"जय हिंद चा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो": पंतप्रधान
“तरुणांशी संवाद साधणे हे माझ्यासाठी नेहमीच खास असते”,पंतप्रधानांनी व्यक्त केले मनोगत
"एनसीसी आणि एनएसएस युवा पिढीला राष्ट्रीय ध्येय आणि देशापुढील समस्यांशी जोडतात" पंतप्रधानांचे प्रतिपादन
"विकसित भारता'चे तुम्ही सर्वात मोठे लाभार्थी होणार आहात आणि तो निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमची आहे", पंतप्रधानांचे युवा पिढीला आवाहन
“जग भारताच्या यशामध्ये स्वतःसाठी नवे भविष्य पाहत आहे”,पंतप्रधानांचा विश्वास
“तुमची ध्येये जेव्हा देशाच्या उद्दिष्टांशी जोडली जातात, तेव्हा तुमच्या यशाची व्याप्ती वाढते. जग तुमच्या यशाकडे भारताचे यश म्हणून पाहील”,पंतप्रधानांचे प्रतिपादन
"भारतातील तरुणांना कधी न पाहिलेल्या शक्यतांचा वापर करावा लागेल, अकल्पित उपायांचा शोध घ्यावा लागेल", पंतप्रधान
“तुम्ही तरुण आहात, तुमचे भविष्य घडवण्याची हीच वेळ आहे. तुम्ही नवीन विचार आणि नवीन मानकांचे निर्माते आहात. तुम्ही नवीन भारताचे मार्गदर्शक आहात”,पंतप्रधानांचा विश्वास

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक गण, निमंत्रित पाहुणे, माझ्या मंत्रिमंडळातले इतर सर्व सहकारी, इतर पाहुणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी होत असलेले विविध कलाकार, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे तरुण सहकारी!

मी बघतो आहे, आज पहिल्यांदाच नेताजींची वेशभूषा करून इतके त्यांचे सगळे बाल अवतार पंतप्रधान निवासस्थानी आले आहेत. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना सलाम करतो. 'जय हिंद' हा मंत्र दर वेळी आपल्याला प्रेरणा देत असतो. 

मित्रांनो, 

गेल्या काही आठवड्यांत तरुण सहकाऱ्यांना अनेकदा भेटण्याही संधी मिळाली. मागच्या महिन्यात आपण ‘वीर बाल दिवस’ साजरा केला, आपल्याला वीर साहेबजाद्यांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी नमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर कर्नाटकात ‘राष्ट्रीय युवा महोत्सवात’ भाग घेतला. त्यानंतर दोन दिवसांनीच देशाच्या अग्निवीरांशी संवाद साधला. मग उत्तर प्रदेशात क्रीडा महाकुंभ कार्यक्रमात तरुण खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर मला आज आधी संसदेत आणि नंतर पंतप्रधान निवासस्थानी ’नो युवर लीडर’ म्हणजेच ‘’आपल्या नेत्यांबद्दल जाणून घ्या’’ , या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळाली. कालच राष्ट्रीय बाल पुरस्कार जिंकणाऱ्या देशाच्या हुशार मुलांची भेट झाली. आज सर्वांना या खास कार्यक्रमात भेटतो आहे. थोड्याच दिवसांत मी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरतील लाखो युवक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधणार आहे. दरवर्षी प्रमाणेच या वेळी देखील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला मिळणार आहे. 

