"गरीबांचे सक्षमीकरण आणि जीवन सुलभ करण्यासाठी आरोग्य सुविधांचे आधुनिकीकरण आणि सहज उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे"
"गुजरातमधील माझ्या अनुभवामुळे संपूर्ण देशातील गरीबांची सेवा करण्यात मदत झाली आहे"
"आपल्याकडे बापूंसारख्या महापुरुषांची प्रेरणा आहे ज्यांनी सेवेला देशाची ताकद बनवली"

नमस्कार!

गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र भाई पटेल, याच भागातले खासदार माझे वरिष्ठ सहकारी, श्रीयुत सी आर पाटील, येथे उपस्थित गुजरात सरकारचे इतर मंत्रिमहोदय, आमदार, निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट चे संस्थापक आणि चेयरमन श्री ए. एम. नाईक जी,  विश्वस्त श्री भाई जिग्नेश नाईक जी, येथे उपस्थित सर्व मान्यवर,  स्त्री-पुरुष ! आज तुम्ही पहिल्यांदा इंग्रजीत ऐकले, नंतर गुजरातीमध्ये, आता हिंदीत राहून जायचे नसेल तर मी हिंदीत बोलतो.

मला सांगण्यात आले की काल अनिल भाईंचा वाढदिवस होता आणि जेव्हा व्यक्ती 80 वर्षांची होते त्यावेळी तो सहस्र चंद्रदर्शनाचा योग असतो. उशिरा का होईना, माझ्याकडून अनिल भाई यांना अनेक-अनेक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्यासाठी अनेक शुभेच्छा.

आज नवसारीच्या भूमीवरून दक्षिण गुजरातच्या संपूर्ण भागातील लोकांसाठी जीवन सुलभतेशी संबंधित अनेक योजना सुरू झाल्या आहेत. आरोग्याशी संबंधित आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रातही आज येथील बंधुभगिनींना नव्या सुविधा मिळाल्या आहेत. काही वेळापूर्वीच इथे जवळच एक कार्यक्रम होता, वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन झाले आहे आणि आता इथे आधुनिक Healthcare Complex आणि Multispeciality Hospital चे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे.

3 वर्षांपूर्वी इथे कॅन्सर हॉस्पिटलचे भूमीपूजन करण्याची संधी देखील मला मिळाली होती. मी श्री ए. एम. नाईक जींना, निराली ट्रस्टला आणि त्यांच्या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. आणि या प्रकल्पाला त्या रुपात पाहतो की हा प्रकल्प म्हणजे त्या निरागस जीवाला, निरालीला वाहिलेली श्रद्धांजली आहे जिला आम्ही अकाली गमावलं होतं.

ए. एम. नाईक जी आणि त्यांच्या कुटुंबाने ज्या अडचणींना तोंड दिले, ती वेळ इतर कुटुंबांवर येऊ नये याचा संकल्प या पूर्ण प्रकल्पात प्रदर्शित होत आहे. अनिल भाई यांनी एका प्रकारे पितृ ऋण देखील चुकवले आहे, आपल्या गावाचे ऋण फेडले आहे आणि आपल्या संततीचे ऋण देखील चुकवले आहे. नवसारी सहित आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमधील लोकांना या रुग्णालयातून खूप मदत होणार आहे. आणि एक खूप मोठी सेवा आहे असे मला वाटते. हा संपूर्ण देशासाठी हा एक संदेश आहे कारण हे रुग्णालय अगदी महामार्गाला लागूनच आहे. आणि महामार्गावर जे अपघात होतात त्यामध्ये first golden hour आयुष्य वाचवण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा golden period असतो. हे रुग्णालय अशा जागी आहे. आम्हाला असे अजिबात वाटत नाही की यात खूप लोक दाखल व्हावेत, अपघात व्हावेत पण जर झाले तर जीव वाचवण्याची सुविधा इथे जवळच उपलब्ध आहे. मी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

गरिबांच्या सक्षमीकरणासाठी, गरिबांच्या चिंता कमी करण्यासाठी, आरोग्य सेवांना आधुनिक बनवणे, सर्वांसाठी सुलभ बनवणे तितकेच गरजेचे आहे, गेल्या 8 वर्षांच्या काळात देशाच्या आरोग्य क्षेत्राला उत्तम बनवण्यासाठी आम्ही एका समग्र दृष्टीकोनावर भर दिला आहे. आम्ही उपचारांच्या सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न तर केला आहेच, त्याचबरोबर चांगलेपोषण, स्वच्छ जीवन शैली, एका प्रकारे प्रतिबंधात्मक आरोग्याशी संबंधित जे वर्तनात्मक विषय आहेत,  सरकारच्या ज्या प्राथमिक जबाबदाऱ्या आहेत, त्या सर्व विषयांवर आम्ही मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे.

