अनेक वर्षे तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होतात, आज तो पूल बांधून तयार झाला आहे, लोकार्पण झाले आहे. मी तुम्हा सर्वाना विनंती करतो की या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही तुमचा मोबाईल फोन बाहेर काढा, आपल्या मोबाईल फोनचा लाईट फ्लॅश करा आणि सर्वांना दाखवून द्या की किती मोठा उत्सव तुम्ही सर्वजण साजरा करत आहात, प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा फ्लॅश चालू करा. शाबास. प्रत्येक जण. सगळीकडून, प्रत्येकाने. असे वाटायला हवे की खूप मोठा उत्सव आपण साजरा करत आहोत. प्रत्येकाच्या मोबाईलचा दिवा दिसायला हवा. हो, तिथे मागेही होत आहे. वा. बघा कसा उत्सव साजरा केला जात आहे. हे सगळे छायाचित्रकार देखील तुम्हालाच टिपत आहेत. तुमचे खूप-खूप आभार. बंधू-भगिनींनो, हे माझे सौभाग्य आहे की मला आज अशा ठिकाणी यायची संधी मिळाली, जे कधी काळी कुंडिलनगर म्हणून ओळखले जायचे आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण इथे येऊन गेले आहेत. माझा जन्म गुजरातमध्ये झाला, जिथे द्वारका आहे, आणि श्री भगवान कृष्णाचे नातं कुंडिलनगरशी आहे आणि आज हे माझे सौभाग्य आहे की या पुरातन वास्तूत येऊन, गेली पाच दशके तुम्ही सर्व ज्याची प्रतीक्षा करत होतात, तो पूल आज तुम्हाला मिळत आहे. जर अटल बिहारी वाजपेयीजी यांचे सरकार 2004 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले असते, तर हा पूल तुम्हाला दहा वर्षांपूर्वीच मिळाला असता 29 मे 2003, त्यावेळचे आमचे आमदार जगदीश भोयन यांनी पत्र लिहून या पुलासाठी आग्रह धरला होता. आणि अटलजींच्या सरकारने याची व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरु केले. गंभीरपणे हे काम सुरु झाले. जर त्यानंतर लगेच हे काम सुरु झाले असते, तर दहा वर्षांपूर्वी तुम्हाला हा पूल मिळाला असता. मात्र मध्येच सरकार बदलले, अडथळे आले, होतं, चालतं, असेच चालू राहिले आणि परिणामस्वरूप तुमचे स्वप्न अर्धवट राहिले. मात्र गेल्या तीन वर्षात अटलजींनी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. आणि आज आसाममध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सर्बानंदजींच्या नेतृत्वाखाली आसाम अनेक समस्यांपासून मुक्त होत आहे. अशा वेळी हा पूल तुम्हाला समर्पित करताना हा केवळ आसामच्या जनतेसाठी अभिमानाचा विषय नाही, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय आहे, की भारतातील सर्वात लांब पूल आज आसामच्या दुसऱ्या टोकाला तयार झाला आहे.
एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जर विकासाला स्थायी स्वरूप द्यायचे आहे, शाश्वत विकासाला गती द्यायची असेल, तर पायाभूत विकास ही पहिली गरज आहे. प्रत्यक्ष पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा या दोन मार्गांवर संतुलित विकास शक्य होतो. जर आपण पायाभूत विकासाचे महत्व समजून घेतले नाही, तर तुटपुंज्या प्रयत्नांचे परिणाम खूपच अल्पकालीन असतात, अशाश्वत असतात आणि म्हणूनच आमच्या सरकारचा हा नियमित प्रयत्न आहे की विकासाला शाश्वत स्वरूप देणे, यंत्रणा विकसित करणे आणि ज्यामुळे जी स्वप्ने पाहून देशाला पुढे न्यायचे आहे, ती स्वप्ने आपण योग्य प्रकारे पूर्ण करू शकू. अरुणाचल प्रदेश आणि आसामला हा पूल जोडत आहे, जवळ आणत आहे165 किलोमीटरचे अंतर कमी होणे, माणसाच्या आयुष्यातील मौल्यवान 6-7 तासांची बचत होणे आणि एकदा का अशी व्यवस्था उभी राहिली की आर्थिक विकासाची नवी दारे खुली होतात.
आता आपला सदिया, तेथील आलं, तेथील शेतकरी जे आल्याचे पीक घेतात, उत्तम दर्जाचे आलं तिथे पिकते संपूर्ण प्रदेशात, आता हा पूल बनल्यानंतर एका खूप मोठ्या बाजारपेठेचा नवीन मार्ग या शेतकऱ्यांसाठी खुला होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. आणि मला विश्वास वाटतो की ईशान्येतील सदिया सारखा भाग जिथले आलं उत्तम प्रतीचं आलं मानले जाते. जर येथील शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले, तर येथील आल्यासाठी जागतिक बाजारपेठ उभी राहू शकते. जगभरात त्याची एक खूप मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच या पुलामुळे केवळ पैसे वाचतील, वेळ वाचेल असे नाही मात्र हा पूल एका नवीन अर्थक्रांतीचे अधिष्ठान घेऊन आला आहे. एका नवीन आर्थिक क्रांतीचा पाया रचला जाणार आहे, आणि म्हणूनच आज या पुलाचे लोकार्पण, संपूर्ण भारतातील लोकांचे याकडे लक्ष लागले आहे की भारतात एवढा मोठा पूल बांधला जाऊ शकतो, कोणत्याही भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. बंधू-भगिनींनो, दोन राज्यांच्या विकासात हा पूल साखळी बनत आहे.
अरुणाचलचा विकास, आसामचा विकास आणि एक प्रकारे आपले जे स्वप्न आहे की भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी, सर्वात मोठी शक्ती प्राप्त करण्याची जर कोणती जागा असेल, शक्यता असेल तर तो भारताचा पूर्वेकडील भाग आहे. ईशान्य भारत आहे. पूर्व भारत आहे, ईशान्य देखील आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या विकासाच्या ज्या योजना लागू केल्या आहेत, त्या सर्वांमध्ये पूर्व भारतावर भर देणे, ईशान्येत व्यवस्था निर्माण करणे, ईशान्य भारतात ती ताकद आहे, त्यांना थोड्या जरी व्यवस्था मिळाल्या तर ते खूप मोठा चमत्कार करू शकतात. आणि म्हणूनच आम्ही नेहमी या गोष्टीवर भर दिला आहे की विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी हा प्रयत्न करायला हवा.
या पुलामुळे दररोज केवळ डिझेलच्या बचतीद्वारे या भागातील नागरिकांचे दररोज दहा लाख रुपये वाचणार आहेत वेळ तर मौल्यवान आहेच, मात्र डिझेलच्या बचतीमुळे देखील दररोज 10 लाख रुपयांची बचत सामान्य नागरिकांच्या खिशातील पैसे वाचवणार आहे. यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात ... याआधी आपण फेरी बोटीने जात होतो, जर हवामान ठीक नसेल तर फेरी बोट सेवा बंद व्हायची. ब्रह्मपुत्रेने रौद्र रूप धारण केले तर फेरी बोट सेवा बंद व्हायची. आता या पुलामुळे 24/7, 365 दिवस आपल्यासाठी सोय झाली आहे. आणि म्हणूनच नैसर्गिक प्रकोपामुळे आपल्या वेगात अडथळे येणार नाहीत.हे काम यामुळे झाले आहे. आणि यामुळे जसे नितीनजी सांगत होते, की देशात आम्ही लोकांनी रस्त्यांचे महत्व, पुलाचे महत्व, रेल्वेचे महत्व, विमान प्रवासाचे महत्व, आणि आता त्याचबरोबर जलमार्गांवर देखील भर देण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत. खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे की जिथे जिथे नदी आहे, पाणी आहे, त्या दिशेने आपली वाहतूक व्यवस्था का वळवू नये. पर्यावरण-स्नेही असेल, आर्थिक दृष्ट्या कमी खर्चाचे असेल आणि जो वेळ वाया जातो, त्यात देखील बचत होईल. ते काम देखील याच ब्रह्मपुत्रेच्या या टोकाकडून अतिशय वेगाने पुढे नेण्याच्या दिशेने हजारो कोटी रुपये खर्चून ते काम इथे होत आहे. आणि आगामी काळात जल वाहतुकीचे नवे क्षेत्र इथूनच सुरु होणार आहे. तेव्हा तुम्ही कल्पना करू शकाल. हा संपूर्ण प्रदेश विकासाची नवी शिखरे पार करेल, याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अंदाज बांधू शकता. .
बंधू-भगिनींनो,
हा खर्च जेव्हा आम्ही करत आहोत, तेव्हा संपूर्ण ईशान्य भागाच्या विकासासाठी देखील, मग तो विजेचा पायाभूत विकास असेल, ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा पायाभूत विकास असेल, रस्त्यांचा विकास असेल, रेल्वेचा पायाभूत विकास असेल, संपूर्ण ईशान्य प्रांताला भारताच्या काना -कोपऱ्याशी जोडणे असेल, भारताच्या काना -कोपऱ्यातील लोकांना या ईशान्य भारताशी जोडणे, या दिशेने आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. जे काम 15-15, 20-20 वर्षांमध्ये होत नाही,.जो पैसा 15-15, 20-20 वर्षांमध्ये खर्च केला जात नाही, आमचे सरकार आल्यावर ईशान्य भारताच्या पायाभूत विकास आणि अन्य विकास कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याच्या दिशेने आम्ही भर दिला आहे.
ऍक्ट ईस्ट धोरणांतर्गत आपण जर या क्षेत्राला एक जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा या स्वरूपात विकसित केले तर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया, तिच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून भारताचा हा प्रांत खूप मोठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. आणि म्हणूनच आम्ही त्या दृष्टिकोनातून संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया मध्ये भारत कशा प्रकारे जोडला जाईल, आर्थिक-व्यापारिक व्यवस्थांमध्ये आपला हा प्रांत मध्यवर्ती केंद्र बनावा, आर्थिक घडामोडींचे केंद्र कसे बनेल आणि यासाठी ज्या-ज्या व्यवस्थांचा विकास करावा लागेल, त्यावर आम्ही भर देत आहोत. आणि याचे परिणाम आगामी काळात तुम्हाला दिसून येतील.
बंधू-भगिनींनो,
स्वातंत्र्य मिळाल्याला 50 वर्षे उलटूनही ईशान्य भागात रेल्वेला जितके महत्व द्यायला हवे होते, त्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. जेणेकरून एक सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था आम्ही निर्माण करू शकू. पर्यटनासाठी देखील ईशान्य भारत एक खूप मोठे केंद्र बनू शकतो. येथील माता कामाख्याचे दर्शन घ्यायचे असेल किंवा कोहिमापर्यंत जायचे असेल तर हा असा सुंदर प्रदेश आहे ज्यापासून भारतातील अनेक लोक अजूनही अनभिज्ञ आहेत. जर देशातील लाखो लोकांनी दरवर्षी या प्रदेशात येणे सुरु केले तर येथील अर्थव्यवस्थेला किती मोठे बळ मिळू शकेल याचा आम्हाला पूर्ण अंदाज आहे आणि म्हणूनच या व्यवस्थांच्या विकासाच्या माध्यमातून भारतातील कानाकोपऱ्यातून आणि हळू-हळू जगभरातील लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित करण्यासाठी हा प्रदेश एका खूप मोठ्या नैसर्गिक संपत्तीचा भाग आहे आणि त्यावर भर देण्याच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत.
बंधू-भगिनींनो,
आज जेव्हा मी या महत्वपूर्ण पुलाचे लोकार्पण करत आहे, तर तुमच्याकडील लोक याला धौला, सदिया, दलांग नावाने ओळखतात. आज या निमित्ताने आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की या दलंगला आता आम्ही या प्रदेशाचे सुपुत्र, ज्यांच्या आवाजाने भारताला आजही प्रेरणा दिली आहे त्या भूपेन हजारिका यांचे नाव देण्याचे ठरवले आहे. या धरतीच्या सुपुत्राला ही आमची उत्तम श्रद्धांजली आहे. भावी पिढयांना प्रेरणा देणारे हे नाव, ते ब्रह्मपुत्रेचे सुपुत्र होते, ते ब्रह्मपुत्रेचे उपासक होते, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ब्रह्मपुत्रेचे गुणगान असायचे, आयुष्यभर ब्रह्मपुत्रेला देशात आणि जगभरात परिचित करण्याचे अद्भुत कार्य या महापुरुषाने केले होते. आज त्याच महापुरुषाच्या नावाने या पुलाला नाव देण्याचे आम्ही ठरवले आहे. मी पुन्हा एकदा श्रीयुत सर्बानंदजी यांना, त्यांच्या संपूर्ण टीमला आसामच्या एक वर्षाच्या सरकारला मनापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. मी समाधान व्यक्त करतो की या एका वर्षात कित्येक कठीण बाबींना त्यांनी स्पर्श केला आहे, हात लावला आहे आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्यांदाच सरकार बनले आहे, पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे , आणि १५ वर्षे आसामची ही अवस्था झाली होती, अशा परिस्थितीतून आसामला बाहेर काढण्यासाठी जी मेहनत हे सरकार घेत आहे. येथील मुख्यमंत्री आणि त्यांची टीम काम करत आहे, मी त्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो. आणि ज्या वेगाने, ज्या इच्छाशक्तीने एक वर्षात त्यांनी काम करून दाखवले आहे, 5 वर्षांमध्ये तर आसाम या सर्व अडचणीतून नक्कीच बाहेर येईल. असा मला विश्वास वाटतो. आणि भारत सरकार खांद्याला खांदा भिडवून 'ए फॉर आसाम' हे जे स्वप्न आपण पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी काम करेल. याच विश्वासासह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. भारत माता की जय.