स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करतांनाच,हा अमृतमहोत्सव आपल्यासाठी भविष्यातील भारताचा स्पष्ट आराखडा आणि दृष्टिकोन विकसित करण्याची संधी : पंतप्रधान
आज, प्रत्यक्ष, तंत्रज्ञान आणि वित्तीय आधारावर जग जवळ येत असतांना, निर्यात विस्तारासाठी जगभरात नव्या शक्यता निर्माण होत आहेत- पंतप्रधान
आपल्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि क्षमता, आपल्या उत्पादने आणि सेवा उद्योगांचा पाया बघता निर्यात विकासाला प्रचंड वाव: पंतप्रधान
उत्पादन-संलग्न- सवलत योजनेमुळे केवळ उत्पादन क्षेत्रांची व्याप्ती वाढणार नाही,तर जागतिक गुणवत्तेचा स्तर आणि कार्यक्षमताही वाढेल- पंतप्रधान
पूर्वलक्षी प्रभावातून मुक्त होण्याचा भारताचा निर्णय, आमची कटिबद्धता, धोरणातील सातत्य दर्शवणारा तसेच भारतात निर्णयक्षम आणि वचनांची पूर्तता करणारे सरकार असल्याचा स्पष्ट संदेश देणारा : पंतप्रधान
Central government is working closely with the states to minimize the regulatory burden: PM
नियमनांचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करत आहे- पंतप्रधान
राज्यांत निर्यातीची केंद्रे विकसित करण्यासाठी राज्यांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन : पंतप्रधान

नमस्कार,

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, जगभरात सेवा देत असलेले सर्व राजदूत, उच्चायुक्त, केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्व अधिकारी तसेच वेगवेगळी निर्यात मंडळे, वाणिज्य आणि उद्योग संघटनेतील सर्व नेते, महोदय आणि महोदया!

हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा काळ आहे. ही वेळ स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 व्या वर्षात आपले स्वातंत्र्य साजरे करण्याची आहेच, पण त्याचबरोबर भविष्यातील भारतासाठी एक स्वच्छ दृष्टी आणि मार्गदर्शक आराखडा तयार करण्याची देखील आहे. यामध्ये आपल्या निर्यातीसाठीच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यात तुम्ही सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला सहभाग तसेच पुढाकार यांची आणि तुम्हां सर्वांची देखील खूप महत्त्वाची भूमिका आहे. जागतिक पातळीवर या संदर्भात ज्या घडामोडी होत आहेत त्यांच्याशी आपण सर्व, इथे उपस्थित असलेले लोक जास्त परिचित आहेत. आज वाढत्या भौतिक, तंत्रज्ञानविषयक  आणि आर्थिक संपर्कामुळे जग दिवसेंदिवस अधिक लहान होत चालले आहे. अशा वेळी, आपल्या देशातून विश्वभरात होणाऱ्या निर्यातीच्या विस्ताराच्या नवनवीन शक्यता निर्माण होत आहेत. मला वाटतं की माझ्यापेक्षाही तुम्ही सर्वजण याबाबतीत जास्त अनुभवी आणि अधिक उत्तम प्रकारे पारख करू शकणारे आहात. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि त्या निमित्ताने या विषयाशी संबंधित दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्याची जी संधी मिळाली आहे त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी निर्यातीच्या बाबतीत आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी जी उत्सुकता, सकारात्मकता आणि वचनबद्धता दाखविली आहे ती देखील कौतुकास्पद आहे.

 

मित्रांनो,

जागतिक अर्थव्यवस्थेत जेव्हा आपल्या देशाचा वाटा सर्वात मोठा असण्याचा एक काळ होता. त्या काळातील भारताचा शक्तिशाली व्यापार आणि निर्यात हे त्याचे मुख्य कारण होते. जगातील प्रत्येक भागाशी तेव्हा आपले व्यापारी संबंध होते आणि  तसे व्यापारी मार्ग देखील तेव्हा प्रचलित होते. आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेत आपली पूर्वीची मक्तेदारी पुन्हा परत मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा परिस्थितीत आपल्या सध्याच्या निर्यात क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कोविडपश्चात परिस्थितीत जागतिक पटलावर आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीबद्दल व्यापक प्रमाणात चर्चा सुरु आहे तेव्हा, आपण नव्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करायचे आहेत. तुम्हां सर्वांना माहितच आहे की, सध्या आपली निर्यात, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे 20% आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार, आपल्या क्षमता, आपले उत्पादन आणि सेवा उद्योगाचा पाया लक्षात घेता त्यात वाढ होण्यासाठी खूप वाव आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपला देश आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मार्गावरून चालत आहे तेव्हा जागतिक पुरवठा साखळीमधील निर्यातीत आपल्या योगदानाच्या प्रमाणात वाढ करणे हे देखील यातील एक लक्ष्य आहे. आणि म्हणूनच आज जागतिक मागणीनुसार आपल्या देशातून निर्यात शक्य करण्याची सुनिश्चिती आपल्याला करावी लागेल जेणेकरून आपला व्यवसाय वाढवता येईल, त्यात आणखी विकास साधता येईल. आपल्या उद्योग क्षेत्राला देखील उत्तम तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, नाविन्यपूर्ण शोधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल तसेच संशोधन आणि विकासात्मक कार्यातील भागीदारी वाढवावीच लागेल. या मार्गांचा अवलंब करूनच जगातील मूल्य साखळीतील आपल्या हिश्श्यात वाढ होईल. स्पर्धात्मकता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देऊनच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जागतिक विजेते निर्माण करायचे आहेत.

 

मित्रांनो,

निर्यातवाढीसाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला घटक म्हणजे देशात उत्पादन अनेक पटींनी वाढले पाहिजे. आणि हे उत्पादन दर्जाच्या बाबतीत बाकीच्यांशी स्पर्धा करू शकेल असे असायला हवे. आता जसे आपल्या सहकाऱ्यांनी सांगितले की आज जगात असा वर्ग तयार झालेला आहे जो वस्तूंच्या किंमतीपेक्षा त्यांच्या दर्जावर अधिक लक्ष केंद्रित करतो, या मुद्द्याकडे आपल्याला लक्ष द्यावेच लागेल. दुसरा घटक म्हणजे उत्पादित मालाच्या मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीच्या मार्गातील समस्या सोडविल्या गेल्या पाहिजेत. या बाबतीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आणि या क्षेत्रातील जे खासगी भागीदार आहेत त्या सर्वांनी आपापली भूमिका योग्य प्रकारे निभावणे महत्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सरकारांनी निर्यातदारांसोबत खांद्याला खांदा भिडवून काम केले पाहिजे. निर्यात प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात जर राज्य सरकारे सहभागी नसतील, राज्यांमधील निर्यात मंडळे त्यात समाविष्ट नसतील तर काय होईल की प्रत्येक व्यापारी आपापल्या पद्धतीने निर्यात करत राहील, तो स्वतःच्या जगात अलिप्तपणे कार्यरत राहील. मग यात आपल्याला हवा तो परिणाम साधता येणार नाही. म्हणून आपल्याला एकत्रितपणेच प्रयत्न करावे लागतील. आणि चौथा घटक आहे तो आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित आहे, तो म्हणजे भारतीय उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजार मिळविणे. हे सर्व घटक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच ‘मेक इन इंडिया-फॉर द वर्ल्ड’चे उद्दिष्ट आपण उत्तम प्रकारे पूर्ण करू शकू.    

 

मित्रांनो,

आज देशात जे सरकार आहे, राज्यांमध्ये जी सरकारे आहेत ती सर्व व्यापार जगताच्या गरजा समजून घेऊन पुढे जाण्याचा, प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अनेक नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे करणे सोपे झाले आहे. आपत्कालीन कर्ज पुरवठा हमी योजनेच्या माध्यमातून 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच इतर प्रभावित क्षेत्रांना लाभ झाला आहे. अर्थव्यवस्थेचे पुनर्परिचालन आणि वाढ यांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच अतिरिक्त दीड लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मित्रांनो,

उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेमुळे आपले उत्पादनाचे प्रमाणच नव्हे तर जागतिक दर्जा आणि कार्यक्षमता यांची पातळी वाढविण्यासाठी देखील खूप मदत होणार आहे.यामुळे, भारतात तयार करण्यात आलेली आत्मनिर्भर भारताची नवी परिसंस्था निर्माण करण्यासाठी खूप सोयीस्कर होईल. देशाला उत्पादन आणि निर्यात क्षेत्रातील नवे विजेते मिळतील. 7 वर्षांपूर्वी आपण सुमारे 8 अब्ज डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन आयात करत होतो, बाहेरच्या देशातून मागवत होतो. आता हे प्रमाण 2 अब्ज डॉलर्स इतके कमी झाले आहे. 8 अब्जांवरून 2 अब्ज झाले आहे. 7 वर्षांपूर्वी भारतातून फक्त 30 कोटी डॉलर्स इतक्या किंमतीचे मोबाईल फोन निर्यात करत असे, आता आपण 3 अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीचे मोबाईल फोन निर्यात करतो.

 

सहकारी मित्रांनो,

उत्पादन आणि निर्यातीशी संबंधित आणखी एक समस्या सोडविण्याचे देखील ध्येय सरकारने ठेवले आहे. देशात मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करण्याला, राज्ये आणि केंद्र अशा दोन्ही सरकारांनी प्राधान्य दिले आहे आणि ते द्यायलाच हवे. यासाठी, धोरणात्मक निर्णय असो किंवा पायाभूत सुविधांची निर्मिती असो, प्रत्येक स्तरावर आपल्याला अधिक वेगाने काम करायला हवे. आज आपण बहुआयामी संपर्क पद्धतीकडे वेगाने मार्गक्रमण करत आहोत.

 

मित्रांनो,

आत्ताच आपण बांगलादेशने जो अनुभव सांगितला, तो ऐकला. आता रेल्वे मार्गाने वस्तू जायला लागल्या आहेत. त्यामुळे एकदम वृद्धी होत आहे. मित्रांनो, सरकारच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महामारीचा परिणाम तर आहेच, मात्र तो कमीत कमी कसा होईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. विषाणू संक्रमण नियंत्रणात राहण्यासाठी आमचे संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. देशामध्ये लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. देशवासियांच्या आणि उद्योगांच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या जात आहेत. त्यांना येणा-या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी शक्य असणारी सर्व पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या काही काळामध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांचे दृष्य परिणाम आज आपणही अनुभव करीत आहात. आमच्या उद्योगांनी, आमच्या व्यवसायांनीही या काळामध्ये नवसंकल्पना प्रत्यक्षात आणल्या. नवीन आव्हानांचा विचार करून स्वतःमध्ये बदल घडवून आणले. औद्योगिक क्षेत्राने देशाला वैद्यकीय आणीबाणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली  आणि बाजारपेठेत टिकून राहण्याबरोबरच वृद्धी करण्यासाठी भूमिका पार पाडली. याच कारणामुळे आज औषधे आणि औषधोपचाराबरोबरच कृषीसारख्या क्षेत्रामध्येही आमच्या निर्यातदारांनी नवीन उंची गाठली आहे. आज आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा सुधारणा झाल्याचे पाहतोय, इतकेच नाही, तर उच्च वृद्धीदराने सकारात्मक खुणा-चिन्हे आम्हाला दिसत आहेत. जगातल्या अनेक मोठ्या अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच निर्यातीविषयी मोठे लक्ष्य निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी ही एक उत्कृष्ट वेळ आहे, असे मला वाटते. यासाठीही सरकार प्रत्येक स्तरावर आवश्यक असणारी पावले उचलत आहे. अलिकडेच सरकारने निर्यातदारांविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आमच्या निर्यातदारांना विमा कवचाच्या रूपाने जवळपास 88 हजार कोटी रूपयांची मदत मिळणार आहे. याप्रकारे निर्यात भत्त्याचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जागतिक व्यापार संघटनेनुसार भत्ता मिळणार असल्याने आमच्या निर्यातीला बळ मिळू शकणार आहे.

