मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
केम छो? आपणा सर्वांसाठी इतका मोठा मंडपही पुरेसा नाही, हे मला दिसते आहे. त्या तिथे अनेक लोक बाहेर उन्हात उभे आहेत. आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी येथे आलात, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आज सुमारे अकराशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण किंवा पायाभरणी करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली. आपण मला हा जो सन्मान दिला आहे, त्यासाठी सुद्धा सहकार चळवळीशी संबंधित माझ्या सर्व शेतकरी कुटुंबांना मी आदरपूर्वक वंदन करुन त्यांचे आभार मानतो.
आज जगातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये अमूल ब्रँडची एक स्वतंत्र ओळख आहे. काही देशांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. तेथील काही शिष्टमंडळे माझी भेट घेऊ इच्छित होती, भारतीय समुदायाचे तेथे राहणारे काही लोक माझी भेट घेऊ इच्छित होते. काही लोक तिथले स्थानिक होते आणि एक गोष्ट ते आवर्जून सांगत की आमच्याकडे अमूलच्या उत्पादनांच्या पुरवठ्याची काहीतरी सोय करा. हे ऐकून मला अतिशय अभिमान वाटत असे. शेतकऱ्यांच्या सहकार चळवळीतून, सुमारे सात दशकांच्या निरंतर प्रयत्नांनंतर आज देशात आणि देशाच्या बाहेर अमूलची एक स्वतंत्र ओळख आहे, अमूल ही एक प्रेरणा झाली आहे, अमूल ही एक अनिवार्य बाब झाली आहे. हे यश लहान नाही. ही फार मोठी कामगिरी आहे. केवळ उत्पादन घेणारा हा एखादा उद्योग नाही, हा केवळ दुग्ध प्रक्रिया करणारा व्यवसाय नाही, तर एका पर्यायी अर्थव्यवस्थेचा आदर्श सुद्धा आहे.
एकीकडे समाजवादी अर्थव्यवस्था तर दुसरीकडे भांडवलवादी अर्थव्यवस्था, एकीकडे शासनाच्या ताब्यात असणारी अर्थव्यवस्था तर दुसरीकडे धनाढ्य सावकारांच्या ताब्यात असणारी अर्थव्यवस्था.
जगाला अशा दोनच प्रकारच्या अर्थव्यवस्था ठाऊक होत्या. सरदार साहेबांसारख्या महापुरुषांनी बीजारोपण केले आणि त्यातून आजच्या तिसऱ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. जिचा ताबा सरकारकडे नसेल, धनाढ्य सावकारांकडे नसेल. ती सहकाराची चळवळ असेल आणि शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या, जनतेच्या सहकार्यातून अर्थव्यवस्था तयार होईल, वाढत जाईल
आणि प्रत्येक जण त्यात भागीदार असेल.
ही अशी एक अर्थव्यवस्था आहे, जी समाजवाद आणि भांडवलवादाला एक परिपूर्ण पर्याय प्रदान करते. आपणा सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या एका वर्षापूर्वी अमूलचे एक चांगले रुप तयार झाले होते. मात्र सहकार चळवळ त्या पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. फार कमी लोकांना माहिती असेल की जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात नव्हती, नगरपालिका होती, तेव्हा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी सरदार वल्लभभाई पटेल निवडून आले. ते नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. दरियापुर मधून त्यांनी निवडणूक जिंकली, जिथे कोणे एकेकाळी आमचे कौशिक भाई विजयी होत असत आणि सरदार साहेब नगरपालिकेमध्ये केवळ एका मताने, एका मताने निवडून आले आणि नंतर अध्यक्ष झाले.
