नमस्कार,
कार्यक्रमाला उपस्थित आचार्य श्री महाश्रमण जी,
मुनी गण, पूज्य साध्वी जी गण आणि सर्व भाविक.
आपला हा भारत हजारो वर्षांपासून संत, ऋषी, मुनी, आचार्य यांच्या महान परंपरेची भूमी आहे.काळाच्या ओघात आलेल्या संकटांनी कितीतरी आव्हाने उभी केली ,मात्र ही परंपरा तशीच सुरू राहिली.ज्यांनी आपल्याला चरैवेती-चरैवेतीचा मंत्र दिला तेच आपल्या येथे आचार्य झाले आहेत.श्वेतांबर तेरापंथ तर चरैवेती-चरैवेती या अखंड सुरु असलेल्या या महान परंपरेला नवी उंची देत आहे. आचार्य भिक्षू यांनी आळसाचा त्याग हा अध्यात्मिक संकल्प केला होता.
आधुनिक काळात आचार्य तुलसी आणि आचार्य महाप्रज्ञ जी यांच्यापासून सुरू झालेली ही महान परंपरा आचार्य महाश्रमणजींच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर जिवंत आहे.आचार्य महाश्रमणजींनी 7 वर्षात 18 हजार किलोमीटरची ही पदयात्रा पूर्ण केली आहे.ही पदयात्रा जगातील तीन देशांची यात्रा होती. याद्वारे आचार्य श्रीं यांनी 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पदयात्रेने देशातील 20 राज्ये एका विचाराने, एका प्रेरणेने जोडली.जिथे अहिंसा आहे तिथे एकता आहे.जिथे एकता असते तिथे अखंडता असते.जिथे अखंडता असते तिथे उत्कृष्टता असते.मला वाटते की, तुम्ही 'एक भारत श्रेष्ठ भारत' या मंत्राचा अध्यात्मिक संकल्प म्हणून प्रसार करण्याचे काम केले आहे.ही पदयात्रा पूर्ण झाल्याबद्दल मी आचार्य महाश्रमण जी आणि सर्व अनुयायांचे भक्तीभावाने खुप - खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
श्वेतांबर तेरा पंथच्या आचार्यांकडून मला नेहमीच विशेष स्नेह लाभला आहे.आचार्य तुलसीजी, त्यांचे पट्टधर आचार्य महाप्रज्ञ जी आणि आता आचार्य महाश्रमण जी, मी या सर्वांचा विशेष कृपाभिलाषी राहिलो आहे. या प्रेमापोटी मला तेरा पंथच्या कार्यक्रमांशी जोडले जाण्याचे भाग्यही लाभले आहे. याच प्रेमापोटी मी तुम्हा सर्व आचार्यांना म्हटले होते की -हा तुमचा पंथ आहे, हा माझा पंथ आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आचार्य महाश्रमणजींच्या या पदयात्रेशी संबंधित माहिती पाहत असताना मला त्यातही एक सुखद योगायोग दिसला.2014 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तुम्ही हा प्रवास सुरू केला होता.त्यावर्षी देशानेही एक नवा प्रवास सुरू केला आणि मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, हा नव्या भारताचा नवा प्रवास आहे.या प्रवासात देशाचाही तोच संकल्प होता- लोकसेवा, लोककल्याण! कोट्यवधी देशवासियांना भेटून परिवर्तनाच्या या महायज्ञात सहभागी होण्याची शपथ देऊन तुम्ही आज दिल्लीत आला आहात. मला विश्वास आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला नव्या भारताच्या या नव्या प्रवासाची उर्जा नक्कीच जाणवली असेल, ती तुम्ही साक्षात पाहिली असेल. माझे आवाहन आहे की, बदलत्या भारताचे हे अनुभव जितके तुम्ही देशवासियांशी सामायिक कराल, तितकीच त्यांना प्रेरणा मिळेल.
मित्रांनो,
आचार्यश्री यांनी आपल्या पदयात्रतून’मध्ये ‘सद्भावना, नैतिकता’ आणि ‘व्यसनमुक्ती’ एका संकल्पाच्या स्वरुपात समाजासमोर मांडले आहेत.
मला सांगण्यात आले आहे, की यामुळे लाखो लोक व्यसनमुक्तीसारख्या संकल्पाशी जोडले गेले आहेत. ही स्वतःच्या बळावर उघडलेली एक विशाल मोहीम आहे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, जेव्हा आपण व्यसनातून मुक्त होतो तेव्हाच आपल्याला स्वतःच्या स्वरुपाचा साक्षात्कार होतो. , हे व्यसन, लोभ-लालच आणि स्वार्थाचे सुध्दा असू शकते. जेव्हा स्वत:ची ओळख पटते, तेव्हा 'स्व'मधील 'सर्वम'चे दर्शन होते. तेव्हाच 'स्वार्था'पासून दूर होऊन 'परमात्म्या'साठी करण्याच्या आपल्या 'कर्तव्यांचे' भान येते.
मित्रांनो,
आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात देशही 'स्व' च्या भावनेच्या पलिकडे जाऊन समाज आणि राष्ट्रासाठी कर्तव्य बजावण्यासाठी आवाहन करत आहे.
आज देश 'सबका साथ, सबका विकास', 'सबका विश्वास' आणि 'सबका प्रयास' असा संकल्प करत आगेकूच करत आहे. सरकार सर्व काही करेल, सत्ताच सर्व काही चालवेल, ही भारताची धारणा कधीच नव्हती. हा भारताचा कधी स्वभावच नव्हता.आपल्या इथे 'राजकीय' सत्ता, 'सामाजिक-सत्ता', 'आध्यात्मिक सत्ता,' सर्वांची भूमिका (पातळी) समान आहे. आपल्याकडे कर्तव्य हाच धर्म आहे. मला आचार्य तुलसीजींची एक गोष्ट आठवते. ते म्हणायचे- ' सर्वात आधी मी माणूस आहे, मग मी एक धार्मिक व्यक्ती आहे. नंतर, ध्यान करणारा जैन मुनी आहे. त्यानंतर मी तेरा पंथाचा आचार्य आहे. कर्तव्याच्या मार्गावर वाटचाल करत आज देश देखील आपल्या संकल्पांमधून हीच भावना अधोरेखित करत आहे.
मित्रांनो,
आज एका नव्या भारताचे स्वप्न पाहत,आपला भारत आपल्या सामूहिक शक्तीच्या आधारे आगेकूच करत आहे,याचा मला आनंद होत आहे.आज आपल्या आध्यात्मिक शक्ती, आपले गुरू, आपले संत, आपण सगळे मिळून भारताच्या भवितव्याची दिशा ठरवत आहेत. देशाच्या या आकांक्षांना आणि देशाच्या या प्रयत्नांना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सक्रिय माध्यम व्हावे, अशी मी विनंती करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या काळात देश ज्या संकल्पांसह मार्गक्रमण करत आहे, मग तो 'पर्यावरणाचा' प्रश्न असो, पोषणाचा प्रश्न असो, किंवा 'गरीबांसाठी' केलेले प्रयत्न असोत, या सर्वांत आपल्या सर्वांची भूमिका मोठी आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की तुम्ही देशाच्या या प्रयत्नांना अधिक प्रभावी आणि अधिक यशस्वी कराल. याच भावनेने सर्व संतांना वंदन करतो. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!