या सभागृहामध्ये जागा कमी पडली आहे, त्यामुळे आणखी एका कक्षामध्ये बहुधा खूप लोकांना बसवण्यात आले आहे, असे मला सांगण्यात आले आहे. त्यांचंही मी आदरपूर्वक स्मरण करतो.
आज 11 सप्टेंबर आहे. सन 2001 च्या आधी या 11 सप्टेंबरचे काय महत्व आहे हे विश्वाला माहितीच नव्हते. दोष जगाचा नव्हता तर दोष आमचाच होता. आपणच हा महत्वपूर्ण दिवस विसरलो. आपल्याला जर या दिवसाचं विस्मरण झालं नसतं तर कदाचित 21व्या शतकातला हा भयानक 9-11 नसता. सव्वाशे वर्षांपूर्वी 11 सप्टेंबर या दिवशी या देशाचा एक नवयुवक, कल्पना करा जवळपास तुमच्याच वयाचा असेल, फार तर 5-7 वर्षांनी मोठा असू शकेल. भगवी वस्त्रधारी तुमच्या वयाचा युवक, दुनियेला तर त्यांनी घातलेले कपडेही वेगळे, अपरिचित होते. संपूर्ण विश्व ‘गुलाम‘ भारताचा प्रतिनिधी या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. परंतु त्या नवयुवकाच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड ताकद होती. गुलामीची छाया त्याच्या चिंतनामध्ये नव्हती की व्यवहारामध्ये नव्हती, की वाणीमध्ये नव्हती. असा कोणता वारसा त्याने स्वत: जतन करून ठेवला होता की, गुलामीची हजार वर्षे उलटल्या नंतरही ऱ्हृदयात ज्वलंत ज्वाला धगधगती होती. त्यांच्यात प्रंचड विश्वास होता की या विश्वाला खूप काही देण्याचं सामर्थ्य या धरतीमध्येच आहे, इथल्या चिंतनामध्ये, इथल्या जीवनशैलीमध्ये हे सामर्थ्य आहे. हा विश्वास असणं म्हणजे असामान्य घटना आहे.
आता आपणच विचार करून पाहा, चोहोबाजूंनी नकारात्मकता आहे, आपला विचार विधायक नाही, चोहोबांजूनी विरोधांचे स्वर उमटत आहेत आणि तरीही आपलं म्हणणं मांडायचं असेल तर किती भिती वाटते. आपल्या बोलण्याचा कोणी चुकीचा अर्थ तरी काढणार नाही ना, असा विचार मनात येतो, आणि बोलतांना चार वेळा विचार करतो. इतकं प्रचंक दडपण, दबाव येत असतो, परंतु या महापुरूषामध्ये अशी कोणती शक्ती होती की, त्याने कधीच असं दडपण, दबाव अनुभवला नाही. आतमध्ये असणारी ज्वाला, आतमध्ये उठणारे तरंग, मनात असलेला आत्मविश्वास, या भूमीमध्ये असलेली ताकद खूप चांगली जाणणारी व्यक्ती विश्वाला सामर्थ्य देण्याचा, योग्य दिशा देण्याचा, समस्यांचे निराकरण करून मार्ग दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न करते. “सभ्य स्त्री-पुरुष हो” या शब्दांशिवाय काही गोष्ट बोलली जाते, हे तर जगाला जणू माहितीच नव्हतं. ‘ अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो, या दोन शब्दांच्या उच्चारानंतर काही मिनिटे टाळयांचा कडकडाट होत राहिला... त्या दोन शब्दांमधून भारताच्या अमर्याद ताकदीचा परिचय त्या युवकाने करून दिला होता. तो दिवस 9-11चा होता. त्या व्यक्तीने तपस्या करून माता भारतीची पदयात्रा केली आणि माता भारतीला आपल्यामध्ये जतन करून ठेवलं होतं. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत प्रत्येक भाषा, प्रत्येक बोली त्या युवकाने आत्मसात केली होती. एकप्रकारे त्याने तपस्येने भारतमातेच्या शाश्वततेसाठी अनाहूत जादू आपल्या आतमध्ये सामावून घेतली होती. असा एक महापुरूष एक-दोन क्षणामध्ये संपूर्ण विश्वाला आपलंस करून घेतो. संपूर्ण विश्वाला आपल्या आतमध्ये समाविष्ट करून घेतो. हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या वेगवेगळ्या मानव संस्कृती तो महापुरूष आपल्यामध्ये सामावून घेवून विश्वाला आपलेपणाची नवीन ओळख देतो. विश्वाला जिंकून घेतो. माझ्यासाठी 9-11 हा दिवस, विश्व विजयाचा दिवस आहे. हा विश्व विजयाचा दिवस होता आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी उगवलेला 9-11हा दिवस भयानक होता. मानवाला विनाशाच्या मार्गाकडे नेणारा, संहाराच्या मार्गावर नेणारा दिवस अमेरिकेच्या भूमीने अनुभवला. मात्र याच भूमीवर आपल्या देशाच्या महापुरुषाने प्रेमाचा, आपलेपणाचा महान संदेश दिला होता. अमेरिकेच्या धरतीवर महापुरुषाने दिलेल्या संदेशाचे विस्मरण झाल्याचे परिणाम म्हणजे, मानवाला संहाराच्या मार्गाचे एक विकृत रूप संपूर्ण जगाला दिसले. आणि त्यामुळे संपूर्ण विश्व हादरून गेलं. 9-11चा हल्ला अनुभवल्यानंतर जगाला लक्षात आलं की, भारतामधून निघालेला आवाज 9-11 ला कोणत्या रूपामध्ये इतिहासात जागा देणार आहे. विनाश आणि विकृतीच्या मार्गावरून जाणारा 9-11 विश्वाच्या इतिहासामध्ये कोणत्या प्रकारे अंकुरित झाला होता, आणि त्याची वाढ खुंटली होती. आणि म्हणूनच आज 9-11 या दिवशी विवेकानंदजी यांना वेगळया रूपाने समजून घेण्याची, जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटतंय.
