तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलाणीस्वामीजी, माझे सहकारी रमेश पोखरीयाल ‘निशान्क्जी’,उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, आयआयटी मद्रासचे अध्यक्ष, राज्यपाल मंडळाचे सदस्य, या महान संस्थेचे संचालक आणि शिक्षकवृंद, मान्यवर अतिथी आणि आपल्या भविष्याच्या सुवर्ण उंबरठ्यावर उभे असलेले माझे तरुण मित्र. आज येथे उपस्थित असणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
मित्रांनो,
माझ्यासमोर छोटा भारत आणि नव भारताचा उत्साह दोन्ही आहे. येथे ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता आहे. तुम्हाला पदवी प्रदान करताना, मला तुमच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने दिसली. मला तुमच्या डोळ्यात भारताचे नशीब दिसले.
मित्रांनो,
पदवीधरांच्या पालकांचे मला अभिनंदन करायचे आहे. त्यांच्या अभिमानाची आणि आनंदाची कल्पना करा. आयुष्यातील या पडावापर्यंत तुम्ही पोहोचावे म्हणून त्यांनी संघर्ष केला, त्याग केला. तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी त्यांनी तुम्हाला पंख दिले. हा अभिमान तुमच्या शिक्षकांच्या डोळ्यात देखील दिसत आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका देखील मी येथे अधोरेखित करू इच्छितो. शांत, पडद्यामागचे कर्मचारी जे तुमच्यासाठी जेवण बनवतात, वर्ग स्वच्छ ठेवतात, वसतिगृह स्वच्छ ठेवतात. तुमच्या यशात त्यांची भूमिका देखील आहे. पुढे भाषण सुरु ठेवण्याआधी मी माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचे शिक्षक, पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करावे.
मित्रांनो,
ही एक उल्लेखनीय संस्था आहे. मला सांगितले आहे की येथे पर्वत हलतात आणि नद्या स्थिर आहेत. आपण तामिळनाडू राज्यात आहोत, ज्याची एक विशिष्ट ओळख आहे. जगातील सर्वात भाषांपैकी एक असलेल्या तामिळ भाषेचे हे माहेरघर आहे. आणि भारतातील सर्वात नवीन- आयआयटी-मद्रास- या भाषेचे देखील हे घर आहे. येथे असे बरेच आहे ज्याची तुम्हाला आठवण येईल. सारंग आणि शास्त्राची तुम्हाला नक्कीच आठवण येईल. तुम्हाला तुमच्या सोबत्यांची आठवण येईल. आणि अशी एक गोष्ट आहे ज्याची तुम्हाला कधीच आठवण येणार नाही. सगळ्यात महत्वाचे, आता तुम्ही कुठल्याही भीती शिवाय उच्च दर्जाची पादत्राणे खरेदी करू शकता.
मित्रांनो,
तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. संपूर्ण जग भारताकडे अनोख्या संधीची भूमी म्हणून पाहत असतानाच तुम्ही या अलौकिक महाविद्यालयातून पास होऊन बाहेरच्या विश्वात पाय ठेवत आहात. मी नुकताच आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यावरून परत आलो आहे. या दौऱ्या दरम्यान मी, राष्ट्राध्यक्ष, व्यवसाय क्षेत्रातले नेते, नवनिर्माते, उद्योजक, गुंतवणूकदार यांची भेट घेतली. आमच्या चर्चे दरम्यान एक धागा सामायिक होता. हे नवीन भारताबद्दल आशावादी होते. आणि भारतातील तरुण लोकांच्या क्षमतावर त्यांना विश्वास आहे.
मित्रांनो,
भारतीय समुदायाने जगभरात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश. या सर्वांना ऊर्जा कोण देत आहे? हे सगळे मोठ्या संख्येने तुमचेच आय आय टी चे वरिष्ठ आहेत. म्हणूनच, तुम्ही ब्रांड इंडियाला जगभरात मजबूत करत आहात. आजकाल मी यु पी एस सी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. आय आय टी पदवीधरांची संख्या तुम्हाला आणि मला आश्चर्य चकित करेल इतकी आहे! अशा प्रकारे आपण भारताला अधिक विकसित देश बनवत आहात. आणि जर तुम्ही कॉर्पोरेट जगतात गेलात तर तुम्हाला तिथे अनेक जण दिसतील ज्यांनी आय आय टी मधून शिक्षण घेतलं आहे. अशा प्रकारे तुम्ही भारताला अधिक समृद्ध करत आहात.
मित्रांनो,
21 व्या शतकाचा पाया मी नवोन्मेश, सांघिक कार्य आणि तंत्रज्ञान या तीन मुख्य स्तंभांवर विसावलेला पाहत आहे. हे प्रत्येक जण एकमेकाला पूरक आहेत.
मित्रांनो,
मी नुकताच सिंगापूर-भारत हॅकाथॉन मधून आलो आहे. तेथे भारत आणि सिंगापुरचे नवनिर्माते एकत्र काम करत आहेत. समान आव्हानांवर ते उपाय शोधत आहेत. त्या सगळ्यांनी त्यांची ऊर्जा एकाच दिशेने वळवली आहे. हे शोधक वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आले आहेत. त्यांचा अनुभव वेगवेगळा आहे. परंतु या सर्वांनी असे उपाय शोधले पाहिजेत जे केवळ भारत आणि सिंगापूरमधीलच नव्हे तर जगासाठी देखील उपयुक्त ठरतील. ही नाविन्य, सांघिक कार्य आणि तंत्रज्ञानाची शक्ती आहे. याचा फायदा काही निवडकांना नाहीतर सर्वांना होतो.
आज, भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तुमचा नवोन्मेश, आकांक्षा आणि तंत्रज्ञानाचा वापर या स्वप्नाचे इंधन आहे. अत्यंत स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये येणारी ही भारताची मोठी झेप आहे.
मित्रांनो,
21 व्या शतकाच्या गरजा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दशक जुनी संस्था स्वतःचे रूपांतर कसे करू शकते याचे आयआयटी मद्रास हे प्रमुख उदाहरण आहे. थोड्या वेळापूर्वी, मी कॅम्पसमध्ये स्थापित संशोधन पार्कला भेट दिली. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच प्रयत्न आहे. मी आज एक अत्यंत उत्साही स्टार्ट अप इकोसिस्टीम पाहिली. मला सांगण्यात आले की आजपर्यंत येथे 200 स्टार्ट अप इनक्युबेट करण्यात आले आहेत. त्यातील काही पाहण्याचे सौभाग्य मला मिळाले. मी विद्युत गतिशीलता, इंटरनेट मधील गोष्टी, आरोग्य सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अनेक क्षेत्रातील प्रयत्न पाहिले. या सर्व स्टार्ट अप्सने अद्वितीय भारतीय ब्रँड तयार केले पाहिजेत जे भविष्यात जगाच्या बाजारात त्यांची स्वतःची जागा बनवतील.
मित्रांनो,
भारताचे नावीन्य हे अर्थशास्त्र आणि उपयुक्तता यांच उत्कृष्ट मिश्रण आहे. आयआयटी मद्रासचा जन्म त्या परंपरेने झाला आहे. येथे विद्यार्थी आणि संशोधक कठीण समस्या घेतात आणि असे उपाय शोधतात जे सर्वांसाठी उपयोगात आणण्याजोगे आणि व्यवहार्य असतात. मला असे सांगण्यात आले की इथले विद्यार्थी स्टार्ट अप सह त्यांच्या रूममधून कोड लिहायचे आणि ते देखील काहीही न खाता आणि न झोपता. भुकेचा आणि झोपेचा भाग वगळता, मी आशा करतो की काहीतरी नव शोधण्याची आणि उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची भावना ही येणाऱ्या काळातही कायमचं राहील.
मित्रहो,
देशात नाविन्यतेसाठी, संशोधनासाठी आणि विकासासाठी आम्ही यंत्रणा निर्माण करत आहोत. यंत्र विषयक शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यांची ओळख, विद्यार्थ्यांना शालेय जीवनाच्या सुरवातीलाच करून देण्यात येत आहे. देशात सर्वत्र अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यासाठी आमचे काम सुरु आहे.
आपल्या संस्थासारख्या संस्थामधून एखादा विद्यार्थी आला आणि त्याची नाविन्यता, कल्पकतेवर काम करण्याची इच्छा असेल तर त्याला यासाठी उपयुक्त अशी अटल इनक्युबेशन केंद्रे अनेक संस्थांमध्ये निर्माण करण्यात आली आहेत. स्टार्ट अप विकसित करण्यासाठी बाजारपेठ शोधणे हे यापुढचे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी स्टार्ट अप इंडिया कार्यक्रम आपल्या मदतीसाठी आखण्यात आला आहे. नाविन्यतेसाठी बाजारपेठ मिळवण्याचा मार्ग शोधण्यासाठी हा कार्यक्रम मदत करतो. याशिवाय, देशात संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी, आम्ही पंतप्रधान रिसर्च फेलो योजना निर्माण केली आहे.
मित्रहो,
या अथक प्रयत्नांचे फलित म्हणजे आज भारत सर्वोच्च तीन स्टार्ट अप स्नेही परीसंस्थांपैकी एक आहे. स्टार्ट अप मधे भारताने घेतलेल्या आघाडीमध्ये सर्वात उत्तम बाब म्हणजे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 मधल्या आणि अगदी ग्रामीण भारतातल्या लोकांच्या बळावर ही वाढ झाली आहे. स्टार्ट अप च्या जगात आपण कोणती भाषा बोलता याला महत्व नाही, तुमच्या आडनावाचा याच्याशी संबंध नाही, इथे महत्व आहे ते तुमच्या प्रतिभेला, स्वतःचे नाव आणि ओळख निर्माण करण्याची तुम्हाला संधी आहे.
मित्रहो,
आयआयटीची तयारी करायला आपण केव्हा सुरवात केली ते आपल्याला आठवते का? किती गोष्टी कठीण वाटत होत्या, पण तुमच्या कठोर मेहनतीने अशक्य वाटणारे शक्य करता आले. आपल्यासाठी अनेक संधी प्रतीक्षा करत आहेत यातल्या सर्वच सहजसाध्य आहेत असे नाही. मात्र आज जे अशक्य वाटत आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यकता आहे ती केवळ आपण त्या दिशेने एक पाऊल टाकण्याची. दबून जाऊ नका. गोष्टी पायरीपायरीने सोडवा. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीकडे जाताना आपल्याला त्या प्रश्नाची उकल होत असल्याचे जाणवेल. स्वप्ने पाहणे कधी सोडू नका, स्वतःला आव्हान देत राहा. त्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा घडत राहते.
मित्रहो,
या संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठ-मोठ्या संधी आपली प्रतीक्षा करत असतील हे मी जाणतो, त्यांचा उपयोग करा. मात्र माझी आपणाला एक विनंती आहे, आपण कोठे काम करता, कोठे राहता हे महत्वाचे नाही, मात्र आपल्या मातृभूमीच्या,भारताच्या आवश्यकता कायम स्मरणात ठेवा. आपले काम, नाविन्यता आणि कल्पकता, संशोधन भारताच्या कसे उपयोगात येईल याचा विचार ठेवा. ही केवळ आपली सामाजिक जबाबदारी आहे असे नव्हे तर त्याला व्यापार विषयक पैलूही आहे.
आपल्या घरात,कार्यालयात, उद्योगासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा किफायतशीर आणि कल्पक मार्ग आपण शोधू शकता का, यामुळे नवीन पाण्याचा उपसा कमी होईल. आज एक समाज म्हणून एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पासून आपण मुक्त व्हायला हवे. त्या जागी या प्लास्टिकचे दुरुपयोग टाळून, पर्यावरण स्न्हेही पर्याय कोणता असेल, यासाठी आम्ही आपल्यासारख्या युवा पिढीकडे पाहत आहोत.
नजीकच्या भविष्यात समाजाला, संसर्गजन्य रोगासारख्या रोगांना नव्हे तर जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या रक्तदाब,टाईप 2 मधुमेह, लठ्ठपणा, ताण यासारख्या रोगांना मोठ्या प्रमाणात सामारे जावे लागणार आहे. डाटा सायन्स आणि या रोगांची आकडेवारी, माहिती यांच्या आधारे तंत्रज्ञान यासंदर्भात उपयुक्त ठरू शकते.
निदान, वर्तनात्मक विज्ञान आणि औषधोपचार यांच्या बरोबरीने जेव्हा डाटा सायन्स येते तेव्हा त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतात. हे रोग रोखण्यासाठी काही बाबी आहेत का, यासारख्या प्रश्नाची उत्तरे तंत्रज्ञान देऊ शकते का, आयआयटीचे विद्यार्थी हे मुद्दे हाती घेतील का?
तंदुरुस्ती आणि आरोग्याची काळजी यावर मी बोलतो आहे कारण आपल्यासारखे उत्तम गुणवत्तावान, कामात इतके व्यग्र असतात की त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. ‘फिट इंडिया’ या आरोग्यदायी भारतासाठीच्या मोहिमेत आपण व्यक्तिगत तंदुरुस्तीवर भर देण्याबरोबरच आरोग्य क्षेत्रात नवनवीन शोध अशा दोनही बाजूनी सहभागी व्हा असे आवाहन मी करतो.
मित्रहो,
आपण दोन प्रकारच्या व्यक्ती समाजात पाहतो,एक म्हणजे जे स्वतःसाठी जगतात आणि दुसरे असे जे दुसऱ्यासाठी जगतात. आपण यापैकी कशाची निवड करायची हे आपणच ठरवायचे आहे. मुदत संपलेली औषधाची एक बाटली आहे,कदाचित मुदत संपून एक वर्षही झाले असेल अशी बाटली आहे. बाटली बाहेरचे वेष्टनही छान आहे आणि बाटलीत औषधही आहे मात्र त्याचा उपयोग काहीच नाही. असे आयुष्य असावे का, आयुष्य हे चैतन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण असावे. असे आयुष्य जगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शिकणे, जाणणे आणि इतरांसाठी जगणे, दुसऱ्याच्या उपयोगी पडणे. विवेकानंदानी म्हटले आहे “ इतरांसाठी जगतात तेच खरे जगतात”.
मित्रहो,
दीक्षांत समारंभ म्हणजे तुमचा हा अभ्यासक्रम समाप्त झाला. मात्र आपल्या शिक्षणाचा हा समारोप नाही. शिक्षण ही अविरत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. आयुष्यभर आपण शिकतच असतो. आपणा सर्वाना मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा. आभार, खूप खूप आभार.