केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह, हिमाचल प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम ठाकुर, केंद्रातील माझे सहकारी मंत्री हिमाचलचा मुलगा अनुराग ठाकुर, हिमाचल सरकारचे मंत्रीगण, स्थानिक लोकप्रतिनिधि आणि लाहौल-स्पीतीचे माझे प्रिय बंधू आणि भगिंनीनो,
आज दीर्घ कालावधीनंतर तुम्हा सर्वांबरोबर उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अतिशय सुखद अनुभव आहे. अटल बोगद्यानिमित्त तुम्हा सर्वांचे खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा .
“जुले, दि केन्हिंग अटल जीऊ तरफे तोहफा शू”
मित्रांनो,
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला भेटायला येत होतो, तेव्हा रोहतांगचा प्रदीर्घ प्रवास, लांबचा प्रवास करून इथे पोहचायचो. आणि थंडीत जेव्हा रोहतांग पास बंद व्हायचा तेव्हा औषधे , शिक्षण आणि कमाईचे सर्व मार्ग कसे बंद व्हायचे याची मला जाणीव आहे, मी स्वतः पाहिले आहे. त्यावेळचे माझे अनेक सहकारी आजही सक्रिय आहेत. काही सहकारी आता आपल्यात नाहीत.
मला चांगले आठवतंय , आपले किन्नौरचे ठाकुर सेन नेगी जी, त्यांच्याशी गप्पा मारण्याची मला संधी मिळायची, खूप काही जाणून घेण्याची, शिकण्याची संधी मिळत होती. नेगी जी यांनी एक अधिकारी म्हणून आणि एक लोक प्रतिनिधि म्हणून हिमाचलची खूप सेवा केली. बहुधा त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती कि काही शिल्लक होती? मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इतके सक्रिय होते. अतिशय ऊर्जावान असे त्यांचे व्यक्तिमत्व होते, खूप प्रेरणादायी होते. मी त्यांना बरेच काही विचारायचो, खूप काही ते सांगत, एकाप्रदीर्घ इतिहासाचे ते साक्षीदार होते. आणि त्यांनी या संपूर्ण प्रदेशाबद्दल माहिती जाणून घेण्यात माझी खूप मदत केली.
मित्रांनो,
या प्रदेशाच्या सर्व अडचणींबाबत अटलजी देखील सुपरिचित होते. हे डोंगर तर अटलजींना नेहमीच खूप प्रिय असायचे. तुम्हा लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी वर्ष 2000 मध्ये जेव्हा अटलजी केलॉन्ग इथं आले होते तेव्हा त्यांनी या बोगद्याची घोषणा केली होती. त्यावेळी उत्सवाचे जे वातावरण या सम्पूर्ण प्रदेशात असायचे, ते मला आजही आठवतंय. इथलेच सुपुत्र होते महान जनसेवक टशी दावा जी , ज्यांचा संकल्प आज सिद्धीला गेला आहे. त्यांचे आणि इतर अनेकांच्या आशिर्वादामुळे हे शक्य झाले आहे.
मित्रांनो,
अटल बोगदा तयार झाल्यामुळे लाहौलच्या लोकांसाठी तर नवी पहाट झाली आहे, पांगीच्या लोकांचे जीवन देखील बदलणार आहे. 9 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे 45-46 किलोमीटर इतके अंतर कमी होणार आहे. या परिसरातील अनेक सहकाऱ्यांनी कधी कल्पना देखील केली नसेल कि त्यांच्या हयातीत त्यांना ही संधी मिळेल. हे ते लोक आहेत, ज्यांनी कित्येक रुग्णांना थंडीत एखाद्या साधनाच्या प्रतीक्षेत वेदना सहन करताना, विव्हळताना पाहिले आहे आणि स्वतःही या अपेष्टा सहन केल्या आहेत. आज ते समाधानी आहेत कि त्यांच्या मुलांना, ते कठीण दिवस आता पाहावे लागणार नाहीत.
मित्रांनो,
अटल बोगदा तयार झाल्यामुळे लाहौल-स्पीति आणि पांगीचे शेतकरी असतील, बागायतीशी संबंधित लोक असतील, पशु पालन करणारे असतील, विद्यार्थी असतील, नोकरी करणारे, व्यापारी -उद्योजक असतील, सर्वांनाच याचा लाभ होणार आहे. आता लाहौलच्या शेतकऱ्यांचा फ्लॉवर, बटाटे, मटार यांचे पीक वाया जाणार नाही तर जलद गतीने बाजारात पोहचेल.
लाहौलची ओळख बनलेले चंद्रमुखी आलू, त्याची चव मी देखील चाखली आहे. चंद्रमुखी आलूला देखील आता नवी बाजारपेठ मिळेल, नवीन ग्राहक मिळतील, पूर्ण नवीन बाजारपेठ मिळेल. आता नवीन भाज्या, नवीन पिकांप्रमाणे या क्षेत्रातही वेगाने प्रगती होईल.
लाहौल-स्पीति तर एक प्रकारे वनौषधी आणि विविध मसाले जसे हींग, कुठ, मनु, काळे जिरे, कड़ु, केसर, पतीश, अशा शेकडो वनौषधींचा खूप मोठा उत्पादक आहे. ही उत्पादने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात लाहौल-स्पीतिची, हिमाचलची , भारताची ओळख बनू शकतात.
