मंचावर उपस्थित मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह, केंद्रातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर, पुरुषोत्तम रुपाला, राज्य सरकारचे मंत्री गोपालजी, ओमप्रकाशजी, संजयजी, संसदेतील माझे सहकारी फग्गन सिंह कुलस्ते, श्रीमती संपत्यिा वी.के.जी, आणि आता भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष बनले आहेत आणि आपल्या जबलपूरचे खासदार आहेत राकेश सिंह जी,मंडला जिल्हा पंचायत अध्यक्ष सरस्वती मरावी आणि आज अतिशय अभिमानाने आणखी एक ओळख करून द्यायची आहे – आपल्यात बसलेले त्रिपुराचे उपमुख्यमंत्री . काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील निवडणुकीने एक ऐतिहासिक काम केले. तिथल्या जनतेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचे सरकार बनवले.
त्रिपुरात बहुतांश आदिवासी समाज राहतो. तुमच्याकडे जसा गौंड परंपरेचा इतिहास आहे, तसाच त्रिपुरामध्ये आदि जातीच्या लोकांचा, आदिवासी समाजाचा आहे, तिथल्या राज्यकारभाराचा एक खूप मोठा इतिहास आहे. मला आनंद आहे की आज त्या त्रिपुराचे नवनिर्वाचित उप-मुख्यमंत्री जिष्णुदेव वर्मा आपल्यात उपस्थित आहेत आणि ते त्रिपुराच्या त्या आदिवासी समाजातील आहेत आणि त्या राजघराण्यातील आहेत ज्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते, आज त्यांचे इथे मध्य प्रदेशाच्या भूमीवर स्वागत करतांना मला अभिमान वाटत आहे.
बंधू भगिनींनो, आपण सर्व आज नर्मदा मातेच्या कुशीत जमलो आहोत. मी सर्वप्रथम, सुमारे 1300 किलोमीटर लांब पात्र असलेली नर्मदा माता, इथून सुरु होऊन गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत जाणारी नर्मदा माता, आपल्या कोट्यवधी लोकांचे आयुष्य सांभाळणारी-जोपासणारी नर्मदा माता, आपले पशुपालन असेल, कृषी असेल, ग्रामीण जीवन असेल, गेली अनेक शतके नर्मदा मातेने आपल्याला नवीन जीवन देण्याचे काम केले आहे. मी त्या नर्मदा मातेला प्रणाम करतो.
आज माझे सौभाग्य आहे , मला या भागात येण्याचे यापूर्वी देखील सौभाग्य लाभले आहे. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमाच्या गाथा, त्याग आणि बलिदानाच्या गाथा आपण सर्वाना प्रेरणा देत आल्या आहेत. आणि हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे, राणी दुर्गावती असो, राणी अवंतीबाई असो, समाजासाठी संघर्ष करत राहणे, परकीय राजवटीपुढे कधी वाकायचे नाही, जगायचे तर दिमाखात आणि मरायचे तर संकल्प करून मरायचे या परंपरेसह आज आपण या भूमीवर आपल्या आदि जातीचा एक गौरवपूर्ण कार्यक्रम सुरु करत आहोत.
मात्र त्याचबरोबर आज पंचायत दिन देखील आहे. पूज्य बापूंचे स्वप्न साकार करण्याची एक महत्वपूर्ण संधी आहे कारण महात्मा गांधींनी ‘भारताची ओळख ही भारताच्या गावांवरून होते’ हा संकल्प वारंवार बोलून दाखवला होता. महात्मा गांधींनी ग्राम स्वराजची कल्पना सुचवली होती. महात्मा गांधींनी ग्रामोदय ते राष्ट्रोदय हा मार्ग सुकर करण्यासाठी आपल्याला प्रेरित केले होते. आज पंचायत राज दिनी, देशातील सुमारे दोन लाख चाळीस हजार पंचायतींना, या पंचायतींमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांना, या पंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून बसलेल्या 30 लाखांहून अधिक लोकप्रतिनिधींना आणि त्यातही एक तृतीयांश हून अधिक आपल्या माता-भगिनी, ज्या आज ग्रामीण जीवनाचे नेतृत्व करत आहेत, अशा सर्वाना आज पंचायती राज दिनी वंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो.
आज मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो , तुमच्या स्वतःच्या गावात विकासासाठी , तुमच्या स्वतःच्या गावातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी, तुमच्या स्वतःच्या गावाला समस्यांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी तुम्ही जो काही संकल्प कराल ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील, भारत सरकारदेखील खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर चालेल. तुमच्या स्वप्नांबरोबर आमचीही स्वप्ने जोडली जातील आणि आपल्या सर्वांची स्वप्ने मिळून सव्वाशे कोटी देशबांधवांची स्वप्ने आपण साकार करून दाखवू. या एका भावनेसह आज पंचायत राज दिनी गावासाठी काही करण्याचा संकल्प करूया.
जुन्या काळी कधी कधी आम्ही जेव्हा इथे मंडलामध्ये येतो तेव्हा त्या किल्ल्याची ओळख होते, त्या राजघराण्याच्या व्यवस्थेची ओळख होते आणि आपण सर्व छाती फुगवून सांगतो की अनेक शतकांपूर्वी गौंड राजांनी किती मोठे काम केले होते, किती मोठी व्यवस्था केली होती. त्या काळी राजव्यवस्था होत्या, राज परंपरा होत्या आणि राज परंपरांशी निगडित लोक आपल्या परिसरातील नागरिकांच्या कल्याणासाठी काही असे काम करण्याचा प्रयत्न करायचे ज्याची आज अनेक शतकांनंतरही आपण इतिहासाच्या माध्यमातून आठवण काढतो, अभिमान बाळगतो आणि आपल्या भावी पिढयांना सांगतो. त्या काळी जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेअंतर्गत हे व्हायचे.
आता लोकशाही आहे, एका ठराविक काळासाठी गावातील लोकांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, गावातील लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. असा कोण पंचायतचा प्रधान असेल, असा कोणता पंचायतीचा निवडून आलेला प्रतिनिधी असेल ज्याच्या मनात ही इच्छा नसेल की जी पाच वर्षे मला मिळाली आहेत, मी पाच वर्षात माझ्या गावासाठी ही 5 चांगली कामे, 10 चांगली कामे, 15 चांगली कामे माझ्या कार्यकाळात करून दाखवेन. हा संकल्प आणि तेव्हा कुठे 20 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षांनंतर, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, घरातील नातवंडांना घेऊन कधी बाहेर फिरायला निघाल तेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांना सांगाल की 25 वर्षांपूर्वी मी पंचायतीचा प्रधान होतो, 25 वर्षांपूर्वी मी पंचायतीत निवडून आलो होतो आणि बघा, माझ्या कार्यकाळात मी या तलावाचे काम केले होते, माझ्या काळात मी या शाळेत हे झाड लावले होते, माझ्या काळी मी ही विहीर खोदली होती, गावाला पाणी मिळाले होते. तुमचीही इच्छा असेल आपणही असे काम करून दाखवायचे की तुमच्या नातवंडांनी तुम्हाला म्हणायला हवे की जनतेने तुम्हाला निवडून आणले आणि तुम्ही 25 वर्षे, 30 वर्षांपूर्वी हे काम केले होते आणि आज आम्हाला याबद्दल आनंद होत आहे. अशी कोणती पंचायत मधील व्यक्ती असेल जिच्या मनात ही इच्छा नसेल.
मला तुमच्या मनात ही इच्छा प्रबळ करायची आहे. तुम्हाला मजबूत संकल्पांचा धनी बनवायचे आहे. आपल्या गावासाठी काही करून दाखवण्याचा निर्धार आणि त्यासाठी जी पाच वर्षे मिळतात, त्या पाच वर्षात प्रत्येक क्षण जनता जनार्दनासाठी वेचण्याचा जर आपण पण करून चाललो तर जगातील कुठलीही ताकद नाही, जगातील कोणतेही आव्हान नाही, कोणतीही समस्या नाही जिच्यावर मात करून आपण आपल्या गावातील जीवन बदलू शकणार नाही.
कधी कधी गावाच्या विकासाचा विषय निघतो तेव्हा बरेचसे लोक खर्चाबद्दल बोलत असतात. एक काळ होता जेव्हा निधीच्या कमतरतेमुळे अडचणी आल्या असतील, मात्र आज निधीची चिंता कमी आहे, आज चिंता आहे निधीचा, पैशाचा योग्य वापर कसा होईल? योग्य वेळी कसा होईल? योग्य लोकांसाठी कसा होईल? आणि जे होईल त्यात प्रामाणिकपणा असेल, पारदर्शकता असेल आणि गावातील प्रत्येकाला माहित असायला हवे की हे काम झाले आहे, एवढ्या पैशात झाले आहे आणि गावाला मी हा हिशेब देत आहे. ही सवय, कधीही पैशांची समस्या नसते तर समस्या कधी प्राधान्य कशाला द्यायचे याची असते.
