मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर हर्षवर्धन जी, अश्विनीकुमार चौबे जी, विविध राज्यांमधून आणि संस्थानांमधून आलेले प्रतिनिधी , आयुष्मान भारतशी जोडलेले सर्व सहकारी तसेच इथे आलेले सर्व लाभार्थी.
बंधू आणि भगिनींनो, आज तिसरा नवरात्र आहे. आज मातेच्या चंद्रघंटा स्वरूपाची पूजा केली जाते. असे म्हणतात की दहा भुजा असलेली देवी चंद्रघंटा चंद्राच्या शीतलता आणि सौम्यतेसाठी संपूर्ण जगातील वेदनांचा नाश करते. भारतातील 50 कोटींहून अधिक गरीबांच्या हाल -अपेष्टा दूर करणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या पहिल्या वर्षासंदर्भात चर्चेचा यापेक्षा उत्तम योगायोग आणखी काय असू शकतो.
मित्रांनो , आयुष्मान भारताचे हे पहिले वर्ष संकल्पाचे होते. समर्पणाचे होते, शिकण्याचे होते. ही भारताची संकल्पशक्तीच आहे की जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आपण भारतात यशस्वीपणे चालवत आहोत. या यशामागे समर्पणाची भावना आहे, सद्भावना आहे. हे समर्पण देशाच्या प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे आहे, हे देशातील हजारो सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे आहे.हे समर्पण प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक, आयुष्मान मित्र, आशा वर्कर सामाजिक संघटना , लोकप्रतिनिधी म्हणजेच सर्वांचे आहे.
बंधू आणि भगिनींनो, याच समर्पणामुळे देश विश्वासाने म्हणत आहे, अभिमानाने म्हणत आहे-वर्ष एक-आयुष्मान अनेक.
देशातील गरीब, 46 लाख गरीब कुटुंबांमध्ये आजाराच्या निराशेतून निरोगी जीवनाची आशा जागवणे ही खूप मोठी सिद्धी आहे. या एका वर्षात जर कुठलीशी एका व्यक्तीची जमीन, घर, दागिने किंवा अन्य कुठले सामान आजारपणातील खर्चादरम्यान विकण्यापासून बचावले असेल, गहाण ठेवल्यापासून वाचले असेल तर हे आयुष्मान भारताचे खूप मोठे यश आहे.
मित्रांनो, थोड्यावेळापूर्वी अशाच काही लाभार्थ्यांशी बोलायची मला संधी मिळाली. गेल्या एक वर्षात, इतकेच नाही तर निवडणुकीदरम्यान देखील मी देशभरात अशा तमाम सहकाऱ्यांशी संवाद साधायचा कायम प्रयत्न केला आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना तुम्हाला हा अनुभव येतो की आयुष्मान भारत ‘PMJAY’ गरीबांच्या आयुष्यात काय परिवर्तन घडवत आहे.आणि एक प्रकारे पीएमजेवाय आता गरीबांचा जय बनला आहे. जेव्हा गरीबाचा मुलगा निरोगी असतो,जेव्हा घराघरातला एकमात्र कमवणारा तंदुरुस्त होऊन कामाला जातो तेव्हा आयुष्मान होण्याचा अर्थ समजतो. आणि म्हणूनच आयुष्मान भारत ‘PMJAY’ च्या यशासाठी समर्पण करणाऱ्या, समर्पित प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक संस्थेबरोबर देशातील कोट्यवधी गरीबांच्या अनेक-अनेक शुभेच्छा आहेत. या महान कार्यात सहभागी प्रत्येक साथीदाराला मी खूप-खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो.
बंधू आणि भगिनींनो, संकल्प आणि समर्पणबरोबर या पहिल्या वर्षात आपण अनुभवातून बरेच काही शिकलो आहोत. आता इथे येण्यापूर्वी मी प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वर्षाचा प्रवास देखील पाहिला आहे. कशा प्रकारे काळानुरूप आपण प्रत्येक आव्हानांना सामोरे गेलो, तांत्रिकदृष्ट्या निरंतर विस्तार केला आहे. प्रत्येक संबंधिताशी निरंतर संवाद कायम राखला आहे, शंका-कुशंका दूर केल्या आहेत. शिकण्याचा, संवादाचा, सुधारणांचा हा सिलसिला यापुढेही कायम राहील.
मित्रांनो, या योजनेची व्याप्ती, देखरेख कशी परिणामकारक बनवता येईल, लाभार्थ्यांसाठी ती कशी सुलभ बनवता येईल, रुग्णालयाच्या अडचणी कशा दूर करता येतील यावर इथे दोन दिवस विस्तृत चर्चा झाली. दर्जांपासून क्षमता निर्मितीपर्यंत इथे मोकळेपणाने विचार मांडण्यात आले. विशेषतः सार्वत्रिक आरोग्यसेवा म्हणजे या योजनेची व्याप्ती प्रत्येक कुटुंबाला कशी लागू होईल, याबाबत देशातील काही राज्यांनी आपले जे अनुभव सांगितले त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे की प्रत्येक गरीबांसाठी , प्रत्येक देशवासीयासाठी संकट समयी रुग्णालयाची दारे खुली असायला हवीत, उत्तम उपचार उपलब्ध व्हायला हवेत.
बंधू आणि भगिनींनो, आयुष्मान भारत नवभारताच्या क्रांतिकारी पावलांपैकी एक आहे. केवळ यासाठी नाही कि देशातील सामान्य माणसाचा, गरीबांचा जीव वाचवण्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे, तर यासाठी देखील कारण भारताच्या 130 कोटी लोकांच्या सामूहिक संकल्प आणि सामर्थ्याचे देखील ते प्रतीक आहे. असे मी यासाठी म्हणत आहे कारण आपल्या देशात गरीबांना स्वस्त आणि उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न यापूर्वी देखील झाला आहे. प्रत्येक राज्य , प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाने आपल्या सीमित पातळीवर शक्य ते प्रयत्न केले आहेत. राज्यांची सद्भावना असूनही गरीबांना ते लाभ मिळत नव्हते आणि वैद्यकीय संरचनेत कोणत्याही सुधारणा होत नव्हत्या. मात्र आयुष्मान भारताने सिद्ध करून दाखवले कि जेव्हा भारताची सामूहिक ताकद एकत्र येते तेव्हा त्याचा लाभ आणि सामर्थ्य अधिक व्यापक बनते, विराट होते. आयुष्मान भारत देशातील कुठल्याही भागातील रुग्णाला देशात कुठेही लाभ मिळवून देतो जे पूर्वी शक्य नव्हते. हेच कारण आहे कि गेल्या एक वर्षात सुमारे 50 हजार लाभार्थ्यांनी आपल्या राज्याच्या बाहेर अन्य राज्यात चांगल्या रुग्णालयात या योजनेचा लाभ घेतला आहे.
बंधू आणि भगिनींनो, देशातील कुठलीही व्यक्ती उपचारासाठी आपले घर, आपला जिल्हा, आपले राज्य सोडून दूर जाऊ इच्छित नाही, नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागते. देशातील प्रत्येक नागरिकाला घराजवळ उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करत आहे..हे देखील खरे आहे की देशातील अशा भागात जिथे उत्तम आरोग्य सुविधा आहेत, तिथे ताण जरा जास्त आहे, मात्र ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की देशातील कुणीही नागरिक आधुनिक आरोग्य सेवांपासून वंचित राहू नये. आयुष्मान भारत हीच भावना मजबूत करत आहे.
मित्रांनो, आयुष्मान भारत संपूर्ण भारतासाठी सामूहिक उपायाबरोबरच निरोगी भारताची सर्वंकष उपाययोजना देखील आहे. सरकारच्या विचाराचा विस्तार आहे. ज्याअंतर्गत, आपण भारताच्या समस्या आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी छोटे छोटे उपाय करण्यापेक्षा समग्रतेने काम करत आहोत. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रात सार्वत्रिक आरोग्यसेवा संदर्भात एक कार्यक्रम झाला होता, ज्यात मला भारताबद्दल बोलण्याची संधी मिळाली होती. भारतात आरोग्य सेवेच्या बाबतीत ज्याप्रकारे व्यापक दृष्टिकोनातून काम होत आहे , ज्या प्रमाणात होत आहे आणि जगासाठी ते एक आश्चर्य आहे, जग हैराण आहे.
बंधू आणि भगिनींनो, संयुक्त राष्ट्रात उपस्थित जगभरातील प्रतिनिधींना मी सांगितले की आपण कशा प्रकारे निरोगी भारताला चार मजबूत स्तंभांवर उभे करत आहोत. एक- प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा दोन – किफायतशीर आरोग्य सेवा, तीन- पुरवठ्यात सुधारणा आणि चार-राष्ट्रीय पोषण अभियान सारख्या अभियानावर आधारित हस्तक्षेपाचे आहेत.
पहिल्या स्तंभाबाबत बोलायचे झाले तर आज स्वच्छता, योग, आयुष, लसीकरण आणि तंदुरुस्तीवर भर दिला जात आहे जेणेकरून जीवनरेषेशी संबंधित आजार कमीत कमी होतील. एवढेच नाही, पशूंमुळे पसरणारे आजार देखील मनुष्यासाठी समस्या ठरत आहेत. आणि म्हणूनच यावेळी आम्ही एक मिशन मोड मध्ये काम हाती घेतले आहे- पशूंमध्ये पायापासून तोंडापर्यंत जे आजार आहेत त्यापासून भारताला मुक्त करणे. म्हणजेच पशूंची चिंता, ती देखील आम्ही विसरलेलो नाही.
मी तिथे दुसऱ्या स्तंभाबाबत देखील बोललो. दुसरा स्तंभ म्हणजे देशातील सामान्य जनतेला उत्तम आणि स्वस्त उपचार मिळावेत यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत.
बंधू आणि भगिनींनो, या दोन स्तंभांना आयुष्मान भारत योजना अधिक बळ देत आहे. मग ते देशभरातील दीड लाखांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्राचे निर्माण असेल किंवा मग दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा, आयुष्मान भारताची भूमिकाच महत्वपूर्ण आहे.
मित्रांनो, आयुष्मान भारत आपला तिसरा स्तंभ म्हणजेच पुरवठ्याच्या मजबुतीचा ठोस आधार तयार करत आहे. आयुष्मान भारतामुळे देशात आरोग्य सेवांच्या मागणीत वाढ होत आहे. आता गरीब रुग्ण देखील रुग्णालयात जात आहेत जे कधी उपचारांबाबत विचार देखील करत नव्हते. खासगी रुग्णालयात तर उपचारांची तो कल्पनाच करत नव्हता. आज PM-JAY सेवा देणाऱ्या 18 हजार पेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये सुमारे 10 हजार, म्हणजे अर्ध्याहून अधिक रुग्णालये खासगी क्षेत्रात आहेत. आगामी काळात ही भागीदारी आणखी वाढणार आहे.
मित्रांनो, जसजशी मागणी वाढत आहे, तसतसे देशातील छोट्या शहरात आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे जाळे देखील पसरत आहे. आगामी काळात अनेक नवीन रुग्णालये बांधली जाणार आहेत. रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत.एका अनुमानानुसार पुढील पाच-सात वर्षात केवळ आयुष्मान भारत योजनेमुळे निर्माण होणाऱ्या मागणीमुळे सुमारे 11 लाख नवीन रोजगारांची निर्मिती होईल. हा किती मोठा आकडा आहे याचा अंदाज या गोष्टीवरून बांधता येतो कि केवळ रेल्वेचं यापेक्षा जास्त रोजगार निर्मिती करते.
बंधू आणि भगिनींनो, रोजगाराच्या या संधींसाठी आपल्या युवा सहकाऱ्यांना प्रशिक्षित करणे खूप आवश्यक आहे. हेच कारण आहे कि वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित पायाभूत विकासाचा विस्तार केला जात आहे. आणि धोरणांमध्ये निरंतर सुधारणा केल्या जात आहेत. एकीकडे देशात वैद्यकीय शिक्षणाच्या जागांची संख्या वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रवेशापासून नियमनापर्यंत एक वेगवान आणि पारदर्शक व्यवस्था तयार केली जात आहे. देशभरात 75 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये बांधण्याचा निर्णय असेल किंवा देशात नवीन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची निर्मिती असेल, यातून वैद्यकीय क्षेत्राला निश्चितच लाभ होणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विस्ताराला गती मिळेल , त्याच्या दर्जात सुधारणा होईल आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी दूर होतील.
मित्रांनो, आयुष्मान भारत योजना नागरिक-स्नेही बनवण्यासाठी, पूर्णपणे सुरक्षित बनवण्यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. आणि मला सांगण्यात आले आहे कि याच्याशी संबंधित माहिती तंत्रज्ञान प्रणालीला PM-JAY 2.0 म्हणून अद्ययावत केले जात आहे. आणि यात निरंतर सुधारणा केल्या जात आहेत. आज जे ॲप सुरु करण्यात आले त्यामुळे लाभार्थ्यांना खूप मदत मिळणार आहे. मात्र मित्रानो, ही योजना अधिक सक्षम अधिक व्यापक बनवण्यासाठी आपल्याला अजून आणखी तांत्रिक उपाय आवश्यक आहेत. आयुष्मान भारताचे वेगवेगळे घटक आहेत, ते परस्परांना जोडण्यासाठी एक प्रभावी आणि सुगम प्रणाली आवश्यक आहे. आरोग्य आणि कल्याण केंद्रांपासून ऑपरेशन थिएटर पर्यंत, निदान, संदर्भ आणि पाठपुराव्यासाठी एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आपल्याला विकसित करायची आहे. आपल्याला त्या स्थितीच्या दिशेने जायचे आहे जिथे गावातील आरोग्य आणि कल्याण केंद्रात नोंदणी असलेल्या कुणाही व्यक्तीची आरोग्य विषयक माहिती त्या व्यक्तीच्या आजाराच्या निदानात उपयुक्त ठरेल. हीच माहिती मोठ्या रुग्णलयात रेफरल करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी प्रभावी भूमिका पार पाडू शकेल. यासाठी आपल्याला सर्वांना विचार करावा लागेल, नव्या पिढीतील लोकांना सामावून घ्यावे लागेल.
मित्रांनो, यासाठी आज सुरु करण्यात आलेले PM-JAY Startup Grand Challenge महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. आणि मी देशातील युवा शक्तीला विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना विनंती करेन कि हे मानवतेचे काम आहे, हे आव्हान तुम्हीच स्वीकारा, आणि आगामी काळात तुम्ही एक उत्तम उपाय घेऊन या. या माध्यमातून देशभरात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना आयुष्मान भारतशी जोडले जात आहे. मी देशातील सर्व तरुण उद्योजकांना, नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्यांना या संधीचा लाभ उठवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो.
बंधू आणि भगिनींनो, नवभारताची आरोग्य सेवा प्रणाली खरोखरच जगासाठी एक उदाहरण बनणार आहे. यातही आयुष्मान भारत योजनेचे खूप मोठे योगदान असेल. देशातील कोट्यवधी लोकांना आयुष्मान बनवण्याची आपली कटिबद्धता आणखी मजबूत होवो, आपले प्रत्येक प्रयत्न यशस्वी होवोत. याच कामनेसह तुम्हा सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद, खूप-खूप शुभेच्छा.