पूज्य श्री सिद्धलिंगेश्वर स्वामी जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येदीयुरप्पा, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी डी व्ही सदानंद गौडा, प्रल्हाद जोशी, कर्नाटक सरकारचे मंत्री, उपस्थित आदरणीय संत समाज, भाविक, आपणा सर्वांना नमस्कार. तुमकुरुमधे डॉक्टर शिवकुमार स्वामीजींची धरती, सिद्धगंगा मठामध्ये येऊन मला खूप आनंद होत आहे. आपण सर्वाना नव वर्षाच्या शुभेच्छा.
2020 या वर्षाच्या आपण सर्वाना शुभेच्छा.
2020 या वर्षाची सुरवात तुमकुरुच्या या पवित्र धरतीवरून, आपण सर्वांसमवेत करत आहे हे माझे भाग्य. सिद्धगंगा मठाच्या या पवित्र ऊर्जेने सर्व देशवासीयांचे जीवन मंगलमय व्हावे अशी माझी इच्छा आहे.
मित्रहो, अनेक वर्षांनी इथे आलो आहे तर एक रितेपणाची भावना जाणवत आहे. पूज्य स्वामी श्री श्री शिवकुमारजी यांची भौतिक अनुपस्थिती आपणा सर्वांना जाणवत आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने, जीवनाला ऊर्जा प्राप्त होत असे याचा मी अनुभव घेतला आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने हे पवित्र स्थान, दशकांपासून समाजाला मार्गदर्शन करत आहे. विशेष करून शिक्षित आणि समान संधी प्रदान करणाऱ्या समाजाच्या निर्मितीची गंगा इथून निरंतर वाहत आहे. आपल्या जीवनकाळात, स्वामीजींचा, असंख्य लोकांच्या जीवनावर प्रभाव राहिला आहे.
श्री श्री शिवकुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाची पायाभरणी करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य. हे संग्रहालय लोकांना प्रेरणा देण्याबरोबरच, समाज आणि देश स्तरावरही आपल्याला दिशा दर्शन करण्याचे काम करेल. पूज्य स्वामीजींचे पुन्हा स्मरण करून मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
मित्रहो, मी अशा वेळी कर्नाटकच्या धरतीवर आलो आहे, जेव्हा या धरतीवरून आणखी एक महान संताने आपला निरोप घेतला आहे. पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांच्या देहावसनामुळे भारतातल्या समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे.आपल्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनातून असे स्तंभ गमावणे म्हणजे एक पोकळी निर्माण होणे. जीवनाची गती आपण थांबवू शकत नाही मात्र आपल्या संतांनी दाखवलेला मार्ग आपण दृढ नक्कीच करू शकतो. मानवता आणि भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करू शकतो.
मित्रहो, हे अशासाठी महत्वाचे आहे, कारण भारताने नवी ऊर्जा आणि नव्या उत्साहाने 21 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश केला आहे. मागच्या दशकाची सुरवात कोणत्या परिस्थितीत झाली याचे आपल्याला स्मरण असेलच. मात्र 21 व्या शतकाचे हे तिसरे दशक आशा- आकांक्षांच्या मजबूत पायासह सुरू झाले आहे.
या आकांक्षा नव भारताच्या आहेत. या आकांक्षा म्हणजे युवकांची स्वप्ने आहेत. देशाच्या माता- भगिनींच्या या आकांक्षा आहेत. या आकांक्षा देशातल्या गरीब, वंचित, पीडित, मागास, आदिवासींच्या आहेत. या आकांक्षा काय आहेत ? भारताला समृद्ध, सक्षम आणि कल्याणकारी जागतिक शक्तीच्या रुपात पाहण्याची ही आकांक्षा आहे. जगाच्या नकाशावर भारताला आपल्या स्वाभाविक स्थानी प्रतिष्ठापित होताना पाहण्याची ही आकांक्षा आहे.
मित्रहो, याच आकांक्षांच्या पूर्ततेसाठी, राष्ट्रात मोठे बदल घडवण्याला देशाच्या जनतेने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पूर्वीच्या ज्या समस्या आहेत त्यांचे निराकरण करायलाच हवे ही प्रत्येक भारतीयाची मानसिकता झाली आहे. समाजातून मिळणारा हा संदेश आपल्या सरकारला प्रेरित करतो, प्रोत्साहित करतो. याच कारणामुळे, 2014 नंतरच जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी देशाने अभूतपूर्व प्रयत्न केले आहेत.
गेल्या वर्षी तर एक समाज म्हणून, राष्ट्र म्हणून या प्रयत्नांचे शिखर गाठले आहे. आज देश हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प सिद्धीला जात आहे. देशातल्या गरीब भगिनींना, धुरापासून मुक्त करण्याचा संकल्प सिद्दीला जात आहे. देशातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला थेट मदत, शेत मजूर, श्रमिक, छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन व्यवस्थेशी जोडण्याचा संकल्प सिद्धीला जात आहे. दहशतवादाविरोधात भारताचे धोरण आणि पद्धतीत बदल घडवण्याचा संकल्पही सिद्दीला जात आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटवून तिथल्या जीवनातून दहशतवाद आणि अनिश्चितता हद्दपार करण्याचा, जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या जनतेच्या विकासाच्या नव्या युगाची सुरवात करण्याचा संकल्पही सिद्ध होत आहे. भगवान रामांच्या जन्मस्थानी, एक भव्य मंदिर उभारण्याचा मार्गही शांतता आणि सहयोगाने प्रशस्त झाला आहे.
मित्रहो, काही दिवसांपूर्वीच आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी संस्था, आपल्या संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा करण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. मात्र काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष भारताच्या संसदेच्या विरोधातच उभे ठाकले आहेत. ज्या पद्धतीची द्वेष भावना ते आम्हा लोकांविषयी बाळगतात तोच स्वर आता देशाच्या संसदेच्या विरोधातही दिसू लागला आहे. या लोकांनी भारताच्या संसदेच्या विरोधातच आंदोलन सुरू केले आहे. हे लोक पाकिस्तानमधून आलेल्या पीडित- शोषितांविरोधातच आंदोलन करत आहेत.
मित्रहो, पाकिस्तानचा जन्म धर्माच्या आधारावर झाला. देश, धर्माच्या आधारावर विभागला गेला. फाळणीच्या वेळेपासूनच, पाकिस्तानमध्ये, दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार सुरू झाले. काळाबरोबरच, पाकिस्तानमध्ये, मग तो हिंदू असो, शीख असो, ख्रिश्चन असो, जैन असो, धर्माच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. अशा हजारो लोकांना तिथून आपले घर सोडून शरणार्थी म्हणून भारतात यावे लागले.
मित्रहो, पाकिस्तानचा जन्म धर्माच्या आधारावर झाला. देश, धर्माच्या आधारावर विभागला गेला. फाळणीच्या वेळेपासूनच, पाकिस्तानमध्ये, दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार सुरू झाले. काळाबरोबरच, पाकिस्तानमध्ये, मग तो हिंदू असो, शीख असो, ख्रिश्चन असो, जैन असो, धर्माच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. अशा हजारो लोकांना तिथून आपले घर सोडून शरणार्थी म्हणून भारतात यावे लागले.
पाकिस्तानने, हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्यावर अत्याचार केले मात्र काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानविरोधात बोलत नाहीत. आज प्रत्येक देशवासियाच्या मनात हा प्रश्न आहे की जे लोक आपला जीव वाचवण्यासाठी, आपल्या मुलींचे जीवन वाचवण्यासाठी इथे आले त्यांच्या विरोधात रॅली काढण्यात येत आहे मात्र ज्या पाकिस्तानने त्यांच्यावर अत्याचार केले त्याच्या विरोधात हे लोक गप्प का आहेत?
पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पाकिस्तानहून आलेले हिंदू, शिख, पीडित, शोषित यांना त्यांच्या नशिबावर न सोडता, त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पाकिस्तानहून आलेल्या जैन आणि ख्रिश्चन यांना त्यांच्या नशिबावर न सोडता त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य ठरते.
मित्रहो, जे लोक आज भारताच्या संसदेच्या विरोधात घोषणा देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आज आवश्यकता आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या या कारवाया उघड करण्याची. आंदोलन करायचे असेल तर पाकिस्तानच्या गेल्या 70 वर्षातल्या कारवायांच्या विरोधात आवाज उठवा.
घोषणाबाजी करायची असेल तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात घोषणा द्या. रॅली काढायची असेल तर पाकिस्तानहून आलेल्या या हिंदू, पीडित, शोषितांच्या समर्थनासाठी रॅली काढा. धरणे आंदोलन करायचे असेल तर पाकिस्तान विरोधात करा.
मित्रहो, दशकांपासून देशासमोर असलेल्या समस्या सोडवण्यासाठी, आमचे सरकार अहोरात्र काम करत आहे. देशातल्या लोकांचे जीवन सुलभ व्हावे याला आमचे प्राधान्य आहे. देशातल्या प्रत्येक गरीबाकडे पक्के घर असावे, प्रत्येक घरात गॅस जोडणी असावी, प्रत्येक घरात पाण्याचा नळ असावा, प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधांचा लाभ व्हावा, प्रत्येक व्यक्तीला विमा सुरक्षा कवच लाभावे, प्रत्येक गावात ब्रॉड बँड असावे, अशा अनेक उद्दिष्टांवर आम्ही काम करत आहोत.
2014 मधे स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मी आपणाला केले आणि आपण मनापासून प्रतिसाद दिलात. आपणासारख्या करोडो जणांच्या सहयोगानेच गांधीजींच्या 150 व्या जयंतीला भारत हागणदारी मुक्त झाला.
आज मी तीन संकल्पामध्ये, संत समाजाकडून सहयोग घेऊ इच्छितो. पहिला म्हणजे आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांना महत्व देण्याची आपली प्राचीन संस्कृती आपल्याला पुन्हा मजबूत करायची आहे. लोकांना याबाबत निरंतर जागृत करायचे आहे. दुसरा संकल्प आहे तो निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाचा. तिसरा आहे तो जल संवर्धन आणि जल संचयनासाठी जनजागृतीत सहयोग.
मित्रहो, भारताने नेहमीच संताना, ऋषींना आणि गुरूंना, योग्य मार्गासाठीचे प्रकाशस्तंभ या रुपात पाहिले आहे.
आपणा सर्व संतांचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव राहू दे, आपल्या आशीर्वादाने आम्ही आमचे संकल्प पूर्णत्वाला नेऊ, ही आकांक्षा बाळगून आता इथे पूर्णविराम घेतो.
आपणा सर्वांचे खूप- खूप आभार.
भारत माता की जय!