मित्रांनो, 

हा युवकांशी होत असलेला संवाद माझ्यासाठी दोन कारणांनी महत्वाचा असतो. एक तर यासाठी की, युवकांमध्ये उूर्जा असते, ताजेपणा असतो, जोश असतो, ध्यास असतो, नाविन्य असते. तुमच्या माध्यमातून ही सगळी सकारात्मकता मला कायम प्रेरणा देत असते. दिवस रात्र मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. दुसरं म्हणजे, आपण सगळे स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाची आकांक्षा, देशाची स्वप्ने यांचं प्रतिनिधित्व करीत आहात. विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी तुम्ही असणार आहात आणि विकसित भारत निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी देखील तुमच्याच खांद्यांवर आहे. ज्याप्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांत तरुणांचा सहभाग वाढतो आहे, तो उत्साहित करणारा आहे. पराक्रम दिनाच्या निमित्ताने एक मोठा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये तुमच्या सारख्या मुलांचा सहभाग याचेच एक उदाहरण आहे. असे अनेक कार्यक्रम, अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम, आणि स्पर्धा देशात सातत्याने होत आहेत. लाखो - कोट्यवधी तरुण यात जोडले जात आहेत. अतिशय लहान वयात देशासाठी मोठी स्वप्ने आणि समर्पण याचेच प्रतीक आहे. हा या गोष्टीचा पुरावा आहे, की भारताची तरुण पिढी देशाच्या जबाबदाऱ्या घ्यायला सज्ज देखील आहे, आणि आपले कर्तव्य पार पडायला देखील तत्पर आहे.  मी  कविता, चित्रे, वेशभूषा आणि निबंध स्पर्धा जिंकणाऱ्या तुम्हा सर्व युवकांचे  देखील खूप खूप अभिनंदन करतो. दर वेळेप्रमाणे आपले राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विविध कलाकार, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी होणार आहेत. आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

मित्रांनो, 

राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना अशा संस्था आहेत,, ज्या तरुण पिढीला राष्ट्रीय ध्येयांशी, राष्ट्रीय हितसंबंधांशी जोडण्याचे काम करतात. कोरोना काळात ज्या प्रकारे राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देशाचे सामर्थ्य वाढविले, ते संपूर्ण देशाने अनुभवले आहे. म्हणूनच सरकारचा देखील या संस्थांना प्रोत्साहित करण्याचा, यांचा विस्तार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते. आता ज्याप्रकारे आपले सीमेलगतच्या आणि समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या जिल्ह्यांत अनेक प्रकारची आव्हाने येत असतात. त्यांचा सामना करण्यासाठी देखील सरकार तुमच्या सारख्या तरुणांना तयार करत आहे. देशाच्या अनेक जिल्ह्यांत राष्ट्रीय छात्र सेनेचा विशेष कार्यक्रम घेतला जातो आहे, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यात तरुण सहकारी भविष्यासाठी देखील तयार होतील आणि गरज पडल्यास सर्वप्रथम प्रतिसाद देणारे म्हणून भूमिका देखील बजावतील. आता तर आम्ही व्हायब्रंट बॉर्डर एरिया कार्यक्रमावर देखील काम करत आहोत. या अंतर्गत सीमेलगतच्या गावांत विकास कामे केली जात आहेत, तिथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा विकसित केल्या जात आहेत. प्रयत्न हाच आहे की सीमेलगतच्या क्षेत्रांत तरुणांचे सक्षमीकरण होईल, लोक आपल्या गावांतच राहतील, तिथेच शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील.  

मित्रांनो, 

सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, अशा वेळी तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की कामी येईल. तुम्ही जेव्हा आयुष्यात काही तरी चांगलं करता, कुठलं यश मिळवता, तेव्हा त्यामागे तुमच्यासोबतच तुमचे माता - पिता, तुमच्या कुटुंबाची देखील फार मोठी भूमिका असते. तुमच्या शिक्षकांची, शाळेची, आणि तुमच्या मित्रांची मोठी भूमिका असते. म्हणजे, तुम्हाला सर्वांची साथ मिळते आणि तेच प्रगतीचे कारण असते. या सर्वांनी तुमची क्षमता आणि निर्णयांवर विश्वास ठेवला असेल. सर्वजण तुमच्या प्रयत्नांत सहभागी झाले असतील. आणि आज जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत आहात, यामुळे तुमचे कुटुंब, तुमची शाळा - महाविद्यालय आणि तुमच्या परिसराचा देखील सन्मान वाढतो आहे.

