महाराष्ट्राचे राज्यपाल श्री विद्यासागर राव, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातले माझे सहकारी नितीन गडकरी, अशोक गजपती राजू, राज्य सरकारमधले मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज पूर्वसंध्येला त्यांच्या राजधानीच्या रायगड जिल्ह्यात इथे येणे हा एक सुखद योगायोग आहे. आज मला दोन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आमच्या नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील भारतात जहाज वाहतूक क्षेत्र, बंदर विकास क्षेत्र आणि जलवाहतूक क्षेत्रांना एक नवी उर्जा,नवी चेतना मिळाली आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच, मुंबईत जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलचे आज लोकार्पण होत आहे.
अनेक वर्षांपासून आपण एक शब्द ऐकत आलो आहोत- जागतिकीकरण, जागतिक व्यापार ! हे आपण खूप आधीपासून ऐकतो तर आहोत, मात्र केवळ घरात चर्चा करुन आपण आपल्या देशाला काही लाभ मिळवून देऊ शकत नाही. जागतिक व्यापाराचा लाभ मिळवायचा असेल तर या व्यापारात सहभागी होण्यासाठी आपल्याकडे जागतिक स्तरावरच्या पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे.
सागरी व्यापार त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. भारत अतिशय नशीबवान देश आहे की सागरी शक्ती ओळखणारे राजपुरुष, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात इतके समुद्रतट बांधले आणि सागरी शक्तीची जाणीव देशाला करून दिली. आज जेव्हा आपण इतक्या वर्षांनी शिवाजी महाराजांचे स्मरण करतो आहोत आणि इथे जेएनपीटीत चौथ्या टर्मिनलचे लोकार्पण करतो आहोत, तेव्हा आपल्याला कळू शकते की आपले महापुरुष किती दीर्घदृष्टीचे होते, ते किती लांबचा विचार करत असत.
जर जागतिक बाजारात आपल्याला आपले स्थान निर्माण करायचे असेल, तर आपल्याला आपल्या सागरी मार्गाची ताकद कित्येक पटीने वाढवण्याची गरज आहे. आपली बंदरे जितकी जास्त विकसित होतील, आधुनिक होतील, त्याच्यावर कमीतकमी वेळात मालवाहतूक करणे शक्य होईल, जलद गतीने चालणाऱ्या जहाजांची संख्या वाढेल, आपला कोट्यवधी टन माल जागतिक बाजारात पोहचावा. आणि कधीकधी माल लवकर पोहचण्याची स्पर्धा असते. एकदा निविदा निघाली, व्यवहार झाला त्यानंतर जर कमी वेळात माल पोहचला तर विकत घेणाऱ्याचा फायदा होतो. आणि जर माल उशिरा पोहचला तर त्याचे नुकसान होते. त्यामुळे माल वेळेत, किंवा वेळेआधी पोहचवण्यासाठी आपल्या बंदरांमध्ये तशा सुविधा असायल्या हव्यात.
सागरमाला प्रकल्पांतर्गत, आम्ही फक्त बंदरांचा विकास करणार आहोत, असे नाही. आम्ही बंदरनिगडीत विकासावर भर देतो आहोत.आपल्या समुद्रकिनाऱ्यालगतचा साडे सात हजार किलोमीटरचा समुद्र आपल्याला लाभला आहे. सागरी क्षेत्राला महाशक्ती बनवण्याची संधी देणारी भौगोलिक व्यवस्था आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोने आपण कसे बनवतो, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. आपल्याला आपल्या व्यवस्था विकासाच्या त्या उंचीवर न्यायच्या आहेत.