 

मित्रांनो,

जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवसाय करणा-या आमच्या निर्यातदारांना स्थैर्य-स्थिरतेचा किती मोठा परिणाम होत असतो, हे अतिशय चांगले माहिती आहे. भारताने पूर्वलक्षी कर भरण्यातून व्यावसायिकांना मुक्त करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावरून आमची वचनबद्धता दिसून येते. धोरणांमध्ये असलेले सातत्य दिसून येते. यामुळेही गुंतवणूकदारांना स्पष्ट संदेश मिळतो की, पुढे मार्गक्रमण करणारा भारत काही फक्त नवीन संभाव्य संधींना व्दार मुक्त करतोय, असे नाही तर भारताचे निर्णयक्षम सरकार आपली वचने पूर्ण करण्याची इच्छाशक्ती बाळगून आहे.

 

मित्रांनो,

निर्यातीविषयी आमची जी काही उद्दिष्टे आहेत, ज्या काही आम्ही सुधारणा करणार आहोत, त्यामध्ये देशाच्या प्रत्येक राज्याची खूप मोठी भागीदारी आहे. गुंतवणूक असो, व्यवसायाचे सुलभीकरण असो, अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पायाभूत सुविधांचे निर्माण असो, यामध्ये राज्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. निर्यात असो अथवा गुंतवणूक या दोन्हींच्या वाढीसाठी नियामकाचा भार कमीत कमी असावा, यासाठी केंद्र सरकार राज्यांच्याबरोबर काम करीत आहे. राज्यांमध्ये निर्यात केंद्र बनावे यासाठी सदृढ स्पर्धेला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्यातरी एका उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

 

