



परमपूज्य श्रीमत् स्वामी गौतमानंद जी महाराज, रामकृष्ण मठ आणि मिशनचे देश-विदेशातून आलेले आदरणीय संत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, या कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर,आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, नमस्कार!
गुजरातचा सुपुत्र या नात्याने या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो,अभिनंदन करतो. माता शारदा, गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना, त्यांच्या श्रीचरणी मी प्रणाम करतो. श्रीमत् स्वामी प्रेमानंद महाराजजी यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मी त्यांच्या चरणीही प्रणाम करतो.
मित्रहो,
महान विभूतींची ऊर्जा अनेक शतकानुशतके जगात सकारात्मक निर्मितीचा विस्तार करत असते.म्हणूनच आज स्वामी प्रेमानंद महाराजांच्या जयंतीदिनी आपण या पवित्र कार्याचे साक्षीदार आहोत. लेखंबा येथील नवनिर्मित प्रार्थना सभागृह आणि साधू निवासाची निर्मिती भारताच्या संत परंपरेसाठी पोषक ठरेल. या ठिकाणाहून सेवा आणि शिक्षणाचा एक असा प्रवास सुरू होतो आहे, ज्याचा लाभ येणाऱ्या अनेक पिढ्यांना मिळत राहणार आहे. श्रीरामकृष्ण देवांचे मंदिर, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, रुग्णालय आणि प्रवासी निवास, ही कामे अध्यात्माचा प्रसार आणि मानवतेची सेवा करण्याचे माध्यम ठरतील. आणि एका अर्थाने मला गुजरातमध्ये दुसरे घर सुद्धा मिळाले आहे. साधुसंतांमध्ये, आध्यात्मिक वातावरणात माझे मन नेहमीच रमते. या प्रसंगी मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.
मित्रहो,
साणंदच्या या परिसराशी आमच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. माझे अनेक जुने मित्र आणि आध्यात्मिक बांधवसुद्धा या कार्यक्रमात आहेत. मी माझ्या आयुष्याचा बराचसा काळ तुमच्यापैकी अनेकांसोबत इथे घालवला आहे, अनेक घरांमध्ये राहिलो आहे, अनेक कुटुंबातील माता-भगिनींनी बनवलेले अन्न मी सेवन केले आहे, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झालो आहे. आम्ही या भागात आणि इथल्या लोकांचा किती संघर्ष पाहिला आहे, हे माझ्या त्या मित्रांना आठवत असेल. या क्षेत्राचा जो आर्थिक विकास व्हायला हवा होता, तो होताना आज आपल्याला दिसतो आहे. मला जुना काळ अजून आठवतो, तेव्हा बसने प्रवास करायचा असेल तर सकाळी एक आणि संध्याकाळी एक बस यायची. त्यामुळे बहुतांश लोकांनी सायकलनेच प्रवास करावा लागत असे. त्यामुळे हा परिसर मला चांगलाच माहीत आहे. इथला प्रत्येक कानाकोपरा मला ठाऊक आहे. आमच्या प्रयत्नांना आणि धोरणांना उपस्थित संतांचा आशीर्वादही लाभला आहे, असा विश्वास मला वाटतो. आता काळ बदलला आहे आणि त्याबरोबर समाजाच्या गरजाही बदलल्या आहेत. त्यामुळे मला असे वाटते की आपले हे क्षेत्र आर्थिक विकासाचबरोबरच आध्यात्मिक विकासाचेही केंद्र बनले पाहिजे. कारण संतुलित जीवनासाठी अर्थाबरोबरच अध्यात्मसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. साणंद आणि गुजरात, आपल्या संत आणि मुनींच्या मार्गदर्शनाखाली या दिशेने वाटचाल करत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे.
मित्रहो,
एखाद्या वृक्षाचे फळ आणि त्याचे सामर्थ्य त्याच्या बीजावरून ओळखले जाते. रामकृष्ण मठ हा असा एक वृक्ष आहे, ज्याच्या बीजात स्वामी विवेकानंदांसारख्या महान तपस्वीची असीम ऊर्जा सामावलेली आहे. म्हणूनच त्याचा अखंड विस्तार, आणि त्यामुळे मानवतेला प्राप्त होणारी सावलीसुद्धा अनंत आहे, अमर्याद आहे. रामकृष्ण मठाचा गाभा असलेल्या विचारांना जाणून घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, इतकेच नाही तर त्यांचे विचारही आचरणात आणावे लागतात. आणि जेव्हा तुम्ही ते विचार आचरणात आणायला शिकता, तेव्हा एक वेगळा प्रकाश तुमचे मार्गदर्शन करतो. मी स्वतः हे अनुभवले आहे. जुन्याजाणत्या संतांना हे ठाऊक आहे, रामकृष्ण मिशनने, रामकृष्ण मिशनच्या संतांनी आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी माझ्या जीवनाला कशी दिशा दिली आहे, हे त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणून, मला संधी मिळते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या या कुटुंबात येण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासोबत असण्याचा प्रयत्न करतो. संतांच्या आशीर्वादाने मी मिशनशी संबंधित अनेक कामांमध्ये हातभार लावत आलो आहे. 2005 साली मला वडोदरा येथील दिलाराम बंगला रामकृष्ण मिशनकडे सोपवण्याचे सौभाग्य लाभले. स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते. आणि माझे भाग्य असे की पूज्य स्वामी आत्मस्थानंदजी तिथे स्वतः राहिले होते, त्यांचे बोट धरून चालण्याची शिकण्याची संधी मला मिळाली होती, माझ्या आध्यात्मिक प्रवासात मला त्यांची साथ मिळाली होती. आणि ती कागदपत्रे मी त्यांना सोपवली होती, हे सुद्धा माझे सौभाग्यच म्हणता येईल. तेव्हापासून मला स्वामी आत्मस्थानंदजींकडून सतत स्नेह लाभत राहिला आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे.
मित्रहो,
मला वेळोवेळी मिशनच्या कार्यक्रमांमध्ये आणि आयोजनांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. आज जगभरात रामकृष्ण मिशनची 280 पेक्षा जास्त शाखा केंद्रे आहेत, भारतात सुमारे 1200 आश्रम केंद्रे रामकृष्ण भावधारेशी संबंधित आहेत. मानव सेवेचा संकल्प करणाऱ्या संस्था म्हणून हे आश्रम कार्यरत आहेत. आणि गुजरात तर पूर्वीपासूनच रामकृष्ण मिशनच्या सेवा कार्याचा साक्षीदार आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये गुजरातमध्ये जी काही संकटे आली असतील, त्या प्रत्येक वेळी रामकृष्ण मिशनने ठामपणे उभे राहून काम केल्याचे आपण पाहिले असेल. जर मी सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला तर त्यात खूपच वेळ जाईल. पण तुम्हाला आठवत असेल, सुरतमधील पुराचा प्रसंग असो, मोरबीतील धरणाच्या दुर्घटनेनंतरच्या घटना असोत किंवा भुजमधील भूकंपानंतरचे दिवस असोत, दुष्काळाचा काळ असो किंवा अतिवृष्टीचा काळ असो.. गुजरातमध्ये संकट आले त्या प्रत्येक वेळी रामकृष्ण मिशनशी संबंधित लोकांनी पुढे येऊन पीडितांना आधाराचा हात दिला. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या 80 पेक्षा जास्त शाळांच्या पुनर्बांधणीत रामकृष्ण मिशनने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गुजरातमधील लोक आजही त्या सेवेचे स्मरण करून त्यातून प्रेरणा घेतात.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंदजी यांचे गुजरात बरोबर एका वेगळ्याच प्रकारचे आत्मीय नाते होते, यांच्या जीवन प्रवासात गुजरातची खूपच अनोखी भूमिका होती. स्वामी विवेकानंदजी यांनी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी भ्रमण केले होते. गुजरातमध्येच स्वामीजींना सर्वप्रथम शिकागो जागतिक धर्म महासभेबाबत माहिती मिळाली होती. येथेच त्यांनी अनेक शास्त्रांचा गहन अभ्यास करून वेदांताच्या प्रचारासाठी स्वतःला सज्ज केले होते. 1891 च्या सुमारास स्वामीजी पोरबंदरच्या भोजेश्वर भवनात अनेक महिने वास्तव्याला होते. गुजरात सरकारने हे भवन देखील स्मृती मंदिरात रूपांतरित करण्यासाठी रामकृष्ण मिशनकडे सुपूर्द केले होते. गुजरात सरकारने स्वामी विवेकानंद जी यांची 150 वी जयंती 2012 ते 2014 यादरम्यान साजरी केल्याचे तुम्हाला आठवत असेलच. जयंती महोत्सवाचा सांगता सोहळा गांधीनगरमधील महात्मा मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यात देश विदेशातील हजारो प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वामीजींच्या गुजरातबरोबर असलेल्या अनोख्या संबंधांच्या स्मरणार्थ आता गुजरात सरकार स्वामी विवेकानंद टुरिस्ट सर्किट तयार करण्याची रूपरेषा बनवत आहे, याचा मला आनंद वाटतो.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी विवेकानंद आधुनिक विज्ञानाचे खूप मोठे समर्थक होते. स्वामीजी म्हणत असत की - विज्ञानाचे महत्त्व केवळ वस्तू किंवा घटनांच्या वर्णनापर्यंत सीमित नाही, तर विज्ञानाचे महत्त्व आपल्याला प्रेरित करण्यात आणि अग्रेसर करण्यात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व, जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या स्टार्ट अप परिसंस्थेच्या रूपात भारताची नवी ओळख, जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे उचलली जात असलेली पावले, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात होत असलेले आधुनिक निर्माण, जागतिक आव्हानांना भारताकडून दिले जात असलेले पर्याय, आजचा भारत, आपल्या ज्ञानपरंपरेला आधार बनवत, आपल्या शतकानुशतके जुन्या शिक्षणाला आधार बनवत, आज आपला भारत जलद गतीने पुढे जात आहे. युवाशक्ती हीच राष्ट्राचा कणा असते, असे स्वामी विवेकानंद मानत असत. स्वामीजींचे हे कथन, हे आव्हान, स्वामी विवेकानंदजी म्हणाले होते की - “मला आत्मविश्वास आणि ऊर्जेने भरलेले 100 युवक द्या, मी भारताचा कायाकल्प करून दाखवेन”. आता वेळ आली आहे की आपण ती जबाबदारी उचलावी. आज आपण अमृत काळातील नवीन प्रवास सुरू केला आहे. आपण विकसित भारताचा अमोघ संकल्प केला आहे. आपल्याला हा संकल्प सिद्धीस न्यायचा आहे आणि निर्धारित वेळेपूर्वीच तो पूर्ण करायचा आहे. आज भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे. आज भारताच्या युवकाने जगात आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध करून दाखवले आहे.