भारत सरकारने हा विकास करण्याचा विडा उचलला आहे. सगळे जग आज पर्यावरणाची चर्चा करते. पर्यावरणाच्या समस्येवर तोडगा काढण्यात एक महत्वाचे साधन आहे, वाहतूक व्यवस्था आणि जलवाहतूक ही पर्यावरण सुरक्षेचा उत्तम मार्ग आहे. त्याच दृष्टीने, आम्ही १०० पेक्षा जास्त जलमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर संपूर्ण देशात आपण रेल्वे आणि रस्ते वाहतुकीपेक्षा जलमार्गाचा वापर केला तर आपण अगदी कमी खर्चात मालवाहतूक करू शकतो. आणि तेही पर्यावरणाला नुकसान न पोचवता! जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी आपण सगळे जो लढा देतो आहोत त्यातही आपण सकारात्मक योगदान देऊ शकतो. या विषयांसंदर्भात आपण आता लक्षणीय प्रगती करतो आहोत.
आज नवी मुंबईत ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमिपूजनही होते आहे. देशात स्वातंत्र्यानंतरचा विमान वाहतूक क्षेत्रातला ग्रीनफिल्ड विमानतळ हा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. तुम्ही कल्पना करू शकता, २० वर्षांपासून तुम्ही ह्या विमानतळाच्या घोषणा ऐकत असाल,कित्येक निवडणुकांमध्ये याविषयी वचने दिली गेली असतील, अनेक आमदार निवडूनही आले असतील, खासदार आले असतील.अनेक सरकारे बनली असतील, मात्र विमानतळ तयार नाही झाले ! आणि त्याचे काय कारण आहे ? तर त्यामागे सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीतल्या चुका आहेत.
१९९७ साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, त्यावेळी या विमानतळाचे स्वप्न पहिले गेले, त्याचा विचार केला गेला, चर्चा झाली आणि प्रकल्पाची आखणी झाली. जेव्हा मी पंतप्रधान झालो, त्यानंतर मी सगळ्या प्रकल्पांचा आढावा घेतला .त्यावेळी शोध घेताना माझ्या लक्षात आले की फक्त मुंबई विमानतळ नाही, तर भारतातील असे अनेक प्रकल्प, ज्यांची घोषणा ३० वर्षांपूर्वी झाली, फाईल मंजूर झाली, कधी कधी २० वर्षांपूर्वी घोषणा झाली, कधी नेताजींनी येऊन कोनशिला ठेवली, फोटो काढले गेले, भाषण केले, मात्र ते प्रकल्प केवळ कागदावरच राहिले. कधीही अस्तित्वात आले नाही.
हे बघून मला खूप धक्का बसला. म्हणून मग मी प्रगती नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. तंत्रज्ञानाचा वापर करत मी देशातल्या सर्व राज्यातल्या मुख्य सचिवांसोबत बसून आणि भारत सरकारच्या सचिवांसोबतही या प्रकल्पांविषयी चर्चा करतो. मी स्वतः देखील या प्रकल्पांच्या प्रगतीवर देखरेख ठेवतो. जसे आता देवेंद्र फडणवीस सांगत होते, हे प्रकल्प माझ्या समोर असतात. म्हणजे फक्त कागदावर असतात, प्रत्यक्षात काहीही नाही. आता उद्या कोणीतरी नक्कीच म्हणेल, की हा प्रकल्प तर आमच्याच काळातला होता. हे म्हणायला काही वेळ लागत नाही. मात्र कामे झालीच नाही. म्हणूनच आम्ही आज प्रगती कार्यक्रमात अधिकार्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतो. जर योजना बनवली, तर त्यात काय अडचणी होत्या, काम सुरु का झाले नाही? नेमक्या समस्या जाणून त्या सोडवून आम्ही कामांची सुरुवात केली आहे. तुम्हाला ऐकून आनंद होईल, की प्रगती मध्ये आढावा घेतलेल्या २०-३० वर्ष जुन्या प्रकल्पांचे रखडलेले काम आम्ही सुरु केले आहे. कामे प्रलंबित ठेवणे हा आधीच्या सरकारांचा स्वभावच होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळपास १० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प असेच रखडले होते. आम्ही ते सुरु केले. त्यांच्यासाठी निधीची तरतूद केली. आणि त्यातलाच एक प्रकल्प मुंबई विमानतळ हा आहे !
आपले विमान वाहतूक क्षेत्र अतिशय जलद गतीने विकसित होत आहे. आमचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी तुम्हाला याबद्दल विस्ताराने सांगितलेच आहे. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी संपूर्ण देशातल्या विमानतळावर जेवढे लोक प्रवास करत, तेवढे प्रवासी आज एकट्या मुंबई विमानतळावरून प्रवास करतात. तुम्ही विचार करा, मुंबई विमानतळावर किती गर्दी होत असेल. आज काळ खूप बदलला आहे. जसे तुम्ही बसच्या रांगेत लोकांना उभे पाहता, तशीच रांग आज भारतातल्या अनेक विमानतळांवर तुम्हाला बघायला मिळेल.
विमानवाहतूक क्षेत्राचा विकास ज्या जलद गतीने होतो आहे, ते लक्षात घेतले तर आपल्याला विमान वाहतूक क्षेत्रात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आजही पायाभूत व्यवस्थेत आपण खूप मागे आहोत. या कामांची गती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ८० च्या दशकात आम्ही अनेकदा २१ वे शतक येत आहे, अशी चर्चा ऐकली. एकवीसाव्या शतकाविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येत. पंतप्रधानांच्या तोंडून आम्ही जवळपास रोजच एकविसाव्या शतकाच्या गोष्टी ऐकायचो. मात्र एकविसाव्या शतकाची गाडी कधी या चर्चेपलीकडे गेली नाही.
२१व्या शतकातील विमान वाहतूक धोरण कसे असावे याचा विचार जर आजपासून २०/२५ वर्षांपूर्वी केला गेला असता तर आज आम्हाला जी धावपळ करावी लागते आहे ती टाळता आली असती. ह्या देशात स्वातंत्र्यानंतर कुठल्याही सरकारने – येणाऱ्या काळात या क्षेत्राचं महत्व वाढणार आहे, यात कुठलीच शंका असण्याचं कारण नव्हतं – तरी देखील आपल्या देशात कधीच विमान वाहतूक धोरण नव्हते. आम्ही सत्तेत आल्यावर विमान वाहतूक धोरण बनविले आणि विमान वाहतूक क्षेत्रात जर आम्ही ही चूक करू तर, करण एके काळी त्यावर महाराजाचे चित्र असायचे. आज तो सामान्य माणूस आहे. जेंव्हा अटलजींचे सरकार होते, तेंव्हा आमचे नागरी विमान वाहतूक मंत्री होते. मी तर कुठेतरी कोपऱ्यात पक्ष संघटनेचं काम करायचो. त्यांना मी विचारलं, की आजही विमानावर महाराजाचे चित्र का लावतात, त्या काळी महाराजाच्या तोडीचे लोक विमानात बसायचे. मी म्हणालो, आता तर तुम्हाला लक्ष्मणच्या व्यंगचित्रात असलेल्या कॉमन मॅन चे चित्र लावावे लागेल, तो आता विमानात बसतो. आणि नंतर अटलजींच्या कार्यकाळात त्याची सुरवात देखील करण्यात आली.
आम्ही म्हटलं की आमच्या देशातला हवाई चप्पल घालणारा माणूस देखील हवाई प्रवास करु शकला पाहिजे. आम्ही विमान वाहतूक योजना आणली. देशभरात १०० पेक्षा जास्त विमानतळ बनवायचे, जे वापरात नाही त्यांची दुरुस्ती करून वापरात आणण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
छोट्या छोट्या शहरांना जोडणारी विमान सेवा असावी. छोटी छोटी – २०-३० आसनी – विमाने असावीत, लोकांना आज जलद प्रवास हवा आहे. आणि आम्ही एक योजना आणली. विशेषतः इशान्य भारतातील लोकांसाठी ज्यात अडीच हजाराचे तिकीट आणि इशान्य भारतातील दुर्गम भाग जिथे दळणवळण आवश्यक आहे. आम्ही त्यावर देखील भर देत आहोत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशात इतक्या वर्षात विमानाची खरेदी झाली, त्यांचा वापर देखील झाला. आज आपल्या देशात जवळ जवळ ४५० विमाने वापरात आहेत. देशात विमान सेवा देत आहेत, सरकारी असोत वा खाजगी, सर्व मिळून. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आपण ४५० वर पोचलो आहोत. आपल्याला ऐकून आनंद होईल की देशातल्या हवाई क्षेत्रातून ९०० नवीन विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिल्या गेल्या आहेत. आपल्याला कल्पना आली असेल की देशाचं हवाई क्षेत्र किती वेगाने प्रगती करत आहे.
आणि विमान वाहतूक क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी देखील आहेत. आणि आत्ता जेंव्हा देवेंद्र सांगत होते की यासोबत पायाभूत सुविधा देखील उभ्या राहतील – जल वाहतूक, भूपृष्ठ वाहतूक, हवाई वाहतूक, यामुळे अनेक आर्थिक व्यवहार होतात, अर्थव्यवस्थेला गती मिळेल. जगाचा एक अभ्यास आहे की जर विमान वाहतूक क्षेत्रात १०० रुपये गुंतवले तर कालांतराने त्यातून ३२५ रुपये परतावा मिळतो. इतकी ह्या क्षेत्राची शक्ती आहे, रोजगाराच्या अनेक संधी आहेत. भारतात यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल.
भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे, दळणवळणाच्या पुरेशा सुविधा मिळाल्या आणि पर्यटकांनी एका जिल्ह्यात एक महिना जरी घालवला तरी पूर्ण देश बघू शकणार नाहीत, इतकी विविधता आपल्या देशात आहे. विमान वाहतूक क्षेत्र आणि त्याची शक्ती, देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देऊ शकतील. आणि पर्यटन हे असे क्षेत्र आहे, ज्यात कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त रोजगार कमावला जाऊ शकतो. आता पर्यटन क्षेत्रात सर्वजण कमाई करू शकतात. टॅक्सीवाला कमाई करेल, ऑटोरिक्षावाला कमाई करेल, मंदिरात पूजा करणारा कमाई करेल, प्रत्येकजण कमाई करेल.
विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा आमचा जो प्रयत्न सुरू आहे, तो सरळ सरळ पर्यटनाशी संबंधित आहे. मला विश्वास आहे की आज नवी मुंबई मध्ये ज्या ग्रीनफील्ड विमानतळाचे भूमिपूजन झाले, आणि मी नेहमी विचारत असतो, पूर्ण कधी होणार? कारण गेल्या काळातला अनुभव कसा आहे, आपण जाणताच. तर, देशाला त्या संस्कृतीतून बाहेर काढण्यासाठी आम्हाला कठोर मेहनत करवी लागली आहे. पण आम्ही करू. तुम्ही दिलेलं काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारच.
मी बघतो आहे की, मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु , आपण थोडी कल्पना करा, कसा असेल? कदाचित यापूर्वी २०-२५ वर्षात देखील आपण कल्पना करू शकला नसता. जर २०२२, २३, २४, २५ ह्या कालखंडात आपण बघाल तर आपल्या देखत नवी मुंबई विमानतळावरून विमानं उडायला लागली असतील.
ह्याच कालखंडात मुंबईत द्वीमार्गी उपनगरीय कॉरिडॉरचं काम अतिशय वेगानं पूर्ण झालेलं असेल. त्याचप्रमाणे, त्याच वेळी इथले समुद्राशी संबंधित जेवढे प्रकल्प आहेत, पाण्याशी संबंधित, जमिनीशी संबंधित, रेल्वेशी संबंधित, सगळे एकदम २२ पर्यंत आपल्याला अस्तित्वात आलेले दिसू लागतील. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक देखील तयार झालं असेल. आपण कल्पना करू शकता की कसं सगळं बदललं असेल.
ह्या सगळ्या उपक्रमांसाठी मी देवेंद्रजी, केंद्रातले माझे सहकारी गजपति राजू जी, नितीन गडकरीजी ह्यांचं अभिनंदन करतो. लवकरच आपल्या सर्वांना इथून विमान प्रवासाची संधी मिळणार आहे. ह्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा देतो !
धन्यवाद.