आपण अगदी बारकाईने लक्षात घेतलं, अभ्यासलं, तर विवेकांनंदजींची दोन रूपं दिसतात. जगामध्ये ते जिथं जिथं गेले, कुठंही त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांनी मोठ्या विश्वासानं, मोठ्या गौरवानं भारताचा नावलौकिक वाढवला. भारताच्या महान परंपरांचा महिमा त्यांनी कथन केला. भारताच्या परंपरांचा महिमा सांगताना, भारताच्या चिंतनाचा महिमा सांगताना, माहिती देतांना ते कधीच थकले नाहीत. कधी ते थांबले नाहीत, हे सांगू की नको- अशी व्दिधा मनस्थिती त्यांनी कधी अनुभवली नाही. हे विवेकानंद यांचे एक रूप होतं. आणि ज्यावेळी ते भारतामध्ये बोलत असत, त्यावेळी ते आपल्याकडच्या वाईट प्रथा, वाईट परंपरा यांच्यावर जाहीरपणे टीका करीत असत, हे त्यांचे दुसरे रूप होते. आमच्या आतमध्ये जी दुर्बलता आहे, त्यावर कठोर वार करत होते. आणि ते ज्या भाषेचा, शब्दांचा उपयोग करीत असत, ती भाषा आज आम्ही वापरली तर कदाचित लोकांना आश्चर्य वाटेल. किती कटू बोलतात हे असेही आज लोक म्हणतील. समाजात असलेल्या सगळया वाईट गोष्टी, प्रथा, परंपरा याविरूद्ध ते आवाज उठवत होते. आणि आता तुम्ही तो कोणता काळ होता, याचा विचार करा. त्याकाळात कर्मकांडाला जास्त महत्व होतं. पूजा, पाठ, परंपरा रोजच्या जगण्याचा एक महत्वपूर्ण भाग होता. अशा काळात 30 वर्षांचा नवयुवक, अतिशय कर्मठ वातावरणामध्ये उभा राहून म्हणतो की, असे पूजा-पाठ करून, पूजा, अर्चना करीत मंदिरामध्ये बसून काही देव-बिव भेटणार नाही. जनसेवा हीच प्रभूसेवा आहे. जा, जनता जनार्दन, गरीबांची सेवा केली तरच देव भेटेल... किती प्रचंड ताकद आहे.
जी व्यक्ती बाहेर, संपूर्ण विश्वात कुठेही गेली की भारताचे गुणगान करीत होती, तीच व्यक्ती भारतामध्ये आल्यानंतर मात्र भारतामधील वाईट परंपरांवर कठोर प्रहार करीत होती. ते संत परंपरेतून आले होते मात्र आयुष्यात ते कधी गुरूचा शोध घ्यायला गेले नाहीत. हा शिकण्यासारखा आणि जाणून घेण्याचा विषय आहे. ते गुरू शोधण्यासाठी नाही बाहेर पडले. ते सत्याच्या शोधात होते. महात्मा गांधीही आयुष्यभर सत्याचा शोध घेत होते. ते सत्य शोधत होते. कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी होत्या. रामकृष्ण देव कालीमातेकडे पाठवतात. जा, तुला जे काही पाहिजे ते कालीमातेकडे माग. आणि त्यांनी विवेकानंदांना नंतर विचारलं, काही मागितलंस? तर विवेकांनद बोलले, ‘ नाही मागितलं.’ प्रत्यक्ष कालीमातेसमोर उभे असतानाही काहीही मागण्यास तयार नाही, ही बुद्धी कशी असेल, ती मनोवस्था कशी असेल, अशी कोणती ऊर्जा आत असेल, असं कोणतं, आणि सामर्थ्य असेल. वर्तमानात समाजात असलेल्या वाईट गोष्टींविरूद्ध लढण्यासाठी सामर्थ्य लागते. आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टींविरूद्ध लढणार नाही का? आम्ही स्वीकार करणार. अमेरिकेच्या भूमीवर विवेकानंदजींनी ‘ अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो, म्हटले, हे जाणून आपण नाचतो, वाहवा करतो. परंतु माझ्या देशातच विशेषतः नवयुवकांना मी विचारू इच्छितो, आपण महिलांचा सन्मान, आदर करतो का? आपण कन्या, मुलींकडे आदराने, मानाने पाहतो का? जर कोणी असा मुलींचा आदर करीत असेल तर त्यांना मी शंभरवेळा नमस्कार करतो. परंतु जी व्यक्ती आतला माणूस जाणून घेत नाही त्याला मानव कळणार नाही. ही सुद्धा एक ईश्वराने निर्मिलेली कृती आहे. आपल्या बरोबरीची आहे. या भावनेने तुम्ही जर पाहत, विचार करीत नसाल तर मात्र स्वामी विवेकानंदजींच्या ‘अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो’ या शब्दांना टाळ्या वाजवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आपल्याला त्यापूर्वी 50 वेळा विचार करावा लागेल.
विवेकानंदजी म्हणायचे, जनसेवा हीच प्रभूसेवा, याचा आपण कधी विचार केला आहे? आता पाहा, 30 वर्षांचे वय असतानाच संपूर्ण विश्वात ख्याती प्राप्त झालेली व्यक्ती आहे. त्या गुलामगिरीच्या कालखंडामध्ये दोन व्यक्तिंनी भारतामध्ये एक नवी चेतना, नवी ऊर्जा दिली. दोन महत्वपूर्ण घटना म्हणजे, एक ज्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला ती. आणि ज्यावेळी स्वामी विवेकानंदजींच्या 9-11च्या भाषणाची चर्चा संपूर्ण देशात, दुनियेमध्ये होऊ लागली, ती घटना. भारतामध्ये असलेल्या गुलामगिरीच्या कालखंडामध्ये एक नवचेतनेची भावना संपूर्ण भारतामध्ये या दोन घटनांमुळे निर्माण झाली. दुनियेमध्ये बाहेर हे सांगताना इतका अभिमान वाटतो की, भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांनी श्रीलंकेचे, बांगलादेशाचे आणि स्वत:चा देश भारताचेही राष्ट्रगीत त्यांनीच लिहिले आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामगिरीचा आपल्याला अभिमान वाटतो तो पोकळ नाही, हे आपण पाहिले पाहिजे. आज हिंदुस्तान, दुनियेत एक युवा देश आहे. विवेकानंदजींनी शिकोगामध्ये ज्या वयात भाषण दिले होते त्याच किंवा त्यापेक्षाही कमी वयोगटातील युवकांची संख्या देशात 800 दशलक्ष आहे. या देशाची 65 टक्के लोकसंख्या संपूर्ण विश्वात डंका वाजवणा-या विवेकानंदजींच्या वयापेक्षा कमी वयाची आहे. 65 टक्के जनतेला विवेकानंदांपेक्षा मोठी प्रेरणा आणखी काय असू शकते आणि म्हणूनच विवेकानंदजींनी काम कसे केले, त्यांचे काम फक्त उपदेशाचे नाही तर त्यांनी कल्पनांचे रूपांतर ध्येयवादामध्ये केलं. या ध्येयवादाचं आणि कल्पनांचं उत्तमप्रकारे एकत्रीकरण त्याला नेटकी संस्थात्मक चौकट त्यांनी तयार केली. सुमारे 120 वर्षांपूर्वी या महापुरुषाने रामकृष्ण मिशन या संस्थेला जन्म दिला. त्यांनी विवेकानंद मिशनला जन्म दिला. रामकृष्ण मिशनला जन्म दिला. ही गोष्ट खूप लहान आहे, परंतु शहाण्यांना फक्त संकेत पुरेसा असतो. आणि त्यांनी ज्या भावनेतून रामकृष्ण मिशनचा उदय झाला त्यामध्ये आजतागायत कधी संभ्रम निर्माण झाला आहे की त्यामध्ये कधी फेरफार केला गेला आहे, असे घडलेच नाही. एका संस्थेची मजबूत पायाभरणी त्यांनी कशी केली असेल. पाया किती मजबूत असणार. दृष्टीकोन किती स्पष्ट, स्वच्छ असणार. कृती कार्यक्रम किती सक्षम असणार. भारताविषयीच्या प्रत्येक गोष्टींबाबत किती सखोल विचार केलेला असणार. हे सर्व आज लक्षात येत आहे. 120 वर्षांनीही ते आंदोलन आजही तशाच भावनेने सुरू आहे.
या महान परंपरेमध्ये काही क्षण सहभागी होवून त्याचं तीर्थ प्राशन करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे थोर सौभाग्य मानतो. ज्यावेळी विवेकानंदजींच्या 9-11च्या भाषणाचा शताब्दी वर्षदिन होता, त्यादिवशी मला शिकागोला जाण्याचं सौभाग्य मिळालं. त्या सभागृहामध्ये जाण्याचं सौभाग्य मिळाले होते. आणि त्या शताब्दी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभलं होतं. मी कल्पना करू शकतो, त्यावेळी भावविश्व कसे असेल, तो क्षणाला कोणत्या भावना असतील.
या जगात कोणी विचार केला असेल का, की कोणा एखाद्या व्याख्यानाची सव्वाशे वर्ष समारंभ साजरा केला जावू शकतो. काही क्षणासाठी मुखातून निघालेले उद्गार, काही क्षण गुंजलेली वाणी, शब्द सव्वाशे वर्षांनंतरही जीवंत आहे, जागृत आहे, जागरूती निर्माण करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे. ही गोष्ट आपल्या- तुमच्या, आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक महान वारसाच्या रूपाने कायम ठेवण्याची संधी आहे.
मी इथे आलो, तर माझ्या कानावर ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्‘ असा गुंजारव झाला. सगळे पूर्ण ताकदीने जयघोष करीत होते. तो ऐकून अंगावर काटा उभा राहतो. मनामध्ये भारतभक्तीची एक भावना अगदी सहजतेने निर्माण होते. परंतु मी फक्त सभागृहात उपस्थितींनाच विचारतोय असे नाही तर संपूर्ण हिंदुस्तानला विचारतोय, ‘ आपल्याला वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे तरी का? मला ठावूक आहे, माझं हे बोलणं अनेक लोकांना आघात करणारं आहे. मला माहीत आहे, परंतु 50 वेळा 50 वेळा विचार करा, आपल्याला वंदे मातरम् म्हणण्याचा खरोखरीच अधिकार आहे का? आपणच लोक पान खाऊन त्या भारत मातेवर पिचकारी मारत आहोत आणि पुन्हा वंदे मातरम् म्हणतो आहोत. आपणच रोज सगळा कचरा भारत मातेवर फेकतो आणि परत वंदे मातरम् म्हणतो. वंदे मातरम् म्हणण्याचा या देशात सर्वात पहिला अधिकार आहे तो देशभरात स्वच्छतेचं काम करणा-या त्या भारत मातेच्या ख-या पुत्रांना आहे. जे सफाई करतात. आणि म्हणूनच, आणि म्हणूनच आपण या गोष्टीचा जरूर विचार करा की, ही आमची भारत माता सुजलाम् सुफलाम् भारत माता, आपण स्वच्छता करो अगर न करो, परंतु तिला घाण करण्याचा हक्क आपल्याला नाही. गंगेविषयी श्रद्धा आहे, गंगेत स्नान केलं की पापक्षालन होतात. प्रत्येक नवयुवकाला वाटतं, आपल्या आई-वडिलांना एकदा गंगास्नान करवून आणावे. परंतु आपण तीच गंगा घाण करण्यावर नियंत्रण आणू शकतो. आज विवेकानंदजी असते, तर या गोष्टीवरून त्यांनी रागवले नसते की फटकारले नसते? आम्ही कधी बोलतो तर कधी नाही.म्हणूनच लोकांना कधी कधी वाटतं की, आम्ही स्वस्थ आहोत याचे कारण म्हणजे भरपूर डॉक्टर आहेत. उत्तमोत्तम डॉक्टरांची फौज आहे. असं अजिबात नाही की, आमच्याकडे उत्तमोत्तम डॉक्टर आहेत म्हणून आम्ही स्वस्थ नाही.
माझ्यासाठी कोणीतरी स्वच्छतेचं काम करतो, म्हणून आपण स्वस्थ आहोत. डॉक्टरांपेक्षा जास्त त्या सफाई कामगाराला आदर दिला, तर आपल्याला वंदे मातरम् म्हणण्याचा आनंद मिळणार आहे. आणि म्हणूनच मी मागे एकदा म्हणालो होतो, आधी शौचालय आणि मग देवालय, हे अगदी बरोबर माझ्या स्मरणात आहे. माझ्या या विधानामुळे अनेकांनी अगदी केस उपटून घेतले होते. परंतु आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की, देशात अशा कन्या आहेत, की त्यांनी घरामध्ये शौचालय नसेल तर त्या घरातील मुलाशी विवाह न करण्याचा निर्धार केला. आपण लोक हजारों वर्षे टिकून आहोत, याचे कारण काय आहे? आपण सगळे काळानुरूप परिवर्तन करतो, आपल्यामध्ये बदल घडवतो. आपण आतमध्ये अशा लोकांना जन्म देत असतो, की आपल्यातील वाईट प्रवृत्तीविरुध्द लढण्यासाठी नेतृत्व देतो आणि हीच खरी आपली ताकद असते. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदजींचे आपण ज्यावेळी स्मरण करतो, तेव्हा त्यांचे 9-11चे शब्द म्हणजे केवळ शब्दभंडार नव्हता. ती एका तपस्वीची वाणी होती. एक तपवाणी होती. त्या वाचेने अवघी दुनिया अभिभूत झाली. नाहीतर हिंदुस्तानची आठवण म्हणजे साप-गारूड्यांचा देश, जादू-टोणा करणा-यांचा देश, एकादशीला काय खायचे आणि पौर्णिमेला काय नाही खायचे, हीच आमच्या देशाची ओळख होती. काय खायचे, काय नाही खायचेही माझ्या देशाची संस्कृती परंपरा नाही. ही तर आमच्या व्यवस्थेचा एक भाग आहे. आमची सांस्कृतिक व्यवस्था वेगळीच आहे. ‘आत्मवत् सर्व भूतेषू’ असा आमचा विचार आहे. ‘अहम् ब्रह्मास्मि‘ अशा गोष्टी नाहीत. ‘कृण्वन्तो विश्वं आर्यम्‘ यामध्ये आर्य हा शब्द आम्ही संपूर्ण विश्वाला सुसंस्कृत करणार आहोत, या अर्थाने आहे. इथं कोणत्याही जाती परिवर्तन आणि धर्म परिवर्तनासाठी नाही. आणि म्हणूनच ज्या महान वारशाने आपण त्या परंपरेत लहानाचे मोठे झालेली माणसे आहोत, ती सर्व या भूमीची निर्मिती आहे.
