भारत माता की – जय,
भारत माता की – जय,
भारत माता की – जय
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर,लांबून लांबून आलेल्या आणि दूरपर्यंत उभ्या असलेल्या माझ्या बंधू- भगिनींनो,
नवे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या राज्यांत सर्व प्रथम जाण्याची संधी मला मिळाली त्यापैकी झारखंड हे एक राज्य आहे. इथेच प्रभात मैदान, प्रभात तारा मैदान,सकाळची वेळ आणि आपण सर्व योग अभ्यास करत होतो, वरूण राजाही आशीर्वाद देत होता. आज पुन्हा या मैदानात आल्यावर याचे स्मरण झाले. याच मैदानावरून आयुष्यमान भारत योजना गेल्या सप्टेंबर पासून सुरू झाली होती.
मित्रहो,झारखंडच्या ओळखीत मला आणखी एक भर घालायची आहे. बंधू-भगिनींनो, आपल्या झारखंडची नवी ओळख निर्माण होतात आहे की हे असे राज्य आहे जिथून गरीब आणि आदिवासी समुदायाच्या कल्याणा साठीच्या मोठ्या योजनांचा प्रारंभ होतो,एक प्रकारे हे या योजनांचे लाँचिंग पॅड आहे. गरिबांच्या कल्याणासाठीच्या, देशातल्या मोठ-मोठ्या योजनांचा प्रारंभ कोणत्या राज्यातून झाल्या याची चर्चा होईल तेव्हा झारखंडच्या नावाची सर्वात जास्त चर्चा असेल. झारखंड मधून जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विम्याच्या,आयुष्यमान भारत योजनेचा प्रारंभ झाला आणि देशातले लाखो लोक,जे पैशाअभावी इलाज करू शकत नव्हते ते आता उपचार घेत आहेत,आशीर्वाद देत आहेत.ते आशीर्वाद झारखंडपर्यंत पोहोचत आहेत.
देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना पेन्शन सुनिश्चित करणाऱ्या प्रधान मंत्री किसन मान धन योजनेचा प्रारंभही, बिरसा मुंडा यांच्या या धरतीवरून होत आहे.एव्हढेच नव्हे तर देशातल्या कोट्यवधी व्यापारी आणि स्वयं रोजगार असलेल्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेची सुरवातही झारखंड मधूनच होत आहे.या महान धरतीवरून मी देशातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अनेक शुभेच्छा देतो.
आम्ही कधी देशातल्या असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना आणली, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना मग व्यापारी आणि स्व रोजगार असणाऱ्या व्यक्तींसाठी पेन्शन योजना म्हणजे एक प्रकारे, देश घडवण्यात ज्यांची मोठी भूमिका आहे अशा, समाजाच्या सर्व वर्गाला वृद्धापकाळात आर्थिक समस्या भेडसावू नये याची हमी, घेऊन ही पेन्शन योजना आली आहे.
मित्रहो,आज मला साहेबगंज मल्टी मोडलचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आमचे मंत्री मनसुख मांडवीय इथे उपस्थित आहेत. संथाल परगण्याचे अनेक लोक या महत्वपूर्ण वेळेचे साक्षीदार आहेत. हा प्रकल्प केवळ झारखंडच नाही तर हिंदुस्थान आणि जगातही झारखंडची नवी ओळख निर्माण करणारा आहे. हा केवळ एक प्रकल्पच नव्हे तर या संपूर्ण क्षेत्रात परिवहन क्षेत्रात एक नवा पर्याय उपलब्ध करून देत आहे.
राष्ट्रीय जलमार्ग एक, हल्दीया बनारस जलमार्ग विकास योजनेचा हे टर्मिनल एक महत्वाचा भाग आहे. हा जलमार्ग झारखंडला संपूर्ण देशाशीच नव्हे तर परदेशाशीही जोडणार आहे. या माध्यमातुन झारखंडच्या लोकांसाठी विकासाच्या अमाप संधी उपलब्ध होणार आहेत. या टर्मिनलमुळे, इथल्या आदिवासी बंधू- भगिनी,इथल्या शेतकऱ्याना, आपली उत्पादने, संपूर्ण देशाच्या बाजारपेठेत सुलभपणे पोहोचवता येणार आहेत.याचप्रमाणे,जलमार्गामुळे, उत्तर भारतातून झारखंडसहित ईशान्येकडच्या आसाम,नागालँड, मिझोराम, मेघालय या सर्व राज्यांपर्यंत,झारखंड मधली उत्पादने पोहोचवणे सुलभ होणार आहे. हे टर्मिनल रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल.प्रगतीच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा जलमार्ग लाभदायी सिद्ध होईल. रस्ता मार्गे होणाऱ्या मालवाहतुकी पेक्षा जलमार्गाने होणारी वाहतूक कमी खर्चात होते. याचा लाभही प्रत्येक उत्पादक, प्रत्येक व्यापारी आणि प्रत्येक ग्राहकालाही होईल.
बंधू- भगिनींनो, निवडणुकीच्या वेळी कामदार आणि दमदार अर्थात काम करणारे आणि भक्कम सरकार देण्याचे आश्वासन मी दिले होते. एक असे सरकार जे पहिल्या सरकारपेक्षाही अधिक वेगाने काम करेल. एक असे सरकार जे जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. गेल्या शंभर दिवसात जनतेने याची झलक अनुभवली आहे, याचा ट्रेलर पाहिलाय, पिक्चर अजून बाकी आहे.
आमचा संकल्प आहे, प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा, आज देश, जल जीवन अभियानाच्या पूर्ततेसाठी काम करत आहे. आमचा संकल्प आहे, मुस्लिम भगिनींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा, शंभर दिवसाच्या आतच त्रिवार तलाक विरोधात कडक कायदा करण्यात आला आहे.
आमचा संकल्प आहे, दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याचा. पहिल्या शंभर दिवसातच दहशतवादाविरोधातला कायदा अधिक मजबुत करण्यात आला.
आमचा संकल्प आहे, जम्मू काश्मीर आणि लडाखला विकासाच्या नव्या शिखरावर न्यायचा. शंभर दिवसाच्या आतच आम्ही याची सुरवात केली आहे.
आमचा संकल्प आहे, जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या योग्य जागी पोहोचवण्याचा. या दिशेनेही वेगाने काम होत आहे. काही लोक तुरुंगात गेलेही.
बंधू-भगिनीनो, नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ देशाच्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला मिळेल असे मी म्हटले होते. हे आश्वासन पूर्ण झाले आहे आणि आता जास्तीत जास्त शेतकरी या योजनेशी जोडले जात आहेत.
आज देशाच्या सुमारे साडेसहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेत माझ्या झारखंड मधल्या 8 लाख शेतकरी लाभार्थी कुटुंबांचा समावेश आहे याचा मला आनंद आहे. त्यांच्या खात्यात सुमारे अडीचशे कोटी रुपये जमा झाले आहेत. कोणी मध्यस्थ नाही. कोणाच्या शिफारसीची गरज नाही.कोणाला काही देण्याची गरज नाही,पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
बंधू-भगिनीनो, आजचा दिवस झारखंड साठी ऐतिहासिक आहे. आज इथे झारखंड विधानसभेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आणि सचिवालयांच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन झाले.राज्य निर्मिती नंतर सुमारे दोन दशकानंतर,आज झारखंड मधे या लोकशाहीच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे. हे भवन म्हणजे केवळ एक इमारत नाही,फक्त चार भिंती नाहीत तर हे असे पवित्र स्थान आहे,जिथे झारखंडच्या लोकांच्या उज्वल भविष्याचा पाया घातला जाईल. लोकशाही प्रती विश्वास राखणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे तीर्थस्थान आहे. लोकशाहीच्या या मंदिराच्या माध्यमातून झारखंडच्या आताच्या आणि भावी पिढ्यांचे स्वप्न साकार होईल. झारखंडच्या ओजस्वी,तेजस्वी आणि प्रतिभावान युवकांनी नवे विधानभवन पाहण्यासाठी जरूर यावे असे मला वाटते. कधी संधी मिळेल तेव्हा,चार महिन्यांनी, सहा महिन्यांनी, वर्षानंतर,आपण जायला हवे.
मित्रहो,या वेळी संसदेच्या सत्राबाबत आपण बरेच काही ऐकले असेल, पाहिले असेल. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर, नवी लोकसभा आल्यानंतर, लोकसभा आणि राज्यसभा कामकाज झाले, ते पाहून हिंदुस्तानच्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू दिसले,आनंद दिसला. कारण संसदेचे पावसाळी अधिवेशन हे कामकाजाच्या दृष्टीने स्वातंत्र्यानंतर हिंदुस्तानच्या इतिहासातले सर्वात जास्त यशस्वी सत्र पैकी एक आहे. संपूर्ण देशाने पाहिले की पावसाळी अधिवेशनात संसदेच्या वेळेचा सार्थ उपयोग झाला. रात्री उशिरापर्यंत संसदेचे कामकाज सुरु राहिले. तासनतास चर्चा सुरु राहिल्या, या दरम्यान अनेक महत्वपूर्ण चर्चा झाल्या आणि देशासाठी महत्वाचे कायदे निर्माण झाले.
मित्रहो, संसदेच्या कामकाजाचे श्रेय सर्व खासदारांना,सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना जाते.सर्व खासदारांचे अभिनंदन,देशवासीयांचे अभिनंदन.
मित्रहो,विकासाला आमचे प्राधान्य आहे आणि आमची त्याप्रती कटीबद्धताही आहे.विकासाचे आमचे आश्वासनही आहे आणि पक्का निश्चयही आहे.आज देश ज्या वेगाने वाटचाल करत आहे, त्या वेगाने कधीच वाटचाल झाली नव्हती. आज देशात जे परिवर्तन होत आहे त्याबाबत कधी विचारही झाला नव्हता. ज्यांनी विचार केला की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत, देशाच्या न्यायालयापेक्षा उच्च आहेत, ते आज न्यायालयासमोर जामिनासाठी अर्ज करत आहेत.
बंधू-भगिनीनो,अशा प्रकारे वेगाने काम करणारे सरकार आपल्याला हवे आहे ना ? शंभर दिवसांच्या कामावर आपण खुश आहात ना ? सरकार योग्य दिशेने काम करत आहे, ठीक काम करत आहे, आपला आशीर्वाद आहे, यापुढेही राहील. आता तर सुरवात आहे. पाच वर्षे अजून बाकी आहेत. अनेक संकल्प बाकी आहेत, प्रयत्न बाकी आहेत, परिश्रम घ्यायचे आहेत. याच दिशेने,छोटे शेतकरी, दुकानदार, व्यापारी यांच्यासाठीच्या ऐतिहासिक योजनेची थोड्या वेळापूर्वी सुरवात करण्यात आली. झारखंड सहित संपूर्ण देशातल्या छोट्या शेतकऱ्यानी, दुकानदारांनी, व्यापाऱ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो.
बंधू-भगिनीनो, आमचे सरकार प्रत्येक देशवासियाला सामजिक सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न करत आहे.ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशाना सरकार मदतीचा हात देत आहे. या वर्षाच्या मार्चपासून देशातल्या कोट्यवधी असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी अशाच एका पेन्शन योजनेची सुरवात झाली आहे. श्रम योगी मानधन योजनेशी आतापर्यंत 32 लाख पेक्षा जास्त कामगार जोडले गेले आहेत.
मित्रहो,पाच वर्षापूर्वी, गरिबांसाठी जीवन विमा किंवा दुर्घटना विमा कल्पनेच्या पलीकडे होता. त्यांच्यासाठी ही फारच मोठी बाब होती. एकतर माहितीचा अभाव होता आणि ज्यांना माहिती होती ती व्यक्ती हप्त्याची मोठी रक्कम पाहून शंभरदा विचार करून मग थांबत असे.आत्ताच्या जेवणाची चिंता करायची की म्हातारपणाचा विचार करायचा, ही परिस्थिती बदलण्याचा आम्ही विचार केला.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, देशाच्या सामान्य जनतेसाठी ठेवण्यात आली. केवळ 90 पैसे, आपण विचार करू शकता, दर दिवशी फक्त 90 पैसे आणि एक रुपया दरमहा या दराने या दोन योजनांअंतर्गत दोन-दोन लाख रुपये विमा सुनिश्चित करण्यात आला आहे.आतापर्यंत या दोन योजनांशी 22 कोटीपेक्षा जास्त देशवासीय जोडले गेले आहेत. यापैकी 30 लाखाहून जास्त लोक झारखंड मधले आहेत. एवढेच नव्हे तर या दोन योजनांच्या माध्यमातून देशवासीयांना, साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त क्लेम मिळाला आहे.
बंधू-भगिनीनो, विम्याप्रमाणेच गंभीर आजारावरचे उपचारही गरिबांसाठी जवळ-जवळ अशक्य होते.आयुष्मान भारत योजनेंतर्गत आम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणली, इथून झारखंड मधूनच सुरवात केली. या अंतर्गत आतापर्यंत सुमारे 44 लाख गरीब रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे, ज्यामध्ये, झारखंड मधले माझे 3 लाख बंधू-भगिनी आहेत. यासाठी रुग्णालयाना 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चुकती करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेतून गरिबांवर उपचार होत आहेत आणि त्यांना उपचारासाठी कर्ज घ्यावे लागत नाही. सावकाराकडे जाऊन व्याजापोटी मोठी-मोठी रक्कम देऊन इलाज करण्याची गरज त्याला भासत नाही.
बंधू-भगिनीनो, गरिबांच्या जीवनातली चिंता कमी झाली, जीवनाचा संघर्ष कमी झाला की तो स्वतः.गरिबीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य बाळगतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरु करतो.आमच्या सरकारने, मग ते केंद्रातले असो किंवा इथले झारखंड मधले असो, गरिबांचे जीवन सुकर करण्याचे, आदिवासी समाजाचे जीवन सुकर करण्याचे, त्यांची चिंता दूर करण्याचे प्रामणिक प्रयत्न सरकारने केले आहेत.
एक काळ होता जेव्हा गरिबांच्या मुलांचे लसीकरण राहून जायचे आणि मोठेपणी त्यांना गंभीर आजाराला बळी पडावे लागत असे. इंद्रधनुष्य अभियान सुरु करून दुर्गम भागातल्या बालकांचेही लसीकरण होईल याकडे आम्ही लक्ष पुरवले.
एक काळ होता जेव्हा गरिबांना बँकेत खाते उघडणेही कठीण होते.आम्ही जन धन योजना आणून देशातल्या 37 कोटी गरिबांची बँकेत खाती उघडली.
एक काळ होता, गरिबांना स्वस्त सरकारी घरे मिळणे कठीण होते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून, गरिबांसाठी 2 कोटी पेक्षा जास्त घरे आम्ही उभारली. आता 2 कोटी आणखी घरांचे काम सुरु आहे.
मित्रहो, एक काळ होता, गरिबांकडे स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती. 10 कोटी पेक्षा जास्त स्वच्छतागृहे निर्माण करून, गरीब माता-भगिनींच्या जीवनातले मोठे कष्ट आम्ही दूर केले.
एक काळ होता, जेव्हा गरीब माता-भगिनींचे जीवन स्वयंपाकघराच्या धुरात गुदमरत होते. 8 कोटी गॅस कनेक्शन मोफत देऊन आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली, त्यांचे जीवन सुकर केले.
बंधू-भगिनीनो, गरिबांची प्रतिष्ठा, त्यांचे आरोग्य, त्यांचे उपचार, औषधोपचार, विमा सुरक्षा, त्यांची पेन्शन, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांची कमाई असे कोणतेही क्षेत्र नाही जे लक्षात घेऊन सरकारने काम केले नाही. अशा प्रकारच्या योजना गरिबांना सशक्त तर करतातच, जीवनात नवा आत्मविश्वासही आणतात आणि जेव्हा आत्मविश्वासाची गोष्ट येते तेव्हा आपल्या आदिवासी समाजाच्या मुलांची चर्चा स्वाभाविक आहे.आज आदिवासी मुले, आदिवासी युवा, आदिवासी मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या कौशल्याला पैलू पाडणाऱ्या मोठ्या प्रकल्पाची सुरवात झाली आहे. देशभरात 462 एकलव्य आदर्श निवासी शाळा उभारण्याच्या अभियानाला आज झारखंडच्या या धरतीवरून, भगवान बिरसा मुंडा यांच्या भूमीवरून प्रारंभ झाला. ज्याचा सर्वात मोठा लाभ झारखंडच्या माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना विशेष रूपाने होणार आहे. या एकलव्य शाळा आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेतच त्याच बरोबर क्रीडा, जे इथल्या मुलांचे सामर्थ्य आहे, कौशल्य विकास, हुनर हाट अंतर्गत सामर्थ्य देणे, स्थानीय कला आणि संस्कृती यांचे संवर्धन यासाठीही सुविधा असतील. या शाळेत सरकार, आपणाला ऐकून आश्चर्य वाटेल,सरकार प्रत्येक आदिवासी मुलावर दर वर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करेल. या शाळातून शिक्षण घेऊन जे बाहेर येतील ते येत्या काळात नव भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका बजावतील.
मित्रहो, दळणवळणाच्या दुसऱ्या माध्यमांवरही झारखंड मधे वेगाने काम होत आहे. ज्या भागात संध्याकाळ नंतर बाहेर पडणे कठीण होते तिथे आता रस्ते निर्माण होत आहेत आणि रस्त्यावर वर्दळही दिसून येत आहे. केवळ महामार्गासाठी नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे प्रकल्प झारखंडसाठी मंजूर करण्यात आले आहेत, ज्यातले अनेक पूर्णही झाले आहेत. येत्या काळात, भारतमाला योजनेअंतर्गत,राष्ट्रीय महामार्गाचा आणखी विस्तार केला जाईल.रस्ते, महामार्ग, जलमार्ग याशिवाय रेल्वे आणि हवाईमार्ग दळणवळणही मजबूत करण्याचे काम सुरु आहे.
गेल्या पाच वर्षात विकासाची जितकी कामे झाली त्यामागे रघुवर दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मेहनत, परिश्रम आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद आहेत.पूर्वी ज्या प्रकारे घोटाळे होत असत, शासनात पारदर्शकतेचा अभाव असे, ती परिस्थिती बदलण्याचा पूर्ण प्रयत्न झारखंडच्या रघुवर दास सरकारने केला आहे.
बंधू-भगिनीनो, हे घडत असताना आपणा झारखंडच्या जनतेवरही एक जबाबदारी मी देत आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची देशात कालपासूनच सुरवात झाली आहे. या अभियाना अंतर्गत आपली घरे,शाळा, कार्यालयात स्वच्छता करायची आहेच, गावातल्या मोहल्ल्यात सफाई करायची आहेच त्याच बरोबर एक विशेष काम आहे ते म्हणजे एकदाच वापरात येणारे प्लास्टिक आपल्याला गोळा करायचे आहे. जे प्लास्टिक एकदाच वापरात येते आणि नंतर निरुपयोगी ठरते, असे प्लास्टिक समस्या निर्माण करते, हे प्लास्टिक एका जागी जमा करून या प्लास्टिक पासून मुक्त व्हायचे आहे.
2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी आपल्याला हा प्लास्टिकचा ढीग हटवायचा आहे. हे प्लास्टिक गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यात येईल. हे प्लास्टिक गोळा करण्यासाठी सरकारचे सर्व विभाग एकत्र काम करत आहेत.निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमी झारखंडच्या लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी या अभियानात सहभागी व्हावे, देशाला एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी आपण नेतृत्व करा, माझ्या समवेत सहभागी व्हा.
मित्रहो, आता नव्या झारखंडसाठी, नव भारतासाठी, आपणा सर्वाना एकत्र काम करायचे आहे, आगेकूच करायची आहे, सगळ्यांनी मिळून देशाला प्रगतीच्या शिखरावर न्यायचे आहे. येत्या पाच वर्षासाठी, झारखंड पुन्हा, विकासाचे डबल इंजिन लावेल या विश्वासासह भाषणाचा समारोप करतो.
आज मिळालेल्या अनेक भेटीसाठी झारखंड आणि देशवासियांना अनेक शुभेच्छा, सर्वाना धन्यवाद. दोन्ही मुठी बंद करून,दोन्ही हात उंचावून, जोशाने म्हणा, भारत माता की – जय, झारखंडच्या प्रत्येक गावापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे…
भारत माता की – जय,
भारत माता की – जय
भारत माता की – जय
खूप-खूप धन्यवाद.