माझ्या प्रिय देशवासियांनो भारताच्या मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात खूप जलद गतीने एक नवीन प्रयोग, नवीन स्वप्ने, नवीन संकल्प आणि काहीतरी करून दाखवायची हिम्मत येत आहे. आपल्या देशात एक असा वर्ग आहे ज्याला जर संधी मिळाली तर त्याच्या कल्पना शक्तीच्या जोरावर तो देशाला विकासाच्या एका नवीन उंचीवर नेवून प्रस्थापित करेल.
विशेषतः हा जो मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आहे त्यांची फस्ट जनरेशन जोखीम उचलण्याची क्षमता सर्वाधिक आहे. जर त्यांना संधी मिळाली तर ते देशाचे भविष्य आणि चित्र बदलतील. संपूर्ण जगाला हे माहित आहे की, जगभरात हवाई यात्रेच्या सर्वाधिक संधी कुठे असतील तर त्या भारतात आहेत. फार पूर्वी आपल्याकडे हा समज होता की, हवाई यात्रा ही राजा महाराजांसाठी आहे आणि म्हणूनच आपल्या विमान कंपनीचे जे चिन्ह आहे ते देखील महाराजाशी निगडीत आहे; आणि जेव्हा अटलजींचे सरकार आले तेव्हा राजीव प्रताप रुडी उड्डाण मंत्रालयात होते. तेव्हा मी पक्षाचे काम करायचो आणि हिमाचल मध्ये रहात होतो, तेव्हा मी एके दिवशी त्यांना भेटलो आणि विचारले की हे जे चिन्ह आहे ते बदली होऊ शकते का? त्यांनी विचारले काय? मी सांगितले की, ह्या चिन्हावरून असे वाटते की, विमानं आणि विमानाचा प्रवास हा एका विशिष्ट वर्गाच्या लोकांसाठीच आहे. तेव्हा त्यांनी विचारले, मग काय करू या? मी म्हणालो काही करू नका फक्त व्यंगचित्रकार लक्ष्मण यांचा जो कॉमन मॅन आहे त्याचा समावेश या चिन्हामध्ये करण्याची परवानगी घ्या आणि मला आनंद आहे की, अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात कॉमन मॅनचा देखील समावेश करण्यात आला होता.
त्यावेळी माझ्याकडे कोणतेही राजकीय पद नव्हते मी संघटनेचे काम करायचो परंतु त्यावेळी मला कळत होते की, हा जो राजा महाराजांशी निगडीत समज आहे तो बदलला पाहिजे. आपल्या देशात कोणतीही उड्डाण योजना नाही ही सर्वात मोठी कमतरता आहे. इतका मोठा देश आहे, इतक्या संधी आहेत, संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे आणि त्यातूनच मी माझ्या विभागाला विनंती केली की, एक उड्डाण योजना तयार करा. तिला सर्व कसोटींवर तपासून पहा. सर्व लाभधारकांना विश्वासात घ्या. नीतीच्या आधारे त्याच्या विस्ताराचा एक आराखडा तयार करा. मला आनंद आहे की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात उड्डाण योजना बनविण्याचे सौभाग्य आमच्या सरकारला मिळाले. विमानप्रवासाला मी कशा प्रकारे पाहू इच्छितो हे त्यावेळी मी बैठकीत सांगितले होते. आपल्या देशात गरीब व्यक्तिची एक ओळख आहे की, तो हवाई चप्पल घालतो आणि मी त्या बैठकीत सांगितले होते की, माझी इच्छा आहे की विमानात हवाई चप्पल घालणारे लोकं दिसू दे. आणि आज हे शक्य झाले आहे.....आज सिमला आणि दिल्ली, नांदेड आणि हैद्राबाद ला विमान मार्गाने जोडण्यात आले आहे. नड्डा जी इथे आहेत, ते हिमाचलचे आहेत, सिमल्याला विमानं मार्गाने जोडण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि मी दिल्लीहून आलो आहे त्यामुळे मला अधिक आनंद होत आहे.
