नमस्कार!
आज आपण मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलेले आहात. दूर दूरच्या गावांमधून आलेल्या माझ्या कोट्यवधी माता-भगिनी आज मला आशीर्वाद देत आहेत. आपला असा उत्साह पाहून कोणता असा भाग्यवान असेल ज्याला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळणार नाही? कुणाला अशी हिंमत मिळणार नाही. तुमच्यासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आपल्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच मला देशासाठी काही ना काही करण्याची नेहमीच नवी शक्ती, ताकद मिळते. आपण सर्वजण आपणच केलेल्या एका संकल्पाचे धनी आहात. उद्यमशीलतेसाठी तुम्ही समर्पित आहात त्याचबरोबर एका “टीम” मध्ये, समुहामध्ये राहून आपण सर्वजण काम करीत आहात. कार्य यशस्वीतेसाठी सामूहिक प्रयत्नही करीत आहात. संपूर्ण विश्वामध्ये एकापेक्षा एक मोठी विद्यापीठे आहेत. मात्र माझ्या या हिंदुस्थानातल्या गरीब माता-भगिनींपैकी फारच थोड्याजणींना शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले असेल. तरीही सगळ्यांनी मिळून समुहामध्ये राहून काम कसे करायचे, कामाची विभागणी कशी करायची, याची कोणाला कदाचित कल्पनाही करता येणार नाही, असे काम या सर्व भगिनी करीत आहेत.
महिला सशक्तीकरणाविषयी आम्ही ज्यावेळी बोलत असतो, त्यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, महिलांनी आपल्यामधील शक्तीला, आपल्या योग्यतेला, आपल्यातील कलाकाराला ओळखण्याची आणि आपल्याला कुठे, कशा संधी मिळेल, हे समजून घेण्याची महिलांना काही शिकवण्याची गरज नसते. त्यांच्यामध्ये अनेक कलागुण असतातच. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. ज्यावेळी आमच्या माता-भगिनींना संधी मिळते, त्यावेळी त्या अगदी कमाल करुन दाखवतात. या संधीचं सोनं करतांना त्यांच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे मोठ्या जिद्दीने पार करतात. महिलांच्या क्षमतेविषयी तर कितीतरी सांगता येईल. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत त्या काय काय करतात आणि इतकी सगळी कामं करताना त्या वेळेचं व्यवस्थापनही किती बिनचूक करतात, हे जाणून नवल वाटेल. आपल्या परिवारासाठी, गावासाठी, समाज जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व महिला आपल्याला जे काही शक्य असेल ते नेहमीच करीत असतात. आपल्या देशातल्या महिलांमध्ये खूप सामर्थ्य आहे. आणि यशस्वी होण्यासाठी काही करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये आहे. संघर्ष करण्याचे धाडसही आहे. ज्यावेळी महिलांचे आर्थिक सामर्थ्य वाढेल, त्यावेळी त्या खूप काही करू शकणार आहेत. महिला सशक्तीकरणामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्या स्वावलंबी होण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटतं. ज्या दिवशी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल, त्यावेळी त्या खंबीर होतील आणि त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे त्या महिलेचे संपूर्ण कुटुंबही खंबीर बनेल. खंबीर महिला आपल्या मुलांना आणि पतीला काय करायचे, काय करायचे नाही, हे ठामपणाने सांगू शकतील. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिलेला स्वतंत्रपणाने निर्णय घेता येतात. निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची क्षमता महिलेमध्ये आली की, कोणतेही काम त्या करू शकतात. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलांचे ज्यावेळी आर्थिक सामर्थ्य वाढेल, त्यावेळी सामाजिक जीवनामध्ये पाळल्या जात असलेल्या कुरितींचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आपोआपच महिलांकडून होवू शकणार आहे. समाजामध्ये असलेल्या काही अनिष्ट प्रथा पाळण्याचा दबाव महिलांवर जास्त असतो. सामाजिक दडपणामुळे महिलांना तडजोड करून त्या दबावापुढे नमते घ्यावे लागते. एखाद्या महिलेची इच्छा नसतांनाही तिला त्या सामाजिक वाईट प्रथेचा स्वीकार करावा लागतो. अशावेळी महिला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती अशा वाईट प्रथेच्या विरोधात ठाम उभी राहू शकते. तशी तयारीही तिची असते. आज आपण कोणत्याही क्षेत्राकडे पाहिले तर लक्षात येईल की, सगळीकडे महिला मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. आमच्या माता-भगिनींशिवाय कोणी पशुपालन करू शकतो, याची कोणी कल्पनाही करणार नाही. आमच्या माता -भगिनींच्या