देशाला विकासाच्या नव्या उंचीवर स्थापित करणाऱ्या या महत्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. वित्तमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांचा संपूर्ण चमू देखील खूप खूप शुभेच्छांसाठी पात्र आहे.
मित्रांनो,
हा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक वर्गाला शक्ती प्रदान करणारा अर्थसंकल्प आहे. देशातील गावे, गरीब आणि शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर करणारा हा अर्थसंकल्प आहे. मागील दहा वर्षात सुमारे 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हा जो नव मध्यमवर्ग तयार झाला आहे, हा अर्थसंकल्प त्यांच्या सशक्तीकरणाचे सातत्य राखणारा अर्थसंकल्प आहे. हा युवकांना अगणित नव्या संधी प्रदान करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून कौशल्य आणि शिक्षणाला नवे प्रमाण मिळेल.
हा अर्थसंकल्प मध्यम वर्गाला नवीन ताकद देणारा आहे. हा अर्थसंकल्प आदिवासी समाज, दलित आणि मागासवर्गीयांना सशक्त करण्यासाठी भक्कम योजना सोबत घेऊन आला आहे. या अर्थसंकल्पामुळे महिलांची आर्थिक भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी मदत होईल. या अर्थसंकल्पामुळे छोट्या व्यापाऱ्यांना; सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच लघु उद्योगांना त्यांच्या प्रगतीचा नवा मार्ग सापडेल. या अर्थसंकल्पात उत्पादनावर भर दिला आहे आणि सोबतच पायाभूत सुविधांवर देखील भर दिला आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल आणि गतीला निरंतरता देखील प्राप्त होईल.
मित्रांनो,
रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अभूतपूर्व संधींची निर्मिती करणे, ही आमच्या सरकारची विशेष ओळख बनली आहे. आजचा अर्थसंकल्प याला आणखी बळकट करतो. देशाने आणि जगाने उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजनेचे यश पाहिले आहे. आता या अर्थसंकल्पात सरकारने रोजगार आधारित प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. यामुळे देशात अनेक कोटी नवे रोजगार तयार होतील. या योजनेअंतर्गत, आयुष्यात पहिलीच नोकरी मिळालेल्या तरुणांचे पहिले वेतन आमचे सरकार देणार आहे.
कौशल्य विकास किंवा उच्च शिक्षणासाठी मदत असो, अथवा मग एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याची योजना असो, यामध्ये गावातील गरीब, माझे तरुण मित्र, माझे मुले आणि मुली देशातील उत्कृष्ट कंपन्यांमध्ये काम करतील, त्यातून त्यांच्यापुढे संधींची नवीन द्वारे खुली होतील. आपल्याला प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात नवउद्योजक तयार करायचे आहेत. याच उद्देशाने कोणत्याही गॅरंटीशिवाय दिल्या जाणाऱ्या मुद्रा ऋणाची सीमा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे छोटे व्यापारी, विशेष रूपाने महिला, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांना स्व रोजगारासाठी बळ मिळेल.
मित्रांनो,
आपण सर्वजण मिळून भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवू. देशाचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र मध्यमवर्गाशी जोडलेले आहे, एका प्रकारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची मालकी मध्यमवर्गीयाकडे आहे. आणि याच क्षेत्रातून गरिबांना जास्तीत जास्त रोजगार देखील मिळतो. छोट्या उद्योगांना मोठी ताकद मिळवून देण्याच्या दिशेने हे आमचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज सुलभता वाढवणाऱ्या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात उत्पादन आणि निर्यात परिसंस्थेला प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ई- वाणिज्य निर्यात केंद्र आणि अन्नप्रक्रिया चाचणीसाठी 100 केंद्रांची निर्मिती अशा पावलांनी ‘एक जिल्हा - एक उत्पादन’ अभियानाला गती मिळणार आहे.