गुजरात मध्ये पहिल्यांदाच शहर विकासाचा आराखडा असला पाहिजे, शहर विकासाचे नियोजन असले पाहिजे, अशी संकल्पना, सरदार साहेब अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना पहिल्यांदाच मांडली गेली आणि त्यावेळी त्यांनी सर्वात आधी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रयोग केला होता. सहकाराच्या आधारे गृहनिर्माणाचे काम केले. मध्यमवर्गीय कुटुंबांना घरे मिळावीत, यासाठी त्यांनी काम केले. त्या काळी प्रीतम राय देसाई होते, ज्यांना सरदार साहेबांनी काम दिले आणि गुजरात मध्ये वरदेश येथे पहिली गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आली. त्याचे नेतृत्व, मार्गदर्शन, रचना, सरदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम राय देसाई यांनी केली होती. 28 जानेवारी 1927 रोजी सरदार साहेबांनी तिचे उद्घाटन केले. उद्घाटनाबरोबरच त्यांनी विकासाचा एक नवा आदर्श लोकांसमोर ठेवला. ही गोष्ट लोकांच्या स्मरणात राहावी, म्हणून त्यांनी प्रीतम राय देसाई यांच्या गौरवार्थ त्या संस्थेचे नाव प्रितम नगर असे ठेवले. आज सुद्धा अहमदाबाद मध्ये प्रीतम नगर ही सहकार चळवळीची पहिली आठवण, पहिली यशस्वी आठवण अस्तित्वात आहे. हीच प्रवृत्ती पुढे देशभर पसरत गेली. विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात ही चळवळ पसरली, कारण त्या काळी बृहन्महाराष्ट्र अस्तित्वात होता. या संपूर्ण क्षेत्रात सहकार ही व्यवस्था नव्हती, सहकार ही नियमांमध्ये अडकलेली रचना नव्हती तर सहकार हा संस्काराप्रमाणे आमच्या जनमानसात रुजला आणि परिणामी आज गुजरातच्या सहकार चळवळीशी संबंधित लोक संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरत आहेत.
अमूल नंतर उत्तर गुजरातने ही चळवळ स्वीकारली. दुग्ध सागर डेअरी तयार झाली, बनारस डेरी तयार झाली. कधी कधी मला वाटते की जर असे दूरदृष्टीने विचार करणारे, सहकार चळवळीचे नेतृत्व करणारे लोक नसते, तर गुजरात मध्ये दर दहा वर्षांपैकी सात वर्षे दुष्काळाची परिस्थिती होती, ती कायम राहिली असती. त्या वेळचे संकट आज कमी झाले आहे. त्या कठीण काळात शेतकरी, पशुपालक कशाप्रकारे चरितार्थ चालवत असतील? या दूध उत्पादक मंडळींनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले आणि दुष्काळ पडला तरीही शेतकरी पशुपालन करून आणि दूध विकून आपला चरितार्थ चालवू लागला. पशुपालकांनी आपला चरितार्थ चालवला आणि जगणे सोपे होत गेले.
मात्र त्यानंतर एक काळ असा आला की कोणत्या ना कोणत्या कारणाने गांधीनगर मध्ये असे लोक सत्तेवर आले, ज्यांनी सहकार चळवळीतल्या डेरी उद्योगांमध्ये अडचणी निर्माण करणारे नियम तयार केले. कच्छ-सौराष्ट्र मध्ये डेरी व्यवसाय सुरु करणे आणि चालवणे, ओझे वाटू लागले. खरेतर कच्छ-सौराष्ट्र मध्ये पशुपालनाचे प्रमाण जास्त होते. जेव्हा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा आम्ही हे चित्र बदलून टाकले. आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन दिले आणि मी पाहतो आहे की गुजरातमध्ये जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पशुपालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि दूध उत्पादकांसाठी एक फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. काही लोक स्वतःला ज्ञानी समजतात, फार विद्वान समजतात. मात्र जेव्हा त्यांच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा त्यांचे मन, त्यांचा अहंकार त्या गोष्टी स्वीकारायला तयार होत नाही. विरोध करायची हिम्मत नसते आणि म्हणूनच अशा गोष्टींची खिल्ली उडवणे, मस्करी करणे आणि आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या खालच्या पातळीच्या गोष्टी हे लोक करू लागतात.
