गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री श्री. विजय रुपाणी जी, केंद्र आणि राज्य सरकारमधले इतर सहयोगी, नायजेरिया, इंडोनेशिया आणि माली सरकारचे प्रतिनिधी, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेले अभियान प्रमुख, देशभरातून इथं आलेले हजारो स्वच्छाग्रही, माझे सर्व सरपंच मित्र, बंधू आणि भगिनींनो!
आज आपल्या भाषणाला प्रारंभ करण्याआधी साबरमतीच्या या किना-यावर इथं उपस्थित असलेल्या सर्व सरंपंचांच्या माध्यमातून मी देशातल्या सर्व सरपंचांना, नगर पालिका, महानगर पालिकांच्या सर्व सदस्यांना बंधूगण, भगिनीगण अशा सर्वांना, तुम्ही गेले पाच वर्षे सातत्याने, अविरत जो पुरुषार्थ दाखवला आहे, ज्या समर्पण भावनेने परिश्रम केले आहेत, पूज्य बापूजींचे स्वप्न साकार करण्यासाठी जो त्याग केला आहे, त्याबद्दल सर्वात आधी आदरपूर्वक वंदन करू इच्छितो.
या पवित्र साबरमतीच्या किना-यावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि साधेपणा, सदाचाराचे प्रतीक असणारे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांना मी वंदन करतो. त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो.
मित्रांनो, पूज्य बापूजींच्या 150व्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. स्वच्छ भारत अभियानाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. आणि सध्या शक्तीचे पर्व म्हणजेच नवरात्रही सुरू आहे. सगळीकडे गरब्याचा आवाज घुमतोय. असा अद्भूत योगायोग फार क्वचितच जुळून येत असतो. आज या इथं देशभरातून आमचे सरपंच बंधू-भगिनी आले आहेत. तुम्हा लोकांना इथला गरबा पाहण्याची संधी मिळाली की नाही मिळाली? गरबा पाहण्यासाठी गेला होता का?
बापूजींच्या जयंतीचा उत्सव तर संपूर्ण विश्वभरात साजरा केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राने एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करून या विशेष वर्षाच्या स्मृती कायम ठेवल्या. आणि आज इथंही टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले तसेच नाणे काढण्यात आले आहे. मी आज बापूजींच्या या भूमीतून, त्यांच्या या प्रेरणास्थानावरून, संकल्प स्थानावरून संपूर्ण विश्वाला सदिच्छा देतोय, शुभेच्छा देतोय.
बंधू आणि भगिनींनो, या इथं येण्याआधी मी साबरमती आश्रमात गेलो होतो. आजवरच्या आयुष्यात तिथं जाण्याची मला अनेकदा संधी मिळाली आहे. प्रत्येकवेळी मला तिथं पूज्य बापूजींच्या आपण सानिध्यामध्ये आहोत, असं वाटतं. परंतु आज मला तिथूनच एक नवीन ऊर्जाही मिळाली. साबरमती आश्रमामध्येच त्यांनी स्वच्छाग्रह आणि सत्याग्रह यांना व्यापक स्वरूप दिले होते. या साबरमतीच्या किना-यावरच महात्मा गांधीजी यांनी सत्याचे प्रयोग केले होते.
बंधू आणि भगिनींनो, आज साबरमतीचे हे प्रेरणास्थान स्वच्छाग्रहाच्या एका मोठ्या संकल्पाच्या यशस्वीतेचे साक्षीदार बनत आहे. हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि गौरवाचा दिवस आहे. साबरमती रिव्हर फ्रंट म्हणजेच साबरमती नदी किनारी या कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे माझ्यासाठी तर दुहेरी आनंदाचा विषय आहे.
