नेटवर्क 18 समुहाचे मुख्य संपादक राहुल जोशीजी, देश विदेशातून आलेले अतिथी आणि येथे उपस्थित असलेले प्रसार माध्यमातील बंधू, भगिनी आणि सज्जन हो,
‘रायझिंग इंडिया’ या परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी आपण मला दिली, याबद्दल मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.
मित्रांनो, ज्यावेळी आपण ‘रायझिंग’ असं म्हणतो, त्यावेळी अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाणे, असा पहिला भाव असतो. आपण जिथे होतो, ज्या स्थितीमध्ये होतो, त्यापेक्षा पुढे जाणे, अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने प्रवास करण्याचा भाव त्यामध्ये येत असतो.
अशा पद्धतीने ‘राइज’ करणे म्हणजेच उदय होणे असते. ज्यावेळी आपण देशाच्या संदर्भामध्ये बोलत असतो, त्यावेळी त्याचा विस्तार खूप व्यापक असतो. म्हणूनच आता प्रश्न निर्माण होतो की, ‘रायझिंग इंडिया’ नेमके आहे तरी काय? फक्त अर्थव्यवस्थेला येणारी बळकटीम्हणजे रायझिंग इंडिया आहे, भांडवली बाजाराचा निर्देशांक विक्रमी स्तरावर पोहोचणे रायझिंग इंडिया आहे, परकीय गंगाजळीमध्ये विक्रमी भर पडणे आणि ती भरपूर वाढणे रायझिंग इंडिया आहे, की विक्रमी परदेशी गंुतवणूक देशामध्ये येणे म्हणजेरायझिंग इंडिया आहे का?
मित्रांनो, मला असं वाटतं की, रायझिंग इंडिया म्हणजे देशाच्या सव्वाशे कोटी जनतेच्या स्वाभिमानाचा उदय होणे, देशाच्या आत्मगौरवाचा उदय होणे. ज्यावेळी याच सव्वाशे कोटी लोकांची इच्छाशक्ती एकजूट होते, सर्वांचे संकल्प एक होत जातात, त्यावेळी अशक्य तेही शक्य होत असते. असंभवसुद्धा संभव होते. आज एकजूट झालेली इच्छाशक्तीच नवभारताचा संकल्प पूर्ण करण्याचं काम करीत आहे.
बंधू आणि भगिनींनो, अनेक देशांमध्ये काही विशिष्ट पद्धती असतात. त्यानुसार सरकार विकास कामांसाठी, परिवर्तन घडवून आणण्यासाठी नेतृत्व करीत आहे आणि नागरिक त्याचे अनुकरण करत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये भारतात आम्ही या स्थितीमध्ये बदल घडवून आणला आहे. आता देशाचा नागरिक नेतृत्व करीत आहे आणि सरकार त्याचे अनुकरण करीत आहे.
आपण सर्वांनीच पाहिले की, इतक्या कमी कालावधीमध्ये स्वच्छ भारत मोहिमेचे, जनआंदोलनामध्ये कशा पद्धतीने रूपांतरण झाले. प्रसार माध्यमांनीही या जनआंदोलनामध्ये एक भागीदार म्हणून कशी भूमिका पार पाडली आहे.
काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये देशाच्या नागरिकांनी डिजिटल पेमेंटला आपले एक मजबूत हत्यार बनवले आहे. डिजिटल पेमेंट करण्यामध्ये अतिवेगाने वाढणारी बाजारपेठ आता भारताची आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक कारवाईला ज्या पद्धतीने लोकांचे समर्थन मिळत आहे, ते पाहिल्यानंतर एक साक्ष पटते की, देशाला अंतर्गत वाईट गोष्टींपासून मुक्ती देण्यासाठी लोक अगदी कंबर कसून कामाला लागले आहेत.
आमच्या राजकीय विरोधकांनी कितीही आणि काहीही बोलले, तरी देशाच्या नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रेरणेमुळेच सरकार इतके मोठे निर्णय घेवू शकते आणि त्यांची लगोलग अंमलबजावणी करू शकते. काही महत्वपूर्ण निर्णयांचा सल्ला दशकापूर्वीच दिला गेला होता परंतु त्या फायली तशाच दाबून ठेवण्यात आल्या होत्या. जे कायदे दशकांपूर्वीच करण्यात आले ते भ्रष्टतंत्राच्या दबावामुळे लागू करण्यात आले नाही. आता आमच्या सरकारने अशा दबावाला बळी न पडता लागू केले आहेत. त्याच कायद्यांचा आधार घेवून आता मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे.
मित्रांनो, भारतामध्ये जे परिवर्तन घडून येत आहे, ते आपल्यासारख्या नागरिकांमुळे घडून येत आहे. आपली चांगली इच्छाशक्ती देशातल्या लोकांमध्ये, देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असंतुलनाची भावना कमी करत आहे.
बंधू आणि भगिनींनो, देशाचा उदय व्हावा अथवा एखाद्या समाजाचा किंवा व्यक्तिचा, जर बरोबरीची, समानतेची भावना नसेल तर,संकल्प सिद्धीस जाणार नाही. म्हणूनच तर एखादा दृष्टिकोन म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमचे सरकार राष्ट्रीय पातळीवर असलेली ही असंतुलनाची भावना नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचा परिणाम नेमका काय होतो आहे, हे मी नेटवर्क 18 च्या प्रक्षेकांना एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. त्यांनी या घडून आलेल्या बदलाचा अनुभव घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.
मित्रांनो, उज्ज्वला ही फक्त स्वयंपाकाच्या गॅसची योजनाच नाही. तर या योजनेमुळे करोडो परिवारांचे चित्रच बदलले आहे. यामुळे आमच्या सामाजिक व्यवस्थेमधली एक मोठी असमानता संपुष्टात आली आहे, येत आहे.
मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमाला येण्यापूर्वी अगदी अदल्या दिवशी, म्हणजे कालच मी मणिपूर इथं होतो. तिथं सायन्य काँग्रेसचे उद्घाटन केले, त्याचबरोबर क्रीडा विद्यापीठाचा शिलान्यास केला, उत्तर पूर्वेसाठी अनेक महत्वपूर्ण योजनांचा प्रारंभ आता करण्यात आला. पंतप्रधान झाल्यापासून हा माझा अठ्ठाविसावा किंवा एकोणतिसावा उत्तर पूर्वचा दौरा होता.
आता आपणच विचार करा, असे का? आमचे सरकार पूर्व भारत, उत्तर पूर्व भारत यांच्यावर इतका जास्त भर का देत आहे? आम्ही हे सर्व मतांसाठी करतो आहोत, असा विचार जे लोक करतात, ते या देशाच्या भूमीतले नाहीच आहेत. इतकच नाही तर लोकांच्या मनातूनही ते उतरले आहेत.
साथींनो, पूर्व भारताची भावनिक एकात्मता आणि भौगोलिक संपन्नता यांच्याकडे लक्ष देण्याची खूप आवश्यकता आहे.
हे लक्षात घेवून आमचे सरकार ‘अॅक्ट ईस्ट अँड अॅक्ट फास्ट फॉर इंडियाज ईस्ट’ असा मंत्र जपून काम करत आहे. आणि ज्यावेळी मी‘अॅक्ट ईस्ट’ असं म्हणतो, त्याचा विस्तार फक्त उत्तर पूर्व राज्यांपुरताच सीमित नाही. तर त्यामध्ये पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा यांचाही समावेश आहे.
देशाचा हा भाग आहे, तो विकासाच्या स्पर्धेमध्ये मागे राहिला आहे. यामागे खूप मोठे कारण आहे, ते म्हणजे या क्षेत्राच्या विकासाबद्दल असलेली उदासिनता. या क्षेत्रामध्ये शेकडो प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. परंतु हे सगळे प्रकल्प एक सुरूच झाले नाहीत किंवा ते दशकांपासून प्रलंबित, अपूर्ण राहिले आहेत. आमच्या सरकारने ही असमानता संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आणि ज्या योजना अपूर्ण आहेत, जे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले गेले आहेत, त्या सर्व योजना, ते प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.
– आसाम राज्यातला मोठा आणि महत्वपूर्ण ‘गॅस क्रॅकर प्रकल्प’ गेली 31 वर्षे प्रलंबित होता, हे जाणल्यानंतर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. आम्ही सत्तेवर आल्यानंतर या योजनेवर पुन्हा एकदा काम सुरू केले.
– आज खूप वेगाने उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर, बिहारमधल्या बरौनी आणि झारखंडमधल्या सिंदरी येथे बंद पडलेले कृषी खतांचे कारखानेही पुन्हा एकदा सुरू करण्याचे काम केले जात आहे.
– या प्रकल्पाला लागत असलेल्या गॅससाठी, जगदीशपूर ते हल्दियापर्यंत गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. याच गॅसवाहिनीमार्फत पूर्व भारतातील प्रमुख शहरांमध्ये गॅसवाहिनीवर आधारित उद्योगांना उद्योगांसाठी पूर्णपणे इको-सिस्टमही विकसित करण्यात येणार आहे.
– ओडिशामध्ये पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारनेच प्रयत्न केले. त्याचबरोबर आता पारादीप विकासाचे व्दीप बनण्यामध्ये अग्रेसर बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आमच्या सरकारच्या प्रयत्नामुळे आसाम आणि अरूणाचल यांना जोडत असलेल्या महत्वपूर्ण ढोला-सादिया पुलाचे काम अत्यंत वेगाने पूर्ण झाले आहे. या पुलाला राजनैतिक महत्वही आहे, हे आमच्या सरकारने ओळखले आणि काम जलदतेने पूर्ण केले.
– रस्ते महामार्गाचे क्षेत्र असो अथवा रेल्वे क्षेत्र असो, सर्व बाजूंनी पूर्व भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. सरकार जलमार्ग बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न सरकार करीत आहे. वाराणसी आणि हल्दिया यांच्या दरम्यान जलमार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतुकीमध्ये आमुलाग्र बदल घडून येवू शकणार आहे. जलमार्ग मालवाहतुकीमध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
– संपर्क यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत पूर्व भारतामध्ये 12 नवीन विमानतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी सहा विमानतळांची निर्मिती उत्तर पूर्वेमध्ये करण्यात येणार आहे. अलिकडेच, अगदी काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेल,सिक्किममध्ये प्रथमच व्यावसायिक विमान उतरले.
– ज्यावेळी नवीन भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची म्हणजेच ‘एम्स’विषयी चर्चा होते, ज्यावेळी नवीन भारतीय कृषी संशोधन संस्थेची चर्चा होते, त्या त्यावेळी आमच्या सरकारने पूर्व भारताला प्राधान्य दिले आहे.
– महात्मा गांधीजी यांची कर्मभूमी असलेल्या पूर्व चंपारण – मोतीहारीमध्ये आमच्या सरकारने एका केंद्रीय विद्यापीठाची स्थापनाही आमच्या सरकारने केली आहे.
मित्रांनो, सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनांमुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेत.
‘दिल्ली दूरअस्त’ म्हणजेच दिल्ली दूर असते, या धारणेपेक्षा वेगळा विचार करून आम्ही दिल्ली आता पूर्व भारताच्या दरवाज्यासमोर आणून उभी केली आहे. आम्ही ‘सबका साथ -सबका विकास’ हा मंत्र जपत देशाचा प्रत्येक भूभाग विकासाच्या मुख्यधारेमध्ये सहभागी करीत आहोत.
मित्रांनो, मी आपल्याला एक नकाशा दाखवू इच्छितो. गेल्या चार वर्षामध्ये देशातला असमतोल कशा पद्धतीने संपुष्टात आला आहे आणि पूर्व भारतामधली गावे कशा पद्धतीने विद्युत जोडणीमुळे उजळली आहेत, हे या नकाशावरून स्पष्ट दिसून येते.
स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत देशातील 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचली नाही, या गोष्टीचा मी वारंवार उल्लेख करीत असतो. विशेष म्हणजे त्यापैकी 13 हजार गावे पूर्व भारतामधले होते हे जाणून आपल्याला खूप आश्चर्य नक्कीच वाटेल. या 13 हजार गावांमध्ये पाच हजार गावे ही उत्तर पूर्वेकडील होती. आता आमच्या सरकारने या सर्व गावांमध्ये विजेचे कनेक्शन देण्यापर्यंत सर्व कामे जवळपास पूर्ण केली आहेत.
इतकेच नाही, तर आता प्रत्येक घरामध्ये विजेचे कनेक्शन देण्यासाठी आमच्या सरकारने सौभाग्य योजनाही सुरू केली आहे. यासाठी सरकार 16 हजार कोटी रूपये जास्त खर्च करीत आहे.
पूर्व भारतामधील लोकांच्या आयुष्यात आलेले हे प्रकाशाचे किरण, वेगळेपणातून एकात्मतेकडे जाणारा हा मार्गच ‘रायझिंग इंडिया’ची चमक आणखी प्रखर करणार आहे.
मित्रांनो, कॉर्पोरेट जगतामध्ये एक म्हण प्रचलित आहे. ‘‘ यू कांट मॅनेज, व्हॉट यू कांट मेझर’ आम्हीही हा मंत्र फक्त आपल्या कार्यपद्धतीसाठी स्वीकारला नाही, तर त्याला आम्ही खूप पुढे घेवून गेलो आहोत. -‘मेझर टू मॅनेज अँड मॅनेज टू क्रिएट मास मुव्हमेंट’.
ज्यावेळी एखादे जन आंदोलन बनते, ज्यावेळी अगदी व्यापक प्रमाणावर सरकार आणि जनता यांची सहभागीता असते, त्यावेळी त्या कार्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात. आणि त्याचबरोबर हे परिणाम दूरगामी, शाश्वत असतात. मी आपल्या देशातल्या आरोग्य क्षेत्राचे उदाहरण देणार आहे. आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये बहुविभागीय पद्धतीने पुढे जात काम करीत आहोत.
त्यामध्ये चार स्तंभाचा प्रामुख्याने विचार करीत आहोत.
– प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा.
– परवडणा-या दरामध्ये आरोग्यसेवा.
– पुरवठा साखळीमध्ये हस्तक्षेप.
– एखादी मोहीम म्हणून आरोग्यसेवा देणे.
आरोग्यसेवेच्या बाबतीत आम्ही या वरील चार गोष्टींवर जास्त भर दिला आहे. देशामध्ये आरोग्य सेवेसाठी फक्त आरोग्य मंत्रालय आहे. आणि ते एकटेच काम करीत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक प्रकारचे साचलेपण आहे आणि त्याला कोणताही पर्याय अथवा उत्तर नाही. आता आमचे प्रयत्न आहेत की, असे कसलेही साचलेपण येवू द्यायचे नाही, तर पर्याय उपलब्ध करून द्यायचे.
जनता-जनार्दनशी जोडल्या गेलेल्या या अभियानामध्ये आरोग्य मंत्रालयाच्या बरोबरीने अन्य इतर मंत्रालयांनीही जोडण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता मंत्रालय, आयुष , रसायन आणि कृषीखते मंत्रालय, ग्राहक आणि महिला तसेच बालविकास मंत्रालय यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आम्हीसगळ्यांना बरोबर घेवून जात, एकत्रितपणे एक ध्येय निश्चित केले आहे. आणि सगळे मिळून कार्य करून या ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील आहोत.
या चारपैकी मी पहिल्या स्तंभाचा म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेविषयी चर्चा करणार आहे. कारण हे करणे सर्वात स्वस्त आणि सर्वात सोपेही आहे.
आपण सगळेचजण जाणून आहोत, की स्वस्थ, निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता सर्वात पहिली आवश्यकता आहे. आणि आम्ही याच गोष्टीवर भर देवून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाला कार्यान्वित केले. त्याचा परिणाम पहा, 2014 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये 6.5कोटी घरांमध्ये शौचालये होती. आणि आता 13 कोटी घरांमध्ये शौचालये आहेत. म्हणजे देशातल्या शौचालयांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.
आज देशातील स्वच्छतेचे प्रमाण 38 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ सुद्धा दुपटीपेक्षा जास्त आहे. अस्वच्छता,घाण अनेक आजारांना आमंत्रण देते त्याउलट, स्वच्छतेमुळे रोग आपल्यापासून दूर जातात. स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्येक घराघरांमध्ये हा संदेश पोहोचला आहे.
प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या रूपामध्ये ‘योग’ने आज नव्या पद्धतीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आयुष मंत्रालय अधिक जोमाने कामाला लागल्यामुळे आज योग संपूर्ण विश्वामध्ये एक जन आंदोलनाचं स्वरूप धारण करीत आहे.
या अंदाजपत्रकामध्ये आम्ही ‘वेलनेस सेंटर’ घेवून आलो आहोत. देशाच्या प्रत्येक मोठ्या पंचायतीमध्ये एक ‘हेल्थ वेलनेस सेंटर’ स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
लसीकरण कार्यक्रमावर आम्ही विशेष भर दिला आहे. आमचे सरकार येण्यापूर्वी देशामध्ये लसीकरणाचा वृद्धीदर फक्त एक टक्का होेता. आता त्यामध्ये वाढ होवून तो 6.7 टक्के झाला आहे.
मित्रांनो, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या बरोबरच सर्वांना परवडणारी आरोग्यसेवा असण्याची खूप आवश्यकता आहे. आरोग्यसेवा तातडीने मिळणारी पाहिजे तसेच ती परवडणारीही हवी. जन सामान्यांसाठी स्वस्त आणि सुलभ आरोग्यसेवा असावी यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. उपाय योजना केल्या आहेत.
आम्ही रसायन आणि कृषीखते मंत्रालयालाही कामाला लावले आहे. त्यामुळे हे मंत्रालय याच दिशेने कार्यरत आहे. देशभरामध्ये3हजारपेक्षा जास्त जन-औषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 800पेक्षा जास्त औषधे कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हृदय रोगींना स्टेंट कमीत कमी किंमतीमध्ये मिळावा, यासाठी ग्राहक मंत्रालयाला जबाबदारी सोपवून कामाला लावले आहे. आणि याबाबतीत ग्राहक मंत्रालयाने केलेल्या कामगिरीमुळे चांगला परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे आज हृदय रोगींना लागत असलेल्या स्टेंटच्या किंमती 85 टक्के कमी झाल्या आहेत. याबरोबरच गुडघेरोपणासाठी लागणारा खर्चही नियंत्रित करण्यात आला आहे. यामुळे गुडघे रोपणाच्या शस्त्रक्रियेचा खर्च आता 50 ते 70 टक्के कमी झाला आहे.
या अंदाजपत्रकामध्ये आम्ही आणखी एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत’. या योजनेमुळे देशातल्या गरीबातील गरीब व्यक्तिला खूप मोठी मदत मिळू शकणार आहे. यामध्ये जवळपास 10 कोटी परिवार म्हणजेच जवळपास45 ते 50 कोटी नागरिक औषधोपचाराच्या चिंतेतून मुक्त होवू शकणार आहेत. समजा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य दुर्दैवाने आजारी पडलाच तर एका वर्षामध्ये 5 लाखापर्यंतचा खर्च भारत सरकार आणि विमाकंपनी संयुक्तपणे करणार आहेत.
मित्रांनो, आरोग्य क्षेत्रामधला तिसरा मोठा स्तंभ आहे, पुरवठा साखळीमध्ये हस्तक्षेप. आरोग्याबरोबरच ज्या आवश्यक सुविधा जोडल्या जातात, त्यांना सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
देशामध्ये आणि विशेष करून गांवांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी जाणवते. या समस्येला उत्तर म्हणून आमच्य सरकारने वैद्यकीय शाखेच्या जागांमध्ये चांगली वाढ केली आहे.
मित्रांनो, 2014 मध्ये ज्यावेळी आमचे सरकार सत्तेवर आले होते, त्यावेळी वैद्यकीय शाखेमधून 52 हजार पदवीपूर्व परीक्षेसाठी , 30हजार पदव्यूत्तर जागा होत्या. आता देशामध्ये 85 हजारपेक्षा जास्त पदवीपूर्व आणि 46 हजारपेक्षा जास्त जागा पदव्युत्तर विद्याथ्र्यांसाठी होत्या.
याशिवाय देशामध्ये नवीन एम्स आणि आयुर्वेद विज्ञान संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्याचबरोबर संसदेच्या प्रत्येक तीन जागांमध्ये किमान एक वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची योजनाही आहे.
आमच्या सरकारने केलेल्या या प्रयत्नांचा थेट लाभ आमच्या युवावर्गाबरोबरच देशातल्या गरीब जनतेलाही मिळावा. नर्सिंग आणि पॅरामेडिकल क्षेत्रामध्येही मनुष्य बळ वाढवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. वैद्यकीय व्यावसायिक वाढले तर परवडणा-या दरामध्ये आरोग्यसेवा सहजपणाने मिळू शकणार आहे.
बंधू आणि भगिनींनो, आरोग्य क्षेत्राचा चैथा आणि अतिशय महत्वपूर्ण स्तंभ आहे, मिशन मोडवर कार्य.
काही आव्हाने अशी असतात, की त्यांच्यासाठी मिशन मोडवर कार्य करण्याची अतिशय आवश्यकता आहे. असे झपाट्याने काम केले तरच त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत मिळत असते. आणि मग सगळ्यांना त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
देशातील माता आणि बालकांचे आरोग्य चांगले रहावे. त्यांना कोणताही आजार होवू नये. ती दोघेही रोगमुक्त असावीत, त्याचबरोबर दोघेही सशक्त असावीत. यासाठी आम्ही महिला आणि बालविकास मंत्रालयावर कामगिरी सोपवलीआहे.या मंत्रालयामार्फत आज माता-बालक आरोग्यासाठी अनेक कार्यक्रम चालवण्यात येत आहेत.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत माता आणि बालकांना सुयोग्य आणि पोषक सुनिश्चित आहार देण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय पोषण अभियानाला प्रारंभही करण्यात आला आहे. देशाला स्वस्थ बनवण्याच्या दिशेने हे सर्वात वेगळे आणि मोठे पावूल उचलण्यात आले आहे. ज्यावेळी बालके आणि माता यांना सुयोग्य पोषण मिळेल त्यावेळी त्यांचे आरोग्य चांगले बनणार आहे.
माझ्या मते केव्हाही- कोणतीही एकच मोजपट्टी,सगळ्यांना लागू होत नाही. एकाच मोजमापामध्ये सगळ्यांना मापता येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक विभागाचा विचार करून ‘युनिक डेव्हलपमेंट मॉडेल’ विकसित केले गेले पाहिजे, असे आमच्या सरकारला वाटतेय.
मित्रांनो, मी आता आपल्याला एक ध्वनिचित्रफीत दाखवणार आहे. आपण त्याच्या माध्यमातून देशभराच्या आनंदामध्ये सहभागीदार व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
आत्ता आपण लोकांच्या चेह-यांवर जो आनंद, जी खुशी पाहिली, तो आनंद माझ्यासाठी ‘रायझिंग इंडिया’ आहे.
आता अखेर हे परिवर्तन कसे काय घडून आले?
आपल्याला आठवत असेल, सहा वर्षांपूर्वी जुलै महिन्यामध्ये ऊर्जा निर्मितीमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देश अंधारामध्ये बुडून गेला होता. जे काही घडले होते, ते म्हणजे, एका कार्यप्रणालीमध्ये झालेली गडबड होती. शासनतंत्रामध्ये झालेला बिघाड होता.
ती एकप्रकारे साचलेपणाची स्थिती होती. कारण काही वर्षांपूर्वी ऊर्जा मंत्रालयाला आपल्या कार्याशी संबंधित असलेल्या कोळसा मंत्रालयाचा ‘रोडमॅप’ काय आहे, हे माहीतच नसायचे. त्याचप्रमाणे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मुख्य ऊर्जा मंत्रालयाशी कोणत्याही प्रकारचे समन्वय नसायचे.
त्यामुळेच असे साचलेपणाच्या मर्यादा तोडून उत्तर, पर्याय शोधण्याचे कार्य देशाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये अतिशय व्यापक पद्धतीने करण्यात येत आहे.
आज भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वोत्तम पर्याय, उत्तर म्हणून ऊर्जा मंत्रालय, नविनीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय अगदी एकसंध विभाग म्हणून काम करीत आहेत.
कोळशामुळे आपल्याला ऊर्जा संरक्षण मिळत आहे. तर नवीकरणीय ऊर्जेमुळे आमच्या आगामी पिढीच्या चांगल्या भविष्य निर्माणासाठी आपण शाश्वत ऊर्जा देवू शकतो. आणि याच कारणामुळे आम्ही ऊर्जेच्या टंचाईला, तुटवड्याला तोंड देत असताना आता अतिरिक्त ऊर्जा निर्माण करू लागलो आहोत. ‘नेटवर्क फेल्युअर’ हा टप्पा आता संपली असून ‘नेट एक्सपोर्टर’च्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे ‘वन नेशन- वन ग्रिड’ हे स्वप्नही साकार झाले आहे.
मित्रांनो, हार, हताशा, निराशा असे वातावरण कोणत्याच देशाला प्रगतीपथावर, आघाडीवर घेवून जावू शकत नाही. आपणही पाहिले असेलच की, गेल्या चार वर्षांमध्ये देशाच्या लोकांमध्ये, देशा चालवत असलेली व्यवस्था यांच्यामध्ये कोणत्या तरी प्रकारचा एक अद्भूत विश्वास निर्माण झाला आहे. सर्वांना एक प्रकारचा विश्वास जाणवतो. अनेक लोकांना झालेले परिवर्तन ठसटशीतपणाने जाणवत आहे. आपल्या जीवनामध्ये घडून आलेले, येत असलेले बदल ते पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयामध्ये हा विश्वास जाणवत आहे. काही लोक झालेले परिवर्तन अनुभवत आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीयाला आता विश्वास वाटतो की, 21व्या शतकामध्ये भारत आपल्या कमतरता बाजूला सारून, आपल्यावर लादलेली बंधने झुगारून पुढे मार्गक्रमण करू शकणार आहे. ‘एक भारत -श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न साकार करू शकतो. लोकांचा हा प्रबळ विश्वासच ‘रायझिंग इंडिया’चा पाया आहे.
बंधू आणि भगिनींनो, याच कारणासाठी आज संपूर्ण विश्व, भारताच्या या उदयाला,‘रायझिंग इंडिया’ मान देत आहेत. सम्मान देत आहेत. पहिल्या सरकारच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जितके राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रप्रमुख भारतामध्ये आले. आणि गेल्या चार वर्षांमध्ये भारतामध्ये किती अतिथी आले यांची तुलना केली तर आपोआपच अनेक गोष्टी समजून येतात. आधीच्या सरकारमध्ये सरासरी एक वर्षामध्ये विश्वभरातील जितके मोठे नेते येवून गेेले, आता त्याच्या जवळपास दुप्पट राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रप्रमुख सध्या दरवर्षी भारतामध्ये येत आहेत.
हे ‘रायझिंग इंडिया’चे एक छायाचित्र आहे, ते पाहून आपल्या सर्वांना नक्कीच गर्व, अभिमान वाटेल.
मित्रांनो, भारत केवळ आपल्या देशाच्या विकासालाच नाही तर संपूर्ण विश्वाच्या विकासाला नवीन दिशा दिली आहे. भारत आज संपूर्ण विश्वामध्ये सौर क्रांतीचे नेतृत्व करीत आहे. आपण पाहिले आहे की, अगदी अलिकडेच, पाच दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय सौर संमेलनाचे आयोजन किती यशस्वीपणे आपण केले होते. या संमेलनामध्ये मांडण्यात आलेल्या दिल्ली सौर कार्यक्रम लागू करण्यासाठी 60 पेक्षा जास्त देशांनी आपली सहमती दर्शवली आहे. हवामान बदलासारख्या विषयामध्ये भारताने सुरू केलेले प्रयत्न म्हणजे 21व्या शतकामध्ये संपूर्ण मानवतेसाठी केलेली सर्वात मोठी सेवा आहे.
मित्रांनो, गेल्या चार वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय जगतामध्ये भारताचा ज्या पद्धतीने प्रभाव वाढला आहे, त्यासाठी अगदी विचारपूर्वक रणनीती निश्चित करून त्या दृष्टीने सातत्याने कार्य करण्यात आले आहे. भारताने संपूर्ण दुनियेला संदेश दिला आहे. हा, शांतीचा,विकासाचा शाश्वत विकासाचा संदेश आहे.
भारताने मोठ मोठ्या समुहांमध्ये मग तो संयुक्त राष्ट्र असो किंवा जी-20 असो, त्यामध्ये उपस्थित केलेले जे विषय आहेत, त्यामुळे संपूर्ण विश्व प्रभावित झाले आहे. दहशतवाद ही काही फक्त कोणत्या एका देशाची अथवा एखाद्या क्षेत्राची समस्या नाही. परंतु दुनियेतल्या प्रत्येक देशासमोर हे एक मोठे आव्हान आहे. ही गोष्ट भारतानेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केली. त्यावर चर्चा करायला भाग पाडले.
वेगवेगळ्या देशांमध्ये काळ्या पैशाचा प्रवाह आणि भ्रष्टाचार कशा पद्धतीने विश्वाच्या विकासामध्ये बाधक ठरत आहे. त्याच बरोबर‘इफेक्टिव्ह फायनान्शियल गव्र्हनन्स’च्या दृष्टीने एक मोठे आव्हान बनले आहे. हा विषयही सर्वात प्रथम भारताचे अतिशय प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केला.
मित्रांनो, जर संपूर्ण जगातून 2030पर्यंत टी.बी. चे समूळ उच्चाटन झाले असेल तर त्याआधी पाच वर्षे म्हणजे 2025 पर्यंतच भारतामधून हा आजार हद्दपार झाला असेल, असा भारताला आत्मविश्वास आहे. भारताने देशातून 2025 पर्यंत टी.बी.निर्मुलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. आणि भारत आपले लक्ष्य निश्चितच पूर्ण करेल, असा माझा विश्वास आहे.
बंधू आणि भगिनींनो, जगासाठी आज ‘रायझिंग इंडिया’ हे केवळ दोन शब्द नाहीत. हेच दोन शब्द सव्वाशे कोटी भारतीयांच्या शक्तीचे प्रतीक आहे. या शक्तीला आज संपूर्ण दुनिया नमन करत आहे. याच कारणामुळे ज्या संस्थांच्या सदस्यता मिळावी म्हणून भारत गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होता, त्या संस्थांचे सदस्यत्व भारताला बहाल करण्यात येत आहे.
क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण क्षेत्रामध्ये सहभागी झाल्यानंतर भारत ‘वासेनार अरेंजमेंट’ आणि ‘ऑस्ट्रेलिया ग्रुप’मध्येही सहभागी झाला आहे. ‘इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी’ च्या निवडणुकीमध्ये, ‘इंटरनॅशनल मरेटाइम ऑर्गनायझेशन’च्या निवडणुकीमध्ये, ‘युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल’च्या निवडणुकीमध्ये भारताला विजय मिळाला आहे. ‘‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’मध्ये भारताला ज्या पद्धतीने विजय मिळाला आहे, त्याची तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा झाली आहे.
मित्रांनो, हा सगळा भारताचा वाढलेल्या प्रभावाचा परिणाम आहे. ज्यावेळी येमेनमध्ये संकटाची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी भारत आपल्या तिथल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढत होता. त्याचवेळी इतर देशही भारताने मदत करावी, असे आवाहन करीत होते. त्या संकटग्रस्त काळात भारताने 48 देशांच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले, हे जाणून आपल्याला भारताचा गर्व, अभिमान वाटेल.
आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये मानवीय मूल्यांना सर्वात जास्त महत्व देणारी आपली नीती लक्षात घेतल्यानंतर संपूर्ण दुनियेला आता जाणवले आहे की, भारत फक्त आपल्या, स्वहितासाठी नाही, तर संपूर्ण विश्वाच्या हिताचा विचार करून काम करीत आहे. ‘सबका साथ- सबका विकास’ हा आमचा मंत्र देशाच्या सीमेपुरताच मर्यादित नाही. तो संपूर्ण विश्वाला लागू होतो.
आज आम्ही फक्त आयुष्मान भारतासाठीच काम करतोय असे अजिबात नाही. तर आयुष्मान विश्वासाठीही कार्य करीत आहोत. योग आणि आयुर्वेद यांच्याविषयी संपूर्ण दुनियेमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. हे सुद्धा एकप्रकारे ‘रायझिंग इंडिया’चे प्रतिबिंबच आहे.
मित्रांनो, जर अर्थव्यवस्थेविषयी चर्चा करायची झाली तर गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारताने आपल्याबरोबरच संपूर्ण जगाच्या आर्थिक वृद्धीला चांगली बळकटी आणली आहे. जे देश जागतिक विकास दरामध्ये केवळ तीन टक्के हिस्सा आहेत, ते देश आज जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये सातपट जास्त सहभागीता नोंदवत आहेत.
जितके मॅक्रो-इकोनॉमिक’ मापदंड आहेत, चलनवाढ, चालू खात्यातील तूट, वित्तीय तूट, देशांतर्गत उत्पन्नाचा विकासदर , व्याजदर,परकीय गुंतवणुकीचा ओघ या सर्व क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी उत्तम आहे.
आज संपूर्ण विश्वामध्ये भारताविषयी जी चर्चा होते, त्यामध्ये आशा असतात आणि विश्वासाची भावनाही असते. याच कारणामुळे सर्व मानांकन, गुणांकन करीत असलेल्या संस्थांच्या गुणांकनामध्ये भारताने सुधारणा केल्याचे दिसून येत आहे.
– आज जगातील ‘टॉप थ्री प्रॉस्पेक्टिव्ह होस्ट इकोनॉमिज’ मध्येही भारताचे नाव घेतले जात आहे.
– ‘एफडीआय कॉन्फीडन्स इंडेक्स’मध्ये भारत टॉप टू इमर्जिंग मार्केट परफॉर्मन्स’ पैकी एक असल्याचे सांगण्यात येते.
– अंकटाडकी वल्र्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट मध्ये भारत दुनियेतील ‘फेव्हरिट एफडीआय डेस्टिनेशन’ पैकी एक असल्याचे सांगण्यात आले आहे.
– जागतिक बँकेच्या ‘ईज ऑफ डुइंग बिझिनेस’ मध्ये भारताच्या मानांकनामध्ये अवघ्या तीन वर्षांमध्ये 42 अंकांची सुधारणा झाली आहे.
– वर्ष 2017 -18 च्या तृतिय तिमाहीमध्ये भारताने 7.2 टक्के विकासदर गाठला आहे. अर्थव्यवस्थेविषयक तज्ञमंडळींच्या मते हा वेग आणखी वाढेल.
मित्रांनो, 2014च्या आधी देशाच्या कर प्रणालीची ओळख होती की, गंुतवणूकदारांसाठी अतिशय त्रासदायक आणि कोणत्याही प्रकारचे भाकित करता न येवू शकणारी. त्याचबरोबर या प्रणालीमध्ये पारदर्शकता अजिबात नव्हती. आता या सर्व परिस्थितीमध्ये परिवर्तन आले आहे. जी.एस.टी.ने भारताला दुनियेतल्या सर्वात मोठ्या इकॉनॉमिक मार्केट्स पैकी एक म्हणून प्रस्थापित केले आहे.
साथींनो, सरकार गरीब, निम्न मध्यम वर्ग यांच्या आशा आकांक्षा लक्षात घेवून अतिशय समग्र पद्धतीने, सुव्यवस्थितपणे काम करीत आहे.
– या अंदाजपत्रकामध्ये आम्ही ‘रिव्हायटलायझिंग इनफ्रास्ट्रक्चर अँड सिस्टिम इन एज्युकेशन’ म्हणजेच ‘राइज’ या नावाने एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आमचे सरकार आगामी चार वर्षात देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणार आहे. यासाठी 1लाख कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.
– सरकार देशामध्ये जागतिक दर्जाच्या 20 इन्स्टिट्युट आॅफ इमेन्स निर्माण करण्यासाठी काम करीत आहे. उच्च शिक्षणासंबंधी खाजगी आणि सार्वजनिक संस्थां मिळून काम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये सार्वजनिक क्षेत्रातून निवडण्यात आलेल्या 10संस्थांना 10 हजार कोटी रूपयांची आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.
-याच प्रमाणे देशातील नवयुवकांना स्वयं रोजगार आणि विशेष म्हणजे ‘एमएसएमई’ क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘स्टँड अप इंडिया’, स्टार्ट अप इंडिया’ ‘स्किल इंडिया मिशन’ यासारखे कार्यक्रम चालवण्यात येत आहेत.
– विशेष करून प्रधानमंत्री मुद्रा योजना नवयुवक आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्वपूर्ण माध्यम बनत आहे. ज्यावेळेपासून ही योजना सुरू झाली आहे, त्यावेळेपासून आत्तापर्यंत 11 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आमच्या सरकारने स्वीकृत केले आहे. लोकांना कोणत्याही हमीशिवाय 5 लाख कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे. यावर्षी अंदाजपत्रकामध्येही आम्ही 3 लाख कोटी रूपयांचे मुद्रा कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जर या सर्व प्रयत्नांचा एक पुष्पगुच्छ म्हणून आपण त्याकडे पाहिले, तर हे कार्य मध्यम वर्ग आणि नागरी युवक यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रोजगारांच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी मदतगार सिद्ध होत आहेत.
मला विश्वास आहे की, विकासाच्या मुख्यधारेपासून जर कोणी मागे राहिले असेल, मग ती एखादी व्यक्ती असेल अथवा एखादे क्षेत्र. मग जो कोणी वेगाने पुढे जाईल, त्याच्या शक्तीला, त्याच्याकडे असलेल्या साधनसामुग्रीला नक्कीच न्याय दिला जाईल. आणि त्यामुळेच ‘ रायझिंग इंडिया’ ची स्टोरीही अधिक सशक्त होईल.
आता शेवटी मी, आपल्या माध्यम समुहाला 2022 आणि संकल्प ते सिद्धी या यात्रेविषयी पुन्हा एकदा स्मरण करून देवू इच्छितो. आपल्या समुहाने काही संकल्प केला आहे का? काही ‘रोडमॅप’ बनवला आहे का? 2022 मध्ये नवभारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण नेमके काय करू शकतो, याविषयी काही विचार केला आहे का?
आपल्या समुहाने हे आव्हान स्वीकारले तर मला अतिशय आनंद होईल. आपल्या संकल्पाला तुम्ही आपल्या वाहिनीवरून मोठी प्रसिद्ध देवू शकता. त्याचा ‘फॉलो-अप’ही माध्यमाव्दारे तुम्ही घेवू शकता.
मित्रांनो, सव्वाशे कोटी देशवासी, ईश्वराचेच रूप आहेत. आणि या देशातल्या प्रत्येक संस्थेला, प्रत्येक शाखेला राष्ट्र कल्याणासाठी,राष्ट्रनिर्माणासाठी, विकासाची यात्रा अशी पुढे नेण्यासाठी संकल्पबद्ध होवून कार्य करण्याची आवश्यकता आहे.
आपण जो कोणताही संकल्प केला असेल, त्याला माझ्या अनेक अनेक शुभेच्छा !
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद!
Read Full Presentation Here