मदतीशिवाय, योगदानाशिवाय कृषी क्षेत्रातली कामे होवू शकतात, असं म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. त्यांच्याशिवाय कृषी, पशुपालन या क्षेत्रांचे काम होवू शकेल, अशी कल्पनाही कोणी करणार नाही. शेतीची किती मोठी आणि महत्वाची कामे आमच्या माता करतात, याची माहिती खूपच कमी लोकांना आहे. त्यांच्या कार्याचे महत्व जाणून घेण्यासाठी या लोकांनी एकदा जरूर गावांत जावून महिला किती कृषी कार्य करतात ते पाहून यावे. आमच्या माता-भगिनींच्या योगदानाशिवाय कृषी क्षेत्राचे कार्य होवूच शकणार नाही. आज देशामध्ये जे काही दूध उत्पादन होते आहे, त्यासाठी पशुपालन क्षेत्रामध्ये शंभर टक्के योगदान आमच्या माता-भगिनी देत आहे, असे मी मानतो. पशुपालन करताना खूप परिश्रम घ्यावे लागतात. आमच्या माता -भगिनी, ज्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करतात त्यांना विविध उद्योग व्यवसाय करण्यासाठी, आवश्यक असलेल्या गोष्टींच्या पूर्तेतेसाठी त्याचबरोबर गावा-गावांमध्ये सामूहिक उद्योगांचे ‘क्लस्टर’ तयार होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे. या सर्व कामासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रयत्नांना अधिक गती मिळावी, चालना मिळावी, तसेच उद्योगांची व्याप्ती वाढावी, विस्तार व्हावा आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळावा, असे सरकारला वाटते.
भारत सरकार दीनदयाळ अंत्योदय योजना
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजनेअंतर्गत काही कार्य करण्याचे, विविध मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. आपल्या देशातल्या ग्रामीण भागातल्या लहान लहान उद्योजकांसाठी, श्रमिकांसाठी स्वयंसहाय्यता समूह स्थापण्यात आले आहे. माझ्या लक्षात आले आहे की, या स्वमदत गटांमध्ये अजिबात न शिकलेल्या, अगदी निरक्षर महिलांनाही सामावून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे अक्षरज्ञान नसतांनाही त्या महिला ‘सेल्फ हेल्प ग्रूप’ हे शब्द बोलतात. याचा अर्थ ‘सेल्फ हेल्प’ हे शब्द किती तळागळापर्यंत पोहोचले आहेत, हे लक्षात येते. कधी जर कोणी ‘स्वयंसहाय्यता समूह’ असं म्हणाले, तर या निरक्षर महिला मी काय बोलतोय, याचा विचार करत राहतात. इतका ‘सेल्फ हेल्प’ हा शब्द लोकप्रिय झाला आहे. हा आमचा ‘सेल्फ हेल्प ग्रूप एक प्रकारे गरीबांच्या, विशेषतः महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार बनला आहे. हा स्वमदत गट महिलांना जागरूक बनवू लागला आहे. त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम बनवत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम यांच्या माध्यमातून देशभरातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीमधल्या कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांना उपजीविकेसाठी कायम स्वरूपी साधन उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ही योजना सर्व राज्यांतून सुरू करण्यात आली आहे. सर्व राज्ये आणि या योजनेसाठी कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे मी या माध्यमातून अभिनंदन करू इच्छितो. ज्या लोकांनी या योजनेला लाखो-करोडो महिलांपर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले, ते प्रशंसनीय आहे. जिल्हा पातळीवर आमचे जे अधिकारी काम करतात, त्यांना माझा आग्रह आहे की, आपल्या जिल्ह्यात काम करताना आपण जर एखादी भावनाप्रधान घटना अनुभवली तर त्याची जरूर नोंद करून ठेवा. अशा भावनाप्रधान, संवेदनशील अनुभवांचे पुढेमागे एखादे पुस्तक लिहिता येइल. ही नोंद म्हणजे काही सरकारी दप्तरी नोंद किंवा दस्तावेज नाही. तर आपण कुणाच्या जीवनात आनंद निर्माण केला, त्याला अर्थार्जनासाठी मदत केली, त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काही हातभार लावला, याचा आनंद अमूल्य असणार आहे. त्यामुळे आपल्यालाही वेगळा आनंद मिळणार आहे. त्याची ती नोंद असणार आहे. आत्तापर्यंत महिलांचे जवळपास 45 लाख स्वयंसहाय्यता समूह तयार झाले आहेत आणि जवळपास पाच कोटी महिला या समुहांमध्ये सक्रिय आहेत, ही माहिती जाणून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका पद्धतीने पाच कोटी कुटुंबामध्ये आणखी एक व्यक्ती उत्पन्न मिळवू लागली आहे. त्यामुळे उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत तयार झाला आहे. स्वयंसहाय्यता समुहाविषयी मी काही आकडेवारी आपल्याला देवू इच्छितो.
2011 ते 2014 या काळामध्ये म्हणजे आमचे सरकार सत्तेवर येण्याआधी स्वयंसहाय्यता समुहासाठी केलेल्या कार्याचा तपशील आपण पाहणार आहोत. या चार वर्षांच्या काळात म्हणजे आमचे सरकार येण्याच्याआधी देशामध्ये फक्त पाच लाख स्वयंसहाय्यता समूह होते आणि त्यांच्या माध्यमातून 50 -52 लाख कुटुंबांना जोडण्यात आले होते. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर 2014 ते 2018 या काळामध्ये आम्ही स्व समुहांच्या कामाला खूप महत्व आणि प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये नवीन 20 लाखांपेक्षा जास्त समूह बनवण्यात आले. या नवीन समुहांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना स्वमदत समुहांशी जोडण्यात आले आहे. याचाच अर्थ आधीच्या तुलनेमध्ये स्वमदत समुहांची वृद्धी चौपट झाली आहे. आणि चौपट जास्त कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला आहे. या वृद्धीवरून सरकारचा काम करण्याचा वेग आणि जनकल्याणासाठी आमची असलेली कटिबद्धता दिसून येते. महिला, माता, भगिनींच्या सशक्तीकरणाला आम्ही जे प्राधान्य आणि महत्व देतो, हे लक्षात येते. या योजने अंतर्गत गरीब महिलांच्या समुहाला प्रशिक्षण देण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत माल पोहोचवण्यासाठी सर्व प्रकारच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी सरकारच्यावतीने मदत केली जात आहे.
याआधीच मी सांगितल्याप्रमाणे देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्वयंसहाय्यता गटांचे सदस्य आज आपल्याबरोबर आहेत. आर्थिक विकासामध्ये भागिदार असलेल्या, कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावत असलेल्या, आणि नवनवीन पद्धतींनी कमीत कमी खर्चामध्ये, गट-समुहामध्ये काम करत असलेल्या, औपचारिक शिक्षण घेतले असेल अथवा नसेलही, तरी अशा प्रकारे यशस्वीपणाने कार्य करीत असलेल्या या सर्व माता -भगिनींचे अनुभव ऐकण्यासाठी मी आज अतिशय उत्सुक आहे.
आपल्या जीवनामध्ये किती मोठे परिवर्तन आले आहे, हे तुम्ही पाहिलेच आहे.
आपल्या आयुष्यात असे स्वयंसहाय्यता समूह किती मोठी भूमिका पार पाडत आहेत, याची अगदी जीवंत उदाहरणे आपल्याला इथं पाहण्यास मिळाली आहेत. सरकार त्यांचा विस्तार करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे.
स्वयंसहाय्यता मदत गटाच्या माध्यमातून एक प्रयोग महिला शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये आम्ही केला आहे. यामध्ये महिला शेतकरी सशक्तीकरण योजनेअंतर्गत, 33 लाखांपेक्षा जास्त महिलांना कृषीविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याच्या जोडीलाच 25 हजारांपेक्षा जास्त समाज उपजीविका स्त्रोत व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. या व्यक्ती ग्रामीण पातळीवर सातही दिवस अगदी चोवीस तास आवश्यक असणारी मदत उपलब्ध करून देत आहेत. आज कोणतेही क्षेत्र असो, विशेषतः कृषी विभागाशी संलग्न क्षेत्राला मूल्यवर्धनासाठी हे खूप महत्वाचे कार्य ठरत आहे. आज आपल्या देशातला शेतकरी बांधव मूल्यवृद्धीचे महत्व समजू लागला आहे, याचा मला खूप आनंद होतो आहे. शेतकरी बांधव मूल्यवृद्धीसाठी विशेष प्रयत्न करायला लागले आहेत आणि त्याचा त्यांना चांगला लाभही होत आहे. काही राज्यांमध्ये काही पिके महत्वाची किंवा विशेष असतात. उदाहरणार्थ मका, आंबा, फुलांची शेती, दुग्धालय यांच्या मूल्यवर्धनासाठी साखळी पद्धती खूप उपयोगी ठरते. आणि त्यामध्ये स्वमदत गटांच्या दोन लाखांपेक्षा जास्त सदस्यांचा सहभाग आहे. आत्ताच आम्ही बिहारमधल्या पाटलीपुत्र इथल्या अमृता देवीजी यांचा अनुभव ऐकला आणि त्यांनी सांगितलेली माहिती जाणून घेतली. या गटामध्ये सहभागी झाल्यापासून गरीब महिलांच्या जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन आले आहे, हे त्यांनी आत्ता सांगितले. मी बिहारमधीलच आणखी काही उदाहरणे आपल्याला सांगतो. तिथे स्वयं सहाय्यता गटातल्या अडीच लाखांपेक्षा जास्त सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिला आता धानाची शेती पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करायला लागल्या आहेत. याशिवाय बिहारमध्ये लाखेच्या बांगड्या बनवण्यासाठी क्लस्टर स्थापण्यात आले आहे आणि त्याचबरोबर निर्माता समूह तयार करण्यात आले आहेत. एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आता बिहारमध्ये बनवल्या जात असलेल्या लाखेच्या बांगड्या फक्त आपल्या संपूर्ण देशभरातच नाही तर बाहेरच्या देशातही लोकप्रिय होत आहेत. आत्ता आपण छत्तीसगढच्या मीना मांझी यांचे विचार ऐकले. त्यांनी सांगितले की, विटा तयार करण्याचे काम आपण सुरू केल्यामुळे आयुष्य अधिक चांगले बनवण्यास मदत मिळाली आहे. त्या भागामध्ये विटांच्या निर्मितीसाठी अनेक गट तयार करण्यात आहेत. जवळपास 2000 स्वमदत समूह या कामामध्ये सहभागी झाले आहेत. आपल्या सर्वांना जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचा वार्षिक नफा कोट्यवधी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. अशा पद्धतीने छत्तीसगढमध्ये 22 जिल्ह्यांमध्ये 122 ‘बिहान बाजार आऊटलेट’ बनवण्यात आले आहेत. या बाजारांमध्ये स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या 200 प्रकारच्या विविध उत्पादनांची विक्री केली जाते.
छत्तीसगढशी संबंधित मी आपला एक व्यक्तिगत अनुभव आज इथं सांगू इच्छितो. कदाचित आपण टी.व्ही.वर ही गोष्ट पाहिलीही असेल. काही दिवसांपूर्वी मी छत्तीसगढला गेलो होतो. तिथं मला ई-रिक्षेत बसण्याची संधी मिळाली. ती ई-रिक्षा एक महिला चालवत होती. छत्तीसगढचा तो परिसर आधी नक्षलवादी, माओवादी यांच्या कारवायांमुळे त्रासलेला होता. अशा हिंसक कारवायाग्रस्त क्षेत्रामध्ये जाण्या-येण्यासाठी कोणतेही वाहन, साधन उपलब्ध नसायचे. परंतु सरकारने वाहतूक साधनांची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कुटुंबांना त्या क्षेत्रामध्ये वाहन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. सरकारच्या या उपाय योजनांमुळे त्या भागामध्ये जाणे-येणे सुकर झाले. त्याचबरोबर या ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे एक खूप चांगले साधन मिळाले.
आत्ताच आपण रेवती यांच्याकडून बरीच माहिती जाणून घेतली आणि वंदना जी यांचे अनुभवही ऐकले. या योजनेअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा त्यांना कसा उपयोग झाला हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून समजले. प्रशिक्षणामुळे नेमके कसे परिवर्तन घडून येते, याचे हे एक उदाहरण आहे. दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत, ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. युवकांना रोजगार आणि स्वरोजगार अशा दोन्हींसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशाच्या युवापिढीला आपल्या आशा, आकांक्षा आणि इच्छेनुरूप पुढे जाता यावे. त्यांनी कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण घेतले तर रोजगाराच्या नवीन संधी त्यांना उपलब्ध होवू शकणार आहेत. हे जाणून सरकार त्यांना कौशल्य प्रशिक्षण देत आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. देशाच्या प्रत्येक जिल्हयामध्ये ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षणाची सुविधा आपल्या घराजवळच मिळू शकतेय. त्याच बरोबर गावातल्य युवकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यावर्षी मे महिन्यापर्यंत जवळ जवळ 600 ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थांनी देशात काम सुरू केले आहे. या संस्थेमार्फत जवळपास 28 लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि त्यापैकी 19 ते 20 लाख युवकांनी आता रोजगार मिळवला आहे. आत्ताच आपण मध्य प्रदेशातल्या सुधा बघेलजी यांचे मनोगत ऐकले. सॅनिटरी नॅपकीन्सच्या पॅकेजिंगचे काम त्या करतात. मध्य प्रदेशामध्ये सॅनिटरी पॅड निर्मिती करणारा विभाग बनवण्यात आला आहे. या विभागाचे काम 35 जिल्ह्यांमध्ये चालते. स्वयंसहाय्यता गटाचे साडे पाच हजारांपेक्षा जास्त सदस्य या प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. मध्य प्रदेशातलेच आणखी एक उदाहरण मी आपल्याला देवू इच्छितो. या राज्यात जवळपास 500 उपजीविका ताजी दुकाने उघडण्यात आली आहेत. त्याठिकाणी दरवर्षी एक टनांपेक्षा जास्त मसाल्यांची विक्री होते. एका अर्थी तिथं आता उपजीविका हा एक ‘ब्रँड’ बनला आहे. आत्ताच आपण रेखाजी यांच्याशी बोललो. बँकिंग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने या गटांच्या माध्यमातून कार्य केले जाते, याची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली. अगदी लहान गाव, वाडा, वस्ती किंवा अतिदुर्गम गावापर्यंत बँकिंग किंवा वित्तीय सेवा पोहोचणे अवघड असते. त्यामुळे स्वमदत समुहातल्या एखाद्या सदस्याची ‘बँक मित्र’ किंवा ‘बँक सखी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज जवळपास 2000 स्वयंसहाय्यता गट देशभरामध्ये बँक मित्र किंवा बँक सखी बनून बँकिंग व्यवहारामध्ये सहायक म्हणून काम करीत आहेत. या सहायकांच्या मार्फत जवळपास साडे तीन कोटी रूपयांचे देवघेवीचे व्यवहार झाले आहेत, अशी माहिती मला देण्यात आली आहे.
आता ‘कम्युनिटी रिसोर्स पर्सन’ म्हणून कशा पद्धतीने काम केले जाते ते आपण पाहूया. या कामाशी अनेक महिला आधीपासूनच जोडल्या गेलेल्या आहेत. त्या महिला हा कार्यक्रम स्वतः चालवतात. त्याचबरोबर आता या महिला आजूबाजूच्या नवीन गावांमध्ये जावून तिथल्या महिलांना कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आत्तापर्यंत दोन लाख ‘कम्युनिटी रिसोर्स पर्सन’ कार्यरत आहेत. ते या कार्यक्रमाला पुढे नेत आहेत. दिवसेंदिवस असे कार्य करण्याची संख्या चांगलीच वेगाने वाढतेय. दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत सरकारी अनुदानाव्यतिरिक्त बँकांच्यामार्फत कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. बँकांकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीमुळे लोकांना व्यवसाय वृद्धीसाठी खूपच मदत होत आहे. त्याचबरोबर सर्वांच्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट म्हणजे कर्ज परतफेडही अगदी वेळेवर केली जात आहे.
माझ्या लक्षात आले आहे की, स्वयंसहाय्यता गटाकडून बँकांमध्ये पैसे जमा करण्यात कधीही उशीर केला जात नाही. जवळपास 99 टक्के पैसे परत मिळत आहेत. हेच आपल्या गरीब कुटुंबातले संस्कार असतात. गरीबांची श्रीमंती अशीच असते. या श्रीमंतीमध्ये खूप शक्ती आहे. आत्ताच आपण लक्ष्मी जी यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांच्याबरोबरच आणखी तीस महिला पापड आणि इतर उत्पादनांची विक्री करून कशा पद्धतीने नफा कमावला, हे त्यांनी सांगितले. आज इथं मी आपल्याला सांगू इच्छितो की, या गटांची उत्पादने अतिशय योग्य, वाजवी किंमतीमध्ये विकली जावीत, यावर विशेष लक्ष दिले जाते. या गटाने तयार केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यांमध्ये वर्षभरात दोन वेळा सरस मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या मेळाव्यांसाठी सरकार विशेष अनुदान देत असते. सरकारच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. दरवर्षी स्वमदत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना असलेली मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या गटातल्या सदस्यांचे उत्पन्नही चांगले वाढत आहेत. याशिवाय स्वमदत गटांना जेम (जी.ई.एम.) म्हणजेच सरकारच्या ई-मार्केटचाही लाभ मिळत आहे. पारदर्शी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून सरकार डिजिटल पद्धतीने सामानांची खरेदी-विक्री करण्यासाठी प्राधान्य देत आहे. सरकारमध्ये आता याच पद्धतीने निविदा काढल्या जातात आणि सरकारी सामानाची खरेदी केली जाते. आणि म्हणूनच स्वमदत गटातल्या सर्व भगिनींनो, माझं एक आपल्याला आवाहन आहे की, आपण जे काही उत्पादन करीत असाल, जो घटक निर्माण करीत असाल, त्याचा सर्व तपशील सरकारच्या जेम म्हणजेच ‘जीईएम’ या पोर्टलवर द्यावा तसेच आपल्या उत्पादनाची, समुहाची या पोर्टलवर नोंदणी करावी. म्हणजे जर सरकारला त्या गोष्टीची आवश्यकता असेल तर त्याची माहिती उपलब्ध होईल आणि तुमच्याकडून त्याची खरेदी करता येईल. आपणही सरकारला आपल्या उत्पादनाची विक्री करू शकता, सरकार तुमचा माल खरेदी करू शकते, हे आज मला इथं आवर्जून सांगायचे आहे.
मी गुजरातमध्ये असताना, एक छोटासा प्रयोग केला होता, त्याची माहिती मी आज तुम्हा सगळ्यांना मुद्दाम देणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच की, जे लोक मेंढ्या पाळतात ते, त्या मेंढ्यांची लोकर काढून विकतात. आता हे मेंढपाळ काही खूप श्रीमंत नसतात. ते आपल्याकडच्या मेंढ्या चरायला नेतात, त्यांचा सांभाळ करतात, ठराविक दिवसांनी त्यांची लोकर कात्रीने कापून विकतात. त्यातून त्यांच्या गरजेपुरते त्यांना पैसे मिळतात. आजकाल सगळीकडे खूप मोठ मोठाली सलून असतात. अशा सलूनमध्ये दाढी करण्यासाठी एक यंत्र वापरले जाते, त्याला ट्रिमर असं म्हणतात. या ट्रिमरचा उपयोग मेंढ्यांच्या अंगावरची लोकर कापण्यासाठीही होवू शकतो, असं माझ्या लक्षात आलं. मी काही मेंढपाळांना असे ट्रिमर दिले. यामुळे फायदा असा झाला की, कात्रीने लोकर कापताना तिचे तुकडे होत होते. त्यामुळे लोकरीचा लांब धागा निघत नसे. आखूड धाग्यामुळे मेंढपाळांना कमी पैसे मिळत होते. ट्रिमरमुळे एकसारखी लांब धाग्याची लोकर मिळू लागली आणि त्याचे भरपूर पैसेही मेंढपाळांना मिळू लागले. ट्रिमरच्या वापरामुळे लाभच लाभ झाला. ट्रिमरमुळे लोकर कापण्यासाठी लागणारे परिश्रम कमी झाले. मेंढ्यांना बरेचवेळा कात्री लागायची आणि त्रास होत असे, तो कमी झाला. लोकरीच्या लांब धाग्याला खूप चांगली बाजारपेठ मिळू लागली. आपण ज्या क्षेत्रात उत्पादन करीत आहात, त्यामध्येही अशाच प्रकारे काही बदल करता येईल का, या दिशेने आपण सर्वांनी जरूर विचार करावा, असे मला वाटते. आपल्या समुहामध्ये ज्या भगिनी आहेत, त्यांना उत्पादनासंबंधी काही विशेष प्रशिक्षण देता येईल का याचाही विचार आपण सर्वांनी करावा. कूपवाडा भागामध्ये मी याआधी पाहिलं आहे की, काम करण्यासाठी अनेक संधी आहेत, त्याचप्रमाणे भगिनींमध्ये खूप क्षमताही आहे. दूध व्यवसायामध्ये आपल्या क्षेत्रात नक्कीच काही करता येणार आहे.
आपणा सर्वांचे अनुभव, गोष्टी ऐकायला, जाणून घ्यायला मला खरोखरीच खूप आवडले. जी व्यक्ती या गोष्टी अगदी खुल्या मनाने ऐकून, चांगल्या विचाराने जाणून घेण्याच्या भूमिकेतून ऐकेल त्याला त्यामधून खूप काही मिळणार आहे, असं मला अगदी मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी आपले अनुभव ऐकण्यास उत्सूक होतो. आपल्या देशातल्या माता भगिनींमध्ये प्रचंड ताकद आहे. त्यांना थोडासा आधार मिळाला तर त्या आपले असे वेगळेच विश्व निर्माण करू शकतात. सगळ्यांनी मिळून -मिसळून, एकोप्याने, एकमेकांच्या साथीने काम कशा पद्धतीने केले जाते, याचे उदाहरण म्हणजे हे स्वमदत समूह आहेत. हे समूहच देशाला चांगले नेतृत्व देवू शकतात. एका नव भारताची पायाभरणी करण्यासाठी हे समूह आज किती परिश्रम करत आहेत, हे आज दिसून आले. आज ज्यांनी ज्यांनी आपले मनोगत सांगितले, त्या प्रत्येकाची गाथा सर्वांनाच खूप प्रेरणा देणारी ठरणार आहे. या देशाला नवीन शक्ती देणारी गाथा आहे. एक नवा उत्साह देणारी ही मनोगते आहेत. आपल्याकडे निराशाजनक वातावरण तयार करणारी मंडळी काही कमी नाहीत. वाईट गोष्टींचा प्रसार करणारी मंडळी काही कमी नाहीत. परंतु आपण कोणीही चांगला मार्ग कधीच सोडायचा नाही. श्रमाची जी पूजा सुरू केली आहे, ती पूजा कधीच अर्धवट सोडायची नाही. आपल्या स्वतःच्या हिंमतीवर देशाला खूप पुढे न्यायचे आहे. आपल्या स्वतःलाही पुढे जायचं आहे. आपल्या कुटुंबाची प्रगती करायची आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे. अतिशय कठीण, अवघड परिस्थितीमध्ये आपण जगताना येत असलेल्या संकटांमधून मार्ग काढताना आपल्यापैकी प्रत्येकाला निराशाजनक स्थितीशी दोन हात करण्यासाठी ताकद देणारा आजचा संवाद आहे. मला वाटतं, देशाची हीच खरी शक्ती, ताकद आहे. म्हणूनच आज आपल्याशी संवाद साधून मला एक वेगळीच शक्ती मिळाल्याचा अनुभव येत आहे. मलाही आपल्याकडून खूप प्रेरणा मिळाली आहे. माझा विश्वास आहे की, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना, ज्यांनी ज्यांनी मनोगते सांगितली आणि ज्यांनी ती ऐकली त्या सर्वांना नक्कीच खूप सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. प्रत्येकाची अशी वेगळी एक कथा आहे आणि प्रत्येकाचा आपला असा अनुभव आहे. प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या संकटातून मार्ग काढलाच आहे. त्यासाठी आपण घेतलेले परिश्रम, आपण केलेले काम, आपण दाखवलेले धाडस हे खूप महत्वाचे आहे. या सगळ्याचे श्रेय आणखी दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही, ते सर्वतोपरी आपलेच आहे. आणि म्हणूनच आपल्यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी प्रेरणा असू शकत नाही. परंतु काही गोष्टी भगिनींना सांगायच्या होत्या, त्या आत्ता सांगता आल्या नाहीत, हेही आज मला जाणवले. मला वाटतं की, आपल्याला जे काही सांगावे वाटते, ते तुम्ही जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. मी आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार आहे. आणि त्यापैकी जर काही गोष्टी इतर लोकांनाही ऐकवाव्यात अशा असतील तर मी ‘मन की बात’च्या माध्यमातून त्या ऐकवेनही. कारण अशा गोष्टींमधून संपूर्ण देशाला प्रेरणा मिळत असते. तक्रारी, रडगाणं सांगणं, या गोष्टी ज्यांना करायच्या असतात त्या तर केल्याच जातात. परंतु जे कोणी चांगलं काम करतं, त्यावरून नक्कीच प्रेरणा मिळत असते. आता आपल्याला ते चांगलं काम असंच पुढे न्यायचं आहे. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करतो की, आपल्याकडे मोबाईल फोन असणार, त्याचा वापर करण्याची तुम्हाला आता सवयही झाली असेल. बरं मोबाईल फोन नसेल, तो वापरला जात नसेल तर आपल्या जवळच्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ची मदत तुम्हाला घेता येईल. तुम्हाला नरेंद्र मोदी अॅप आहे हे, माहीत असेल. त्या अॅपवर आपल्या स्वयं सहाय्यता गटाचे छायाचित्र जरूर पोस्ट करावे. आपल्या समुहातल्या भगिनींची मुलाखत त्यावर घालावी. आपण नेमके काम कसे केले आहे. हे काम करताना कोणत्या समस्या आल्या, त्यामधून आपण मार्ग कसा काढला आणि कोण कोणती चांगली कामे केली, याची सगळी माहिती तुम्ही या अॅपवर पोस्ट जरूर करा. मी तुमची सगळी माहिती नक्की पाहीन, वाचेन, ऐकेन. इतर लोकही तुमच्या संघर्षाची कहाणी वाचतील, ऐकतील. ज्या ज्यावेळी मला थोडा अवधी मिळेल, त्या त्यावेळी मी त्या माहितीतील काही भाग ‘मन की बात’ मधून लोकांनाही सांगेन. आपल्या गोष्टी मी दुनियेला सांगू शकणार आहे. आपण सगळ्यांनी स्वतःसाठी काम तर केलं आहेच परंतु त्याचबरोबर तुम्ही तुमच्याच सारख्या कोट्यवधी भगिनींनाही नवीन धाडस दिलं आहे. नवी हिंमत दिली आहे. आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सगळीकडेच खूप लोकप्रिय झाले आहे. देशातल्या तीन लाख गावांमध्ये असे ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ आहे. आता तर आमच्या कन्या हे कॉमन सर्व्हिस सेंटर चालवतात. त्या केंद्रांवर जावून या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या यशस्वीतेची गाथा मला जरूर पाठवा. संपूर्ण देश तुमची गाथा पाहू शकणार आहे. आमच्या देशातल्या दुर्गम-अतिदुर्गम भागात वास्तव्य करीत असलेल्या आमच्या या भगिनी किती उत्तम प्रकारे काम करतात, किती नव-नवीन पद्धती त्यांनी कामाच्या शोधून काढल्या आहेत, हे संपूर्ण देशाने, दुनियेने पाहिलेच पाहिजे, असे मला वाटते. आज आपणा सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली, त्याचा मला खूप आनंद झाला आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. त्याबद्दल धन्यवाद; माझ्याकडून आपणा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!!
खूप -खूप धन्यवाद !!