व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापक जगदीश मुखी जी, मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल, अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेम खंडू जी, हेमंत विश्वकर्मा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजन गोहाई जी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो…
आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येनं इथे आशीर्वाद द्यायला आले आहात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. आज ईशान्य भारतासाठी अत्यंत महत्वाचा, ऐतिहासिक दिवस आहे. देशातल्या सर्वात लांब रस्ते-रेल्वे पुलाच्या उद्घाटनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !
मी आताच या पुलावरुन तुमच्यापर्यत आलो आहे. माझे मन अत्यंत प्रसन्न आहे.
मित्रांनो, आज संपूर्ण जग ख्रिसमस साजरा करत आहे. आसामसह पूर्ण ईशान्य भारतातील नागरिकांना नाताळच्या शुभेच्छा! आसामी समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित असलेल्या स्वॉर्गोदेउ साउलुंग सु-का-फा को यांना मी वंदन करतो.
त्यासोबतच, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असलेला लसीत बोरफुकॉन, वीर शिलाराई, स्वॉर्गोदेउ सर्बानंद सिंह्, बीरागंना हॉति साधिनी, बोदौसा, बीर राघव मोरान, मानिक रजा, हॉति जॉयमॉति, हॉति राधिका यांच्यासह ईशान्य भारतातील सर्व नायक-नायकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
स्वातंत्र्यलढ्यापासून ते देश आणि आसामच्या नवनिर्मितीसाठी अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे. राजकारणापासून ते समाजसेवा, ज्ञान-विज्ञान ते क्रीडाक्षेत्रात आसामचा गौरव करणारी कामगिरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला माझी आदरांजली !
आसामच्या स्वरकोकीळा, पद्मश्री दीपाली बोस ठाकूर यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनामुळे देशविदेशातल्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आसामी आवाज हरपला आहे.
मित्रांनो, सुशासनासाठी समर्पित आयुष्य जगलेले, देशातल्या महान व्यक्तिमत्वांपैकी एक अशा सहृदयी अटल बिहारी वाजपेयी यांचीही आज जयंती आहे. त्यांची जयंती देशभरात सुशासन दिन म्हणून साजरी केली जात आहे. बंधू भगिनींनो, सुशासनाचा अर्थ आहे जनतेचे कल्याण ! सर्वसामान्य माणसाचे आयुष्य अधिक सुकर, चांगले करण्यासाठीचा संस्कार म्हणजे सुशासन ! आपले-परके, माझं-तुझं यापलिकडे जात जेव्हा देश आणि समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात, जेव्हा आयुष्य सुकर आणि सुखकर करणाऱ्या व्यवस्था आणि स्रोत निर्माण केले जातात, तेव्हा सुशासन स्वराज्यकडे वाटचाल करु लागते. जेव्हा 'सबका साथ, सबका विकास' ह्या मंत्रानुसार काम सुरु होते आणि देशाच्या संतुलित विकासाला प्राधान्य दिले जाते, तेव्हा सुशासन स्वराज्याकडे वाटचाल करु लागतो. मित्रांनो, हाच प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकार आणि आता आसाम आणि अरुणाचल प्रदेशचे सरकार करत आहे. मला अतिशय आनंद होत आहे की, आज सुशासनाचे एक मोठे प्रतीक, ऐतिहासिक बोगीबील रस्ते रेल्वे पुलाच्या लोकार्पणाचे आपण साक्षीदार होत आहोत. या देशातला सर्वात मोठा रस्ता-रेल्वे पूल आहे. पूर्णपणे पोलादापासून तयार झालेला हा देशातला पहिलाच पूल आहे.पाण्याच्या 30 मीटरपेक्षाही अधिक उंचावर बनलेला हा पूल भारतीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सामर्थ्याचं दर्शन घडवणारा आहे. एकाच वेळी गाड्या आणि रेल्वेगाड्यांचे वजन सहन करण्याची क्षमता असलेला हा पूल भारताच्या लष्करी सामर्थ्याला कित्येक पटीने वाढवणारा आहे.
बंधू आणि भागिनींनो, हा केवळ पूल नाही, तर या भागातल्या लाखो लोकांच्या आयुष्याला जोडणारी जीवनरेषा आहे. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल दरम्यानचे अंतर कमी झाले आहे. इटानगर आणि दिब्रूगडदरम्यान रेल्वे प्रवासाचे अंतर 700 किलोमीटर वरुन 200 किलोमीटर्स पर्यत घटले आहे. रेल्वेने ज्या प्रवासासाठी आधी 24 तास लागायचे, तोच प्रवास आता केवळ 5-6 तासांत पूर्ण होणार आहे. 5 किलोमीटर लांबीच्या या पूलामुळे आसामचा तीन सुखीया आणि अरुणाचल प्रदेशातील नाहर यांच्यातले केवळ अंतर कमी झालेले नाही, तर जनतेचे कष्ट कमी झाले आहेत,त्यांचे आयुष्य सोपे झाले आहे.