गरिबांचे, मध्यम वर्गाचे आजारांपासून रक्षण करणे आणि त्यांचा उपचारांवर होणारा खर्च कमी करणे हाच आमचा प्रयत्न आहे. विशेषतः बालके आणि मातांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी जे प्रयत्न होत आहेत, त्याचे स्पष्ट परिणाम आज आपल्याला पाहता येत आहेत. आज गुजरातमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणखी चांगल्या होत आहेत आणि आरोग्य निर्देशांक सातत्याने चांगले होऊ लागले आहेत. नीती आयोगाच्या तिसऱ्या शाश्वत विकासाच्या लक्ष्यांच्या यादीमध्ये देशात गुजरातने अव्वल स्थान पटकावलं आहे.

 

मित्रांनो,

ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी राज्यातल्या आरोग्य सेवा गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ज्या मोहिमा राबवल्या त्याचा अनुभव आता संपूर्ण देशातील गरिबांच्या उपयोगाला येत आहे. त्या काळात आम्ही निरोगी गुजरात, उज्जवल गुजरातचा आराखडा तयार केला होता. गरिबांना गंभीर आजारासाठी त्या काळात 2 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा देणारी मुख्यमंत्री अमृतम योजना, जिला संक्षिप्त रुपात मां योजना म्हणून ओळखले जाते ती याचाच परिणाम होती.

याच योजनेच्या अनुभवातून गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळण्याची हमी देणारी आयुष्मान भारत योजना, ज्यावेळी मला पंतप्रधान म्हणून सेवेचे काम मिळाले, तेव्हा मी ही योजना घेऊन देशवासियांकडे आलो. या योजनेंतर्गत गुजरातच्या 40 लाखांपेक्षा जास्त गरिबांना मोफत उपचारांच्या सुविधा मिळाल्या आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने आमच्या माता-भगिनी आहेत, दलित असो, वंचित असो, आदिवासी समाजातील आमचे बांधव असोत, यामुळे गरीब रुग्णांची 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झाली आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत गुजरातमध्ये गेल्या वर्षी साडेसात हजार आरोग्य आणि निरामयता केंद्र देखील, या ठिकाणी त्यावर काम झाले आहे.

 

मित्रांनो,

गेल्या 20 वर्षात गुजरातच्या आरोग्य क्षेत्राने अनेक नवी लक्ष्ये साध्य केली आहेत. या वीस वर्षांमध्ये गुजरातमधील शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत आरोग्य पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व काम झाले आहे, प्रत्येक पातळीवर काम झाले आहे. ग्रामीण भागात हजारो आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली, प्राथमिक तपासणी केंद्र उभारण्यात आली.

शहरी भागात सुमारे 600 दीनदयाल औषधालये देखील स्थापन करण्यात आली आहेत.

गुजरामध्ये आज सरकारी रुग्णालयात कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. गुजरात कर्करोग संशोधन संस्थेची क्षमता साडे चारशे ने वाढवून एक हजार करण्यात आली आहे. अहमदाबादशिवाय जामनगर,भावनगर, राजकोट आणि वडोदरा अशा अनेक शहरांममध्ये देखील कर्करोग उपचारांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

अहमदाबाद इथली मूत्रपिंड उपचार संस्था अधिक आधुनिक केली जात आहे, तिचा विस्तार केला जात आहे.लवकरच तिथली बेड्सची संख्या दुप्पट होणार आहे.

आज गुजरातमध्ये अनेक डायलिसिस केंद्र, हजारो रुग्णांना त्यांच्या घराजवळच डायलिसिस ची सुविधा देत आहेत. भारत सरकारच्या वतीने देखील संपूर्ण देशभरात डायलिसिससाठीच्या पायाभूत सुविधा तयार करणे, अशा रुग्णांना आपल्या घराजवळ सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणे हे अभियान अतिशय वेगाने सुरु आहे.आधीच्या तुलनेत कित्येक पटीने वेगात. या प्रकारे किडनी रुग्णांसाठी डायलिसिस केंद्र आज उपलब्ध झाली आहेत.

मित्रांनो,

गुजरात मध्ये आमच्या सेवाकाळात आमच्या सरकारने मुले आणि महिलांचे आरोग्य आणि पोषणाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. चिरंजीवी योजनेअंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी सुनिश्चित करत, संस्थात्मक डिलिव्हरीचा आम्ही व्यापक विस्तार केला आहे आणि गुजरातमध्ये त्याचे उत्तम परिणाम मिळाले आहेत.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 लाख गरोदर महिलांना या चिरंजीवी योजनेचा लाभ मिळाला आहे. आम्ही गुजरातचे लोक आहोत, त्यामुळे प्रत्येक बाबतीत काहीतरी अधिक करण्याचा विचार करणारे लोक आहोत. आमच्या डोक्यात काही गोष्टी असतात. मी जेव्हा इथे होतो तेव्हा आम्ही 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु केली होती. नंतर मग असा विषय आला की 108 च्या ज्या सेवेत असलेल्या जुन्या गाड्या आहेत त्या काढून टाकायला हव्यात. त्यावर मी म्हटले की असं एकदम काढून नका टाकू. 108 च्या सेवेसाठी ज्या गाड्या (रुग्णवाहिका) लागतात त्या आपत्कालीन सेवेसाठी असतात, त्यामुळे त्या तर उत्तम दर्जाच्याच असायला हव्यात. त्वरित प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता असायला हवी.

मात्र, या ज्या जुन्या झालेल्या गाड्या आहेत, त्यांना लगेच काढून टाकण्याची गरज नाही. मग त्यांना आम्ही नवे रूप दिले -'खिलखिलाहट' आणि आम्ही निर्णय घेतला की त्यांची संपूर्ण रचना बदलून टाकूया. त्यात सायरनचा आवाज देखील अगदी संगीतमय करुन टाकला. आणि जेव्हा आई रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तीन चार दिवसांनी आपल्या बाळाला घेऊन घरी जाते, तेव्हा तिला रिक्षा शोधणे अशा सगळ्या अडचणी असत. मग आम्ही ठरवलं की या सगळ्या जुन्या 108 गाड्या खिलखिलाहट योजनेसाठी बदलून घेऊया. आता, नवजात बाळाला घेऊन जेव्हा आई, त्या खिलखिलाहट गाडीतून घरी जाते तेव्हा जो सायरन वाजतो त्यातून, सगळ्या सोसायटीला, शेजारपाजाऱ्यांना कळतं की यांचं बाळ आलं आहे, आणि सगळी कॉलनी त्याच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभी राहते !

खिलखिलाहट योजनेद्वारे आम्ही हेही सुनिश्चित केलं आहे की नवजात अर्भकाच्या आरोग्यावर घरच्या घरीच देखरेख ठेवली जाईल. यामुळे बाळ आणि आईचा जीव वाचविण्यासाठी, विशेषतः आदिवासी कुटुंबांच्या घरांत आनंद आणण्यात मोलाची मदत झाली आहे.

 

मित्रांनो,

गुजरातची ‘चिरंजीवी’ आणि ‘खिलखिलाहट’ ह्या योजनेमागची भावना केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मिशन इंद्रधनुष्य आणि मातृवंदना योजनेच्या रूपाने आम्ही देशभरात विस्तारली आहे. पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत गेल्या वर्षी गुजरातच्या 3 लाखांपेक्षा जास्त भगिनींना लाभ मिळाला आहे. या भगिनींच्या खात्यात कोट्यावधी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, जेणेकरून गरोदरपणात त्या आपल्या पोषणाकडे लक्ष देऊ शकतील. मिशन इंद्रधनुष अंतर्गत देखील गुजरातमध्ये लाखो मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास आणि प्रशिक्षण या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राजकोटमध्ये एम्स सारखी मोठी संस्था तयार होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आज 30 पेक्षा जास्त झाली आहे. पूर्वी राज्यात MBBS च्या केवळ 1100 जागा होत्या. आज या वाढून जवळजवळ 6000 पर्यंत पोचत आहेत. स्नातकोत्तर जागा देखील जवळपास 800 हून वाढून 2 हजार पेक्षा जास्त झाल्या आहेत. त्याच प्रमाणे परिचारिका आणि फ़िजिओथेरपी सारख्या इतर वैद्यकीय सेवांसाठी देखील पात्र लोकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

 

मित्रांनो,

गुजरातच्या लोकांसाठी आरोग्य आणि सेवा आयुष्यातील एका ध्येयाप्रमाणेच आहेत. आम्ही पूज्य बापुंसारख्या महापुरुषांकडून प्रेरणा घेतो, ज्यांनी सेवेला देशाचे सामर्थ्य बनविले होते. गुजरातचा हा स्वभाव आजही तितकाच उर्जावान आहे. इथे सर्वात यशस्वी याक्ती देखील, कुठल्या न कुठल्या सेवा कार्याशी जोडलेला असतो. जसजसे गुजरातचे सामर्थ्य वाढेल, गुजरातचा हा सेवाभाव देखील वाढेल. आज आपण इथवर पोचलो आहोत, याहून अधिक पुढे जायचे आहे.

याच संकल्पनेसोबत, मग ते आरोग्य असो, शिक्षण असो, पायाभूत सुविधा असो, आम्ही भारताला अत्याधुनिक बनवण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि यात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सोबतच एक महत्वपूर्ण पैलू आहे सबका प्रयास. लोकसहभाग जितका जास्त वाढेल, तितके  देशाचे सामर्थ्य जलद गतीने वाढते, याचे परिणाम लवकर दिसून येतात आणि आपण जो विचार केलेला असतो, त्यापेक्षा जास्त चांगला परिणाम दिसून येतो.

अनिल भाई, त्यांच्या कुटुंबाने या ट्रस्टच्या माध्यमातून ‘सबका प्रयास’ चा हा जो आपला संकल्प आहे, खाजगी-सरकारी भागीदारीचा जो संकल्प आहे, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन पुढे जाण्याचा जो संकल्प आहे, त्यात  त्यांचे एक महत्वाचे योगदान आहे. मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अनेक अनेक शुभेच्छा देतो.

खूप खूप  धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi