रामेश्वरम् ही अशी भूमी आहे, जिने हजारो वर्षे देशाच्या आध्यात्मिक जीवनाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवला आहे. या शतकात तर रामेश्वरम् आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जाते. अब्दुल कलाम यांच्या रूपात एक कर्मयोगी वैज्ञानिक, एक प्रेरक शिक्षक, एक प्रखर विचारक आणि एक महान राष्ट्रपती बहाल करणे, ही रामेश्वरम्ची आणखी एक ओळख झाली आहे. रामेश्वरमच्या या पवित्र भूमीला स्पर्श करताना माझ्या मनात आदराची भावना आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे रामेश्वरम हे केवळ एक धार्मिक ठिकाण नाही. रामेश्वरम हा ज्ञान पुंज आहे, ते सखोल अध्यात्मिक ज्ञानाचे केंद्र आहे. १८९७ साली अमेरिकेहून परतणारे स्वामी विवेकानंद यांनीही या ठिकाणाला भेट दिली होती. आणि याच भूमीने भारताला अब्दुल कलाम यांच्या रूपात आपला सर्वात प्रसिद्ध पुत्र बहाल केला. डॉ कलाम यांच्या कृतीतून आणि विचारातून नेहमीच रामेश्वरमचा साधेपणा, गंभीरता आणि शांततेचे दर्शन घडत राहिले.
डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीदिनी रामेश्वरम येथे येणे, हा मला भावुक करणारा क्षण आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी आम्ही एक संकल्प केला होता, एक वचन दिले होते की कलाम यांच्या स्मरणार्थ रामेश्वरममध्ये एक स्मारक उभारले जाईल. आज हा संकल्प पूर्ण होत असल्याबद्दल मला आनंद वाटतो आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने फारच कमी वेळेत हे स्मारक उभारले आहे. हे स्मारक देशाच्या वर्तमान आणि भावी पिढीला प्रेरणा देत राहील. गेल्या वर्षी मी व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. देशाच्या युवा पिढीला प्रेरणा देईल, असे स्मारक डीआरडीओच्या सोबत, तामिळनाडू सरकारच्या सहकार्यांने येथे उभारावे, हे काम मी त्या समितीकडे सोपवले होते. आज मी हे स्मारक पाहिले आणि मन प्रसन्न झाले. आपल्या देशात अब्दुल कलाम यांचे कार्य, विचार, जीवन, आदर्श आणि संकल्पांशी सुसंगत असे अत्यंत नाविन्यपूर्ण स्मारक इतक्या कमी वेळात उभारण्यात आले आहे. असे स्मारक उभारल्याबद्दल व्यंकय्याजी आणि त्यांची टीम, तामिळनाडू सरकार, भारत सरकारचे सर्व विभाग आणि डीआरडीओ, अशा सर्वांचेच मी मनापासून अभिनंदन करतो.
आपणाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या या देशात एखादे काम वेळेत पूर्ण झाले, ठरविल्याप्रमाणे झाले तर, सरकारला काम वेळेत काम करता येते? असे नागरिक आश्चर्याने विचारू लागतात. पण हे शक्य होते आहे, कारण दिल्लीत आज जे सरकार वसले आहे, आपण सर्वांनी निवडून दिलेल्या या सरकारवर जी जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे संपूर्ण कार्य पध्दती बदलली आहे. आणि वेळेत काम पूर्ण करण्याचा आग्रह सरकारने यशस्वीरित्या निभावला आहे.
मात्र केवळ सरकार, पैसे, नियोजन आणि उर्जा असली की सगळी कामे होतातच असे नाही, हे आपण विसरू नये. या स्मारकाच्या यशामागे आणखी एक गुपित आहे.सर्व सव्वाशे कोटी भारतीयांना ज्याचा अभिमान वाटेल, असे गुपित मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. ते गुपित म्हणजे हे काम करण्यातील जे जे तज्ञ होते, कारागिर होते, कलाकार होते, वास्तुविशारद होते, भारतभरातून आलेले हे सर्व लोक सरकारी नियमानुसार सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजे पर्यंत काम करत, त्यानंतर ते ५ ते ६ असा तासभर आराम करत आणि त्यानंतर ६ ते ८ वाजेपर्यंत दोन तास जास्तीचे काम करत. या अधिकच्या वेळाचे आम्ही पैसे घेणार नाही, ही आमच्यातर्फे अब्दुल कलाम यांना आम्ही आमच्या श्रमातून, आमच्या घामातून दिलेली श्रद्धांजली आहे, असे त्यांनी सांगितले. ज्या माझ्या गरीब मजूर बंधू-भगिनींनी भक्तीभावाने हे काम केले, त्यांना हे काम पूर्ण केल्याबद्दल मी शत-शत प्रणाम करतो. या मजदूरांनी, या कारागिरांनी इतके उत्तम काम केले आहे की येथे उपस्थित आपण सर्वांनी आपल्या जागी उभे राहून त्या मजुरांना अभिवादन करू या, टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे, असे आवाहन मी येथे उपस्थित असलेल्या सर्वांना करतो.
जेव्हा एखाद्या मजुराचे मन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भरून जाते, तेव्हा किती महान कामे पूर्ण होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामेश्वरमध्ये उभे असलेले हे स्मारक होय. माझ्या मनात आज आले की आज जर या मंचावर आपल्याबरोबर अम्मा उपस्थित असत्या आणि आमच्या गरीब मजुरांनी केलेले काम त्यांनी पाहिले असते तर त्यांनी अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले असते. आज अम्मांची अनुपस्थिती आपणा सर्वांनाच सलते आहे. अम्मा गेल्यानंतर माझा तमिळनाडूच्या भूमीवर हा पहिलाच कार्यक्रम आहे. मलाही त्यांचे उपस्थित नसणे जाणवते आहे. मात्र त्यांचा आत्मा जेथे असेल, तिथून तो तमिळनाडूच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम आशिर्वाद देत असेल, असा विश्वास मला वाटतो.
मी आज रामेश्वरमच्या या पवित्र भूमीवरील आणि देशभरातील नागरिकांना एक प्रार्थना करू इच्छितो. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक रामेश्वरमची यात्रा करण्यासाठी येतात. पर्यटक मार्गदर्शकांना मी विनंती करतो, रामेश्वरमला येणाऱ्या प्रवाशांना मी विनंती करतो आणि देशातील युवा पिढीलाही मी विनंती करतो की जेव्हा ते येथे येतील तेव्हा अब्दुल कलाम यांचे हे स्मारक पाहायलाही आवर्जून या. नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या प्रेरणा तीर्थाला भेट देण्यासाठी आपण अवश्य यावे, अशी विनंती मी करतो.
आजचा कार्यक्रम एक प्रकारे पंचामृत आहे. रेल्वे, रस्ते, भूमी, समुद्र आणि अब्दुल कलाम यांचे स्मारक. आज अब्दुल कलाम यांच्या पुण्यतीथीनिमित्त आज अशा पाच कार्यक्रमांची संधी मिळाली आहे. आज आमचे मच्छिमार बांधव लहान-लहान नौका घेऊन समुद्रात जातात. भारताच्या सीमेत आहेत की त्याबाहेर, हे सुद्धा अनेकदा समजत नाही. त्यांना अनेक संकंटांचा सामना करावा लागतो. आम्ही प्रधानमंत्री नीलक्रांती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आमच्या मच्छिमार बांधवांना कर्ज मिळेल, अनुदान मिळेल, सवलती मिळतील. त्यांना खोल समुद्रात मासेमारी करता यावी, यासाठी यांत्रीक नौका दिल्या जातील. आज या योजनेचाही शुभारंभ झाला आहे. आणि काही मच्छिमार बांधवांना त्यासाठीचे धनादेश देण्याची संधी मला लाभली आहे.
रामेश्वरमची भूमी प्रभु रामचंद्रांशी जोडलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांशी जोडल्या गेलेल्या या ठिकाणापासून प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीपर्यंत जाणाऱ्या श्रद्धा सेतू नावाच्या रेल्वे गाडीचे लोकार्पण करायची संधी मला मिळते आहे, त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. त्याचप्रमाणे धनुष्कोडीला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी, सागरी मार्गाने पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांसाठीचा मार्गही पूर्ण करण्यात आला आहे आणि तो ही देशवासियांना समर्पित करण्याची संधी मला मिळते आहे. रेल्वे गाडीचे देशार्पण आणि रस्त्याचेही लोकार्पण. ही रामेश्वरमची भूमी आहे, जेथे स्वामी विवेकानंदांनी परदेशात भारताचे नाव उज्ज्वल केल्यानंतर पहिले पाऊल टाकले होते. त्या स्वामी विवेकानंदांचे येथे कन्याकुमारीजवळ स्मारक तयार करण्यात आले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने, काही खाजगी संस्थांनी रामेश्वरमला हरीत करण्याचा संकल्प केला आहे. रामेश्वरमच्या भविष्यासाठी उत्तम काम करणाऱ्या असा सर्व संघटनांचे, विशेषत: विवेकानंद केंद्राचे मी मनापासून अभिनंदन करतो.
भारताला लाभलेला विशाल समुद्र आणि साडे सात हजार किलोमिटर लांबीचा समुद्र किनारा, हे असंख्य संधींचे आगार आहे. हेच लक्षात घेऊन केंद्र सरकारने सागरमाला कार्यक्रम हाती घेतला आहे. भारताच्या दीर्घ समुद्र किनाऱ्याचा पुरेपूर लाभ घेत भारताच्या पुरवठा क्षेत्रात मोठा बदल घडविणे अपेक्षित आहे. सागरमाला कार्यक्रमातून आयात-निर्यात, तसेच व्यापारासाठीच्या पुरवठ्यावरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या कार्यक्रमामुळे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ज्याप्रकारे डीआरडीओने अब्दुल कलाम यांचे हे स्मारक उभारले आहे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्यासाठीही डीआरडीओ अनेक महत्वपूर्ण कामे करते, हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. नागरिकांसाठीही ते अशी अनेक लहान-मोठी कामे करतात. रामेश्वरम ते अयोध्या दरम्यान धावणारी श्रद्धा सेतू नावाची ही जी रेल्वेगाडी इथून सुरू होते आहे, तिचे कामही डीआरडीओनेच केले आहे. या रेल्वेगाडीतील सर्व शौचालये ही जैव शौचालये आहेत. स्वच्छता मोहिमेला हातभार लावण्याचे काम या श्रद्धा सेतू रेल्वे गाडीच्या माध्यमातूनही होणार आहे.
मित्रहो,
डॉक्टर कलाम यांनी आपल्या आयुष्यात युवकांना सर्वात जास्त प्रेरणा दिली. आजचे युवक स्वत:च्या हिमतीवर प्रगती करू इच्छितात. त्यांना इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे. या युवकांना आपली स्वप्ने पूर्ण करता यावीत, यासाठी केंद्र सरकारने स्टार्ट अप इंडिया तसेच स्टँड अप इंडियासारखे उपक्रम सुरू केले आहेत. युवकांमध्ये कौशल्य विकास साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जात आहेत. स्वत:चा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरूणांना बँकेत तारणासारख्या अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी केंद्र सरकार मुद्रा योजना राबवत आहे.
देशात आतापर्यंत मुद्रा योजनेंतर्गत ८ कोटी पेक्षा जास्त खातेधारकांना आपले आयुष्य मार्गी लावता यावे, यासाठी बँकेच्या तारणाशिवाय चार लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. यात तामिळनाडूतील १ कोटीपेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे, हे सांगताना मला आनंद होतो आहे. स्वयंरोजगाराबद्दल तमिळनाडूमधील युवक किती उत्सुक आणि सजग आहेत, हे या आकडेवारीवरून सहज लक्षात येते.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतही केंद्र सरकार आग्रही आहे. तामिळनाडूला वगळून नवा भारत घडविणे शक्य नाही. आणि म्हणूनच राज्यातील मुलभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहाय्य केले जाते आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारच्या ज्या योजना राबवल्या, ज्या योजनांचे सार्वजनिकरित्या स्वागत केले आणि आभार मानले, आणि त्यामुळे तामिळनाडूला जो लाभ मिळतो आहे, त्याबद्दल मी तामिळनाडू सरकारचे आभार मानतो. त्यांच्या या सहकार्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार मानतो.
स्मार्ट शहर अभियानात तमिळनाडूमधील दहा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात चेन्न्ई, कोईम्बतूर, मदुराई, तंजावर अशा मोठ्या शहरांचाही समावेश आहे. या शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे ९०० कोटी, खरे तर सुमारे १००० कोटी रूपये जारी केले आहेत.
अमृत मोहिमेतही तामिळनाडूतील ३३ शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारने तमिळनाडूसाठी चार हजार सातशे कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर केली आहे. या ३३ शहरांमध्ये वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता आणि उद्यानांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
रामेश्वरमलाही या योजनेचा मोठा लाभ मिळेल, त्याचबरोबर योजनेतील मदुराई, तूतूकोरीन, तिरूनलवेली आणि नागरकोईल अशा योजनेतील सर्व ३३ शहरांना या योजनेचा लाभ मिळेल. केंद्र सरकारने सुमारे चार हजार कोटी रूपये खर्चाच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारालाही मंजुरी दिली आहे. तामिळनाडूमधील ग्रामीण रस्त्यांसाठी स्वयं सहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी, गावातील तरूणांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत सुमारे १८ हजार कोटी रूपये तमिळनाडूसाठी जारी केले आहेत.
येथील सरकारलाही मी काही प्रयत्न करण्याचे आवाहन करतो. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत सध्या भरतातील शहरांमध्ये सध्या अटीतटीची शर्यत सुरू आहे. सर्वांत आधी आपले शहर शौचमुक्त जाहीर करण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत तामिळनाडू इतर राज्यांच्या तुलनेत मागे राहणार नाही आणि आघाडी घेईलच, असा विश्वास मला वाटतो.
अशाच प्रकारे येथील शहरांमधील आठ लाखाहून जास्त गरीब कुटुंबांना घराची आवश्यकता आहे, असे राज्य सरकारला वाटते. शहरांसाठीच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ही गरज भागवता येईल. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा, प्रक्रियेला वेग द्यावा आणि स्वीकृत घरे वेगाने बांधावी, अशी विनंती मी राज्य सरकारला करतो.
डॉक्टर अब्दुल कलाम आयुष्यात अखेरपर्यंत एका विकसित भारताचे स्वप्नं साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिला. हे ध्येय साध्य करण्यासाठी सव्वाशे देशवासियांना प्रेरणा देत राहिले. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत, अर्थात २०२२ सालापर्यंत नव भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने ही प्रेरणा आम्हाला मदत करेल.
2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारताच्या सुपुत्रांनी जी स्वप्ने पाहिली होती, ती पूर्ण करण्याचा आपला प्रत्येक प्रयत्न डॉक्टर कलामांसाठीही उत्तम श्रद्धांजली असेल. आणि आज मी रामेश्वरमच्या या धरतीवर आहे. रामेश्वरमचे नागरिक बरेच काही करू इच्छितात. रामायणात एक गोष्ट सांगितली आहे की येथील लहानशा खारीनेसुद्धा, या रामेश्वरममधल्या छोट्याशा खारीनेसुद्धा सेतू बनवताना श्री रामचंद्रांना मदत केली होती. ती खार रामेश्वरमची होती. म्हणूनच, एक लहानशी खारसुद्धा आपल्याला प्रेरणा देऊ शकते. त्या खारीकडून प्रेरणा घेऊन जर १२५ कोटी भारतीयांनी प्रत्येकी एक पाऊल पुढे टाकले तर भारत एका क्षणात १२५ पावले पुढे जाईल.
भारताचे हे दुसरे टोक आहे. रामेश्वरम्, येथे समुद्र सुरू होतो. आणि आपणा सर्वांच्या मनात अब्दुल कलामांप्रती किती आदर आहे आणि आपण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी किती मनापासून हातभार लावू इच्छिता, हे आज या ठिकाणी जमलेल्या विशाल समुहाकडे पाहून सहज लक्षात येते. मला अगदी सहज हे समजते आहे. या विशाल जनसागराला मी पुन्हा एकदा वंदन करतो. अब्दुल कलाम यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि स्वर्गीय अम्मांनाही आदरांजली अर्पण करतो.
आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.