भारताच्या या सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन झाले आहे, याचे सोपस्कार तर मी केले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे, आज या ठिकाणी जितके नागरिक उपस्थित आहेत, त्या सर्वांनी या बोगद्याचे उद्घाटन करावे आणि उद्घाटन करण्याची पध्दत मी सांगतो. तुम्ही सर्वांनी आपापले मोबाइल फोन बाहेर काढा आणि त्याचे फ्लॅश चालू करा आणि भारत माता की जय या घोषणेसह पाहा सर्व कॅमेरामन तुमचे फोटो काढत आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी आपले मोबाईल बाहेर काढा. प्रत्येकाने आपल्या मोबाईलचे फ्लॅश मारा. किती अद्भूत दृश्य आहे. माझ्या समोर हे अद्भूत दृश्य मी पाहात आहे आणि ख-या अर्थाने या बोगद्याचे उद्घाटन तुम्ही आपापल्या कॅमे-याने करून दाखवले आहे. संपूर्ण भारत हे सर्व पाहात आहे.
भारत माता की जय
भारत माता की जय
बंधु-भगिनींनो नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू आहे आणि मला मातेच्या चरणी येण्याची संधी प्राप्त झाली आहे. हे माझे भाग्य आहे. आताच नितीन गडकरी मला सांगत होते की जगातील जे मापदंड आहेत त्या मापदंडांनुसार या बोगद्याची निर्मिती झाली आहे. काही बाबतीत तर आपण जागतिक मापदंडांच्याही एक पाऊल कुठे कुठे पुढे आहोत. मी नितीन गडकरी यांना, त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. मात्र, बंधु-भगिनींनो हा केवळ एक लांब बोगदा नाही आहे तर हा जम्मू आणि श्रीनगर यांच्यातील अंतर कमी करणारा लांब बोगदा नाही आहे. हा लांब बोगदा जम्मू काश्मीरच्या विकासाची एक लांब उडी आहे, असे मला स्पष्ट दिसत आहे.
बंधु-भगिनींनो भारतात तर या बोगद्याची चर्चा होईलच. पण जगातील जितके पर्यावरणवादी आहेत. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांची जे चिंता करत असतात, त्यावर चर्चा करत असतात, त्यांच्यासाठी देखील या बोगद्याची निर्मिती एक फार मोठी बातमी आहे. एक फार मोठी आशा आहे. भारताच्या कोणत्या ना कोणत्या कोप-यात असा बोगदा तयार झाला असता तर पर्यावरणवाद्यांचे लक्ष त्या ठिकाणी जाण्याची शक्यता कमी होती. पण आम्ही हिमालयाच्या कुशीत हा बोगदा तयार करून हिमालयाच्या रक्षणाचे कार्य देखील केले आहे. आम्ही पर्यावरणाच्या रक्षणाचे काम केले आहे. जागतिक तापमानवाढीने हैराण झालेल्या जगाला भारताने संदेश दिला आहे की हिमालयाच्या उरावर हा बोगदा तयार करून हिमालयाचे नैसर्गिक संरक्षण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न भारत सरकारने यशस्वी केला आहे.
बंधु-भगिनींनो हा बोगदा हजारो कोटी रुपयांच्या खर्चाने तयार करण्यात आला आहे. पण आज मी अभिमानाने सांगेन की जरी या बोगद्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारचे पैसे खर्च झाले असले तरीही मला या गोष्टीचा आनंद आहे की, या बोगद्याच्या निर्मितीमध्ये भारत सरकारच्या पैशांबरोबरच जम्मू काश्मीरच्या तरुणांच्या घामाचा सुगंध दरवळत आहे. अडीच हजारांहून जास्त युवकांनी, जम्मू काश्मीरचे 90 टक्के जवान जम्मू काश्मीरचे आहेत, ज्यांनी कष्ट करून या बोगद्याची निर्मिती केली आहे. रोजगाराच्या किती संधी उपलब्ध झाल्या असतील याचा आपण अंदाज लावू शकतो.
बंधु-भगिनींनो जम्मू काश्मीरच्या ज्या तरुणांनी हे कातळ कापून बोगद्याची निर्मिती केली, एक हजार पेक्षा जास्त दिवस ते खडक फोडत राहिले आणि बोगद्याची निर्मिती करत राहिले. दगडांचे सामर्थ्य काय असते. एका बाजूला काही भरकटलेले तरुण दगडफेक करण्यात गुंतले आहेत तर दुस-या बाजूला त्याच काश्मीरमधले तरुण दगडांना फोडून काश्मीरचे भाग्य उज्वल करण्यामध्ये गुंतले आहेत.
बंधु-भगिनींनो, हा बोगदा काश्मीर खो-यातील पर्यटनाचा एक नवा इतिहास रचण्यामध्ये आपली ऐतिहासिक भूमिका निभावणार आहे. प्रवासी, पर्यटक गैरसोयींच्या वृत्तांनी त्रासून जातात. पटनी टॉपवर हिमवृष्टी झाली आहे. पाच दिवस रस्ते बंद असतील आणि पर्यटक अडकून पडले असतील तर पुन्हा ते पर्यटक येण्याची हिंमत करणार नाहीत. पण बंधु-भगिनींनो या बोगद्यामुळे काश्मीरच्या खो-यात देशाच्या कानाकोप-यातून ज्या लोकांना येण्याची इच्छा आहे, त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. ते थेट श्रीनगरला पोहोचू शकतात.
काश्मीर खो-यातील लोकांना मला सांगायचे आहे, हा बोगदा उधमपूर आणि रामबन यांच्यातील का असेना पण हा बोगदा म्हणजे काश्मीर खो-याची भाग्यरेषा आहे, हे कधीही विसरू नका. ही काश्मीर खो-याची भाग्यरेषा यासाठी आहे कारण काश्मीर खो-यातील माझा शेतकरी बांधव नैसर्गिक आपत्तींना तोंड देत दिवसरात्र घाम गाळत असतो. शेतात काम करत असतो, बगीच्यात काम करत असतो. अशा वेळी गरजेनुसार पाऊस झालेला असेल, हवामान जसे हवे तसे असेल, पीक चांगले आलेले असेल, दिल्लीच्या बाजारात त्याची विक्री करायला निघायचे असेल,त्याच वेळी जर पाच दिवस रस्ते बंद झाले तर त्या शेतक-याची निम्म्याहून अधिक फळे खराब होतात. दिल्लीला पोहोचेपर्यंत पूर्ण कष्टाची कमाई पाण्यात जाते. काश्मीर खो-यातील शेतक-यांसाठी हा बोगदा वरदानकारक ठरणार आहे. जेव्हा ते आपले पीक, आपली फळे, आपली फुले, आपल्या भाज्या निर्धारित काळात दिल्लीच्या बाजारात अतिशय सहजपणे पोहोचवू शकतील तेव्हा त्यांच्या कृषी खर्चामध्ये जे नुकसान होत होते ते आता होणार नाही. हा फायदा काश्मीर खो-याला मिळणार आहे.
बंधु-भगिनींनो, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या उरात एक स्वप्न असते. कधी ना कधी तरी काश्मीर पाहायचे आहे. त्याला या द-याखो-यांमध्ये पर्यटक बनून यायचे असते आणि ज्या पायाभूत सुविधांचे काम आम्ही हाती घेतले आहे, त्यामुळे भारताच्या कानाकोप-यातून पर्यटकांना येण्यासाठी सुविधा वाढणार आहेत. पर्यटनाची पूर्ण हमी मिळणार आहे आणि जितक्या जास्त प्रमाणात येथील पर्यटनात वाढ होईल, तशी जम्मू-काश्मीरची आर्थिक स्थिती संपूर्ण भारतात इतरांना मागे टाकत पुढे निघून जाईल, असा मला विश्वास आहे.
बंधु-भगिनींनो, मी या खो-यातील तरुणांना सांगेन की तुमच्या समोर दोन मार्ग आहेत जे तुमच्या नशिबाला कोणत्या दिशेला नेतील? एका बाजूला आहे “टूरिजम “ आणि दुस-या बाजूला आहे “टेररिजम” . 40 वर्ष उलटून गेली आहेत आणि या काळात अनेक निरपराधांचे बळी गेले. कोणाचाच फायदा झाला नाही मात्र, रक्तबंबाळ झाले ते माझे आपले काश्मीरचे खोरे. जर कोणी आपला पुत्र गमावला असेल तर तो माझ्या काश्मीरच्या मातेचा पुत्र आपण गमावला आहे. कोणी आपण भारताचा पुत्र गमावला आहे.
बंधु-भगिनींनो, हा रक्तरंजित खेळ 40 वर्षांनंतरही कोणाचेही भले करू शकलेला नाही. पण याच 40 वर्षात जर टूरिजमवर(पर्यटनावर) भर दिला असता तर आज संपूर्ण जग काश्मीर खो-याच्या पायाशी येऊन बसले असते, काश्मीर खो-यामध्ये ही क्षमता आहे आणि म्हणूनच आपण टूरिजमची ताकद ओळखली पाहिजे. पर्यटनाला बळ देण्यासाठी जी काही व्यवस्था उभी करायची आहे, दिल्लीत केंद्र सरकार काश्मीरच्या सोबत आहे, जम्मू काश्मीरच्या सोबत आहे. प्रवासाला चालना देण्यासाठी तुमच्या सोबत उभे आहे.
मेहबुबाजींचे मी विशेषत्वाने अभिनंदन करत आहे, मी त्यांना शुभेच्छा देत आहे, त्यांची प्रशंसा करत आहे. गेल्या वर्षी भारत सरकारने जम्मू काश्मीरसाठी जे 80 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले, मला अतिशय आनंद होत आहे की इतक्या कमी काळात त्यापैकी अर्ध्याहून अधिक अंदाजपत्रकीय खर्च, पॅकेजचा खर्च प्रत्यक्ष जमिनीवर कार्यरत झाला आहे. ही बाब सामान्य नाही. नाहीतर पॅकेज फक्त कागदावरच राहतात. त्यांना जमिनीवर उतरण्यासाठी वर्षे उलटून जातात. पण मेहबुबाजी आणि त्यांच्या सरकारने प्रत्येक बारकाव्यावर भर देत प्रत्येक गोष्ट जमिनीवर प्रत्यक्षात आणण्यासाठी अतिशय कष्ट केले आहेत आणि त्याची फळे दिसत आहेत. मी यासाठी जम्मू काश्मीरचे सरकार, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देत आहे.
बंधु-भगिनींनो, आज भारतात दरडोई उत्पन्न जर जलदगतीने वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त राज्य कोणते असेल तर त्या राज्याचे नाव आहे जम्मू काश्मीर. मला याच्या सामर्थ्याची पुरेपूर जाणीव आहे. अनेक वर्षांपासून या खो-यामध्ये पक्षाच्या कामासाठी ये-जा करण्याची संधी मला मिळाली आहे. येथील दिलदार लोकांना मी ओळखतो. येथील सूफी परंपरेच्या संस्कृतीची मला माहिती आहे.
बंधु-भगिनींनो, या अनमोल वारशाला जर आपण विसरलो तर आपले वर्तमान आपण गमावून बसू आणि आपण आपल्या भवितव्याला अंधकाराच्या खाईत लोटून देऊ. ही भूमी हजारो वर्षांपासून संपूर्ण भारताला मार्गदर्शन करू शकेल अशा महान वारशाची भूमी आहे. या वारशासोबत स्वतःला जोडून घ्या, त्या वारशाचा सन्मान करा आणि परिश्रमांनी आपण आपले भविष्य घडवण्यासाठी सरकारच्या बरोबरीने वाटचाल करा, मग पाहता पाहता जम्मू काश्मीरचे जीवन बदलून जाईल.
बंधु-भगिनींनो, ज्या ज्या वेळी जम्मू काश्मीरचा विषय निघतो, प्रत्येक काश्मीरी व्यक्तीच्या हृदयात, प्रत्येक जम्मूवासीच्या हृदयात प्रत्येक लडाखवासी व्यक्तीच्या हृदयात अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव नेहमीच आठवते. काश्मिरीयत, इन्सानियत, जम्हुरियत या मूलमंत्राला घेऊन, जो मूलमंत्र अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला आहे, त्याच मूलमंत्राला घेऊन आम्ही काश्मीरला विकासाच्या नव्या उंचीवर, सद्भावनेच्या वातावरणाला, बंधुभावाच्या वातावरणाला, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय भक्कमपणे, दृढ संकल्पाने, एकामागून एक पावले उचलत पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहोत. कोणताही अडथळा आम्हाला अडवू शकणार नाही आणि जे सीमेवर बसले आहेत ते स्वतःलाच सांभाळू शकत नाही आहेत.
बंधु-भगिनींनो, सीमेपलीकडच्या काश्मीरमधील भागातील नागरिकांची देखील प्रगती करून दाखवण्याची आणि काश्मीर कशा प्रकारे विकसित होत आहे ते दाखवून देण्याची आमची इच्छा आहे आणि जे लोक तुमच्यावर ताबा मिळवून बसले आहेत, त्यांनी तुम्हाला किती उद्ध्वस्त केले आहे ते आम्ही दाखवून देणार आहोत. विकास हाच आमचा मंत्र आहे विकासाचा मंत्र जपत वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे. लोकसहभाग आमचा मार्ग आहे. याच मार्गावर आम्हाला वाटचाल करायची आहे. तरुण पिढीला घेऊन पुढील भविष्य घडवायचे आहे.
बंधु-भगिनींनो, आता एक बोगदा जर काश्मीरची भाग्यरेखा बनत असेल, खो-यातील शेतक-यांचे जीवन बदलत असेल, खो-यामध्ये पर्यटनाला चालना देत असेल तर भविष्यात अशा प्रकारचे नऊ बोगदे बनवण्याची योजना आहे. नऊ.... संपूर्ण भारताशी याची अशी जोडणी होईल आणि हे केवळ रस्त्यांचे जाळे नसेल तर एकमेकांच्या हृदयांना जोडणारे जाळे बनेल, असा मला विश्वास आहे.
बंधु-भगिनींनो, विकासाच्या या प्रवासाला आपण पुढे नेऊ या. जम्मू काश्मीरच्या तरुणांनो या भागाचे नशीब बदलून टाकण्यासाठी भारत सरकारच्या रोजगाराच्या योजनांचा लाभ घ्या. शिक्षणाची जी नवीन क्षेत्रे या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घ्या. विकासाची नवी शिखरे सर करा आणि माझ्या जम्मूच्या बांधवा, या जम्मू क्षेत्राचा विकासही जलदगतीने होत आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेचा विषय असो, हृदय योजना असो, अमृत योजना असो, शिक्षणाच्या क्षेत्राचा विषय असो, पायाभूत सुविधा तयार करायच्या असोत, येथील तलावाची पुनर्रचना असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते लडाख असो, खोरे असो वा जम्मू असो. एक संतुलित विकास झाला पाहिजे आणि त्याचा फायदा संपूर्ण जम्मू काश्मीरच्या भावी पिढीला मिळत राहिला पाहिजे, याची तयारी करत राहा. जम्मू काश्मीरला पुढे नेत राहा. या स्वप्नांना घेऊन वाटचाल करत पुढे जायचे आहे.
मी पुन्हा एकदा नितीनजींचे, त्यांच्या टीमचे, डॉक्टर जितेंद्र सिंह यांचे, जम्मू काश्मीरच्या सरकारचे, खूप खूप अभिनंदन करत आहे. खूप खूप धन्यवाद.