मित्रांनो,
चारही दिशांना सर्वत्र होळीच्या सणाचा उत्साह आहे. मी देखील तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमामुळे होळीच्या या महत्त्वाच्या सणानिमित्त हजारो कुटुंबांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. गुजरातमध्ये अल्पावधीतच दुसऱ्यांदा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यासाठी मी आमचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
युवकांना संधी देण्याच्या आणि त्यांच्या सामर्थ्याचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाच्या सरकारांच्या आणि आपल्या सर्वांच्या कटिबद्धतेचा हा पुरावा आहे. मला आनंद आहे की केंद्र सरकारचे सर्व विभाग आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राज्य सरकारे जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. केंद्र सरकार व्यतिरिक्त, राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. ज्या तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की, नवीन जबाबदारी स्वीकारणारा युवा वर्ग हा अमृत काळातील संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने आपले योगदान देईल.
मित्रांनो,
गेल्या 5 वर्षांत गुजरातमधील दीड लाखांहून अधिक तरुणांना राज्य सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत गुजरातमध्ये सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त रोजगार विनिमय केंद्रांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सुमारे 18 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुजरात सरकारने भर्तीचे वेळापत्रक तयार करून निर्धारित कालावधीत भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. मला सांगण्यात आले आहे की, यावर्षी 25 हजारांहून अधिक तरुणांना राज्य सरकारमध्ये नोकऱ्या देण्याची तयारी करण्यात आली आहे. गुजरात सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक केली आहे. यासाठी वेगवेगळे डिजिटल मंच तयार करण्यात आले आहेत, मोबाईल अॅप्स आणि वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहेत.
मित्रांनो,
भाजपा सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकारने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण आखले आहे. पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त रोजगार वाढवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. उत्पादनाला चालना देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. देशात स्वयंरोजगारासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि तरुणांना हमीशिवाय आर्थिक सहाय्य देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. नोकऱ्यांच्या बदलत्या स्वरूपानुसार तरुणांच्या कौशल्य विकासावर आमचा भर आहे.
मित्रांनो,
जेव्हा विकासाची चाके गतिमान असतात तेव्हा प्रत्येक क्षेत्रात रोजगार निर्माण होऊ लागतो. आज देशात पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील विकासाच्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. केंद्र सरकारचे सवा लाख कोटी खर्चाचे प्रकल्प केवळ गुजरातमध्ये सुरू आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लाखो कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीतून लाखो रोजगारही निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
येत्या काही वर्षांत भारत हे सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनेल, असा विश्वास जगभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यात गुजरातचे मोठे योगदान आहे. तुमच्यासारखे तरुणच भारतात होणाऱ्या या क्रांतीचे नेतृत्व करतील. आता जसा गुजरातच्या दाहोदमध्ये आपला आदिवासी भाग आहे, एक प्रकारचा मागास भाग आहे. त्या भागात 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून रेल्वे इंजिनचा कारखाना उभारला जात आहे. गुजरातही सेमीकंडक्टरचे मोठे केंद्र बनणार आहे. या सर्व प्रयत्नांमुळे गुजरातमध्ये हजारो नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
मित्रांनो,
आज सरकार विकासासाठी ज्या सर्वांगीण दृष्टिकोनातून काम करत आहे त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. धोरण पातळीवरील महत्त्वाच्या बदलांमुळे, हे जे नवीन बदल झाले आहेत त्यामुळे एक अशी व्यवस्था निर्माण झाली आहे ज्यामध्ये स्टार्टअप्सना पुढे जाण्याची संधी मिळत आहे. आज देशात 90 हजारांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत आणि ते देखील श्रेणी 2, श्रेणी 3 शहरांमध्ये आहेत.
त्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत, तसेच लाखो युवक स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त होत आहेत. सरकार त्यांना कोणत्याही बँक हमीशिवाय आर्थिक मदत करत आहे. मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया योजनेतूनही स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे. कोट्यवधी महिला बचत गटात सामील होऊन त्यांच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेचे नेतृत्व करत आहेत. या महिलांना सरकार शेकडो कोटी रुपयांची आर्थिक मदतही करत आहे.
मित्रहो,
देशात निर्माण होत असलेल्या नव्या शक्यतांसाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करण्याची गरज आहे. तरुणांच्या कौशल्याच्या बळावरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकतो. समाजातील प्रत्येक घटकाला कौशल्य विकासाचा लाभ मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपले दलित बंधू-भगिनी असोत, आपले आदिवासी बंधू-भगिनी असोत, आपला वंचित वर्ग असो, आपल्या माता-भगिनी असोत, सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळेल. हे लक्षात घेऊन युवकांच्या कौशल्य विकासालाही प्राधान्य दिले जात आहे.
पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत देशात 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात येणार आहेत. येथे तरुणांना न्यू एज टेक्नॉलॉजीच्या (नवयुग तंत्रज्ञान) माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे छोट्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना एमएसएमईशी जोडले जाईल. या योजनेद्वारे छोट्या व्यवसायांशी निगडित लोकांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. आम्ही आमच्या तरुणांना नोकरीच्या बदलत्या स्वरूपासाठी सातत्याने तयार करत असतो. या कामात आमच्या आयटीआयचा मोठा वाटा आहे. गुजरातमध्ये आयटीआय आणि त्यांच्या जागांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज एकट्या गुजरातमधील सुमारे 600 आयटीआयमध्ये 2 लाख जागांवर विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. उद्योगाच्या गरजेनुसार हा प्रशिक्षण कार्यक्रम अद्ययावत करण्यात आला आहे. मला आनंद आहे की गुजरातमध्ये आयटीआयचे प्लेसमेंट खूप चांगले झाले आहे.
मित्रहो,
रोजगार निर्मितीच्या प्रत्येक संधीचा विकास करण्यावरही आमचा भर आहे, ज्याकडे दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर जितके द्यायला हवे होते तितके दिले गेले नाही. अर्थसंकल्पात 50 नवीन पर्यटन केंद्रे विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केवडिया-एकता नगरमध्ये जसा युनिटी मॉल आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात युनिटी मॉल तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील अनोख्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाईल. या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय एकलव्य शाळेत सुमारे 40 हजार शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
मित्रहो,
तुम्हा सर्वांना गुजरात सरकारशी संगनमत करून सेवा करण्याची संधी मिळत आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण असणे स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवणे हे तुमचे ध्येय ठरवले तर तुमचा वैयक्तिक विकास खुंटेल. ज्या मेहनतीने आणि समर्पणाने तुम्हाला इथपर्यंत आणले आहे, त्यात कधीही खंड पडू देऊ नका, ते पुढेही चालू ठेवावे लागेल. काहीतरी नवीन शिकण्याची ऊर्मी तुम्हाला आयुष्यभर पुढे जाण्यास मदत करेल. तुम्ही कुठेही रुजू झालात, तिथे तुमची कॅपॅबिलिटी वाढवण्यावर, तुमची क्षमता वाढवण्यावर, तुमचे ज्ञान वृंद्धिंगत करण्यावर तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुम्हाला तर लाभ होईलच, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्राचाही फायदा होईल. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला चांगले प्रशिक्षण मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. या दिशेने आम्ही कर्मयोगी भारत ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि मला खात्री आहे की निरंतर अध्ययन हे तुमच्या प्रगतीसाठी एक उत्तम अस्त्र ठरू शकते.
मित्रहो,
पुन्हा एकदा मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना या शुभारंभासाठी शुभेच्छा देतो. मी तुम्हा सर्व, गुजरातच्या बंधू आणि भगिनींना होळीच्या अनेकानेक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.