भारत माता की जय,
भारत माता की जय,
कार्यक्रमात उपस्थित उत्तर प्रदेशचे ऊर्जावान आणि कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, प्रयागराजचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी साध्वी निरंजन ज्योतिजी, श्रीमती अनुप्रिया पटेलजी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री डॉ महेंद्र सिंहजी, राजेन्द्र प्रताप सिंह मोतीजी, श्री सिद्धार्थनाथ सिंहजी, नन्दगोपाल गुप्ता नंदीजी, श्रीमती स्वाति सिंहजी, श्रीमती गुलाबो देवीजी, श्रीमती नीलिमा कटियारजी, संसदेतील माझ्या सहकारी भगीनी रीता बहुगुणाजी, श्रीमती हेमा मालिनीजी, श्रीमती केशरी देवी पटेलजी, डॉ संघमित्रा मौर्यजी, श्रीमती गीता शाक्यजी, श्रीमती कांता कर्दमजी, श्रीमती सीमा द्विवेदीजी, डॉ रमेश चंद बिन्दजी, प्रयागराजच्या महापौर श्रीमती अभिलाषा गुप्ताजी, जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉ वीके सिंहजी, सर्व आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी गण, तसेच इथे उपस्थित उत्तर प्रदेशचे सामर्थ्य वाढवणाऱ्या इथल्या सामर्थ्याच्या प्रतीक माझ्या माता, भगिनी ! आपणा सर्वांस माझा प्रणाम।
माँ गंगा, यमुना, सरस्वती के पावन तट पे बसा प्रयागराज के धरती के, हम शीश झुकाय के प्रणाम करत हई। हम शीश झुकाय के प्रणाम करत हई। ई उ धरा ह, जहां धर्म, ज्ञान और न्याय की त्रिवेणी बहत ह। तीर्थन के तीर्थ, प्रयागराज में आइके, हमेशा ही एक अलगैय पवित्रता और ऊर्जा का अहसास होत है। पिछले वर्ष फरवरी में हम कुम्भ मा ई पवित्र धरती पर आवा रहेन, तब संगम में डुबकी लगायके अलौकिक आनंद के अनुभव प्राप्त किहे रहे।
तीर्थराज प्रयागच्या अशा पवित्र पावन भूमीस मी साष्टांग नमस्कार करतो. हिंदी साहित्य जगतातील सर्वमान्य आचार्य महावीर प्रसाद द्विवेदीजी यांची आज पुण्यतिथीही आहे. प्रयागराज मधून साहित्याची सरस्वती प्रवाहीत राहिली, द्विवेदीजी दीर्घकाळ त्याचे संपादकही राहिले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
मातांनो-भगीनींनो,
हजारो वर्षांपासून प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे, आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज हे तीर्थक्षेत्र स्त्री आणि शक्तीच्या अशा अद्भुत संगमाचे साक्षीदार बनले आहे. तुम्ही सर्वं आपला स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला देण्यासाठी आलात हे आम्हा सर्वांचे सौभाग्य आहे. माता आणि भगिनींनो, मी येथे मंचावर येण्यापूर्वी मी बँकिंग सखी, बचत गटांशी संबंधित बहिणी आणि कन्या सुमंगला योजनेच्या लाभार्थी मुलींशी बोललो. असे भाव, असे आत्मविश्वासपूर्ण शब्द! माता आणि भगिनींनो, इथे एक म्हण आहे – ““प्रत्यक्षे किम् प्रमाणम्”.
म्हणजेच जे प्रत्यक्ष आहे, जे समोर आहे ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज नाही. उत्तर प्रदेशात विकासासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काम झाले ते संपूर्ण देश पाहत आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या एक लाखाहून अधिक लाभार्थी मुलींच्या खात्यावर कोट्यवधी रुपये हस्तांतरित करण्याचा बहुमान आत्ता मला मिळाला. ही योजना गरिबांसाठी, गावांसाठी आणि मुलींसाठी विश्वासाचे एक मोठे माध्यम ठरत आहे. उत्तर प्रदेशने सुरू केलेली बँक सखीची मोहीम महिलांसाठी रोजगाराच्या संधींसोबतच त्यांच्या आयुष्यातही मोठे बदल घडवून आणत आहे. सरकारच्या विविध योजनांमधून जे पैसे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) थेट खात्यात येतात, ते पैसे काढण्यासाठी आता बँकेत जावे लागत नाही. बँक सखीच्या मदतीने हा पैसा गावात, घरापर्यंत आणला आहे. म्हणजेच बँक सखीने बँक गावात आणली आहे. आणि ज्यांना हे काम छोटे आहे असे वाटेल त्यांनाही मला बँक सखींचे काम किती मोठे आहे हे सांगायचे आहे. सुमारे ७५ हजार कोटींच्या अशा व्यवहारांची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारने या बँक सखींवर सोपवली आहे. गावात राहणाऱ्या या माझ्या बहिणी माझ्या मुली 75 हजार कोटी रुपयांचा व्यवहार करत आहेत. गावात जेवढे व्यवहार होतील तेवढे त्यांचे उत्पन्न वाढेल. यापैकी बहुतेक बँक सखी अशा बहिणी आहेत ज्यांचे काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वतःचे बँक खाते देखील नव्हते. पण आज बँकिंग, डिजिटल बँकिंगची ताकद या महिलांच्या हातात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कसे काम केले जाते, याकडे देशाचे लक्ष आहे. आणि तेव्हाच मी म्हणतो, “प्रत्यक्षे किम् प्रमाणम्”॥
मातांनो भगिनींनो,
उत्तर प्रदेशने महिलांच्या हातात रेशन घरी नेण्याची, आई आणि बाळाला पोषण देण्याची जबाबदारीही सोपवली आहे. हे पौष्टिक रेशन आणि आहार आता महिला बचत गटांमध्ये एकत्र काम करून त्या स्वत: बनवणार आहेत. हे देखील खूप मोठे काम आहे, वर्षाला हजारो कोटींचे काम आहे. 202 पोषण उत्पादन युनिटची आज पायाभरणी करण्यात आली त्यामुळे बचत गटातील महिलांनाही उत्पन्न मिळणार असून, गावातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. गावातील महिला आपल्या कारखान्यात पौष्टिक आहार बनविण्यासाठी गावातूनच तर पिके व धान्य खरेदी करणार आहेत. या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशातील महिलांचे जीवन बदलू लागले आहे. सरकार विविध क्षेत्रातील बचत गटांना देत असलेल्या मदतीचा हप्ता म्हणून एक हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा बहुमान आज मला मिळाला आहे. आता उत्तर प्रदेशाचा विकासाचा प्रवाह कोणालाच थांबवणार नाही. उत्तर प्रदेशातील महिलांनी, माता-भगिनींनी-मुलींनी ठरवले आहे- आता पूर्वीच्या सरकारांचा काळ परत येऊ देणार नाही. दुहेरी इंजिनच्या सरकारने दिलेली सुरक्षा, उत्तर प्रदेशच्या महिलांना दिलेला सन्मान, त्यामुळे त्यांचा सन्मान वाढला आहे, प्रतिष्ठा वाढली आहे, हे अभूतपूर्व आहे.
बंधू आणि भगिनींनो,
माता-भगिनी-मुलींचे जीवन हे अनेक पिढ्या प्रभावित करणारे, पिढ्या घडवणारे जीवन आहे. मुलीचे सामर्थ्य, तिचे शिक्षण, तिचे कौशल्य हे केवळ कुटुंबाचीच नाही तर समाजाची दिशा ठरवते. त्यामुळे 2014 मध्ये भारतमातेची मोठी स्वप्ने, मोठ्या आकांक्षा साकार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत सर्वप्रथम देशातील मुलींच्या विश्वासाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे मुलीच्या जन्मापासून आयुष्याच्या चक्रातील प्रत्येक टप्प्यावर महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही योजना बनवल्या आणि अभियाने राबवली.
मित्रांनो,
मुलींचा गर्भातच अंत होऊ नये , त्या जन्माला याव्यात, यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेतून समाजातील चेतना जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला आहे की देशातील अनेक राज्यांमध्ये मुलींच्या संख्येच चांगली वृद्धी झाली आहे. प्रसूतीनंतरही आईला आपल्या बाळाची प्राथमिक काळजी घेण्यासाठी, आपले काम चालू ठेवता यावे यासाठी महिलांची रजा 6 महिने करण्यात आली आहे.
मित्रांनो,
गरीब कुटुंबांमध्ये गरोदरपणात आईचे आरोग्य हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच आम्ही गरोदर महिलांचे लसीकरण, रुग्णालयात प्रसूती आणि गर्भधारणेदरम्यान पोषण यावर विशेष लक्ष दिले. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदरपणात महिलांच्या बँक खात्यात 5 हजार रुपये जमा केले जातात, जेणेकरून त्यांना आहाराची योग्य काळजी घेता येईल. आतापर्यंत 2 कोटींहून अधिक भगिनींना सुमारे 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
मित्रांनो,
मुलींना व्यवस्थित शिकता यावे, त्यांच्यावर शिक्षण मध्येच, अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठीही आम्ही सातत्याने काम केले आहे. शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बनविण्याचे काम असो अथवा गरीबातल्या गरीब घरातल्या मुलींना सॅनिटरी पॅड सुलभतेने मिळावेत, यासाठीही काम केले आहे. आमचे सरकार कोणतेही काम करण्यामध्ये मागे राहिले आहे, असे झालेले नाही. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जवळपास अडीच कोटी कन्यांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. हा निधी या मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मिळू शकणार आहे. या निधीवर व्याजदरही जास्त ठेवण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षणानंतर करियरपासून ते घर-गृहस्थीपर्यंत प्रत्येक पावलावर महिलांच्या सुविधा आणि आरोग्याच्या विषयाकडे लक्ष पुरविण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोट्यवधी शौचालये बनविण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीबातल्या गरीब भगिनींना गॅस जोडणीची सुविधा मिळाल्यामुळे, तसेच घरामध्ये नळाव्दारे पाणी येत असल्यामुळे भगिनींच्या जीवनामध्ये सुविधाही आल्या आहेत आणि त्यांची प्रतिष्ठाही वाढली आहे.
मित्रांनो,
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्वात अधिक लाभ जर कोणाला झाला असेल, तर तो आमच्या भगिनींनाच आहे. मग रूग्णालयामध्ये बाळंतपण होणार असेल अथवा इतर कोणत्याही आजारावर औषधोपचार करायचा असेल, आधी गरीब भगिनींच्या हातामध्ये कधी पैसा नसायचा त्यामुळे आजारपण म्हणजे त्यांच्या दृष्टीने जीवनावर संकट कोसळायचे. आता पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा मिळत असल्यामुळे त्यांची ही काळजी दूर झाली आहे. माता-भगिनींनो, भारतीय समाजामध्ये नेहमीच माता-भगिनींना सर्वोपरी दर्जा दिला आहे. मात्र आज एका सत्यस्थितीकडेही मी आपले आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधू इच्छितो. आपल्याकडे परंपरेनुसार अगदी युगांपासून, अनेक दशकांपासून अशी काही व्यवस्था आहे की, घर आणि घरातली प्रत्येक संपत्ती यांच्यावर केवळ पुरूषांचा अधिकार समजला जात होता. घर असेल, तर ते कोणाच्या नावावर आहे? पुरूषांच्या नावावर!नौकरी, दुकान, यांच्यावर कोणाचा हक्क? पुरूषांचा! आज आमच्या सरकारच्या योजनांमुळे ही असमानता दूर केली जात आहे. प्रधानमंत्री घरकूल योजना याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. प्रधानमंत्री घरकूल योजनेअंतर्गत ज्यांना घरकुले दिली जातात, त्यासाठी प्राधान्यक्रमाच्या आधाराचा निकष लावला जातो. या घरकुलांचे मालकी हक्क पत्रक महिलांच्या नावे बनवले जात आहे. जर मी उत्तर प्रदेशापुरते बोलायचे ठरवले तर सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेशात 30 लाखांपेक्षा जास्त घरकूले प्रधानमंत्री आवास योजनेखाली बनविण्यात आली आहेत. त्यापैकी 25 लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावे करण्यात आली आहेत. यावरून आपल्याला आम्ही केलेल्या कामाचा अंदाज लावता येईल. पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातल्या 25 लाख महिलांना त्यांच्या मालकीचे, हक्काचे घर मिळाले आहे. ज्या घरांमध्ये अनेक पिढ्यांपासून महिलांच्या नावावर कोणत्याही प्रकारची संपत्ती नव्हती, अशा महिलांच्या नावांवर आज त्यांचे संपूर्ण घर आहे. हेच तर ख-या अर्थाने महिलांचे सशक्तीकरण आहे. हाच तर खरा विकास आहे.
माता - भगिनींनो,
आज मी आपल्याला आणखी एका योजनेविषयी सांगू इच्छितो. ही योजना आहे- केंद्र सरकारची स्वामित्व योजना! स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण देशातल्या गावांमधल्या घरांची, भूमींची ड्रोनच्या मदतीने छायाचित्रे घेतली जात आहेत. घराच्या मालकांना त्यांच्या मालमत्तेचे दस्तऐवज दिले जात आहेत. घरमालकांच्या नावांचे घरपट्टे दिले जात आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारे घरमालकी घरपट्टा देताना त्या घरातल्या महिलेचे नाव त्यावर लागले जाईल, यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आगामी काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये योगी यांचे सरकार प्रत्येक घराचे ‘मॅपिंग’ करून अशा प्रकारचे घरपट्टा देण्याचे काम पूर्ण करेल. तसेच जी घरे बांधण्यात आली आहेत, त्यांच्या दस्तऐवजांवरही घरातल्या महिलांचे नाव असेल. घरातल्या मातेच्या नावे ते घर असणार आहे.
मित्रांनो,
रोजगारासाठी, कुटुंबाचे उत्पन्न वाढावे यासाठी ज्या योजना देशामध्ये राबविल्या जात आहेत, त्यामध्येही महिलांना समान भागीदार बनविण्यात येत आहे. मुद्रा योजनेमुळे आज गावांगावांमधल्या, गरीब परिवारांतल्या महिलांनाही नव-नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या योजने अंतर्गत एकूण कर्जवितरणापैकी 70 टक्के महिलांना कर्ज देण्यात आले आहे. दीनदयाळ अंत्योदय योजनेतून देशभरातल्या महिलांना स्वयंसहायता समूह आणि ग्रामीण संघटनांबरोबर जोडण्यात येत आहे. महिला स्वयंसहायता समूहातल्या भगिनींना मी तर आत्मनिर्भर अभियानातल्या चॅम्पियन मानतो. हे सर्व स्वयंसहायता समूह वास्तवामध्ये राष्ट्र सहायता समूह आहेत, म्हणूनच राष्ट्रीय आजीविका मिशन अंतर्गत 2014च्या आधी पाच वर्षे जितकी मदत दिली गेली, त्यापेक्षा जवळपास 13 पट जास्त मदत गेल्या सात वर्षांमध्ये दिली गेली आहे. प्रत्येक स्वयंसहायता समूहाला आधी ज्याठिकाणी 10 लाख रूपयांपर्यंत विनाहमी कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा दुप्पट झाली आहे, म्हणजे आता 20 लाख रूपयांपर्यंत विनाहमी कर्ज दिले जाते.
माता -भगिनींनो,
शहर असो अथवा गांव, आमच्या सरकारने महिलांना भेडसावणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्यांचा, संकटांचा विचार करून, त्यातून त्यांची सुटका कशी होईल, हे लक्षात घेवून सरकारने निर्णय घेतले आहेत . कोरोनाकाळामध्ये आपल्या घरातली चूल चालू रहावी, म्हणून मोफत रेशन देण्याची व्यवस्था आमच्या सरकारने केली होती. महिलांना रात्रपाळीत काम करता यावे, यासाठी नियम अधिक सुकर बनविण्याचे काम आमच्या सरकारने केले. खाणीमध्ये महिलांना काम करण्यावर बंदी होती. ही बंदी हटविण्याचे कामही आमच्या सरकारने केले. देशभरातल्या सैनिक शाळांचे दरवाजे मुलींसाठी मुक्त करण्याचे काम आमच्याच सरकारने केले. अत्याचारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्याच्या खटल्यांची वेगाने सुनावणी व्हावी, यासाठी आमच्या सरकारने देशभरामध्ये जवळपास 700 फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली आहे. मुस्लिम भगिनींना अत्याचारापासून वाचविण्यासाठी तीन तलाकच्या विरोधात कायदा आमच्या सरकारने बनवला आहे.
मित्रांनो,
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता, डबल इंजिनचे सरकार मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी निरंतर कार्य करीत आहे. अलिकडेच, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. आधी मुलांचे विवाहाचे वय कायद्यानुसार 21 वर्ष होते. परंतु मुलींसाठी विवाहाचे किमान वय 18 वर्ष होते. कन्यांनाही आपले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असते. त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही वेळ हवा असतो. यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. म्हणूनच मुलींचे विवाहाचे वय 21 वर्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश हा निर्णय मुलींसाठी घेत आहे, परंतु त्यामुळे काहीजणांना त्रास होत आहे, हे सगळेजण पहात आहेत.
बंधू- भगिनींनो,
पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या रस्त्यांवर माफियाराज होता. उत्तर प्रदेशातल्या सत्तेवर गुंडांचे वर्चस्व होते. याचा सर्वात जास्त त्रास कोणाला भोगावा लागला होता? माझ्या उत्तर प्रदेशातल्या भगिनींना आणि कन्यांना भोगावा लागला होता. त्यांना घराबाहेर पडणे, बाहेर रस्त्यावर निघणे अवघड होते. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणे अवघड होते. तुम्हा मंडळींना काही करता येत नव्हते की काही बोलता येत नव्हते. कारण पोलीस ठाण्यावर गेले, तर गुन्हेगार, अत्याचारी यांची शिफारस करणारा कुणाचा तरी फोन येत होता. योगी यांनी या गुंडांना अगदी योग्य स्थानी पोहोचवले आहे. आज उत्तर प्रदेशामध्ये सुरक्षाही आहे, उत्तर प्रदेशामध्ये सर्वांना त्यांचे अधिकारही मिळत आहे. आज उत्तर प्रदेशामध्ये अनेक कामे होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. आज उत्तर प्रदेशात व्यापारही होत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्हाला तुम्हा सर्व माता -भगिनींचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच या नवीन उत्तर प्रदेशाला कोणीही पुन्हा एकदा अंधःकाराच्या गर्तेत ढकलू शकणार नाही. बंधू -भगिनींनो, प्रयागराजच्या पुण्य भूमीवर आज हा संकल्प करूया, आपल्याला उत्तर प्रदेशला पुढे घेवून जायचे आहे. आपला उत्तर प्रदेश नवीन विक्रमी उंची प्राप्त करेल. आपण सर्व माता- भगिनींना, तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल, तुम्ही दिलेल्या समर्थनाबद्दल, आणि उत्तर प्रदेशला पुढे घेवून जाण्यासाठी तुमच्या सहभागाबद्दल, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. तुम्हा सर्वांचे अगदी हृदयापासून खूप-खूप धन्यवाद! माझ्या बरोबर जयघोष करावा -
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप- खूप धन्यवाद!!