Quote“गुजरातच्या शिक्षकांसोबतचा माझा अनुभव मला राष्ट्रीय स्तरावरही धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी उपयोगी पडला"
Quote"अनेक जागतिक नेते अतिशय आदराने त्यांच्या भारतीय शिक्षकांची आठवण काढतात"
Quote“मी सतत शिकणारा विद्यार्थी आहे आणि समाजात जे काही घडते त्याचे बारकाईने निरीक्षण करायला शिकलो आहे"
Quote“कमालीचा आत्मविश्वास असलेले हे धाडसी विद्यार्थी शिक्षकांना अध्यापनाच्या पारंपारिक पद्धतीतून बाहेर पडण्याचे आव्हान देतात "
Quote"जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या आव्हानांकडे शिक्षकांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे कारण ते आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी देतात"
Quote"तंत्रज्ञान माहिती पुरवू शकते मात्र दृष्टिकोन नाही"
Quote“आज भारत 21 व्या शतकाच्या गरजांनुसार नवीन प्रणाली निर्माण करत आहे आणि हे लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे"
Quote“सरकार प्रादेशिक भाषांमधून शिक्षणावर भर देत आहे ज्यामुळे शिक्षकांचे जीवनही सुधारेल”
Quote“शाळेचा वर्धापन दिन साजरा केल्यास शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील तुटलेले बंध पुन्हा जोडले जातील"
Quote“शिक्षकांनी केलेला छोटासा बदलही युवा विद्यार्थ्यांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणू शकतो"

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!

तुम्ही इतक्या प्रेमाने मला, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या या राष्ट्रीय अधिवेशनात बोलावले, यासाठी मी तुमचा आभारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात, भारत विकसित होण्याच्या संकल्पासह अग्रेसर होत आहे, अशावेळी तुम्हा सर्व शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि मोठी आहे. गुजरातमध्ये असताना, प्राथमिक शिक्षकांसोबत काम करत, संपूर्ण राज्याची शिक्षण व्यवस्था बदलण्याचा माझा अनुभव राहिला आहे. एकेकाळी गुजरात मध्ये गळतीचा दर, जसे मुख्यमंत्री जी यांनी सांगितले, सुमारे 40 टक्क्याच्या जवळपास असे. आणि आज, जसे मुख्यमंत्री जी यांनी सांगितले, तो तीन टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे.  आणि हे गुजरातमधील शिक्षकांच्या सहकार्यानेच शक्य झाले आहे. गुजरात मध्ये शिक्षकांसोबत काम करताना माझे जे अनुभव राहिले, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही धोरणे बनवण्यात, धोरणांचा आराखडा तयार करण्यात आम्हाला खूपच मदत झाली. आता जसे रुपाला जी, सांगत होते शाळांमध्ये स्वच्छतागृह नसल्या कारणाने मोठ्या संख्येने मुली शाळा सोडत होत्या. यासाठी आम्ही विशेष अभियान राबवून शाळांमध्ये मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवली. येथे गुजरात मध्ये तर एकेकाळी संपूर्ण आदिवासी भागामध्ये, गुजरातचा संपूर्ण पूर्व भाग, जिथे आमचे आदिवासी बांधव राहतात, एकाप्रकारे, त्या संपूर्ण भागात उमरगाव पासून ते अंबाजी पर्यंत विज्ञान शाखेचे शिक्षणच होत नसे.  

शिक्षक आज तेथे केवळ विज्ञान शिकवत नाहीत तर माझे आदिवासी नवयुवक मुले मुली डॉक्टर आणि इंजिनियर देखील बनत आहेत.  मी अनेकदा, पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मला परदेशी जाण्याची जबाबदारी असते, जेव्हाही मी जातो, परदेशात मी या नेत्यांबरोबर जेव्हा भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि ते जे मला सांगतात, इथे बसलेला प्रत्येक शिक्षक ते ऐकून त्याला अभिमान वाटेल. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. सामान्यतः जेव्हा परदेशातील नेत्यांची भेट घेतो, तेव्हा त्यांच्या जीवनात, भारतीय शिक्षकांचे किती मोठे योगदान राहिले आहे, याचे ते खूप अभिमानाने वर्णन करतात. मी पंतप्रधान झाल्यानंतर माझा पहिला प्रदेश दौरा भूतानमध्ये झाला. आणि भूतानच्या राज परिवारासोबत जेव्हा मी चर्चा करत होतो तेव्हा ते अभिमानाने सांगत होते, त्यांचे राजे सांगत होते की माझ्या पिढीतील जितके लोक भूतान मध्ये आहेत, त्यांना भारतीय शिक्षकानेच शिकवलेले आहे. आणि ते हे सर्व अभिमानाने सांगत होते. अशातच मी जेव्हा सौदी अरेबियाला गेलो, तिथले राजे खूपच वरिष्ठ आणि सन्माननीय महापुरुष आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेमही खूप आहे. परंतु मी जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हा तेव्हा ते म्हणाले माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मग त्यांनी मला विचारले त्याचे कारण माहित आहे? मी म्हटले तुम्ही सांगा, ही तुमची कृपा आहे. तेव्हा ते म्हणाले, हे बघा भले मी राजा आहेे, परंतु मी जो कोणी आहे, लहानपणापासूनच माझे शिक्षक तुमच्या देशातील होते आणि तुमच्या गुजरात मधील होते ज्यांनी मला शिकवले.

