मंचावर आसनस्थ सर्व मान्यवर अतिथी आणि माझे प्रिय युवा मित्रहो, आपणा सर्वांना 21 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनेक शुभेच्छा. वेळेअभावी मी आज रोहतकमध्ये स्वत: उपस्थित राहू शकलो नाही, पण जी छायाचित्रे मी पाहतो आहे त्यावरून मला असे वाटते आहे की आज हा महोत्सवसुद्धा 21 वर्षाचा तरूण झाला आहे. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या तरूण मित्रांच्या चेहऱ्यावर इतकी उर्जा दिसते आहे की रोहतकमध्ये युवा महोत्सवाबरोबरच तिथे प्रकाश महोत्सवही साजरा केला जातो आहे, असे वाटते आहे.
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक युवकाला या विशेष दिवशी अनेक शुभेच्छा देतो आहे. कमी अवधीत किती गोष्टी साध्य करता येतील याचे स्वामी विवेकानंद हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे आयुष्य अल्प होते. स्वामी विवेकानंद युवा शक्तीला प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंद म्हणत असत – आमच्या देशाला या वेळी आवश्यकता आहे ती लोखंडासारख्या भक्कम आणि मजबूत स्नायूंच्या शरीरांची. आवश्यकता आहे ती अशा प्रकारच्या दृढ इच्छाशक्तीने परिपूर्ण युवकांची.
स्वामी विवेकानंद असे युवा निर्माण करू इच्छित होते, ज्यांच्या मनात कोणताही भेदभाव न बाळगता परस्परांबद्दल प्रेम आणि विश्वास असेल. जे भूतकाळाची काळजी न करता, भविष्यातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कार्यरत असतात, तेच खरे युवा असतात. आपण सर्व युवक जे काम आज करता, त्यातूनच उद्याचे देशाचे भविष्य घडत असते.
सहकाऱ्यांनो, आज देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. स्वामी विवेकानंदांनी दाखविलेल्या मार्गावरून चालल्यास आज भारत एका अशा युगाची सुरूवात करू शकतो ज्यामुळे भारत विश्वगुरू होऊ शकतो.
आज माझे जे युवा सहकारी यावेळी रोहतकमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हरयाणाची ही भूमी सुद्धा अतिशय प्रेरक आहे. हरयाणाची ही भूमी वेदांची आहे, उपनिषदांची आहे, गीतेची आहे. ही वीरांची भूमी आहे, कर्मवीरांची भूमी आहे. जय जवान-जय किसान ची भूमी आहे. ही सरस्वतीची पवित्र भूमी आहे. आपली संस्कृती आणि मूल्यांना जपत पुढे कसे जावे, हे या भूमीकडून शिकण्यासारखे आहे.
या वर्षी “युथ फॉर डिजीटल इंडिया” ही राष्ट्रीय युवा महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना दैनंदिन आयुष्यात डिजीटल पद्धतीने देवाण घेवाण करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महोत्सवात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक युवकाने येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या संपर्कातील किमान 10 कुटुंबांना डिजीटल पद्धतीने देवाण घेवाण करायला शिकवावे, असे आवाहन मी करतो. कमी रोखीची अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आपणा सर्व युवकांची भूमिका मोलाची आहे. देशाला काळा पैसा आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याच्या या लढ्यात आपले योगदान मोलाचे असेल.
या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी शुभंकर म्हणून एका मुलीची निवड करण्यात आली आहे. प्रेमाने तिला ‘‘म्हारी लाडो’’ अर्थात ‘‘माझी लाडकी’’ असे नाव दिले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ‘‘बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ’’ मोहिमेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. हरयाणापासूनच सरकारने ‘‘बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ’’ मोहिमेची सुरूवात केली होती. या मोहिमेचा या भागात मोठा परिणाम दिसून येतो आहे. बदल व्हायला सुरूवात झाली आहे. मुलगा-मुलगी यांच्या प्रमाणात बराच बदल झाला आहे. संपूर्ण देशभरात हा बदल जाणवतो आहे. मी याबद्दल हरियाणातील लोकांचे विशेष अभिनंदन करतो. जेव्हा लोक मनापासून एखादी गोष्ट करायचे ठरवतात, तेव्हा अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते,हे यावरून दिसून येते. लवकरच हरयाणा संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवेल, असा मला विश्वास वाटतो.