ही भारताची युवाशक्तीच आहे, जी आज जगातील मोठमोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहे. ही भारताची युवाशक्तीच आहे, जिने भारताच्या विकासाचे शिवधनुष्य पेलले आहे. आज देशाजवळ वेळही आहे, संयोगही आहे, स्वप्नही आहे आणि संकल्प देखील आहे, आणि अगाध पुरुषार्थाचा संकल्प सिद्धीला नेण्याचा प्रवास देखील आहे. म्हणूनच आपल्याला राष्ट्र निर्माणच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी युवकांना सज्ज करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांप्रमाणेच आपल्या युवकांनी राजनीतीमध्ये देखील देशाचे नेतृत्व करण्याची आज गरज आहे. आता आपण राजनिती केवळ कुटुंबशाहीची मक्तेदारी मानू शकत नाही, राजनीतीला आपल्या कुटुंबाची जहागीर समजणाऱ्यांकडे आम्ही राजनीती सोपवू शकत नाही, म्हणूनच आम्ही नव्या वर्षात, 2025 मध्ये एक नवी सुरुवात करणार आहोत. 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीदिनी, युवा दिवसाचे निमित्त साधून, दिल्लीमध्ये युवा नेते संवादाचे आयोजन केले जाणार आहे. या संवादात देशभरातून 2 हजार निवडक युवकांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय देशभरातून अनेक कोटी युवक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले जाणार आहेत. या संवादात युवकांच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या संकल्पावर चर्चा केली जाईल. युवकांना राजनीतिशी जोडण्यासाठी मार्गदर्शक आराखडा बनवण्यात येईल. आगामी काळात एक लाख प्रतिभावान आणि ऊर्जावंत युवकांना राजनीतीमध्ये समाविष्ट करून घेणे, हा आमचा संकल्प आहे. आणि हेच युवक उद्या एकविसाव्या शतकातील भारताच्या राजनीतीचा नवा चेहरा बनतील, देशाचे भविष्य बनतील.
मित्रांनो,
आजच्या या पावन प्रसंगी वसुंधरेला आणखी चांगले बनवणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण विचारांचे स्मरण करणे आवश्यक आहे. ते म्हणजे अध्यात्म आणि शाश्वत विकास. या दोन्ही विचारांमध्ये ताळमेळ साधून आपण एका उज्वल भविष्याची निर्मिती करू शकतो. स्वामी विवेकानंद आध्यात्मिकतेच्या व्यावहारिक बाजूवर भर देत होते. त्यांना अशी आध्यात्मिकता अपेक्षित होती जी समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल. स्वामीजी विचारांच्या शुद्धी सोबतच आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर देखील भर देत होते. आर्थिक विकास, समाज कल्याण आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये ताळमेळ साधून शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करतात येऊ शकते. स्वामी विवेकानंदजी यांचे विचार या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील. अध्यात्म आणि शाश्वतता या दोन्हीमध्ये संतुलन साधणे महत्त्वाचे आहे, हे आपण जाणतोच. यापैकी एक बाब मनाचे संतुलन साधते तर दुसरी बाब आपल्याला निसर्गाबरोबर संतुलन साधण्याचे प्रशिक्षण देते. म्हणूनच रामकृष्ण मिशन सारख्या संस्था आपल्या अभियानाला गती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभवू शकतात, असे मी मानतो. मिशन लाईफ असो किंवा एक पेड मा के नाम यासारखे अभियान असो, रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून या अभियानांना आणखीन विस्तारित केले जाऊ शकते.
मित्रांनो,
स्वामी विवेकानंद भारताला सशक्त आणि आत्मनिर्भर देशाच्या रूपात पाहू इच्छित होते. त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने देश पावले टाकत आहे. हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो, सशक्त आणि समर्थ भारत पुन्हा एकदा मानव जातीला दिशा दाखवणारा देश बनो, यासाठी प्रत्येक देशबांधवाने गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदजी यांच्या विचारांना आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. या प्रकारचे कार्यक्रम,संतांचे प्रयत्न याचे खूप मोठे माध्यम आहे. मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व पूजनीय संतगणांना श्रद्धापूर्वक वंदन करतो, आणि स्वामी विवेकानंदजी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आजची ही नवी सुरुवात नव्या ऊर्जेची निर्मिती करेल, याच अपेक्षेसह तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.