 

|

म्हणजेच भारताच्या पंतप्रधानांशी बोलताना, एवढ्या मोठ्या समृद्ध देशाच्या महापुरुषांना, एका शिक्षकाच्या योगदानाबद्दल बोलताना अभिमान वाटत होता.

गेल्या काही काळात कोविडमधील दिवसात तुम्ही टीव्हीवर जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात बरेच काही पाहिले असेल.  WHO चे प्रमुख, टेड रॉस, तुम्ही त्यांची विधाने टीव्हीवर अनेकदा पाहिली असतील. माझी त्याच्याशी खूप छान मैत्री आहे आणि ते नेहमी अभिमानाने सांगत असतात. ते मागे जामनगरला आले होते, तेव्हाही त्यांनी पुन्हा त्याच अभिमानाने उल्लेख केला होता. ते म्हणाले की, लहानपणापासून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या भारतीय शिक्षकाचे योगदान आहे.  माझ्या आयुष्याला घडवण्यात भारतातील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

मित्रांनो,

रुपाला जी अभिमानाने सांगू शकतात की त्या आजीवन शिक्षक आहेत.  मी स्वतः शिक्षक नाही. पण मी अभिमानाने सांगतो की मी आजीवन विद्यार्थी आहे. तुम्हा सर्वांकडून, समाजात जे काही घडते ते बारकाईने निरीक्षण करायला शिकलो आहे.  आज प्राथमिक शिक्षकांच्या या सत्रात मला माझे अनुभव मनापासून तुमच्यासमोर मांडायचे आहेत. या वेगवान बदलत्या 21 व्या शतकात भारताची शिक्षण व्यवस्था बदलत आहे, शिक्षक बदलत आहेत, विद्यार्थीही बदलत आहेत. अशा परिस्थितीत या बदलत्या परिस्थितीत आपण पुढे कसे जायचे, हे खूप महत्त्वाचे ठरते. आपण पाहिल्याप्रमाणे, पूर्वीच्या शिक्षकांना संसाधनांचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाजूने विशेष आव्हान नव्हते.

शिक्षकांसमोरील साधन-सुविधांचा अभाव, त्या अडचणी होत्या.  त्या आज हळूहळू दूर होत आहेत. पण, आजच्या पिढीची मुले, विद्यार्थी, त्यांची जी जिज्ञासा आहे, जे कुतुहल आहे, त्यांनी पालकांबरोबरच शिक्षकांसमोरही मोठे आव्हान उभे केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आहे, हे विद्यार्थी निर्भय आहेत. आणि त्याचा स्वभाव असा आहे की आठ वर्षांचा, नऊ वर्षांचा विद्यार्थीही शिक्षकाला आव्हान देतो.  शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींच्या पलिकडे काही नवीन गोष्टी तो विचारतो, त्यांच्याशी बोलतो. त्यांची उत्सुकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अभ्यासक्रम आणि विषयाच्या पलीकडे जाण्याचे आव्हान शिक्षकांना देते. येथे उपस्थित सध्याच्या शिक्षकांना सध्याच्या विद्यार्थ्यांकडून दररोज असा अनुभव येत असावा. असे प्रश्न घेऊन ते आले असतील, तुम्हालाही ते खूप अवघड जात असेल.

विद्यार्थ्यांकडे माहितीचे वेगवेगळे स्रोत असतात. यामुळे शिक्षकांसमोर स्वत:ला माहितीने परिपूर्ण ठेवण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे. शिक्षक ही आव्हाने कशी सोडवतात यावर आपल्या शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे. आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे या आव्हानांना वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीच्या संधी म्हणून पाहणे. ही आव्हाने आपल्याला शिकण्याची, आधीचे शिकलेले पुसण्याची आणि पुन्हा शिकण्याची संधी देतात. यावर तोडगा काढण्याचा एकच मार्ग म्हणजे अध्यापनासह स्वतःला विद्यार्थ्याचे शिक्षक आणि मार्गदर्शक बनवणे. तुम्हाला हे देखील माहित आहे की गुगलवरून डेटा मिळवता येतो, परंतु निर्णय तर स्वतःलाच घ्यावा लागतो. विद्यार्थ्याला त्याच्या ज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन फक्त गुरुच करू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळवता येते, पण योग्य दृष्टिकोन शिक्षकच देऊ शकतो. कोणती माहिती उपयुक्त आहे आणि कोणती नाही हे समजून घेण्यासाठी फक्त एक गुरुच मुलांना मदत करू शकतो.  कोणतेही तंत्रज्ञान विद्यार्थ्याची कौटुंबिक स्थिती समजून घेऊ शकत नाही. केवळ एक गुरुच त्याची परिस्थिती समजून घेऊ शकतो आणि त्याला सर्व अडचणींमधून बाहेर पडण्यास प्रेरीत करू शकतो. त्याचप्रमाणे एखादा विषय सखोलपणे कसा समजून घ्यावा, डीप लर्निंग कसे करावे हे जगातील कोणतेही तंत्रज्ञान शिकवू शकत नाही.

