नमस्कार
जय मां अन्नपूर्णा
जय-जय मां अन्नपूर्णा
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भुपेंद्र भाई पटेल आणि संसदेतील माझे सहकारी तसेच गुजरात भाजपाचे अध्यक्ष श्री सी. आर. पाटील, अन्नपूर्णा धाम विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष, संसदेतील माझे सहकारी नरहरी अमीन, इतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजातील मान्यवर नागरिक, बंधू आणि भगिनींनो,
माता अन्नपूर्णेच्या या पवित्र स्थळी श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारीशी संबंधित मोठमोठ्या कार्यात सहभागी होण्याची संधी मला नेहमीच मिळत असते. मग मंदिराचे भूमिपूजन असो, मंदिराची प्राणप्रतिष्ठा असो, वसतिगृहाचे भूमिपूजन झाले आणि आता त्याचे उदघाटनही होत आहे. मातेच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळी मला काही ना काही कारणाने आपल्यात राहण्याची संधी मिळली आहे. आज अडलज इथे श्री अन्नपूर्णा धाम विश्वस्त संस्थेचे मुलांचे वसतिगृह आणि शिक्षण संकुलाच्या उदघाटनासोबतच लोक सहाय्यक ट्रस्ट, हिरामणि आरोग्य धामाचे भूमिपूजनही होत आहे. शिक्षण, पोषण आणि आरोग्य क्षेत्रात समाजासाठी कार्य करण्याची गुजरातची वृत्ती आहे. ज्याची जेवढी ताकद आहे, तेवढे सामाजिक कार्य प्रत्येकच समाजाचे लोक करतच असतात. आणि त्यात पाटीदार समाज देखील मागे राहत नाही. आपण सगळ्यांनी सेवेच्या या यज्ञात माता अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने अधिक सामर्थ्य मिळावे,आणि अधिक समर्पित व्हावे आणि सेवेचे नवनवे सोपान आपण गाठावेत. असा आशीर्वाद आपल्याला माता अन्नपूर्णा देवीने द्यावा. माझ्याकडून आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !
मित्रांनो, समृद्धी आणि धन धान्याची देवी माता अन्नपूर्णेच्या प्रती आपली अगाध श्रद्धा आहे. पाटीदार समाज तर भूमातेशी थेट जोडले गेले आहेत. अन्नपूर्णा मातेप्रती या अगाध श्रद्धेमुळेच काही महिन्यांपूर्वी देवी अन्नपूर्णेची मूर्ती आम्ही कॅनडाहून काशीला परत आणली आहे. मातेची ही मूर्ती, दशकांपूर्वी काशी इथून चोरून परदेशात पोचवली गेली होती. आपल्या संस्कृतीची अशी डझनभर प्रतीके गेल्या सात आठ वर्षात परदेशातून परत आणली आहेत.
मित्रांनो, आमच्या संस्कृतीत, आपल्या परंपरेत भोजन, आरोग्य आणि शिक्षणावर नेहमीच खूप भर देण्यात आला आहे. आज आपण त्याच तत्वांचा माता अन्नपूर्णा धामात विस्तार केला आहे. ह्या ज्या नव्या सुविधा विकसित झाल्या आहेत, इथे जे आरोग्य धाम विकसित केले जाणार आहे, त्याचा गुजरातच्या सर्वसामान्य लोकांना खूप लाभ होणार आहे. विशेषतः एकाच वेळी अनेक लोकांना डायलिसिसकरणे शक्य होणार आहे आणि 24 तास रक्तपुरवठयाच्या सुविधेमुळे अनेक रुग्णांची मोठी सेवा होणार आहे. केंद्र सरकारने जिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिसची जी सुविधा सुरु केली आहे. त्या अभियानाला आपले हे प्रयत्न अधिक बळ देणार आहेत. या सगळ्या मानवी प्रयत्नांसाठी, सेवाभावासाठी आणि समर्पण भावासाठी आपल्या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे!
मी जेव्हा गुजरातच्या लोकांपाशी येतो, तेव्हा मला असे वाटते की थोडा संवाद गुजराती भाषेतही करावा. कित्येक वर्षांपासून मी आपल्यामध्ये आहे. एकप्रकारे सांगायचे तर माझे शिक्षण-दीक्षा सगळी आपणच केली आहे. आणि आपण जे संस्कार दिले आहेत, जे शिक्षण दिले आहे, ते ग्रहण करुन आज देशाने जी जबाबदारी दिली आहे, तीच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत असतो. या जबाबदारीमुळेच, नरहरी यांनी खूप आग्रह केला असूनही मी आज प्रत्यक्ष तिथे येऊ शकलो नाही. जर प्रत्यक्ष येऊ शकलो असतो,तर मला सगळ्या जुन्या ज्येष्ठाशी, मान्यवरांशी भेटण्याची संधी मिळाली असती. सर्वांना भेटून आनंद झाला असता. मात्र,तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मी अजिबात सोडू शकलो नसतो. म्हणूनच आपल्या सगळ्यांचे दर्शन मी करु शकतो आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करु शकतो.
आपल्या नरहरी भाईंची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ते माझे खूप जुने मित्र आहेत. नरहरी भाईंचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे जे सार्वजनिक जीवन आहे, ते आंदोलनातून सुरु झाले आहे. ते नवनिर्माण आंदोलनातून जन्मले आहेत. आंदोलनातून जन्माला आलेला हा जीव पुढे विधायक कार्यात मिसळून जावा ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची बाब आहे. आणि नरहरी भाई आंदोलनातून निघालेले जीव आहेत. राजकारणात राहून देखील याच प्रकारची विधायक कार्ये करतात आणि मला माहीत आहे. की त्याचे खूप महत्त्व आहे. घनश्याम भाई देखील सहकारी चळवळीत पूर्ण समर्पित वृत्तीने काम करत आहेत. एकप्रकारे सांगायचे तर कुटुंबांचे पूर्ण संस्कारच आहेत ज्यामुळे ते सतत चांगली, विधायक कामे करत असतात. आणि यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला देखील, शुभेच्छा. आता तर नरहरी भाई एक नवी पिढी तयार करत आहेत, त्यासाठी त्यांनाही माझ्या शुभेच्छा !
आपले मुख्यमंत्री कठोर आणि मृदू आहेत. गुजरातला एक असे नेतृत्व मिळाले आहे, ज्यांची आधुनिक विचारसरणी आणि पायाभूत कार्याप्रति जबाबदारीची भावना गुजरातला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे. खरोखरच आपल्या राज्याला त्यांच्या रूपाने एक मोठे नेतृत्व मिळाले आहे. आणि आज ते इथे जे जे काही बोलले आहेत, आणि आज माझा असा अंदाज सर्व लोक आणि विशेषतः नारायण संप्रदायाच्या भावंडांना मी आग्रह करेन की आपल्याकडे जिथे जिथे आपले हरी भक्त अहेग, तिथे तिथे नैसर्गिक शेती सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या भूमातेचे संरक्षण करण्यासाठी जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न आपण करावेत. आपण बघा, तीन चार वर्षात आपल्याला त्याची अशी फळे मिळतील, भूमातेची ताकद एवढी वाढली असेल, की आपण सगळे तिच्या पोषणाने सुदृढ होऊ, सशक्त होऊ.आणि यासाठी आपण नक्कीच काम केले पाहिजे.
गुजरात देशाच्या विकासासाठी आहे. मला आठवतं मी जेव्हा काम करत असे, तेव्हा आमचा एक मंत्र होता की 'भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास'.आपण गुजरातच्या विकासात असे मोठमोठे मापदंड स्थापन करूया. गुजरातची जी समृद्ध परंपरा आहे, त्या समृद्ध परंपरेला भुपेंद्र भाईं यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळयांना पुढे न्यायचे आहे. मला काही दिवसांपूर्वी कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला होता, ज्यात भुपेंद्र भाई कशाप्रकारे माता अंबेचा कायापालट, जीर्णोद्धार करत आहेत. कारण अंबाजींविषयी माझ्या मनात विशेष भावना आहेत, त्यामुळे मला अधिकच आनंद झाला. आणि त्यांनी ज्याप्रकारे गब्बरचा, ज्याप्रकारे त्यांनी नवा अवतार धारण केला आहे, भूपेंद्र भाई, आपल्या योजना साकार करत आहेत. आणि ज्या प्रकारे, आई अंबेच्या स्थानाचा विकास होत आहे, ज्या प्रकारे स्टॅच्यु ऑफ युनिटी द्वारे सरदार साहेबांना गुजरातने इतकी भव्य श्रद्धांजली दिली आहे. ते संपूर्ण जगात सरदार साहेबांचं नाव आज सर्वात उंच आहे आणि स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील झालं आहे. आणि याचप्रकारे, मला विश्वास आहे, की अंबाजी इथे जेव्हा मी होतो, तेव्हा 51 शक्तीपीठांची संकल्पान मांडली होती. जर अंबाजीला कुणी आलं, तर त्याच्या मूळ स्वरूपात आणि त्याची मूळ रचना, कुणीही भक्त येत असतो, तर त्यांना 51 शक्तिपीठांचे दर्शन करण्याची संधी प्राप्त व्हायला हवी. आज भूपेंद्र भाई ते कार्य पुढे नेत आहेत. पूर्ण मान सन्मानानं लोकार्पण केलं आणि त्याच प्रकारे गब्बर, जिथे फार कमी लोक गब्बर इथे जात असत. आज गब्बरला देखील आई अंबेच्या स्थानाइतकंच महत्व देऊन आणि स्वतः तिथे जाऊन ज्या प्रकारे आई गब्बरकडे आपले लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे उत्तर गुजरातमध्ये पर्यटन वाढलं आहे. आत्ताच मी बघितलं की नडा बेट इथं ज्या प्रकारे हिंदुस्तानच्या शेवटच्या गावाचा प्रयोग केला जात आहे.
भूपेंद्र भाईंच्या नेतृत्वात संपूर्ण उत्तर गुजरातमध्ये पर्यटनाच्या संधी कितीतरी पटींनी वाढल्या आहेत आणि आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे की जेव्हा अशा ठिकाणांचा विकास होत असतो, तेव्हा आपण स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे आणि आरोग्याचे काम हाती घेतली आहे, तेव्हा स्वच्छता तर त्याच्या पाया असते. त्याच्या मुळात पोषण होत आहे आणि आई अन्नपूर्णा जिथे विराजमान असते, तिथे आपल्या गुजरातमध्ये कुपोषण कसं होऊ शकतं आणि कुपोषणात पोषणाच्या अभावापेक्षा जास्त पोषणाविषयी अज्ञान याचे कारण असते आणि याच अज्ञानामुळे आपल्याला समजत नाही की शरीराच्या कुठल्या भागाला कुठल्या गोष्टीची गरज आहे, काय खायला हवं, कुठल्या वयात खायला पाहिजे? बाळांना आईच्या दुधाने जी शक्ती मिळत असते आणि अज्ञानामुळे जर आपण त्यापासून वंचित राहिलो, तर त्या बाळाला आपण कधीच सदृढ बनवू शकणार नसू, तर त्या आधारभूत विषयी जेव्हा आपण आई अन्नपूर्णेच्या सान्निध्यात बसलेले असू, तेव्हा आपल्याला ते आठवतील आणि मला विश्वास आहे की हा टायमिंग हॉल 600 लोकांना जेवण तर देईलच, सोबतच मी नरहरीजी यांना एक नवे कार्य सोपवत आहे की इथे एक व्हिडिओ लावा, आपल्या जेवणाच्या हॉलमध्ये जिथे जेवताना सर्व लोक पडद्यावर व्हिडिओ बघत राहतील, ज्या व्हिडिओत केवळ हेच दाखवले जाईल की काय खायला हवे, आणि काय खायला नको. खाण्याने शरीराला फायदा होईल का, कुठले तत्व शरीराला हवे आहेत, त्या विषयी माहिती व्हिडिओत दिलेली असावी, जेणेकरून खाताना त्यांना आठवेल की आईच्या प्रसादासोबत मला हे ज्ञान सोबत घेऊन जायचे आहे आणि घरी जाऊन त्याची अंमलबजावणी करायची आहे. आजकाल तर असे जाणकार लोक मोठ्या संख्येत आहेत.
आपला हा नव्या प्रकारचा जेवणाचा हॉल प्रसिद्ध होईल. आणि हे मिडीयावाले जेव्हा आपला हा व्हिडिओ येईल, तेव्हा आपला जेवणाचा हॉल बघायला येतील आणि मला विश्वास आहे की मी आजपर्यंत नरहरी भाईंना जितके सल्ले दिले आहेत. त्यांनी आज पर्यंत एकही सल्ल्याचा अनादर केलेला नाही, म्हणूनच हा सल्ला देखील ते जरूर लक्षात घेतील आणि आपल्याकडे तर शास्त्रांत एक चांगली गोष्ट सांगितली आहे, आणि बघा आपल्या पूर्वजांनी किती चांगले काम केले आहे. त्यांत म्हटले आहे-
देयं वैशजम आर्तस्य, परिश्रांतस्य च आसनम्। तृषि तश्याश्च पानी य:, सुधि तश्याश्च भोजनम्।
याचा अर्थ हा आहे की आजारी माणसाला औषधे, थकलेल्या माणसाला आसन, तहानलेल्या व्यक्तीला पाणी आणि भुकेल्याला भोजन द्यायला हवे. हे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. अन्नपूर्णाच्या सान्निध्यात ज्या कामाचा प्रस्ताव दिला होता ते आरंभ होत आहे आणि माझ्यासाठी ही गौरवाची बाब आहे. तुम्ही आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझा हा प्रस्ताव निर्धाराने पूर्णत्वाला नेला. यामुळे, आज उत्साह आणखी वाढला आहे आणि आणखी दोन नवीन कामे सांगायची इच्छा देखील होते. भोजन, आरोग्याची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच पोषण अभियान आपण देशभरात राबवायला सुरुवात केली आहे. मी आजही सांगतो की भोजनाच्या अभावामुळे कुपोषणाची समस्या निर्माण होते असे नाही. भोजनाबाबत अज्ञानामुळे कुपोषण होण्याची समस्या अधिक बळावते.
आज तुम्हाला माहीतच आहे की गेल्या तीन वर्षांत, दोन अडीच वर्षांत जेव्हापासून हा कोरोना आला आहे, तेव्हापासून गुजरातमध्ये गरीब लोक उपाशीपोटी राहू नयेत, गरीबांच्या घरी संध्याकाळी चूल पेटणार नाही अशी स्थिती आम्ही येऊ दिली नाही आणि संपूर्ण जगाला आश्चर्य वाटत आहे की कशाप्रकारे दोन अडीच वर्षांत 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. जगाला या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. संपूर्ण जगात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, कोणाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत, जिथून आपल्याला पेट्रोल मिळत आहे, तेल मिळत आहे, खत मिळत आहे, ते सर्व दरवाजे बंद झाले आहेत युद्धाची अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळेजण आपलं स्वतःचं सांभाळून बसले आहेत. अशावेळी एक नवीन संकट जगासमोर आले आ , अन्नधान्याचा साठा कमी होत आहे. काल मी जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा करत होतो, तेव्हा मी त्यांनी सांगितलं की आम्हाला जर जागतिक व्यापार संघटनेने परवानगी दिली तर थोडी मदत करू. भारतात थोडाफार अन्नधान्याचा साठा आहे, त्यातून थोडेफार बाहेर पाठवू शकत असू तर आम्ही ते उद्याच पाठवण्यासाठी तयार आहोत. आम्ही भारतात तर सर्वांना अन्नधान्य देत आहोतच. आमच्या अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने आपल्या देशातल्या शेतकऱ्यांनी, जणू काही त्यांना आधीच जगाची चिंता होती, आधीच तयारी केली आहे. मात्र आता ते जगाच्या कायदे-नियमांमध्ये बसणे आवश्यक आहे. म्हणूनच माहित नाही केंव्हा जागतिक व्यापार संघटना यात सुधारणा करेल.
तुम्ही बघा, आरोग्याच्या बाबतीत गुजरातची ताकद किती आहे. संपूर्ण जगात ज्या पद्धतीने आपण कोरोना विरोधात लसीकरण अभियान चालवले आणि मी भूपेंद्रभाई यांचे यासाठी अभिनंदन देखील करू इच्छितो की गुजरातमध्ये लसीकरणाचे काम अतिशय वेगाने झाले आहे. अतिशय उत्तम पद्धतीने झाले आहे आणि याचमुळे गुजरातला वाचवण्यात यश मिळाले आहे. एवढे मोठे काम करण्यासाठी देखील भूपेंद्रभाई आणि त्यांचे सरकार अभिनंदनासाठी पात्र आहेत. आता तर मुलांसाठी देखील आम्ही लसीकरणसाठी सूट दिली आहे आणि आपल्या पाटीदार बंधूंना अनेकदा परदेशात जावं लागतं, हिरे व्यापाऱ्यांना जावे लागते, गुजरातच्या लोकांना व्यापार उद्योगासाठी जावं लागतं. अशा वेळी जर कोणी बाहेर जात असेल, त्यांना जर कोणी विचारत असेल की तुम्ही प्रिकॉशन मात्र घेतली आहे की नाही, तर आता आम्ही अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे की आता कुठल्याही रुग्णालयात जाऊन तुम्ही ही मात्रा घेऊ शकता आणि परदेशी जाऊ शकता. चिंता करण्याची काहीही गरज नाही. म्हणूनच ज्या काही आवश्यकता आहे त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत आणि आता वेळ आली आहे की या क्षेत्रात, मी समाजातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांना कौशल्य विकासासाठी किती प्राधान्य देतो आणि कौशल्य विकास देखील जुन्या काळातला नाही. आताच्या काळात सायकल दुरुस्तीचा कौशल्य विकास होत नाही.
आता जग बदलले आहे. आता उद्योग 4.0 चे युग आहे, तेव्हा कौशल्य विकास देखील उद्योग 4.0 नुसार व्हायला हवा. आता गुजरातला उद्योग 4.0 च्या अनुषंगाने कौशल्य विकासासाठी मोठी झेप घ्यायची आहे आणि याकामी गुजरातने देशाचे नेतृत्व केले पाहिजे. गुजरातमधील उद्योग जगतातील आघाडीचे उद्योजक आहेत, जे व्यावसायिक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांचा गुजरातवर प्रभाव आहे आणि गुजरातने तर भूतकाळात अशी कामगिरी करून दाखवली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आपल्या पूर्वजांनी गुजरातमध्ये एक फार्मसी महाविद्यालय सुरु केले होते. त्याला आता 50-60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याकाळी नगर सेठ आणि महाजनच्या लोकांनी भारतात सर्वप्रथम फार्मसी महाविद्यालय सुरु केले होते, त्याचा परिणाम असा झाला की आज औषध निर्मितीत जगात गुजरातचा दबदबा आहे. गुजरातमधील औषध निर्माण कंपन्यांची नावे जगभरात प्रसिद्ध झाली आहेत आणि गरीबांना स्वस्त दरात औषधे मिळावीत अशी चिंता आपले लोक करू लागले. 50-60 वर्षांपूर्वी एक फार्मसी महाविद्यालय उभे राहिले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जे वातावरण आणि परिसंस्था निर्माण झाल्या, त्यामुळे आज फार्मसी उद्योगाने गुजरातला समृद्ध बनवले आहे.
अशा प्रकारे उद्योग 4.0, आधुनिक आणि कृत्रिम बुध्दिमत्तेबरोबरच तंत्रज्ञान शिकलेले आपले युवक कौशल्य विकासात देखील तयार होतील. मला पूर्ण विश्वास आहे की यांचे नेतृत्व देखील आपण करू शकतो आणि गुजरातमध्ये ते सामर्थ्य आहे की ते ही सर्व कामं अगदी सहजपणे करू शकतील. या दिशेनं आपण जितके पुढे जाऊ, तेवढा लाभ होईल. आज जेव्हा आरोग्याची चर्चा सुरू आहे, आपल्याला माहीतच आहे की जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या समोर मोठ्या समस्या होत्या, मूत्रपिंडाचे रुग्ण वाढत होते, डायलिसिस करावे लागत होते आणि सकाळी घरातून बाहेर पडायचे, दोनशे अडीचशे रुपये प्रवासी भाड्यात खर्च करायचे, मोठ्या रुग्णालयात जायचे, ज्यांना आठवड्यात डायलिसिस करायचं असायचे, त्यांना दोन महिन्यातून एकदा संधी मिळायची. या सर्व परिस्थितीमुळे अतिशय चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या अपुऱ्या संसाधनांमुळे आम्ही एक अभियान सुरू केलं की भारतात डायलिसिस सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्या देखील मोफत उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून ज्याना डायलिसिसची आवश्यकता आहे त्यांना डायलिसिस सेवा उपलब्ध होईल आणि आज आपण या दिशेने यशस्वीपणे पुढे जात आहोत आणि अशा रुग्णांना त्याची मदत मिळत आहे. आपण खूपच महत्त्वाचं काम केलं आहे, मात्र त्याची चर्चा खूप कमी प्रमाणात होते.
वृत्तपत्रांमध्ये मला फार काही आढळले नाही, कारण त्यांना अन्य कामांमधून कुठे वेळ मिळतो, मात्र आपण एक अतिशय महत्वाचे काम केले आहे. या देशातील मध्यम आणि गरीब वर्गाला आपण सर्वाधिक लाभ दिले आहेत. जसे जन औषधी केंद्र आहे, जर एखाद्या घरात कुणा ज्येष्ठ व्यक्तीला मधुमेह झाला तर त्या कुटुंबाला हजार- दोन हजार रुपये खर्च येतो. जर मध्यम वर्गातील व्यक्तीवर औषधांच्या खर्चाचा भार पडला तर तो आर्थिक अडचणीत येतो की आता हे सगळे कसे करायचे. मात्र आता चिंता नाही. आम्ही जन औषधी अंतर्गत औषधांच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली नाही. मात्र तरीही जी औषधे 100 रुपयांमध्ये मिळतात, तीच औषधे जन औषधी केंद्रांवर 10-12 किंवा 15 रुपयांमध्ये मिळतात. आपण जेवढा जन औषधी केंद्राचा प्रचार करू आणि आपला मध्यमवर्गीय माणूस जनऔषधी केंद्रातून औषधे खरेदी करू लागेल, तेव्हा त्याची मोठी बचत होईल. गरीबांना मदत होईल. अनेकदा असे होते की गरीब लोक औषधे खरेदी करत नाहीत, त्यामुळे त्यांचा आजार आणखी बळावतो. ते बिल भरू शकत नाहीत. जन औषधीमुळे सर्वसाधारण माणूस औषधे खरेदी करू शकेल, आपले उपचार करू शकेल, याची आम्ही काळजी घेत आहोत.
स्वच्छता अभियान असेल, डायलिसिस व्यवस्था असेल, पोषण अभियान असेल किंवा मग जनऔषधी द्वारे परवडणारी औषधे पुरवणे असेल, आम्हाला चिंता वाटत आली आहे. आता तर आम्ही ह्रदय रोग असेल तर स्टेंटचा खर्च कमी करण्यासाठी अभियान राबवत आहोंत. गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी अभियान चालवत आहोत. अशी अनेक कामे आहेत जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्रास होणार नाही. सर्वात मोठे काम केले आहे, आयुष्मान भारत योजना. आयुष्मान भारत योजनेद्वारे, भारतातील सामान्य लोकांना दरवर्षी त्यांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च सरकार देत आहे. मी पाहिले आहे की अनेक, ज्यात विशेषतः आपल्या मातांना एखादा गंभीर आजार झाला असेल तर आधी आपल्या मुलांना सांगत नव्हत्या कारण मुलाना दुःख होईल. म्हणून त्या वेदना सहन करायच्या.
जेव्हा परिस्थिती बिघडायची आणि ऑपरेशन करायची वेळ यायची तेव्हा आई म्हणायची तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार नको, मला तसेही कुठे फार जगायचे आहे आणि आयुष्यभर वेदना सहन करायची. अशा वेळी आईची कुणाला काळजी वाटेल. जिथे माता आंबेचे धाम आहे, कालीमातेचे धाम आहे, जिथे माता खोड़ियार आहे, माता उमियाचे वास्तव्य आहे, जिथे माता अन्नपूर्णा आहे, तिथे कोण आईची चिंता करेल, आणि आम्ही ठरवले की प्रधानमंत्री जन आरोग्यच्या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत उपचार उत्तम रुग्णालयात करण्याची जबाबदारी सरकार उचलेल. मग त्यांचे ऑपरेशन करणे असेल, त्यांचा मूत्रपिंडाचा आजार असेल, सगळं खर्च उचलेल.
एवढेच नाही, अहमदाबाद मधील असेल आणि तो मुंबईत आजारी पडला तरी त्याच्या उपचारांची जबाबदारी सरकारची असेल. त्यांना ऑपरेशान करून घ्यायचे असेल, आकस्मिक उपचार असतील, एवढेच नाही, अहमदाबादला राहणारी व्यक्ती मुंबईत गेली तरी त्याला लाभ मिळेल. हैदराबादला गेला तरी तिथे लाभ मिळेल. एक प्रकारे आरोग्यासाठी जेवढे सुरक्षा कवच शक्य होईल, आरोग्य रक्षणासाठी जेवढे काही शक्य असेल, ते सर्व करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गुजरातचे तर वैशिष्ट्य आहे की गुजरात हे नेहमी सर्वांच्या बरोबर चालणारे राज्य आहे.
आपल्याकडे जेव्हा कधी आपत्ती आली असेल, आणि अन्नाची पाकिटे पोहचवायची असतील, तर सरकारला कमी धावपळ करावी लागते. आमच्या येथील स्वामी नारायण संस्थेला एक फोन केला, संतराम संस्थाला एक फोन केला की ताबडतोब गुजरात मध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे पोहचतात. कुणीही उपाशी राहत नाही. हे सर्व माता अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने होते. ही गरज गुजरातची आहे, आणि याच आधारावर आम्ही गुजरातला प्रगतीच्या मार्गावर पुढे नेत आहोत. शिक्षण , आरोग्य यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे आणि अध्यात्माची देखील चिंता करत आहेत. त्रिवेणी मिळाली आहे, तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.
खूप-खूप धन्यवाद.