुलांना पर्वतावर, ऐतिहासिक स्थळांवर, शेतात, सुरक्षित कारखान्यांमध्ये नेऊ शकतो.
आता बघा, तुम्ही वर्गात मुलांना रेल्वे इंजिना विषयी शिकवता …. तेव्हा तुम्ही फक्त शिकवता पण कधी गावाजवळील रेल्वे स्टेशनवर घेऊन जा ….. इंजिन कसे आहे ते मुलांना दाखवा मग कधी बसस्थानकावर घेऊन जा, बस कशी असते ते दाखवा …. मुलं ते पाहून शिकण्यास सुरवात करतात. मला माहित आहे की बर्याच मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक असा विचार करत असतील की आमच्या शाळेत किंवा महाविद्यालयात असे करतो. मला विश्वास आहे की बरेच शिक्षक अभिनव कल्पना राबवतात …. परंतु हे सर्वत्र होत नाही. आणि यामुळे बरेच विद्यार्थी व्यावहारिक ज्ञानापासून दूर राहतात. या चांगल्या गोष्टींचा जितका प्रसार होईल तितकीच आमच्या शिक्षकांना शिकण्याची संधी मिळेल. शिक्षक आपला अनुभव जितका सामायिक करतील तितका ते मुलांना त्याचा फायदा होईल.
मित्रांनो, देशातील प्रत्येक भागाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे, काही पारंपारिक कला, कारागिरी, उत्पादने सर्वत्र प्रसिद्ध आहेत. बिहारमधील भागलपूरच्या साड्यांप्रमाणेच तेथील रेशीमही देशभर प्रसिद्ध आहे. मुलांनी तिथल्या यंत्रमाग, हातमाग कारखान्यांना भेट द्यावी, हे कपडे कसे बनतात ते पहावे. त्या कामाबद्दल त्यांना प्रश्न विचारावे. वर्गात प्रश्न तयार करून न्यावे. मग त्यांना विचारा तुम्ही काय विचारले… उत्तर काय मिळाले? हेच तर शिक्षण आहे. जेव्हा विद्यार्थी एखादा विशिष्ठ प्रश्न विचारेल – आपण धागा कोठून आणता, धाग्याचा रंग कसा आहे, साडीवरील चमक कशी येते. ते मूल स्वेच्छेने विचारायला लागेल, तुम्ही बघाल की या सगळ्यातून त्याला बरेच काही शिकायला मिळेल.
शाळेमध्ये अशा कौशल्यपूर्ण लोकांना बोलविता येईल. तेथे त्यांचे प्रात्यक्षिक, कार्यशाळा आयोजित करता येऊ शकता येईल. समजा, ग्रामीण भागात कुंभारकाम करणारे लोक आहेत, एक दिवस त्यांना शाळेत बोलावावे, शालेय विद्यार्थ्यांनी पहावे, मग त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करावीत, तुम्ही लक्षात घ्या ते सहजपणे शिकतील. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढेल आणि माहिती देखील, शिकण्याची आवड देखील वाढेल. अशी कितीतरी व्यावसायिक क्षेत्र आहेत, ज्यासाठी सखोल कौशल्याची गरज असते, पण आपण त्यांना महत्त्व देत नाही, कित्येक वेळा तर त्यांना आपण क्षुल्लक समजतो. जर विद्यार्थ्यांनी त्यास समजून घेतले तर तो एक भावनिक स्वरूपाचा बंध असेल, विद्यार्थी कौशल्य समजून घेतील, त्यांचा आदर करतील.
असे होऊ शकते मोठे झाल्यावर यांतील काही मुले अशाही व्यवसायांशी जोडले जाऊ शकतील, असे होऊ शकेल की ते मोठे मालक बनतील, मोठे उद्योजक होऊ शकतील. मुलांमध्ये संवेदना जागृत करण्याचा मुद्दा आता इथे निर्माण होतो. आता मुले ऑटो रिक्षामधून शाळेत जातात. काय त्या मुलांना विचारले की त्या ऑटोरिक्षा चालविणाऱ्याचे नाव काय आहे, जे तुम्हाला रोज घेऊन येतात… त्यांचे घर कुठे आहे.. त्यांचा वाढदिवस कधी साजरा झाला आहे का.. कधी तुम्ही त्यांच्या घरी गेला आहात का.. काय ते तुमच्या आई-वडिलांना भेटले आहेत का ? मग मुलांना सांगा की तुमचे जे रिक्षा चालक आहेत.. त्यांना हे 10 प्रश्न विचारून या.. मग येऊन वर्गात सगळ्यांना सांगा की माझे रिक्षावाले असे आहेत, ते अमूक एका गावातील आहेत, ते येथे कसे आले आहेत. मग मुलांना त्यांच्याबद्दल मुलांमध्ये आपुलकी निर्माण होईल. अन्यथा या गोष्टी त्या मुलांना माहीत देखील नाही, त्यांना असे वाटते की माझे वडील पैसे देतात म्हणून ऑटो-रिक्षावाले मला घेण्यासाठी येतात. त्याच्या मनात ही भावना निर्माण होत नाही की ऑटो-रिक्षावाले माझे आयुष्य घडवित आहेत. माझे आयुष्य घडविण्यासाठी ते देखील काही करत आहेत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल.
त्याच प्रकारे जर कोणी दुसरा व्यवसाय जरी निवडला, अभियंता जरी बनला तरी त्याच्या मनात राहील की या क्षेत्राला अधिक चांगले बनविण्यासाठी कोणते संशोधन केले जाऊ शकते ? अशाच प्रकारे, रुग्णालये, अग्निशामक दल किंवा अन्य दुसऱ्या ठिकाणी देखील भेट देऊन अशी भेट हा शिक्षणाचा एक भाग होऊ शकतो. मुलांना घेऊन गेले पाहिजे, दाखविले पाहिजे.. त्यांना समजेल की डॉक्टर देखील किती प्रकारचे असतात. दंतवैद्यक काय असतो.. डोळ्यांचे रुग्णालय कसे असते. मुले त्या ठिकाणचे साहित्य बघतील, डोळे तपासण्याचे यंत्र कसे असते… त्याबाबत त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होईल, मूल त्यातूनच शिकेल.
मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की जेणेकरून अभ्यासक्रम कमी केला जाऊ शकेल आणि मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकेल. शिक्षणाला एकात्मिक तसेच अंतःविषय, आनंददायी आणि पूर्णपणे अनुभवातून शिक्षण बनविण्यासाठी एक राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) विकसित केली जाईल. हे देखील ठरविण्यात आले आहे की, 2022 मध्ये जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आपण साजरी करणार आहोत, तेव्हा आमचे विद्यार्थी या नव्या अभ्यासक्रमा बरोबरच नवीन भविष्याच्या दिशेने पाऊल टाकतील. हा देखील भविष्याचा वेध घेणारा, भविष्य घडविणारा आणि शास्त्रोक्त अभ्यासक्रम असेल. यासाठी देखील सूचना मागविल्या जातील, आणि सगळ्यांच्या सूचना आणि आधुनिक शिक्षण पद्धतीला यामध्ये समाविष्ट केले जाईल.
मित्रांनो, भविष्यातले जग आपल्या आजच्या जगापेक्षा खूप वेगळे होणार आहे. आपण त्याच्या गरजांना आतापासून बघू शकतो, त्याचा वेध घेऊ शकतो, ते अनुभवू शकतो. अशा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला 21 व्या शतकाच्या कौशल्यांसह पुढे न्यायचे आहे. हे 21 वे शतक काय असेल ? हे असेल – गुंतागुतींची विचारसरणी – सर्जनशीलता – सहकार्य – औत्सुक्य आणि संपर्क (प्रसारण). आपल्या विद्यार्थ्यांनी, शाश्वत भविष्य, शाश्वत विज्ञानाला समजून घ्यावे, त्या दिशेने विचार करावा, हे सर्व आता काळाची गरज आहे, हे सर्व खूप गरजेचे बनले आहे. म्हणूनच, विद्यार्थ्यानी सुरवातीपासूनच कोडिंग शिकावे, कृत्रीम बुद्धिमत्तेला समजून घ्यावे, इंटरनेट ऑफ थिंग्ज, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि रोबोटिक्स या संकल्पनांशी जोडले जावे, हे सर्व गोष्टींकडे आपल्याला आता बारकाईने बघावे लागेल.
मित्रांनो, आपले या पूर्वीचे जे शौक्षणिक धोरण होते, त्याने आपल्या अनेक विद्यार्थ्यांना गुंतवून (बांधून) ठेवले होते. जसे उदाहरण घ्यायचे झाले तर, जो विद्यार्थी शास्त्र शाखेत प्रवेश घेतो, तो कला किंवा वाणिज्य शिकू शकत नाही. कला – वाणिज्य मधील मुलांसाठी समजून घेऊ की ते इतिहास, भूगोल, सांख्यिकी अशासाठी शिकत आहेत, की ते शास्त्र शिकू शकत नाहीत. पण काय खऱ्या जगात, तुमच्या आमच्या आयुष्यात असे घडते का, की फक्त एकाच क्षेत्राची माहिती घेऊन सगळी कामे होतात ? प्रत्यक्षात सगळे विषय एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. प्रत्येक शिक्षण परस्परांशी जोडले गेले आहे. विद्यार्थी जे कोणते क्षेत्र निवडतात, त्यांना कालांतराने वाटू लागते की ते दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रात अधिक चांगले काम करू शकतात. मात्र विद्यमान व्यवस्था ही त्यांना बदलण्याची, नव्या संधींशी जोडले जाण्याची संधीच देत नाही. बऱ्याच मुलांचे नापास होण्याचे, शिक्षण सोडण्याचे देखील हे एक मोठे कारण आहे. म्हणूनच, राष्ट्रीय शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांना कोणताही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याकडे मी एक मोठी सुधारणा या अर्थाने बघतो. आता आमच्या युवकांना विज्ञान, मानवता किंवा वाणिज्य यामध्ये कोणत्या एका चौकटीत बसावे लागणार नाही. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच्या प्रतिभेला आता पूर्ण संधी मिळेल.
मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण हे आणखी एका प्रश्नाला संबोधित करते. येथे तर मोठमोठे अनुभवी आणि जाणकार लोक उपस्थित आहेत, आपल्याला निश्चितच जाणवले असेल की आपल्या देशात शिक्षण देणाऱ्या शिक्षणाच्या जागी गुण आणि गुणपत्रिकेचे शिक्षण वरचढ आहे. मुले जेव्हा खेळत असतात, जेव्हा ते कुटुंबात बोलत असतात, जेव्हा ते आई – वडिलांबरोबर बाहेर फिरायला जतात, तेव्हा देखील ती मुलं शिकत असतात. शिकण्याची प्रक्रिया तेव्हाही होतच असते. मात्र आई – वडील देखील मुलांना विचारत नाहीत की काय शिकलात ? ते सुद्धा नेहमी हेच विचारतात की किती गुण मिळाले ? परीक्षेत किती गुण मिळवले ? एक चाचणी परीक्षा, एक गुणपत्रिका ही काय मुलांच्या शिकण्याचे, त्यांच्या मानसिक विकासाचे परिमाण असू शकते का ? आज सत्य हे आहे की गुणपत्रिका, ही मानसिक तणावपत्रिका बनली आहे आणि कुटुंबाची प्रतिष्ठा बनली आहे. अभ्यासामुळे येणाऱ्या या तणावाला, मानसिक तणावातून आपल्या मुलांना बाहेर काढणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे.
परीक्षा अशा प्रकारे झाली पाहिजे, की विद्यार्थ्यांवर त्याचा विनाकारण दबाव पडू नये. आणि प्रयत्न असा आहे की केवळ एका परीक्षेतून विद्यार्थी – विद्यार्थिनींचे मूल्यांकन केले जाऊ नये, तर स्व-परीक्षण, पिअर – टू – पिअर पद्धतीचे (विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे केलेले परस्परांचे मूल्यांकन करण्याची क्षमता) मूल्यांकन यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यांकन होऊ शकेल. यासाठी, राष्ट्रीय शिक्षण धोरणात गुणपत्रिकेच्या ऐवजी समग्र अहवाल पत्रक (होलिस्टिक रिपोर्ट कार्ड) करण्यावर भर देण्यात आला आहे. समग्र अहवाल पत्रक हे विद्यार्थांच्या अद्वितीय क्षमता, योग्यता, बुद्धिमत्ता, कौशल्य, कार्यक्षमता, स्पर्धात्मकता आणि शक्यता यांचे सविस्तर पत्रक असेल. मूल्यांकन प्रणालीच्या संपूर्ण सुधारणेसाठी नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र “परख“ याची देखील स्थापना करण्यात येईल.
मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण आयोग आल्यानंतर आणखी एका चर्चेला उधाण आले आहे, की मुलांच्या शिक्षणाची भाषा कोणती असेल ? यामध्ये काय बदल केला जाईल ? याठिकाणी आपल्याला एक वैज्ञानिक संकल्पना समजून घेतली पाहिजे का भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे, भाषा हेच समग्र शिक्षण नाही. पुस्तकी अभ्यासात गुंतलेले काही लोक हा फरक विसरतात. म्हणून, ज्या कोणत्याही भाषेत मूल सहजपणे शिकू शकेल, संकल्पना आत्मसात करू शकेल, ती भाषा ही शिक्षणाची भाषा असली पाहिजे. हे पाहणे देखील गरजेचे आहे की जेव्हा आपण मुलांना शिकवित असतो, तेव्हा आपण बोलत आसताना, काय तो ते समजू शकतो आहे का ? समजू शकत असेल तर सहज समजू शकतो आहे का ? कुठे असे तर नाही की विषय समजून घेण्यापेक्षा त्या मुलाला ती भाषा समजून घेण्यासाठीच अधिक ऊर्जा खर्च करावी लागत आहे ? याच सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन अधिकाधिक देशांमध्ये देखील आता प्राथमिक शिक्षण मातृभाषेमधूनच दिले जात आहे.
आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे माहीत असेल की 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम – प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स असेसमेंट – PISA चे सर्वोच्च क्रमांकित देश असलेल्या, जसे की इस्टोनिया, फिनलँड, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, या सर्व देशांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेत दिले जाते. ही बाब स्वाभाविक आहे की, जी भाषा ऐकत मुले लहानाची मोठी होतात, जी भाषा कुटुंबाची भाषा असते, त्यामध्येच शिकण्याची मुलांना चांगली गती असते. अन्यथा, असे होते की मुले जेव्हा दुसरी एखादी भाषा ऐकतात, तेव्हा आधी एक तर ते आपल्या भाषेत अनुवादित करतात, मग ते समजून घेतात. बालमनात हा खूप गोंधळ निर्माण होतो, खूप ताण देणारी परिस्थिती असते ही. याचा आणखी एक पैलू आहे. आपल्या देशामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, शालेय शिक्षण हे मातृभाषेपेक्षा वेगळ्या असलेल्या भाषेतून मिळत असल्यामुळे मोठ्या संख्येने पालक शिक्षणाशी जोडलेही जात नाहीत. अशा मुलांसाठी शिक्षण ही एक सहज सोपी प्रक्रिया राहात नाही, तर शिक्षण हे शाळेचे एक कर्तव्य बनते. पालक आणि शाळा यांच्यामध्ये एक सीमारेषा आखली जाते.
म्हणूनच, जेथ पर्यंत शक्य आहे, कमीत कमी ग्रेड पाच, पाचवी पर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम मातृभाषा, स्थानिक भाषा असली पाहिजे, असे राष्ट्रीय शिक्षण धोरणात म्हटले गेले आहे. मी पाहात असतो, काही लोक या बाबतीतही गोंधळ निर्माण करतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेशिवाय अन्य कोणतीही भाषा शिकणे, शिकविणे यावर कोणतेही बंधन नाही. इंग्रजी बरोबरच ज्या कोणत्या परदेशी भाषा आंतरराष्ट्रीय पटलावर सहाय्यक आहेत, त्या मुलांनी शिकाव्या, आत्मसात कराव्यात, ही बाब कधीही चांगलीच आहे. मात्र, या बरोबरीने सर्व भारतीय भाषांना देखील प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून आपल्या देशातील युवक वेगवेगळ्या राज्यांची भाषा, तेथील संस्कृतीश परिचित होऊ शकतील, प्रत्येक क्षेत्राचे एकमेकांशी नाते दृढ होईल.
मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या या प्रवासात मार्ग दाखविणारे आपण सगळेजण आहात, देशातील शिक्षक आहेत. मग ते नव्या पद्धतीने शिक्षण असो, `परख`च्या माध्यमातून नवीन परीक्षा असो, विद्यार्थ्यांना या नवीन प्रवासात शिक्षकांनाच सोबत घेऊन जायचे आहे. कारण, विमान कितीही अत्याधुनिक का असेना, ते चालविण्यासाठी वैमानिक असतातच. म्हणून, शिक्षकांना हे सारे काही नवीन शिकावे लागणार आहे, बऱ्याच काही जुन्या गोष्टी विसरून जाव्या लागतील. 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारताचा प्रत्येक विद्यार्थी, राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे निश्चित केलेल्या दिशा – दर्शकांत शिकेल, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मी सर्व शिक्षकांना, प्रशासकांना, स्वयंसेवी संस्था आणि पालकांना आवाहन करतो की आपण या राष्ट्रीय मोहीमेमध्ये आपले योगदान द्यावे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सर्व शिक्षकांच्या सहकार्याने, देश राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकेल.
मी माझे म्हणणे संपविण्यापूर्वी शिक्षकांच्या माध्यमातून एक गोष्ट आग्रहाने नमूद करू इच्छितो की कोरोना काळात आपण देखील ज्या मर्यादांचे पालन करायचे आहे, – दोन हात अंतर ठेवणे असो, मास्क किंवा चेहरा झाकण्यासाठी आवरण असो, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांची पूर्ण काळजी घेण्याची बाब असो, स्वच्छतेची बाब असो, ही सर्व लढाई लढण्याचे नेतृत्त्व देखील आपल्या सर्वांना करायचे आहे. आणि शिक्षक हे अतिशय सोप्यारितीने करू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने या गोष्टी घरोघरी पोहोचवू शकतात. आणि जेव्हा शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगतात तेव्हा विद्यार्थी अतिशय विश्वासाने ती गोष्ट ऐकतात. विद्यार्थ्यांसमोर मी एक सांगतो, पंतप्रधानांनी हे सांगितले, असे म्हणलात आणि माझ्या शिक्षकांनी अमूक एक सांगितले आहे, असे म्हणालात, तर मी ठासून सांगतो… विद्यार्थी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर, चार प्रश्न उपस्थित करतील. पण शिक्षकांच्या वक्तव्यावर, एकही प्रश्न उपस्थित करणार नाहीत. घरी जाऊन सांगतील माझ्या शिक्षकांनी सांगितले आहे की.. ही श्रद्धा, हा विश्वास मुलांच्या मनात रुजलेला आहे. हीच तुमची खूप मोठी संपत्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. आणि या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या कित्येक पिढ्यांनी तपस्या करून ही परंपरा निर्माण केली आहे. आणि जेव्हा अशा गोष्टी आपल्याला परंपरेतून मिळाल्या आहेत, तेव्हा आपले दायित्व देखील खूप वाढत असते.
मला खात्री आहे की, माझ्या देशातील शिक्षक, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही गोष्ट एका मोहिमेच्या रूपात स्वीकारतील, मन लावून करतील. देशातील एक – एक मूल तुमच्याकडील शिक्षण आत्मसात करण्यासाठी तयार असतो, तुमच्या आदर्शांचे पालन करण्यासाठी तयार असतो. तुमचे वागणे अनुकरणात आणण्यासाठी तयार असतो. तो दिवस – रात्र कष्ट करण्यासाठी तयार असतो. एकदा शिक्षकांनी सांगितले की तो सर्व काही मान्य करण्यासाठी तयार असतो. मी असे समजतो की, आई – वडील, शिक्षक, शिक्षण संस्था, सरकारी व्यवस्था, आपल्या सर्वांना मिळून हे कार्य पार पाडावयाचे आहे. मला खात्री आहे की, हा जो ज्ञान यज्ञ सुरू आहे, शिक्षण पर्व सुरू झाले आहे, 5 सप्टेंबर पासून सलग विविध क्षेत्रातील लोक हे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. या प्रयत्नांमधून चांगले फळ हाती लागेल… वेळेपूर्वी फळ हाती मिळेल. आणि सामूहिक कार्याच्या भावनेतूनच ते होऊ शकेल.
या विश्वासानेच मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप – खूप धन्यवाद देतो. आपणा सर्वांना खूप – खूप शुभेच्छा देतो आणि नेहमीच मी शिक्षकांना नमन करत असतो. आज व्हर्च्युअल माध्यमातून देखील आपणा सर्वांना नमन करताना मी माझे बोलणे थांबवितो.
खूप खूप धन्यवाद !!