मोठ्या संख्येने उपस्थित माता-भगिनी,बंधू आणि युवा मित्रहो,
आज 8 मार्च,संपूर्ण जग 100 वर्षाहून जास्त काळ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या रुपानं या दिवसाशी जोडले गेले आहे.मात्र आज अवघा हिंदुस्तान झुनझुनूशी जोडला गेला आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने झुनझुनू मधले हे दृश्य संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे.
मी झुनझुनू मध्ये विचारपुर्वक आलो आहे, आलो आहे नव्हे तर आपण मला इथे आपल्या ओढीने आणले आहे,मला इथे यायला भाग पाडले आहे.कारण बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आपल्या जिल्ह्याने शानदारपणे पुढे नेले आहे, इथल्या प्रत्येक कुटुंबाने उत्तम काम केले आहे तर स्वाभाविकपणे मनात विचार आला की चला झुनझुनुची माती भाळी लावू या.
आताच वसुंधराजी यांनी वर्णन केले की ही भूमी वीरांची कशी आहे, या भूमीची ताकत काय आहे,म्हणूनच समाजसेवा असो,शिक्षणाचे काम असो,दान- पुण्ण्याचे काम असो अथवा देशासाठी बलिदान असो,या जिल्ह्याने सिद्ध केले आहे की युद्ध असो वा दुष्काळ असो, झुनझुनू झुकणे नव्हे तर झुंज देणे जाणतो.झुनझुनूच्या धरती वरून आज ज्या कार्यात पुढाकार घेतला जात आहे, त्यातून संपुर्ण देशाला प्रेरणा मिळेल,देशाला इथून नवे बळ मिळेल.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाला सफलता मिळाली की मनाला संतोष होतो,वाटते चला परिस्थितीत काही सुधारणा झाली.मात्र कधी कधी मनाला क्लेषही होतात ते या गोष्टीचे की ज्या देशाला महान परंपरा लाभली आहे,शास्त्रात उत्तमोत्तम गोष्टी आहेत,वेदापासून ते विवेकानंदांपर्यंत योग्य दिशेने प्रबोधन केले गेले आहे,तिथे असे काय कारण आहे, काय अपप्रवृत्ती आहे की आज आपल्याच घरात मुलगी वाचवण्यासाठी हात जोडावे लागतात,समजवावे लागते, त्यासाठी अर्थ संकल्पातून पैसा खर्च करावा लागतो.
कोणत्याही समाजात यापेक्षा जास्त क्लेशदायी काही असेल असे मला वाटत नाही.काही दशकांच्या विकृत मानसिकतेतून, अयोग्य विचारसरणीतून, सामाजिक अपप्रव्रुत्तीतून आपण मुलींना बळी पाडण्याचा मार्ग निवडला. असे ऐकले की हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कुठे 800,कुठे 850 तर कुठे 900 आहे अशा समाजाची काय दुर्दशा होईल याची कल्पना आपण करू शकता.स्त्री-पुरुष समानतेवरच समाजाचे चक्र चालते.
काही दशकांपासून मुलींना नाकारत राहिल्याने,बळी घेत राहिल्याने परिणामी समाजात असंतुलन निर्माण झाले. एका पिढीत सुधारणा होणार नाही हे मी जाणतो. चार-चार, पाच-पाच पिढ्यांमधल्या अपप्रवृत्ती आज जमा झाल्या आहेत. मागची जी तफावत आहे ती दूर करण्यासाठी काळ जावा लागेल हे प्रत्येक जण जाणतो. मात्र आता आपण मुलांप्रमाणेच मुलीचाही प्रतिपाळ करण्याचा निश्चय करूया. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत हे ध्यानात ठेवून वाटचाल केली तर चार-पाच-सहा पिढ्यात जे नुकसान झाले आहे ते कदाचित दोन किंवा तीन पिढ्यात भरून काढता येईल.मात्र त्यासाठी पहिली अट आहे की आता जन्माला आलेल्या मुलांच्यात असंतुलन राहता कामा नये.
मला आनंद आहे की आज ज्या जिल्ह्याना सन्मानित करण्याची संधी मिळाली त्या दहा जिल्ह्यांनी हे काम उत्तमरित्या केले आहे. नवजात बालकात मुला-मुलींचे प्रमाण समान ठेवण्यात हे जिल्हे यशस्वी ठरले आहेत.आज ज्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली त्या जिल्ह्यांचे,त्या राज्यांचे, त्या चमूचे अभिनंदन. त्यांनी या पवित्र कार्याची जबाबदारी घेतली.
देशातल्या सर्व अधिकाऱ्यांना, सरकारमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि राज्य सरकारांना मी आवाहन करतो की त्यांनी याला जन आंदोलनाचे स्वरूप द्यावे.या अभियानाशी प्रत्येक कुटुंब जोडले जात नाही,सासू याचे नेतृत्व स्वीकारत नाही तोपर्यंत या कामाला जास्त काळ लागेल.सासूने ही जबाबदारी स्वीकारली आणि घरात मुलगी हवी हे ठासून सांगितले तर मुलीच्या बाबतीत अन्याय करायला कोणी धजावणार नाही.म्हणूनच आपल्याला एक सामाजिक आंदोलन उभारावे लागेल, एक जन आंदोलन निर्माण करावे लागेल.
केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी पूर्व हरियाणामध्ये जिथे स्त्री-पुरुष गुणोत्तर चिंताजनक होते तिथे आव्हानाचा स्वीकार करत हरियाणामध्ये एक कार्यक्रम राबवला.हरियाणाच्या भूमीवर जाऊन ही बाब सांगणे कठीण होते. तिथल्या अधिकाऱ्यांनी सल्ला दिला की साहेब तिथली परिस्थिती इतकी खराब झाली आहे की तिथे गेलो तर नव्याने काहीतरी अयोग्य घडेल.सर्वात जास्त कठीण परिस्थिती असेल तिथून सुरवात करू असे मी सांगितले.आज हरियाणाचे मी अभिनंदन करतो त्यांनी गेल्या दोन वर्षात परिस्थितीत झपाट्याने सुधारणा घडवून आणली आहे.
मुलींच्या जन्मदरात जी वाढ झाली आहे त्यामुळे आपल्यात एक नवा विश्वास,एक नवी आशा निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षाचा अनुभव पाहून, अभियानाला मिळालेले यश पाहून, ते लक्षात घेऊन आज 8 मार्च, आंतर राष्ट्रीय महिला दिनी भारत सरकारने ही योजना 160-161 जिल्ह्यापर्यंत नव्हे तर हिंदुस्तानातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करण्याचे ठरवले आहे.जिथे स्थिती चांगली आहे तिथे आणखी चांगली कशी होईल यासाठी काम केले जाईल.
आपण आपल्यालाच प्रश्न विचारावा लागेल.मुलगी म्हणजे ओझे हा जुना विचार.आजचा अनुभव सांगतो की मुलगी ओझे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची ती शान आहे.
हिंदुस्तानमध्ये, उपग्रह सोडल्याचे, मंगळयान, उपग्रह अवकाशात झेपावल्याचे आपण ऐकतो,जेव्हा पाहतो तेव्हा समजते माझ्या देशाच्या तीन महिला वैज्ञानिकांनी, अंतराळ तंत्रज्ञानात केवढी झेप घेतली आहे ते, तेव्हा मुलींच्या सामर्थ्याची जाणीव होते.जेव्हा झुनझुनु मधली एक मुलगी लढाऊ विमान चालवते तेव्हा समजते मुलींचे सामर्थ्य काय आहे.ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक, पदक घेऊन कोणी येते आणि हे पदक घेऊन येणाऱ्या मुली आहेत हे जेव्हा समजते तेव्हा देशाची मान अभिमानाने उंचावते की आमच्या देशाच्या मुली जगात आपल्या देशाचे नाव उज्वल करत आहेत.
जे लोक मानतात की मुलगा आहे तो म्हातारपणी उपयोगाला येईल, तर परिस्थिती वेगळीच आहे. मी अशी कुटुंबे पहिली आहेत जिथे म्हातारे आई-वडील आहेत, त्यांना चार-चार मुलगे आहेत, मुलांचे बंगले आहेत,गाड्या आहेत, सुस्थिती आहे मात्र म्हातारे आई-वडील अनाथाश्रमात आहेत आणि मी अशी कुटुंबेही पहिली आहेत म्हाताऱ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे,आई-वडिलांना म्हातारपणात त्रास होऊ नये म्हणून रोजगार करते, नोकरी करते, मेहनत करते, आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून लग्नही करत नाही,आपले आयुष्य आई-वडिलांसाठी खर्ची घालते.
म्हणूनच समाजाची ही मानसिकता आहे, मुलींविषयी विचार करण्याचा हा जो दुषित पूर्वग्रह आहे त्यातून बाहेर पडायचे आहे.त्याला सामाजिक आंदोलनाचे स्वरूप देणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.सफल, असफल याबाबत कोणी सरकारला दोष देईल, ठीक आहे, ते काम करत राहतील.मात्र प्रत्येक कुटुंबाचा संकल्प हाच सफलतेकडे घेऊन जाईल.म्हणूनच मुलगा-मुलगी एकसमान, मुलीसाठी अभिमानाचा भाव आपल्या मनात राहणार नाही तोपर्यंत गर्भातच स्त्री भृण हत्या होत च राहतील.
18 व्या शतकात मुलीसाठी दुध पिती करण्याची अयोग्य प्रथा होती.एका मोठ्या भांड्यात दुध भरून त्यात मुलीला बुडवत असत.मात्र, आपण 21 व्या शतकात असूनही त्या 18 व्या शतकातल्या लोकांपेक्षा कधी कधी वाईट आहोत असे मला कधी कधी वाटते.कारण 18 व्या शतकात मुलीला जन्म घेण्याचा हक्क तर होता,तिला आपल्या आईचा चेहरा पाहायला तर मिळत असे, त्या आईला आपल्या मुलीचे तोंड तर पाहायला मिळत असे.या पृथ्वीवर पळभर का असेना श्वास घ्यायला मिळत असे,त्यानंतर ते महापाप करून समातले सर्वात वाईट काम केले जात असे.
मात्र आज तर त्यापेक्षाही वाईट काम केले जात आहे, मातेच्या गर्भातच, आई आणि मुलीला परस्परांचे चेहरेही पहाता येत नाही. आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन मातेच्या गर्भातच स्त्री भृण खुडला जातो.यापेक्षा मोठे पाप नाही असे मी मानतो. मुलगी आपली शान आहे असे आपण जोपर्यंत मानणार नाही तोपर्यंत या अपप्रवृत्ती नष्ट होणार नाहीत.
ज्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला आहे त्या मातांना, त्या मुलींना आज इथे भेटण्याचे भाग्य मला लाभले,मी त्यांना विचारले की तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला कोणी सांगितले आहे का की तुमच्या जन्मानंतर मिठाई वाटली होती का,त्यांनी उत्तर दिले की ते माहित नाही,मात्र मुलगी झाल्यावर आम्ही मात्र संपूर्ण मोहोल्ल्यात मिठाई वाटून आनंद साजरा केला.
आपल्याला परिस्थिती बदलायची आहे आणि त्या दिशेने सरकार महत्वपूर्ण काम करत आहे त्या अंतर्गत, या योजनेची व्याप्ती संपूर्ण देशभरात आम्ही विस्तारत आहोत.
दुसरा एक कार्यक्रम आज सुरु होत आहे पोषण अभियान,राष्ट्रीय पोषण अभियान.कोणालाही पंतप्रधानांवर टीका करायची असेल,दुषण द्यायचे असेल तर माझी विनंती आहे की आपण पंतप्रधानांवर टीका करा, दुषणे द्या,चांगले- वाईट म्हणा,मात्र जेव्हा पंतप्रधान म्हणाल,मनात पंतप्रधान हा शब्द येईल तेव्हा नरेंद्र मोदी नजरेसमोर येता कामा नये, पंतप्रधान हा शब्द ऐकताच आपल्याला पोषण अभियान नजरेसमोर आले पाहिजे.पहा कसे घराघरात पोहोचते हे अभियान.
