तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री श्री एम के स्टॅलिन जी, कुलपती डॉ के एम अन्नामलाई जी, कुलगुरू प्रोफेसर गुरमीत सिंग जी, गांधीग्राम ग्रामीण संस्थेचे कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचारी, तेजस्वी विद्यार्थी आणि त्यांचे अभिमानी पालक ,
वणक्कम!
आज पदवीधर झालेल्या सर्व तरुण गुणवंतांचे अभिनंदन करतो . या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही मी अभिनंदन करतो. तुमच्या त्यागामुळेचं हा दिवस दिसू शकला आहे. तसंच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही कौतुकास पात्र आहेत.
मित्रांनो,
येथे दीक्षांत समारंभासाठी येणे हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी अनुभव आहे. गांधीग्रामचे उद्घाटन स्वतः महात्मा गांधींनी केले होते. निसर्गसौंदर्य, स्थिर ग्रामीण जीवन, साधे पण बौद्धिक वातावरण आणि महात्मा गांधींच्या ग्रामीण विकासाच्या विचारांचा आत्मा येथे पाहायला मिळतो. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही सर्वजण अत्यंत महत्त्वाच्या वेळी पदवीधर झाला आहात. गांधीवादी मूल्ये विद्यमान काळात अतिशय समर्पक झाली आहेत. विविध संघर्ष संपवण्याबाबत असो किंवा हवामान संकट असो, महात्मा गांधींच्या विचारांमध्ये आजच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची उत्तरे आहेत. इथे गांधीवादी जीवनपद्धतीचे विद्यार्थी म्हणून, तुम्हाला मोठा प्रभाव पाडण्याची उत्तम संधी आहे.
मित्रांनो,
महात्मा गांधींना सर्वोत्तम श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या कल्पनांवर कार्य करणे. खादी ही दीर्घकाळापासून दुर्लक्षित आणि विसरली गेली होती. मात्र ‘खादी फॉर नेशन-खादी फॉर फॅशन’ या आवाहनातून खादी उत्पादने खूप लोकप्रिय झाली आहेत. गेल्या 8 वर्षात खादी क्षेत्राच्या विक्रीत 300% हून अधिक वाढ झाली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आपल्या विविध उत्पादन विक्रीतून गेल्या वर्षी 1 लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. आता तर जागतिक फॅशन ब्रँडही खादीकडे वळत आहेत. कारण खाडी हे पर्यावरणपूरक वस्त्र आहे आणि पृथ्वीवरील वातावरणासाठी ते उपयुक्त आहे. ही मोठ्या प्रमाणावर झालेली उत्पादनाची क्रांती नाही,तर ही जनतेने घडवून आणलेली उत्पादन क्रांती आहे. महात्मा गांधींनी खादीकडे खेड्यांमध्ये स्वावलंबनाचे एक साधन म्हणून पाहिले. खेड्यांच्या स्वावलंबनात त्यांना स्वावलंबी भारताची बीजे दिसली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनचं आम्ही आत्मनिर्भर भारतासाठी काम करत आहोत. तामिळनाडू हे स्वदेशी चळवळीचे प्रमुख केंद्र होते. आता पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारतमध्ये तामिळनाडू महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
मित्रांनो,
महात्मा गांधींचा ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन समजून घेणे महत्त्वाचे आहे. खेड्यांनी प्रगती करावी अशी त्यांची इच्छा होती. त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील मूल्यांचे जतन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. ग्रामीण विकासाची आमची दृष्टी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन विकसित झाली आहे.आमचा दृष्टिकोन आहे....
“आत्मा गावाचा ,तरीही सुविधा शहरातल्या ”
किंवा
“ग्रामत्तिन्मा , नगरत्तिन् वसदि”
शहरी आणि ग्रामीण भाग वेगळे असणे समजू शकतो. फरक असणे ठीक आहे,पण विषमता नको. शहरी आणि ग्रामीण भागात दीर्घकाळ असमानता होती. पण आज आपलं राष्ट्र ही सुधारणा करत आहे. संपूर्ण ग्रामीण स्वच्छता अभियान 6 कोटींहून अधिक घरांना नळाचे पाणी, 2.5 कोटी वीज जोडण्या, अधिकाधिक ग्रामीण रस्ते, विकासाला लोकांच्या दारापर्यंत घेऊन जात आहे. महात्मा गांधींसाठी 'स्वच्छता'ही अत्यंत प्रिय संकल्पना होती. स्वच्छ भारताच्या माध्यमातून ही क्रांती झाली आहे. पण आम्ही फक्त मूलभूत गोष्टी देऊन थांबत नाही आहोत. आज आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहेत. जवळपास 2 लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी 6 लाख किलोमीटर लांबीची ऑप्टिक फायबर केबल टाकण्यात आली आहे. इंटरनेट डेटाच्या कमी किमतीचा फायदा ग्रामीण भागाला झाला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर अधिक वेगाने वाढत असल्याचे अभ्यासक सांगतात. यामुळे संधींचे जग खुले होते. स्वामित्व योजनेंतर्गत, आम्ही जमिनीचे नकाशे तयार करण्यासाठी ड्रोन वापरत आहोत. आम्ही लोकांना प्रॉपर्टी कार्ड देखील देतो. शेतकरी अनेक ऍप्सशी जोडले जात आहेत. त्यांना करोडोंच्या मृदा आरोग्य पत्रिकांची मदत मिळत आहे. खूप काही केले आहे पण अजून बरेच काही करायचे आहे. तुम्ही तरुण, उजळ अशी पिढीचे आहात. या घालून दिलेल्या पायावर नवराष्ट्र उभारण्यासाठी तुम्ही खूप सक्षम आहात.
मित्रहो,
ग्रामीण विकासाचा विचार करताना आपण शाश्वतता विचारात घेतलीच पाहिजे. या कामी तरुणांकडे नेतृत्व देण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या भविष्यासाठी शाश्वत शेती महत्त्वाची आहे. नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने तसेच रसायनमुक्त शेतीच्या दृष्टीने मोठे उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे खताच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी होते. मातीचे आरोग्य आणि मानवी आरोग्यासाठीसुद्धा ते चांगले आहे. आपण या दिशेने काम सुरू केले आहे. आपली सेंद्रीय शेती योजना विशेषत: ईशान्येत आश्चर्यकारक परिणाम दाखवत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही नैसर्गिक शेतीशी संबंधित धोरण आणले. खेड्यापाड्यांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करण्याच्या कामी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता.
शाश्वत शेतीच्या बाबतीत तरुणांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मोनो-कल्चर म्हणजे वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे पीक घेण्याच्या पद्धतीपासून शेतीचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. धान्ये, भरड धान्ये आणि इतर पिकांच्या अनेक देशी वाणांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. संगम काळातही भरड धान्याच्या अनेक प्रकारांचा उल्लेख आढळतो. प्राचीन तामिळनाडूच्या लोकांना भरड धान्ये प्रिय होती. ही धान्ये पौष्टिक आणि हवामान-अनुकूल आहेत. त्याशिवाय पिकांच्या वैविध्यामुळे माती आणि पाण्याचीही बचत होते. तुमचे स्वतःचे विद्यापीठ नवीकरणीय ऊर्जा वापरते. गेल्या 8 वर्षांमध्ये सौरऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 20 पटीने वाढली आहे. खेड्यापाड्यात सौरऊर्जेचा प्रसार झाला तर ऊर्जेच्या बाबतीतही भारत स्वावलंबी होऊ शकतो.
मित्रहो,
गांधीवादी विचारवंत विनोबा भावे यांनी एकदा एक निरीक्षण नोंदवले होते. ते म्हणाले की गावपातळीवरील संस्थांच्या निवडणुका फूट पाडू शकतात. या निवडणुकांमुळे समुदाय आणि अगदी कुटुंबांमध्येही फूट पडते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी गुजरातमध्ये आम्ही समरस ग्राम योजना सुरू केली होती. ज्या गावांनी एकमताने नेते निवडले, त्यांना काही सवलती देण्यात आल्या. त्यामुळे सामाजिक संघर्ष खूपच कमी झाला. संपूर्ण देशभरात अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यासाठी युवा वर्ग गावकऱ्यांसोबत काम करू शकतो. गावांची एकजूट झाली तर गुन्हेगारी, अंमली पदार्थ आणि समाज विघातक तत्वांसारख्या समस्यांशी लढा देऊ शकतात.
मित्रहो,
अखंड आणि स्वतंत्र भारतासाठी महात्मा गांधीजींनी लढा दिला. गांधीग्राम ही खरे तर भारताच्या एकतेची गाथा आहे. याच ठिकाणी हजारो ग्रामस्थ गांधीजींचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेगाडीकडे आले होते. ते कुठले होते, हे महत्त्वाचे नव्हते. गांधीजी आणि गावकरी भारतीय होते, हे महत्वाचे होते. तामिळनाडू हे कायमच राष्ट्रीय सजग जाणीवांचे माहेरघर राहिले आहे. स्वामी विवेकानंद पश्चिमेतून भारतात परतल्यावर त्यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आले होते. मागच्या वर्षीही आम्ही ‘वीर वणक्कम’ या मंत्राचा साक्षीदार होतो. जनरल बिपिन रावत यांच्याप्रति तामिळ लोकांनी ज्या प्रकारे आदर व्यक्त केला, ते मनाला भिडणारे होते. दरम्यान काशीमध्ये लवकरच काशी-तमिळ संगमम होणार आहे. या उपक्रमांतर्गत काशी आणि तामिळनाडू यांच्यातील नातेसंबंध साजरे केले जातील. तामिळनाडूची भाषा, संस्कृती आणि इतिहास यांचा उत्सव साजरा करण्यासाठी काशीचे लोक उत्सुक आहेत. हे खऱ्या अर्थाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आहे. एकमेकांबद्दलचे हे प्रेम आणि आदर, हाच आपल्या एकतेचा आधार आहे. येथून पदवीधर झालेल्या तरुणांनी विशेषत: एकतेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मी करतो.
मित्रहो,
आज मी अशा ठिकाणी आहे, ज्या क्षेत्राने नारी शक्तीचे सामर्थ्य पाहिले आहे. इंग्रजांशी लढा देण्यासाठी सज्ज होणाऱ्या राणी वेळू नचियार याच ठिकाणी थांबल्या होत्या. येथून पदवीधर होणाऱ्या तरुणी, सर्वात मोठे बदल घडवून आणणाऱ्या आहेत, असे मला वाटते. ग्रामीण महिलांना यशस्वी होण्यास तुम्ही मदत कराल. त्यांचे यश हेच देशाचे यश आहे.
मित्रहो,
ज्या वेळी अवघ्या जगाला शतकातील सर्वात भीषण संकटाचा सामना करावा लागला, त्या वेळी भारत हे एकमेव आशास्थान होते. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असो, गरिबांसाठीची अन्न सुरक्षा असो किंवा जगातील विकासाचे इंजिन असो, या सर्वच बाबतीत भारताने आपले खरे सामर्थ्य दाखवून दिले आहे. जगाला भारताकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा आहे, कारण भारताचे भविष्य ‘कॅन डू’ अशी विचारसरणी असणाऱ्या तरुण पिढीच्या हातात आहे.
युवा वर्ग, जो केवळ आव्हाने स्वीकारत नाहीत, तर त्यांचा आनंदही घेतो; युवा वर्ग, जो फक्त प्रश्न विचारत नाही, तर उत्तरेही शोधतो; युवा वर्ग जो केवळ निर्भय नाही, तर अथक काम करणाराही आहे, युवा वर्ग जो केवळ आकांक्षा बाळगत नाही, तर साध्यही करतो. त्यामुळे आज पदवीधर झालेल्या तरुणांना माझा संदेश आहे, तुम्ही नव भारताचे निर्माते आहात. पुढील 25 वर्षे अमृत काळामध्ये भारताचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
अनेक शुभेच्छा!