भारत माता की जय, भारत माता की जय… मी एक घोषणा देईन, तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा.- मी म्हणेन, महाराजा सुहेलदेव… तुम्ही सगळे हात उंचावून दोनदा म्हणा, अमर रहे, अमर रहे. महाराजा सुहेलदेव अमर रहे, महाराजा सुहेलदेव अमर रहे, महाराजा सुहेलदेव अमर रहे, महाराजा सुहेलदेव अमर रहे…
मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो.
देशाच्या सुरक्षिततेसाठी शूरवीरांना जन्म देणारी, देशाला वीर पुत्र देणारी, सैनिकांना जन्म देणारी, ऋषी-मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गाजीपुरच्या भूमीवर पुन्हा एकदा येण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत सुखद, आनंददायी अनुभव आहे.
तुम्हा सर्वांचा उत्साह आणि उमेद माझ्यासाठी मोठ्या ऊर्जेचा स्त्रोत आहे आज, इतक्या थंडीतही तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे, मला आशीर्वाद द्यायला आले आहात, यासाठी मी तुम्हा सर्वांना वंदन करतो.
मित्रांनो, उत्तर प्रदेशातल्या आजच्या माझ्या दौऱ्यादरम्यान आज पूर्वांचलला देशाचे मोठे वैद्यकीय केंद्र बनवण्याचे, कृषीक्षेत्राच्या संशोधनाचे महत्वाचे केंद्र बनवण्याचे आणि उत्तरप्रदेशातील लघुउद्योगांना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मोठी पावले उचलणार आहोत. थोड्यावेळापूर्वीच गाजीपूर येथे बांधल्या जाणाऱ्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभ झाला.
आज इथे पूर्वांचल आणि पूर्ण उत्तरप्रदेशाचा गौरव वाढवणारे आणखी एक पुण्याचे काम झाले आहे. खर तर, पूर्ण देशालाच अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. प्रत्येक भारतीयाला आपला देश, आपली संस्कृती, आपले शूरवीर योद्धे आणि त्यांचे शौर्य यांचे पुण्यस्मरण करुन देण्याचे पुण्यकार्य आज इथे झाले आहे. महाराजा सुहेलदेव यांच्या शौर्याची गाथा देशात पोहोचवून त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या टपाल तिकिटाचे आज इथे अनावरण केले गेले. पाच रुपये किंमतीचे हे टपाल तिकीट लाखोच्या संख्येने टपाल कार्यालयाच्या माध्यामातून देशाच्या घराघरात पोहोचणार आहे. महाराजा सुहेलदेव यांना, त्यांच्या महान कार्याला भारताच्या काना कोपऱ्यात पोचवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
मित्रांनो, महाराजा सुहेलदेव देशातल्या अशा वीर पुरुषांपैकी आहेत, ज्यांनी भारत मातेच्या सन्मानासाठी संघर्ष केला. महाराजा सुहेलदेव यांच्यासारख्या नायकांकडून, प्रत्येक वंचित, शोषित व्यक्ती प्रेरणा घेतो. त्यांचे केवळ स्मरणही “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला नवी शक्ती देतो. असे सांगतात, की जेव्हा महाराजा सुहेलदेव यांचे राज्य होते, तेव्हा लोकांना आपल्या दारांना कुलूप लावायचीही गरज वाटत नसे. आपल्या शासनकाळात त्यांनी जनतेचे आयुष्य सुखी करण्यासाठी, गरिबांना सक्षम करण्यासाठी अनेक कामे केलीत. त्यांनी रस्ते बनवले, बाग-बगीचे तयार केले, शाळा सुरु केल्या, मंदिरांची स्थापना केली आणि आपले राज्य एक उत्तम राज्य बनवले.जेव्हा परकीय शक्तींनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्यांचा सामना करणाऱ्या वीरांमध्ये एक सुहेलदेव होते, त्यांनी शत्रूचा नेटाने मुकाबला करुन त्याला पराजित केले. आजूबाजूच्या इतर राजांना एकत्र घेत अशी एक संघटीत शक्ती निर्माण केली की शत्रू त्यांच्यासमोर टिकूच शकले नाही. महाराजा सुहेलदेव एक वीर योद्धा, कुशल राजानीतिज्ञ, संगठन कुशल नेते होते. अनेकांसाठी ते आजही प्रेरणास्त्रोत आहेत. ते सर्वाना एकत्र घेऊन चालत असत, ते सर्वांचे होते.