हरयाणाचे भविष्य घडविण्याच्या कामी येथील युवा वर्ग मोठी आणि महत्वाची भूमिका बजावत आहेत. हरयाणाच्या युवा खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावून नेहमीच देशाच्या सन्मानात भर घातली आहे.
संपूर्ण देशभरात विकासाची नवी शिखरे गाठण्यासाठी युवा शक्तीच्या आणखी योगदानाची आवश्यकता आहे. हे शतक भारताचे शतक बनविण्यासाठी आपल्या या युवकांना क्षमता आणि कौशल्ये प्रदान करणे, हे भारताचे उद्दिष्ट्य आहे.
मित्रहो, राष्ट्रीय युवा महोत्सव आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. विविध संस्कृतींमधून आलेल्या आपणा सर्व युवकांना परस्परांना जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत या उक्तीचा खरा अर्थ हाच आहे. आत्ताच, थोड्या वेळापूर्वी युवा महोत्सवांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे संचलन झाले.
“एक भारत-श्रेष्ठ भारत”, हा देशाच्या सांस्कृतिक विविधतेला एका सूत्रात गुंफण्याचा एक प्रयत्न आहे. आमच्या देशात भाषा अनेक असतील, आहार पद्धतींमध्ये विविधता असेल, रीती-पद्धती वेगवेगळ्या असतील, पण आत्मा एकच आहे. त्या आत्म्याचे नाव आहे, भारतीयत्व. आणि या भारतीयत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
एका राज्यातील युवक इतर राज्यांतील युवकांना भेटतील तेव्हा त्यांनाही एक वेगळा अनुभव मिळेल, परस्परांबद्दल आदर वाटू लागेल, समज वाढेल. लोक जेव्हा एकत्र राहतात, भेटतात तेव्हा लक्षात येते की खाण्यापिण्यातील आणि भाषेतील फरक वरवरचे आहेत. खोलवर पाहिले तर आमची मूल्ये, मानवता, विचार सारखेच आहेत, हे उमजते.
मित्रहो, एक भारत-श्रेष्ठ भारत अंतर्गत दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर्षभरासाठी भागिदारी तयार करण्यात आली आहे. या वर्षी हरयाणाने तेलंगणासह भागिदारी केली आहे. दोन्ही राज्यांनी परस्पर सहकार्याचे काम करायचे मुद्दे निश्चित केले आहेत. आज तेलंगणमधून हरयाणामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना बरेच काही विशेष शिकता येईल, असा विश्वास मला वाटतो.
“एक भारत-श्रेष्ठ भारत” ही केवळ एक योजना नाही. एखाद्या जनआंदोलनाप्रमाणे याचा प्रसार केला जातो आहे. जेव्हा याला युवकांची साथ लाभेल, तेव्हाच हे यशस्वी होऊ शकेल.
माझ्या युवा सहकाऱ्यांनो, या वर्षी देश पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची शताब्दी साजरी करतो आहे. देशातील युवकांसाठी पंडितजींचा मंत्र होता- चरैवति-चरैवति, चरैवति अर्थात चालत राहा, चालत राहा. थांबायचे नाही, रेंगाळायचे नाही, राष्ट्र निर्मितीच्या मार्गावर पुढे चालतच राहायचे आहे.
तंत्रज्ञानाच्या आजच्या काळात देशातील युवकांना तीन C वर लक्ष केंद्रीत करावे लागेल. हे तीन C म्हणजे COLLECTIVITY, CONNECTIVITY आणि CREATIVITY. COLLECTIVITY अर्थात सामुहिकता म्हणजेच आपण संघटीत शक्ती झाले पाहिजे, सर्व भेदभाव बाजूला ठेवून फक्त भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे. CONNECTIVITY म्हणजे संलग्नता किंवा जोडणी. आता देश बदलला आहे, तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आले आहे. संपूर्ण जग आपल्या हातात, आपल्या तळव्यात मावेल, इतके लहान झाले आहे. संलग्नता ही काळाची गरज आहे. आपण CONNECTIVITY च्या दृष्टीने तंत्रज्ञानासोबत आमच्या मानवी मूल्यांनाही जपत पुढे जाऊ. तिसरा C म्हणजे CREATIVITY अर्थात नवे विचार. नाविन्यपूर्ण कल्पना. जुन्या समस्या सोडविण्यासाठी नव्या उपाययोजना. युवकांकडून हीच अपेक्षा असते. जेव्हा कलात्मकता संपून जाते, नाविन्य लोप पावते तेव्हा आयुष्यही थिजून जाते. म्हणूनच आपल्याला शक्य होईल तेवढी आपल्यातील नाविन्याला संधी दिली पाहिजे.
म्हणूनच परस्परांशी संपर्क साधा, सामूहिक जबाबदाऱ्या पार पाडायला शिका आणि नव्या कल्पनांवर काम करा. लोक काय म्हणतील किंवा हे किरकोळ आहे, असा विचार करून तुमच्या मनातल्या कल्पना झटकून टाकू नका. लक्षात ठेवा की जगात बहुतेकदा मोठे आणि नवे विचार सुरूवातीला फेटाळले गेले आहेत. जी विद्यमान यंत्रणा असते, ती नव्या विचारांना विरोध करते. मात्र आमच्या देशाच्या युवा शक्तीसमोर असा कोणताही विरोध नेस्तनाबूत होईल, असा विश्वास मला वाटतो.
सहकाऱ्यांनो, आजपासून ५० वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी एकात्म मानववादावर बोलतांना पंडित दिन दयाळ उपाध्याय यांनी जे भाष्य केले होते, त्यात देशातील युवकांसाठी मोठा संदेश आहे. दिन दयाळ उपाध्याय यांनी राष्ट्र निर्माण आणि देशातील अपप्रकारांशी लढा देण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते, “ आम्हाला अनेक रीती नष्ट कराव्या लागतील. अनेक सुधारणा कराव्या लागतील, आमच्या मानव विकासासाठी आणि देशाच्या एकात्मतेच्या वाढीसाठी जे पोषक असेल, ते आम्ही करू आणि जे बाधक असेल ते नष्ट करू. ईश्वराने जे शरीर दिले आहे त्यात त्रुटी शोधून किंवा आत्मग्लानी सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता नाही. शरीरावर गळू झाले तर शस्त्रक्रिया आवश्यक असते. सजीव आणि कार्यक्षम अवयव कापण्याची गरज नाही. आज जर समाजात अस्पृश्यता आणि भेदभाव दिसून येत असेल, ज्यामुळे लोक माणसाला माणूस मानायला तयार होत नसेल आणि ते देशाच्या एकतेसाठी घातक ठरत असेल, तर आम्ही ते संपवणार, त्याचा खातमा करणार.”
पंडितजींचे हे आवाहन आजही तितकेच महत्वाचे आहे. आजसुद्धा देशात अस्पृश्यता आहे, भ्रष्टाचार आहे, काळा पैसा आहे, निरक्षरता आहे, कुपोषण आहे. या सर्व वाईट बाबींचा नायनाट करण्यासाठी देशाच्या युवा शक्तीला झोकून देऊन काम करावे लागेल. हल्लीच काही दिवसांपूर्वी सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईचे तरूणाईने ज्या प्रकारे स्वागत केले त्यावरून समाजातील कुप्रथा आणि समस्या दूर करण्याची किती तीव्र इच्छाशक्ती त्यांच्या मनात आहे, हे सिद्ध झाले.
म्हणूनच, माझा देश बदलतो आहे, असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामागे आपले हे प्रयत्न असतात. देशाच्या विविध भागांमध्ये हजारो-लाखो युवक आपापल्या परीने समाजातील कुप्रथा आणि आव्हानांविरोधात लढा देत आहेत. इतकेच नाही तर ते असे अनेक नवे विचार समोर आणत आहेत की मला त्यांना अभिवादन केल्याशिवाय राहवत नाही.
अलिकडेच काही दिवसांपूर्वी “मन की बात” मध्ये मी एका मुलीचा उल्लेख केला होता. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना परतीची भेट म्हणून आंब्याचे रोप दिले जावे, अशी कल्पना तिने दिली होती. पर्यावरण वाचवण्याचा हा खरोखरंच चांगला उपाय असू शकतो.
अशाच प्रकारे एका भागातील नागरिक कचऱ्याच्या डब्यांच्या कमतरतेमुळे त्रासले होते. त्या वेळी तेथील युवकांनी एकत्र येऊन कचऱ्याचे डबे आणि जाहिरातींची सांगड घातली. आता तेथील रस्त्यांवर तुम्हाला कचऱ्याचे डबे दिसतील ज्यावर जाहिरातीही वाचता येतील. आता तेथील कचऱ्याच्या डब्यांना डस्टबीन नाही तर ॲडबीन म्हटले जाते.
येथे असेही काही तरूण आहेत ज्यांनी मागच्याच महिन्यात रीले पद्धतीने केवळ १० दिवसात सुमारे ६ हजार किलोमिटर अंतर सायकल चालवून Golden Quadrilateral Challenge हे आव्हान पूर्ण केले. यांचे घोषवाक्य फार छान आहे – Follow the rules and India will Rule अर्थात नियमांचे पालन करा तरच भारत राज्य करेल.
आमच्या देशात उर्जेने भारलेले असे तरूण प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. कोणी डोंगरातून उगम पावणाऱ्या लहान झऱ्यापासून वीज निर्माण करतो आहे, कोणी कचऱ्यातून घरात वापरण्याजोग्या वस्तू तयार करत आहे, कोणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे तर कोणी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी वाचविण्याच्या कामी प्रयत्न करीत आहे. असे लाखो युवक राष्ट्र निर्माणाच्या कामी दिवस रात्र एक करीत आहेत.
उर्जेने परिपूर्ण अशा या प्रत्येक युवकासाठी मला स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचा पुनरूच्चार करावासा वाटतो. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.
उठा चा अर्थ आहे, शरीराला चैतन्यमय करा, शरीराला उर्जेने परिपूर्ण करा, शरीराला स्वस्थ राखा. अनेकदा असे होते की लोक उठतात, पण जागे होत नाहीत. त्यामुळे त्यांना परिस्थितीचे योग्य आकलन होत नाही. म्हणूनच उठण्याबरोबरच जागे होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही, थांबू नका. यातही मोठा संदेश आहे. सर्वात आधी ध्येय स्पष्ट असणे गरजेचे आहे.
कुठे जायचे आहे हे निश्चित होत नाही तोवर कोणत्या दिशेने जायचे आहे आणि कोणत्या गाडीने जायचे आहे हे सुद्धा निश्चित होऊ शकणार नाही. म्हणूनच जेव्हा ध्येय निश्चित होईल तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी न थांबता अथक प्रयत्न करीत राहा.
मित्रांनो, माझ्या समोर तुम्ही सर्व देशाची बौद्धिक ताकत म्हणून उपस्थित आहात. आज गरज आहे युवकांच्या उर्जेचा रचनात्मक उपयोग करण्याची. आज गरज आहे युवकांना दिशाहीन होण्यापासून वाचविण्याची. आज गरज आहे युवकांना व्यसने आणि गुन्ह्यांपासून दूर ठेवण्याची. आपण चिंतन आणि मनन करून नवा मार्ग तयार करा, नवी उद्दीष्ट्ये गाठा. आपल्या समोर शक्यतांचे मोकळे आकाश आहे.
युवकांनी सेवेचे आदर्श उदाहरण घालून देणे ही आजची गरज आहे. त्यांचे चारीत्र्य इमानदार आणि निष्पक्षपाती असावे. प्रत्येक आव्हान पेलण्याचे धैर्य त्यांच्यात असावे. आपल्या गौरवशाली परंपरांचा त्यांना अभिमान असावा. त्यांचे आचरण आणि चारित्र्य नैतीक मूल्यांवर आधारित असावे. मी हे वारंवार सांगतो आहे कारण ध्येय साध्य करणे जेवढे कठीण असते, तेवढेच लक्ष्यापासून विचलित होणे सोपे असते.
सुखी- समृद्ध आयुष्याची इच्छा असणे चूक नाही. मात्र त्याचबरोबर समाज आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीचे भान असणेही आवश्यक आहे. मी तुम्हाला १, २, ३, ४, ५ आणि ६ अशा आव्हानांबद्दल सांगू इच्छितो, ज्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे.
1.समाजाप्रती अज्ञान
2.समाजाप्रती असंवेदनशीलता
3.समाजाप्रती साचेबद्ध विचार
4.जाती-धर्मापलीकडे विचार करण्यातील अक्षमता
5. माता-भगिनी- मुलींबरोबर गैरवर्तन
6.पर्यावरणाप्रती बेजबाबदार, बेपर्वा वृत्ती
ही सहा आव्हाने आजच्या युवकांनी लक्षात घेतली पाहिजेत आणि त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण जेथे असाल, ज्या क्षेत्रात काम करीत असाल, तेथेही या आव्हानांबद्दल विचार करा. त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करा.
आपण सर्व युवक तंत्रज्ञान स्नेही आहात. समाजात सकारात्मक परिवर्तन कसे घडवून आणावे, हा संदेश आपणा सर्व युवकांनाच समाजापर्यंत पोहोचवायचा आहे.
जे वंचित आहेत, शोषित आहेत, त्यांच्या आयुष्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. इतरांचे भविष्य सुधारण्यासाठी आपण सर्व युवकांनी आपली उर्जा आणि वेळेचे योगदान द्यावे. बदल घडवून आणण्याच्या कामी युवकांची ताकत, युवकांची उर्जा आणि युवकांची आस्था अधिक प्रभावी ठरते. आता कोट्यवधी युवकांच्या आवाजाला या देशाचा आवाज होऊन विकास कामे मार्गी लावण्यात मदत करायची आहे.
माझ्या सहकाऱ्यांनो, आपण सर्वांनी नव्या क्षितीजांना स्पर्श करावा, विकासाचा नवा दृष्टीकोन तयार करावा, नवे यश प्राप्त करावे. याच सदिच्छेसह आपणा सर्वांना राष्ट्रीय युवा दिवस आणि महोत्सवाच्या अनेक शुभेच्छा. स्वामी विवेकानंदांचे पुण्यस्मरण करीत आमच्या अंतरातील ऊर्जा सोबत घेत समाजाच्या, राष्ट्राच्या, कुटुंबाच्या, गावातील गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्यातील काही वेळ देण्याचा संकल्प करू या. लक्षात घ्या, आयुष्यात जे करण्यात आनंद मिळेल, त्या आनंदाची, समाधानाची जी ताकत असेल, ती स्वत:च उर्जेचे रूप धारण करेल. माझ्या आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तरूणांच्या रूपात एक प्रकारे लघु भारतच माझ्या डोळ्यांसमोर साकारला आहे. हा लघु भारत नवा प्रेरणा, नवा उत्साह घेऊन आला आहे. ही भूमी गीतेची आहे, जी निष्काम कर्माचा संदेश देते. निष्काम कर्मयोगाचा संदेश देते. तोच सोबत घेऊन आपण मार्गक्रमण करा. या युवा महोत्सवासाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा.
धन्यवाद!!!