मित्रांनो,

निर्यातीविषयी आम्ही निश्चित केलेले महत्वाकांक्षी लक्ष्य हे समग्र आणि तपशीलवार कृती धोरणाच्या अंमलबजावणीनेच साध्य होवू शकणार आहे. आपल्याला सध्याच्या निर्यातीमध्येही वेगाने वृद्धी करावी लागणार आहे. आणि नवीन उत्पादनांसाठी नव्या बाजारपेठा तयार करण्याचे कामही करायचे आहे. आणि मी आपल्याला काही सल्ले देवू इच्छितो. आपले जे मिशन आहे, ते निश्चित करता येईल. आज जे देश खूप लहान आहेत, त्यांच्याविषयी मी हे बोलत नाही. मात्र इतर देशांमध्ये आज तीन ठिकाणीच जर भारताचा माल जात असेल. तर ती तीनही व्यवसायाची स्थाने आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत, त्यानिमित्त आपण आता त्यामध्ये नवीन पाच व्यवसायाची स्थाने वाढवू शकतो का, हे पाहिले पाहिजे.  आपल्या मिशन स्वांतत्र्याची 75 वर्षे, या अंतर्गत नवीन स्थाने जोडण्याचा निश्चिय करू शकतो. त्याचबरोबर या वर्षात  भारतातून आत्ता जात असलेल्या वस्तूंमध्ये अतिरिक्त नवीन 75 उत्पादने कशी जावू शकतील, यासाठी विचार करण्याचे काम आपण या मिशनमध्ये करू शकतो. त्याचप्रकारे तिथे ज्या प्रकारे भारतीय मंच आहे, गेल्या सात वर्षात आम्ही पाहिले की, अनेक देशांमध्ये भारतीय समाज, मंच अतिशय कृतिशील, बनली आहेत. आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणारे समूह परदेशात तयार झाले आहेत, या लोकांना अतिशय प्रयत्नपूर्वक जोडण्यात आले आहे. आम्ही राज्यवार, असे काही गट बनवले आहेत आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन वर्षामध्ये त्यांच्या राज्यांना बरोबर घेवून निर्यात विषयक आभासी परिषद आपण भरवू शकतो. उदाहरणार्थ असे मानू या की, बिहार सरकारने अशा परिषदेचे आयोजन केले. त्यामध्ये भारत सरकारही सहभागी असेल. बिहारमधून ज्या गोष्टी, उत्पादने निर्यात होतात, त्यांचे सर्व निर्यातदार यामध्ये सहभागी  होतील. आणि त्या बाहेरच्या देशामध्ये निवास करणारी जी बिहारची मंडळी आहेत, त्यांनाही जोडण्यात येईल. त्याचबरोबर बिहारची अशी कोणती गोष्ट आहे, जी त्या विशिष्ट देशामध्ये पोहोचली  पाहिजे. अशा प्रकारे त्या देशातल्या मंडळीना मंचाला जोडल्यामुळे भावनिक नाते तयार होईल, असे मला वाटते. यामुळे मार्केटिंग करताना ब्रँडिंग करताना खूप मोठी मदत मिळू शकेल. आणि आमच्या वस्तू, उत्पादनांचा वेगाने प्रसार होवू शकणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारांनाही या गोष्टीचा विचार करता येईल. आपल्या राज्यातल्या पाच किंवा दहा उच्च प्राधान्याच्या गोष्टी निश्चित कराव्यात. या वस्तू निर्यात कशा करता येतील, याचा विचार करावा. आणि देशातल्या कमीत कमी 75 देशांमध्ये माझ्या राज्यातून काही ना काही, कोणत्या ना कोणत्या वस्तू गेल्या पाहिजेत, असे ठरवावे. यासाठी राज्यांना आपले स्वतःचे लक्ष्य निश्चित करता येईल. म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षामध्ये जगामध्ये पोहोचण्यासाठी नव-नवीन पद्धतींचा स्वीकार करून आपण क्रियाशील होण्याचा प्रयत्न करू शकतो. निर्यात करण्यासारखी अनेक उत्पादने आपल्याकडे असतील. त्या उत्पादनांविषयी जगाला काहीच माहिती नसेल. आता ज्याप्रमाणे आपल्याकडे एलईडी बल्ब आहे. भारताने अतिशय स्वस्तामध्ये एलईडी बल्ब बनवला आहे. संपूर्ण जग वैश्विक तापमान वाढीविषयी चिंता करीत आहे. ऊर्जेची बचत करण्याविषयी चर्चा केली जात आहे. हे लक्षात घेवून आपण जगामध्ये एलईडी बल्ब पोहोचवू शकतो. स्वस्तामध्ये पोहोचवू शकतो.

आपण वैश्विक तापमान वृद्धी समस्या निवारणासाठी मानवतेतून एक कामही करणार आहोत आणि त्यामुळे भारताला एक खूप मोठी बाजारपेठही मिळणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. हे तर एक उदाहरण म्हणून मी आत्ता घेतले आहे. आपण अनेक गोष्टी करू शकतो. आत्ता आपला जवळपास निम्मा निर्यात फक्त चार मोठ्या स्थानी  होत आहे. याचप्रकारे जवळपास 60 टक्के निर्यात अभियांत्रिकी उत्पादने, रत्ने आणि आभूषणे, पेट्रोलियम आणि रसायन उत्पादने आणि औषधोपचार यांच्याशी संबंधित आहे.

मला वाटते की एवढा मोठा विशाल देश, इतका विविधतेने नटलेला देश, इतक्या मोठ्या संख्येने वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने असलेला देश, हे सगळे जर जगभरात पोहचत नसेल तर आपल्याला आत्मचिंतन करावे लागेल. यात ज्या उणिवा आहेत त्या दूर कराव्या लागतील. आणि एकत्र बसून मार्ग शोधायचेच आहेत. ही स्थिती आपण सर्वानी मिळून बदलायची आहे. आपल्याला नवनवीन ठिकाणे देखील शोधायची आहेत आणि आपली नवीन उत्पादने देखील जगभरात पोहचवायची आहेत. खाणकाम, कोळसा, संरक्षण, रेल्वे यांसारखी क्षेत्रे खुली केल्यामुळे आपल्या उद्योजकांना निर्यात वाढवण्याच्या नव्या संधी मिळत आहेत. या नवीन क्षेत्रांसाठी आपण भविष्याच्या दृष्टीने रणनीती आखू शकतो का ?