मला सांगण्यात आले आहे की घेमाजी लखीमपुर आणि अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधल्या लोकांना नावेतून ब्रह्मपुत्रा नदी पार करावी लागत असे. किंवा मग रस्ता आणि रेल्वेमार्गाने पूर्ण दिवसभर प्रवास करावा लागत असे. अनेक गाड्या बदलाव्या लागत. बंधू-भगिनीनो, आज ज्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे, ती १४ डब्यांची थेट ट्रेन आहे. या गाडीमुळे या पूर्ण परिसरात अभूतपूर्व परिवर्तन होणार आहे. जे स्वप्न बघत अनेक पिढ्या संपल्या, ते स्वप्न आज साकार झाले आहे. आता दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळूरूला जाण्यासाठी इथल्या लोकांना गुवाहाटीला जाण्याची गरज भासणार नाही. आरोग्याच्या सोयी असतील, शिक्षणसुविधा, रोजगार, व्यापार उदीम, अशा सगळ्यासाठी दिब्रुगड हे आसाममधले खूप मोठे केंद्र आहे. लाखो लोकांना इथे येण्याची गरज भासते. विशेषतः गंभीर आजाराच्या स्थितीत दिवसभर रुग्णांना अत्यंत त्रासात दिवसभराचा प्रवास करावा लागत असे, त्यावेळी या प्रवासाचा किती त्रास व्हायचा हे तुम्हा सर्वाना चांगलेच माहिती आहे.
मित्रांनो, दिब्रुगड मेडिकल कॉलेज, रुग्णालय आणि दिब्रुगड विद्यापीठासारख्या सुविधा आता नॉर्थ ब्लॉक मधल्या लोकांसाठी, युवकांसाठी केवळ काही मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत. या खूप मोठ्या पायाभूत सुविधेसाठी मी ईशान्य भारतातील सर्व लोकांचे अभिनंदन करतो.
या पुलाच्या निर्मितीशी संबंधित सर्व अभियंते आणि कामगार यांचेही मी कौतुक करतो, त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन अत्यंत विपरीत परिस्थितीत या पुलाचे काम पूर्ण केले. या कामासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन !
बंधू-भगिनींनो, आसाम आणि ईशान्य भारतासाठी हा दुहेरी अभिनंदनाचा दिवस आहे. कारण देशातला सर्वात मोठे रस्ते पूल आणि रेल्वे पूल दोन्ही आसामच्या भूमीवर बांधण्यात आला आहे. हे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचे सद्भाग्य आहे की देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या पुलाचे काम पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात, सदिया येथे, भूपेन हजारिका पुलाचे लोकार्पण करण्यासाठी मी आलो होतो. आज या बोगीबील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी तुमच्यामध्ये येण्याची संधी मला मिळाली. बंधू आणि भगिनीनो, गेल्या साडे चार वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा तिसरा पूल आहे. गेल्या ६० -७० वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवर तीन पूल बनले आणि गेल्या साडेचार वर्षात तीन पूल. पाच नव्या पुलांचे बांधकाम सुरु झाले आहे. जेव्हा हे सगळे पूल तयार होतील तेव्हा, ब्रह्मपुत्रेच्या उत्तर- दक्षिण किनाऱ्याच्या दळणवळणात तर सुधारणा होईलच, त्याशिवाय आहार-उद्योग आणि व्यवसायांच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल.
मित्रांनो, हेच तर सुशासन आहे. हीच तर सुराज्याकडे वाटचाल करणारी पावले आहेत. आज आम्ही दावा करु शकतो की विकासाची ही गती आसामसोबतच, संपूर्ण ईशान्य भारताचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे.
बंधू आणि भगिनीनो,
आज कदाचित असेही काही लोक इथे असतील जे तेव्हाही इथे आले असतील जेव्हा १६ वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी इथे आले होते. तेव्हापासून आजपर्यत एक पूर्ण पिढी बदलली आहे. तुम्ही खरोखरच दीर्घ काल प्रतीक्षा केली यासाठी. मित्रांनो, तुमच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनंतर या पुलाशी सबंधित प्रक्रिया दोन दशकांपूर्वी सुरु झाली, मात्र सत्य हेच आहे की, पुलाचे बांधकाम खऱ्या अर्थाने अटलजींच्या प्रयत्नांनीच सुरु झाले. मात्र दुर्दैवाने २००४ साली अटलजींचे सरकार गेले आणि त्यांनी सुरु केलेल्या इतर सगळ्या प्रकल्पांप्रमाणेच , ईशान्य भारतासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुलाचा प्रकल्पही रखडला.
बंधू आणि भगिनीनो,
आपण सगळे साक्षीदार आहात की २०१४ पर्यत कसे याठिकाणी काही अर्धवट खांबांपलिकडे काहीही काम झाले नव्हते. परिस्थिती अशी होती, कि जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा या पुलाचे अर्ध्यापेक्षाही कमी काम झाले होते. यात काहीही संशय नाही की जर अटलजींना पुन्हा एक संधी मिळाली असती तर २००७-२००८ पर्यत या पुलाचे लोकार्पण देखील झाले असते. मात्र, त्यांच्यानंतर जे सरकार सत्तेवर आले, त्यांनी तुमच्या गरजांकडे लक्ष दिले नाही.
2014 साली आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही या प्रकल्पाच्या मार्गात येणारे सगळे अडथळे बाजूला केले आणि त्याला गती दिली. सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला हा बोगीबील पूल आज जनतेच्या सेवेसाठी आम्ही समर्पित करतो आहोत.अटलजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे एक स्वप्न पूर्ण करुन राष्ट्राने त्यांना उत्तम श्रद्धांजली वाहिली आहे. ईशान्य भारतातील अनेक लोकांना आज ही भेट मिळालेली बघून त्यांचा आत्मा जिथे कुठे असेल, तिथे खुश, आनंदी झाला असेल. तुमच्या चेहऱ्यावर आज जो आनंद दिसतो आहे, तो बघून अटलजींचा आत्मा प्रफुल्लीत झाला असेल.
मित्रांनो, आधीच्या सरकारची ओळख “प्रकल्प रखडवणारे सरकार” अशी होती, मात्र आमच्या सरकारने दळणवळणाद्वारे परिवर्तन करणारे सरकार अशी ओळख निर्माण केली असून यामूळ देशाला अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळत आहेत.
12 लाख रुपयांचे असे शेकडो प्रकल्प आम्ही शोधून काढले आहेत, ज्यांचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते किंवा अत्यंत मंद गतीने सुरु होते. जर ही कामे आधीच्याच मंद गतीने सुरु राहिली असती, तर ती पूर्ण व्हायला एक दशक लागले असते. मात्र आज सुशासन दिनाच्या निमित्ताने मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की कामे रखडवणारी, अडकवणारी किंवा ना करणारी जुनी सरकारी कार्यसंस्कृती आम्ही पूर्णपणे बदलून टाकली आहे. आणि यामुळेच देशातील पायाभूत प्रकल्पांना नवी गती मिळाली आहे.
गेल्या वर्षी आम्ही मिझोराम मधील असाच अर्धवट राहिलेला जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला. याच वर्षी काही महिन्यांपूर्वी सिक्कीमच्या विमानतळाचे लोकार्पण देखील झाले. अशा अनेक योजना आहेत ज्या एकतर पूर्ण झाल्या आहेत किंवा काही ठिकाणी अतिशय वेगाने काम सुरु आहे.
मित्रांनो, आज निश्चित काळात निश्चित निधीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आता कालमर्यादा ही केवळ कागदावर लिहिण्यापुरती मर्यादित नाही, तर ती सरकारी कार्यपद्धतीतला संस्कार बनली आहे. हा संस्कार पूर्णतः आत्मसात केल्याबद्दल मी आसामच्या सोनोवाल सरकारचे अभिनंदन करतो.
आसाममधले असे अनेक प्रकल्प, जे अर्धवट होते , ते एकतर पूर्ण झाले आहेत किंवा पूर्ण होण्याच्या स्थितीत आहेत. 3 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सुमारे 700 किलोमीटर लांबीचे प्रकल्प साडेचार वर्षात पूर्ण झाले आहेत. सुमारे 6 हजार कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या एक डझनपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रचंड वेगाने सुरु आहे. नवे विमानतळ टर्मिनल असोत,रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण असो किंवा मग चौपदरीकरण, गुवाहाटी, तिनसुखीया गैस पाईपलाईन प्रकल्प असो, गुवाहाटी मध्ये एम्स सुरु करण्याचा प्रकल्प असो,किंवा मग धेमाजी येथे भारतीय कृषी संशोधन संस्था सुरु करायची असो, या सगळ्या योजनांचे काम एकतर पूर्ण झाले आहे किंवा लवकरच पूर्ण होणार आहे. जलद गतीने इंटरनेट सुविधा देणारी आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल त्रिपुऱ्यापर्यत पोहचली असून लवकरच ती आसामपर्यत पोहोचेल. यामुळे डिजिटल सेवा अधिक मजबूत होतील.
मित्रांनो, माझं असं स्पष्ट मत आहे की जेव्हा पुर्व भारताची प्रगती होईल,तेव्हाच संपूर्ण भारत प्रगत होईल. आणि ईशान्य भारत हा पूर्व भारताचे अविभाज्य अंग आहे. यामुळेच आसामसह पूर्ण ईशान्य भारतात पायाभूत सुविधा पोहचवण्याचे काम सुरु आहे.
ईशान्य भारतात सध्या सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे साडे पाच हजार किलोमीटर्स चे राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचे काम सुरु आहे. एक हजार पेक्षा जास्त किलोमीटरचे आंतरराष्ट्रीय रस्ते, भारताच्या ईस्ट ऍक्ट धोरणानुसार बनवले जात आहेत. त्यापैकी 800 किलोमीटरच्या रस्त्यांवर काही ना काहीतरी काम सुरु आहे.
रेल्वे दळणवळणाचा विचार करता, येत्या दोन तीन वर्षात ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या ब्रॉड गेजने एकमेकांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. सुमारे, 47 हजार कोटी रुपयांच्या निधीतून 15 नवे रेल्वेमार्ग तयार होत आहेत. म्हणजेच, ईशान्य भारतातील सर्वच रेल्वे मार्गाना ब्रॉडगेज मध्ये बदलले जात आहे. याआधी, ईशान्य भारतात दर वर्षी सुमारे 100 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग तयार होत असत, किंवा विस्तारीकरण होत असे. मात्र गेल्या साडे चार वर्षात दर वर्षी 350 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग बनत आहेत, किंवा ब्रॉडगेज मध्ये परावर्तित केले जात आहेत. एवढेच नाही तर, 19 जलमार्गांचे कामही सुरु आहे. इथे आसाममध्ये ब्रह्मपुत्र आणि बडाग नद्यांमधून चिटगाव आणि मंगला बंदराअंतर्गत जलमार्ग बनवले जातात आहेत.
बंधू आणि भगिनींनो, पायाभूत सुविधांशिवाय, सामान्य माणसाचे जीवनमान उंचाविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांना आसाम सरकार वेगाने पुढे नेत आहे. ह्यामुळेच, आसाममध्ये लहान मुलांना शिक्षण, युवकांना रोजगार, वडीलधाऱ्या मंडळींना औषधोपचार मिळत आहे. सामान्य लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली जातील याची खात्री बनत चलली आहे. आसामच्या भगिनींना उज्ज्वला योजनेअंतर्गत, स्वयंपाकाच्या गॅसच्या 24 लाख जोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षात, आसाममध्ये गॅस जोडणी असलेल्या घरांची संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वी हे प्रमाण 40% होतं, आज ते 80% आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत, आसाममध्ये जवळपास 32 लाख शौचालये बांधली गेली आहेत. ह्यामुळे गेल्या साडे चार वर्षात आसाममध्ये स्वच्छतेच्या कक्षा 38 टक्क्यांपासून रुंदावून 98 टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. सौभाग्य योजनेअंतर्गत गेल्या एका वर्षातच आसाम मधल्या 12 लाखाहून अधिक कुटुंबांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ह्यासोबतच आसाममध्ये विद्युतीकरणाच्या कक्षा 50 टक्क्यांपासून रुंदावून 90 टक्क्यांपर्यंत रुंदावल्या आहेत. तुम्ही ती परिस्थिती आठवा जेंव्हा चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या बंधू आणि भगिनींची बँक खाती सुध्दा नव्हती. इतकंच काय, त्यांना बँकेची नावं देखील माहित नव्हती. जन धन योजने अंतर्गत 7 लाख कामगार बंधू-भगिनींची बँक खाती उघडण्यात आली. जर पूर्ण आसामचा विचार केला तर पूर्ण राज्यात जवळपास दीड कोटी जन धन खाती उघडण्यात आली आहेत. ह्या सर्व योजना, सरकार आणि आपल्या सहकार्याने यशस्वी होत आहेत.
मित्रांनो, गरीब, शोषित, वंचितांचे सर्वात जास्त नुकसान कशामुळे होत असेल तर, तो आहे भ्रष्टाचार. मध्यमवर्गातील कुटुंबांवर सगळ्यात जास्त ताण जर कुठल्या गोष्टीचा पडत असेल तर ती आहे भ्रष्टाचार. देशाच्या विकास यात्रेच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार गरिबांचे अधिकार हिरावून घेतो. त्यांचे जगणे मुश्कील करतो. म्हणूनच गेले साडे चार वर्षे, आमचे सरकार एकीकडे गरिबांना त्यांचे अधिकार देण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराशी पूर्ण ताकदीने लढत आहे.
बंधू आणि भगिनींनो, एकीकडे, आमच्या सरकारने पंतप्रधान गृह योजनेत एक कोटी 25 लाख गरीब लोकांना घरे दिली आहेत, तर दुसरीकडे बेनामी संपत्ती कायद्याची अंमलबजावणी करत भ्रष्टाचारी लोकांची पाच हजार कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, ज्यात अलिशान बंगले आणि गाड्या आहेत, जप्त केली आहे. एकीकडे, आमच्या सरकारने तरुणांना एका दिवसात नवीन कंपनीची नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे, तर दुसरीकडे, भ्रष्टाचाराचं कुरण समजल्या जाणाऱ्या सव्वा तीन लाखापेक्षा जास्त संशयास्पद कंपन्यांची नोंदणी देखील आम्ही रद्द केली आहे. एकीकडे, सरकारने महिला आणि युवकांना स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजने अंतर्गत सात लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, तर दुसरीकडे, आधीच्या सरकारांनी बँकांचे जे लाखो करोडो रुपये बुडीत खात्यात घातले होते त्यापैकी तीन लाख कोटी रुपये आमच्या सरकारने वसूल केले आहेत. एकीकडे, आमच्या सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देत आहे, तर दुसरीकडे आरोग्य क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे.
मित्रांनो, चार वर्षांपूर्वी कुणी विचारही करू शकला नसता की हेलीकॉप्टर घोटाळ्याचा सर्वात महत्वाची व्यक्ती भारताच्या तुरुंगात जाईल. पण ह्या व्यक्तीला जेरबंद करण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली. हि आमच्या सरकारची काम करण्याची पध्दत आहे, हे आमची कार्यसंस्कृती आहे.
बंधू आणि भगिनींनो, जेंव्हा व्यवस्था पारदर्शी होते, तेंव्हा भ्रष्टाचार संपतो, सोयी-सुविधा मिळू लागतात, आयुष्य सोपं बनतं. मग ह्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसू लागतो. क्रीडा क्षेत्रावर देखील ह्याचा परिणाम दिसून येतो आहे. आज आसामसकट देशाच्या अतिदुर्गम भागातील खेडी, वस्त्या आणि छोट्या शहरांतून सर्वसामान्य कुटुंबातून आलेले युवक देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. हीमा दास सारख्या अनेक कन्या, अनेक युवक नाव-भारताच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतिक बनले आहेत.
मित्रांनो, आम्ही व्यवस्था आणि व्यवहारात परिवर्तन करून, उत्तम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देश सशक्त करण्याचं काम सुरु आहे. देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आज रस्ते, शाळा निर्मिती, शहरं-गावांचा विकास, सिंचन आणि वीज योजना आखल्या जात आहेत. ह्यावर वेगाने काम सुरु आहे. येत्या काळात जेंव्हा ह्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील, तेंव्हा जगासमोर नवीन भारताचे चित्र असेल.
मित्रांनो, अटलजींनी एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला देशाचा पाया मजबूत केला, आम्ही त्यावरच एक भव्य दिव्य भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बंधू आणि भगिनींनो,आसामच्या जनतेने, देशाच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याचे जे सौभाग्य दिले आहे, ती सेवा पूर्ण निष्ठेने करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही भाऊ-बंद आणि नातेवाईकांसाठी नाही, तर देश आणि समाजासाठी झटत आहोत. मला विश्वास आहे की आपल्या आशीर्वादाने आपण सर्व मिळून आई अखोमी आणि भारत मातेला नव्या शिखरांवर घेऊन जाऊ. पुन्हा एकदा बोगीबील पुलासारख्या अद्भुत सुविधेसाठी आपले अभिनंदन. आपण इतक्या मोठ्या संख्येने येथे आलात, आशीर्वाद दिलेत, याबद्दल मी आपल्या समोर नतमस्तक आहे.
अनेक अनेक धन्यवाद.
दोन्ही हात उंचावून माझ्या सोबत पूर्ण शक्तीने म्हणा –
भारत माता की जय.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
अनेक अनेक धन्यवाद!