महोदय, आदरणीय मान्यवर आणि प्रतिनिधी, नमस्कार!
जिनिव्हा इथल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या 76 व्या अधिवेशनासाठी उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 75 वर्ष जगाची सेवा करण्याचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल मी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अभिनंदन करतो. डब्ल्यूएचओ आपली शताब्दी पूर्ण करेल, म्हणजेच पुढच्या 25 वर्षांसाठीचे उद्दिष्ट या संस्थेने निश्चित केले असेल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
कोविड-19 महामारीने आपल्याला आरोग्य यंत्रणेत अधिक सहकार्याची गरज दाखवून दिली. या महामारीने जागतिक आरोग्य संरचनेमधील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकला. अशा संकटात टिकून राहील, अशी जागतिक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
मित्रांनो,
जगात उपलब्ध असलेल्या आरोग्य सांसाधानांच्या उपयोगाबाबत समतेचे धोरण असावे, अशी शिकवणही या कोविड महामारीने आपल्याला दिली आहे. संकटकाळात भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीची आपल्या वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. भारताने 100 पेक्षा जास्त देशांना जवळजवळ 300 दशलक्ष लसी पाठवल्या. यापैकी अनेक दक्षिणेकडील अविकसित देशही होते. आगामी वर्षांमध्ये आरोग्यविषयक संसाधनांची सर्वांना सामान उपलब्धता यावर काम करणे डब्ल्यूएचओ साठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असेल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
भारताचे पारंपरिक ज्ञान हे सांगते की, तुम्हाला काहीही आजार नसणे याचा अर्थ तुम्ही सुदृढ आहात असा होत नाही. त्यामुळे, आपण केवळ आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न न करता, संपूर्ण निरामयतेच्या दिशेने आणखी एक पाउल पुढे जायला हवे. योग, आयुर्वेद आणि प्राणायाम सारख्या पारंपरिक पद्धती, शरीराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याशी निगडीत पैलूंवर उपचार करणाऱ्या आहेत.. डब्ल्यूएचओ चे पहिले जागतिक पारंपरिक उपचार केंद्र भारतात स्थापन होत आहे याचा मला आनंद आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या माध्यमातून जग भरड धान्यांचे महत्व ओळखत आहे, याचाही मला आनंद आहे.
मित्रांनो,
भारताचे प्राचीन धर्मग्रंथ आपल्याला जगाकडे एक कुटुंब, म्हणजेच ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणून पाहायला शिकवतात. आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, या वर्षी आम्ही ''एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'' या संकल्पनेवर काम करत आहोत. ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ हा आमचा उत्तम आरोग्याबाबतचा दृष्टीकोन आहे. आपली संपूर्ण परिसंस्था निरोगी असेल, तेव्हाच आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच, आपला हा दृष्टीकोन केवळ मानवापुरता सीमित नसून, तो प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणा सह संपूर्ण परीसंस्थेचा विचार करणारा आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आरोग्य सेवेची उपलब्धता, सहजपणे आणि किफायतशीर दरात सर्वपर्यंत ही व्यवस्था पोहोचवण्यावर मोठे काम केले आहे. मग ती जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना- आयुष्मान भारत असो, किंवा आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे असो किंवा लाखो कुटुंबांना स्वच्छता आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची मोहीम असो, शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य सेवा वितरणाला चालना देणे, हेच आमच्या अनेक प्रयत्नांचे उद्दिष्ट राहिले आहे. भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा दृष्टिकोन इतर देशांसाठीही पथदर्शक ठरू शकतो. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओ करत असलेल्या अशा प्रकारच्या प्रयत्नांना पाठींबा द्यायला आम्ही उत्सुक आहोत.
मित्रांनो,
सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्धता सुधारण्यामध्ये 75 वर्ष केलेल्या प्रयत्नांबद्दल मी डब्ल्यूएचओची प्रशंसा करतो. डब्ल्यूएचओसारख्या जागतिक संस्थांची भूमिका यापूर्वीही नक्कीच महत्त्वाची होती. पण आव्हानांनी भरलेल्या उद्याच्या भविष्यात ती अधिक महत्त्वाची ठरेल. निरामय जगाच्या निर्मितीसाठीच्या प्रत्येक प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद!