मंचावर उपस्थित राज्यपाल, द्रोपदी जी, मुख्यमंत्री जी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे मंत्री आणि झारखंडचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,
तुम्हा सर्वांना , संपूर्ण देशाला आणि जगाला आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा.
आज या प्रभात तारा मैदानातून सर्व देशवासियांना सुप्रभातम् । आज हे प्रभात तारा मैदान जगाच्या नकाशावर नक्कीच चमकत असेल. हा सन्मान आज झारखंडला मिळाला आहे.
आज देश आणि जगभरातील अनेक भागांमध्ये लाखो लोक योग दिन साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमले आहेत, मी त्या सर्वांचे आभार मानतो.
योगाच्या जगभरातील प्रसारात माध्यमातील आमचे सहकारी, समाज माध्यमांशी संबंधित लोक ज्याप्रमाणे महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत, ती देखील महत्वपूर्ण आहे, मी त्यांचेही आभार मानतो.
मित्रांनो, झारखंडमध्ये योग दिनानिमित्त येणं हा एक अतिशय सुखद अनुभव आहे. तुम्ही सगळेजण पहाटेच आपापल्या घरातून निघून लांबून इथे आला आहात, मी तुमचाही आभारी आहे. अऩेकांच्या मनात आज हा प्रश्न आहे कि मी पाचवा योगदिन साजरा करण्यासाठी, आज तुमच्या बरोबर योगसाधना करण्यासाठी रांचीलाच का आलो आहे?
बंधू आणि भगिनींने, रांची बद्दल मला ओढ तर आहेच, मात्र आज माझ्यासाठी रांचीला येण्याची तीन आणखी मोठी कारणे आहेत. एक, ज्याप्रमाणे झारखंडच्या नावात़च वन प्रदेश आहे, निसर्गाच्या अगदी जवळ आहे,आणि योग व निसर्गाचा ताळमेळ मनुष्याला एक वेगळीच अनुभूति करून देतो. दुसरे मोठे कारण इथे येण्याचे हे होते कि रांची आणि आरोग्याचे नाते आता इतिहासात नोंदले गेले आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्म-जयंती निमित्त राँची मधूनच आम्ही आयुष्मान भारत योजनेची सुरूवात केली होती. आज जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना खूप कमी कालावधीत गरीबांसाठी खूप मोठा आधार बनली आहे. भारतीयांना आयुष्मान बनवण्यात योगाचे जे महत्व आहे, ते देखील आपण जाणतो, समजतो, यासाठी देखील आज रांचीला येणं माझ्यासाठी विशेष आहे.
बंधू आणि भगिनींनो , आता योगाचे अभियान मी आणि आपण सर्वानी मिळून एका वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे आणि हेच रांचीला येण्यामागचे माझे तिसरे आणि सर्वात मोठे कारण होते.
मित्रांनो, योगाभ्यास कायमच आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. इथे झारखंडमध्ये जे ‘छऊ नृत्य’ असते त्यातही आसने आणि मुद्रा व्यक्त केल्या जातात. मात्र हे देखील खरे आहे कि आधुनिक योगाचा जो प्रवास आहे तो देशाच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात अजून तितकासा पोहचलेला नाही जेवढा पोहचायला हवा होता. आता आपण सर्वानी मिळून आधुनिक योगाचा प्रवास शहरातून गावांकडे जंगलांकडे दूर सुदूर शेवटच्या व्यक्तीपर्यंत घेऊन जायचा आहे. गरीब आणि आदिवासींच्या घरापर्यंत योग पोहचवायचा आहे. मला योगाभ्यासाला गरीब आणि आदिवासीच्या जीवनाचा अभिन्न भाग बनवायचा आहे कारण गरीबांनाच आजारामुळे सर्वात जास्त वेदना आणि त्रास सोसावे लागतात. हा आजारच गरीबांना आणखी गरीब बनवतो. म्हणूनच अशा वेळी जेव्हा देशात गरीबी कमी होण्याचा वेग वाढलेला आहे योगाभ्यास त्या लोकांसाठी देखील एक मोठे माध्यम आहे जे गरीबीतून बाहेर पडत आहेत. त्यांच्या आयुष्यात योगाची स्थापना म्हणजे त्यांना आजार आणि गरीबीपासून वाचवणे हा आहे.
मित्रांनो,
केवळ सुविधांनी आयुष्य सोपे बनवणे पुरेसे नाही. औषधे आणि शस्त्रक्रिया पुरेसे नाही. आजच्या बदलत्या काळात आजारापासून (illness)वाचण्याबरोबरच मनःशांती (wellness)वर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. हीच ताकद आपल्याला योगातून मिळते. हीच योगाची भावना आहे, प्राचीन भारताचे दर्शन देखील आहे. योग केवळ तेव्हा होत नाही जेव्हा आपण अर्धा तास जमीन किंवा टेबलावर, किंवा दरी वर असतो, योग शिस्त आहे, समर्पण आहे, आणि याचे पालन संपूर्ण आयुष्यभर करायचे असते. योग- आयु, रंग, जाति, धर्म , मत, पंथ, श्रीमंत, गरीबी, प्रांत, सरहद्द चे भेद , सीमेसम्बन्धी भेदाच्या पलिकडे आहे. योग सर्वांचा आहे आणि सगळे योगाचे आहेत.
मित्रांनो गेल्या पाच वर्षात योगाला आरोग्य आणि मनःशांतीशी जोडून आमच्या सरकारने याला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा मजबूत स्तंभ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण हे म्हणू शकतो की भारतात योगप्रति जागरूकता प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक वर्गापर्यंत पोहचली आहे – ड्राइंगरूम पासून बोर्डरूम पर्यंत, शहरांमधील उद्यानापासून क्रीडा संकुलांपर्यंत, गल्लीबोळापासून वेलनेस सेंटरपर्यंत, आज चारी बाजूनी योगाची प्रचिती येते.
बंधू आणि भगिनींनो, मला तेव्हा आनंद होतो जेव्हा मी पाहतो की तरुण पिढी आपली ही प्राचीन पद्धत आधुनिकतेशी जोडते, प्रचार आणि प्रसार करते. युवकांच्या अभिनव आणि सर्जनशील कल्पनांमुळे योग पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय झाला आहे, नवसंजीवनी मिळाली आहे.
मित्रानो, आज यानिमित्ताने पंतप्रधान योग प्रोत्साहन आणि विकास पुरस्कारांती घोषणा करण्यात आली, आपल्या मंत्री महोदयांनी केली. एका परीक्षकांनी याचा निर्णय घेतला आहे आणि जगभरातून चाचपणी करून या लोकांचा शोध घेण्यात आला आहे.
ज्या मित्रांना हे पुरस्कार मिळाले आहेत, मी त्यांची तपश्चर्या आणि योग प्रति त्यांच्या समर्पणाची प्रशंसा करतो.
मित्रांनो, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय है ‘हृदयासाठी योंग ‘Yoga for Heart Care’. हृदयरोग आज संपूर्ण जगासाठी एक आव्हान बनले आहे. भारतात तर गेल्या दोन-अडीच दशकांत हृदयरोगाशी संबंधित आजारांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. दुःखद बाब ही आहे कि अतिशय कमी वयाच्या युवकांमध्येही हृदयरोगाची समस्या आता वाढत आहे. अशात हृदयरोगाप्रती जागरूकते बरोबरच योगाला देखील प्रतिबंध किंवा उपचारांचा भाग बनवणे आवश्यक आहे.
इथल्या स्थानिक योग आश्रमानाही मी विनंती करेन कि त्यांनी योगाच्या प्रसारासाठी आणखी पुढाकार घ्यावा. मग तो देवघरचा रिख्या पीठयोग आश्रम असेल, रांचीचा योगदा सत्संग सखा मठ किंवा अन्य संस्था, त्यांनीही यावर्षी हृदयरोग जागरूकतेची संकल्पना बनवून आयोजन करावे.
आणि मित्रांनो, जेव्हा आरोग्य उत्तम असते, तेव्हा आयुष्यातील नवीन शिखरे पादाक्रांत करण्याचे एक अप्रूप असते. थकलेल्या शरीराने, हिरमुसल्या मनाने स्वप्ने पाहताही येत नाहीत आणि साकार देखील करता येत नाहीत. जेव्हा आपण उत्तम आरोग्याबाबत बोलतो,काही गोष्टी पाणी, पोषण, पर्यावरण, परिश्रम- या चार गोष्टी – पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, गरजेनुसार पोषण प्राप्त व्हावे, पर्यावरण स्वच्छता- वायु पर्यावरण असेल, काहीही असेल, पाणी असेल, काहीही, आणि परिश्रम जीवनाचा भाग असेल तर उत्तम आरोग्यासाठी हे चार ‘प’ परिणाम देतात.
मित्रानो, योगदिनाच्या सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल मी जगभरातील लोकांचे आभार मानतो. योगसाधना करणाऱ्यांकडून सूर्याच्या पहिल्या किरणांचे स्वागत हे किती विलोभनीय दृष्य असते. मी तुम्हा सर्वाना आवाहन करतो कि तुम्ही योगाला आपलेसे करा आणि तुमच्या दैनंदिन व्यवहाराचा एक अविभाज्य भाग बनवा. योग प्राचीन आहे आणि आधुनिकही आहे. तो कायम आहे आणि घडतोही आहे. अनेक शतकांपासून योगाचे सामर्थ्य तसेच आहे.- निरोगी शरीर, स्थिर मन, एकात्मतेची भावना. योग ज्ञान, कर्म आणि भक्तीचा योग्य मिलाप आहे. योग प्रत्येक व्यक्तीला विचार, कृती आणि भावनिकदृष्ट्या उत्तम बनवतो.
मित्रानो, योगधारणा करण्याचे महत्व यापूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढले आहे. आपण अशा काळात जगतो आहोत जेव्हा जीवनशैली आणि तणावाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. वेगवान दैनंदिन कामकाज आणि कामाच्या ठिकाणी तणाव यामुळे हे होते. जेव्हा तरुण तडफदार युवक युवती अमली पदार्थ, मद्यपान, मधुमेह आणि अशाच प्रकारच्या वाईट प्रवृत्तींना बळी पडतात हे वाचतो ,तेव्हा मला खुप वाईट वाटते.
मित्रांनो, शांती, सामंजस्य हे योगाशी संलग्न आहेत. ५ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आपण आपले घोषवाक्य ठरवूया- शांती, सद्भावना आणि समृद्धीसाठी योग .
बंधू आणि भगिनींनो, आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सुरुवातीनंतर आम्ही अनेक प्रभावी पावले उचलली ज्यांचा लाभ पाहायला मिळत आहे. भविष्याचा विचार करून आपण योगसाधनेला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी, स्वभाव बनवण्यासाठी निरंतर काम करायचे आहे. यामुळे योगशी संबंधित साधक, शिक्षक आणि संघटनांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. योगसाधनेला कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी मनुष्यबळ तयार करणे देखील खूप आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण योगाशी संबंधित मानके आणि संस्था विकसित करू. आणि म्हणूनच आमचे सरकार याच विचाराने पुढे मार्गक्रमण करत आहे.
मित्रानो, आज जग आपल्या योगसाधनेचा स्वीकार करत असताना आपण योगाशी संबंधित संशोधनावर भर दयायला हवा. जसे आपल्या मोबाईल फोनचे सॉफ्टवेअर अद्ययावत होत असते त्याप्रमाणे आपणही योगसाधनेबाबत जगाला अवगत करायला हवे. यासाठी आपण योगसाधनेला कुठल्याही चौकटीत बांधून न ठेवणे आवश्यक आहे. योगाला वैद्यकीय, फिजिओथेरपी, कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्याशीही जोडायला हवे. एवढेच नाही, आपण योगाशी संबंधित खासगी उद्यम भावनेला देखील प्रोत्साहित करावे लागेल तेव्हाच आपण योगाचा विस्तार करू शकू.
आमचे सरकार या गरजा ओळखून अनेक क्षेत्रात काम करत आहे.
मी तुम्हाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छांसह पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा देतो. आणि मी आशा करतो कि तुम्ही सर्वजण, इथे आपण जेवढी योगासने करणार आहोत, जास्त नाही, तेवढीच, मात्र नियमितपणे त्याचा कालावधी वाढत न्यायचा, तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात अद्भुत लाभ होईल.
मी पुन्हा एकदा तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शांती, सद्भावना आणि समन्वय असलेल्या आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो.
चला, आता आपण योगाभ्यास सुरु करूया.
मी झारखंड सरकारचेही अभिनंदन करतो कि त्यांनी अतिशय कमी वेळेत एवढे मोठे आयोजन केले. त्यांना आधीपासून माहित नव्हते, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर रांचीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम करण्याचा विचार झाला. मात्र एवढ्या कमी वेळेत झारखंड-वासियांनी जी कमाल करून दाखवली, मी तुमचे, सरकारचे देखील खूप-खूप अभिनंदन करतो.
धन्यवाद.