आपल्याकडे मुलगा असो वा मुलगी, त्यांचा शारीरिक विकास म्हणावा तसा होत नाही.कधी कधी कमी वजनाचे मुल जन्मते,त्यातही अज्ञान खूप असते.आपल्याला या समस्येवर मात करायची आहे.मी पुन्हा सांगतो की केवळ सरकारी पैशाने हे काम होणारे नव्हे.जेव्हा हे काम जन आंदोलन बनेल तेव्हा हे काम होईल.लोकांना शिक्षित केले जाते समजावून सांगितले जाते.
कुपोषणाविरोधात याआधी काम झाले नाही असे नव्हे.प्रत्येक सरकार मध्ये कोणती ना कोणती योजना झाली आहे. मात्र आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते की जितक्या कॅलरीज आवश्यक आहेत तेवढ्या पोटात गेल्या तर कुपोषणा पासून मुक्ती मिळेल.मात्र अनुभव असा आहे की केवळ आहार ठीक असून पुरेसा नाही तर संपूर्ण चक्र ठीक करावे लागते.आहार चांगला मिळाला मात्र पाणी खराब असेल तर कितीही खाल्ले तरी कुपोषणाच्या स्थितीत फरक पडणार नाही.
खूप कमी लोकांना माहित असेल की बाल विवाह हे सुद्धा कुपोषित बालकांमागचे एक महत्वाचे कारण म्हणून समोर आले आहे.लहान वयात लग्न होणे,मुले होणे, ना मातेच्या शरीराचा विकास झालेला असतो,ना त्या बाळाच्या शरीराचा विकास होतो. म्हणूनच जीवनाशी जोडले गेलेले सर्व पैलू, आजारपणात वेळेवर औषधपाणी, नवजात शिशूला जन्मल्यानंतर लगेचच आईचे दुध मिळणे,या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. नाहीतर आपल्याकडे जुन्या काळातले लोक सांगतात की बालकाच्या जन्मानंतर त्याला लगेच आईचे दुध देता कामा नये, हे चूक आहे. जन्मानंतर लगेचच बालकाला आईचे दुध मिळाले तर वाढत्या वयात समस्या कमी येतात.आईच्या दुधात ही ताकद असते, मात्र आपण ते नाकारतो.
मातेचे महात्म्य जाणून त्याचा स्वीकार केला, मातृत्वाची पूजा केली, मातेची काळजी घेतली तर तिची मुलेही कुपोषण मुक्त असतील.
पोषणाची चिंता करणे एक काम आहे.सरकारकडून लसीकरणाचे अनेक कार्यक्रम राबवले जातात.मात्र त्या आरोग्य केंद्रावर जेव्हढ्या सेवा उपलब्ध आहेत, निधी आहे, अधिकारीवर्ग आहे,लोक आहेत पण आपण त्या सर्वांपर्यंत पोहोचत नाही.म्हणूनच कोणत्या ना आजाराला आपण तोंड देतो.
आताच एक माहितीपट दाखवला त्यात सांगितले की हात न धुता जेवल्यामुळे,शरीरात येणाऱ्या आजारपणामुळे मृत्यु पावणाऱ्यांची संख्या 30-40 टक्के आहे असा अंदाज आहे.मुलांना आई भरवत असेल तर तिनेही हात धुवायला पाहिजेत आणि मुलानेही स्वतः काही खाण्यापूर्वी हात धुणे आवश्यक आहे ही सवय कोण लावणार ?हे कोण शिकवणार ?
आपल्या उज्वल भविष्यासाठी,आपल्या मुलांचे आयुष्य सुधारणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्या अंतर्गत ही योजना मिशन मोड अर्थात एक अभियान म्हणून तसेच वेगवेगळ्या योजना एकत्र आणून, मग ती पाण्याची समस्या असेल, औषधांची समस्या असेल किंवा परंपरा अडचणीची ठरत असेल, या सर्वाना एकत्र आणून अभियान म्हणून राबवले जात आहे.आपण पाहिले असेल मुले शाळेत जातात,एका विशिष्ट वयानंतर मुलामध्ये न्यूनतेचा भाव निर्माण होतो, कोणत्या गोष्टीमुळे, तर शाळेत पाच मुलांची उंची जास्त असेल आणि बाकीच्यांची उंची कमी असेल तर त्यांना वाटते माझी उंची पण त्या उंच मुलाइतकीच असायला हवी.मग तो झाडाला लटकून आपली उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करतो.आपण सर्वांनी हा प्रयोग केला असेल.प्रत्येकाला वाटते माझी उंची वाढायला हवी. मात्र आपण वैज्ञानिक पद्धतीने यावर काम करत नाही.
आज आपल्या देशात वयाच्या मानाने जेव्हढी उंची असायला हवी त्यापेक्षा बरीच कमी असल्याचे आढळते.बालके तंदुरुस्त असावीत, त्यांचे वजन योग्य असावे,उंची प्रमाणात असावी या साऱ्या बाबींवर लक्ष पुरवून एक सर्वंकष दृष्टीकोन बाळगत आपण 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील तेव्हा देशात पोषण क्षेत्रात आपण अभिमानाने जगाला सांगू शकू की आम्ही हे साध्य केले आहे,आमच्या देशातली मुले पहा,त्यांच्याकडे पाहून मनाला आनंद होईल, अशी हसती खेळती मुले आपल्याला सगळीकडे दिसतील अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे.
सुमारे 9 हजार कोटी रुपये खर्चून ही योजना पुढे नेली जात आहे.सुनिश्चित मानकांसह आशा कार्यकर्ती असो,खेड्यातल्या स्तरावरचे स्वयंसेवक असो,त्यांच्या जवळ तंत्रज्ञानाचे पाठबळ असेल, नियमितपणे ते आपली माहिती आणि आकडेवारी गोळा करतील.त्यात काही चढ-उतार आले तर तातडीने वरच्या स्तरावरून लक्ष घातले जाईल.समस्या कशी सोडवली जाईल यावर कटाक्ष राहील.कधी कधी आठ महिन्यापर्यत मुलाची प्रकृती, वाढ, वजन व्यवस्थित असते,पावसाळा आला अचानक साथी आल्या तर एकदम शेकडो मुलांची प्रकृती बिघडते.आठ महिन्यांची आपली मेहनत एकदम खाली येते.हे एक आव्हानात्मक काम असते.मात्र हे आव्हानात्मक कामही आपल्याला पूर्णत्वाला न्यायचे आहे.मला विश्वास आहे की आपण सर्वांनी जो संकल्प केला आहे,त्या संकल्पातून हे पूर्ण होईल.
‘मिशन इंद्रधनुष्य’द्वारा लसीकरणाच्या कामाला गती आली आहे.वर्षाच्या अखेरी पर्यंत 90 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत गरोदर महिलेसाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत देऊन गरोदरपणातली त्यांची आर्थिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छ भारत अभियानाशी 23 लाख महिला जोडल्या गेल्या आहेत.
अशाच प्रकारे लाकडांचा वापर करून चुलीवर जेवण करणारी माता, एका दिवसात 400 सिगारेटच्या धुराइतका धूर आपल्या फुफ्फुसात घेत होती. त्यापासून तिची सुटका करण्यासाठी आम्ही प्रधान मंत्री उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन द्यायला सुरवात केली. मोफत गॅस कनेक्शनमुळे आज सुमारे साडे तीन कोटी कुटुंबे या धुरा पासून मुक्त झाली आहेत.येत्या काळात विकासाच्या वाटेवरची मार्गक्रमणा सुरु ठेवत आज ज्या योजनांचा प्रारंभ झाला त्या योजना अधिक गतीने पुढे नेऊन आपल्याला आपला देश तंदुरुस्त राखायचा आहे. देशातली बालके सशक्त असतील तर देशाचे भविष्यही उज्वल आणि बळकट राहील.
हा संकल्प बाळगून आपण सर्वांनी या जन आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन मी देशवासियांना करतो. हे मानवतेचे कार्य आहे,भावी पिढीचे कार्य आहे,हे भारताच्या भविष्यासाठीचे काम आहे.आपण सर्वजण आमच्या समवेत सहभागी व्हा.
जोशपूर्ण आवाजात माझ्या समवेत म्हणा
भारत माता की – जय
भारत माता की – जय
भारत माता की – जय
खूप खूप धन्यवाद.