मित्रांनो,
हा अर्थसंकल्प आपल्या स्टार्टअप्स साठी आणि नवोन्मेषी परिसंस्थांसाठी अनेक नव्या संधी घेऊन आला आहे. अंतराळ अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा फंड असो किंवा एंजल कर हटवण्याचा निर्णय असो अशी अनेक पावले या अर्थसंकल्पात उचलण्यात आली आहे.
मित्रांनो,
विक्रमी उच्च भांडवली खर्च (Capex) अर्थव्यवस्थेसाठी एक प्रेरक शक्ती बनेल. 12 नवे औद्योगिक नोडस्, देशात नव्या उपग्रह शहरांचा विकास आणि 14 मोठ्या शहरांसाठी संक्रमण आराखडा… यामुळे देशात नवे आर्थिक केंद्र विकसित होतील आणि खूप मोठ्या संख्येने नव्या रोजगारांची निर्मिती होईल.
मित्रांनो,
आज संरक्षण निर्यात विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. आज संपूर्ण जगात भारताबाबतचे आकर्षण वाढत आहे. आणि भारतात पर्यटन क्षेत्रामध्ये नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. पर्यटन क्षेत्र गरीब आणि मध्यमवर्गांसाठी नव्या संधी घेऊन येते. या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावर देखील विशेष भर देण्यात आला आहे.
मित्रांनो,
एन डी ए सरकारने गेल्या दहा वर्षात गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना करातून सवलत मिळत राहील हे सुनिश्चित केले आहे. या अर्थसंकल्पात देखील प्राप्ती करात घट आणि स्टॅंडर्ड डिडक्शन मध्ये वृद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्रोतावर कर वजावट (TDS) नियम देखील सुलभ करण्यात आले आहेत. या पावलांमुळे प्रत्येक करदात्याची अतिरिक्त बचत होणार आहे.
मित्रांनो,
देशाच्या विकासासाठी भारताच्या पूर्वेकडील क्षेत्राचा संपूर्ण विकास… पूर्वोदयाच्या दृष्टिकोनाद्वारे आमच्या या अभियानाला नवी गती, नवी ऊर्जा मिळेल. आम्ही पूर्व भारतात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा जसे की महामार्ग, जल परियोजना आणि ऊर्जा प्रकल्प यांची निर्मिती करून विकासाला नवी गती देणार आहोत.
मित्रांनो,
या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धान्य साठवणूकीची जगातील सर्वात मोठी योजना अमलात आणल्यानंतर आता आम्ही भाजीपाला उत्पादन समूह तयार करणार आहोत. यामुळे एकीकडे छोट्या शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ मिळेल, त्यासाठी चांगली किंमत मिळेल तर दुसरीकडे आपल्या मध्यम वर्गीय लोकांसाठी फळे आणि भाजीपाल्याची उपलब्धता वाढेल तसेच कुटुंबासाठी पोषण सुनिश्चित होईल. कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनणे ही काळाची गरज आहे. यासाठी डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मित्रांनो,
देशातील गरिबी समाप्त व्हावी, गरिबांचे सशक्तिकरण व्हावे या दिशेने आजच्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांसाठी 3 कोटी नवीन घरे बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संपृक्तता दृष्टिकोन ठेवून आदिवासी उन्नत ग्राम अभियान पाच कोटी आदिवासी कुटुंबांना मूलभूत सेवांशी जोडणार आहे. याशिवाय ग्राम रस्ते योजना 25000 नव्या ग्रामीण भागांना सर्व ऋतुत सक्षम रस्त्यांना जोडणार आहे. यामुळे देशभरातील सर्व राज्यांमधील दुर्गम भागातील गावांना लाभ होईल.
मित्रांनो,
आजचा अर्थसंकल्प नव्या संधी, नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. असे खूप सारे नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प चांगले भविष्य आणि उज्वल भविष्य घेऊन आला आहे. अर्ज संकल्प भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करेल, विकसित भारताची मजबूत पायाभरणी करेल.
सर्व देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा!