देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण आडवाणी जी, गृहमंत्री श्री राजनाथ सिंह जी, मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, संसदेतील माझे सहकारी, पोलीस दलातील सन्माननीय अधिकारी वर्ग, हॉट स्प्रिंग घटनेचे साक्षीदार असलेले वीरपुत्र, हुतात्मा पोलिसांचे कुटुंबिय,इतर मान्यवर आणि माझ्या बंधू- भगिनींनो,
आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा आपल्याला शौर्याला वंदन करण्याची संधी मिळते. अशा वेळी आपल्या उरात अभिमान तर असतोच, त्याशिवाय मनात एका विलक्षण संवेदनेची अनुभूती होत असते. आज माझ्या मनात अशाच काहीशा भावना दाटल्या आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, इथे उपस्थित असलेल्या शहिदांच्या कुटुंबियांना मी आज पोलीस स्मृती दिवसानिमित्त आदरपूर्वक नमन करतो.
आजचा हा दिवस तुमच्या सेवेसोबतच, तुमचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्याचाही दिवस आहे.आपले पोलीस आणि निमलष्करी दलात ही शौर्य आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे.
ज्या पोलिसांनी लदाखच्या बर्फाळ शिखरांवर पहिल्यांदा संरक्षणाचे कार्य केले, आपले आयुष्य देशासाठी समर्पित केले अशा वीर, साहसी पोलिसांच्या वीरकथांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे पोलीस स्मृती दिन.ज्या पोलिसांनी स्वातंत्र्यापासून आपल्या कर्तव्यपथावर चालताना, आपले सर्वस्व, आपले तारुण्य आणि आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले, अशा सर्व शहीद पोलिसांच्या बलिदानाला आज वंदन करायला हवे. अशा प्रत्येक वीर-वीरांगनांना माझे शतश: वंदन! प्रत्येक शहीद पोलिसाचे कुटुंब, ज्यातील अनेक लोक आज इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांसमोर मी नतमस्तक होतो आहे. या सगळ्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे.
मित्रांनो, हे माझे सद्भाग्य आहे की मला राष्ट्रसेवा आणि समर्पणाच्या अमर गाथेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या या पोलीस स्मारकाचे राष्ट्रार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या स्मृतीस्थळाच्या आत बनलेले केंद्रीय भवन हे प्रत्येक पोलिसाचे सामर्थ्य, शौर्य आणि सेवाभावाचे प्रतीक आहे.
या शिळेच्या खाली वाहणारा जलप्रवाह, आमच्या समाजात सातत्याने वाहत असलेल्या सद्भावनेचे प्रतीक आहे. ‘शौर्याच्या भिंतीवर’ 34 हजार 844 पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यानी देशाच्या वेगवगेळ्या राज्यांमध्ये, विविध आव्हानांचा सामना करतांना आपले सर्वोच्च बलिदान दिले. मला विश्वास वाटतो की, या स्मारकातल्या नवनिर्मित वस्तूसंग्रहालयात ठेवलेली प्रत्येक वस्तू, एकेक स्मृती इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीयाला, आपल्या युवा मित्रांना, देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीला, आपल्या मुलांना आपल्या पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कार्याविषयी सतत प्रेरणा देत राहील. ज्याप्रमाणे आपण सगळे, आपल्या दिवसरात्र, न थकता, न थांबता आपल्या कर्तव्य पथावरून अढळपणे चालत राहता, प्रत्येक ऋतुत, उन्हाळा असो, थंडी असो, बर्फ असो, प्रत्येक सणाला तुम्ही देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असता. हे स्मारक बघतांना अशाचभावनांची प्रकर्षाने जाणीव होते.
मित्रांनो, केवळ तुमच्या कार्यतत्परतेमुळेच, देशाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्तींच्या पदरी निराशा येते. देशात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी कित्येक कटकारस्थाने तुम्ही हाणून पाडली आहेत. अशी कट कारस्थाने, ज्यांची माहिती कधीही बाहेर येत नाही. त्यामुळे अशा निडर कारवायांसाठी कधीही कोणी तुमची तारीफ करत नाही. शांततेत जाणारा देशातला प्रत्येक क्षण, देशाप्रती तुम्ही निभावत असलेल्या कर्तव्याचाच साक्षात्कार आहे.तुमच्या सेवाभावामुळेच देश सुरक्षित आहे.
मित्रांनो, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या प्रत्येक जवानाचे स्मरणही आज केले पाहिजे. देशाच्या नक्षलप्रभावित जिल्ह्यांमध्ये जे जवान आता या क्षणी तैनात आहेत, त्यानांही मी आज हेच म्हणेन की, तुम्ही अत्यंत उत्तम काम करत आहात. शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने तुम्ही अतिशय वेगाने वाटचाल करत आहात.
आज नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. त्या भागातले अनेक युवक आज मुख्य प्रवाहात आले आहेत. ईशान्य भारतात, पोलिसांनी गाजवलेल्या शौर्यामुळेच आज तिथे शांतता प्रस्थापित झाली आहे. शांतता आणि समृद्धीचे प्रतीक बनलेल्या ईशान्य भारताच्या विकासात तुमचेही महत्वाचे योगदान आहे.
मित्रांनो, आजचा हा दिवस देशात आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करणाऱ्या सगळ्या निमलष्करी जवानांच्या कार्याचा गौरव करण्याचाही दिवस आहे. नैसर्गिक संकट किंवा अपघाताच्या वेळी बचाव आणि मदतकार्य करणाऱ्या या जवानांच्या कामांची फारशी चर्चा होत नाही.
मी आज देशाच्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो, की गेल्या काही वर्षांपासून कुठेही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तुम्ही पहिले असेल, की एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ अशा नावांचे गणवेश घातलेले जवान अशा ठिकाणी दिवसरात्र मेहनत करून लोकांचे प्राण वाचवत असतात. मात्र देशाला माहित नाही की हे तेच खाकी वर्दीतले लोक आहेत, आपले पोलीस जवान आहेत. देश त्यांच्या या साहसाला, त्यांच्या समर्पण आणि सेवाभावाला कधीही विसरू शकत नाही. अनेकांना हे माहित नसते की कुठे ईमारत पडते तेव्हा, एखादी नाव पाण्यात उलटते तेव्हा, आग लागल्यावर, रेल्वे अपघात झाल्यावर हे बचाव आणि मदतकार्य करणारे लोक कोण असतात.
देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक पोलीस स्थानकात, प्रत्येक पोलीस चौकीवर तैनात, राष्ट्राच्या प्रत्येक संपत्तीचे रक्षण करण्यास सज्ज असलेल्या माझ्या मित्रांनो, बचाव आणि मदत कार्यासाठी तत्पर असलेल्या माझ्या सहकार्यानो, आजच्या या महत्वाच्या प्रसंगी, मी तुम्हा सर्वांना मनापासून अनेकानेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो, हे स्मारक सेवा आणि शौर्याचे प्रतीक तर आहेच, त्यासोबतच हे सरकारच्या कटीबद्धतेचेही उदाहरण आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कामात गुंतलेल्या प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाचे हे प्रतीक आहे. मला आज या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचा अभिमान वाटतो आहे, मात्र सोबतच मनात काही प्रश्नही आहेत. या स्मृतीस्थळाच्या निर्मितीसाठी 70 वर्षे का लागलीत? ज्या हॉट स्प्रिंग घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो, ती घटना तर 60 वर्षांपूर्वीची आहे. मग त्यासाठी इतकी वाट का बघावी लागली?
मित्रांनो, देशाच्या पोलीस दलाला समर्पित असे एक स्मारक बनवावे, असा विचार माझ्या मनात 25-26 वर्षांपूर्वी देखील आला होता. तेव्हाच्या सरकारने या प्रकल्पाला मंजुरी देखील दिली होती. मात्र या प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिले पाऊल अटलबिहारी वाजपेयी यांनी उचलले होते. 2002 मध्ये या प्रकल्पाचा तेव्हाचे गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या हस्ते शिलान्यासही झाला होता. आज आडवाणीजी स्वतः इथे उपस्थित आहेत आणि आपले स्वप्न साकार होतांना बघून त्यांना अतिशय अभिमान वाटत असेल. त्यांना हे आठवत असेल की त्यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर पुढे त्याचे काम झालेच नाही.
मला मान्य आहे, की काही कायदेशीर अडचणींमुळे सुरुवातीची काही वर्षे हे काम रखडले होते. मात्र जर आधीच्या सरकारची इच्छा असती, त्यांनी मनापासून प्रयतन केला असता, तर हे स्मृतीस्थळ कित्येक वर्षे आधी तयारही झाले असते. मात्र आडवाणीजी यांनी केलेल्या शिलान्यासावर आधीच्या सरकारने केवळ धूळ जमू दिली.
2014 साली जेव्हा पुन्हा रालोआचे सरकार सत्तेत आले, तेव्हा आम्ही यासाठी निधी मंजूर केला आणि आज हे भव्य स्मारक राष्ट्राला समर्पित केले जात आहे. कदाचित काही चांगली कामे करण्यासाठी परमेश्वराने माझी निवड केली आहे. हीच आमच्या सरकारची कार्यसंस्कृती आहे. निश्चित वेळेत ठरवलेले काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक ही संस्कृती विकसित केली आहे.
तुम्हाला आठवत असेल, दिल्लीत गेल्यावर्षी आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण केले गेले होते. अशाच प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या 26, अलीपुर रोड निवास स्थानाला राष्ट्रीय स्मारक बनवण्याचे कामही अटलजीच्या काळातच सुरु झाले होते. मात्र त्यांचे सरकार गेल्यावर या प्रकल्पाचे कामही थांबले. आमचे सरकार आल्यावर आम्ही आधी त्याचा शिलान्यास केला आणि याच वर्षी एप्रिल महिन्यात, त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्यही मला मिळाले. मला अतिशय आनंद वाटतो की, आज हे स्मारक जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.
मित्रांनो, कधीकधी तर माझ्या मनात एक अतिशय गंभीर प्रश्न येतो. की देशासाठी आपले सर्वस्व देणाऱ्या, शौर्य आणि बलिदानाची परंपरा यांच्याबदल आधीच्या सरकारच्या मनात एवढी अलिप्तता का होती? हे तर आपली संस्कृती आणि परंपरेत कधीही नव्हते. आम्ही तर असे लोक आहोत, ज्यांनी प्रसंगी उपाशी राहूनही देशाचा सन्मान आणि शान राखण्यासाठी आपले सगळे आयुष्य अर्पण केले.
मला सांगायला अभिमान वाटतो, की गेल्या चार वर्षात आम्ही ही परंपरा पुनरुज्जीवीत केली आहे. या परंपरेत प्रत्येक व्यक्तीला योग्य सन्मान मिळाला आहे, राष्ट्रनिर्माणात योगदान देणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला त्याचा यथोचित सन्मान आम्ही मिळवून दिला आहे.
आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे होत असलेले राष्ट्रार्पण हा याच परंपरेचा एक भाग आहे. आजपासून बरोबर दहाव्या दिवशी, म्हणजे 31आक्टोबरला गुजरातच्या केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एका गगनचुंबी पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळणार आहे. जगातला सर्वात उंच असा हा पुतळा सरदार पटेल यांनी देशासाठी केलेल्या उत्तुंग कामगिरीचे प्रतीक आणि प्रतिबिंब असेल.
मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की, हे स्मारक केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले न जाता, एक अशी व्यवस्था म्हणून विकसित व्हावे, जिथून नव्या पिढीला, आपल्या देशाची परंपरा, देशाच्या अभिमानाची माहिती होईल. पोलिसांच्या पराक्रमाची माहिती होईल. माझी तर अशीही सूचना आहे की देशासाठी त्याग आणि पराक्रम करणाऱ्या प्रत्येक हुतात्मा सैनिकाचा फोटो, ते ज्या शाळेत शिकले होते, त्या शाळेतही लावला जावा. ते ज्या गावातले होते, त्या गावातही त्यांची प्रतिमा लावली जावी. जेव्हा आपले विद्यार्थी ह्या वीरांची प्रतिमा बघतील, त्यांचे कार्य त्यांना कळेल, तेव्हा त्यांना एक नवी प्रेरणा त्यातून मिळेल.
मित्रांनो, आपण सगळ्यांनी देशात असं वातावरणतयार करायला हवं की, जेव्हा कोणताही पोलीस कर्मचारी किंवा निमलष्करी दलाचा जवान आपल्याला दिसेल, तेव्हा आपल्या मनात सन्मान आणि अभिमानाची भावना जागृत व्हायला हवी. ह्या पोलीस स्मारकातील हुतात्म्यांच्या प्रतिमा, त्यांच्या गाथा आपल्याला त्याच दिशेने घेऊन जात आहेत. आज या निमित्ताने, मी तुम्हा सगळयांसमोर आणखी एक महत्वाची आणि ऐतिहासिक घोषणा करतो आहे.
मित्रांनो, देशात काही संकट आले, नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळी मदतीसाठी सगळ्यात आधी आपले पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवानच धावून येतात. त्यांच्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. संकटाच्या वेळी इतरांचे आयुष्य वाचवण्यासाठी ते आपले आयुष्य पणाला लावतात. मात्र अशा बिकट स्थितीत नेहमी काही गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही. संकट निवारण झाल्यावर, सगळे पुन्हा नीट पदावर आलं की, ते सगळे आपापल्या जागी, आपल्या तुकड्यांमध्ये परत जातात. आपत्ती व्यवस्थापनात दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या अशा पराक्रमी जवानांसाठी मी आज एका सन्मानाची घोषणा करतो आहे.
हा सन्मान भारत मातेचे वीर सुपुत्र सुभाषचंद्र बोस यांच्या नावे दरवर्षी 23 जानेवारीला, म्हणजे त्यांच्या जयंतीला घोषित केला जाईल. अशक्य ते शक्य करणारे, इंग्रजाना भारत सोडण्यास भाग पाडण्याच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आमच्या सुभाष बाबूंच्या नावामुळे ह्या सन्मानाचा गौरव अधिकच वाढेल. आपल्या सर्वांसाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे,त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारलाही यंदा 75 वर्षे पूर्ण होणार आहेत.
बंधू आणि भगिनिंनो, शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या ह्या वैभवशाली परंपरेसोबत आणि अभिमानास्पद भूतकाळाच्या चर्चेनंतर आता,वर्तमान आणि भविष्यात आपल्यासमोर असलेल्या आव्हानांकडेही मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो.
आज तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. स्वाभाविकपणे याचा परिणाम गुन्हेगारी जगतातल्या बदलत्या कार्यशैलीवरही आपल्याला जाणवतो. अशा स्थितीत, गुन्हेगार, तंत्रज्ञानालाच आपले शस्त्र म्हणून वापरत आहेत. अफवा आणि सायबर गुन्हेगारी एक मोठे आव्हान म्हणून आपल्यासमोर उभे ठाकले आहे. अशावेळी दुसऱ्या तपास यंत्रणांसोबत अधिक चांगला ताळमेळ ठेवणे, त्याशिवाय आपल्या कामकाजात, तंत्रज्ञान आणि नवनवीन संशोधनाचा वापर करणे, अत्यावश्यक झाले आहे.
मित्रांनो, या दिशेने आज देशभरात अनेक प्रयत्नही होत आहेत. देशाच्या अनेक राज्यांत सोशल मिडियावर किंवा मग ऑनलाईन एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) नोंदवण्याची सुविधा पोलीस देत आहेत, हे कौतुकास्पद पाऊल आहे. वाहतुकीसंबंधीच्या समस्या देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून हाताळल्या जात आहेत. हे आपल्याला तिथपर्यत न्यायचे आहे, की छोट्या-छोट्या तक्रारी, पडताळणीसाठी, कोणाला पोलीस स्थानकात येण्याची गरज पडू नये.
मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हे ही माहिती आहेच की गेल्याच वर्षी पोलीस दलात सुधारणेच्या दृष्टीने सरकारने महत्वाची सुरुवात केली होती . एमपीएफ म्हणजेच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनेअंतर्गत, 2019-20 पर्यत, पोलीस दलासाठीच्या मूलभूत सुविधा आणि प्रशिक्षणावर 45 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.आधुनिक शस्त्रांमुळे पोलिसांच्या हालचालीत तत्परता आणि गती यावी, यासाठी आवश्यक ते सामान, तंत्रज्ञान-आधारित संपर्कयंत्रणा, व्यवस्थेचे आधुनिकीकरण अशी कामे केली जात आहेत. त्याशिवाय, सर्व पोलीस स्थानकांना एकमेकांशी जोडून, त्या आधारावर गुन्हेगार आणि गुन्हेगारीविषयक राष्ट्रीय आकडेवारी आणि माहिती संकलित करण्याचे कामही सुरु आहे.ही आकडेवारी न्यायव्यवस्थेशी संबंधित इतर संस्था, जशा न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळा, किंवा न्यायालयाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
आपली न्यायव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था आधी उत्तम करण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान देशातले प्रत्येक राज्य आणि प्रत्येक शहरापर्यंत पोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र तंत्रज्ञान मानवी बुद्धी आणि संवेदनांना पर्याय ठरू शकत नाही. आणि ह्यामुळेच पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते.
समाजातील, दबलेल्या, पीडित, शोषित जनतेचा पहिला आधार तुम्ही आहात. तुम्ही त्यांचे पहिले मित्र आहात, जेव्हाही त्यांच्यावर काही संकट येतं तेव्हा सर्वात आधी ते तुमच्याकडे येतात. त्यामुळेच, तुमची भूमिका कायदा-सुव्यवस्था राखण्याची तर आहेच, पण त्याशिवाय, संवेदनशील मनाने अशा शोषित, वंचितांचे दु:ख समजून घेत, त्यांचे अश्रू पुसणे हे तुमचे अधिक महत्वाचे कर्तव्य आहे.
तुमच्या पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक पीडिताला, शोषिताला एक पेला थंड पाणी प्यायला देऊन, त्याच्याशी दोन प्रेमाच्या गोष्टी बोललात, त्याची तक्रार शांतपणे ऐकून घेतलीत तर पोलीस आणि समाजामधील हे बंध अधिकच दृढ होतील. जेव्हा हे बंध मजबूत होतील तेव्हा सहकार्य आणि जनसहभागही वाढेल.त्यातून गुन्हेगारी कमी करण्यात समाजाकडून सगळ्यांना मोठी मदत मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो.
शेवटी पुन्हा एकदा, पोलीस स्मृती दिवसाच्या निमित्ताने उद्घाटन झालेल्या या आधुनिक स्मारकाबद्दल मी आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही अशी विनंती करेन, की त्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित करून इथे यावे आणि या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी. आणि त्यांच्या राज्यातील वीर हुतात्म्यांचा, शूर सैनिकांचाही सन्मान करावा.
तुमची सेवा आणि समर्पणाला वंदन करत सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मी आगामी सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो, आणि माझे भाषण समाप्त करतो.