मित्रांनो, आज ग्रामीण भारतातल्या सर्व लोकांनी स्वतःला उघड्यावर शौच करण्याच्या प्रथेतून मुक्त घोषित केलं आहे. स्वेच्छेने, स्व-प्रेरणेने आणि जन-भागीदारीतून सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची ही शक्ती आहे आणि यशस्वीतेचे स्त्रोतही आहे. प्रत्येक देशवासियाला, विशेषतः गावांमध्ये वास्तव्य करणा-या आमच्या सरपंचांना, सर्व स्वच्छाग्रहींना आज मी अगदी हृदयपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. आज ज्या ज्या स्वच्छाग्रहींना इथं स्वच्छ भारत पुरस्कार मिळाले आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो, आज खरोखरीच मला इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं जाणवत आहे. ज्या पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी बापूजींच्या आवाहनावरून लाखो भारतवासी सत्याग्रहाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी घराबाहेर पडले, त्याचप्रमाणे स्वच्छाग्रहासाठीही करोडो देशवासियांनी मोकळ्या मनाने आपणहून पुढं येवून सहकार्य केलं. पाच वर्षांपूर्वी स्वच्छ भारत बनवण्यासाठी ज्यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासियांना मी आवाहन केलं होतं, त्यावेळी माझ्याकडे फक्त आणि फक्त जन-विश्वास होता आणि जोडीला बापूजींचा अमर संदेश होता. बापू म्हणत होते की, दुनियेमध्ये आपल्या जर काही बदल घडवून यावा असे वाटत असेल तर जो बदल हवा आहे तो आधी स्वतःमध्ये आणला पाहिजे.
या मंत्राचा जप करीत आपण सर्वांनी हातामध्ये झाडू घेतला आणि वाटचाल सुरू केली. कोणत्याही वयाची व्यक्ती असू दे, कोणत्याही सामाजिक आणि आर्थिक स्थितीमधली व्यक्ती असो, स्वच्छता, गरिमा आणि सन्मान यांच्या या यज्ञामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले आहे.
कुणा मुलीने विवाहासाठी शौचालयाची अट ठेवली तर कुठे शौचालयाला ‘इज्जतघर’ असा दर्जा दिला. ज्या शौचालयाविषयी बोलणं संकोच वाटणारं होतं, त्याच शौचालयाविषयी विचार करणं सर्वांना महत्वाचं वाटतं. बॉलीवूडपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत स्वच्छतेच्या या अभियानानं विस्तृत स्वरूप घेतलं आणि त्याच्याशी सगळेजण जोडले गेले. प्रत्येकाला या अभियानानं प्रेरित आणि प्रोत्साहित केलं.
मित्रांनो, आपण जे यश मिळवलं आहे, ते पाहून संपूर्ण दुनिया आश्चर्यचकित झाली आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला पुरस्कार दिले जात आहेत, आपल्या देशाचा सन्मान करीत आहेत. 60 महिन्यात 60 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 11 कोटींपेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती करण्यात आली. ही आकडेवारी ऐकून विश्वाला आश्चर्य वाटतंय. परंतु माझ्यासाठी कोणतेही आकडे किंवा कोणी केलेली प्रशंसा महत्वाची नाही तर ज्यावेळी आपल्या कन्या कोणत्याही चिंतेविना, काळजीमुक्ततेनं शाळेत जाताना मी पाहतो, त्यावेळी मला सर्वात जास्त आनंद होतो.
करोडो माता-भगिनींना आता असह्य पीडेतून मुक्त झाल्या आहेत. शौचाला जाण्यासाठी त्यांना अंधार कधी पडतोय, याची वाट पहावी लागत होती, त्या वाट पाहण्यातून त्यांची मुक्तता झाली आहे, याचा मला आनंद होतो. लाखो निष्पाप जीवांचे प्राण त्यांना होणा-या भीषण आजारातून आता वाचू शकतात. याचा मला जास्त आनंद आहे. स्वच्छता होत असल्यामुळे गरीबांचा औषधोपचारावर होणारा खर्च आता खूप कमी झाला आहे, याचा मला आनंद आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागामध्ये, आदिवासी क्षेत्रांमध्ये लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या आहेत, याचा मला आनंद आहे. आपल्याकडे आधी राजमिस्त्री हा शब्द प्रचलित होता, आता आमच्या भगिनीही या क्षेत्रात काम करू लागल्या आहेत, त्यामुळे राणीमिस्त्री हा शब्द वापरला जावू लागला आहे.
बंधू आणि भगिनींनो, स्वच्छ भारत अभियान हे जीवनरक्षक असल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे जीवनस्तर उंचावत आहे. युनिसेफच्या एका पाहणीतल्या अंदाजानुसार भारतामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये स्वच्छ भारत झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर 20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त सकारात्मक प्रभाव पडला आहे. यामुळे 75 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती भारतामध्ये झाली आहे. या संधी गावांमधल्या बंधू-भगिनींना मिळाल्या आहेत.
इतकंच नाही तर मुलांचा शैक्षणिक स्तर, आमची उत्पादन क्षमता, उद्योजकता यांच्यावरही सकारात्मक प्रभाव पडला आहे. यामुळे देशातल्या कन्या, भगिनी यांना सुरक्षित वातावरण मिळाले आहे आणि त्यांच्या सशक्तिकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. आपल्या सर्वांचे आदर्श महात्मा गांधी यांचीही असेच घडावे, अशी इच्छा होती. महात्मा गांधीजींच्या कल्पनेतल्या स्वराज्याचे हेच मूळ होते. यासाठीच तर त्यांनी आपलं सर्व जीवन समर्पित केलं होतं.
मित्रांनो, आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की – आपण जे काही मिळवलं, कमावलं आहे, ते पुरेसं आहे का? या प्रश्नाचं उत्तर अगदी साधे आणि स्पष्ट आहे. आज आपण जे काही मिळवले आहे, तो फक्त एक टप्पा आहे. केवळ एक टप्पा आहे. स्वच्छ भारतासाठी आपल्या कार्यरूपी प्रवास निरंतर सुरू राहणार आहे.
आत्ता कुठे आम्ही शौचालयांची निर्मिती केली आहे. शौचालयाच्या नित्य वापराची सवय लागावी, यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले आहे. आता आमच्या देशातला एका मोठ्या वर्गाच्या व्यवहारामध्ये आलेले परिवर्तन कायम स्वरूपात टिकून राहिले पाहिजे. बनवण्यात आलेल्या शौचालयांचा योग्य प्रकारे वापर केला जावा, यासाठी सरकार असो अथवा स्थानिक प्रशासन तसे ग्राम पंचायती असो, सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. ज्या लोकांपर्यंत अद्याप ही सुविधा पोहोचली नाही, त्यांना ही सुविधा मिळेल, असे काम करण्याची गरज आहे.
बंधू आणि भगिनींनो, सरकारने अलिकडेच जल-जीवन मोहीम सुरू केली आहे. त्याचाही लाभ आता घेता येणार आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या गावांमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये ‘वॅाटर रिचार्ज’ म्हणजेच जन पुनर्भरण करण्यासाठी, वॉटर रिसायकलिंग म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. जर आपण हे काम चांगले करू शकलो तर शौचालयाच्या नियमित आणि स्थायी वापरासाठी खूप मोठी मदत मिळू शकणार आहे. सरकारने जल-जीवन मोहिमेसाठी साडे तीन लाख कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु देशवासियांच्या सक्रिय सहभागाशिवाय असे कोणतेही विराट कार्य पूर्ण करणे अवघड आहे.
मित्रांनो, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि जीव सुरक्षा हे तीन विषय महात्मा गांधी यांना खूप प्रिय होते. प्लास्टिकचा या तिनही गोष्टींसाठी खूप मोठा धोका आहे. त्यामुळे वर्ष 2022 पर्यंत संपूर्ण देशाला एकदा वापरण्यात येवू शकणा-या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचं लक्ष्य आपल्याला साध्य करायचं आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मानून त्याव्दारे संपूर्ण देशामध्ये या अभियानाला खूप चांगली गती मिळाली आहे. या काळात 20 हजार टन प्लास्टिकचा कचरा एकत्रित करण्यात आला असल्याची माहिती मला देण्यात आली. विशेष म्हणजे आता प्लास्टिकच्या कॅरी बॅगच्या वापराची आकडेवारी झपाट्याने कमी होत आहे, हेही या काळात दिसून आले आहे.
देशभरातल्या कोट्यवधी लोकांनी एकल वापराची प्लास्टिक वापरणे बंद करण्याचा संकल्प केला आहे, असं मला समजलं आहे. याचा अर्थ, एकदा वापरून आपण जे प्लास्टिक फेकून देतो, त्या प्लास्टिकपासून देशाला आपण मुक्त करायचं आहे. यामुळे आपल्या पर्यावरणाचं भलं होणार आहे. आपल्या शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी तुंबण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. सांडपाणी वाहून जाण्याची क्षमता या प्लास्टिक पिशव्यांच्या कच-यांमुळे कमी झाली आहे. यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांवर उत्तर म्हणून एकल वापराचे प्लास्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज आहे. यामुळे आपले पशुधन आणि समुद्री जीवन यांचेही संरक्षण होणार आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपल्या या आंदोलनाचे मूळ आहे ते म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये येणारे परिवर्तन आहे, असं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. असे परिवर्तन नेहमीच स्वतःपासून आले पाहिजे तसेच ते संवेदनेतून येत असते. हीच शिकवण महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जीवनातून आपल्याला मिळते.
देशामध्ये ज्यावेळी गंभीर खाद्यान्न संकट निर्माण झाले होते, त्यावेळी शास्त्रीजींनी देशवासियांना आपल्या भोजनाच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन केले होते. आणि त्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून केली होती. स्वच्छतेच्या या प्रवासामध्ये आमच्यासाठी हाच एक मार्ग आहे. त्यावरून वाटचाल करूनच आपल्याला यशोशिखर गाठायचे आहे.
बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण विश्व आपल्या स्वच्छ भारत मोहिमेला आदर्श मानून त्याचे अनुकरण करू इच्छित आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेमध्ये ज्यावेळी ‘ग्लोबल गोल कीपर’ पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी भारताच्या यशाची माहिती संपूर्ण विश्वाला झाली.
संयुक्त राष्ट्रामध्ये बोलताना मी सांगितलंही की, भारत आपल्या अनुभवाचा लाभ इतर देशांना देण्यास नेहमीच तयार आहे. आज नायजेरिया, इंडोनेशिया आणि माली सरकारचे प्रतिनिधी आपल्यामध्ये आहेत. त्यांच्याबरोबर स्वच्छतेविषयी सहकार्य करताना नक्कीच आनंद वाटेल.
मित्रांनो, महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह, स्वावलंबन या विचारांनी देशाला मार्ग दाखवला. आज आम्ही त्याच मार्गावरून जात आहोत. स्वच्छ, स्वस्थ, समृद्ध आणि सशक्त नवभारताच्या निर्माणाचे काम करीत आहोत. पूज्य बापू स्वच्छतेला सर्वोपरी मानत होते. निष्ठावान साधकाप्रमाणे देशाचा ग्रामीण भाग आज त्यांना स्वच्छ भारताची कार्यांजली देत आहे. गांधीजी आरोग्याला खरी धनसंपत्ती मानत होते. देशातला प्रत्येक नागरिक स्वस्थ असावा, अशी त्यांची इच्छा होती. आम्ही योग दिवस, आयुष्मान भारत, फिट इंडिया चळवळ यांच्या माध्यमातून देशाच्या व्यवहारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आाहेत. गांधीजी वसुधैव कुटुम्बकम यावर विश्वास ठेवत होते.
आता भारत आपल्या नवीन योजना आणि पर्यावरण यांच्याविषयी कटिबद्धता बाळगून त्याव्दारे विश्वापुढे असलेल्या अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करीत आहे. भारत आत्मनिर्भर व्हावा, आत्मविश्वासाने देशाने वाटचाल करावी असे बापूजींचे स्वप्न होते. आज आम्ही मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया यांच्या मदतीने बापूंजींचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहोत.
देशातले प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावे, असा आपला भारत निर्माण व्हावा, असा गांधीजींचा संकल्प होता. आम्ही राष्ट्रीय ग्राम स्वराजच्या माध्यमातून या संकल्पाला सिद्धीच्या दिशेने घेवून जात आहोत.
समाजातल्या सर्वात शेवटच्या, तळातल्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या निर्णयाचा लाभ व्हावा, असं गांधीजी म्हणत होते. आम्ही आज उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री घरकूल योजना, जन-धन योजना, सौभाग्य योजना, स्वच्छ भारत यासारख्या योजना राबवताना गांधींजीच्या विकास मंत्रालाच व्यवस्थेचा भाग बनवलं आहे.
पूज्य बापूजींनी तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांच्या जीवन अधिक सुकर कसे बनवता येईल, यासाठी करावा, असे विचार व्यक्त केले होते. आम्ही आधार, थेट लाभ हस्तांतरण, डिजिटल भारत, भीम अॅप, डिजी लॉकर यांच्या माध्यमातून देशवासियांचे जीवन अधिकाधिक सुकर, सोपे बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मित्रांनो, महात्मा गांधी म्हणत होते की, संपूर्ण विश्वाने भारताचा लाभ घ्यावा, यासाठी भारताचे उत्थान झाले पाहिजे. गांधीजींचे स्पष्ट म्हणणे होते की, राष्ट्रवादी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीयवादी होता येत नाही. म्हणजेच आपल्याला आधी आपले प्रश्न, समस्या यांच्यावर स्वतःलाच उत्तरे शोधली पाहिजेत. आणि मगच आपण संपूर्ण विश्वाची मदत करू शकणार आहोत. या राष्ट्रवादाच्या भावनेचा विचार करून आपला भारत पुढची मार्गक्रमणा करीत आहे.
बापूंजींच्या स्वप्नातला भारत- नवीन भारत बनत आहे. बापूजींच्या स्वप्नातला भारत हा स्वच्छ असेल आणि पर्यावरण सुरक्षित असेल.
बापूजींच्या स्वप्नातल्या भारतामधली प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, फिट असेल. बापूजींच्या स्वप्नातल्या भारतामध्ये प्रत्येक माता, प्रत्येक अपत्य पोषित, सुदृढ असेल.
बापूजींच्या स्वप्नातल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाच्या मनात सुरक्षिततेची भावना असेल. बापूजींच्या स्वप्नातला भारत भेदभावमुक्त आणि सद्भावयुक्त असेल.
बापूजींच्या स्वप्नातला भारत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या आदर्शांनुसार चालणारा असेल. बापूजींच्या राष्ट्रवादाची ही सर्व तत्वे दुनियेच्या दृष्टीने आदर्श सिद्ध होतील. सर्वांचे प्रेरणास्त्रोत बनतील.
चला तर मग, राष्ट्रपित्याच्या या मूल्यांच्या प्रतिस्थापनेसाठी, मानवतेच्या भल्यासाठी प्रत्येक भारतवासियाने राष्ट्रवादाच्या प्रत्येक संकल्पाच्या सिद्धीसाठी निर्धार करावा.
आज देशातल्या प्रत्येक व्यक्तीने एक संकल्प करण्याचा मी आज आग्रह करतो. प्रत्येकाने देशासाठी कोणताही एक संकल्प करावा. हा संकल्प देशासाठी कामी येईल. देशासाठी, समाजासाठी, गरीबांच्या भल्यासाठी असा संकल्प सर्वांनी करावा. आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, आपल्या कर्तव्यांविषयी विचार करावा, राष्ट्राविषयी आपली जबाबदारी याचा विचार अवश्य करावा.
कर्तव्याच्या पथावरून जाताना 130 कोटी प्रयत्न, 130 कोटी संकल्प यांच्यामुळे देशाला किती मोठी ताकद मिळेल आणि असा ताकदवान देश काहीही आणि कितीतरी करू शकणार आहे. संकल्पाला आज सुरूवात करून आगामी एक वर्षात आपण या दिशेने निरंतर काम करायचे आहे. एक वर्षभर काम केले तर आपल्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळू शकणार आहे. आपली ही जीवनशैली बनून जाईल. हीच एक कृतज्ञ राष्ट्राने बापूजीना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
हा आग्रह आणि या शब्दांच्याबरोबरच मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. आत्तापर्यंत सगळे यश मिळाले आहे, ते कोणा सरकारचे यश नाही.
हे यश मिळाले आहे, ते कोणा पंतप्रधानाचे नाही. हे यश मिळाले आहे, ते कोणा मुख्यमंत्र्याचे नाही.
हे यश मिळाले आहे ते 130 कोटी नागरिकांच्या पुरुषार्थामुळे मिळालं आहे. समाजातल्या वरिष्ठ लोकांनी वेळोवेळी जे नेतृत्व केलं, जे मार्गदर्शन केलं, त्यामुळे मिळालं आहे. गेल्या पाच वर्षात सर्व प्रसार माध्यमांनी या गोष्टीला सातत्याने प्रसिद्धी देवून अभियानाला सकारात्मक मदत केली आहे. देशामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसार माध्यमांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
ज्या ज्या लोकांनी स्वच्छतेचे काम पुढे नेले आहे, या कामामध्ये जे लोक सक्रिय राहिले आहेत, त्या सर्वांना मी आदरपूर्वक वंदन करतो. त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच मी त्यांचे आभारही व्यक्त करतो.
या शब्दांबरोबरच मी आजचा संवाद समाप्त करतो. आपण सर्वजण माझ्याबरोबर उच्चरवाने म्हणा —
मी ‘महात्मा गांधी ’ असं म्हणणार आहे. तुम्ही लोकांनी आपले दोन्ही हात वर करून म्हणायचं आहे– ‘ अमर रहे, अमर रहे !’
महात्मा गांधी – अमर रहे !
महात्मा गांधी – अमर रहे !
महात्मा गांधी – अमर रहे !
पुन्हा एकदा संपूर्ण राष्ट्रानं जो एका खूप मोठा संकल्प सिद्धीस नेला आहे, त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्याबरोबर सर्वांनी उच्चरवात म्हणा –
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
खूप- खूप धन्यवाद!!