अटल बोगद्याचा आणखी एक लाभ होईल, तो म्हणजे आता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला पलायन करण्याची गरज भासणार नाही. या बोगद्याने जायचाच नव्हे तर यायचा देखील मार्ग सुकर केला आहे.
मित्रांनो, या संपूर्ण प्रदेशात पर्यटनाच्या अमाप संधी आहेत. इथे निसर्गाचा देखील वरदहस्त आहे आणि अध्यात्म, आस्थाशी निगडित पर्यटनाच्या अद्भुत संधी आहेत. पर्यटकांसाठी आता ना चंद्रताल दूर आहे आणि ना स्पीति खोऱ्यापर्यंत पोहचणे कठीण आहे. तुपचीलिंग गोंपा असो किंवा त्रिलोकीनाथ , देवदर्शन आणि बौद्ध दर्शनाच्या संगमाच्या रूपाने लाहौल-स्पीतिला आता नवीन आयाम मिळणार आहे. खरे तर हा तो मार्ग आहे जिथून बौद्ध मठ आणि तिबेट पर्यंत आणि अन्य देशांपर्यंत प्रचार-प्रसार वाढला आणि विस्तार झाला.
स्पीति खोऱ्यात स्थित देशातील बौद्ध शिक्षणाचे एक महत्वपूर्ण केंद्र ताबो मठ पर्यंत जगाला पोहचणे अधिक सुलभ होणार आहे. म्हणजे एक प्रकारे हा संपूर्ण प्रदेश पूर्व आशियासह अनेक देशांच्या बौद्ध अनुयायांसाठी देखील एक मोठे केंद्र बनणार आहे.
सर्वाना माहित आहेच कि हा बोगदा या संपूर्ण प्रदेशातील युवकांना रोजगाराच्या अनेक संधींशी जोडणार आहे. कुणी होम स्टे चालवेल, कुणी गेस्ट हाउस चालवेल, कुणाचा ढाबा असेल, कुणाचे दुकान असेल, तसेच अनेक मित्रांना गाईड म्हणून देखील रोजगार उपलब्ध होईल. इथली हस्तकला, इथली फळे, औषधे सगळे काही.
मित्रांनो,
अटल बोगदा केंद्र सरकारच्या त्या संकल्पाचा देखील भाग आहे, कि देशाच्या प्रत्येक भागात, देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहचायला हवा. नाहीतर, तुम्ही आठवून पहा पूर्वीची काय स्थिती होती.
लाहौल-स्पीति सारखे देशातील अनेक भाग असे होते ज्यांना अनेक समस्यांशी लढण्यासाठी त्यांच्या नशिबावर सोडण्यात आले. याचे साधे कारण हे होते कि हा प्रदेश काही लोकांचा राजकीय स्वार्थ पूर्ण करत नव्हता.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षात आता देशात नव्या विचारांसह काम होत आहे. सर्वांची साथ, सर्वांच्या विश्वासामुळे सर्वांचा विकास होत आहे. सरकारच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडून आला आहे. आता योजना कुठे किती मते आहेत या आधारे बनत नाहीत. आता असा प्रयत्न होत आहे कि कुणी भारतीय वंचित राहू नये, मागे राहू नये.
या बदलाचे एक खूप मोठे उदाहरण लाहौल-स्पीति आहे हे देशातील त्या पहिल्या जिल्ह्यांपैकी एक आहेत जिथे प्रत्येक घरात पाईपद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. जल जीवन मिशन कशा रीतीने लोकांचे जीवन सुलभ बनवत आहे त्याचे प्रतीक हा जिल्हा आहे.
मित्रांनो,
आमचे सरकार दलित-पीड़ित-शोषित-वंचित, आदिवासी, सर्वांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या संकल्पानिशी काम करत आहे. आज देशातील 15 कोटींहून अधिक घरांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पाईपद्वारे पोहचवण्याचे मोठे अभियान सुरु आहे.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही देशातील 18 हज़ारपेक्षा अधिक गावे अंधारात जगत होती. आज या गावांमध्ये वीज पोहचली आहे.
स्वातंत्र्य मिळून देखील इतक्या दशकानंतर या भागात शौचालयाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, एवढेच नाही स्वयंपाक बनवण्यासाठी एलपीजी गॅसच्या जोडण्या उपलब्ध होउ शकल्या आहेत.
आता असा प्रयत्न होत आहे कि देशातील दूर-सुदूर वसलेल्या प्रत्येक भागात उत्तम औषधोपचार मिळावेत. आयुष्मान भारत योजने अंतर्गत गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देखील दिली आहे.
इथे हिमाचलमधील 22 लाखांपेक्षा अधिक गरीब-बंधू-भगिनींना याचा लाभ मिळणे सुनिश्चित झाले आहे. या सर्व अभियानामुळे देशातील दुर्गम क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, युवकांना लाभ झाला आहे.
मित्रांनो,
पुन्हा एकदा अटल बोगद्याच्या रूपाने विकासाची नवी दारे खुली झाल्याबद्दल लाहौल-स्पीति आणि पांगी खोऱ्यातील तुम्हा सर्व बंधू-भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि मी विनंती करेन, ही गोष्ट मी प्रत्येक नागरिकासाठी म्हणत आहे, कोरोनाच्या या कठीण काळात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. मास्कचा वापर करा, हातांच्या स्वच्छतेकडे विशेष ध्यान द्या.
मला या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप आभार मानतो. धन्यवाद !