 

|

जेव्हा भरमसाठ माहिती समोर येते, माहितीचे डोंगर उभे राहतात, तेव्हा विद्यार्थ्यांनी एकाच गोष्टीवर लक्ष कसे केंद्रित करायचे, हे शिकणे महत्त्वाचे ठरते. सखोल अभ्यास करणे आणि त्याद्वारे तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आज एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका आणखी व्यापक झाली आहे. मी तुम्हालासुद्धा हे सांगू इच्छितो की मी तुम्हाला कोणताही उपदेश देण्यासाठी आलो नाही आणि मी उपदेश करूही शकत नाही. पण तुम्ही शिक्षक आहात, हे क्षणभरासाठी विसरून जा. क्षणभर विचार करा की तुम्ही एखाद्या मुलाची आई आहात, एखाद्या मुलाचे वडील आहात. तुम्हाला तुमचे मूल कसे असायला हवे आहे? तुम्हाला तुमच्या मुलासाठी काय हवे आहे? मित्रांनो, तुम्हाला पहिले उत्तर मिळेल, जे इथे असणारे कोणीही नाकारू शकत नाही. तुम्हाला पहिले उत्तर मिळेल, मी एक चांगला शिक्षक आहे,  आम्ही आई-वडील दोघेही चांगले शिक्षक आहोत, पण आमच्या मुलांना चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत, चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तुमच्या मनात सुद्धा पहिली इच्छा ही मुलांसाठी आहे. तुमच्या मुलांना चांगले शिक्षक, चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. जी इच्छा तुमच्या हृदयात आहे, तीच इच्छा भारतातील कोट्यवधी पालकांच्या हृदयात आहे. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जे हवे आहे तेच भारतातील प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांसाठी हवे आहे आणि ते तुमच्याकडून ती अपेक्षा करतात.

मित्रहो,

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की विद्यार्थी तुमच्याकडून, तुमच्या विचारांमधून, तुमच्या रोजच्या वागण्यातून, तुमचे बोलण्यातून, तुमच्या उठ – बस करण्याच्या पद्धतीतून खूप काही शिकत असतो. तुम्ही जे शिकवत आहात आणि विद्यार्थी तुमच्याकडून जे शिकत आहे, त्यात कधी कधी खूप फरक असतो. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गणित, विज्ञान, इतिहास किंवा इतर कोणताही विषय शिकवत आहात, पण विद्यार्थी तुमच्याकडून फक्त तो विषय शिकत नाही. आपले बोलणे कशा प्रकारे मांडावे, हे देखील शिकत आहे. धीर धरणे, इतरांना मदत करणे असे गुणही तो तुमच्याकडून शिकत असतो. कठोर व्यक्तिमत्व बाळगतानाही आपुलकी कशी व्यक्त करायची हे तुम्हाला पाहूनच शिकतो. नि:पक्ष असण्याचा गुणही विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मिळतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. लहान मुलांसाठी शिक्षक ही कुटुंबाबाहेरची पहिली व्यक्ती असते, ज्यांच्यासोबत ते सर्वाधिक वेळ घालवतात. त्यामुळे तुम्हा सर्वांना या जबाबदारीची जाणीव असली तर त्यायोगे भारताच्या भावी पिढ्यांना निश्चितच बळ मिळेल.

मित्रहो,

तुम्ही सध्या ज्या शाळांमध्ये कार्यरत आहात, तिथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकतर लागू केले झाले असेल किंवा ते लागू होणार असेल. आणि मला अभिमान वाटतो की यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात देशातील लाखो शिक्षकांनी योगदान दिले आहे. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे हे संपूर्ण शैक्षणिक धोरण तयार झाले आहे. आणि यामुळे त्याचे सर्वत्र स्वागत होते आहे. आज भारत एकविसाव्या शतकातील आधुनिक गरजांनुसार नवीन व्यवस्था निर्माण करत आहे. हे लक्षात घेऊन, हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे.

इतकी वर्षे आपण शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देत होतो. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या जुन्या असंबद्ध व्यवस्थेत बदल घडवून आणते आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जास्त व्यावहारिक आहे. आता तुमच्यासाठी शिकवणे आणि शिकणे, आता शिकवण्याचा कालावधी संपत आला आहे, असे म्हणतात. आता शिक्षणाच्या माध्यमातून पुढचे शिक्षण द्यायचे आहे. आता तुम्हाला मातीबद्दल काही सांगायचे आहे, चाकाबद्दल काही शिकवायचे आहे तर अशा वेळी जमल्यास मुलांना कुंभाराच्या घरी घेऊन जा. कुंभाराच्या घरी गेलात तर अनेक गोष्टी पाहायला मिळतील. कुंभार कोणत्या परिस्थितीत राहतात, किती कष्ट करतात? गरिबीतून बाहेर पडण्यासाठी माणूस किती प्रयत्न करतो, हे त्यांना दिसून येईल. आणि यामुळे मुले संवेदनशील होतील. मातीपासून सुरई, मडके, भांडी कशी तयार होतात, हे मुले पाहू शकतील. मातीचे विविध प्रकार कोणते आहेत, या सर्व गोष्टी प्रत्यक्ष दिसतील. अशा प्रकारचा व्यावहारिक दृष्टिकोन हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

मित्रहो,

आजकाल अनोखे प्रयोग करणारे तसेच शिकण्या आणि शिकवण्याबाबतचे वादविवाद ऐकायला मिळतात. पण मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग सांगतो. आज मला माझ्या एका शिक्षकाची आठवण येत आहे. माझे प्राथमिक शिक्षक, संध्याकाळी शाळेतून घरी जायच्या वेळीच ते मुलांना काही ना काही काम देत असत. आणि गृहपाठ नाही तर भलतेच काहीतरी काम द्यायचे. म्हणजे ते एखाद्या मुलाला सांगायचे, एक काम कर, तू उद्या तांदळाचे दहा दाणे आण. इतर कोणाला मूगाचे दहा दाणे आणायला सांगायचे, तिसर्‍याला तूरडाळीचे 10 दाणे आणायला सांगत तर चौथ्याला दहा चणे आणायला सांगत. प्रत्येकाला 10-10 असे काहीतरी आणायला सांगत. त्यामुळे मुलाला घरी जाताना लक्षात राहायचे, मला 10 आणायचे आहेत, मला 10 आणायचे आहेत. 10 क्रमांक लक्षात राहून जाई. मग आपल्याला गहू आणायचेत की तांदूळ, ते तो घरी जाताच आईला सांगत असे. शिक्षकांनी मला उद्या हे आणायला सांगितले आहे. सकाळपर्यंत तांदूळ आणि 10 दाणे, तांदूळ आणि 10 दाणे हेच त्याच्या मनात येत राही. पण आम्ही वर्गात जायचो तेव्हा आमचे शिक्षक ते सगळ्यांकडून एकत्र करायचे. आणि मग सगळ्यांना वेगवेगळ्या मुलांना सांगायचे, अरे मुला, तू एक काम कर, यातून पाच मूग काढ, दुसऱ्याला म्हणायचे, ३ चणे काढ, तिसऱ्याला असेच काही सांगायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला चणे ओळखता येत, मूग ओळखता येई आणि अंकही लक्षात राही. म्हणजे त्यांची ती व्यावहारिक पद्धत होती, आम्हालाही काहीतरी वेगळेच अनुभवल्यासारखे वाटत असे, पण ती त्यांची शिकवण्याची पद्धत होती. ते एक वर्ष पूर्ण करून आम्ही पुढच्या वर्गात गेलो, तेव्हाही तेच शिक्षक होते. त्यांनी पुन्हा तसेच करायला सांगितले. मला प्रश्न विचारायची सवय होती, त्यामुळे मी त्यांना म्हणालो सर, मागच्या वर्षी तुम्ही हे आमच्याकडून करून घेतले, आका पुन्हा का करायला सांगता आहात? पुन्हा केले? तर ते म्हणाले, गप्प बस, तू तुझं काम कर. ठीक आहे तर, आम्ही जे सांगितले ते घेऊन आलो. पण पुढच्या वर्षी त्यांनी बदल केला. त्यांनी प्रत्येकाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आणि म्हणाले, तुम्ही फक्त स्पर्श करून, मूग कोणता, हरभरा कोणता, हे ओळखू शकता. मित्रांनो, त्यांनी आम्हाला स्पर्शेंद्रियांचे सामर्थ्य अगदी सहज सोप्या प्रकारे शिकवले होते. एखादा शिक्षक जेव्हा मनापासून तुमच्यात गुंतलेला असतो, तेव्हा तो कशा पद्धतीने शिकवतो, याबद्दल मी माझा अनुभव सांगत आहे. या एका उपक्रमाचा आम्हाला किती फायदा झाला याची तुम्ही कल्पना करू शकता. आम्ही मोजायला शिकलो, आम्ही डाळींबद्दल शिकलो, आम्ही रंगांबद्दल शिकलो. अशा प्रकारे आमचे ते शिक्षक आम्हाला व्यावहारिक पद्धतीने अभ्यास करायला शिकवायचे. प्रात्यक्षिकासह अभ्यास, ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामागची मूळ भावना आहे आणि  आणि त्यानुसार शिकवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांना पार पाडावी लागेल.

 

|

मित्रांनो,

राष्ट्रीय शिक्षण धोरणात जी एक मोठी तरतूद करण्यात आली आहे ती आपल्या गाव-खेड्यातील आणि लहान शहरांतील शिक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरणारी आहे. ही तरतूद आहे – मातृभाषेतून शिक्षण घेण्याची. इंग्रजांनी आपल्या देशावर अडीचशे वर्षे राज्य केले पण तरीही इंग्रजी भाषा एका विशिष्ट वर्गापुरतीच सीमित राहिली. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर अशी पद्धत रुढ झाली की इंग्रजी भाषेतील शिक्षणालाच प्राधान्य मिळू लागले. आई-वडील देखील त्यांच्या मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी हिरीरीने सरसावू लागले. या पद्धतीमुळे किती तोटा झाला आहे याचा विचार कधी  माझ्या शिक्षक संघाने केला आहे की नाही ते मला माहित नाही. मी आज त्याबद्दल तुम्हांला सागतो, ज्या वेळी तुम्ही या विषयाचा विचार कराल तेव्हा या सरकारची जितकी स्तुती कराल तितकी कमीच असेल.

झाले काय, तर जेव्हा हा इंग्रजीचा उदो-उदो सुरु झाला त्या सुमारास गाव-खेड्यातील तसेच गरीब कुटुंबांतील आपले लाखो शिक्षक मातृभाषेत शिक्षण घेऊन मोठे झालेले होते. ते सर्वजण कितीठी उत्तम शिक्षक असले तरीही त्यांना इंग्रजी भाषा शिकण्याची संधीच मिळालेली नव्हती. त्यामुळे त्यांची नोकरी धोक्यात आली होती कारण इंग्रजी भाषेतून शिकवणे अनिवार्य करणारे  वातावरण निर्माण झाले होते. म्हणून तुम्हा सर्वांची नोकरी आणि भविष्यात अशी नोकरी करू इच्छिणाऱ्या तुमच्यासारख्या सर्व सहकाऱ्यांची नोकरी सुरक्षित करण्यासाठी आम्ही मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे. यातून माझ्या देशातील शिक्षकांना अभय मिळणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या देशात अशीच रीत चालत आली आहे.  आता मात्र,राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे मातृभाषेतून शिक्षण घेण्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. ग्रामीण भागांतील, गरीब कुटुंबांतील आपल्या युवकांना, शिक्षकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे, त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो,

शिक्षकांसमोर असलेली आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता, लोक स्वतःहून शिक्षकी पेशा स्वीकारण्यासाठी पुढे येतील असे वातावरण आपण निर्माण करण्याची आज  गरज आहे. आपल्या आजूबाजूला आजघडीला असलेल्या वातावरणात आपण बघतो की अनेक जण डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त करतात, कोणी इंजिनियर होण्याची इच्छा व्यक्त करतात, कोणी एमबीए चे शिक्षण घेऊ इच्छितो तर कोणी तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळवू इच्छितो, अनेक जण अशा अनेक गोष्टी बोलतात. पण एखादा येऊन म्हणेल की मी आयुष्यात शिक्षक होऊ इच्छितो, मला मुलांना शिकवण्याची इच्छा आहे, असे फार कमी वेळा घडते. अशी परिस्थिती म्हणजे कोणत्याही समाजासाठी एक फार मोठे आव्हान आहे. या सगळ्यात हे प्रश्न देखील मनात यायला हवेत की, आपण केवळ नोकरी म्हणून मुलांना शिकवतो आहोत का? या नोकरीचा पगार तर  मिळतो आहे पण आपण आपल्या हृदयापासून देखील शिक्षकी स्वीकारत आहोत का? आपण आयुष्यभर शिक्षकाची भूमिका निभावणार आहोत का? मला देशाची भविष्यातील पिढी घडवायची आहे, मुलांना दररोज नवे काहीतरी शिकवायचे आहे असा विचार जागेपणी, झोपेत, उठता बसता आपल्या मनात येतो आहे का? समाजाला आकार देण्यात शिक्षकांची फार मोठी भूमिका असते असे मला वाटते. पण, अनेकदा, काही काही गोष्टी पाहून मला फार वेदना देखील होतात. मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला देखील माझ्या वेदना समजू शकतील.आताच रुपालाजींनी जसे सांगितले तसे कधी कधी माझ्या देखील मनात येत असे, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या दोन इच्छा होत्या, अगदी व्यक्तिगत पातळीवरील इच्छा होत्या त्या. त्यातील एक इच्छा म्हणजे, लहानपणी शाळेत माझ्यासोबत शिकणारे जे मित्र होते त्यांना मी मुख्यमंत्री निवासात येण्याचे आमंत्रण द्यावे. त्या वेळेपर्यंत मी पूर्णपणे संन्यासी झालो होतो, सर्वांशी असलेले माझे नाते तुटून गेले होते. या दरम्यान तीन-तीन दशकांचा काळ निघून गेला होता. तर माझ्या मनात असे आले की त्या जुन्या मित्रांची भेट घ्यावी. आणि माझी दुसरी इच्छा अशी होती की माझ्या सर्व शिक्षकांना माझ्या घरी बोलावून त्यांचा सत्कार करावा. आणि मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की, ज्या वेळी मी माझ्या शिक्षकांना आमंत्रण दिले त्यावेळी त्यापैकी एका शिक्षकांचे वय 93 वर्षे झाले होते. मित्रांनो, मला हे सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आहे की मी असा विद्यार्थी आहे की माझे जे जे शिक्षक आज जिवंत आहेत त्या सर्वांच्या मी आजही संपर्कात आहे. पण, आजकाल काय बघायला मिळते, कधी कोणी लग्नाचे आमंत्रण द्यायला येतो,कधी मी एखाद्या लग्न समारंभाला जातो, तेव्हा तो समाजातील कितीही मोठा माणूस असेल तरी त्याला मी विचारतो की बाबारे, तुझे लग्न होते आहे, तुझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे, तर या प्रसंगी उपस्थित राहण्याचे निमंत्रण तू तुझ्या एखाद्या शिक्षकाला दिले आहेस की नाही? आणि असा प्रश्न विचारल्यावर त्यातील 100 पैकी 90 जण नकारार्थी उत्तर देतात. जेव्हा मी हा प्रश्न विचारतो तेव्हा लोक इकडेतिकडे पाहू लागतात. अरे बाबांनो, तुमचे आयुष्य घडवण्याची सुरुवात त्या शिक्षकांनी केली, आणि आता तुम्ही तुमच्या जीवनातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे मार्गक्रमण करत आहात तर तुम्हांला तुमच्या त्या शिक्षकांची आठवण आली नाही? ही आपल्या  समाजातील एक सत्य परिस्थिती आहे आणि असे का घडते आहे याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. या सत्य परिस्थितीचा आणखी एक पैलू देखील आहे. जसे मी लोकांना विद्यार्थ्यांच्या संदर्भातील प्रश्न मी शिक्षकांना देखील विचारत असतो. शिक्षणाशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला मला फार आवडते. अनेक वर्षांपासून मी अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत आलो आहे. अशा कार्यक्रमांमध्ये गेल्यावर मी तेथील शिक्षकांची अवश्य भेट घेतो. लहानलहान शाळांच्या कार्यक्रमांमध्ये देखील मी जातो तेव्हा तेथील शिक्षक कक्षात बसून मी शिक्षकांशी बातचीत करतो. मी त्यांना विचारतो की तुम्ही 20-25 वर्षांपासून किंवा 12 वर्षांपासून शिक्षकी पेशात कार्यरत आहात. तर शिक्षक म्हणून तुमच्या कार्यकाळातील अशा 10 विद्यार्थ्यांची नावे मला सांगा ज्यांनी आयुष्यात पुढे जाऊन काही भरीव कार्य करून तुमचे नाव उज्ज्वल केले आहे,  त्याचे जीवन अत्यंत यशस्वी झाले आहे आणि तो तुमचा विद्यार्थी आहे हे सांगताना तुम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. मला असे सांगायचे आहे की दुर्दैवाने,त्यांच्यापैकी बहुतेक जण मला याचे नीट उत्तर देऊन शकत नाहीत. ते सांगतात की, 20 वर्षांपासून मी शिक्षकी पेशात आहे, दररोज विद्यार्थी माझ्या सोबत असतात पण माझ्या हाताखालून गेलेले आणि आपले जीवन उत्तमपणे घडविलेले 10 विद्यार्थी कोण आहेत हे मला सांगता येणार नाही. ते विद्यार्थी माझ्या स्मरणात नाहीत, माझा त्यांच्याशी संपर्क राहिलेला नाही.म्हणजेच दोन्ही बाजूंनी   संपर्क तुटलेला आहे.आणि हे  विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही बाजूंकडून होते आहे.

आणि मित्रांनो,

सगळीच परिस्थिती  निराशाजनक आहे असे नाही. आपल्या क्रीडा क्षेत्रात तुम्हांला अगदी वेगळेच दृश्य पाहायला मिळते. आपण पाहतो की एखादा खेळाडू पदक जिंकून आला तर सर्वात प्रथम तो त्याच्या गुरुला, प्रशिक्षकाला वंदन करतो. हा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जिंकून आला असेल. ज्या गुरूने लहानपणी त्याला हा खेळ शिकवला असेल आणि मध्ये 15-20 वर्षांचा काळ निघून गेला असेल तरीही, जेव्हा हा खेळाडू पदकावर आपले नाव कोरतो तेव्हा त्या गुरुला नमन करतो. गुरुप्रती आदराची ही भावना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनात कायम असते. क्रीडा क्षेत्रात असे होते याचे कारण असे आहे की या गुरु किंवा प्रशिक्षकाने त्या खेळाडूवर व्यक्तिगत स्वरुपात लक्ष केंद्रित केलेले असते, त्या खेळाडूच्या आयुष्याचा भाग होऊन त्यांनी त्याला घडविलेले असते. त्याच्यावर मेहनत घेतलेली असते. खेळाचे मैदान वगळता, इतर शिक्षकांच्या जगात आपल्याला असे क्वचितच पाहायला मिळते की एखादा विद्यार्थी आयुष्यभर त्या शिक्षकांची आठवण काढत असेल आणि त्यांच्या संपर्कात  राहीला असेल. असे का होते याचा विचार आपण सर्वांनी अवश्य करायला हवा.

मित्रहो,

काळानुसार विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील ओढ देखील कमी होऊ लागली आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडताना विद्यार्थ्यांना शाळेची त्यावेळी आठवण येते ज्यावेळी त्यांना एखादा फॉर्म भरायचा असतो आणि तिथून एखादा दाखला घ्यायचा असतो. मी अनेकदा लोकांना विचारतो की तुम्हाला तुमच्या शाळेचा वर्धापन दिवस किंवा तुमच्या शाळेचा वाढदिवस कधी असतो ते माहीत आहे का? वाढदिवस म्हणजे तो कोणता दिवस होता ज्या दिवशी तुमची शाळा सुरू झाली होती आणि मला जो अनुभव आला आहे तो  हा आहे की विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या व्यवस्थापनाला किंवा शिक्षक यापैकी कोणालाही हे माहीत नसते की ज्या शाळेत ते नोकरी करत आहेत किंवा ज्या शाळेत ते शिकले होते ती शाळा कधी सुरू झाली होती. ही माहिती देखील नसते भाऊ. शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील ही असंलग्नता दूर करण्यासाठी परंपरा सुरू करता येऊ शकतात की आपण शाळांचा वाढदिवस साजरा करुया आणि अगदी थाटामाटात साजरा करुया, संपूर्ण गावाने एकत्रितपणे साजरा केला पाहिजे आणि याच बहाण्याने तुम्ही त्या शाळेत शिकलेल्या सर्व जुन्या-जुन्या लोकांना एकत्र करा, सर्व जुन्या शिक्षकांना एकत्र करा, तुम्ही बघा एक संपूर्ण वातावरण बदलून जाईल, आपलेपणाची नवी सुरुवात होईल. यामुळे एक जोड तयार होईल, समाज जोडला जाईल आणि तुम्हाला देखील याची माहिती होईल की आपण ज्यांना शिकवले होते ते विद्यार्थी आता कुठपर्यंत पोहोचले आहेत. तुम्हाला अभिमान वाटू लागेल. मला हे सुद्धा दिसते की शाळांना सुद्धा माहीत नसते की त्यांच्याकडे शिकलेले विद्यार्थी आज कुठे कुठे पोहोचले आहेत, किती उंचीवर आहेत. कोणी एखाद्या कंपनीचा सीईओ आहे कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनिअर आहे, कोणी नागरी सेवेत आले आहे. त्याच्याविषयीची माहिती सर्वांना आहे पण तो ज्या शाळेत शिकला आहे त्या शाळेलाच हे माहीत नाही आहे. मला पक्की खात्री आहे की कोणी कितीही मोठी व्यक्ती का असेना, कितीही मोठ्या पदावर का असेना,  जर त्याला त्यांच्या जुन्या शाळेकडून निमंत्रण मिळाले तर तो काहीही करून आनंदाने नक्कीच शाळेत येईल. म्हणूनच प्रत्येक शाळेने आपल्या शाळेचा वाढदिवस नक्कीच साजरा केला पाहिजे.

मित्रहो,

आणखी एक महत्त्वाचा विषय तंदुरुस्ती आणि आरोग्याचा देखील आहे, स्वच्छतेचा देखील आहे. हे सर्व विषय परस्परांशी संबंधित विषय आहेत.अनेकदा मी पाहतो की बालकांचे जीवन इतके शिथिल झाले आहे की संपूर्ण दिवस निघून गेला तरीही कोणतीही शारीरिक हालचालीची कृती होत नाही. एक तर तो डिजीटली मोबाईलवर बसलेला असेल किंवा टीव्हीच्या समोर बसलेला असेल. मी कधी कधी शाळांमध्ये जात होतो त्यावेळी बालकांना विचारत असायचो की सांगा पाहू अशी कोणती बालके आहेत ज्यांना दिवसातून चारवेळा घाम येतो, सांगा पाहू. अनेक बालकांना तर हे सुद्धा माहीत नसायचे की घाम म्हणजे काय असतो. बालकांना घाम येत नाही कारण त्यांच्या खेळण्याचे कोणते नियमित वेळापत्रकच नाही आहे. असे असताना त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल? तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की सरकार बालकांच्या पोषणावर किती लक्ष केंद्रित करत आहे ते. सरकार माध्यान्ह भोजनाची व्यवस्था करत असते. जर अशी भावना असेल की कोणत्या तरी प्रकारे अन्नाचा पुरवठा करायचा आहे, कागदावर हे सर्व ठीक राहायचे असेल तर पोषणासंदर्भात आव्हाने येत राहतील. मित्रांनो, मी याकडे दुसऱ्या प्रकारे पाहतो. अर्थसंकल्प तर सरकार तयार करत असते, पण आपण त्या देशातील लोक आहोत जिथे एखाद्या ठिकाणी कोणीही एखादे लहानसे अन्नछत्र चालवत असेल आणि तिथे कोणीही व्यक्ती आली तरी तिला अन्न मिळत असते. समाज याकडे अतिशय अभिमानाने पाहत असतो, श्रद्धेने पाहात असतो. आज आपण लंगरचा विचार केला तर आज लंगरकडे अतिशय श्रद्धेने पाहिले जाते. आज आपण पाहिले तर एखाद्या ठिकाणी भंडारा असतो त्यावेळी लोकांना अतिशय श्रद्धेने जेवण वाढले जाते. मग आपल्याला असे वाटत नाही का की आपल्या शाळेत तर रोज भंडारा सुरू आहे. त्या बालकांना खाऊ घालण्याचा आनंद, त्यांच्या मनांना संस्कारित करण्याचा आनंद आणखी एक पवित्र भाव केवळ त्यांच्या पोटात काही तरी अन्न जात आहे, इतके पुरेसे नाही आहे मित्रांनो. आपल्याला एक अनुभूती असली पाहिजे की बघा संपूर्ण समाज तुम्ही उपाशी राहू नये म्हणून बरेच काही करत आहे, त्या बालकांच्या जीवनासोबत आणि मला तर असे वाटते दररोज गावातील दोन ज्येष्ठ व्यक्तींना बोलावले पाहिजे की आज दुपारी माध्यान्ह भोजनासाठी शाळेत या, आमच्या बालकांना वाढा आणि तुम्ही देखील त्यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद घ्या. बघा संपूर्ण वातावरणच बदलून जाईल, हेच माध्यान्ह भोजन संस्काराचे एक खूप मोठे कारण बनेल आणि त्यामुळे बालकांना कसे जेवायचे, किती स्वच्छतेने जेवायचे, जेवण जराही खराब करायचे नाही, काही वाया घालवायचे नाही, असे सर्व संस्कार त्यासोबत जोडले जातील. शिक्षक म्हणून आपण स्वतःच जेव्हा एखादे उदाहरण देतो, त्यावेळी त्याचा परिणाम खूपच चांगला होत असतो. मला आठवतंय की एकदा मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील एका शाळेत गेलो होतो. ज्यावेळी मी तिथे गेलो तेव्हा पाहिले की तिथली जी बालके होती अतिशय नीटनेटकी होती आणि प्रत्येकाच्या वर एकदम जी लहान बालके होती त्यांच्या गणवेशावर पिन ने एक रुमाल लटकवलेला होता. तर त्या बालकांना हे शिकवण्यात आले होते की त्यांना हात स्वच्छ करायचे आहेत, नाक साफ करायचे आहे आणि ते करत होते आणि जेव्हा शाळा सुटायची वेळ व्हायची तेव्हा ती शिक्षिका होती, ती ते सर्व काढून घ्यायची, घरी नेऊन धुऊन दुसऱ्या दिवशी आणून पुन्हा लावून देत असायची. आणि मला अशी माहिती मिळाली आपल्याकडे तर तुम्हाला माहीत आहेच, या ठिकाणी गुजरातमध्ये तर विशेष आहे की जुने कपडे विकून भांडी घेतात, ती भांडी खरेदी केली जातात. तर ही महिला गरीब होती, पण ती आपली साडी विकत नव्हती. ती आपली साडी कापून रुमाल तयार करत होती आणि बालकांच्या गणवेशावर लावत होती. आता पहा एक शिक्षिका आपल्या जुन्या साडीच्या तुकड्यांनी त्या बालकांवर किती संस्कार करत होती जो तिच्या कामाचा भाग नव्हता. तिने स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण केली होती, त्या आदिवासी भागातील मातेविषयी मी बोलत आहे.   

बंधू-भगिनींनो

स्वच्छतेविषयी जागरुकता याविषयी मी आणखी एका शाळेची गोष्ट सांगतो. मी एका शाळेत गेलो तर शाळा म्हणजे एखाद्या झोपडीसारखी शाळा होती. मोठी शाळा नव्हती. आदिवासी क्षेत्र होते, तर एक काच लावलेली होती, आरसा लावलेला होता, आरसा 2/2 चा आरसा असेल. त्या शिक्षिकेने एक नियम केला होता की जो कोणी शाळेत येईल तो सर्वप्रथम त्या आरशाच्या समोर पाच सेंकद उभा राहील, स्वतःला पाहील आणि मग वर्गात जाईल. त्या एकमेव प्रयोगाने जो कोणता विद्यार्थी यायचा तो लगेच आरशाच्या समोर आपले केस नीट करायचा. त्याचा स्वाभिमान जागा व्हायचा. त्याला असे वाटायचे की मला असे राहिले पाहिजे. बदल घडवून आणण्याचे काम शिक्षक किती अद्भुत  पद्धतीने करतात. अशी शेकडो उदाहरणे आपल्या समोर आहेत.

मित्रहो,

तुम्ही कल्पना करू शकता एक लहानसा प्रयत्न किती मोठे परिवर्तन घडवू शकतो. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणे देऊ शकतो, जी मी स्वतः देखील शिक्षकांच्या सोबत राहताना पाहिली आहेत, जाणून घेतली आहेत, शिकलो आहे. मात्र, वेळेची मर्यादा आहे म्हणून मी माझे म्हणणे जास्त लांबवणार नाही. माझ्या वाणीला मी विराम देतो. मला खात्री आहे की आपल्या परंपरेत गुरुला जे स्थान दिले आहे, तुम्ही सर्व ती प्रतिष्ठा, तो गौरव, त्या महान परंपरेला पुढे न्याल, नव्या भारताचे स्वप्न पूर्ण कराल. याच विश्वासाने मी तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद देतो आणि खूप-खूप शुभेच्छा देतो.

नमस्कार!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
What Is Firefly, India-Based Pixxel's Satellite Constellation PM Modi Mentioned In Mann Ki Baat?

Media Coverage

What Is Firefly, India-Based Pixxel's Satellite Constellation PM Modi Mentioned In Mann Ki Baat?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जानेवारी 2025
January 20, 2025

Appreciation for PM Modi’s Effort on Holistic Growth of India Creating New Global Milestones