म्हणजे, आपले यश हे आपल्या एकट्याच्या प्रयत्नाने मिळत नसते आणि आपले यश सुद्धा कधीही आपल्या ‌एकट्याचे असू शकत नाही. हाच दृष्टिकोन तुम्ही आपल्या जीवनात समाजाविषयी  आणि देशाविषयी ठेवला पाहिजे. ज्या कोणत्या  क्षेत्रात तुम्हाला आवड असेल त्यात तुम्ही प्रगती केली पाहिजे. परंतु लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप सार्‍या लोकांची मदत घ्यावी लागेल. तुम्हाला 'टीम स्पिरीट' दाखवत काम करावे लागेल आणि याचसाठी जेव्हा तुम्ही आपल्या उद्दिष्टांना आपल्या लक्ष्याला देशाच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट करता तेव्हा आपल्या यशाची उंची आणखी वाढत जाईल. 

तुमच्या या यशाला हे जग भारताचे यश म्हणून पाहणार आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, होमी जहांगीर भाभा आणि डॉक्टर सी. व्ही. रमण यासारखे वैज्ञानिक असतील किंवा मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या आणखी इतर आजच्या मोठ्या खेळाडूपर्यंत, त्यांनी आपल्या जीवनात जे काही काम केले, यशाचे जे काही टप्पे गाठले, त्याकडे संपूर्ण जग हे भारताचे यश म्हणूनच बघते. आणि याही पुढे जाऊन हे जग, भारताच्या या यशामध्ये आपल्या स्वतःसाठीचे भविष्य बघते आहे. याचा अर्थ , जे संपूर्ण मानवतेच्या विकासाची पायरी बनू शकते, तेच ऐतिहासिक यश होऊ शकते. हीच सबका प्रयास या भावने मागची खरी ताकद आहे.

मित्रांनो,

आज आपण ज्या कालखंडात आहोत त्या कालखंडाची आणखी एक विशेष बाब आहे;  आणि ती म्हणजे आज देशात युवकांसाठी जेवढ्या नव्या संधी आहेत, त्या अभूतपूर्व अशा आहे. आज भारतात स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यासारखे अभियान चालवले जात आहेत. अवकाश क्षेत्रापासून पर्यावरणापर्यंत आणि हवामानापासून त्याच्याशी संबंधित आव्हानांपर्यंत आज भारत संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी कार्य करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, (यांत्रिकी शिक्षण) आणि वर्चुअल रियालिटी यासारख्या भविष्यकालीन क्षेत्रांमध्ये आपला देश आघाडीवर आहे. खेळ आणि सर्जनशीलता यासारख्या तत्सम क्षेत्रासाठी सुद्धा आपल्या देशात चांगल्या प्रकारे परिसंस्था निर्माण केली गेली आहे. आपल्या सर्वांना याचा भाग बनायचे आहे. इतरांचे लक्षही जाणार नाही, अशा क्षेत्रात कामगिरी करता येण्‍याजोग्या  शक्यतांचा शोध घ्यायचा आहे, नवनवीन क्षेत्रांचा शोध घ्यायचा आहे आणि अकल्पीत अशा उपायांचा, तोडग्यांचा शोध घ्यायचा आहे. 

मित्रांनो,

 भविष्यासाठीचे मोठी उद्दिष्टे आणि मोठे संकल्प हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. परंतु, याचबरोबर आपल्याला सध्याच्या वर्तमानातील छोट्या-मोठ्या प्राथमिक आवश्यकतांकडेही तेवढेच महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की, आपण या देशात होणाऱ्या प्रत्येक बदलांचे साक्षी राहावे, देशात जी  नवनवीन अभियाने  चालवली जात आहेत आपण त्यामध्ये सहभागी व्हावे. स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण आपल्यासमोर आहे, आपण युवकांनी या अभियानाला आपल्या जीवनाचे मिशन बनवले पाहिजे. आपल्याजवळ सर्जनशीलता पण आहे आणि मोठी ऊर्जा पण आहे. तुम्ही असा संकल्प घेऊ शकता की, आम्ही आमच्या मित्रांना बरोबर घेऊन आपला परिसर, गाव, शहर आणि नगरांना स्वच्छ बनवण्यासाठी निरंतर काम करत राहूयात. जेव्हा तुम्ही युवक स्वच्छतेसाठी बाहेर पडाल त्यावेळी ज्येष्ठ लोकांवरही  त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्याचप्रमाणे अमृत महोत्सवाच्या या काळात आपण युवकांनी स्वतंत्रसंग्रामातल्या सैनिकांशी संबंधित कमीत कमी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प जरूर करावा. आपल्या मधले कितीतरी लोक कविता, कथा लिहितील, व्लॉगिंगसारख्या कामातही काही लोकांचा हातखंडा असेल. स्वातंत्र संग्राम आणि कोणी स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित असं काही सर्जनशील काम करावे. आपण आपल्या शाळांना या विषयावर आधारित विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यासाठी प्रवृत्त करावे. आपल्या सर्वांच्या जिल्ह्यांमध्ये 75 अमृत सरोवरांची निर्मिती सुरू आहे. तुम्ही आपल्या जवळच्या अमृत सरोवराजवळ आपल्या मित्रांना घेऊन एकत्रितपणे खूप मोठे योगदान देऊ शकता. जसे की, अमृतसर  सरोवराच्या जवळ वृक्षारोपण करू शकता. याच कार्याच्या निर्मितीमध्ये लोकांना जागृत करण्याकरता एखादी रॅली सुद्धा काढू शकता. देशात सध्या सुरू असलेल्या फिट इंडिया मोहिमेबाबत ही आपण नक्कीच ऐकले असेल. युवकांना हे अभियान अधिक  आकृष्ट करू शकते. या अभियानात आपण स्वतः तर सहभागी व्हाच परंतु यात आपल्या कुटुंबियांना सुद्धा सहभागी करून घ्या. आपल्या घरी प्रत्येक दिवशी सकाळी काही वेळ सगळ्या लोकांनी एकत्र येऊन योग करावा. आपण ही परंपरा आपल्या घरी सुरू करू शकता. आपण नक्कीच ऐकले असेल यावर्षी आपला भारत देश जी -ट्वेंटी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे, ही भारतासाठी एक मोठी संधी आहे. आपण याविषयी सुद्धा नक्कीच अभ्यास करावा आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा याविषयी चर्चा करावी.

मित्रांनो,

यावेळी आपला देश 'आपल्या वारशाचा अभिमान’ आणि ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य’ या संकल्पांना घेऊन मार्गक्रमण करत आहे. हे संकल्प सुद्धा देशातल्या युवकांसाठी एक मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या वारशाचे  भविष्यासाठी जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. हे काम आपण त्याचवेळी करू शकाल, जेव्हा आपण आपल्या वारशाला समजून घ्याल, जाणून घ्याल. माझी आपल्याला एक् सूचना आहे आपण जेव्हा प्रवास करायला निघाल तेव्हा तुम्ही वारसा स्थळांना सुद्धा भेटी द्याव्या. ती ठिकाणे आपण पहावीत, ती ठिकाणे जाणून घ्यावीत. तुम्ही तरुण आहात, तुमचे भविष्य घडवण्याची हीच वेळ आहे. तुम्ही नव्या भारतासाठी नवनवीन मार्ग बनविणारे युवक आहात. आपण तरूण आहात आपल्यासाठी हा काळ भविष्य घडवण्याचा काळ आहे. आपण नवीन विचार आणि नवीन मानकांचे निर्माते आहात. आपण नव्या भारताच्या विकासासाठी नवीन मार्ग शोधणारे युवक आहात, मला विश्वास आहे की, आपण नेहमीच या देशाच्या अपेक्षा आणि  आकांक्षा पूर्ण करण्याच्या कसोटीत खरे उतरणार आहात. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi