येथे यायच्या आधी मला कोणीतरी सांगितले होते की, लेह मध्ये खूप थंडी आहे. तापमान उणे आहे. इतक्या थंडीत तुम्ही सर्व इथे आलात, खरंच मी भारावून गेलो आहे आणि तुम्हाला नमन करतो. विमानतळावर उतरल्यावर मी पाहिले की, वयोवृध्द माता विमानतळा बाहेर आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. इतक्या उण्या तापमानात त्या खुल्या जागेत उभ्या होत्या. मी देखील कारमधून उतरून त्यांना नमन करण्यासाठी खाली उतरलो. मन प्रफुल्लित झाले. हे प्रेम, आशीर्वाद, मातांचे हे प्रेम आणि ते ही इतक्या विपरीत परिस्थितीत जेव्हा निसर्ग आपली साथ देत नसेल तेव्हा यातून एक नवीन ऊर्जा मिळते, एक नवीन ताकद मिळते. मला जी काही थोडीफार थंडी लागत होती ती तुम्हा सर्वांची ही आपुलकी पाहून हे प्रेम बघून, ती अजून कमी झाली आहे.
व्यासपीठावर उपस्थित जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या जम्मू-काश्मीरचे पुत्र डॉ. जितेंद्र सिंह जी, जम्मू काश्मीर विधानपरिषदेचे अध्यक्ष हाजी अनायत अली जी, लडाख स्वेग डोंगर विकास परिषद लेह चे अध्यक्ष फिरोज अहमद जी, विधानपरिषदेचे सदस्य चेरिंग डोरेजे आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो…
लडाख शूरवीरांची भूमी आहे. मग 1947 असो किंवा 1962 किंवा मग कारगिलचे युद्ध. इथल्या आहुती सैनिकांनी लेह आणि कारगिलच्या बहादूर लोकांनी देशाच्या सुरक्षेची खात्री दिली आहे. इतक्या सुंदर डोंगर रांगांनी सुशोभित लडाख अनेक नद्यांचा स्रोत देखील आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी ही स्वर्गीय भेट आहे. 9-10 महिन्यातच मला पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत राहता.प्रत्येक समस्येला आव्हान देता. ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तुम्हा सर्वांसाठी मला अजून जोमाने काम करायचे आहे. तुम्ही जे प्रेम मला देता…विकास करून मला ते व्याजासह तुम्हाला परत द्यायचे आहे. हवामान तुम्हा सगळ्यांसाठी कठीण परिस्थितीत घेऊन येतं याची मला जाणीव आहे. विजेची समस्या असते, पाण्याची समस्या असते. आजारपण आले तर समस्या होते. जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करून ठेवावी लागते. दूरवर भटकंती करावी लागते. मी पूर्वी जेव्हा माझ्या पक्षाचे संघटनेचे काम करायचो तेव्हा मला इथे राहण्याचे सौभाग्य मिळाले होते. दीर्घकाळ तुम्हा लोकांमध्ये राहिलो आहे. मी जेव्हा इथे राहिलो होतो तेव्हा इथल्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करताना स्वतःहून पाहिले आहे.
मित्रांनो, याच समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. आणि याचसाठी मी स्वतः वारंवार लेह, लडाख आणि जम्मू- काश्मीरला येत असतो. गेल्यावेळी विजेशी संबंधित अनेक प्रकारच्या प्रकल्पांचा शिलान्यास आणि लोकार्पण केले होते. तुमचे आयुष्य सुकर करणाऱ्या अंदाजे 3 हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे आज उद्घाटन, शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात आले तुम्ही पाहिलेच.
द्राज जलविद्युत प्रकल्पामुळे लेह आणि कारगिलच्या अनेक गावांना मुबलक आणि स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल. श्रीनगर उल्लेस्तीन दराज कारगिल ट्रान्समिशन रॅक चे शिलान्यास करण्याची संधी मला मिळाली होती आणि आज याचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य देखील मला प्राप्त झाले. 2 हजार कोटींहून अधिक खर्च करून पूर्ण करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे लेह लडाख ची विजेची समस्या कमी होईल.
मित्रांनो, आमच्या सरकारची काम करण्याची हीच पद्धत आहे. अडवून ठेवण्याची जुनी संस्कृती देशाने मागे टाकली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मला ही अडवून ठेवण्याची आणि फिरवत ठेवण्याची परंपरा देशातून हद्दपार करायची आहे. ज्या प्रकल्पाचा शिलान्यास केला जातो त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जाते.
बंधू आणि भगिनींनो, आज ज्या प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि शिलान्यास केला आहे त्यामुळे विजेसोबतच लेह-लडाखची देश आणि जगातील इतर शहरांसोबत कनेक्टिव्हिटी वाढेल, पर्यटन वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि इथल्या तरुणांना शिक्षणासाठी इथेच चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. इथले हवामान इतके सुंदर आहे की, इथे जर आपण उत्तम दर्जाची शैक्षणिक संस्था स्थापन केली तर देशातील कानाकोपऱ्यातील तरुण लेह लडाख मध्ये शिकायला येतील हे मी विश्वासाने सांगतो. आपण अशी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि माझ्या डोक्यात अशी अनेक स्वप्ने आहेत.
मित्रांनो, आपल्या सर्वांचे आदरणीय महान कुशक बकुला रिंपोचिजे यांनी आपले संपूर्ण आयुष्य एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खर्ची केले. लेह – लडाख ला उर्वरित भारताशी जोडणे आणि देशाची एकता आणि अखंडतेची भावना अधिक मजबूत करणे हेच पूज्य रिंपोचिजे यांचे स्वप्न होते.
त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद सरकार इथे कनेक्टिव्हिटीचा विस्तार करत आहे. लेह-लडाखला रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडणाऱ्या दोन नवीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. या क्षेत्राला पहिल्यांदाच रेल्वे नाकाशाशी जोडणारी रेल्वे लाईन आणि कुशक बकुला रिंपोची विमानतळाची नवीन आणि आधुनिक टर्मिनल इमारत दोन्ही इथल्या विकासाला गती देतील.
मित्रांनो, तीन वर्षांपूर्वी इथे जी इमारत बांधली होती कालानुरूप त्याला आधुनिकतेशी जोडण्याचा, त्यात नवीन सुविधांचा विकास करण्यासंदर्भात याआधी कधीच विचार केला नव्हता. आज नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन झाले आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण देखील होईल. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो की, ज्याचे आधी मी भूमिपूजन केले होते त्याचे आज लोकार्पण करत आहे आणि आज ज्यांचे भूमिपूजन करत आहे, तुमच्या आशीर्वादाने त्याचे लोकार्पण करायला देखील मीच येईन. हे टर्मिनल आता आधुनिक सुविधा देण्यासोबतच त्याची प्रवासी क्षमता देखील वाढेल.
याचप्रमाणे, बिलासपूर, मनाली, लेह रेल्वे मार्गावर सुरवातीचे सर्वेक्षण झाले आहे. अनेक स्थानकांचे काम देखील सुरू झाले आहे. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर दिल्ली ते लेहचा प्रवास कमी होईल. हिवाळ्यात तर इथला रस्ते मार्ग पूर्ण बंद होत असल्याने उर्वरित भारताशी संपर्क तुटतो. हा रेल्वे मार्ग बऱ्याच अंशी ही समस्या दूर करेल.
मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रात जेव्हा कनेक्टिव्हिटी वाढत जाते तेव्हा तिथल्या लोकांचे जीवन अधिक सुलभ होते आणि अर्थार्जनचे स्रोत देखील वाढतात. याचा सर्वाधिक लाभ पर्यटनाला होतो. लेह- लडाखचा परिसर तर अध्यात्म, कला, संस्कृती, निसर्गाची सुंदरता आणि साहसी खेळांसाठी जगातील एक महत्वाचे ठिकाण आहे. इथे पर्यटनाचा विकास करण्यासाठी सरकारने अजून एक पाऊल उचलले आहे. गिर्यारोहणाचे पाच नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय आज इथे घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने या मार्गांवरील संरक्षित क्षेत्र परवान्याची वैधता 7 दिवसांवरून 15 दिवस केली आहे. यामुळे इथे येणारे पर्यटक आरामात आपल्या यात्रेचा आनंद लुटू शकतील आणि इथल्या तरुणांना अधिक रोजगार मिळेल.
मित्रांनो, मला सांगितले की, यावेळी 3 लाखांहून अधिक पर्यटक लेहला आले आहेत आणि अंदाजे 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी कारगिलला भेट दिली आहे. म्हणजेच काश्मीरमध्ये जितके पर्यटक आले त्यातले अर्धे इथे आले. तो दिवस आता दूर नाही जेव्हा लेह लडाख चे पर्यटन नवीन उंची गाठेल.
बंधू आणि भगिनींनो, केंद सरकार मुलांचे शिक्षण, तरुणांना रोजगार, ज्येष्ठ नागरिकांना औषध, शेतकऱ्यांना सिंचन आणि लोकांना न्याय ही विकासाची पंचधारा राबवण्यात व्यस्त आहे. लेह लडाख आणि कारगिलमध्ये देखील या सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लडाख मध्ये एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकसंख्या ही तरुण विद्यार्थ्यांची आहे. तुम्ही बऱ्याच वर्षांपासून इथे एक विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करत आहात. आज तुमची ही मागणी देखील पूर्ण झाली आहे आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषतः माझ्या तरुण सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज ते क्लस्टर विद्यापीठ सुरु केले आहे. यात नुब्रा, लेह आणि जस्का कारगिल इथे सुरु असलेल्या महाविद्यालयांच्या स्रोतांचा वापर केला जाईल. विद्यार्थ्यांच्या सुविधासाठी लेह आणि कारगिल इथे देखील त्याचे प्रशासकीय कार्यलय असेल.
मित्रांनो, लेह-लडाख देशाच्या त्या भागांपैकी एक आहे जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अनुसूचित जमातीच्या कल्याणकारी निधीमध्ये अर्थसंकल्पात अंदाजे 30 टक्क्याची वाढ केली आहे. तर या अर्थसंकल्पात दलितांच्या विकासासाठी निधीत अंदाजे 35टक्के अधिक वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जी 11 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यात आता शिक्षण, आरोग्य आणि दुसऱ्या सुविधांचा विकास केला जाईल.
बंधू आणि भगिनींनो, ज्यांना काही कारणास्तव विकासाचा लाभ घेता आला नाही त्या सर्वांना केंद्र सरकार विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यचा प्रयत्न करत आहे. सरकारने या अर्थसंकल्पात भटक्या समुदायासाठी देखील एक निर्णय घेतला आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या जीवनशैलीमुळे, तर बऱ्याच वेळा हवामानाच्या कारणामुळे एकाच ठिकाणी राहत नाही, यामुळे या लोकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचणे फार कठीण होते. आता या लोकांसाठी सरकारने कल्याणकारी विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; जेणेकरून सरकार जे विकास कार्य राबवत आहे ते ह्या समुदायाच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात आतापर्यंत जे पोहोचले नाही ते आता जलद गतीने पोहोचले पाहिजे. आणि हे लोकं कोण आहेत…..गारुडी, बंजारा आणि बैलगाडीतून फिरणारे लोहार….भटकत राहतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहतात, एकाजागी थांबत नाहीत, आपल्या जनावरांसोबत फिरत असतात. त्यांच्या मूळ ठिकाणी यायला त्यांना जवळजवळ दोन वर्ष लागतात. अशा कुटुंबाची काळजी घेण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला आहे.
मित्रांनो, याशिवाय, सरकारने अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी देखील एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लेह-लडाख मधील अनेक शेतकरी कुटुंबाना होणार आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा कमी जमीन आहे, आणि इथे तर जवळजवळ सर्वच शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे पाच एकरापेक्षा कमी जमिन आहे. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकार थेट वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार आहे. दोन-दोन हजारच्या तीन हफ्त्यात हे तुमच्या खात्यात जमा होतील. हवामानानुसार निश्चित करण्यात आले आहे. माझा हा प्रयत्न आहे की याचा पहिला हफ्ता लवकरच तुम्हाला मिळला पाहिजे. आणि यासाठीच देशातील सर्व राज्य सरकारांना याची मार्गदर्शक तत्वे आजच पाठवणार आहे. संबंधित राज्यातील शेतकरी….त्यांची यादी, त्यांचा आधार नंबर तातडीने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि फक्त बोलायचे, आश्वासन द्यायचे आणि मग नंतर ते विसरायचे…असे मुळीच नाही, मला ह्या सर्व गोष्टी लागू करायच्या आहेत. आणि सर्व राज्यांची यंत्रणा जेवढी सक्रीय असेल तितक्याच वेगाने सगळ्यांना लाभ मिळेल.
आणि म्हणूनच इथल्या बटाटे, मटार, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. आणि इथल्या फ्लॉवरची गोष्ट तर मला चंगलीच लक्षात आहे. मी जेव्हा संघटनेचे काम करायचो तेव्हा दिल्लीहून इथे यायचो. त्यावेळी दिल्ली मधील माझ्या ओळखीचे कार्यकर्ते मला इथून आठवणीने फ्लॉवर घेऊन यायची विनंती करायचे त्यासाठी सामानाचा जो काही अधिक खर्च व्ह्याचा तो देखील ते द्यायला तयार असायचे. मग मी पण इथून फ्लॉवर घेऊन जायचो तसेच इतर बरीच भाजी घेऊन जायचो. त्या कुटुंबाना इथली भाजी खूप आवडायची. आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी अद्भुत आहे. त्यांना खूप मोठी शक्ती प्रदान करणार आहे. आणि जे दिल्लीत वातानुकुलीत खोल्यांमध्ये बसतात त्यांना हे माहित नाही की, दुर्गम डोंगराळ भागात, वाळवंटात राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी हे सहा हजार रुपये किती मोलाचे आहेत. हे त्या लोकांना कधीच समजत नाही.
या नवीन योजनेसाठी मी तुम्हा सर्वांचे देशातील शेतकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो, लेह,लडाख,कारगिल भारताचे टोक आहे, आमचे शीर आहे, भारत मातेचा हा मुकुट आमचा गौरव आहे, गेल्या साडे चार वर्षांपासून हे क्षेत्र आमच्या विकासाचे मुख्य केंद्र आहे. लडाख स्वायत्त डोंगर विकास परिषद कायद्यात बदल करण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. परिषदेला आता जास्त अधिकार दिले आहेत.
या क्षेत्राच्या विकासासाठी येणारा निधी आता इथली स्वायत्त परिषदच जारी करते. परिषदेचे अधिकार आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढवण्यात आली आहे. यामुळे इथले महत्वाचे विषय जलद गतीने आणि अधिक संवेदनशीलतेने सोडवले जातील. आता तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वारंवार श्रीनगर आणि जम्मूला जावे लागणार नाही. जास्तीत जास्त कामे इथे लेह आणि लडाख मध्येच पूर्ण होतील.
मित्रांनो, केंद्र सरकार ‘सबका साथ सबका विकास’ या मूल मंत्रानुसार काम करत आहे. देशातील कोणतीही व्यक्ती, कोणताही भाग विकासापासून दूर राहू नये यासाठी आम्ही गेल्या साडे चार वर्षांपासून सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन दिवस रात्र काम करत आहोत.
मी इथल्या लोकांना विश्वासाने सांगतो की, लेह लडाख कारगिलच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
केंद्र सरकार, आता आमच्या मित्राने बरीच मोठी यादी वाचली परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, मी जास्त खोलात जात नाही. मी इथे सगळ्यांना ओळखतो, मी एक असा पंतप्रधान आहे जो देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून आला आहे, यामुळे मला बऱ्याच गोष्टींचा अंदाज आहे. छोट्या छोट्या गोष्टी अधिकाऱ्यांकडून समजून घेतो परंतु मला अनुभव देखील आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, केंद्र सरकार तुमच्या आशा आकांक्षा यांचा सन्मान करते. आणि आजचा हा भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम त्याच शृंखलेचा एक भाग आहे.
आयुष्य सुलभ करणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो. थंडीच्या या दिवसात देखील तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या दुरून इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात यासाठी देखील मी तुमचा आभारी आहे. माझ्यासह सर्व शक्तीनिशी बोला……
भारत माता की ……जय
भारत माता की ……जय !
भारत माता की ……जय
खूप खूप धन्यवाद