असे लोक असतात. मला चांगलेच आठवते आहे. जेव्हा आम्ही कच्छ मध्ये व्हाईट डेजर्ट रणोत्सवाचा शुभारंभ करत होतो, रणोत्सवाला प्रोत्साहन देत होतो, भूकंपानंतर कच्छच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक योजना राबवत होतो, तेव्हा मी भाषण करताना म्हणालो होतो की, माझ्या माहितीप्रमाणे सांडणीचे दूध पोषण मूल्यांनी युक्त असते. ते आपल्या बालकांच्या वाढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. हे वक्तव्य करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय गुन्हा केला कुणास ठाऊक? मी जेथे जात असे तेथे सांडणीच्या दुधाच्या विषयावरून माझी खिल्ली उडवली जात असे, व्यंगचित्रे तयार केली जात असत, कल्पनाही करता येणार नाही अशा वाईट शब्दात वक्तव्ये केली जात असत. आज अमूलने सांडणीच्या दुधापासून चॉकलेट तयार केली आहेत. त्याला फार मोठी मागणी आहे, हे ऐकून मला आनंद होतो आहे. आत्ताच मला रामसिंह भाई सांगत होते की आज घडीला गाईच्या दुधाच्या दुप्पट किंमत सांडणीच्या दुधाला मिळते. काही वेळा निव्वळ अज्ञानातून लोक कसे वागू शकतात, याचे हे उदाहरण आहे. आता वाळवंटात राहून उंट पाळणाऱ्या व्यक्तीला सांडणीच्या दुधासाठी इतकी मोठी बाजारपेठ मिळेल, तेव्हा त्याच्या चरितार्थाचे आणखी एक साधन तयार होईल. आज इतक्या वर्षानंतर अमूलने माझे हे स्वप्न साकार केले, याचा मला आनंद वाटतो आहे. पोषणाची गरज भागवण्यासाठी आपल्या देशात बरेच काही करण्याची आवश्यकता आम्हाला सतत वाटत राहिली आहे.
जेव्हा मी गुजरात मध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा पोषण अभियानांतर्गत, अनेक बाबींमध्ये पुढाकार घेत राहिलो. आपल्या देशात माता आणि बालके निरोगी असतील, तर भारत कधीही आजारी पडणार नाही. आमचा भारतही कायम निरोगी राहू शकेल, असे मला वाटते.
आज आणखी एका गोष्टीचा मला मनापासून आनंद झाला आहे. येथे सौर ऊर्जा आणि सहकार चळवळ या दोन्ही बाबींचा मेळ घालण्यात आला आहे. ज्या शेतात पिकाचे उत्पन्न होते, त्या शेतात वीज सुद्धा निर्माण होईल. ज्या 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वीज निर्माण केली, शेतीच्या कामी वापरली आणि अतिरिक्त वीज सरकारच्या धोरणामुळे आता खरेदी केली जात आहे, त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला सांगण्यात आले आहे की या सहकारी संस्थेला वार्षिक 50 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. सहकार क्षेत्रात ही धरती सदैव नवे प्रयोग करून पाहायला उत्सुक असते. भारत सरकारने तीन महत्त्वपूर्ण योजनांना प्रोत्साहन दिले आहे, एक जनधन, दुसरी वनधन आणि तिसरी गोबर धन. जनधन, वनधन, गोबरधन. कचऱ्यामधून संपत्ती निर्माण करणे, पशूंच्या मलमूत्रापासूनही संपत्तीचे निर्माण करणे, शेणापासून गॅस तयार करणे, विज मिळवणे, खते तयार करणे अशा अनेक बाबी करता येतील. मला चांगलेच आठवते आहे. डाकोर उमरेठ जवळ आमचे एक उत्साही कार्यकर्ता सहकारी होते. त्यांनी दहा-बारा गावांमधून सर्व शेण गोळा करायचा प्रकल्प सुरू केला होता. एक मोठे गोबर गॅस संयंत्र उभारून आसपासच्या गावांना गॅस पोहोचवण्याच्या योजनेवर ते काम करत असत. आज सुद्धा आपल्यासारखे अकरा शेतकरी एकत्र आले, तर एका सोलार पंपाच्या माध्यमातून वीज निर्माण करण्याचे काम आणि नंतर शिल्लक वीज विकण्याचे काम करू शकतील. शेतीचे उत्पन्नही सुरू राहील आणि सौर ऊर्जेची शेती सुरू राहील. त्याचप्रमाणे प्रत्येकी 11 गावे एकत्र येऊन गोबर धनाशी संबंधित काम पथदर्शी मोहिमेच्या रूपात हाती घेऊ शकतील.
मी आज चरोतराच्या धरतीवर आलो आहे. सरदार साहेबांच्या तपस्येमुळे, सहकार क्षेत्रातील अनेक महापुरुषांच्या तपस्येमुळे येथे जे काम सुरू आहे, जे संस्कार आहेत, त्याच्या बरोबरीने येणाऱ्या काळात अमूलने मार्गदर्शन करावे, लोकांनी मार्गदर्शन घ्यावे आणि मग या गोबरधन योजनेला आपण खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत योजनाही म्हणू शकू. कचऱ्यातून संपत्ती निर्माण होईल, स्वच्छ ऊर्जा प्राप्त होईल आणि देशाला परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर अवलंबून राहावे लागणार नाही. या माध्यमातून आपल्याला देश सेवेची एक चांगली संधी मिळेल. येणाऱ्या काळात येथील लोकांनी अशा प्रकारे काम केले, तर ते देशासाठी एक फार मोठा आदर्श निर्माण करू शकतील, असा विश्वास मला वाटतो
पुढच्या दोन वर्षात अमूलला 75 वर्षे पूर्ण होतील आणि 2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतील. मी पाहिले आहे की अमूलने कधीही विश्रांती घेतलेली नाही. नवा विचार करणे, नवी कृती करणे, साहस करणे, हा अमूलचा स्वभाव आहे. यांचा हा जो संघ आहे, यांची ही जी कार्यसंस्कृती आहे, ती सांभाळणारे जे व्यावसायिक आहेत आणि सहकार चळवळीतील जे नेते आहेत, त्यांना समजून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे, कारण मी गेली अनेक वर्षे या सर्वांशी जोडलेला आहे. ते धाडसी आहेत. नव्या गोष्टी करून पाहणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे.
मी अमूलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना , मुळचे नेतृत्व करणाऱ्या सहकारी आंदोलनाच्या सर्व नेत्यांना आज एक विनंती करण्यासाठी आलो आहे. जेव्हा अमूलला ७५ वर्षे पूर्ण होतील आणि भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील,ही दोन्ही वर्षे लक्षात घेऊन अमूल नवीन लक्ष्य ठरवू शकतो का? नवीन उद्दिष्ट ठरवू शकतो का? आणि या ७५ वर्षानिमित्त आपण असे ७५ वर्ष साजरे करू , आपण आतापासून, आपल्याकडे दोन-तीन वर्षे वेळ आहे. देशाच्या स्वातंत्र्यच्या मध्ये आपल्याकडे वेळ आहे ७५ वर्षात. तर आपण असे काही लक्ष्य ठरवून आपले जितके लोक आपल्याबरोबर आहेत, त्यांना घेऊन देशाला आणि जगाला एखादी नवीन गोष्ट देऊ शकतो का?
आज संपूर्ण जगात दूध प्रक्रियेत आपण दहाव्या क्रमांकावर आहोत. जर अमूलला वाटले, संकल्प केला की स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होताना आपण दहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याचा निर्धार करून पुढे जाऊ का? मला कठीण वाटत नाही.
आपल्या देशामध्ये एक काळ होता ,जेव्हा आपल्याला टंचाई जाणवायची. टंचाईच्या समस्येशी झुंज देत होतो. आणि तेव्हा सरकारची निर्णय प्रक्रिया, विचार करण्याची प्रक्रिया, काम करण्याची पद्धत वेगळी होती.त्यातून खूप लवकर बाहेर येण्याची गरज आहे. आज आपल्यासमोर संकट नाही. आज देशासमोर विपुलतेचे आव्हान आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादन घेतो की कधी-कधी बाजार पडतो, शेतकऱ्याचेही नुकसान होते कारण उत्पादन भरपूर आहे.
पूर्वी असा काळ होता की उत्पादन, खूपच कमी होते, आपण गहू देखील बाहेरून आणून पोट भरायचो. जशी धवल क्रांती झाली तशी कृषी क्रांती झाली; देशातील धान्याची कोठारे भरली. परंतु आता आपल्या गरजेपेक्षा काही गोष्टींचा आपल्याकडे अधिक साठा आहे. या परिस्थितीवर उपाय आहे त्यावर प्रक्रिया करण्याचा, मूल्य वर्धन करण्याचा. जर आपण दुग्ध उद्योग वाढवला नसता, दुधावर नवनवीन प्रक्रिया केली नसती, नवनवीन उत्पादने बनवली नसती तर कदाचित हे दूध उत्पादन देखील शेतकऱ्यांनी बंद केले असते, पशुपालन बंद केले असते कारण त्यात टिकून राहण्याची शक्यताच नव्हती. परंतु ही यंत्रणा असल्यामुळे शेतकरी दूध उत्पादनात आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहे.
त्याचप्रमाणे आपल्यासाठी कृषी उत्पादनात देखील मूल्यवर्धन खूप आवश्यक आहे. जेव्हा मी गुजरातचे मुख्यमंत्री होतो, तेव्हा इथे आणंदमध्ये एक कृषी महोत्सव होता, म्हणून मी तिथे आलो होतो. तर तिथे माझा एक जुना मित्र मला भेटला. कोट, पॅन्ट आणि टाय घालून उभा होता, मी खूप आश्चर्यचकित झालो – मी विचारले , तू खूप बदलला आहेस, आजकाल काय करत आहेस? मग त्याने मला काय सांगितले – आपल्याकडे सरद असते ना , त्याची पावडर बनवून विकतो. आणि भरपूर पैसे कमवतो. याला मूल्य वर्धन म्हणतात. म्हणजेच, पूर्वी सरद खाली पडायचे, पण त्याचे पोषण मूल्य माहित नव्हते. आपल्या प्रत्येक कृषी उत्पादनात ही शक्ती आहे. टोमॅटो उत्पादन होते, टोमॅटोचे भाव घसरतात, टोमॅटो दोन दिवस, तीन दिवसात खराब होऊ लागतात. मात्र जर टोमॅटोचे मूल्यवर्धन झाले, प्रक्रिया केली, तर केचअप तयार होते, छानशा बाटलीत भरले जाते, कित्येक महिने खराब होत नाही आणि जागतिक बाजारात विकले जाते. आपल्या शेतकऱ्याचे कधी नुकसान होत नाही. आणि म्हणूनच ज्याप्रकारे दुधावर प्रक्रिया केल्यामुळे आपल्या शेतकऱ्याला मोठे बळ मिळाले. आगामी काळात, कृषी उत्पादनावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, मूल्यवृद्धी यावर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि म्हणूनच भारत सरकारने पंतप्रधान कृषी संपत्ती योजने अंतर्गत देशात आपल्या शेती उत्पादनाला अधिक बळ मिळावे या दिशेने आम्ही काम करीत आहोत.
मी कधीतरी आमच्या दुग्धव्यवसायिकांना सांगितले होते- अमरेली आणि बनास डेअरी यांनी हे काम पुढे नेले. कदाचित इतरांनी केले असेल मात्र मला माहित नाही. मी त्यांना सांगितले होते की जशी आपण धवल क्रांती केली तशी आपल्याला गोड क्रांती करायची आहे. आणि आपले जे शेतकरी बंधू या दूध व्यवसायात आहेत त्यांना मधमाशी पाळण्याचे प्रशिक्षण देखील दिले पाहिजे. आणि जेव्हा आपण दूध घ्यायला जाऊ तेव्हा तिथे तयार होणारा मध देखील घ्या. आणि या कारखान्यात जसे त्याचे पॅकेजिंग करतात तसे आणखी एक पॅकेजिंग करावे. अमरेली जिल्हा आणि बनास, या दोन्ही दुग्धशाळा आज मध उत्पादनात मोठे योगदान देत आहेत. भारतात यापूर्वी जितके मध उत्पादन व्हायचे त्यापेक्षा कित्येक पट अधिक मध उत्पादन सुरू झाले आहे आणि ते परदेशात जाऊ लागले आहे. जरी ते विकले गेले नाही , घरी खाल्ले तरी ते मुलांच्या पोषणातही उपयुक्त ठरेल. यासाठी जास्त मेहनत नाही. जसे की शेत लहान असले तरी जर आपण त्यावर सौर यंत्रणा बसवली तर अधिक मूल्य मिळेल. त्यात मधमाशा पाळण्याचे काही सामान टाका आणि अधिक कमवा. यासाठी आम्ही 2022 पर्यंत स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतांना भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी असे अनेक नवीन प्रकल्प आखत आहोत.
.मी आशा करतो की आपण यात सहभागी व्हावे. आणखी एक विचार मी पूर्वी मांडला होता, जेव्हा मी इथे होतो तेव्हा मी तो करू शकलो नाही. मात्र आपण करू शकतो. जसे इथे टेक होम रेशन, याबाबत चांगले काम झाले आहे. इथे मुलांच्या पोषणासाठी बाल अमूलच्या रचनेबाबत चांगले काम झाले आहे. आपण माध्यान्ह भोजनाच्या बाबतीत देखील खूप मोठे काम करू शकतो. ज्या गावांमध्ये आपण दूध घ्यायला जातो, मध्यवर्ती ठिकाणी जर आपण स्वयंपाकाचा प्रकल्प उभारला, आणि जेव्हा आपली गाडी दूध घ्यायला सकाळी जाते तेव्हा तिथे ज्या शाळा असतील , त्या मुलांसाठी खूप छान अशा खाऊच्या डब्यात माध्यान्ह भोजन घेऊन जाता येईल, शाळेतील मुलांसाठी तिथे डबा पाठवता येईल. डबा देखील इतका छान असेल की गरम-गरम जेवण मिळेल आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा दूध परत येते तेव्हा रिकामा डबा पाठवायचा. वाहतुकीचा अतिरिक्त खर्च न करता आपण आरामात , आपले जिथे-जिथे दूध बाजार आहेत तिथल्या शाळांमध्ये सरकार पैसे देते , आपण केवळ व्यवस्थापन करायचे आहे.
मी तुम्हाला आश्वस्त करतो की ज्या प्रकारे इस्कॉनद्वारे माध्यान्ह भोजन योजनेला ताकद लाभली आहे, आपल्या सर्व दुग्धशाळा आपल्या या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे या व्यवस्थेखाली अन्न पुरवू शकतात. एकाच व्यवस्थेचा बहुपयोगी वापर हे लक्षात घेऊन जर आपण योजना आखल्या तर मला खात्री आहे की आपण केवळ काही मर्यादित क्षेत्रांवरच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभाव निर्माण करण्याचे काम करू शकतो.
मला आठवतंय, धर्मचच्या आमच्या लोकांनी , संपूर्ण देशात मी पाहिले आहे की जी कुरणांची जमीन असते त्यावरून नेहमी भांडणे होत असतात. कोणीतरी अतिक्रमण केले, अमुक केले, तमुक केले. पण आमच्या धर्मचच्या बांधवांनी अनेक वर्षापूर्वी सहकारी संस्था उभारली आणि कुरणांच्या जमिनीचा सहकार्याने विकास केला आणि त्या वेळी दररोज हिरव्या गवतांचे घरपोच वितरण केले जायचे. आज मला माहित नाही. मी पूर्वी कधीतरी यायचो. घरपोच द्यायचे हिरवे गवत आणि दररोज , जर दोन प्राणी असतील तर तुम्हाला इतके किलो हवे, पोहचवायचे. आणि त्यातून जी कमाई व्हायची त्यातून कुरणाच्या विकासाचे आधुनिक कार्य त्यांनी सुरु केले.
माझे सांगायचे तात्पर्य हे आहे की इथल्या विचारात सहकार्याचे संस्कार आहेत आपण या सहकार्याचे व्यापक स्वरूप कसे बनवायचे , आपण कशाप्रकारे अन्य गोष्टींशी जोडले जायचे आणि ते पुढे नेण्याच्या दिशेने आपण कशा प्रकारे काम करू शकतो?
मी पुन्हा एकदा अमूल परिवाराला या भूमीवरील माझ्या विकसनशील शेतकरी पुत्रांना , या भूमीवरील महान सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करत आणि त्यांनी जी उत्तम परंपरा बनवली , त्या परंपरेशी निगडित सहकारी क्षेत्राला समर्पित सर्व लोकांचे आदरपूर्वक स्मरण करत , मी आज ही खूप मोठी योजना , तसेच अन्य योजना गुजरातच्या भूमीला, देशाला समर्पित करतो आणि अतिशय अभिमानाने तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि भारत सरकारच्या वतीने विश्वास देतो की हे सर्व प्रकल्प पुढे नेण्यासाठी दिल्ली सरकार कधीही मागे राहणार नाही. भारत सरकार खांद्याला खांदा भिडवून याच्या प्रगतिसाठी तुमचा भागीदार बनेल. याच एका प्रार्थनेसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. माझ्याबरोबर पूर्ण ताकदीनिशी बोला-
भारत माता की – जय
काय हो, काय झाले, हे माझे चरोतर आहे, आवाज असा नसतो.
भारत माता की – जय
शाबास
धन्यवाद !