सर्वप्रथम मी पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करतो. त्यांनी देशाची सेवा करतांना आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या दुःखद प्रसंगी मी आणि प्रत्येक भारतीय त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.
या हल्ल्यामुळे देशात किती आक्रोश आहे, लोकांचे रक्त सळसळते आहे हे मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. या प्रसंगी देशाच्या अपेक्षा आहेत, काहीतरी करुन दाखवण्याची भावना आहे आणि ती स्वाभाविक आहे. आपल्या सुरक्षादलातील जवानांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आपल्याला आपल्या सैनिकांच्या शौर्यावर , त्यांच्या बहादुरीवर पूर्ण विश्वास आहे. देशभक्तीच्या रंगात रंगणारे लोक खरी माहिती आपल्या संस्थांपर्यंत पोहोचवतील ज्यामुळे दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या आपल्या लढ्याला वेग येईल.
दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना निक्षून सांगू इच्छितो की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.
मी देशाला विश्वास देतो की, या हल्ल्याच्या पाठीमागे ज्या शक्ती आहेत , या हल्ल्याच्या मागे जे कुणी गुन्हेगार आहेत त्यांना निश्चितच शिक्षा होईल. जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. त्यांच्या भावना मी समजू शकतो आणि त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार देखील आहे.
परंतु माझ्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे की, ही वेळ खूप संवेदनशील आणि भावूक क्षण आहे. पक्षातील असो किंवा विपक्षातील असो, आपण सर्वानी राजकीय चिखलफेकीपासून दूर रहायला हवे. देश एकजूट होऊन या दहशतवादी हल्ल्याचा सामना करत आहे, देश एकत्र आहे. देशाचा एकच आवाज आहे आणि तोच जगभरात ऐकू जायला हवा कारण आपण जिंकण्यासाठी ही लढाई लढत आहोत. संपूर्ण जगात एकटा पडलेला आपला शेजारी देश अशा भ्रमात असेल की आपण ज्याप्रकारची कृत्य करत आहोत , ज्या प्रकारची कट-कारस्थाने रचत आहोत, त्यामुळे भारतात अस्थिरता निर्माण करण्यात आपण यशस्वी होऊ, तर हे स्वप्न त्यांनी कायमचे सोडून द्यावे. कारण ते हे कधीही करू शकणार नाहीत आणि कधीही असे घडणार नाही.
याप्रसंगी मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या आपल्या शेजारी देशाला जर असे वाटत असेल की भारतात अस्थिरता निर्माण केल्यानंतर भारत दुबळा होईल. तर हे त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. काळाने सिद्ध केले आहे की, ज्या मार्गाने शेजारी राष्ट्र चालले आहे तो विनाशाकडे जाणारा आहे आणि आपण जो मार्ग स्वीकारला आहे तो समृद्धी आणि विकासाकडे नेणारा आहे.
130 कोटी भारतीय अशा प्रकारच्या प्रत्येक कट -कारस्थानाला, प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल. अनेक मोठ्या देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि भारताबरोबर ठामपणे उभे राहण्याची , भारताला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली आहे. मी या सर्व देशांचा आभारी आहे. मी या सर्व राष्ट्रांना आवाहन करतो की, सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन लढायला हवे , मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करायला हवा.
दहशतवादाविरुद्ध लढण्यात सर्व देश जर एक मत, एक स्वर, एक दिशेने चालले तर दहशतवाद काही क्षण देखील तग धरू शकणार नाही.
मित्रांनो, पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांची मन:स्थिती आणि वातावरण दु:ख आणि आक्रोशाने भरलेले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा देश निक्षून सामना करेल. हा देश थांबणारा नाही.आपल्या वीर शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तसेच देशासाठी प्राणाचे बलिदान देणारा प्रत्येक शहीद दोन स्वप्नांसाठी आपे आयुष्य पणाला लावतो- पहिले देशाची सुरक्षा आणि दुसरे देशाची समृद्धी. मी सर्व वीर शहीदांना , त्यांच्या आत्म्याला नमन करतांना , त्यांचे आशिर्वाद घेतांना पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतो की ज्या दोन स्वप्नांसाठी त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण खर्ची घालू. समृद्धीच्या मार्गाला देखील आम्ही अधिक गती देऊ, विकासाचा मार्ग अधिक बळकट करून, आपल्या या वीर शहीदांच्या आत्म्याला नमन करुन पुढे जाऊ आणि याच संदर्भात मी वंदे भारत एक्स्प्रेसची संकल्पना आणि रचना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येक इंजिनीअर, प्रत्येक कामगाराचे आभार मानतो.
चेन्नई मध्ये तयार करण्यात आलेली ही रेल्वेगाडी दिल्ली ते काशी दरम्यान पहिला प्रवास करणार आहे. हीच एक भारत-श्रेष्ठ भारताची खरी ताकद आहे, वंदे भारत एक्सप्रेसची ताकद आहे.
मित्रानो, गेल्या साडेचार वर्षात आम्ही भारतीय रेल्वेची स्थिति अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय मेहनतीने बदलण्याचा प्रयत्न केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस त्या कामांचीच एक झलक आहे. गेली काही वर्षे रेल्वे अशा क्षेत्रांमध्ये आहे ज्यांनी मेक इन इंडिया अंतर्गत निर्मितीमध्ये खूप प्रगती केली आहे. त्याचबरोबर, देशात रेल्वे डब्यांच्या कारखान्यांचे आधुनिकीकरण, डिझेल इंजिनचे इलेक्ट्रिक मध्ये रूपांतर करण्याचे काम आणि यासाठी नवीन कारखाने देखील सुरु करण्यात आले आहेत.
तुम्हाला आठवत असेल यापूर्वी रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन आरक्षणाची काय अवस्था होती. त्याकाळी एका मिनटात दोन हजारपेक्षा जास्त तिकिटांचे आरक्षण होऊ शकत नव्हते. आता आज मला आनंद वाटतो की रेल्वेचे संकेतस्थळ वापरायला अगदी सुलभ आहे आणि एका मिनटात 20 हजारहून अधिक तिकिटांचे आरक्षण करता येते. पूर्वी परिस्थिती अशी होती की एका रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी किमान दोन वर्षे लागायची. आता देशात एक रेल्वे प्रकल्प तीन किंवा चार किंवा जास्तीत जास्त सहा महिन्यात मंजूर होतो. अशाच प्रयत्नांमधून रेल्वेच्या कामात नवीन गती आली आहे. संपूर्ण देशात ब्रॉड गेज मार्गामुळे एका मोठ्या मोहीमेद्वारे मानवरहित फाटके बंद करण्यात आली आहेत.
आता जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो, तेव्हा देशात 8 हजार 300 पेक्षा जास्त मानव रहित रेल्वे फाटक होती. त्यामुळे दररोज अपघात व्हायचे. आता ब्रॉड गेज मार्गावर मानव रहित रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
देशात रेल्वे रूळ टाकण्याचे काम असेल किंवा विद्युतीकरणाचे काम असेल, पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने होत आहे. देशातील सर्वात व्यस्त मार्गाना प्राधान्य देऊन त्यांना पारंपरिक रेल्वे गाड्यांपासून मुक्त केले जात आहे. विजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये आपण पाहतो आहोत की प्रदूषण देखील कमी होईल, डिझेलचा खर्च देखील वाचेल आणि गाड्यांचा वेग देखील वाढेल.
रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मला सांगण्यात आले आहे की २014 पासून आतापर्यंत सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत नियुक्ती झाली आहे. आता जे भर्ती अभियान सुरु आहे त्यानंतर ही संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, मी असा दावा करत नाही की एवढ्या कमी वेळेत आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करून भारतीय रेल्वेत सर्व काही बदलून टाकले आहे, असा दावा आम्ही कधी करत नाही , अजूनही बरेच काही करणे बाकी आहे. ,एवढे मात्र मी नक्की सांगू शकतो की भारतीय रेल्वेला आधुनिक रेल्वेसेवा बनवण्याच्या दिशेने आम्ही जलद गतीने पुढे जात आहोत आणि मी विश्वास देतो की या विकास यात्रेला आणखी गती देऊ , आणखी ताकद देऊ. पाणी असेल, भूमी जमीन असेल, आकाश असेल, भारताचा पूर्वेकडील भाग असेल,पश्चिमेकडील भाग असेल, उत्तरेकडील भाग असेल, दक्षिणेकडील भाग असेल , सबका साथ-सबका विकास, हाच मंत्र घेऊन विकासाचा हा मार्ग पुढे नेऊ. विकासाच्या माध्यमातून देशासाठी बाजी लावणाऱ्यांना आम्ही वंदन करत राहू आणि सुरक्षेच्या क्षेत्रातही पूर्ण ताकदीने गुन्हेगारांना शिक्षा देऊन देशाच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्यांचे जे रक्त आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत वसूल करू.
याच विश्वासासह मी माझे भाषण संपवतो. या शहीदांच्या नावाने माझ्याबरोबर म्हणा-
वंदे मातरम – वंदे मातरम
वंदे मातरम – वंदे मातरम
वंदे मातरम – वंदे मातरम