 

मित्रांनो,

आज या कार्यक्रमात उपस्थित आपले राजदूत, परदेशी मंत्रालयाच्या सहकाऱ्यांना मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही ज्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करत आहात, त्या देशांच्या गरजा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहेत. त्या देशात कोणत्या वस्तुंना मागणी आहे, भारताच्या कोणत्या क्षेत्राकडून ती मागणी पूर्ण होऊ शकते याचा उत्तम अंदाज तुम्हा लोकांना असतोच. आणि मागील  7 वर्षात आपण एक नवीन प्रयोग केला आहे. मिशनचे लोक भारतात येतात. तेव्हा त्यांना राज्यांमध्ये पाठवले जाते. राज्य सरकारांबरोबर त्यांची दोन-तीन दिवस चर्चा करून दिली जाते. जेणेकरून त्या राज्याला त्या देशात आपली काही उत्पादने पाठवायची असतील तर सोयीचे होईल. हे काम याआधीच सुरु झाले आहे. अशा स्थितीत भारताच्या निर्यातीसाठी इथल्या वाणिज्य उद्योगासाठी तुम्ही सर्वजण एका मजबूत सेतूप्रमाणे आहात. माझी इच्छा आहे की विविध देशांमधील भारतीय दूतावास भारताच्या निर्मिती क्षमतेचे देखील प्रतिनिधी बनावेत. वेळोवेळी तुम्ही भारतात इथल्या यंत्रणांना सावध करत राहाल, मार्गदर्शन करत राहिलात तर याचा लाभ निर्यात वाढवण्यासाठी होईल. मी वाणिज्य मंत्रालयाला देखील सांगत आहे की अशी व्यवस्था निर्माण करा ज्यात आपले निर्यातदार आणि आपल्या दूतावासांमध्ये निरंतर संपर्क कायम राहील. आणि मला तर वाटते की या व्हर्च्युअल व्यवस्थेमुळे या सर्व गोष्टी आपण वेगाने आणि अधिक सुलभपणे करू शकतो. पूर्वी प्रवास करणे, बैठका घेणे हे सगळे करणे खूप कठीण होते. मात्र कोरोना नंतर व्यापक प्रमाणात जगभरात या व्यवस्थेचा स्वीकार केला जात आहे. मला वाटते या व्हर्चुअल सवयीला प्रोत्साहन द्यायला हवे. आणि आपला ह्या प्रकारचा सर्वपक्षीय, सर्व हितधारकांचा संयुक्त उपक्रमाचा प्रयत्न अधिक  निर्णायक बनेल.

 

मित्रांनो,

आपल्या निर्यातीतून आपल्या अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी आपल्याला देशातच वेगवान आणि उच्च दर्जाची पुरवठा साखळी निर्माण करायची आहे. यासाठी आपण नवीन संबंध, नवीन भागीदारी बनवण्याची गरज आहे. मी सर्व निर्यातदारांना विनंती करतो कीं त्यांनी आपले एमएसएमई, आपले शेतकरी, आपले मच्छिमार यांच्याबरोबर भागीदारी मजबूत करावी. आपल्या स्टार्टअप्सना प्रोत्साहित करावे, आपले अनेक निर्यातदार असतील, ज्यांना स्टार्टअपच्या जगात आपली युवा पिढी किती मोठे योगदान जगाला देऊ शकते याबाबत परिचित नसतील. जमले तर एक दिवस आपण वाणिज्य मंत्रालय उपक्रम हाती घेऊ. आपले स्टार्टअप्स, आपले निर्यातदार, आपले गुंतवणूकदार यांची एक संयुक्त कार्यशाळा व्हावी. परस्परांच्या सामर्थ्याचा परिचय व्हावा. जगातील बाजारपेठांचा परिचय व्हावा. आपण खूप काही करू शकतो. आपण त्यांना मदत करावी. दर्जा आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत बोलायचे तर आपली औषधें , आपल्या लसींच्या बाबतीत आपण जगाला हे सिद्ध करून दाखवले आहे. तंत्रज्ञानाच्या उत्तम वापराद्वारे आपण दर्जा कसा उंचावू शकतो, याचे आणखी एक उदाहरण आहे आपले मध क्षेत्र. मी छोटी उदाहरणे देत आहेत कारण छोट्या छोट्या गोष्टी देखील किती मोठ्या ताकदीने उभ्या राहू शकतात. मी हे तुम्हाला मधाचे उदाहरण देत आहे. मधाचा दर्जा सुनिश्चित करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची ओळख निर्माण करण्यासाठी अनिवार्य होते. आम्ही मधाच्या चाचणीसाठी तंत्रज्ञान आधारित एक नवीन चाचणी सुरु केली. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी आपण सुमारे  97 दशलक्ष डॉलरच्या मधाची निर्यात केली. आपण अशाच प्रकारे अन्न प्रक्रिया, फळे, मासे याबाबत नाविन्यपूर्ण संशोधन करू शकत नाही का ? आज जगात सर्वंकष आरोग्यसेवेचे वातावरण तयार झाले आहे. पुन्हा मूलभूत गोष्टींकडे वळण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या योगमुळे भारताकडे या दिशेने पाहिले जात आहे. अशा वेळी आपली सेंद्रिय कृषी उत्पादने जी आहेत, त्याची जगभरात एक मोठी बाजारपेठ तयार होण्याची शक्यता आहे. आपल्या सेंद्रिय उत्पादनांना आपण प्रोत्साहित करायला हवे.

 

मित्रांनो,

हा काळ ब्रँड इंडियासाठी नवीन उद्दिष्टांसह नव्या वाटचालीचा आहे. हा काळ आपल्यासाठी दर्जा आणि विश्वासार्हता याची नवी ओळख स्थापित करण्याचा आहे. आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात भारताची उच्च मूल्यवर्धित उत्पादने पोहचावीत. आपल्या प्रत्येक वस्तूंमध्ये निरंतर मूल्यवर्धन करत रहावे लागेल. त्यातून एक स्वाभाविक मागणी निर्माण होईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. मी उद्योग क्षेत्राला, सर्व निर्यातदारांना आश्वासन देतो की सरकार तुम्हाला शक्य ती सर्व मदत करेल. चला, आपण  आत्मनिर्भर भारताचा, वैभवशाली भारताचा संकल्प एकत्रितपणे सिद्धीला नेऊ ! तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. एका आठवड्यानंतर जगभरात आपले दूतावास आणि भारतातही आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करू. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची  विधिवत सुरुवात देखील होईल. माझी इच्छा आहे की हे आपल्यासाठी प्रेरणेचे कारण बनायला हवे. जगभरात  प्रभाव निर्माण करण्यासाठी जगभरात पोहचण्यासाठी ही स्वातंत्र्याची 75 वर्षे आपल्यासाठी एक खूप मोठी प्रेरणादायी संधी आहे. आणि 2047, जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करेल, तर हा पुढील 25 वर्षांचा काळ आपल्यासाठी खूप मौल्यवान काळ आहे. आपल्याला एकही क्षण वाया न दवडता आतापासूनच एक रूपरेषा आखावी लागेल. आणि मला विश्वास आहे की आजच्या संवादातून आपण सर्व हा संकल्प पूर्ण करू, हा संकल्प तडीस नेऊ. याच विश्वासासह मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद !

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How Modi Government Defined A Decade Of Good Governance In India

Media Coverage

How Modi Government Defined A Decade Of Good Governance In India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi wishes everyone a Merry Christmas
December 25, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi, extended his warm wishes to the masses on the occasion of Christmas today. Prime Minister Shri Modi also shared glimpses from the Christmas programme attended by him at CBCI.

The Prime Minister posted on X:

"Wishing you all a Merry Christmas.

May the teachings of Lord Jesus Christ show everyone the path of peace and prosperity.

Here are highlights from the Christmas programme at CBCI…"