जय श्रीराम – जय श्रीराम
जय श्रीराम – जय श्रीराम
जय श्रीराम – जय श्रीराम
मोठ्या संख्येने उपस्थित, संस्कृती प्रेमी, माझ्या बंधू- भगिनींनो, विजयादशमीच्या पवित्र पर्वाच्या आपणा सर्वाना खूप – खूप शुभेच्छा.
भारत उत्सवांची भूमी आहे. वर्षाच्या 365 दिवसांपैकी कदाचित एखादाच दिवस असा असेल ज्या दिवशी हिंदुस्तानच्या कोणत्याच भागात कोणताही उत्सव साजरा झाला नसेल.
हजारो वर्षांची परंपरा, अनेक वीर, पौराणिक कथांशी जोडले गेलेले जीवन, ऐतिहासिक
वारसा दृढ करणारा सांस्कृतिक वारसा, या सर्वांमुळे आपल्या देशात उत्सव म्हणजे संस्कार, शिक्षण, सामुहिक जीवनाचे निरंतर प्रशिक्षण देणारे राहिले आहेत.
उत्सव आपल्या जोडतात, उत्सव आपल्यात जोश, उत्साह आणतात आणि नव-नव्या स्वप्नांसाठी बळही देतात. उत्सव आपल्या नसा – नसात आहे म्हणूनच भारताच्या सार्वजनिक जीवनाचे प्राणतत्व उत्सव आहे. उत्सव प्राण तत्व असल्यामुळे हजारो वर्षाच्या या प्राचीन महान परंपरेला क्लब संस्कृतीत जाण्याची गरज भासली नाही. उत्सवच भाव अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम राहिले आणि हेच उत्सवाचे सामर्थ्य आहे.
उत्सवाबरोबर प्रतिभा जोपासली जावी, प्रतिभेला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, प्रतिभेला वाव मिळावा असाही आपला अखंड प्रयत्न असतो. कला असो, वाद्य असो, गायन असो, प्रत्येक प्रकारची कला आपल्या उत्सवाचा अविभाज्य भाग राहिली आहे. याचमुळे, भारताच्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक वारश्यात कला साधनेमुळे, उत्सवांच्या माध्यमातून कला आपल्या जीवनात असल्यामुळे, भारतीय परंपरेत, रोबो नव्हे तर हाडामासाची माणसे असतात. या माणसांमधली मानवता, त्यांच्यामधली करूणा, त्यांच्यामधली संवेदना, त्यांच्यातल्या दयेच्या भावनेला सतत उर्जा देण्याचे काम उत्सवांच्या माध्यमातून होत असते.
म्हणूनच आताच आपण नवरात्रीचे नऊ दिवस, हिंदुस्तानचा असा कोणताही भाग नसेल जिथे नवरात्रीचे पर्व साजरे झाले नसेल. शक्ती साधनेचे पर्व, शक्ती उपासनेचे पर्व, शक्ती आराधनेचे पर्व, अंतर्गत त्रुटी कमी करण्यासाठी, अंतर्गत असमर्थतेतून मुक्त होण्यासाठी, ही शक्तीची आराधना एक नवे चैतन्य निर्माण करते.
मातेची उपासना करणारा हा देश, शक्ती साधना करणारा हा देश, या धरतीवर आई-मुलीचा सन्मान, गौरव, त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा संकल्प करणे ही, शक्ती साधनेबरोबरच आपणा सर्वांची, समाजाच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनते.
म्हणूनच मी म्हटले होते की आपल्याकडे उत्सवात काळानुरूप बदल घडत राहतात. आपला समाज अभिमानाने बदलांचा स्वीकार करतो. आम्ही आव्हान स्वीकारण्याबरोबरच आव्हान देणारेही आणि गरजेनुसार आपल्यात बदल घडवून आणणारेही लोक आहोत.
काळानुरूप बदल घडवणे, म्हणूनच हस्ती मिटती नही हमारी असे जेव्हा म्हटले जाते, त्याचे कारण हेच आहे की आपल्या समाजात कोणतीही अपप्रवृत्ती शिरकाव करते तेव्हा त्याच्या विरोधात संघर्ष करणारी महान व्यक्तीही समाजातच निर्माण होते. आपल्याच समाजात असणाऱ्या वाईट बाबींविरोधात आपल्याच समाजातली व्यक्ती लढा देण्यासाठी उभी ठाकते तेव्हा सुरवातीला संघर्ष होतो मात्र त्या नंतर तीच व्यक्ती आदरणीय, तपस्वी, आचार्य, आपला युग पुरुष, प्रेरणा पुरुष बनते.
बदलांचा सातत्याने स्वीकार करणारे आपण लोक आहोत. दिवाळीत आपण महालक्ष्मीचे पूजन करतो. लक्ष्मीचे स्वागत आपण आतुरतेने करतो. पुढच्या दिवाळीपर्यंत, या लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात राहावे, संपत्तीत वाढ व्हावी हा भाव आपल्या मनात असतो.
मन की बातमध्ये मी सांगितले होते,की आपल्या देशात लक्ष्मीची पूजा होते, आपल्या घरातही लक्ष्मी असते, आपल्या मोहोल्यात, घरातही लक्ष्मी असतात,आपल्या कन्या लक्ष्मीचे रूप असतात. आपल्या गावात, मोहोल्यात, विभागात, शहरात कन्यांनी, उत्तम कामगिरी केली आहे, जीवनात काही महत्वपूर्ण यश संपादन
केले आहे, ज्यांची कामगिरी दुसऱ्यांना प्रेरणादायी ठरली आहे अशा मुलींना या दिवाळीत सामूहिक कार्यक्रमात आपण सन्मानित केले पाहिजे, हेच आपले लक्ष्मी पूजन असले पाहिजे, याच आपल्या देशाच्या लक्ष्मी आहेत. आपल्याकडे कालानुरूप उत्सवात होणारे बदलही आपण स्वीकारले आहेत.
आज विजयादशमीचे पवित्र पर्व आहे आणि त्याचबरोबर हवाईदल दिनही आहे.
आपले हवाई दल पराक्रमाची नव- नवी शिखरे गाठत आहे, आज विजयादशमीचे पावन पर्व आहे, भगवान हनुमान यांचे स्मरण करतो तेव्हा विशेष करून आपल्या हवाई दलाचेही स्मरण करूया. आपल्या हवाईदलाच्या शूर जवानांना शुभेच्छा देऊया आणि उज्वल भविष्यासाठीही त्यांना शुभेच्छा देऊया.
आज विजयादशमीचे पर्व आहे, असुरी शक्तीवर दैवी शक्तीच्या विजयाचे पर्व आहे.आपल्यातल्या आसुरी शक्तीचा विनाश करण्याचीही तितकीच आवश्यकता आहे तेव्हाच आपण रामाची अनुभूती घेऊ शकतो. प्रभू रामांची अनुभूती घेण्यासाठी, आपल्या जीवनात विजय संपादन करण्यासाठी, विजयाच्या संकल्पासह आपल्यातली ऊर्जा, शक्तीला सामर्थ्य देतानाच आपल्यातल्या त्रुटी, आसुरी शक्ती नष्ट करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे.
आज विजयादशमीच्या पर्वावर आणि महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आपण साजरी करत असताना, आपण सर्व देशवासियांनी संकल्प करूया-
देशाच्या भल्यासाठी, एक संकल्प या वर्षात पूर्ण करू, ज्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रुपात देशासाठी उपयोगी काम असेल. मी जर पाण्याची बचत केली तर तोही एक संकल्पच असेल.मी जेवताना ताटात काही टाकणार नाही, हाही संकल्प असू शकतो. विजेची बचत करण्याचाही संकल्प असू शकतो. देशाच्या संपत्तीचे कधी नुकसान होऊ देणार नाही, हाही संकल्प असू शकतो.
विजयादशमीचे पर्व, महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, गुरू नानक देव यांचे 550 वे प्रकाश पर्व असा पवित्र संगम फारच दुर्मिळ. याचा उपयोग करत, त्यातून प्रेरणा घेत आपणही आपल्या जीवनात एखादा संकल्प करू आणि त्यात यश संपादन करू असा निश्चयही करूया.
सामूहिक एकत्रित मोठी ताकद असते. भगवान श्रीकृष्णांनी करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, तेव्हा सर्व गोपांच्या, त्यांच्या काठ्यांच्या सामूहिक ताकदीची सांगड त्याच्याशी घातली होती.
प्रभू रामचंद्रांचे जीवन पाहिले तर समुद्र पार करायचा असो, सेतू बांधायचा असो, सामूहिक शक्ती, तीही जंगलातून आपल्याला जे साथीदार मिळाले त्यांना बरोबर घेऊन सामूहिक शक्तीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला आणि लंकेलाही पोहोचले. हे सामर्थ्य सामूहिकतेचे असते. उत्सव सामूहिकतेची शक्ती देतात. त्या शक्तीच्या आधारावर आपणही आपला संकल्प पार करूया.
प्लास्टिक पासून मुक्त होण्यासाठी आपण आपापले प्रयत्न करूया. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी आपले गाव, मोहल्ला अशा सर्व ठिकाणी जन चळवळ उभारूया. हा विचार ठेवून एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्याचा आपला संकल्प असला पाहिजे.
प्रभू रामचंद्र यांच्या विजयोत्सवाचे हे पर्व, हजारो वर्षांपासून आपण विजय पर्व म्हणून साजरे करत आलो आहोत. रामायणाची कथा सादर करून संस्कार सरिता आणण्याचा प्रयत्न करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कार दिले जातात.
द्वारका रामलीला समिती द्वारा सादर करण्यात आलेल्या या कथेतून युवा पिढीला, नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
आपण सर्वाना विजयादशमीच्या खूप- खूप शुभेच्छा.
माझ्यासमवेत पुन्हा एकदा म्हणा
जय श्रीराम – जय श्रीराम
जय श्रीराम – जय श्रीराम
जय श्रीराम – जय श्रीराम
खूप- खूप धन्यवाद.