बंधू आणि भगिनीनो, अशा कित्येक वीरांचे आधीच्या सरकारांना जणू विस्मरणच झाले होते,त्यामुळे त्यांचा कधीच यथोचित सन्मान होऊ शकला नाही. मात्र अशा वीरांना वंदन करणे ही आमची जबाबदारी आहे.
बंधू आणि भगिनींनो, उत्तरप्रदेशातल्या बहराइच जनपदच्या चित्तोरा येथील राजा सुहेलदेव यांचा पराक्रम आपण कधीही विसरू शकणार नाही. ही तीच भूमी आहे, जिथे महाराज सुहेलदेव यांनी आक्रांताना पराभूत केले होते, संपवले होते. मात्र दोन हाजार वर्षे त्यांच्या या पराक्रमाचे कोणालाही स्मरण झाले नाही. आता योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्या विजयभूमीवर महाराज सुहेलदेव यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकामुळे येणाऱ्या पिढ्यांना सुहेलदेव यांच्या पराक्रामाच्या गाथा कळतील. या स्मारकाच्या कल्पनेसाठी मी उत्तरप्रदेश सरकारचे अभिनंदन करतो. आणि सुहेलदेव यांच्या या स्मारकामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळावी अशी शुभेच्छा देतो.
ज्यांनी ज्यांनी भारताचे संरक्षण, देशाचे सामाजिक जीवन सुधारण्यासाठी आपले आयुष्य वेचले अशा सर्व महान विभूतींच्या स्मृती मिटू न देण्याचा संकल्प भाजपाप्रणीत रालोआ सरकारने केला आहे. आपला इतिहास, आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरांच्या सुवर्णमय इतिहासाची पाने आम्ही विस्मरणात जाऊ देणार नाही.
मित्रांनो, महाराजा सुहेलदेव जीतके मोठे वीर पुरुष होते, तितकेच दयाळू आणि संवेदनशील देखील होते. संवेदनशीलतेचा हाच संस्कार आम्ही सरकारच्या कार्यपद्धतीत रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत. गरीब, वंचित, शोषित, दलित अशा सर्व लोकांना त्यांचे अधिकार मिळावेत, ते सक्षम व्हावेत, सामर्थ्यवान व्हावेत यासाठी केंद्र आणि उत्तरप्रदेशातील सरकार पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे.सरकारी व्यवस्थांपर्यत त्यांचा आवाज पोहोचावा हे स्वप्न उराशी घेऊन आम्ही काम करतो आहोत.
बंधू आणि भगिनींनो, आज सर्वसामान्य जनतेसाठी सरकार सहज- सुलभ झाले आहे आणि अनेक प्रश्नांवर, समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. केवळ मतांसाठी घोषणा आणि कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात फीत कापण्याच्या परंपरा आम्ही पूर्णपणे बदलल्या आहेत. सरकारचा संस्कार आणि व्यवहार या दोन्हीमध्ये फार दिसू लागला आहे. हेच कारण आहे की आज गरीबातल्या गरीब माणसाचा आवाज ऐकला जात आहे.
मित्रांनो, समाजाच्या उतरंडीत शेवटच्या स्थानावर असलेल्या व्यक्तीला प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे हे अभियान आता प्राथमिक पातळीवर आहे.आता एक भक्कम पाया निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. याच पायावर एक मजबूत इमारत बांधण्याचे काम अद्याप बाकी आहे. पूर्वांचल येथे आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी सुरु केलेले उपक्रम याच दिशेने टाकलेले पाउल आहे. आरोग्याच्या अत्यंत कमी सुविधा असलेल्या पूर्वांचलात एक वैद्यकीय सुविधा केंद्र बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
बंधू-भगिनींनो,थोड्यावेळापूर्वी ज्या वैद्यकीय सुविधा केंद्राची पायाभरणी केली गेली, त्यामुळे या क्षेत्राला आधुनिक चिकित्सा सुविधा तर मिळणार आहेतच, त्याशिवाय गाजीपूरमधून नवे तज्ञ डॉक्टर तयार होतील. इथल्या तरुणांना डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न त्यांच्याच गावात राहून पूर्ण करता येईल. सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून जेव्हा हे वैद्यकीय महाविद्यालय बांधून तयार होईल, तेव्हा गाजीपूरचे जिल्हा रुग्णालय 300 खाटांचे होईल. या रूग्णालयाचा गाजीपूरसोबतच इतर आसपासच्या जिल्ह्यातल्या लोकांनाही लाभ मिळेल. अनेक वर्षांपासून ही तुम्हा सर्वांची मागणी होती आणि तुम्हा सर्वांच्या वतीने, तुमचे लाडके नेते मनोज सिन्हा जी सुद्धा सतत ही मागणी करत होते. लवकरच हे रुग्णालय तुमच्या सेवेसाठी तयार होईल. त्याशिवाय, गाजीपूर येथे 100 खाटांच्या प्रसूती रुग्णालयाची सुविधा देखील मिळणार आहे. जिल्हा रुगणालयात अम्ब्युलांस ची सुविधा देखील उपलब्ध होईल. भविष्यात या सुविधांचा आणखी विस्तार केला जाईल.
बंधू आणि भगिनींनो,
गाजीपूरचे नवे वैदयकीय महाविद्यालय असो, गोरखपूर येथील एम्स असो, वाराणसी मध्ये बांधली जात असणारी अनेक रुग्णालये असोत, नव्या रुग्णालयांचा विस्तार अशी किंवा मग पूर्वांचलमध्ये हजारो कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या आरोग्य सुविधा असोत.या सगळ्या योजनांमधून गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेच्या आरोग्य सुविधांना प्राधान्य दिले जात आहे.
‘आयुष्यमान भारत योजना, ‘पीएमजेएवाय’, ज्याला लोक मोदीकेअर योजनाही म्हणतात. या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, असे प्रयत्न केले जात आहेत. या योजनेमुळे, कर्करोगासारख्या शेकडो गंभीर आजारांवर पाच लाख रुपयांपर्यतचे उपचार मोफत करणे शक्य झाले आहे. केवळ 100 दिवसांतच देशभरातल्या सुमारे साडे सहा लाख गरीब बंधू- भगिनींवर या योजनेअंतर्गत उपचार करणे शक्य झाले आहे. यात आपल्या उत्तरप्रदेशातील 14 हजारपेक्षा जास्त बंधू- भगिनींवर उपचार झाले किंवा सुरु आहेत. आणि हे सगळे लोक दोन-पाच वर्षांपासून आपल्या गंभीर आजारांवर पैशाअभावी उपचार न करु शकल्यामुळे अक्षरशः मरणाच्या दारात पोहोचले होते. त्यांना भीती असायची की जर मी स्वतःच्या उपचारांवर पैसे खर्च केले, तर माझ्या घरावर कर्जाचा बोजा पडेल, त्यामुळे त्रास सहन करुनही ते उपचार करत नव्हते. मात्र आयुष्यमान भारत योजनेमुळे अशा सर्व दुर्बळ लोकांना ताकद दिली आहे, हिम्मत दिली आहे. आता ते रुग्णालयात जातात, त्यांच्यावर उपचार होतात आणि हसत खेळत ते आपल्या घरी परत जातात. इतकेच नाही, तर सरकार प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा योजनेशी जोडण्याचाही प्रयत्न करत आहे. कठीण प्रसंगात 2 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळावी, यासाठी दररोज फक्त 90पैसे आणि 1 रुपया प्रती महिना इतक्या किमान हप्त्याच्या विमा योजना आम्ही सुरु केल्या आहेत. देशभरातल्या 20 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत या दोन योजना घेतल्या आहेत. त्यापैकी सुमारे पावणेदोन कोटी लोक उत्तरप्रदेशातील आहेत. या योजनेअंतर्गत, 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गरिब, गरजू जनतेपर्यंत ही रक्कम पोहोचली आहे.त्यापैकी 400 कोटी रुपयांचा विमा निधी उत्तरप्रदेशातील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे.
मित्रांनो, 400 कोटी रुपये केवळ 90 पैसे विम्याच्या रकमेतून गरीब कुटुंबाना मिळाले, त्यांना यातून किती ताकद मिळाली असेल, याची आपण कल्पना करु शकता.
मित्रांनो, जेव्हा सरकार पारदर्शकतेने काम करतात, जेव्हा स्वहिताला नाही, तर जनहिताला महत्व दिले जाते, संवेदनशीलता जेव्हा स्वभाव बनतो, तेव्हा अशी कामे सहजपणे होतात. जेव्हा अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेत बदल होतात, तेव्हा अशी मोठी कामे शक्य होतात. तेव्हाच दूरदृष्टी ठेवून कायमस्वरूपी बदलासाठी प्रामाणिकपणे काम करणे शक्य होते.
मित्रांनो,
साथियों, वाराणसीमधील तांदूळ संशोधन संस्था असो, वाराणसी आणि गाजीपूर येथील कार्गो केंद्र असो, गोरखपूर येथे होत असलेला खतांचा कारखाना असो, बाणसागर सारखी सिंचन योजना असो अशा अनेक व्यवस्था देशभरात तयार होत आहेत. मला सांगण्यात आलं आहे की, गाजीपूर येथे जो नाशवंत पदार्थांसाठीचे मालवाहू केंद्र बनले आहे, तिथून इथली हिरवी मिरची आणि वाटाणा दुबईच्या बाजारात पाठवला जातो आहे, अशी महिती आमच्या मनोजजी यांनी दिली.शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळतो आहे.
आज जे काम होते आहे, ते पूर्ण प्रामाणिकपणे होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा या दिशेने पूर्ण ताकदीने काम होत आहे.
बंधू आणि भगिनींनो, केवळ मते मिळवण्यासठी दिलेल्या प्रलोभनांचा परिणाम काय होतो, ते आता राजस्थान आणि मध्यप्रदेशात दिसतेच आहे. सरकार बदलताच तिथे आता खतासाठी, युरीयासाठी शेतकऱ्याना रांगा लावाव्या लागत आहेत, लाठ्या काठ्या झेलाव्या लागत आहेत. काळा बाजार करणारे लोक मैदानात उतरले आहेत. कर्नाटकमध्येही लाखो शेतकऱ्याना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र बंधू- भगींनीनो, सत्य जाणून घ्या. कर्नाटकातही अलीकडेच कॉंग्रेसने मागच्या दरवाजाने सरकार बनवले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले गेले होते. लॉलीपोप दिले गेले होत, त्यांच्या हातात! लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार होते, आणि किती लोकांचे झाले? सांगू? ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल. या कर्जमाफीचे आमिष दाखवून मते घेतली, पण कर्जमाफी किती लोकांना दिली? केवळ ८०० शेतकऱ्यांना!
मला सांगा, ही कसली खोटी आश्वासने? कसले खेळ? शेतकऱ्यांना धोका दिला गेला. हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो. ज्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांच्यामागे पोलीस सोडले आहेत. जा बँकेत पैसे जमा करण्यासाठी तगादा लावला जातो आहे.
मित्रांनो, केवळ तात्पुरत्या राजकीय लाभांसाठी, जी आश्वासने दिली जातात, जे निर्णय घेतले जातात, त्यातून देशाच्या समस्यांचे कायमस्वरूपी समाधान नाही मिळत.
2009 च्या निवडणुकांच्या आधी काय झाले,त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. 2009 च्या निवडणुकांच्या आधी देखील अशीच आश्वासने दिली गेली होती. देशभरातल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले गेले होते. इथे जे शेतकरी आहेत, त्यांना मी विचारु इच्छितो, की 2009 साली त्यांचे कर्ज माफ झाले का? तुमच्या खात्यात पैसे आले का? तुम्हाला काही मदत मिळाली का? आश्वासने दिली गेली होती ना? सरकारही बनले, मात्र त्यानंतर तुमचा सगळ्यांना विसर पडला. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणार का? ह्या लॉलीपॉप कंपनीवर विश्वास ठेवणार का? यांच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार का? जनतेला धोका देणाऱ्यांवर विश्वास ठेवणार का?
बंधू आणि भागींनीनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तेव्हा देशभरातल्या शेतकऱ्यावर सहा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली, तेव्हा काय झाले तुम्हाला कल्पना आहे का? सहा लाख रुपयांचे कर्ज होते आणि निवडून आल्यावर, सरकार बनल्यावर काय झाले, त्याचे आकडेच पुरेसे बोलके आहेत. मी सांगतो तुम्हाला, किती लोकांचे कर्ज माफ केले ते. लक्षात ठेवा, आणि जेव्हा पुन्हा हे लोक तुमच्याकडे अशी खोटी आश्वासने घेउन आले, तर त्यांनाच त्याची आठवण करुन द्या. द्याल ना? तर, त्या सरकारने 6 लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ 60 हजार कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले.आश्वासन दिले सहा लाख कोटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे, मात्र प्रत्यक्षात दिले केवळ 60 हजार शेतकऱ्यांना. एवढेच नाही, तर कॅगचा अहवाल आला तेव्हा, त्यात लकशात आले की, कि 35 लाख रुपयांची रक्कम अशा लोकांकडे गेली, जे ना शेतकरी होते, ना कर्जदार ! हे रुपये, 35 लाख एवढी मोठी रक्कम, हे तुमचेच हक्काचे पैसे होते ना? ज्यांचे कर्ज माफ झाले, त्यांच्यापैकी कित्येकांना त्याचे प्रमाणपत्र दिले गेले नाही, त्यामुळे त्यांच्या कर्जावर व्याज वाढत गेले आणि नंतर त्या शेतकर्यांना वाढीव कर्जाचे हप्ते फेडावे लागले, असे पाप या लोकांचे आहे.
बंधू- भगिनींनो, हे सगळे शेतकरी दुसऱ्यांदा कर्ज घेण्यास पात्र राहिले नाहीत. या निराशेतून काहींनी दारू जवळ केली तर काहींना पुन्हा कर्ज घेण्यासाठी खाजगी सावकारांच्या दाराशी जावे लागले. त्यांच्याकडून महाग व्याजदरावर कर्ज घ्यावे लागले.
मित्रांनो, अशा कर्जमाफीचा लाभ कोणाला झाला? निदान शेतकऱ्यांना तर नाही झाला. आणि म्हणूनच माझा आग्रह आहे, की अशा खोट्या घोषणा, खोटी आश्वासने यांच्यापासून सतर्क रहा. लक्षात ठेवा की, या कॉंग्रेस सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सुद्धा लागू केल्या नाहीत. कॉंग्रेसच्या काळातच शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती. सरकारने कित्येक वर्षे ही फाईल बासनात गुंडाळून ठेवली. त्यावर काही केले नाही, शिफारस लागू केली नाही. जर कॉंग्रेस ने आपल्या काळात 11 वर्षापूर्वी ही शिफारस लागू केली असती, खर्चाच्या दीड पट हमीभाव शेतकऱ्यांना दिला असता, तर आज माझा शेतकरी कर्जदार झाला नसता, त्याला कर्ज घ्यायची गरजच पडली नसती.मात्र, तुम्ही या शिफारसी दाबून ठेवल्या, कधीच अंमलात आणल्या नाहीत. शेतकऱ्यांना मालाची किंमत दिली नाही. हमीभाव दिला नाही, त्यातून शेतकरी आणखी जास्त कर्जबाजारी होत गेला. हीच फाईल भाजपा सरकारने बाहेर काढली आणि 12 वर्षांनी 22 पिकांवरचा हमीभाव दीड पट निश्चित केला.
बंधू आणि भागींनीनो, अशी अनेक कामे आहेत, जी गेल्या चार वर्षात केली जात आहेत. जो छोटा शेतकरी आहे, त्यालाही आमचे सरकार बँकिंग व्यवस्थेशी जोडत आहे. बाजारासाठी नव्या पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतऱ्यांना नव्या बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. नवी शीतगृहे, मेगा फूड पार्क याची साखळी तयार केली जात आहे.
मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकापासून ते उद्योगांपर्यत आवश्यक आधुनिक पायाभूत सुविधा देखील आमचे सरकार तयार करत आहे. पूर्वांचलमध्ये दळणवळणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या साडे चार वर्षात अनेक कामे झाली आहेत. आणि अनेक कामे येत्या काही काळात पूर्ण होणार आहेत. पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे काम वेगाने सुरु आहे.
गेल्या वेळी जेव्हा मी गाजीपूरला आलो होतो, तेव्हा ताड़ीघाट गाजीपुर रेल्वे रस्ते पुलाचे भूमिपूजन केले होते. मला सांगण्यात आले आहे की लवकरच हा पूल तयार होणार असून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होईल यामुळे पूर्वांचलच्या लोकांना दिल्ली आणि हावडाला जाण्याचा एक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
मित्रांनो, गेल्या साडेचार वर्षात पूर्वी उत्तरप्रदेशात रेल्वेची महत्वपूर्ण कामे झाली आहेत. स्थानके आधुनिक होत आहेत. रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण सुरु आहे. कित्येक नव्या रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. गावातले रस्ते असो, राष्ट्रीय महामार्ग असो किंवा मग पूर्वांचल एक्स्प्रेस वे… हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील, तेव्हा या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाईल. इतक्यातच वाराणसी हून कोलकात्यापर्यत जलमार्ग वाहतूक सुरु झाली आहे, त्याचा लाभही गाजीपूरला निश्चितच मिळेल. इथे जेट्टी बनणार असून त्याचे भूमिपूजन देखील झाले आहे. या सर्व सुविधा तयार झाल्यानंतर, हे पूर्ण क्षेत्र व्यापार आणि व्यवसायाचे केंद्र बनेल. इथे उद्योगधंदे सुरु होतील, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
मित्रांनो, स्वराज्याच्या या संकल्पाच्या दिशेने आम्ही निरंतर वाटचाल सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना असो, स्वच्छ भारत योजना असो, उज्ज्वला योजना असो, आयुष्यमान भारत असो, मुद्रा योजना असो, सौभाग्य योजना असो, ह्या सगळ्या केवळ योजना नाहीत, तर सशक्तीकरणाचे माध्यम आहे. मुलांना शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना औषधे, शेतकऱ्यांना सिंचन आणि सगळ्यांच्या मागण्या, तक्रारींची दखल या विकासाच्या पंचधारा आहेत, देशाच्या विकासासाठी ह्या अपच गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
बंधू आणि भागींनीनो, येणारा काळ तुमचा आहे, तुमच्या मुलांचा आहे, युवा पिढीचा आहे. त्यांचे भविष्य सुखकर करण्यासाठी, भविष्य बनवण्यासाठी, तुमचा हा चौकीदार खूप प्रामाणिकपणे दिवसरात्र मेहनत करतो आहे. तुम्ही तुमचा हा विश्वास आणि आशीर्वाद असाच कायम असू द्या, कारण चौकीदारामुळे काही चोरांची रात्रीची झोप उडाली आहे. माझ्यावर तुमचा विश्वास आणि आशीर्वाद असाच कायम राहिला तर, एक दिवस असा येईल, जेव्हा चोर योग्य जागी पोहचतील.
पुन्हा एकदा तुम्हाला नव्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी खूप खूप शुभेच्छा ! पुन्हा एकदा, महराजा सुहेलदेव यांच्या महान पराक्रमाला वंदन करत, मी माझे भाषण संपवतो. दोन दिवसांनी 2019 हे वर्ष सुरु होणार आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांना खुप खूप शुभेच्छा !!
भारत माता की जय…… भारत माता की जय