अनेक पिढींच्या तपस्येतून निघालेली गोष्ट... या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये काही ना काही तरी त्यामध्ये भर घातलीच आहे. हाच खरा देश आहे. भीक्षा मागणाराही त्यावेळी ज्ञानाने भरलेला घडा होता. ज्यावेळी कोणी काही मागायला येतं, त्यावेळी म्हणतात, देणा-याचं भलं आणि न देणा-याचंही भलं. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदजी यांच्या यशाचं मूळ होतं ते, त्यांच्या आतमध्ये आत्मसन्मान आणि आत्मगौरवाची भावना होती. आणि आत्म म्हणजे एखादी व्यक्ती असा अर्थ नाही. तर ज्या देशाचे ते प्रतिनिधित्व करीत होते त्याचा हा महान वारसा आत्मगौरव आणि आत्म सन्मानाच्या रूपामध्ये त्यांनी प्रस्तुत केला होता. आपण काय बोलतो, याविषयी आपण कधी विचार करतो का? एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण गेलो. अगदी मस्त, सुंदर निसर्ग असतो. स्वच्छ, निटनेटका परिसर असतो. पाहून खूप छान वाटलं की, आपल्या तोंडून उद्गार निघतात, ‘‘ अरे हे पाहून आपण हिंदुस्तानात आहोत, असं वाटतच नाही....म्हणतो की नाही आपण असं. सांगा, असं होतं की नाही? जर मनामध्ये आत्म-सन्मान, आत्म गौरव असेल आणि तशीच भावना मनात ठेवून आपण मोठे झाले असू तर, हा माझा देश वाटत नाही, असं मनात येणार नाही. उलट देशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल. काहीही झालं तरी माझ्या देशातही हे आहे, असं चांगलं आहे.
मी अगदी खरंच सांगतो, आजच्या काळाचा संदर्भ घेवून तुम्ही विवेकानंदजींचा विचार करा..... काही लोकांना वाटतं की, मी ज्यावेळी मेक इन इंडिया, मेक इन इंडिया असं म्हणतो, त्यावेळी त्याला विरोध करणारेही अनेक लोक आहेत. काहीजण म्हणतात, मेक इन इंडिया नाही, तर मेड इन इंडिया पाहिजे. असेही अनेक लोक म्हणतात. अनेक बुद्धिजीवी लोक तर नाना त-हेच्या गोष्टी काढतात. परंतु ज्यांना विवेकानंदजी आणि जमशेदजी टाटा यांच्यामध्ये झालेला संवाद जर कोणाला माहीत असेल तर वेगळेच म्हणतील. विवेकजी आणि जमशेदजी टाटा यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार जर कोणी पाहिला, वाचला असेल तर काही समजेल. त्यावेळी हिंदुस्तान गुलामीमध्ये होता. त्यावेळीही विवेकानंदजी 30 वर्षांचे नवयुवक होते. आणि जमशेदजी टाटांसारख्या व्यक्तीला ते म्हणत होते की, भारतामध्ये उद्योग सुरू कराना, “मेक इन इंडिया” बनवा दस्तूरखुद्द जमशेदजी टाटा यांनी लिहिले आहे की, विवेकानंदजींनी सांगितलेली ती गोष्ट मला प्रेरणादायी ठरली. आणि या प्रेरणेमुळेच मी या भारतामध्ये उद्योग निर्मिती करण्यासाठी गेलो.
आपण जाणून हैराण व्हाल, आपल्या देशामध्ये पहिली कृषी क्रांती विवेकानंदजींच्या विचारातून झाली आहे. भारतामध्ये कृषी क्रांती करण्याची आवश्यकता आहे, आणि डॉक्टर सेन हे पहिल्या कृषी क्रांतीचे जनक मानले जातात. त्यांनी एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेचे नाव ‘विवेकानंद कृषी संशोधन संस्था’ असे ठेवले होते. म्हणजेच हिंदुस्तानमध्ये कृषी क्षेत्राला आधुनिक बनवले पाहिजे, वैज्ञानिक संशोधनातून शेती केली पाहिजे. असे विचार विवेकानंदजी त्या वयामध्ये करीत होते.