तुम्ही मला सांगा, गावात शाळा आहे, शाळेची चांगली इमारत आहे, गावात गुरुजींची नेमणूक करण्यात आली आहे, गुरुजींना नियमितपणे वेतन मिळत आहे, शाळेच्या वेळी शाळा उघडण्यात येते, मात्र तरीही जर माझ्या गावातील पाच-पंचवीस मुले शाळेत जात नसतील, शेतात जाऊन लपत असतील, झाडावर चढून बसतात आणि माझ्या गावातील 5-25 मुले निरक्षर राहतात, मला सांगा ही 5-25 मुले निरक्षर राहिली , निधीची समस्या होती का? नाही, गुरुजींची समस्या होती का? नाही. आपण गावकर्यांनी गावातील लोकांना ही गोष्ट समजावून सांगायला हवी की शाळा आहे, गुरुजी आहेत, सरकार शुल्क भरते, सरकार गणवेश देते, सरकार माध्यान्ह भोजन देते. चला, आपल्या गावातील एकही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही. आपल्या गावातील एकही मुलगा निरक्षर राहणार नाही, आपण हे निर्णय घेऊ शकत नाही का?
आपले आईवडील निरक्षर राहिले असतील, त्यांना ते सौभाग्य नसेल लाभले. त्यावेळच्या सरकारांमुळे ते शिकू शकले नसतील, मात्र जर आपण पंचायतीत निवडून आलो आहोत, राज्यातही सरकार, केंद्रातही सरकार, मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही आहोत, मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही आहोत, तर ही आपली जबाबदारी नाही का की लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षात असे काम करू के शाळेत जाण्याच्या वयाचा एकही मुलगा निरक्षर राहणार नाही. तुम्ही बघाल, जेव्हा तो मुलगा मोठा होईल, चांगले शिक्षण घेऊन पुढे जाईल, तो मुलगा मोठा झाल्यावर म्हणेल की मी तर गरीब आईचा मुलगा होतो, कधी आईबरोबर शेतात काम करायला जायचो, मात्र माझ्या गावातले प्रधानजी होते, ते मला शेतातून पकडून घेऊन गेले होते आणि मला म्हणाले- बेटा , हे तुझे शेतात काम करायचे वय नाही, चल शाळेत चल, अभ्यास कर, त्यामुळेच आज मी डॉकटर बनू शकलो, आज मी इंजिनिअर बनू शकलो, आज मी आयएएस अधिकारी बनू शकलो, माझ्या कुटुंबाचे आयुष्यच बदलले. एका प्रधानजींमुळे एक आयुष्य बदलते,तर संपूर्ण भारत बदलण्यासाठी योग्य दिशेने चालू लागतो.
आणि म्हणूनच माझे प्रिय प्रतिनिधी, हा पंचायत राज दिन, हा आपल्या संकल्पांचा दिन व्हायला हवा. तुम्ही मला सांगा, आजच्या काळात, आरोग्य क्षेत्रात इतके चांगले संशोधन झाले आहे. जर पोलिओची लस योग्य वेळी मुलांना दिली तर आपल्या गावात मुलांना पोलिओ होण्याची शक्यता नाही, वाचेल तो. तुम्ही मला सांगा, आजही तुमच्या गावात कुणी 40 वर्षांची, कुणी 50 वर्षांची व्यक्ती पोलिओमुळे त्रासाचे आयुष्य जगत असेल, दिव्यांग अवस्थेत तुम्ही पाहत असाल, तुम्हाला मनात वेदना होत असतील कि नाही? तुम्हाला वाटत असेल की नसेल वाटत, अरे देवाने याच्याबरोबर असे का केले, बिचारा चालूही शकत नाही. तुमच्या मनात नक्की ही भावना येत असेल.
माझ्या बंधू, भगिनींनो, 40-50 वर्षे वय असलेल्या व्यक्तीला कदाचित ते सौभाग्य लाभले नाही. मात्र आज, आज पोलिओची लस, तुमच्या गावातील एकही मुलाला अपंग होऊ देत नाही, दिव्यांग बनू देत नाही, त्याला पोलिओचा आजार होऊ शकणार नाही. पोलिओ लसीचा निधी लागेल का? डॉक्टर येतात, सरकार येते, पैसे खर्च केले जातात, पोलिओ लसीची तारीख टीव्हीवर, वृत्तपत्रात सातत्याने जाहीर केली जाते. पंचायतीतून निवडून आलेला मी, माझ्या गावात पोलिओ लसीच्या बाबतीत कधीही लापरवाही बाळगणार नाही, मी असा निर्णय घेऊ शकेन का की नाही घेऊ शकणार? मी हे काम करू शकतो कि नाही करू शकत?
मात्र कधी कधी लोकप्रतिनिधींना वाटते की हे काम तर सरकारी नोकरांचे आहे , आमचे काम नाही. असे नाही, माझ्या प्रिय बंधू, भगिनींनो,आपण जनतेचे सेवक आहोत, आपण सरकारचे सेवक नाही. आपण लोकप्रतिनिधी जनतेच्या भल्यासाठी येतो आणि म्हणूनच आपली शक्ती, आपला वेळ जर त्या कामासाठीच खर्च केला तर आपण आपल्या गावाचे जीवन बदलू शकतो.
तुम्ही मला सांगा- मी छोट्या छोट्या गोष्टी अशासाठी सांगतो कारण कधी कधी मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी तर अनेक योग्य जागा असतात आणि मोठमोठे लोक मोठमोठ्या गोष्टी सांगतही असतात. मात्र आपल्या गावात आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीद्वारेही परिवर्तन आणायचे आहे.
आपल्याला माहित आहे आपल्या गावातील शेतकरी- त्याला हे माहित आहे का के जर ज्या शेतीमुळे त्याचे पोट भरते, ज्या शेतीमुळे तो समाजाचे पोट भरतो जर त्या मातीचे आरोग्य चांगले नसेल, तर कधी ना कधी ती धरती माता नाराज होईल कि नाही होणार?धरती माता आज जेवढे पीक देते, ते देणे बंद करेल कि नाही करणार? आपणही उपाशी मरु आणि तोही उपाशी मरेल. आपल्या भावी पिढीला देखील गरीबीत गुजराण करावी लागेल. कधी विचार केला आहे का, आपण कधी गावातील लोकांना बोलवावे, बसून ठरवावे की आपण लवकरात लवकर पीक, जास्तीत जास्त पीक दिसायला हवे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया टाकतो. शेजारच्याने एक पिशवी युरिया टाकले म्हणून मी पण एक पिशवी टाकतो. शेजारच्याने दोन पिशव्या टाकल्या म्हणून मी पण दोन थैल्या टाकतो. शेजारच्याने लाल डब्यातले औषध टाकले म्हणून मी देखील लाल डब्यातील औषध टाकतो आणि त्यामुळे मी माझ्या जमिनीचे नुकसान करतो.
गावातील लोकांनी मिळून ठरवावे की जर याआधी गावात 50 पिशव्या युरिया येत होते, आता आपण 40 पिशव्यांमध्ये काम भागवू, 40 बॅगमध्ये काम चालवू. हे सांगा, गावातील 10 पिशव्यांचा पैसा वाचेल की नाही वाचणार? गावात युरियामुळे आपल्या मातीचे आरोग्य खराब होत आहे, आपल्या जमिनीचे नुकसान होत आहे, आपल्या धरती मातेचे नुकसान होत आहे,तिला वाचवणे ही आपली जबाबदारी आहे की नाही ? पैसे देखील वाचतील, हळू-हळू पीक देखील चांगले वाटायला लागेल. आपली माता, धरती माता आपल्यावर खुश होईल, ती आपल्याला आशीर्वाद देईल की औषधे पाजून मला मारत होता. आता माझा मुलगा सुधारला आहे, आता मी देखील एका धरती मातेप्रमाणे त्याचे पोट भरण्यासाठी जास्त पीक देईन. तुम्ही मला सांगा, करू शकतो की नाही करू शकत?
मी तुम्हाला, माझ्या आदिवासी बांधवांना विचारू इच्छितो, आपण हे काम करू शकतो कि नाही करू शकत? करू शकतो कि नाही करू शकत?
तुम्ही मला सांगा, आता सरकारने एक खूप छान नियम बनवला आहे. मी आज मंडलातील जंगलात उभा आहे. इथे बांबूची शेती होते. एक काळ होता बांबूला आपल्या देशात वृक्ष मानण्यात आले होते. आता मलाही समजत नाहीये, मी फाईली वाचत आहे की इतकी वर्षे बांबूला वृक्ष का मानण्यात आले? आणि त्यामुळे झाले काय, माझा आदिवासी बांधव जो जंगलात राहतो, तो बांबू कापू शकत नव्हता, बांबू विकू शकत नव्हता आणि कधी घेऊन गेला आणि एखाद्या वन अधिकाऱ्याने पाहिले तर त्या बिचाऱ्याला दिवसाही रात्रीचे तारे दिसतात. हे संकट येते की नाही येत? त्रास होतो कि नाही होत?
सरकारने एक मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारने महत्वाचा निर्णय घेतला कि आता बांबूला वृक्षाच्या श्रेणीत नाही तर गवताच्या श्रेणीत ठेवले जाईल जेणेकरून शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर बांबूची शेती करू शकेल, बांबू विकू शकेल, बांबूपासून निरनिराळ्या वस्तू बनवून बाजारात विकू शकेल, गावात एक नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो.
तुम्ही हैराण व्हाल, एवढे जंगल, एवढ्या जमातींचा माझा समुदाय , एवढे बांबू, मात्र माझ्या देशात 12-15 हजार कोटी रुपयांचे बांबू आपण परदेशातून आणतो. अगरबत्ती बनवायची आहे बांबू परदेशातून आणा, दियासलाई बनवायची आहे बांबू परदेशातून आणा, पतंग बनवायचा आहे, बांबू परदेशातून आणा. घर बांधायचे आहे, बांबू कापण्याची परवानगी नाही. हजारो कोटी रुपये परदेशात जातात.
आता मी माझ्या आदिवासी बांघवांना, गावातील शेतकऱ्यांना विनंती करतो की चांगल्या दर्जाचा बांबू आपल्या शेताच्या बांधावर लावा, इतर जी शेती करता ती सुरूच ठेवा, शेताच्या किनाऱ्यावर जर पण बांबू लावले, दोन वर्षात, तीन वर्षात तो कमाई करायला सुरुवात करेल. माझ्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल कि नाही वाढणार? जी जमीन बेकार पडली होती किनाऱ्यावर, तिथे अतिरिक्त कमाई होईल कि नाही?
मी तुम्हाला विनंती करतो , माझ्या पंचायतच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण कृषीच्या बाबतीत गावातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करू शकतो कि नाही करू शकत? आपले हिमाचलचे राज्यपाल साहेब आहेत, देवव्रतजी. ते राज्यपाल आहेत, मात्र पूर्ण वेळ शून्य खर्चाची शेती लोकांना शिकवत असतात. एक गाय असेल आणि दोन एकर जमीन असेल तर शून्य खर्चाची शेती कशी करायची हे ते शिकवत असतात आणि अनेक लोकांनी तशा प्रकारे मार्ग बनवला आहे. माझ्या पंचायतचे प्रतिनिधि या गोष्टी शिकून आपल्या गावातील शेतकऱ्यांना तयार करू शकतात कि नाही करू शकत?
आता आम्ही मधाचे अभियान चालवत आहोत. मधमाशी पालनाचे. छोटासा देखील शेतकरी असला , जर 50 पेट्या आपल्या शेतात ठेवल्या तर वर्षभरात दीड-दोन लाख रुपयांचे मध विकू शकतो आणि जर विकले नाही , गावातखाल्ले तरीही शरीराला फायदा होईल. तुम्ही मला सांगा,शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते कि नाही ? हे काम निधीची तरतूद करून करणे गरजेचे आहे का, मुळीच नाही. हे काम आपोआप होऊ शकते. आणि यासाठी आपण ठरवायला हवे.
आता मनरेगाचा पैसा येतो, लोकांना सरकार, भारत सरकार पैसे पाठवते. मेहनतीसाठी पैसे देते. आपण आतापासून हे ठरवू शकतो का की एप्रिल, मे, जून -तीन महिने मनरेगाचे जे काम होईल, जी मजुरी आपण देऊ, आपण आधी ठरवू के गावात पाणी वाचवण्यासाठी काय काय कामे होऊ शकतात? जर तलाव खोल करायचा आहे, छोटे छोटे कालवे तयार करायचे आहेत, पाणी अडवायची व्यवस्था करायची आहे. पावसाचा एकेक थेंब, हे पाणी वाचवण्यासाठी तीन महिने मनरेगाच्या पैशांचे काम, त्यातच टाकू. जे कुणी मोलमजुरीचे काम करेल, त्या कामासाठी करेल.
तुम्ही मला सांगा, जर गावातील पाणी गावात राहिले, पावसाचा एक-एक थेंब पाणी वाचले, तर जमिनीतील पाण्याची पातळी जी खालावत चालली आहे ती वाढेल कि नाही वाढणार? पाणी काढण्याचा खर्च कमी होईल कि नाही होणार? जर पाऊस कमी अधिक झाला तर त्याच पाण्यामुळे शेतीला जीवदान मिळू शकते कि नाही मिळू शकत? गावात कुणावर उपाशी मरायची वेळ येईल का?
असे नाही कि योजना नाहीत, असे नाही कि पैशांची कमतरता आहे. मी गावातील प्रतिनिधींना विनंती करतो, तुम्ही ठरवा- मग तो शिक्षणाचा मुद्दा असेल, आरोग्याचा मुद्दा असेल, पाणी वाचवण्याचा मुद्दा असेल, शेतीमध्ये बदल घडवण्याचा मुद्दा असेल, ही अशी कामे आहेत ज्यात नवीन तरतुदीशिवाय देखील गावातील लोक आज जिथे आहेत त्यापेक्षा पुढे जातील.
आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे- एक योजना आम्ही लागू केली होती जनधन योजना, बँक खाते. दुसरी योजना सुरु केली होती 90 पैशात विमा योजना. मला नाही वाटत गरीबातील गरीब 90 पैसे खर्च करू शकत नाही. जर त्याला विडी ओढायची सवय असेल तर तो दिवसभरात दोन रुपयांची विडी तर ओढतच असेल. 90 पैसे तो काढू शकतो.
तुम्ही पाहिले असेल इथे मंचावर मला एक आदिवासी समाजातील मातेला दोन लाख रुपये देण्याचे सौभाग्य लाभले. हे दोन लाख रुपये कशाचे होते? तिने जो 90 पैसे वाला विमा घेतला होता आणि तिच्या कुटुंबावर जे संकट कोसळले, कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला. त्या 90 पैशांमुळे आज तिला दोन लाख रुपयांचा विमा मिळाला आहे. एका गरीब मातेच्या हातात दोन लाख रुपये येणे, मला सांगा आयुष्याच्या या कठीण प्रसंगी तिला जगायला मदत होईल कि नाही.
माझे लोकप्रतिनिधी, माझे पंचायतीचे प्रधान माझ्या गावात एकही कुटुंब असे राहणार नाही ज्याचे प्रधानमंत्री जनधन खाते नसेल आणि ज्याचे कमीतकमी 90 पैसे वाला विमा नसेल आणि जर त्या कुटुंबावर संकट आले तर दोन लाख रुपये त्या कुटुंबाला मदत मिळेल, गावावर तो कधी भार बनणार नाही, हे काम करू शकत नाहीत का?
बंधू , भगिनींनो, तीन गोष्टींकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. आणि ते म्हणजे एक जनधन, दोन वनधन आणि तीन गोबरधन. या तीन गोष्टींद्वारे आपण गावाच्या अर्थव्यवस्थेत एक खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. जनधन योजनेद्वारे आपल्या कुटुंबाला, प्रत्येक नागरिकाला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो.
वनधन – आपल्याकडे जी वनसंपत्ती आहे, जी नैसर्गिक संपत्ती आहे, त्याचे मूल्य ओळखून – जर गावात कडुनिंबाचे झाड आहे आणि कडुनिंबाची फळे खाली पडत असतील- जर पाच-पंचवीस महिलानी ती फळे गोळा केली, त्यातुन तेल निघते आणि युरियाचे नीम कोटिंग होते, गावातील महिलांचीही कमाई होईल. ते कडुनिंबाचे झाड, कडुनिंबाची फळे कधी मातीत मिसळायची, आज ते वनधन बनू शकते. आपण हा बदल आणू शकतो का?
मी जंगलात राहणाऱ्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो, मी सर्व सरकारांना सांगू इच्छितो. आज इथे मध्य प्रदेश सरकारने आदिवासी समुदायासाठी एक खूप मोठी योजना सुरु केली आहे. ज्यात वनधनाचे देखील माहात्म्य आहे.
तिसरी गोष्ट मी सांगितली-गोबरधन. गावात जनावरे असतात, जे गोबर आहे त्याचा वैज्ञानिक पद्धतीने वापर होत नाही. जर गावातील गोबर , गावातील कचरा, याला संपत्ती मानले, त्यातून गॅस निर्माण होऊ शकतो, त्यातून वीज निर्माण होऊ शकते, त्यातून उत्तम प्रकारचे खत तयार होऊ शकते. युरियाच्या गरजेशिवाय उत्तम खताद्वारे गावातील शेती चालू शकते. गावात रोग पसरणार नाहीत. हे काम देखील पैशांशिवाय होऊ शकते. सरकारी योजनांचा लाभ घेऊन होऊ शकते.
आणि म्हणूनच, बंधू , भगिनींनो, आज जेव्हा मी देशभरातील पंचायतींमधून निवडून आलेल्या लोकांबरोबर भारताच्या सर्व गावांमधून. दोन लाख चाळीस हजार गावांना आज नर्मदा मातेच्या भूमीवरून, माता दुर्गावतीच्या आशीर्वादासह आज जेव्हा मी संबोधित करत आहे तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो – या, संकल्प करूया-2022, जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील , आणि याच वर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची 150 वी जयंती सुरु होईल, ही आपल्यासाठी संधी आहे की आपण गांधीजींच्या स्वप्नातील गाव निर्माण करूया. आपण सर्वानी मिळून भारताला बदलण्यासाठी गावाला बदलूया. आपण सर्वानी मिळून गावांमध्ये पैशांचा योग्य वापर करूया.
आज इथे मी आणखी एका कार्यक्रमाचा शुभारंभ केला ज्याअंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारकडून किती पैसा येतो, कोणत्या कामासाठी येतो, ते काम झाले की नाही, जिथे व्हायला हवे तिथे झाले की नाही, ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकाल. तुम्हाला समजेल की विहिरीसाठी निधी आला होता, मात्र विहीर तर कुठे दिसत नाही, तर तुम्ही गावात विचारू शकाल की सरकारने ही जी व्यवस्था केली आहे, यावर तर विहीर दिसत नाही. तर गाववाला देखील विचार करेल, हो खरेच, राहून गेले, महिन्याभरात करून देतो. मला सांगा हिशोब राहील कि नाही? गावात प्रामाणिकपणे काम करण्याची सवय लागेल कि नाही? सरकारी नोकरांना कामाचे उत्तर द्यावे लागेल कि नाही? पै-पैचा हिशोब द्यावा लागेल कि नाही?
आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, योग्य वेळी योग्य काम- तुम्ही पहा पाच वर्षांचा आमचा कार्यक्रम सुवर्ण कार्यकाळ बनवू शकतो. गाव आठवण काढेल के अरे, अमुक वर्षांपासून तमुक वर्षापर्यंत जे निवडून आले होते त्यांनी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. हा संकल्प करून पुढे जाऊया आणि याचसाठी आज मला इथे एका एलपीजी प्रकल्पाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि या एलपीजी कारखान्याचे जे मी लोकार्पण केले, तुम्ही पाहिले असेल कि आपण गॅस तर पोचवत आहोत लोकांना , मात्र गॅस भरायची जी सिलिंडर आहेत त्याचे कारखाने उभारावे लागत आहेत. इथेच 120 कोटी रुपये खर्चून एलपीजीचा कारखाना उभारला जाईल. गॅस सिलिंडर भरण्याचे काम होईल आणि आसपासच्या पन्ना, सताना, रिवा , सिंगरोली, शहडोल, उमरिया , दिंडोरी, अनुपूर, मंडला, सिवन, बालाघाट, जबलपूर, कटनी, दमोह या सर्व जिल्ह्यांमध्ये गॅस सिलिंडर पोहचवण्याचे काम सुलभ होईल. इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि तुमच्या इथे एक नवीन जग सुरु होईल. हे काम देखील आज तुमच्यासमोर करण्याची संधी मला मिळाली आहे.
बंधू भगिनींनो, अनेक विषय आहेत ज्याची मी चर्चा करू शकतो. मात्र मला वाटते आपण ग्राम केंद्री जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा मंत्र घेऊन पुढे चालायला हवे.
आता तुम्ही लोकांनी पाहिले – मी पाहत होतो के आता जेव्हा शिवराजजी सांगत होते कि भारत सरकारने मुलींबरोबर दुष्कर्म करणाऱ्या राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांना फासावर लटकावण्याचा कायदा बनवला आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे सांगितले, मी पाहत होतो पूर्ण मंडपात टाळ्यांचा कडकडाट घुमत होता. टाळ्या थांबत नव्हत्या. हे दिल्लीत असे सरकार आहे जे तुमच्या मनातील आवाज ऐकते आणि निर्णय घेते.
आणि मी म्हणेन, आपण कुटुंबातील मुलींना मान द्यायला शिकायला हवे, आपण कुटुंबात मुलींचे महत्व वाढवावे आणि कुटुंबात जरा मुलांना जबाबदारी शिकवणे सुरु करायला हवे. जर मुलांना जबाबदारी शिकवणे सुरु केले तर मुलींना सुरक्षित ठेवणे कठीण जाणार नाही आणि म्हणूनच जो बेईमानी करेल, भ्रष्ट आचरण करेल, राक्षसी कृत्य करेल तो तर फासावर जाईल. मात्र आपण आपल्या कुटुंबात देखील आपल्या मुलींच्या मान -सन्मानाची जबाबदारी उचलायला हवी. एक सामाजिक चळवळ उभी करायला हवी. आणि आपण सर्वानी मिळून देशाला अशा संकटांतून बाहेर काढू शकतो. आणि मला वाटते या गोष्टी तुम्ही पुढे न्याव्यात.
बंधू भगिनींनो, सरकारने एका खूप मोठ्या महत्वपूर्ण कामावर विचार केला आहे. आपल्या देशाचे दुर्भाग्य होते की स्वातंत्र्याची लढाई काही लोकांच्या आसपास, काही कुटुंबांच्या आसपास मर्यादित राहिली. सच्च्या बलिदान देणाऱ्यांच्या कथाची इतिहासाच्या पानावर नोंद होऊनही माहित नाही काय आपत्ती आली, मला माहित नाही.
1857 पासून जर पाहिले , त्याच्याही आधी शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडात एकही वर्ष असे गेले नाही कि भारताच्या कोणत्या ना कोणत्या भागात आत्मसन्मानासाठी, संस्कृतीसाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसेल. शेकडो वर्षे सातत्याने दिले आहे. मात्र समजा 1857 नंतर देखील पाहिले, खूप कमी लोकांना माहित आहे आणि आपल्याला विसरण्यात आले आहे कि माझ्या समाजातील बंधू भगिनींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी किती बलिदान दिले आहे. भारताच्या सन्मानासाठी किती मोठमोठ्या लढाया लढल्या गेल्या. दुर्गावती, अवंतीबाई यांचे स्मरण तर केले जाते, बिरसा मुंडा यांचे स्मरण केले जाते, किती लोकांनी दिले आहे.
माझे स्वप्न आहे भारतातील प्रत्येक राज्यात जिथे जिथे आदिवासी समुदायातील आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे त्यांचे प्रत्येक राज्यात एक संग्रहालय उभारले जावे. शाळेतील मुलांना तिथे नेले जावे आणि त्यांना सांगितले जावे की आपल्या जंगलात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवानी आपल्या देशाची संस्कृती आणि इतिहासासाठी किती बलिदान दिले होते आणि आगामी काळात मध्य प्रदेशात देखील हे काम होणार आहे.
आणि म्हणूनच माझ्या बंधू, भगिनींनो, आज आपण मंडलाच्या भूमीवरून माता दुर्गावतीचे स्मरण करत आदि मेळावा करत आहोत. तेव्हा पंचायतराजच्या या महत्वपूर्ण प्रसंगी आपल्या पंचायतराजचे सशक्तीकरण व्हावे, आपल्या लोकशाहीची मुळे मजबूत व्हावीत, आपले लोकप्रतिनिधी भारत मातेच्या कल्याणासाठी, आपल्या गावाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित करावे. याच एका भावनेसह तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तोमरजी, रूपालाजी आणि त्यांच्या विभागाचे सर्व अधिकारी यांचेही मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवले आहे.
येत्या 30 एप्रिलला आयुष्मान भारताचे लोक-जागरण होणार आहे. 2 मे रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा होणार आहेत. गावातील जीवनाशी संबंधित बाबी जोडल्या जाणार आहेत. तुम्ही सर्वांनी मोठ्या उत्साहाने आणि जोमाने त्यात सहभागी व्हा.
याच एका अपेक्षेसह खूप-खूप शुभेच्छा, खूप-खूप धन्यवाद.