नमस्ते,
श्री. नीलेश विक्रमसे, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया (आयसीएआय)चे पदाधिकारी, अर्थमंत्री अरुण जेटलीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सर्व सहकारी, देशभरातील जवळ जवळ 200 ठिकाणी उपस्थित असलेले चार्टर्ड अकाऊंटंटस् (सनदी लेखापाल) क्षेत्रातले मान्यवर, राज्यांमध्ये उपस्थित असलेले सर्व माननीय मुख्यमंत्री, दिल्लीतल्या या पावसातही उत्साहाने उपस्थित असलेल्या आपणा सर्वांना माझा नमस्कार.
आजच्या शुभ प्रसंगी ज्यांना सन्मानित करण्यात आले, आज या सभागृहात आणि देशात निरनिराळ्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मान्यवर, टीव्ही पाहणारे आणि रेडिओ ऐकत असलेले सर्व नागरिक, तरुण मित्रांनो आणि बंधुभगिनींनो,
आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया (आयसीएआय)चा स्थापना दिन आहे. माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज एक चांगला योगायोग आहे. आजच आपला स्थापना दिवस आहे आणि आजच भारताच्या आर्थिक क्षेत्रातील नव्या मार्गाचा आरंभ झाला आहे. आज पासूनच भारतात जीएसटी म्हणजेच गुड अँड सिंपल टॅक्सचीही सुरुवात झाली आहे. माझ्यासाठी आनंदाची बाब अशी की या ऐतिहासिक प्रसंगी मी आपल्यापुढे उपस्थित आहे हे माझं सद्भाग्य आहे. तरुणांनो,चार्टर्ड अकाऊंटंटस् (सनदी लेखापाल) क्षेत्राशी अनेकवर्षांपासून संबंधित असलेल्या मान्यवरांनो संसदेने तुम्हाला एक पवित्र अधिकार दिला आहे.
हिशेबवहीत जे बरोबर आहे ते बरोबर आणि चूकला चूक म्हणण्याचा, प्रमाणित (सर्टिफाय) करण्याचा, ऑडिट करण्याचा, हे अधिकार फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आहेत. जशी डॉक्टरांना समाजातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते, तशीच तुमच्यावर समाजाच्या आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी असते. असा कोणीही डॉक्टर नसेल जो लोकांना सांगत असेल की तुम्ही अमके खा...तमके खा, असे करा-तसे करा आणि आजारी पडा, म्हणजे माझी मिळकत वाढेल. डॉक्टरांना माहिती असते की कोणी आजारी पडले तर माझी अधिक कमाई होईल. तरीसुद्धा डॉक्टर सांगतात की तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही असं करायला पाहिजे.
माझ्या मित्रांनो, समाजाचं आर्थिक स्वास्थ्य चांगलं रहावं, त्यात चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होऊ नये याची काळजी तुम्ही घेता. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तुम्ही मोठे आधारस्तंभ आहात. म्हणूनच आपल्यामध्ये उपस्थित राहणं ही माझ्यासाठी शिकण्याची, दीक्षा घेण्याची मोठी संधी आहे.
भारतातल्या चार्टर्ड अकाऊंटंटस् चं ज्ञान आणि उत्तम आर्थिक कौशल्याचा जगभरात नावलौकिक आहे. नवीन सनदी लेखापालन अभ्यासक्रम(Chartered Accountancy Course Curriculum )सुरू करण्याची आज मला संधी मिळाली आहे. तुमचा चैतन्यपूर्ण अभ्यासक्रम ( Dynamic Course )आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेची (Exam की Credibility) हीच खरी ओळख आहे. मला खात्री आहे की नवीन अभ्यासक्रम, या व्यवसायात येणा-या नव्या लोकांची फायनान्शियल स्किल्स आणखी बळकट करेल. आपल्या इन्स्टिट्यूटस आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रात जे जागतिक मानदंड ( Global Bench Mark )आहेत, ज्या जागतिक गरजा (GlobalRequirement) आहेत त्या अनुषंगाने आपल्या मनुष्यबळाच्या विकासाच्या दिशेने आपल्याला सतत चैतन्यपूर्ण ( डायनॅमिक) व्यवस्था विकसित कराव्या लागतील. आपल्या अभ्यासक्रमांमध्ये लेखापालन क्षेत्रातील तांत्रिक गोष्टींचा कशाप्रकारे अंतर्भाव करता येईल, आपल्या काही Charted Neutral Firms, तंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण कल्पना, Accountant Filed Innovation, नवनवीन सॉफ्टवेअर्स ही सुद्धा एक नवीन बाजारपेठ (मार्केट) आपल्या प्रतीक्षेत आहे.
मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचं शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन केलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की धर्म आणि मोक्षाचा मुद्दा निघाला तर ऋषी, मुनी डोळ्यासमोर येतात. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्राचा कारभार तुमच्या हातात आहे. त्यांच्याच बरोबरीने आहे. म्हणूनच तुम्हाला मी जर आर्थिक क्षेत्रातले ऋषी-मुनी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मोक्षाचा मार्ग दाखवणा-या ऋषी-मुनींचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही जे मार्गदर्शन करता त्याला आहे, अर्थ क्षेत्रात कसं आचरण पाहिजे, कोणता मार्ग बरोबर आहे, ही दिशा दाखवण्याची जबाबदारी सनदी लेखापालन क्षेत्रातील प्रत्येक लहान-थोर व्यक्तींची असते.
माझ्या प्रिय मित्रांनो तुमच्याकडून मला जे प्रेम मिळत आहे, ज्या प्रकारे मला तुमचं प्रोत्साहन लाभत आहे, त्याच प्रेमापोटी माझं मन तुमच्यापुढे मोकळं करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तुमची आणि माझी देशभक्ती सारखीच आहे. देशाला पुढे नेण्याची माझी जशी इच्छा आहे, तशीच तुमचीही आहे. पण काही वस्तुस्थिती अशा आहेत ज्या विचार करायला भाग पाडतात.
तुमच्यामध्ये जे जुने, अनुभवी लोक आहेत त्यांना माहितीच असेल की एखाद्या घराला आग लागली, सगळी मालमत्ता त्या आगीत जळून खाक झाली तरी त्या घरातलं कुटुंब स्वकर्तृत्वाच्या बळावर लवकरच पुन्हा उभं राहतं. सुरुवातीला थोडा त्रास झाला तरी कालांतराने ते संकटातून बाहेर पडतं. आपल्या बुजुर्गांनी सांगितलंच आहे की आगीत जळालेलं घर पुन्हा उभं करण्याचं काम कुटुंब करतं. पण कुटुंबातल्याच एखाद्या व्यक्तीला जर चोरी करण्याची सवय असेल तर ते कुटुंब पुन्हा उभं राहू शकत नाही. बंधुभगिनींनो, ते सगळं कुटुंब काही चोरी करत नाही, पण कुटुंबातला एखादाच सदस्य जर कुटुंबाचे नियम सारखे- सारखे तोडत असेल तर ते कुटुंब संपून जातं.
हिशेबवही चोख ठेवणा-या माझ्या मित्रांनो अशाच प्रकारे आलेल्या कुठल्याही संकटातून देश पुन्हा उभा राहू शकतो. पूर असो, भूकंप असो कुठलंही संकट असो त्याच्यातून बाहेर पडण्याचं जनताजनार्दनामध्ये सामर्थ्य असतं. शासन व्यवस्था आणि जनता दोघे मिळून त्या संकटातून बाहेर येतात. पण त्याच देशातील कुणाला चोरी करायची सवय लागली तर ज्याप्रमाणे कुटुंब संकटातून सावरू शकत नाही त्याचप्रमाणे तो देश, समाजसुद्धा पुन्हा संकटातून उभारी घेऊ शकत नाही. सगळी स्वप्नं भंग पावतात, विकास थांबतो. काही लोक असे असतात जे प्रगती रोखण्याचं काम करतात. अशा लोकांविरुद्ध सरकारनं गेल्या तीन वर्षात कठोर पावलं उचलली आहेत. नवीन कायदे केले आहेत, जुने कायदे अधिक कठोर केले आहेत. कितीतरी देशांशी करार केले आहेत. जुन्या करारांमध्ये नवे बदल केले आहेत. परदेशातील काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होतो आहे त्याचा पुरावा स्विस बँकेच्या ताज्या आकडेवारीमध्ये दिसून येतो आहे.
स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशाचं प्रमाण आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर गेलं आहे. 30 वर्षांपूर्वी पासून म्हणजे 1987 पासून कुठल्या देशातील लोकांचा किती पैसा जमा होतो आहे, हे स्विस बँकांनी जाहीर करायला सुरुवात केली. गेल्या वर्षाचा अहवाल आता आला आहे, त्यानुसार भारतीयांचा जो पैसा स्विस बँकांमध्ये आहे, त्यात नवीन भर पडली नाही आहे तो जुनाच जमा केलेला आहे, त्यातसुद्धा 45 टक्के घट झाली आहे. 2014 साली ज्यादिवशी तुम्ही माझ्याकडे कारभार सोपवला त्याच दिवसापासून 2014 पासून ही घट सुरू झाली आहे. त्याचं प्रमाण आता आणखी वाढलं आहे. स्विस बँकेच्या नोंदी सांगतात की 2013 मध्ये 42 टक्के वाढ होती, हे ऐकून तुम्हाला दुःखही होईल आणि आश्चर्यही वाटेल. बंधुभगिनींनो, स्विसबँकेचा आता रियलटाईम डेटा जसा मिळू लागेल तसं परदेशात काळा पैसा ठेवणा-यांच्या अडचणी आणखी वाढतील. तुमच्याकडे तसा पैसा नसेल याची मला खात्री आहे. देशाच्या प्रेमापोटी असा पैसा असलेल्यांना तुम्ही ते सांगाल याचा मला विश्वास आहे.
मित्रांनो मी स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. त्याचबरोबर देशातील आर्थिक आणि वित्तीय व्यवस्था स्वच्छ करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. 8 नोव्हेंबर ही तारीख तुमच्या सगळ्यांच्या मनावर कोरली गेली असेल याची मला खात्री आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय काळ्या पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं मोठं पाऊल होतं. मला एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की मी ऐकून आहे की 8 नोव्हेंबर नंतर तुम्ही तुमच्या कामात आजवर कधी नाही इतके व्यस्त झाला आहात. चार्टर्ड अकाऊंटंटस् नी दिवाळीची सुटी साजरी करण्यासाठी हॉटेल्स बुक केली होती, त्यांना त्यांच्या ट्रिप्स रद्द करून कामाच्या ठिकाणी यावं लागलं. परत आल्यावर तुम्हाला 24 तास काम करावं लागलं.तुम्ही चुकीचं केलंत, बरोबर केलंत मला माहित नाही. पण तुम्ही क्लायंटसाठी केलं की देशासाठी केलं, पण तुम्ही रात्रंदिवस काम केलं हे मात्र खरं आहे.
मित्रांनो, मला प्रथमच काळा पैसा कायमचा नष्ट करण्याच्या मोहिमेविषयी माझे विचार तुमच्यापुढे मांडायचे आहेत. कारण या मोहिमेची ताकद तुम्हाला ठाऊक आहे. बँकांमध्ये जमा करणयात आलेल्या पैशाविषयी सगळी माहिती खणून काढण्याची मोठी व्यवस्था सरकारनं विकसित केली आहे. 8 नोव्हेंबरपूर्वी आणि नंतर बँकेत झालेल्या पैशांच्या व्यवहारांची बारकाईने छाननी सुरू आहे. आम्ही कुणाचीही चौकशी केली नाही पण फक्त माहितीचं विश्लेषण केलं गेलं आहे.
मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुमचं देशप्रेम माझ्या देशप्रेमापेक्षा जराही कमी नाही.मी आज प्रथमच उघडपणे सांगतो आहे त्यामुळे सगळा देश आश्चर्यचकित होईल, आतापर्यंत जेवढं डेटा मायनिंग करण्यात आलं आहे, त्यावरून असं निष्पन्न झालं आहे की, 3 लाख नोंदणीकृत कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद आहेत.
अजून खूप माहिती खणून काढायची आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही की हा आकडा नेमका किती असू शकेल. ही सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. मी हे तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्हाला सरकारचा त्यामागचा विचार कदाचित कळू शकेल, राजकारण्यांची ताकद तुमच्या लक्षात येऊ शकेल. एकीकडे सरकार, प्रसारमाध्यमं,संपूर्ण व्यवसायक्षेत्र 30 जूनच्या मध्यरात्रीकडे आणि त्यानंतर 1 जुलैला काय होणार याकडे लक्ष ठेवून होतं. दुसरीकडे त्याच्या केवळ 48 तास अगोदर लेखणीच्या केवळ एका फटका-यासरशी 1 लाख कंपन्या रद्द करण्यात आल्या.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या यादीतून या एक लाख कंपन्या काढून टोकण्यात आल्या आहेत. मित्रांनो, हा काही साधासुधा निर्णय नाही. राजकारणाचे हिशेब आणि गणितं मांडणारे असे निर्णय घेऊ शकत नाहीत तर केवळ देशभक्तीनं प्रेरित असणारेच लोक असे निर्णय घेऊ शकतात.ज्यांनी देशातील गरीबांची लूट केली, त्यांना ती आता परत गरीबांना द्यावीच लागेल.
याशिवाय 37 हजारांहून जास्त बनावट कंपन्यां सरकारनं शोधून काढल्या आहेत. काळा पैसा आणि हवालाचा पैसा दडवण्यासाठी काढण्यात आलेल्या अशा कंपन्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.भविष्यात कायद्याचं उल्लंघन करणा-यांविरुद्ध आणखी कठोर कारवाईची व्यवस्था करण्यात आली आहे. बनावट कंपन्यांचं उच्चाटन आणि काळ्या पैशाविरुद्ध मोहीम सुरू करणं हे राजकारणाच्यादृष्टीनं चुकीचं आणि राजकीय पक्षासाठी नुकसानकारक आहे, याची मला कल्पना आहे. पण देशासाठी कुणाला तरी असे निर्णय घ्यावेच लागणार आहेत.
माझ्या चार्टर्ड अकाऊंटंट मित्रांनो आज मी तुमच्या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आलो आहे, त्यानिमित्तानं एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हिशेबाच्या नोंदी चोख ठेवण्याची ताकद तुमच्याकडे आहे. नोटबंदीनंतर अशा कंपन्यांना तुमच्यापैकी कुणीतरी नक्कीच मदत केली असणार. अशा चोर आणि दरोडेखोर कंपन्यांना आर्थिक डॉक्टरकडे जाण्याची गरज भासली असणारच, त्यासाठी अशा कंपन्या तुमच्यापैकी कोणाकडे तरी आल्या असतीलच. ज्यांनी अशा कंपन्यांना मदत केली अशा लोकांची नावं उघड होण्याची आवश्यकता आहे की नाही. मित्रांनो मला सांगण्यात आलं आहे की चार्टर्ड अकाउंटंटसची संख्या 72 हजांरापेक्षा जास्त आहे. तुमच्यासोबत सहायक प्रशिक्षणार्थीही (आर्टिकल्ड असिस्टंटसही) काम करतात. त्यांचीही संख्या जवळपास दोन लाख इतकी आहे. असे तुम्ही 2 लाख 72 हजार चार्टर्ड अकाउंटटस् आणि तुमच्या ऑफिसांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग मिळून या क्षेत्रात काम करणा-यांची संख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. तुम्हा लोकांना आकडेवारी चांगली समजते म्हणून तुमच्यापुढे काही गोष्टी मांडतो.
देशात अंदाजे दोन कोटींहून अधिक इंजिनिअर्स आणि व्यवस्थापन पदवीधारक आहेत. तर आठ लाखांपेक्षा जास्त डॉक्टर्स आहेत. हे सर्व व्यवसाय अतिशय प्रतिष्ठेचे मानले जातात, या व्यवसायांना खूप मान दिला जातो. कोट्यवधी लोक या व्यवसायांमध्ये आहेत. त्याही पेक्षा देशात टोलेजंग, राजेशाही थाटाच्या घरांची संख्याही काही कोटींमध्ये आहे. सुमारे दोन कोटी 18 लाख लोकांनी गेल्या वर्षी परदेश प्रवास केला. असं असूनसुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल देशातले केवळ 32 लाख लोक आपलं उत्पन्न 10 लाखांच्यावर असल्याचं कर परतावा दाखल करताना सांगतात. कुणाचा यावर विश्वास बसू शकेल. हिशेबाच्या नोंदी बरोबर ठेवणा-यांनो मी तुम्हाला विचारतो आहे, 10 लाखांहून अधिक उत्पन्न असलेले देशात फक्त 32 लाखच लोक आहेत ?
माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपल्या देशातलं कटुसत्य आहे. हे आकडे सांगतात की 32 लाख लोकांच उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे. मला वाटतं की यातले बरेचसे लोक पगारदार आहेत. त्यांचं निश्चित उत्पन्न आहे आणि त्यातल्या बहुतेकांमध्ये सरकारी नोकर आहेत. त्यांना सरकारकडून वेतन मिळतं. असं असून देशात प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे. बंधुनो, मी आणखी आकडेवारी सांगू इच्छित नाही. देशात दरवर्षी करोडो वाहनांची खरेदी केली जाते. आणि तरीही देशाप्रती जी जबाबदारी आहे, त्याचं मात्र पालन केलं जात नाही ही चिंतेची बाब आहे.
आणखी आकडेवारी तुम्हाला सांगण्यापेक्षा माझ्या सीए मित्रांनो मी माझे विचार तुम्हाला सांगू इच्छितो. कुठलीही व्यक्ती किंवा क्लायंट तेव्हाच कर भरायला प्रवृत्त होतो, जेव्हा त्याच्या आसपासचं वातावरण सकारात्मक असतं.जर त्याला सल्ला देणाराच काही सत्य लपवायला सांगत असेल तर तो आपसूकच चुकीच्या मार्गाला लागतो. म्हणूनच असे चुकीचे सल्ले देणा-यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याकरता तुम्हालाही पावलं उचलावी लागतील. सीए ही अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये मनुष्यबळ विकासाचं काम तुम्हीच करता, तुमचा अभ्यासक्रम तुम्हीच तयार करता, तुम्हीच परीक्षा घेता, नियमही तुम्हीच बनवता आणि तुमची संस्था दोषींना शिक्षा करते. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की लोकशाहीचं मंदिर म्हणजे देशातील सव्वाशे कोटी जनतेचा आवाज असलेल्या संसदेनं तुम्हाला एवढे अधिकार दिलेले असतानाही गेल्या 11 वर्षांमध्ये फक्त 25 च चार्टर्ड अकाऊंटंटसवर कारवाई झाली. केवळ 25 सीएंनीच गैरप्रकार केले असतील.
मी ऐकलं आहे की 1400 हून अधिक प्रकरणं कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. एका प्रकरणाचा निपटारा होण्यात अनेक वर्ष जातात. मला सांगा मित्रांनो, अशा अत्यंत उच्चविद्याविभूषित लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे की नाही, बंधुभगिनींनो, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक युवक फासावर गेले. अनेक थोर लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. त्या काळात विविध व्यवसायातले लोक पुढे येऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले.त्यापैकी बरेचजण वकील होते. त्यापैकी बहुसंख्य बॅरिस्टर होते. त्याना कायद्याचं ज्ञान होतं. कायद्याविरुद्ध लढा देण्याचे परिणाम त्यांना चांगलेच ठाऊक होते. असं असूनसुद्धा त्या काळातील लोकांनी त्यांचा वकिली व्यवसाय उत्तम चालला असतानाही वकिली सोडून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.
केवळ महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, नेहरू एवढेच नव्हेत तर डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. मदनमोहन मालवीय, बाळ गंगाधर टिळक, सी. राजगोपालाचारी, मोतीलाल नेहरू, देशबंधू चित्तरंजन दास, सैफुद्दीन कुचलू, भुलाभाई देसाई, लाला लजपतराय,तेजबहादूर सप्रू, असफअली, गोविंद वल्लभ पंत, कैलासनाथ काटजू अशी किती असंख्य नावं आहेत ज्यांनी वकिली सोडून देशासाठी जीवन अर्पण केलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यापैकी अनेकांनी देशाची घटना तयार करताना महत्तव पूर्ण योगदान दिलं आहे. आणि म्हणूनच बंधु भगिनींनो देशाच्या इतिहासाचं अविभाज्य अंग असलेल्या या थोर लोकांना आपण विसरू शकत नाही.
मित्रांनो आपला देश आज इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. 1947 नंतर झालेल्या राजकीय एकीकरणानंतर आता देश आर्थिकदृष्ट्या एक होत आहे. आपला देश या वर्षात, 2017 मध्ये एका नवीन प्रवासाला प्रारंभ करत आहे. एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ हे स्वप्न साकार होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी चार्टर्ड अकाउंटंटसची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. मित्रहो, तुम्ही माझ्या भावना समजून घ्या, स्वातंत्र्याच्या लढ्यात वकिली क्षेत्रातील लोकांनी देशासाठी प्राण पणाला लावले होते. तुम्हाला गजाआड जाण्याची गरज नाही. हा देश तुमचाच आहे. तुमचीच मुलं या देशाचं भवितव्य आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याचं ज्याप्रमाणे वकिलांनी नेतृत्व केलं तसंच या नव्या युगात देशातील नेतृत्वाची सूत्रं तुमच्याच हातात असण्याची गरज आहे. आता यापुढे आर्थिक विकासाचं नेतृत्व चार्टर्ड अकाउंटटसच्या फौजेनं सांभाळलं पाहिजे.
आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्याचं काम दुसरं कुणी नाही तर तुम्हीच करू शकता.हे तुम्हाला दिसतच असेल मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो की, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुमच्या क्लायंटसना प्रामाणिकपणाच्या मार्गावर आणा. भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुम्ही सूत्रं ताब्यात घ्या.
मित्रांनो चार्टर्ड अकाउंटंटस देशाच्या अर्थव्यवस्थेचे राजदूत असतात. सरकार आणि करदात्या व्यक्ती आणि कंपन्यांदरम्यान तुमची मध्यस्थाची भूमिका असते. पंतप्रधानांपेक्षाही तुमची स्वाक्षरी जास्त महत्त्वाची असते. तुमची सही सत्यतेच्या विश्वासाची साक्ष देते.
एखादी कंपनी छोटी असो वा मोठी त्यांच्या हिशोबांचे व्यवहार एकदा स्वाक्षरी करून प्रमाणित केलेत की, सरकार, या देशातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवते. एकदा तुम्ही बॅलन्सशीटवर स्वाक्षरी केलीत की दुसरं कुणीही त्या कंपनीच्या बॅलन्सशीटबद्दल प्रश्न उपस्थित करत नाही. तुमची सही ज्यावर असेल त्या फाईल्स अडवून ठेवल्याजात नाहीत. मित्रानो त्यानंतर एक नवा अध्याय सुरू होतो. मी आज त्या नवीन अध्यायाची माहिती तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे.
एखाद्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांच्या नोदींवर, बॅलन्सशीटवर तुम्ही स्वाक्षरी केली, सरकारी अधिका-यांनी त्याला मान्यता दिली, कंपनीची भरभराटहोऊ लागली, प्रगती सुरू झाली की तुम्हीही मोठे होता, तुमचीही भरभराट होते. तेव्हा कोणी वयस्क व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये आपला पैसा गुंतवते. एखादी विधवा महिला तिची महिनाभराची बचत रोखे बाजारात गुंतवते. जेव्हा एखाद्या कंपनीचा खरा अहवाल दिला जात नाही, सत्य लपवलं जातं आणि जेव्हा खरी परिस्थिती उघडकीस येते तेव्हा नुसती ती कंपनीच बुडते असं नाही तर मित्रांनो, त्या गरीब विधवेचं आयुष्यही गटांगळ्या खातं. ती वयस्क व्यक्तीही बरबाद होते.ते केवळ तुमच्या सहीवरच्या विश्वासाच्या आधारे आपली बचतपुंजी गुंतवतात. म्हणून माझं तुम्हाला आवाहन नाही तर आग्रह आहे मित्रांनो, की ज्या तुमच्या एका स्वाक्षरीवर देशातले सव्वाशे कोटी नागरिक विश्वास ठेवतात त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. त्या विश्वासावर साधा ओरखडादेखील उमटू देऊ नका. या विश्वासाला तडा गेला आहे असं हृदयात कुठेतरी खोलवर जाणवत असेल तर तो पुन्हा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या.
2017 च्या जुलैचा पहिला दिवस, तुमच्या संस्थेचा वर्धापन दिन तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी तुम्हाला निमंत्रित करतो, प्रामाणिकपणाच्या या उत्सवात सहभागी होण्याचं तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे. आपल्या कामाचं महत्त्व तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसारच योग्य मार्ग निवडा. समाज तुमच्याकडे किती अभिमानाने पाहील, याची तुम्ही स्वतःच अनभूती घ्या.
मित्रांनो, कर परताव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तथापि , सरकारतर्फे जो कर गोळा करण्यात आला, तो देशाच्या विकासासाठी उपयोगात आणल्या गेला की नाही ? हा च तो कर परतावा आहे, असे मला वाटते.
चलनवाढ रोखण्यासाठी हा कर परतावा महत्वाची भुमीका बजावतो. हा परतावा एखाद्या महिलेला गॅस कनेकशन देण्याची तरतूद करतो जिने आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वयंपाकासाठी लाकडांचा उपयोग केला. हा निधी वृद्धांच्या निवृत्ती वेतनासाठी उपयोगात आणला गेला ज्यांच्याकडे बघायची जबाबदारी त्यांच्या मुलांनी झिडकारली.
हा पैसा तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी उपयोगात आणल्या जाऊ शकतो जे दिवसभर कठीण परिश्रम करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या वर्गांना उपस्थित राहू शकतील
हा पैसा गरीब लोकांना परवडणाऱ्या औषधांची तरतूद करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे ज्यांच्या जवळ स्वतःच्या उपचारासाठी पैसे नाहीत , जे आजारी असूनही त्याच्या नित्याच्या कामांमधून वेळ काढू शकत नाही आणि या साठी त्यांच्या मुलांनी अन्नाविना झोपी जावे?
हा कराच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा शूर सैनिकांसाठी उपयोगात आणता येऊ शकतो जे सीमेवर आपल्या संरक्षणासाठी जोखीम पत्करतात. हा पैसा ज्यांच्या कडे विद्युत पुरवठा देशाच्या सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अजून मिळाला नाही अशाना विदुत तरतुदीसाठी उपयोगात आण्यात येत आहे. एक बल्ब सुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या घरात लागलेला नाही अजूनही ते अंधारात आहेत.
यापेक्षा चांगली सेवा देशाच्या गरिबांना कशी देता येईल हे पहिले पाहिजे . तुम्हाला कल्पना नाही कि तुमच्या एक स्वाक्षरी मुळे किती गरिबांना मदत मिळणार आहे . या देशाच्या सामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही खूप महत्वाची जबाबदारी पार पडू शकता . आणि जर तुम्ही एकदा का ठरवले , मला विश्वास आहे कि, १ जुलै २०१७ हा आई सी ए आई च्या इतिहासाला वेगळे वळण देणार असेल.
आणि मित्रानो तुम्ही एकदा का ‘वॉव’ म्हंटलेत, मी पूर्ण विश्वासाने सांगतो की कुणीही कर चकविण्याचा प्रयत्न करणार नाही लोक तेंव्हाच नियम मोडतात जेंव्हा त्यांना पाठिंबा देणारे कुणी असतं
मित्रांनो , जिएसटी हे तुमच्या साठी एक माध्यम आहे जे तुमचे योगदान राष्ट्र निर्मितीसाठी घेऊ शकेल. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही लोकांपर्यंत पोहचा. मी जेंव्हा इथे येण्याच्या मार्गावर होतो , निलेश म्हणाला कि तुम्ही व्यापारांना जिएसटी समजावून सांगण्यासाठी मदत करणार आहात मी त्यांचे अभिनंदन करतो.
तुम्ही लोकांना भेटा, प्रोत्साहित करा त्यांना एकात्मतेच्या मुख्य धारेत सामावून घ्या . या मार्गात सरकारने सनदी लेखापाल या क्षेत्रात येण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्ही यासाठी तयार रहा. विशेषतः या क्षेत्रातील तरुण व्यवसायिकांना मी तयार राहायला सांगतो.
कृपया पुढे या, सरकारने अलीकडेच मंजूर केलेल्या विशेषतः नादारी आणि बँक रॅप्टसी कोड कायदयाच्या योग्य अंमलबजावणीसाठी आणि यशस्वीतेसाठी चार्टर्ड अकाऊंटण्टची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.या कोड अंतर्गत, जेंव्हा कंपनीला नादार म्हणून घोषित केले जाते तेंव्हा या कंपनीचे नियंत्रण नादारी व्यवसायिकाकडे जाते.
चार्टर्ड अकाऊंटण्ट एक नव्या कॅरियर ची सुरवात या क्षेत्रात करू शकतो. हे एक वेगळे दार तुमच्या साठी सरकारने खुले केले आहे जो मार्ग आज तुम्ही स्वीकारणार आहात. या मार्गावरील सी ए म्हणजे सनद आणि अचूकता, अनुपालन आणि प्रामाणिकपणा होय.
वर्ष २०२२ मध्ये आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करतो आहे. या साठी देशाने काही उद्दिष्ट ठरविली आहेत. नवीन भारत आपल्याकडून कठोर परिश्रम आणि उदयोगांची अपेक्षा करतो.
कुठल्या प्रकारच्या भारताचे स्वप्न आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तते निमित्त, एक संस्था, भारताचे चार्टर्ड अकाउंटंट, एक व्यक्ती आणि एक नागरिक म्हणून भूमिका निभावताना पाहणार आहोत ? " द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया" ला भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्ती नंतर दोन वर्षांनी ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत.
आजपासून उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही भारताला ७५ व्या वर्षाच्या स्वातंत्र्यपूर्ती निमित्त कार्यक्रम तयार करा. तुम्ही आजपासून या संस्थेला एका विशिष्ठ उंची गाठण्यासाठी आणि तिच्या नाव लौकिकासाठी तसेच या ऐतिहासिक प्रसंगासाठी एक रोडमॅप तयार करा. आणि ठरवा देशासाठी, लक्ष लोकांसाठी आणि लक्ष लक्ष तरुणांसाठी , त्याच्या भविष्यासाठी काय करता येईल.
तुम्ही देशाला पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त पद्धत देऊ शकत नाही का? काय म्हणता? तुम्ही अशा कित्येक लोकांकडे बघणार आहात का जे कर भरून बचत करतात. किंवा असे लोक ज्यांना तुमच्याकडे बघून कर भरण्याची स्फूर्ती येते. तुम्हाला याबाबत ठरवायचे आहे ?
तुम्ही तुमच्यासाठी उद्दिष्ट ठराव की, किती लोकांना तुम्ही मनापासून कर भरण्यासाठी अभिप्रेरित करू शकता , मुख्य धारेत आणू शकता ? या कामासाठी तुमच्याशिवाय चांगला निर्णायक कोण असू शकेल?
तुमच्या व्यवसायात तंत्रज्ञानाची भूमिका विस्तारित करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करा. फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात आणण्यासाठी काय करू शकता , ते कसे उपयोगी पडू शकेल, या साठीही तुम्ही उद्दिष्ट ठरवू शकता.
मित्रांनो, तथापि , मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे जी तुम्ही पूर्ण करू शकता. मी समजून घ्यायला अयशस्वी ठरलो कि तुम्ही पाठीमागे का राहता? मित्रांनो, जगात चार महत्वाच्या संस्था आहेत ज्यावर मोठ्या संस्था आणि संघटना त्यांच्या अंकेक्षणासाठी या चार संस्थांवर विश्वास ठेवतात, त्यानां 'बिग फोर'च म्हटल्या जाते. आपण या चार मध्ये कुठेही बसत नाही.
पण तुम्ही या साठी सक्षम आहात आणि एकतर प्रतिभेची कमतरता नाही मित्रानो, जेंव्हा भारत, वर्ष २०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करेल त्यावेळी आपण या ‘बिग फोर’ ला ‘बिग ऐट’ मध्ये रूपांतरित करू शकू. पण त्यासाठी भारताला जगात आदराची वागणूक मिळविण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष्य ठरवायला हवे?
या आठ पैकी चार मोठ्या संस्था या लोकांवर निर्भर करतात जे माझ्या आधी येथे बसले आहेत. तुमच्या व्यवसायाला ख्याती आणि व्यवसायिकता मिळवून देणे हे कठीण काम नाही. मित्रानो, चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रात जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला आदर मिळ्याल्याशिवाय राहणार नाही . शेवटी मी तुम्हाला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चाणक्याच्या सल्ल्याची आठवण करून देतो, तो म्हणतो, "कालाती क्रमात काळ अवम फलं पिवति" म्हणजे वेळ हीच अशी गोष्ट आहे जी वेळेवर केली नाही तर स्वतःच्या यशाचे मूल्य अधिकृत करते, तेंव्हा तुमचा वेळ वाया घालवू नका.
अरुणजीं नुकतेच तुमच्याशी बोललेत , ते म्हणत होते की, याआधी कधीही अशी संधी प्राप्त झाली नाही. तुम्हा लोकांना अशी संधी मिळणे हे तुमचे भाग्य आहे. हि संधी दवडू नका.
मी तुम्हाला देशाच्या विकासातील मुख्य धारेत समाविष्ट कार्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे तुम्ही या व्यवसायावरही तुमची दृष्टी ढळू देऊ नका जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या शाश्वततेसाठी , क्षमता म्हणून तुमच्या पाठीशी राहील. मी पुन्हा एकदा आई सी ए आई च्या स्थापनदिनानिमित्त माझ्या शुभेच्छा संस्थेतील तुमच्या या संपूर्ण विभागासाठी, येथे उपस्थित चार्टर्ड अकाउंटंटसाठी देतो.
मी हा कार्यक्रम व्हिडीओ लिंकद्वारे इतर देशांमधून बघत असणाऱ्या सर्व लोकांचे तसेच चार्टर्ड अकाऊंटटण्टचे आभार मानतो
मी अशी इच्छा व्यक्त करतो की सर्व आता एका नव्या दिशेने , नव्या उमेदीने आणि नव्या ध्येयाने संक्रमण करू जे साधारण लोकांना श्रद्धा आणि सदिच्छेने हे पर्व मानविण्यासाठी अभिप्रेरित करतील. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रानो !