आज आमचे नवयुवक विद्यापीठांमध्ये जातात त्याची खूप चर्चा होते. आजची 9-11 ही तारीख पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी कार्यक्रमाशीही संबंधित आहे. आणि आज 9-11 ज्या महापुरुषाने गांधीजींना ‘महात्मा’बनवलं, त्या आचार्य विनोबा भावे यांच्याही जयंतीचा दिवस आहे. आज मी ज्यावेळी ही गोष्ट सांगतो, दीनदयाळजींच्या विचारांना ज्यांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल. त्यांना लक्षात येईल. हा भावनांचा आधुनिक संदर्भ लावायचा असेल तर ती प्रगती आहे. अन्त्योदय आहे, जनसेवा ही प्रभूसेवा आहे. असेही विवेकानंदजी म्हणत होते. आचार्य विनोबाजी यांचे निकटवर्तीय सहकारी दादा धर्माधिकारी.... गांधीजी जो विचार करीत होते, ते व्यक्त करण्याचं काम आयुष्यभर विनोबाजींनी केले. आणि विनोबाजी जे काही विचार करत होते, त्याला शब्दरूप् देण्याचं काम दादा धर्माधिकारी यांच्या चिंतनातून दिसून येतं. दादा धर्माधिकारी यांनी एका ग्रंथामध्ये फार मजेदार लिहिले आहे. कोणीएक नवयुवक त्यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी आला. त्यांच्या कोणी परिचितांनी त्याला पाठवलं होतं. त्याला वाटत होतं की, धर्माधिकारीजी कोणाला तरी शिफारस करतील, सांगतील, शब्द टाकतील आणि आपल्याला नोकरी मिळायला मदत होईल. दादा धर्माधिकारी यांनी लिहिले आहे की, मी त्याला विचारलं, तुला काय येतं? त्यानं उत्तर दिलं, ‘मी पदवीधर आहे’. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, तुला काय येतं? दुस-यांदा त्यानं उत्तर दिलं, ‘मी पदवीधर आहे’. त्याला लक्षातच येईना की, दादा धर्माधिकारी यांना काय उत्तर अपेक्षित आहे. ते काय विचारत आहेत, हेच त्या तरुणाला समजेना. तिस-या वेळेस त्यांनी विचारलं, ‘अरे बाबा, तुला येतं तरी काय?’ उत्तर तेच. ‘मी पदवीधर आहे’. धर्माधिकारी यांनी अखेर विचारलं, ‘ तुला टंकलेखन येतं?’ ‘‘नाही’’ तुला भोजन बनवता येतं? ‘‘नाही’’ फर्निचर बनवता येतं? ‘‘ नाही’’ बरं चहा,नाश्ता बनवता येतो तुला? ‘‘ नाही हो, मी तर पदवीधर आहे.’’ आता पाहा, विवेकानंदजींनी काय सांगितलं आहे. विवेकानंदजींची प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूला हादरून टाकणारी आहे. तो त्यांचा स्वभाव होता, ते त्याच भाषेत बोलत होते. आणि त्यांनी खूप मजेशीर पद्धतीने सांगितलं आहे. ‘‘ शिक्षण म्हणजे काही माहिती, ज्ञानाचा खजिना नाही. तो मेंदूमध्ये भरायचा नसतो. असा ठासून भरला तर पचणारही नाही. फक्त पाच कल्पना डोक्यात घ्या आणि त्यांच्या पूर्तीसाठी तुमचं आयुष्य खर्ची घाला. तुमचं व्यक्तिमत्व घडवा.... सांगायचे तात्पर्य हेच आहे की, विवेकानंदजींनी ज्ञान आणि कौशल्य हे दोन्ही वेगळे केले होते. आज संपूर्ण विश्वात कोणीही सांगेल, एकाच्या हातात पदवी प्रमाणपत्र आहे, तर दुस-याच्या हातात कौशल्य आहे. कोणाला, कशाला महत्व आहे, हे कोणीही सांगू शकेल. या सरकारनेही हाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल्य विकास.
आमच्या देशात कौशल्य विकास हा विषय नवीन नाही. परंतु आधी हा विभाग विखुरला गेला होता. त्याला कोणी मालक नव्हता. ज्याची मर्जी चाले तसे या विभागाचे काम चालत असे. आम्ही आल्यानंतर सगळया कौशल्य विकास विभागाला एकत्र आणलं. आणि त्याचे एक स्वतंत्र मंत्रालय बनवलं. आणि फोकस निश्चित करून कौशल्य विकास हा देशाच्या नवयुवकांसाठी कार्यक्रम तयार केला. या युवकांना कधीही, कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, यासाठी काम सुरू केलं. माझ्या देशाचा युवक काम मागणारा नाही तर रोजगार निर्माण करणारा बनला पाहिजे. माझ्या देशाचा युवक याचक, मागणारा नाही तर दाता, देणारा बनला पाहिजे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी स्वामी विवेकानंदजींच्या विचारांचं स्मरण केलं जातं त्यावेळी तो नवसंकल्पना, संशोधन यानंतर जुन्या-पुराण्या वस्तूंचा बहिष्कार करण्याचं आवाहन करतो. कितीही महान, कितीही चांगली वस्तू असली तरी ती सोडण्याचं आवाहन केलं जातं.
समाजाची प्रगतीही नित्य नाविन्यतेवर अंवलंबून असते. नित्य नूतन गोष्टीत ऊर्जा असते, म्हणून आपण यशस्वी आहोत. आणि म्हणूनच आपल्या देशाची युवापिढी साहसाने ओतप्रोत भरलेली असली पाहिजे. नवसंकल्पना प्रत्यक्षात आणतांना अनेकांच्या मनात थोडी भीती असते. अरे, जर आपल्याला अपयश आलं तर, असा विचार त्यांच्या मनात येत असतो. या जगात अपयशाचं तोंड पाहिल्याशिवाय यशस्वी झालेला माणूस तुम्ही कधी पाहिला आहे का? अपयशच तर यशाचा मार्ग बनवत असतो. आणि म्हणूनच अपयशाला घाबरून काहीच करायचं नाही, असं आयुष्य नसतं, मित्रांनो. जो कोणी काठावर उभा असतो, तो कधीच पाण्यात बुडत नाही. परंतु पाण्यात उडी घेणारा बुडतोही आणि बुडता बुडताच पोहायलाही शिकतो. काठावर उभे राहून लाटा मोजता येतात. परंतु लाटांवर स्वार होऊन सागर पार करण्याचं सामर्थ्य आपण मिळवलं पाहिजे. तलावात, नदीमध्ये, सागरामध्ये उडी टाकून सामर्थ्य निर्माण करणारा युवक स्वामी विवेकानंदजींना अपेक्षित आहे. असाच सामर्थ्य वान नवयुवकांकडून अनेक अपेक्षा ठेवता येतात.
आज भारत सरकार मोहीम राबवत आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, मुद्रा योजनेतून बॅंक हमी देवून पैसे मिळतात. माझी इच्छा आहे की, आपल्या देशाच्या नवयुवकांनी देशाच्या समस्यांवर उत्तर शोधावीत त्यासाठी नवकल्पनांमधून नवेनवे उत्पादने करावीत आणि लोकांकडे जावे. हिंदुस्तान ही एक मोठी बाजारपेठ आहे. माझ्या देशाच्या नवयुवकांच्या बुद्धी आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाची हीच वेळ आहे. आणि विवेकानंदजींनी ज्याप्रमाणे ज्ञान आणि कौशल्य वेगवेगळे केले आहे, त्याच भाावनेने, आजच्या काळाची मागणी लक्षात घेवून आम्हीही कौशल्याचे महत्व जाणले आहे. हे सगळे काही एका रात्रीत होत नाही. आपणच पुढे न्यायचे आहे. आपण पाहणारच आहे, त्याचे परिणामही वेगळे होत आहेत. नवकल्पनांचा विचार करून आम्ही नीती आयोगाव्दारे आम्ही ‘अटल इनोव्हेशन मिशन अॅप तयार केले आहे. त्यालाच जोडून अटल टिंकरिंग लॅब्स आहेत. देशातली लहान -लहान मुलांनी केलेल्या नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक चळवळ सुरू केली आहे. अगदी शांतपणे ही चळवळ सुरू आहे, हे विशेष. प्रतिभावान मुले नवनव्या गोष्टी समोर आणत आहेत. आधी प्रणवदा राष्ट्रपती असताना एकदा मी राष्ट्रपती भवनामध्ये नवनवीन प्रयोग करणा-या देशभरातल्या मुलांना आमंत्रित केलं होतं. 12-15 मुलं आपला नवीन प्रयोग घेवून आले होते. प्रणवदांनी मला या मुलांना एकदा भेटावं असं सांगितलं होतं. मी भेटलो. 8वी, 9वी, 10 वी च्या वर्गातली ही मुलं होती. टाकाऊ, कच-यातून चांगली टिकावू वस्तू कशी तयार करायची याचा हा प्रकल्प होता. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की, भारतामध्ये प्रतिभेला काही तोटा नाही. यावर आपण विचार केला पाहिजे. आज संपूर्ण जगामध्ये विदेश नीतीविषयी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते. हा समूह, तो गट, हा तट, त्या समूहाचे शीतयुद्ध असे वेगवेगळे छान छान शब्द वापरले जातात. कधी विवेकानंदजींची विदेश नीती काय होती, याविषयी कोणी वाचलं आहे का? स्वामी विवेकानंदजींनी जी गोष्ट 120 वर्षांपूर्वी सांगितली होती, त्याचा प्रत्यय आज संपूर्ण दुनियेला येत आहे. त्यांनी सांगितलं होतं, ‘एक आशिया’! एक अशियाची संकल्पना त्यांनीच मांडली होती. आणि ‘एक अशिया’ या संकल्पनेव्दारा त्यांनी स्पष्ट केलं होतं की, संपूर्ण जग ज्यावेळी संकटांनी घेरलेलं असेल त्यावेळी मार्ग, दिशा दाखवण्याची क्षमता जर कोणात असेल तर ती एक अशियामध्येच असेल. एक अशिया सांस्कृतिक वारशाचा धनी आहे. आज दुनियेत म्हटलं जातं, 21वे शतक अशियाचे असणार कोणी म्हणतं चीनचे असणार तर कोणी म्हणतं, भारताचं असणार. परंतु यामध्ये अजिबात मतभेद नाही की, संपूर्ण दुनिया 21वं शतक अशियाचं असणार आहे, असं म्हणतेय.
125 वर्षांपूर्वी ज्या महापुरूषाला जाणवलं आणि त्यानं ‘एक अशिया’ ही कल्पना केली. जगाच्या या पूर्ण चित्राचा विचार केला तर लक्षात येतं, की आतमध्ये ‘एक अशिया’ कल्पना ही अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकते. समस्या सोडवण्याची पायाभूत क्षमता ‘एक अशिया’ मध्ये आहे. हजारो वर्षांचा वारसा म्हणजे काय आहे, याचेच दर्शन विवेकानंदजींनी दिले आहे. आणि म्हणूनच आधुनिक संदर्भामध्ये आपल्याला विवेकानंदजींना पाहावे लागणार आहे. ते उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची गोष्ट करतात. त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, गोष्टीमध्ये भारत सामर्थ्यवान, सशक्त कसा बनेल. त्यासाठी आधार काय असेल तर कृषी क्रांतीची गोष्ट ते करतात. आणि दुसरीकडे नवकल्पनांची गोष्ट करतात. तिसरीकडे ते व्यावसायिकांविषयी बोलत होते. आणि समाजामध्ये जे दोष आहेत, त्याच्याविरूद्ध लढा पुकारण्याचीही गोष्ट ते करतात. स्पृश्य-अस्पृश्यतेला विरोध करीत, या विषयावर तर त्यांनी खूप विचार व्यक्त केले आहेत. अस्पृश्यता मानणे म्हणजे वेडाचार आहे, असं ते म्हणत होते. असे स्पृश्य-अस्पृश्य मानणे, मानाने लहान-मोठा असा भेद करणे वेडेपणा आहे, असे त्यांचे विचार होते. या महापुरूषाने आपल्याला असेच खूप काही दिले आहे. आज दीनदयाळजींची जन्मशताब्दी साजरी होत आहे. त्यांनीही भेदाभेद संपुष्टात आणण्यासाठी अंत्योदय योजना आणली. स्वामीजीही अंत्योदयाविषयी बोलत होते.
महात्मा गांधीजीही कोणत्याही योजनेविषयी निर्णय घेतला जाताना, समाजाच्या अगदी शेवटच्या टोकाशी, तळाशी असलेल्या घटकाला त्या योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे पहावे. तो मिळत असेल, तर आपण घेतलेला निर्णय योग्य ठरेल, असे म्हणत होते.
काही दिवसांपूर्वी काही युवकांनी एक कार्यक्रम केला. अटलजींच्या काळामध्ये सुवर्ण चतुष्कोण बनवण्यात आला होता. या मार्गांवरून त्यांनी सायकल रिले करीत प्रवास केला. या युवकांनी बहुतेक 6हजार किलोमिटर सायकलवरून रिले खेळ केला. त्यांचा एक खूप चांगला मंत्र होता की, ‘‘ फॉलो द रूल अॅंड इंडिया विल रूल’. आपण 125 कोटी देशवासीयांनी फक्त ‘ फॉलो द रूल’ एवढंच केलं तरी विवेकानंदजींचे स्वप्न पूर्ण होईल. माझा भारत विश्व गुरू बनेल. आणि मग आपोआपच भारत राज्य गाजवेल. परंतु आधी आपण नियमांचं पालन केलंच पाहिजे. आणि म्हणूनच या भावनेतून आपण आज विवेकानंदजी यांच्या भाषणाचे 125 वे वर्ष आणि पंडित दीनदयाळ यांचे शताब्दी वर्ष आणि सौभाग्याने विनोबाजींची जयंती साजरी करीत आहोत. तर दुसरीकडे तो भयानक 9-11चा संहार आहे. विनाश करून दहशतवादाच्या खाईत जगाला लोटणारा दिवस आहे. माणूस माणसाचा शत्रू बनला आहे. अशा वेळी ‘वसुधैव कुटुम्बकम’ हा विचार पुढे नेला पाहिजे. आपण लोक तर निसर्गामध्येही परमात्म्याला पाहणारे आहोत. रोपांमध्ये आपण परमेश्वर पाहतो. नदीलाही आपण माता मानतो. संपूर्ण ब्रह्मांडाला परिवार मानणारे लोक संकटांनी घेरलेल्या मानवतेला, संकटांनी घेरलेल्या विश्वाला आपण कधी काही देवू शकणार आहे? ज्यावेळी आपण आपल्या गोष्टींचा अभिमान बाळगू, आणि काळानुरूप होणारे बदल स्वीकारणार आहे, त्याचवेळी काही देवू शकणार आहे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, समाजासाठी घातक आहेत, त्या नष्ट केल्याच पाहिजेत. मग त्यासाठी समाजातील मान्यता योग्य आहेत, असा कितीही दावा केला गेला तरी, अयोग्य गोष्टींच्या विरूद्ध आवाज उठवून त्या नष्ट केल्या पाहिजेत.
स्वामी विवेकानंद यांनी ज्या रामकृष्ण मिशनची स्थापना केली,त्याला 125 वर्षे झाली आहेत. 2022मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होणार आहेत. नवयुवकांनो, यानिमित्त आपण काही संकल्प करू शकतो. आणि संकल्प... हे आपले जीवन व्रत बनवले पाहिजे. ‘मी अमूक करेनच’ असं ठरवा. आणि मग तुम्हीच पाहा, जगण्याचा एक वेगळा आनंद तुम्ही घ्याल. कधी कधी आपल्या देशात असा विवाद होतो की, महाविद्यालयीन विद्यापीठाचे विद्यार्थी असे वाद निर्माण करतात. विद्यापीठाच्या अध्यक्षपदी असलेले सगळे निवडणुका जिंकून आलेले विद्यार्थी नेते आहेत. सगळेच विद्यार्थी आहेत...पण राजकारण कोठून सुरू होतेय आणि कोठे जावून संपत आहे, हा एक चिंतनाचा विषय झाला आहे. परंतु मी कधी कधी पाहतो, विद्यार्थी दशेत राजकारण करणारे लोक ज्यावेळी निवडणूक लढवतात, त्यावेळी आपण हे करू, आपण ते करू अशी भाषणबाजी करतात. परंतु कोणीही आपण महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणार असे सांगत नाही. विद्यापीठाच्या निवडणुका झाल्यानंतर दुसरे दिवशी तुम्ही त्या परिसरामध्ये जावून पाहावे, काय दिसते. काय पडलेले असते? काय होत आहे.... पुन्हा वंदे मातरम् ...काय? 21 वे शतक हिंदुस्तानचे शतक बनवायचे आहे. 2022 हे वर्ष स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष म्हणून साजरे करायचे आहे. गांधींच्या स्वप्नातला हिंदुस्तान, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या स्वप्नातला हिंदुस्तान, सुभाषबाबूंच्या स्वप्नातला हिंदुस्तान, विवेकानंदांच्या स्वप्नातला हिंदुस्तान बनवण्याची जबाबदारी आपल्यावरच नाही का? आणि म्हणूनच व्यवस्थापनवाल्यांना शिकवलं जातं ना, ‘एव्हरीबडी इज समबडी, नोबडी’ जे कोणी व्यवस्थापनवाले असतील त्यांनी शिकलं असेल हे आणि अखेर परिणामी काही नाही. आणि म्हणूनच आवश्यकता आहे ती ‘हे मी करणारच,ही जबाबदारी माझीच आहे‘ असा निर्धार करून ती स्वीकारण्याची. मग आपल्याला दिसून येईल, हिंदुस्तानला बदलण्यासाठी वेळ नाही लागणार. आणि जर 125 कोटी हिंदुस्तानींनी एक पाऊल पुढे टाकलं तर हिंदुस्तान 125 कोटी पावले पुढे जाणार आहे.
महाविद्यालयांमध्ये मी पाहिलं आहे, काही जणांना चांगलं वाटतं तर काहींना वाईट. लोक कशालातरी विरोधही करतात. असे लोकही थोडेफार आहेत. महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे दिवस साजरे करतात. आज काय ‘रोज डे’ आहे... काही लोकांचे विचार असे दिवस साजरे करण्याच्या विरोधात आहेत. असे विरोधक इथेही बसले असतील... मी अशा गोष्टींचा विरोध करीत नाही.
लक्षात घ्या आपल्याला काही यंत्रमानव तयार करायचा नाही. आपल्याला नवनिर्मिती पाहिजे. आपल्या आतल्या माणसामध्ये असलेल्या संवेदना प्रगट होण्यासाठी विद्यापीठाच्या परिसराइतकी चांगली, उपयुक्त जागा दुसरी कोणतीही नाही. परंतु कधी आपल्या मनात असा विचार येतो का? की हरियाणातल्या महाविद्यालयाने तमिळ दिवस साजरा करण्याचा निर्णय घ्यावा. पंजाबातल्या महाविद्यालयांमध्ये केरळ दिवस साजरा करावा. दोन गाणी त्यांची ऐकावीत, त्यांच्यासारखी वेशभूषा करावी आणि महाविद्यालयात त्या दिवशी यावे. हाताने भात खाण्याची सवय लावून घ्यावी. महाविद्यालयामध्ये एखादी मल्याळी चित्रपट पहावा. तमिळ चित्रपट पहावा. तिकडच्या काही नवयुवकांना बोलवावे. तुमच्या तामिळनाडूत अगदी आतल्या वस्तीमध्ये कोणते खेळ कसे खेळतात. चला आपण मिळून खेळूया. मला सांगा असे केल्याने दिवस साजरा होईल की नाही होणार? तो साजरा केलेला दिवस विधायक, काही तरी शिकवणारा ठरेल की नाही ठरणार? यामुळे एक भारत श्रेष्ठ बनेल की नाही बनणार? आपण सगळे अनेक नारे लावत असतो. ‘विविधतेमध्ये एकता’ पासून ते अशी विविधतेमध्ये आम्ही गौरव मानतो... मला सांगा खरोखरीच असे आपण मानतो का? जोपर्यंत हिंदुस्तानमध्ये आपल्या प्रत्येक राज्याविषयी आपण गौरवाची भावना मनात निर्माण करीत नाही, प्रत्येक भाषेविषयी गौरवाची भावना निर्माण करीत नाही.... मला आठवतेय आत्ताच मला तमिळ विद्यापीठातले तमिळनाडूचे नवयुवक मी वर येत असताना भेटले. मी त्यांना वणक्कम म्हणालो...तर ते एकदम खूष झाले. त्यांना मनाला खूप बरं वाटलं. आपलेपणा वाटला. असे आपलेपणाचे वातावरण विद्यापिठांमध्ये निर्माण करावं असं आपल्या मनात येत नाही? अशाप्रकारे दिवस साजरे करावे असं नाही वाटत? आपल्या विद्यापीठामध्ये एका वर्षी शीख गुरू दिवस साजरा करावा आणि पंजाबातील शीख गुरूंनी कोणता त्याग केला, तपस्या केली, बलिदान दिले याची माहिती घ्यावी. आपण फक्त भांगडयापर्यंतच जाऊन थांबणार आहोत का? पराठा आणि भांगडा. पंजाब यापेक्षाही खूप पुढे आहे. आणि म्हणूनच आपण काहीतरी वेगळे करून त्यामधून जाणून घेतले पाहिजे. नवनिर्मितीशिवाय आयुष्य निरस आहे. आपण यंत्रमानव नाही बनवू शकत... परंतु आपल्या आतमध्ये असलेला माणूस प्रत्येक क्षणी जागता राहिला पाहिजे. देशाची ताकद वाढेल, देशाचे सामर्थ्य वाढेल, या देशाला ज्याची आवश्यकता आहे, असे वेगळे काही तरी तुम्ही करा. आपण या गोष्टींकडे जर अधिक काळ दुर्लक्ष केलं तर आपण हळू हळू आकूंचित पावत जावू.
विवेकानंदजी कूपमंडूक वृत्तीविषयी एक कथा नेहमी सांगायचे. विहिरीमधल्या बेडकाची गोष्ट सांगायचे. आपण तसे बनू शकत नाही. आपण तर ‘जय जगत’ म्हणणारे लोक आहोत. संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं आहे आणि आपणच एका खुराड्यामध्ये बंदिस्त राहिलो तर काय होईल, याचा कोणी विचारही करू शकत नाही. उपनिषदांपासून ते उपग्रहांपर्यंत आपला प्रवास सुरू आहे. आणि विश्वाचा प्रत्येक विचार जर आपल्याला अनुकूल आहे, मानवतेला अनुकूल आहे, तो स्वीकार करण्यामध्ये संकोच आपण केला नाही. आणि आपण घाबरलोही नाही. कोणी येईल आणि आम्हाला चिरडून टाकेल, असं घडणार नाही. तर कोणीही सामोरं आलं तरी त्याला पचवायचे, असा विचार करणारे आपण आहोत. समोरच्याला आपलंस करतानाच त्याच्यातील चांगले गुण घेवून पुढे जायचे आहे. अशी वाटचाल केली तर भारत या विश्वाला देण्याइतका सामर्थ्य वान बनेल. आणि म्हणूनच काही कालखंडामध्ये आम्ही गुलामीचं आयुष्य जगलो. त्यावेळी आम्ही संरक्षित स्वभावाचे होतो, तसाच तो काळ आम्ही व्यतीत केला. आज आपल्याकडे इतके सामर्थ्य पाहिजे की, बाहेरच्या कोणत्याही गोष्टी आम्हाला त्रासदायक वाटणार नाहीत. त्यांचा विचारही करण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, आणि मी तर दुनियेमध्ये जिथे जिथे जातो, तिथे अनुभवतो की, हिंदुस्तानकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. ही ताकद काही राजकीय शक्तीने आलेली नाही, तर ही क्षमता जनशक्तीची आहे. ही सव्वाशे कोटी देशवासियांची ताकद आहे. आमच्यातील वाईटाला जर आपण स्वतःच्या सतरंजीखाली दाबत राहिलो, तर मात्र दुर्गंधी आणि सडक्याशिवाय काहीही मिळणार नाही. आपल्याला या वाईटाविरूद्ध लढले पाहिजे. आपल्या आतल्या वाईटाच्याविरोधात लढले पाहिजे. भारताला आधुनिक बनवण्याचं स्वप्न आपण पाहिलं पाहिजे. आपला देश आधुनिक का नाही होणार? माझ्या देशाच्या युवकांनी दुनियेची बरोबरी का करू नये? देशाने सामर्थ्यवान का होऊ नये? कधी काळी मी एका महापुरुषाला भेटलो होतो. खूप आधीची ही गोष्ट आहे. त्यांनी माझे भाषण ऐकले असेल, त्याविषयी चर्चा सुरू होती. त्याकाळी मी राजकारणात नव्हतो. ते म्हणाले, आपल्या हिंदुस्तानात एक समस्या आहे. मी म्हणालो, कोणती समस्या? तर म्हणाले, आपण लोक पाच हजार वर्षांपूर्वी असे होते, दोन हजार वर्षांपूर्वी तसे होते. बुद्धाच्या काळात असे होते, रामाच्या युगात असे होते. यातून आपण कधी बाहेरच पडलो नाही. दुनिया तुम्ही आज कुठे आहात त्यावर तुमचे मूल्यांकन होते. आपल्याकडे एक महान परंपरा आहे, म्हणून आपण भाग्यवान नक्कीच आहोत. परंतु आपले दुर्भाग्य असे आहे की आपण त्या गौरवगानाच्या पुढे जायला तयारच नाही. गौरवगान पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे असले पाहिजे. गौरवगान मागे राहून आहे तिथेच अडकून पडण्यासाठी नकोय. आपल्या अशा गौरवगानापासून पुढे जायचे आहे. आणि युवा, युवा हे काही एका परिस्थितीचे शीर्षक नाही. मित्रांनो, युवा एक मनःस्थितीचे नाव आहे. जो घडून गेलेल्या भूतकाळामध्येच रममाण होत राहतो, त्याला युवा मानता येणार नाही. परंतु जी गोष्ट घडून गेली आहे, त्यातील चांगले, श्रेष्ठ घेवून जो येणारा उद्या आहे, त्याचा विचार करतो, समजून घेतो, ऐकतो, पुढे जातो तो युवा आहे. त्या युवा भावनेच्या आतमध्ये सामावून घेवून पुढे जाण्याचा संकल्प करावा .या भावनेबरोबर आज दीनदयाळ उपाध्यायजींना मी नमन करतो. स्वामी विवेकानंदजींना नमन करतो. श्रीमान विनोबा भावेजींना नमन करतो. आणि आपणा सर्व माझ्या देशवासीय नवयुवकांना खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद !