या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि अतिशय सुंदर अशा या मैदानावर उपस्थित असलेले माझे सर्व मित्र तसेच जगभरातील सर्व योगप्रेमी यांना मी उत्तराखंड देवभूमीच्या पवित्र स्थानावरून चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण माता गंगेच्या या भूमीवर उपस्थित राहिलो आहोत हे आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे कारण या ठिकाणी चार पवित्र तीर्थस्थाने वसली आहेत, हे तेच स्थान आहे ज्या स्थानाला आदि शंकराचार्यांनी भेट दिली आणि स्वामी विवेकानंद अनेकदा या ठिकाणी येऊन गेले.
तसे पाहायला गेले तर उत्तराखंड हे अनेक दशकांपासून योगसाधनेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. उत्तराखंडच्या या पर्वतरांगा आपल्याला उत्स्फूर्तपणे योगसाधनेची आणि आयुर्वेदाची प्रेरणा देतात. अगदी एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला देखील या स्थानाला भेट दिल्यावर अतिशय आगळी वेगळी अनुभूती होते. या पवित्र भूमीमध्ये असामान्य चुंबकीय उर्जा, कंपने आणि असामान्य चैतन्य आहे.
मित्रांनो,
सर्व भारतीयांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे, जसजसा उगवता सूर्य आपल्या दिवसाच्या प्रवासात वरवर येत जाईल, सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचतील आणि सर्वत्र प्रकाश पसरेल, त्या सर्व भागांमध्ये लोक सूर्याचे स्वागत योगसाधनेने करतील.
डेहराडूनपासून डब्लिनपर्यंत, शांघायपासून शिकोगोपर्यंत, जकार्तापासून जोहान्सबर्गपर्यंत सर्वत्र योगसाधना दिसत आहे. मग तो हजारो फूटांच्या उंचीवर हिमालयातील भाग असो किंवा लख्ख सूर्यप्रकाश असलेले वाळवंट असो योग प्रत्येक स्थितीत जीवनाला समृद्ध करत आहे.
ज्यावेळी विभाजनवादी शक्तींना महत्त्व प्राप्त होते तेव्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे लोकांमध्ये विभाजन होऊ लागते, समाजात फूट पडते आणि देशांमध्ये फूट पडू लागते. ज्यावेळी समाजात फूट पडते तेव्हा कुटुंबांमध्ये कलह निर्माण होतात आणि व्यक्ती आतून खचून जाते आणि जीवनातील तणाव वाढत जातो.
विभाजनाच्या वातावरणात संतुलन साधण्यामध्ये योगसाधना उपयुक्त ठरते. आपल्याला एकजूट करण्याचे कार्य ही साधना करते.
सध्याच्या या गतिमान आधुनिक जगात शरीर, मन, भाव आणि आत्मा यांना एकत्र करत योगविद्या शांतता निर्माण करित आहे.
कुटुंबातील सदस्याला कुटुंबाशी जोडून ती शांतता निर्माण करते.
कुटुंबाला समाजाविषयी संवेदनशील बनवून ती समाजात एकात्मता निर्माण करते.
समाज राष्ट्रीय एकात्मतेचे दुवे बनतात.
आणि अशा प्रकारचे देश जगात शांतता आणि एकात्मता निर्माण करतात आणि बंधुभावाच्या या भावनेमुळे मानवतेची जोपासना होऊ लागते आणि तिला बळ मिळते.
म्हणजेच योग व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि जगाला एकत्र करतो आणि संपूर्ण मानवतेला एकत्र करतो.
ज्यावेळी योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर करण्यात आला, त्यावेळी हा अशा प्रकारचा पहिला ठराव होता जो जगातील जास्तीत जास्त देशांकडून सह-पुरस्कृत करण्यात आला होता आणि संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात हा अशा प्रकारचा पहिला प्रस्ताव होता जो सर्वात कमी वेळात संमत झाला. आणि आज जगातील प्रत्येक नागरिक, जगातील प्रत्येक देश योगसाधनेला आपले मानत आहे आणि भारतातील नागरिकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की आपण या महान वारशाचे वारसदार आहोत, या महान परंपरेचा वारसा आपण जतन केला आहे.
जर आपण या वारशाचा अभिमान बाळगू लागलो आणि आपण काळाशी सुसंगत नसलेल्या गोष्टींचा त्याग केला तर तशा प्रकारच्या गोष्टी देखील टिकून राहत नाहीत.मात्र काळानुरूप काय योग्य आहे? आपले भविष्य घडवण्यासाठी काय उपयोगी आहे, जर आपण अशा प्रकारच्या आपल्या वारशाचा अभिमान बाळगला तर जगाला देखील त्याचा अभिमान बाळगण्यामध्ये कोणताही कमीपणा वाटणार नाही. पण जर आपल्यालाच आपल्या क्षमतेवर आणि सामर्थ्यावर विश्वास नसेल तर कोणीही तिचा स्वीकार करणार नाही. एखाद्या कुटुंबाने आपल्याच बालकाचे मनोबल सातत्याने कमी केले आणि त्या बालकाला त्या भागात चांगला मानसन्मान मिळावा अशी अपेक्षा ते कुटुंब बाळगत असेल तर ते शक्य होणार नाही. ज्यावेळी पालक, ज्यावेळी कुटुंब, ज्यावेळी भाऊ आणि बहिणी सर्वांनीच जर त्या बालकाचा स्वीकार केला तरच ते शेजारी देखील त्या बालकाला त्याच प्रकारे स्वीकारतील.
आज योगविद्येने हे सिद्ध केले आहे की, भारताने पुन्हा एकदा स्वतःला योगसामर्थ्याशी जोडले आहे, अगदी तशाच प्रकारे जगाने देखील योगसाधनेशी स्वतःचा संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे.
आज योगसाधना जगातील एकीकरणाच्या सर्वाधिक प्रभावी शक्तींपैकी एक शक्ती बनली आहे.
मी हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगत आहे की जर आपण जगभरात इतक्या लोकांना योगसाधनेसाठी एकत्र आणू शकत असू तर अतिशय आश्चर्यकारक वस्तुस्थिती जगासमोर उघड होत जाईल.
योगसाधनेसाठी एकत्र आलेले लोक, तुमच्यासारखे विविध देशातील योगसाधनेसाठी जमा झालेले लोक, उद्यानांमध्ये, खुल्या मैदानांमध्ये, रस्त्यांच्या कडेला, कार्यालयांमध्ये आणि घरांमध्ये, रुग्णालयांमध्ये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, ऐतिहासिक इमारतींमध्ये या आगळ्यावेगळ्या बंधुभावाच्या आणि जागतिक मैत्रीच्या भावनेला आणखी उर्जा प्रदान करत आहेत.
मित्रांनो, जगाने योगाचा अंगिकार केला आहे आणि दरवर्षी ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो त्यातून त्याची प्रचिती येत आहे.
प्रत्यक्षात योग दिन मानवाचे उत्तम आरोग्य आणि कल्याण करण्याच्या उपायांच्या शोधाची एक सर्वात मोठी लोकचळवळ बनली आहे.
मित्रांनो, टोकियोपासून टोरांटोपर्यंत, स्टॉकहोमपासून साओ पावलोपर्यंत योगविद्या लाखो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकणारी शक्ती बनली आहे.
योग सुंदर आहे कारण तो प्राचीन असूनही आधुनिक आहे आणि तरीही सातत्याने त्यात उत्क्रांती होत आहे.
यामध्ये आपल्या भूतकाळातील सर्वोत्तम गोष्टी आहेत आणि आपल्या भविष्यासाठी तो आशेचा किरण दाखवत आहे.
आपल्याला एक व्यक्ती किंवा समाज म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांवर योगविद्येमध्ये अतिशय समर्पक तोडगा आहे.
आपले जग असे आहे जे कधीही झोपत नाही. प्रत्येक क्षणी जगात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी काही तरी घडतच असते.
अतिशय वेगाने होत असलेल्या घडामोडींमुळे मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होत असतो. जगभरात दरवर्षी सुमारे एक कोटी 80 लाख व्यक्ती हृदयाशी संबंधित आजारांनी मरण पावतात असे वाचल्यावर मला धक्का बसला. सुमारे सोळा लाख लोक मधुमेहाच्या विकाराचा सामना करताना बळी जातात.
एक शांत, नवनिर्मितीकारक आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग म्हणजे योगसाधना आहे. तणाव आणि अस्वस्थपणा दूर करण्याचा मार्ग ही साधना दाखवते. विभाजनाऐवजी योगसाधनेमुळे नेहमीच एकीकरण होते. द्वेषभावना वाढवण्याऐवजी योगसाधना सामावून घेण्याची वृत्ती वाढवते. वेदना वाढवण्याऐवजी योगसाधना बरे होण्याची प्रक्रिया करते.
योगसाधनेच्या सरावात एक शांततापूर्ण, आनंदी आणि बंधुभावाचे युग निर्माण करण्याची क्षमता आहे.
अधिकाधिक लोक योगसाधना करू लागल्यामुळे जगाला आता त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या जास्तीत जास्त लोकांची गरज भासत आहे. गेल्या तीन वर्षात अनेकांनी योगविद्येचे प्रशिक्षण सुरू केले आहे, अनेक नव्या संस्था स्थापन झाल्या आहेत आणि अगदी तंत्रज्ञानाने देखील लोक योगविद्येशी जोडले जात आहेत. हे जे वातावरण निर्माण झाले आहे त्या वातावरणाचा येत्या काळात तुम्ही लाभ घ्यावा असे मी आवाहन करत आहे.
हा योगदिन योगविद्येशी आपले संबंध अधिक दृढ करण्याची एक संधी बनावा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याने योगसाधनेची प्रेरणा द्यावी. या दिवसाचा हा चिरंतन प्रभाव ठरू शकतो.
मित्रांनो, योगविद्येने जगाला आजारपणाच्या मार्गापासून दूर करून निरोगीपणाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळेच जगभरात योगविद्येला जास्तीत जास्त प्रमाणात झपाट्याने स्वीकारले जात आहे.
कॉवेन्ट्री विद्यापीठ आणि रॅडबाउंड विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे निष्पन्न झाले आहे की योगसाधनेमुळे केवळ आपल्या शरीरालाच आराम मिळत नाही तर आपल्या आजारपण आणि वैफल्य निर्माण करणाऱ्या डीएनएमध्ये होणाऱ्या मॉलिक्युलर प्रक्रियांना उलट दिशा दिली जाते.
जर आपण योगविद्येमधील श्वसनांचे प्रकार आणि योगासनांचा नियमित सराव केला तर चांगल्या आरोग्याचा लाभ होण्याबरोबरच अनेक आजारांपासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो. योगासनांच्या नियमित सरावाचा परिणाम एखाद्या कुटुंबाच्या नियमित वैदयकीय खर्चावर होतो आणि या खर्चात कपात होते.
प्रत्येक कामामध्ये सहभागी होण्यासाठी, राष्ट्रउभारणीच्या कार्यात योगदान देण्यासाठी आपण निरोगी असणे अतिशय आवश्यक असते आणि यामध्ये योगासनांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे.
म्हणूनच मी आज जे लोक योगसाधना करत आहेत त्या सर्वांना असे आवाहन करतो की ही साधना नियमित करा. ज्यांनी अद्याप योगसाधनेची सुरुवात केलेली नाही त्यांनी ताबडतोब ही साधना सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.
योगविद्येच्या वाढत्या प्रसारामुळे सर्व जग भारतात आले आहे आणि भारत जगाच्या आणखी जवळ आला आहे. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज जगात योगविद्येला जे स्थान मिळाले आहे ते स्थान यापुढील काळात आणखी बळकट करण्यात येईल.
निरोगी आणि आनंदी मानवतेसाठी योगाभ्यासाचे ज्ञान आणखी वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. आपली जबाबदारी लक्षात घेऊन आपले प्रयत्न आणखी गतिमान करण्यासाठी कृपया सर्वांनी पुढे या.
या पवित्र भूमीवरून मी पुन्हा एकदा जगभरातील सर्व योगप्रेमींना माझ्या शुभेच्छा देत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तराखंडच्या सरकारचे देखील आभार मानतो.
धन्यवाद.