आज जर आपण टॅक्सीने एका किलोमीटरचा प्रवास केला तर 8 ते 10 रुपये भाडे दयावे लागते. दिल्ली-सीमला विमानं प्रवास जास्तीत जास्त एक तासाचा. जर मी रस्ते मार्गाने आलो असतो तर कमीत कमी 9 तास लागले असते, आणि प्रति किलोमीटर दहा रुपये असा किलोमीटरचा हिशोब केला तर....हा विमानं प्रवास असा आहे जो वेळ वाचवेल आणि याचा खर्च टॅक्सीने जर 10 रुपये लागत असतील तर नवीन धोरणांतर्गत विमानं प्रवासासाठी प्रति किलोमीटर फक्त 6 ते 7 रुपये खर्च होतील. नांदेड ते हैदराबाद विमानं प्रवास सुरु होत आहे परंतु सिमला-दिल्ली नंतर आधी नांदेड ते मुंबई हा विमानं मार्ग सुरु होणार आहे. मी विमानं कंपन्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मी जो त्यांना हा सल्ला देत आहे त्यासाठी मी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारणार नाही. मी मोफत त्यांना हा सल्ला देत आहे. विमानं कंपन्या जर व्यापारी दृष्टीकोण ठेवून विचार करत असतील तर बघा की, नांदेड साहिब, अमृतसर साहिब आणि पटना साहिबला जर विमानं मार्गाने जोडले तर जगभरातले सिख प्रवासी याचा सर्वाधिक लाभ घेतील.
खूप कमी लोकांना हे माहित आहे की, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी पूर्वेकडील भागात जास्तीत जास्त धावपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या, सीमेलगतच्या भागातही अनेक धावपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या, परंतु त्याचा कधी वापर करण्यात आला नाही. यामुळे या धावपट्टयांवरील काही सामान लोकांनी काढून नेले असेल. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाल्यानंतरही आपल्या देशात 70 ते 75 अशी विमानतळ आहेत ज्यांच्या वापर व्यवसायिक कामासाठी होतो. सत्तर वर्षात 70 ते 75 विमानतळ......या नवीन धोरणांतर्गत एका वर्षाच्या आत याहून अधिक नवीन विमानतळ व्यवसायिक हेतूसाठी जोडले जातील. भारताच्या “टायर टू सिटीज” विकासाची चाकं बनत आहेत. विकासामध्ये उर्जा भरण्याची ताकद “टायर टू टायर थ्री सिटीज” मध्ये येत आहे. जर तिथे हवाई मार्ग जोडला जाईल तर गुंतवणूकदार, व्यवस्थापक तज्ञ, शिक्षणासाठी दर्जात्मक मनुष्यबळ या सर्वांना जर हवाई मार्ग सुविधा उपलब्ध झाली तर विकासाच्या शक्यता अधिक वाढतील. जगात पर्यटनाचा विकास सर्वाधिक वेगाने होत आहे परंतु पर्यटनामध्ये इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी कष्ट सहन करायला तयार असतो, त्याला ते आवडते देखील, मेहनत करायला आवडते, डोंगर चढायला आवडतात, घाम गाळायला आवडतो परंतु इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर तो सर्वात आरामदायक सुविधेचा वापर करणे पसंद करतो. जर त्याला विमानं सुविधा मिळत असेल, जर त्याला इंटरनेट जोडणी मिळत असेल, जर त्याला वायफाय सुविधा मिळत असेल तर तो त्या पर्यटन स्थळी जाणे अधिक पसंद करतो.
तिथे पोहोचल्यानंतर तो त्रास सहन करायला तयार आहे, जोखीम उचलायला तयार आहे परंतु येण्या जाण्यासाठी तो आरामदायक सुविधेला सर्वाधिक पसंती देतो. सिमल्यामध्ये ही व्यवस्था आता पुन्हा एकदा सुरु होत आहे, खूप वर्षापासून हे काम रखडले होते. मला विश्वास आहे की, हिमाचलच्या पर्यटनाला यामुळे चालना मिळेल. सर्वाधिक तिकीट 2500 रुपये आहे. तिकीट व्यवस्था अशी करायची आहे जिथे तिकीट 2500 रुपयांपेक्षा कमी असेल.
ईशान्य हा भारताचा एक असा भूभाग आहे जो खूपच मनमोहक आहे. एकदा का एखादी व्यक्ति तिथे गेली की त्या व्यक्तीला वारंवार तिथे जावेसे वाटते, असा आहे आपला ईशान्य भारत. निसर्गाचे नयनरम्य दृश्य जी तिथे आहेत कदाचितच तशी दुसरीकडे पाहायला मिळतील. परंतु विमानं मार्ग नसल्यामुळे भारताचा सामान्य नागरिक तिथे सहजगत्या जाऊ शकत नव्हता. हा देशाच्या एकात्मतेसाठीचा खूप मोठा उत्सव ठरेल. यामुळे केवळ प्रवासाची सुविधा मिळणार नाही तर दोन भूभाग, दोन संस्कृती, दोन परंपरा अगदी सहजरीत्या जोडल्या जातील. मला आनंद आहे की, विमानं प्रवासाच्या दृष्टीने सामान्य नागरिकाला आणि ह्याचे जे उडान (UDAN ) नाव आहे... “उडे देश का आम नागरिक” यावरून उडान शब्द तयार झाला आहे. आणि जसे मी सांगितले होते की विमानं प्रवासामध्ये हवाई चप्पल घालणारा दिसला पाहिजे आणि सर्व उडणार.....सर्व जोडणार.
देशाच्या एका कोपऱ्याला दुसऱ्या कोपऱ्या सोबत जोडण्याचे हे महाअभियान आहे. इथे दुसऱ्या एका कार्यक्रमाचा देखील शुभारंभ होत आहे त्याचा शिलान्यास होत आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मनुष्यबळ विकासामध्ये जितके उद्दिष्ट केंद्रित असेल तेवढी आपल्या देशाची क्षमता वाढेल. भारताकडे जलविद्युत उर्जेच्या अनेक शक्यता आहेत आणि अंदाजे दिड लाख मेगावॅटहून अधिक उर्जेची निर्मिती आपण याद्वारे करू शकतो त्यासाठी मनुष्यबळ पाहिजे आणि समर्पित संस्था पाहिजेत. हिमाचल प्रदेश आणि हिमालयन पट्टा जम्मू काश्मीर पासून त्या प्रदेशात सगळीकडेच जलविद्युत उर्जा प्रकल्पासाठी खूपच संधी आहेत. जर इथल्या युवकांना जलविद्युत संबंधित अभियांत्रिकी शिक्षण मिळाले, तो विशेष विषय म्हणून समाविष्ट केला तर मला वाटते की, ही खूप मोठी सेवा ठरेल आणि म्हणूनच मॅकॅनिकल इंजिनिरिंग सारखे इतर विषय देखील असतील. परंतु विशेष लक्ष जलविद्युत ऊर्जेशी संबंधित विषयावर असेल. त्याच्याशी निगडीत खूप मोठे काम बिलासपुर येथे सुरु होणार आहे त्याचा शिलान्यास करण्याची संधी आज मला मिळाली. हिमाचल वासियांना आणि देशाच्या युवा पिढीला ही भेट देताना मला खूप अभिमान वाटत आहे आणि देश एकाप्रकारे आज हिमाचलच्या भूमीवरून वायू ऊर्जेचा आणि जलविद्युत ऊर्जेचा अनुभवत आहे.
आज विकासामध्ये वायू शक्ती आणि जल शक्ती दोघांची खूप मोठी ताकद आहे आणि आपण नवीन भारताचे जे स्वप्न बघत आहोत ज्यामध्ये जन-धनचे सामर्थ्य आहे, वन-धनचे सामर्थ्य आहे, जल-धनचे देखील तितकेच सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यासह आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे. मी पुन्हा एकदा भारत सरकारच्या उड्डाण विभागाला, त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना, त्यांच्या सर्व मंत्र्यांना, त्यांच्या नेतृत्वाचे मी हार्दिक अभिनंदन करतो. खूप मोठ्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ होत आहे जी खूप कमी कालावधीमध्ये भारताच्या नवीन विकास केंद्राची उंच भरारी मारण्याची ताकद यामुळे प्राप्त होणार आहे. माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद.