"खेळात हार नाही, फक्त जिंकणे किंवा शिकणे आहे": पंतप्रधान
"तुमचे यश संपूर्ण देशाला प्रेरणा देते आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते": पंतप्रधानांचे गौरवोद्गार
अलीकडच्या काळात खेळाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
दिव्यांगांचे यश हे केवळ क्रीडा क्षेत्राला प्रेरणा देणारे नसून, जीवनाला प्रेरणा देणारे आहे: पंतप्रधान
'सरकारसाठी खेळाडू', हा पूर्वीचा दृष्टीकोन मागे पडून आता, 'खेळाडूंसाठी सरकार' असा झाला आहे: पंतप्रधान
सरकारचा दृष्टीकोन खेळाडू केंद्रित असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
क्षमता आणि त्याला मिळणारे व्यासपीठ याचा एकत्रित परिणाम कामगिरीमधून प्रतिबिंबित होतो
क्षमतांना साजेसे व्यासपीठ उपलब्ध होते, तेव्हा कामगिरीला अधिक बळ मिळते: पंतप्रधान “प्रत्येक स्पर्धेमधील तुमचा सहभाग हा मानवी स्वप्नांचा विजय आहे”: पंतप्रधानांचे गौरवोद्गार

मित्रहो,

तुम्हा सर्वांना भेटण्याच्या संधीचा मी शोध घेत असतो आणि वाट बघत असतो, कधी एकदा तुम्हाला भेटेन, तुमचे अनुभव कधी ऐकू शकेन आणि मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी तुम्ही नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने समोर येता आणि ही देखील एक मोठी प्रेरणा ठरते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांमध्ये फक्त एकाच कामासाठी आलो आहे आणि ते म्हणजे तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुम्ही भारताबाहेर होता, चीनमध्ये खेळत होता, पण कदाचित तुम्हाला माहीती नसेल, मी ही तुमच्यासोबत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीचा, तुमच्या प्रयत्नांचा, तु मच्या आत्मविश्वासाचा प्रत्येक क्षण मी इथे बसून जगत होतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे ते खरोखरच अभूतपूर्व आहे. आणि त्यासाठी आम्ही तुमचे, तुमच्या प्रशिक्षकांचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. आणि या ऐतिहासिक यशाबद्दल देशवासियांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, अनेकानेक शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

तुम्हाला चांगलेच माहीती आहे की खेळ नेहमीच अत्यंत स्पर्धात्मक असतात. तुम्ही प्रत्येक खेळात एकमेकांसोबत स्पर्धा करता, अगदी खडतर चढाओढ असते. पण मला माहित आहे की एक स्पर्धा तुमच्या आतही सुरू असते. तुम्ही रोज स्वतःशीच स्पर्धा करता. तुम्हाला स्वत:शीच स्पर्धा करावी लागते, संघर्ष करावा लागतो, स्वत:ला पुन्हा पुन्हा समजावून सांगावे लागते. कधी-कधी तुम्ही अनुभवले असेल की उद्या सकाळी उठू नये असे वाटते, पण मग अचानक कोणती तरी ऊर्जा तुम्हाला जागे करते आणि तुम्हाला धावायला भाग पाडते, हे तुम्हालाही कळत नाही. प्रशिक्षण आवडत नसले तरीही तुम्हाला ते घ्यावे लागते आणि जरी प्रशिक्षण केंद्रातून सगळे जण घरी गेले असले तरी कधीकधी तुम्हाला काही अतिरिक्त तास घाम गाळावा लागतो आणि जास्त मेहनत करावी लागते. आणि सोने जितके जास्त तापवावे, तितके ते जास्त चमकेल, तितके अस्सल ठरेल, असे म्हणतात. आणि त्याच प्रकारे तुम्ही सर्व सुद्धा खडतर कष्ट करून अस्सल ठरले आहात. या स्पर्धेसाठी निवडलेले सर्व लोक, काही जिंकून परत आले आहेत, काही तिथून शिकून आले आहेत, तुमच्यापैकी एकही जण पराभूत होऊन परत आलेला नाही. आणि माझी ही व्याख्या अगदी सोपी आहे. खेळात दोनच गोष्टी आहेत. एकतर जिंकणे, किंवा शिकणे, पराभूत होणे कधीच नसते. मी तुम्हा सर्वांशी बोलत होतो, तेव्हा काही जण म्हणत होते की यावेळी जरा कमी पडलो, पुढच्या वेळी मी जास्त लांब झेप घेईन. म्हणजे तुम्ही शिकून परत येता, नव्या विश्वासासह परत येता. असे बरेच लोक आहेत जे यावेळी गेले असतील, काही पहिल्यांदाच गेले असतील. पण 140 कोटी देशवासीयांमधून तुमची निवड होणे, हा देखील एक विजय आहे.

अनेक आव्हानांशी दोन हात केल्यानंतर तुम्ही आणखी मजबूत झाला आहात. आणि ही केवळ तुमच्या गटाच्या निकालातील आकडेवारीशी संबंधित बाब नाही, प्रत्येक देशवासीयाला तुमचा अभिमान वाटत आहे. एका नव्या विश्वासाने देश भारून जातो. तुम्ही सर्वांनीच केवळ यापूर्वीचे विक्रम मोडले नाहीत तर काही क्षेत्रांत तर तुम्ही ते विक्रम मोठ्या फरकाने मोडले आहेत. काहींना वाटले असेल की तुम्ही फार दोन-तीन फेऱ्यांपर्यत पोहोचू शकाल, आणि तुम्ही लोक 111 पदके घेऊन घरी परतलात...111. ही काही थोडकी संख्या नाही. मला आठवते, जेव्हा मी राजकारणात नवीन होतो. पक्षाच्या संघटनेत काम करत असे. आणि लोकसभा निवडणुकीत आम्ही 12 जागा लढवल्या आणि गुजरातमध्ये 12 पैकी 12 जागा जिंकल्या. त्यामुळे आम्ही जिंकलो आणि आम्ही दिल्लीत आलो, हे मला आश्चर्यचकित करणारे होते. त्यावेळी आमचे नेते अटलबिहारी वाजपेयीजी, त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, तुला माहित आहे का बारा म्हणजे काय? बारा पैकी बारा जिंकणे म्हणजे काय, माहिती आहे का? ते म्हणाले, संपूर्ण देशातून आमचे बारा कधीच जिंकून आले नव्हते, तुम्ही एका राज्यातून बारा जिंकून आणले आहेत. आणि बारा जिंकल्यानंतरही, अटलजींनी मला सांगेपर्यंत ते माझ्या लक्षात आले नव्हते. तुमच्यासाठी सुद्धा मी हेच सांगतो. ही 111 पदके फक्त 111 नाहीत. ही 140 कोटी स्वप्ने आहेत. 2014 सालच्या आशियाई दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने जिंकलेल्या पदकांच्या संख्येपेक्षा हे प्रमाण तीन पटीपेक्षा अधिक आहे. 2014 च्या तुलनेत यावेळी आम्हाला जवळपास 10 पट जास्त सुवर्णपदके मिळाली आहेत. 2014 साली एकूण कामगिरीमध्ये आपण 15 व्या स्थानावर होतो, परंतु यावेळी तुम्ही सर्वांनी देशाला पहिल्या पाचमध्ये आणले आहे. गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्थेच्या बाबतीतसुद्धा देश जगात दहावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आणि आज तुम्ही सुद्धा देशाला दहावरून पाचव्या स्थानावर आणले आहे. हे सर्व तुमच्या मेहनतीचे फळ आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्व वारंवार अभिनंदनास पात्र आहात.

 

मित्रहो,

भारतातील क्रीडा क्षेत्रासाठी गेले काही महिने आश्चर्यकारक ठरले आहेत. आणि त्यात तुमचे यश हे दुग्धशर्करा योगासारखे आहे. ऑगस्ट महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला सुवर्णपदक मिळाले. भारताच्या बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले. भारताच्या पहिल्या महिला दुहेरी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पदक जिंकले. भारतीय पुरुषांच्या बॅडमिंटन संघाने 2022 सालचा थॉमस कप जिंकून इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी 28 सुवर्ण पदकांसह एकूण 107 पदके जिंकून इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. आता तुम्ही आशियाई दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

मित्रहो,

तुमची कामगिरी पाहून संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रहो, इतर खेळांमध्ये जेव्हा एखादा खेळाडू पदक जिंकतो, तेव्हा क्रीडाविश्व, आणि खेळाडू, नवे खेळाडू, या सर्वांसाठी ती एक मोठी प्रेरणा ठरते, उत्साहाचे कारण ठरते. पण जेव्हा एखादा दिव्यांग विजयी होतो, तेव्हा तो केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात  प्रेरणा ठरतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी तो एक प्रेरणा ठरतो. निराशेच्या गर्तेत बुडालेली कोणतीही व्यक्ती, दिव्यांगांचे यश पाहून उभा राहतो, विचार करतो की देवाने मला सर्व काही दिले आहे, त्याने मला हात, पाय, मेंदू, डोळे सर्व काही दिले आहे. आणि हा खेळाडू, त्याच्या अंगी काही कमतरता असूनही तो कमाल करतो आहे, आणि मी झोपा काढतो आहे. या विचारानेच तो उभा राहतो. तुमचे यश त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही यशस्वी होता, जेव्हा कोणी तुम्हाला खेळताना पाहते, तेव्हा होणारा परिणाम हा खेळाच्या मैदानापुरता किंवा खेळाच्या जगापुरता मर्यादित राहत नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो आणि तुम्ही ते काम करत आहात मित्रहो.

 

मित्रहो,

ही क्रीडा संस्कृती आणि क्रीडा समाज म्हणून भारताची दिवसेंदिवस होत जाणारी प्रगती आपण पाहत आहोत. आणखी एक कारण आहे ज्यामुळे भारताचा पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आता आम्ही 2030 युवा ऑलिम्पिक आणि 2036 ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत.

मित्रहो,

तुम्हाला माहीत आहेच की खेळांमध्ये कोणताही शॉर्ट कट नसतो. क्रीडापटूंच्या वाट्याला त्यांचे कष्ट, जर तुम्हाला जे काम करायचे आहे ते दुसरे कोणीही करू शकत नाही. तुम्हालाच करावे लागते. क्रीडा विश्वात सर्व कष्ट त्यांना स्वतःलाच करावे लागतात. कोणी ‘प्रॉक्सी’ असत नाही, स्वतःलाच करावे लागते. खेळाडूंना खेळातील सर्व दबावाची हाताळणी स्वतःलाच करावी लागते. आपले धैर्य-आपले कष्ट यांचाच सर्वात जास्त उपयोग होतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याने बरेच काही करू शकते. ज्यावेळी त्या व्यक्तीला एखाद्याचे सहकार्य मिळते तेव्हा तिची शक्ती अनेक पटींनी वाढते.

कुटुंब, समाज, संस्था आणि इतर पाठबळ देणाऱ्या परिसंस्था खेळाडूंना एका नव्या उंचीवर पोहोचण्याची प्रेरणा देतात. या सर्व गोष्टी एकत्रितपणे आपल्या खेळाडूंना जितके पाठबळ देतील, त्यांच्यासाठी ते तितकेच चांगले असेल. तुम्ही कुटुंबाचा विचार केला, तर आपल्या घरातील लोक आपल्या मुलांना खेळांच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी आणखी पाठबळ देत आहेत. ज्यावेळी तुमच्यापैकी काही लोक, ज्यावेळी कदाचित तुम्हाला थोडी संधी मिळाली असेल, घरातून थोडे प्रोत्साहन मिळत असेल, पण यापूर्वी जे लोक, नको तुला दुखापत होईल, तुला अमुक होईल, मग तुझ्याकडे कोण लक्ष देईल,  तिथे कोण तुझी काळजी घेईल, नाही जायचे आहे, घरीच रहा, बऱ्याच जणांना यामधून जावे लागले आहे. आज मी पाहात आहे, प्रत्येक कुटुंब बालकांना या क्षेत्रात देखील पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ही नवी संस्कृती देशात उदयाला येणे, खूप मोठी गोष्ट आहे. समाजाचा विचार केला तर लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आता तुम्ही देखील पाहात असाल, पूर्वी खेळांमध्ये असाल तर तुम्ही नीट अभ्यास करत नाही, तुम्ही जाऊन सांगितले की मी मेडल मिळवले आहे, तर अच्छा म्हणजे हेच करतोस का, अभ्यास नाही करत का, पोटापाण्याचे काय करणार? पैसे कसे कमावणार? हेच विचारत असायचे, आता, अच्छा तू मेडल आणलेस का, बघू जरा मी पण हात लावतो, मी पण जरा हात लावून पाहतो, हा बदल झाला आहे.   

 

मित्रहो,

त्या वेळी जर कोणी खेळांच्या क्षेत्रात असेल त्या व्यक्तीला जीवनात स्थिरस्थावर (सेटल) मानले जात नव्हते. त्या व्यक्तीला विचारले जायचे- पण सेटल होण्यासाठी काय करणार? हेच विचारले जात होते, पण आता खेळांना देखील एका व्यावसायिक कारकिर्दीच्या (प्रोफेशन) स्वरुपात समाज स्वीकारू लागला आहे.

मित्रहो,

जर मला सरकारविषयी सांगायचे झाले तर पूर्वी असे सांगितले जात होते की खेळाडू सरकारसाठी आहेत. पण आता सांगितले जाते की सरकार पूर्णपणे खेळाडूंसाठी आहे. ज्यावेळी सरकार आणि धोरणे तयार करणारे तळागाळापर्यंतच्या स्तराशी जोडलेले असतात, जेव्हा सरकार खेळाडूंच्या हिताबाबत संवेदनशील असते, जेव्हा सरकार खेळाडूंचा संघर्ष, त्यांची स्वप्ने यांची जाणीव ठेवते, त्यावेळी त्याचा थेट प्रभाव सरकारच्या धोरणात देखील दिसून येतो, दृष्टिकोनात देखील दिसतो, विचारात देखील दिसतो. देशात उत्तम खेळाडू यापूर्वी देखील होते. पण त्यांना पाठबळ देणारी धोरणे नव्हती, ना चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनाची व्यवस्था होती, ना आधुनिक पायाभूत सुविधा होत्या आणि आवश्यक असलेली आर्थिक मदतही मिळत नव्हती, तर मग आपले खेळाडू कशाप्रकारे आपल्या विजयाचा ध्वज फडकवू शकले असते?  गेल्या नऊ वर्षात देश या जुन्या विचारसरणी मधून आणि जुन्या व्यवस्थेमधून बाहेर पडला आहे. आज देशात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावर चार-चार, पाच-पाच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. सरकारचा दृष्टिकोन आता खेळाडू केंद्रित आहे. सरकार आता खेळाडूंच्या समोरचे अडथळे दूर करत आहे, संधी निर्माण करत आहे. असे सांगितले जाते “पोटेन्शिअल+ प्लॅटफॉर्म= परफॉर्मन्स”. ज्यावेळी क्षमतेला योग्य मंच योग्य व्यासपीठ मिळते त्यावेळी कामगिरी अधिक चांगली होते. खेलो इंडिया सारख्या योजना खेळाडूंसाठी असा मंच तयार करत आहेत, ज्यामुळे आपल्या खेळाडूंचा तळागाळातील स्तरापासून शोध घेण्याचे आणि त्यांना पाठबळ देण्याचे मार्ग खुले होत आहेत. तुमच्यापैकी अनेक लोकांना हे माहीत असेल की कशाप्रकारे ‘टॉप्स’ हा उपक्रम आपल्या खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करत आहे.
 

पॅरा खेळाडूंना मदत करण्यासाठी आम्ही ग्वाल्हेरमध्ये ‘डिसेबिलिटी स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर’ची देखील स्थापना केली आहे आणि तुमच्यापैकी जे गुजरातशी परिचित आहेत, त्यांना हे माहीत असेल की या विश्वात सर्वात पहिल्यांदा प्रवेश करण्याचा प्रयत्न गुजरात मध्ये सुरू झाला होता आणि हळूहळू एकेक करून पूर्ण संस्कृती विकसित होत गेली. आज देखील गांधीनगरच्या इन्स्टिट्यूट मध्ये तुमच्यापैकी बरेचसे लोक आहेत जे कदाचित या ठिकाणी प्रशिक्षण घेतात, प्रशिक्षणासाठी राहतात. सांगायचं तात्पर्य हे आहे की सर्व संस्था जेव्हा आकाराला येतात त्यावेळी त्यांचे सामर्थ्य लक्षात येत नाही पण ज्यावेळी त्या ठिकाणी सातत्याने साधना होते तेव्हा सामर्थ्याची अनुभूती देशाला होऊ लागते. मला असा विश्वास आहे की या सर्व ज्या सुविधा आहेत तुमच्यासारखे अनेक विजेते देशाला मिळणार आहेत, मला पुरेपूर खात्री आहे.

