“आता देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्ती पर्यंतचा आपला प्रवास नव्या गरजा आणि नव्या आव्हानांचा सामना करण्यास अनुकूल अशी कृषीव्यवस्था उभारण्याचा असेल"
आपल्याला आता आपली शेती रासायनिक प्रयोगशाळांतून बाहेर काढत निसर्गाच्या प्रयोगशाळेत न्यायची आहे. जेव्हा मी नैसर्गिक प्रयोगशाळा असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्णपणे विज्ञान-आधारित असा आहे"
"आपल्याला आपले प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे, एवढंच नाही, तर त्यावर नव्याने संशोधन करुन हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवायचं आहे."
“देशातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकाऱ्यांना या नैसर्गिक शेतीचा सर्वाधिक लाभ मिळेल.”
“भारत आणि भारतातील शेतकरी, एकविसाव्या शतकात, ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’म्हणजेच ‘लाईफ’या जागतिक अभियानाचे नेतृत्व करतील.”
“या अमृत महोत्सवात, देशातल्या प्रत्येक पंचायतक्षेत्रातले किमान एक तरी गाव, नैसर्गिक शेतीकडे वळेल असे प्रयत्न करायला हवेत.”
“चला, स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सव काळात, भारतमातेची भूमी रासायनिक खते आणि किटकनाशकांपासून मुक्त करण्याचा संकल्प करुया: पंतप्रधान

नमस्कार,

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गृह आणि सहकार मंत्री अमित भाई शाह, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर जी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, इतर सर्व मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने जोडले गेलेले माझे शेतकरी बंधू भगिनी, देशाच्या कृषी क्षेत्रासाठी, शेती आणि शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे.  

मी देशभरातील शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीवरच्या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्याची विनंती केली होती. आणि ज्याप्रमाणे कृषिमंत्री तोमरजींनी सांगितलं, जवळ जवळ 8 कोटी शेतकरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याशी जोडले गेले आहेत. मी सर्व शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करतो, अभिनंदन करतो. मी आचार्य देवव्रतजींचे देखील मनापासून अभिनंदन करतो. मी अगदी लक्षपूर्वक एका विद्यार्थ्याप्रमाणे आज त्याचं बोलणं ऐकत होतो. मी स्वतः शेतकरी नाही, पण नैसर्गिक शेतीसाठी काय हवं असतं, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे अगदीच सरळ सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलं आणि मला पूर्ण विश्वास आहे आज त्याचं हे मार्गदर्शन आणि मी मुद्दाम आज पूर्ण वेळ त्यांना ऐकायला बसलो होतो. कारण मला माहित होतं, की त्यांना जी सिद्धी प्राप्त झाली आहे,त्यातून ते हा प्रयोग यशस्वीपणे पुढे नेतील. आपल्या देशातले शेतकरी देखील त्यांच्या फायद्याच्या या गोष्टींना कधीच कमी लेखणार नाहीत, कधीच विसरणार नाहीत. 

मित्रांनो, 

हे संमेलन जरी गुजरातमध्ये होत असलं, तरी याची व्याप्ती, याचा प्रभाव, संपूर्ण भारतासाठी आहे. भारताच्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे. शेतीचे वेगवगळे पैलू असोत, अन्न प्रक्रिया असो, नैसर्गिक शेती असो, हे विषय 21 व्या शतकात भारतीय शेतीचा कायापालट करण्यात खूप मदत करतील. या संमेलनादरम्यान इथे हजारो कोटी रुपयांच्या करारांबाद्द्ल चर्चा झाली, त्यात प्रगती देखील झाली आहे. यात देखील इथेनॉल, ऑरगॅनिक शेती आणि अन्नप्रक्रिया याविषयी जो उत्साह दाखवला, नव्या शक्यतांचा विस्तार बघितला. मला या गोष्टीचा देखील आनंद आहे, की गुजरातमध्ये आम्ही तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीच्या संतुलनाचे जे प्रयोग केले होते, ते संपूर्ण देशाला दिशा दाखवत आहेत. मी पुन्हा एकदा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजींचे विशेष आभार मानतो, त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल इतक्या सोप्या आणि सरळ शब्दांत स्वानुभवाच्या गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या. 

मित्रांनो, 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज भूतकाळाचे अवलोकन करण्याची आणि त्या अनुभवातून धडा घेऊन नवे मार्ग बनविण्याची वेळ आहे. स्वातंत्र्यानंतर देशात ज्या प्रकारे शेती करण्यात आली, ज्या दिशेने ती वाढली, ते आपण सर्वांनी खूप जवळून बघितले आहे. आता स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षाकडे जो आपला प्रवास आहे, येणाऱ्या 25 वर्षांचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात नव्या गरजा, नवी आव्हानं यानुसार आपल्या शेतीत बदल करण्याचा आहे. गेल्या 6-7 वर्षांत बियाणांपासून बाजारापर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकामागे एक अनेक पावलं उचलली गेली आहेत. मृदा परीक्षणापासून शेकडो बियाणे तयार करण्यापर्यंत, पीएम किसान सम्मान निधी पासून उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्यापर्यंत, सिंचनाचे मजबूत जाळे निर्माण करण्यापासून तर किसान रेलपर्यंत, अनेक पावलं उचलली गेली आहेत. आणि श्रीमान तोमरजींनी या सगळ्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला आहे. शेतीसोबतच पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन आणि सौर उर्जा, जैवइंधन यासारखे उत्पन्नाचे अनेक पर्यायी साधनं शेतकऱ्यांना सतत उपलब्ध करून दिले जात आहेत.  खेड्यांत साठवणूक, शीतगृहे आणि अन्नप्रक्रिया व्यवस्थांना बळ देण्यासाठी शेतकऱ्यांना स्रोत उपलब्ध करून दिले जात आहेत, शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीचे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र या सर्वांसोबतच एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. जेव्हा भूमीच नापिक होईल तेव्हा काय करायचं? जेव्हा हवामान साथ देणार नाही, जेव्हा धरतीच्या गर्भातलं पाणी मर्यादित असेल तेव्हा काय होईल? आज जगभर शेतीला या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.  रासायनिक खतांची हरित क्रांतीमध्ये महत्वाची भूमिका होती, हे खरं आहे. मात्र हे देखील तितकंच खरं आहे, आपल्याला याचे पर्याय शोधण्यावर देखील काम करत राहावं लागणार आहे आणि त्यावर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. शेतीत लागणारी कीटनाशके आणि खतं, आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागतात. इतर देशांतून अब्जावधी रुपये खर्च करून आणावी लागतात. यामुळे शेतीत करावी लागणारी गुंतवणूक वाढत आहे, शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे आणि गरिबांना महागाईचे चटके बसत आहेत. ही समस्या शेतकरी आणि सर्व देशवासियांच्या आरोग्याशी देखील निगडीत आहे. म्हणूनच सतर्क राहण्याची गरज आहे, जागरूक राहण्याची गरज आहे. 

 

मित्रांनो, 

गुजराती भाषेत एक म्हण आहे, प्रत्येक घरात वापरली जाते “पानी आवे ते पहेला पाल बांधे.”म्हणजे, पाऊस पडला की सर्वात पहिले पाण्याला बांध घाला. हे आपल्याकडे कोणीच करत नाही. याचा अर्थ असा आहे, उपचारापेक्षा पथ्य कधीही चांगलं. शेतीच्या समस्या गंभीर होण्यापूर्वीच हालचाल करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्याला आपली शेती रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून काढून नैसर्गिक प्रयोगशाळेत आणावीच लागेल. जेव्हा मी नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणतो, तेव्हा ती पूर्णपणे विज्ञानावर आधारित असते. हे कसं होतं, या बाबतही आचार्य देवव्रत जींनी सविस्तर सांगितलं देखील आहे. आपण एका छोट्या चित्रफितीत देखील बघितलं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं पुस्तक घेऊन देखील युट्युबवर आचार्य देवव्रत जींचं नाव शोधलं तर त्यांची भाषणं सापडतील. जी ताकद खतांमध्ये आहे तीच बियाणांमध्ये, तेच तत्व निसर्गात देखील उपलब्ध आहे. आपल्याला फक्त त्या जीवाणूंची जमिनीतली संख्या वाढवायची आहे, जे जमिनीचा कस वाढवतात. अनेक तज्ञ म्हणतात की यात देशी गायींची महत्वाची भूमिका असते. जाणकार सांगतात शेण असो, गोमूत्र असो, यापासून आपण या समस्यांवर उपाय शोधू शकतो, जे पिकाचं रक्षण देखील करतील आणि जमिनीचा कस देखील वाढवतील. बियाणांपासून मातीपर्यंत सर्व सामायांचे उपाय नैसर्गिक पद्धतीने करता येऊ शकतात. या शेतीत न खतांवर खर्च करावा लागोत, न कीटनाशकांवर. यात सिंचनाची गरज देखील अत्यल्प असते आणि पूर आणि दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती देखील या असते. कमी सिंचन असलेली जमीन असो अथवा मुबलक पाणी असलेली, नैसर्गिक शेतीत शेतकरी एका वर्षात अनेक पीकं घेऊ शकतो. इतकंच नाही, गहू - धान - डाळी, शेतातून जो कचरा निघतो, पिकांचे अवशेष निघतात, त्याचा देखील यात सदुपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे कमी गुंतवणूक, जास्त फायदा. हीच तर आहे, नैसर्गिक शेती.   

मित्रांनो, 

आज जग जेवढे आधुनिक होत आहे, तेवढीच 'बॅक टू बेसिक'कडे  (मुळाकडे) परतायची ओढ वाढत आहे. या 'बॅक टू बेसिक' चा अर्थ काय? याचा अर्थ आहे,  आपल्या मुळाशी जोडले जाणे! ही गोष्ट तुम्हा शेतकरी मित्रांशिवाय अधिक कोण चांगल्या प्रकारे समजू शकेल? आपण जसे मुळांना पाणी घालतो तसा रोपांचा विकास होतो. भारत तर  एक कृषिप्रधान देश आहे. आपला समाज शेतीभोवती विकसित झाला आहे, परंपरा जोपासल्या गेल्या आहेत, सणउत्सवांचा उगम झाला आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातले शेतकरी मित्र या कार्यक्रमात आहेत. तुम्हीच मला सांगा, तुमच्या परिसरातील आहार, जीवनशैली, सण, परंपरा असे काही तरी आहे का, ज्याच्यावर आपल्या शेतीचा , पिकांचा  परिणाम होत नाही? जर आपली संस्कृती  शेतीने एवढी समृद्ध आहे तर शेतीच्या बाबतीत आपले ज्ञान आणि विज्ञान  किती समृद्ध असेल ? ते किती शास्त्रीय असेल ? म्हणूनच बंधूभगिनींनो, आज जग जेव्हा ऑरगॅनिकबद्दल बोलते तेव्हा त्याचा संदर्भ नैसर्गिकतेशी असतो, आज जेव्हा 'बॅक टू बेसिक' बद्दल बोलले जाते तेव्हा त्याचे मूळ भारताशी जोडलेले दिसून येते. 

मित्रांनो,

कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक तज्ज्ञ  येथे उपस्थित आहेत ज्यांनी या विषयावर व्यापक अभ्यास केला  आहे. ऋग्वेद आणि अथर्ववेदापासून आपल्या पुराणांपर्यंत, कृषी-पराशर आणि काश्यपीय कृषी सुक्तासारख्या  प्राचीन ग्रंथांपर्यंत आणि दक्षिणेतील तामिळनाडूच्या संत तिरुवल्लुवर यांच्यापासून  उत्तरेतील शेतकरी  कवी घाघ यांच्यापर्यंत, आपल्याकडे  शेतीवर किती सखोल संशोधन केले गेले आहे, हे आपण जाणतच असाल.  जसे एक श्लोक आहे-

गोहितः क्षेत्रगामी च,

कालज्ञो बीज-तत्परः।

वितन्द्रः सर्व शस्याढ्यः,

कृषको न अवसीदति॥

अर्थात्,

जो गोधनाचे, पशुधनाचे हित जाणतो, ऋतू आणि काळ जाणतो, बियांणाबाबत जो माहिती ठेवतो आणि जो आळस करत  नाही, असा शेतकरी कधीही अडचणीत येऊ  शकत नाही, गरीब होऊ शकत नाही. हा एक श्लोक नैसर्गिक शेतीचे सूत्रदेखील आहे आणि नैसर्गिक शेतीची ताकददेखील सांगणारा आहे.  यामध्ये नमूद केलेली सर्व संसाधने नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. तसेच जमीन सुपीक कशी करावी, कोणत्या पिकाला पाणी कधी द्यावे, पाण्याची बचत कशी करावी यासाठी किती सूत्रे दिली आहेत. आणखी एक  लोकप्रिय श्लोक आहे-

नैरुत्यार्थं हि धान्यानां जलं भाद्रे विमोचयेत्।

मूल मात्रन्तु संस्थाप्य कारयेज्जज-मोक्षणम्॥

म्हणजेच पिकाचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी आणि ती जोमाने वाढण्यासाठी भाद्रपद  महिन्यात पाणी काढून टाकावे.शेतात पाणी फक्त मुळांसाठीच राहिले पाहिजे. अशाच प्रकारे कवी घाघ यांनीही लिहिले आहे-

गेहूं बाहें, चना दलाये।

धान गाहें, मक्का निराये।

ऊख कसाये।

म्हणजे खोलवर नांगरणी करण्याने गहू, खुडणीमुळे हरभरा, वारंवार पाणी मिळाल्याने धान,खुरपणीमुळे मका आणि आधी पाण्यात सोडून नंतर ऊस पेरल्याने पीक चांगले येते. तुम्ही कल्पना करू शकता, जवळजवळ  दोन हजार वर्षांपूर्वी, तामिळनाडूतील संत तिरुवल्लुवर  यांनीही शेतीशी संबंधित कितीतरी  सूत्रे सांगितली  होती. त्यांनी सांगितले होते- 

तोड़ि-पुड़ुडी कछ्चा उणक्किन,

पिड़िथेरुवुम वेंडाद् सालप पडुम

अर्थात, जमीन जर कोरडी असेल तर जमिनीचा  एक औंस एक चतुर्थांशापर्यंत  कमी होईल, यामुळे  मूठभर खत नसतानाही ती भरघोस पीक देईल. 

 

मित्रांनो,

शेतीशी संबंधित आपले हे प्राचीन ज्ञान आपल्याला पुन्हा शिकण्याची आवश्यकता आहेच शिवाय आधुनिक काळानुसार त्याला आकार देण्याचीही गरज आहे. या दिशेने आपल्याला  नवे संशोधन करावे लागेल, प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक चौकटीत बसवावे लागेल. या दिशेने आपल्या आयसीएआरसारख्या संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे  मोठी भूमिका बजावू शकतात. आपल्याला केवळ शोधनिबंध आणि सिद्धांतांपुरती माहिती मर्यादित ठेवायची नाही, तर तिचे व्यावहारिक यशात रूपांतर करायचे आहे. प्रयोगशाळा  ते जमीन असा आपला  प्रवास असेल. याची सुरुवातही आपल्या या संस्था  करू शकतात. नैसर्गिक शेती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आपण करू  शकता.  यातून यश मिळवणे शक्य असल्याचे जेव्हा तुम्ही दाखवून द्याल तेव्हा सामान्य माणूसही लवकरात लवकर याच्याशी जोडला जाईल. 

मित्रांनो, 

नवीन शिकण्यासोबतच शेतीत आलेल्या  चुकीच्या पद्धती आपण मागे सोडायला हव्या.  शेतात आग लावल्याने जमिनीची उपजाऊक्षमता  नष्ट होते, असे तज्ज्ञ सांगतात. आपण पाहतो की माती जेव्हा भाजली जाते तेव्हा तिचे रूपांतर विटेत करता येते आणि वीट इतकी मजबूत होते की तिच्यापासून इमारत बांधली जाऊ शकते.  पण आपल्याकडे पिकांचे अवशेष जाळण्याची परंपराच जणू पडल्यासारखे झाले आहे. माती जळली की तिचे रूपांतर विटेत होते हे माहीत आहे  तरीही आपण माती तापवतच राहतो. तसेच रसायनांशिवाय पीक चांगले येणार नाही, असाही एक  भ्रम निर्माण झाला आहे. तर सत्य अगदी उलट आहे. पूर्वी रसायने नव्हती, पण पीक चांगले येत होते. माणसाच्या  विकासाचा इतिहास याचा साक्षीदार आहे. तमाम आव्हाने असतानाही कृषियुगात माणसाचा  सर्वात वेगाने विकास झाला, प्रगती झाली. कारण तेव्हा योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केली जात होती. तेव्हा अध्ययनाची प्रक्रिया निरंतर सुरू होती. आज औद्योगिक युगात आपल्याकडे तंत्रज्ञानाची ताकद आहे, किती संसाधने आहेत, हवामानाचीही माहिती आहे! आता आपण शेतकरी मिळून नवा इतिहास घडवू शकतो. जागतिक तापमानवाढीमुळे जग चिंतेत असताना भारतातील शेतकरी आपल्या पारंपारिक ज्ञानातून त्यावर उपाय शोधू शकतो. एकत्र मिळून आपण काहीतरी करू शकतो.

बंधू आणि भगिनींनो,

नैसर्गिक शेतीचा सर्वाधिक फायदा ज्यांना होईल ते आपल्या देशातील 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. असे  अल्पभूधारक शेतकरी, ज्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांचा खूप मोठा खर्च   रासायनिक खतांवर होतो. जर ते नैसर्गिक शेतीकडे वळले तर त्यांची स्थिती सुधारू शकेल. 

बंधू आणि भगिनींनो,

नैसर्गिक शेतीबद्दलचे गांधीजींनी सांगितलेल्या या गोष्टी अगदी तंतोतंत खऱ्या आहेत, जिथे शोषण असेल, तिथे पोषण नसेल. गांधीजी म्हणायचे की माती वरखाली करायला विसरणे,  खुरपणी विसरणे म्हणजे एक प्रकारे स्वतःला विसरण्यासारखेच आहे. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक राज्यात या दृष्टीने सुधारणा होत असल्याबद्दल मला समाधान वाटते. अलीकडच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. यातील अनेक स्टार्टअप्स आहेत,  ते तरुणांचे आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पारंपरिक  कृषी विकास योजनेचाही त्यांना लाभ झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत असून या प्रकारच्या शेतीकडे वळण्यासाठी  मदतही करण्यात येत आहे.

बंधू आणि भगिनींनो ,

ज्या राज्यांमधले  लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीत सहभागी झाले आहेत, त्यांचे अनुभव उत्साहवर्धक आहेत. गुजरातमध्ये आम्ही खूप पूर्वीपासून नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. आज गुजरातच्या अनेक भागात त्याचे सकारात्मक परिणाम  दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशातही या शेतीबद्दलचे  आकर्षण झपाट्याने वाढत आहे. आज मी प्रत्येक राज्याला, प्रत्येक राज्य सरकारला, नैसर्गिक शेती लोकचळवळ व्हावी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करतो. या अमृतमहोत्सवात प्रत्येक पंचायतीतले किमान एक गाव नैसर्गिक शेतीशी जोडले जाईल, हा प्रयत्न आपण सर्वजण करू शकतो.आणि मला शेतकरी बांधवांनाही सांगायचे आहे, तुमची जर 2 एकर किंवा  5 एकर जमीन असेल तर संपूर्ण जमिनीवरच प्रयोग करा,असे मी सांगणार नाही.  स्वतः थोडा अनुभव घ्या.  शेतीतला  थोडा भाग घ्या, अर्धा भाग  घ्या , एक चतुर्थांश भाग घ्या , एक भाग निश्चित करून त्यात हा प्रयोग करा. त्यात फायदा होताना दिसल्यावर  प्रयोगाचे क्षेत्र थोडे विस्तारा.  एक- दोन वर्षात हळूहळू  तुम्ही संपूर्ण शेती या पद्धतीने करू लागाल. तुम्ही तुमचे क्षेत्र विस्तारत जाल.  माझे सर्व गुंतवणूकदार साथीदारांना आवाहन आहे की हीच वेळ आहे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये, यांच्या  उत्पादनांच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची. त्यासाठी देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगाची बाजारपेठ आपली वाट पाहत आहे. भविष्यातल्या संधींसाठी आपल्याला आजच  काम करावे लागेल.

मित्रांनो,

या अमृत काळात जगाला, अन्नसुरक्षा  आणि निसर्गाशी समन्वयाचा  सर्वोत्तम उपाय आपल्याला भारतातून, द्यायचा आहे. हवामान बदल परिषदेमध्ये, मी जगाला पर्यावरणासाठी जीवनशैली म्हणजेच' LIFE 'हे जागतिक अभियान करण्याचे आवाहन केले. 21व्या शतकात याचे नेतृत्व भारत  करणार आहे, भारताचा शेतकरी ते करणार आहे. चला तर मग स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भारतमातेची भूमी रासायनिक खते आणि कीटकनाशकांपासून मुक्त करण्याचा संकल्प करूया. जगाला निरोगी पृथ्वी, निरोगी जीवनाचा मार्ग दाखवूया. आज देशाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारत आत्मनिर्भर तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याची शेती आत्मनिर्भर होईल, प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर होईल आणि हे तेव्हाच घडू शकते जेव्हा अनैसर्गिक खते आणि औषधांऐवजी आपण भारतमातेच्या   मातीचे संवर्धन गोबरधनाने करू , नैसर्गिक घटकांनी करू. प्रत्येक देशवासीयाच्या हितासाठी, प्रत्येक घटकाच्या  हितासाठी, प्रत्येक जीवाच्या हितासाठी नैसर्गिक शेती,ही आपण एक लोकचळवळ करू , असा विश्वास व्यक्त करून मी या उपक्रमासाठी गुजरात सरकारचे,गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे या उपक्रमासाठी, संपूर्ण  गुजरातमध्ये त्याला लोकचळवळीचे रूप देण्यासाठी आणि आज संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी  मी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Tourism Sector on the Rise: Growth, Innovation, and Future Prospects

Media Coverage

India’s Tourism Sector on the Rise: Growth, Innovation, and Future Prospects
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi congratulates President Trump on historic second term
January 27, 2025
Leaders reaffirm their commitment to work towards a mutually beneficial and trusted partnership
They discuss measures for strengthening cooperation in technology, trade, investment, energy and defense
PM and President Trump exchange views on global issues, including the situation in West Asia and Ukraine
Leaders reiterate commitment to work together for promoting global peace, prosperity and security
Both leaders agree to meet soon

Prime Minister Shri Narendra Modi spoke with the President of the United States of America, H.E. Donald J. Trump, today and congratulated him on his historic second term as the 47th President of the United States of America.

The two leaders reaffirmed their commitment for a mutually beneficial and trusted partnership. They discussed various facets of the wide-ranging bilateral Comprehensive Global Strategic Partnership and measures to advance it, including in the areas of technology, trade, investment, energy and defence.

The two leaders exchanged views on global issues, including the situation in West Asia and Ukraine, and reiterated their commitment to work together for promoting global peace, prosperity and security.

The leaders agreed to remain in touch and meet soon at an early mutually convenient date.