 मित्रहो,

300 पेक्षा जास्त असलेल्या तुम्हा लोकांच्या समूहात मी यापूर्वीच सांगितले आहे की कोणीही हरलेले नाही आणि माझा जो मंत्र आहे मी त्याचा पुनरुच्चार करतो, काही जिंकून आले आहेत, काही शिकून आले आहेत. तुम्ही तुमच्या मेडल्सपेक्षा स्वतःकडे आणि आपल्या वारशाकडे पहा कारण हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही ज्या अडचणींचा सामना केला आणि ज्या प्रकारे त्यातून वर येण्यासाठी आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली, तीच या देशासाठी तुमचे सर्वोच्च योगदान आहे. तुमच्यापैकी अनेक लोक लहान शहरे, सामान्य पार्श्वभूमी आणि कठीण परिस्थितींमधून इथपर्यंत आलेले आहेत. अनेक लोकांनी जन्मापासून शारीरिक समस्यांना तोंड दिले आहे, अनेक लोक दुर्गम भागातील गावांमध्ये राहिले आहेत, कोणाच्या बाबतीत अशी दुर्घटना झाली आहे ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे, पण तरीदेखील तुम्ही अविचल आहात. तुमचे यश सोशल मीडियावर पहा. कदाचित कोणत्याही खेळाला या दिवसांमध्ये इतकी प्रसिद्धी मिळत नसेल जितकी तुम्हा लोकांना मिळत आहे. प्रत्येक जण ज्यांना खेळातील काही कळत नाही ते देखील पाहत आहेत, अरे हा मुलगा काहीतरी करत आहे याच्या शरीरामध्ये काहीतरी समस्या आहे, तरी देखील इतकी मोठी कामगिरी करत आहे. हे सर्व लोक पहात आहेत, त्यांच्या घरातील मुलाबाळांना दाखवत आहेत, की बघा कशा तऱ्हेने ही मुले आपली कामगिरी करत आहेत. गावातील मुले-मुली लहान शहरातील लोक तुमच्या जीवनाचे किस्से आज शाळा, महाविद्यालये, घरात, मैदानात प्रत्येक जागी त्यावर चर्चा होत आहे. तुमचा संघर्ष आणि हे यश त्यांच्या मनामध्ये देखील एक नवे स्वप्न आकाराला येत आहे. आज कोणतीही परिस्थिती असू देत, पण ते एक मोठा विचार, एक मोठी प्रेरणा प्राप्त करत आहेत. त्यांच्यामध्ये मोठे बनण्याची लालसा निर्माण होत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग मानवी स्वप्नांचा विजय आहे आणि हाच तुमचा सर्वात मोठा वारसा आहे.
 

आणि यामुळेच मला हा विश्वास आहे की तुम्ही अशा प्रकारेच परिश्रम करत रहाल आणि देशाचा सन्मान वाढवत रहाल. आमचे सरकार तुमच्यासोबत आहे, देश तुमच्यासोबत आहे आणि मित्रहो संकल्पाचे सामर्थ्य खूप मोठे असते, जर तुम्ही मृतवत झालेल्या विचाराने चालत राहाल तर ना तुम्ही जगाला चालवू शकता ना तुम्हाला कोणतेही यश प्राप्त होऊ शकते. तुम्ही बरेचसे असे लोक पाहिले असतील, तुम्ही त्यांना सांगा की बाबा रे जरा इथून रोहतक ला जाऊन ये तर तो 50 वेळा विचार करेल, की बस मिळेल की नाही, ट्रेन मिळेल की नाही, कसा जाऊ, काय करू आणि काही लोक ठीक आहे, रोहतकला जायचे आहे ना, मी संध्याकाळपर्यंत जाऊन येतो. तो विचार करत राहत नाही, तो हिंमत दाखवतो. विचार करण्याचे जे सामर्थ्य आहे आणि तुम्ही पाहिले असेल की 100 च्या पलीकडे असे नुसते म्हणून काही होत नाही. एक दूरदृष्टी देखील असते, संपूर्ण परिश्रमाचा एक रेकॉर्ड देखील असतो आणि मग आत्मविश्वासाने भरून संकल्पासह आपण पुढचे पाऊल टाकतो. यावेळी शंभरच्या पलीकडे आणि मग 101 वर थांबलो नाही 111 पदके मिळवून आपण परतलो. आज ज्यावेळी मी सांगतो मित्रहो हा माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि यासाठीच मी सांगतो की आपणच ते आहोत जे 10 क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत आणि अगदी जाहीरपणे सांगतो की याच दशकात आपण तिसऱ्या क्रमांकापर्यंत नक्कीच पोहोचू, याच आधारावर मी सांगतो की 2047 मध्ये हा देश विकसित भारत बनेलच, जर माझे दिव्यांग बांधव स्वप्ने साकार करू शकतात तर 140 कोटी लोकांची ताकद देखील, एकही स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही हा माझा विश्वास आहे.

मित्रांनो मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पण आपल्याला इथेच थांबायचं नाही आहे आणि नवीन संकल्प आणि नवा आत्मविश्वास, प्रत्येक पहाट नवी पहाट तेव्हा कुठे आपले लक्ष्य आपल्या जवळ येते मित्रांनो.

खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
25% of India under forest & tree cover: Government report

Media Coverage

25% of India under forest & tree cover: Government report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi