मा. शेख हसीना, पंतप्रधान बांगलादेश
भारत आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री,
सुश्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प. बंगाल
बिप्लव कुमार देव, मुख्यमंत्री त्रिपुरा
काही दिवसांपूर्वी काठमांडूमध्ये बिमस्टेक शिखर परिषदेत शेख हसीना यांची भेट झाली होती. त्याआधीही मे महिन्यात आम्ही शांतीनिकेतनमध्ये आणि एप्रिल महिन्यात लंडन इथल्या राष्ट्रकुल परिषदेत भेटलो होतो.
आणि मला आनंद वाटतो की, आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळत आहे.
मी याआधीही अनेकदा म्हटले आहे की, शेजारी देशांच्या नेत्यांशी शेजाऱ्यांसारखे संबंध असले पाहिजेत. जेव्हा मनात आले तेव्हा चर्चा झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे. यासाठी राजशिष्टाचाराच्या बंधनात राहण्याची आवश्यकता नाही.
ही जवळीक पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबरच्या माझ्या संपर्कात स्पष्टपणे दिसून येते. अनेक भेटींखेरीज ही आमची चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आणि आगामी काळात आणखी एक व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे.
या व्हिडिओ कान्फरन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आम्हा दोन्ही देशांच्या सहकार्याने साकारणाऱ्या प्रकल्पांचा शुभारंभ किंवा उद्घाटन कुठल्या व्हीआयपी भेटीवर अवलंबून नाही.
महोदया, जेव्हा आपण दळणवळणाबद्दल बोलतो तेव्हा मला 1965 पूर्वीचे दळणवळण बहाल करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाचा विचार आठवतो.
आणि मला खूप आनंद वाटतो की, गेल्या काही वर्षांमध्ये या दिशेने आम्ही सातत्याने पावले उचलली आहेत.
आज आपण आपली विजेची जोडणी वाढवली आहे आणि रेल्वेचे जाळे अधिक विस्तृत करण्यासाठी दोन प्रकल्प सुरू केले आहेत.
2015 मध्ये जेव्हा मी बांगलादेशला आलो होतो तेव्हा आपण बांगलादेशला 500 मेगावॅटचा अतिरिक्त वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी प. बंगालहून बांगलादेशात पारेषण वाहिनी उपयोगात आणली जात आहे. हे काम पूर्ण करण्यात सहकार्याकरता मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करतो.
हा प्रकल्प पूर्ण होण्यामुळे आता 1.16 गिगावॅट वीज भारतातून बांगलादेशला पुरवली जाणार आहे. मला असे वाटते की, मेगावॅट ते गिगावॅट हा प्रवास आमच्या संबंधाचे सुवर्ण अध्यायाचे प्रतीक आहे.
रेल्वेच्या क्षेत्रातही आमचा संपर्क सातत्याने वाढत आहे. यात बांगलादेशातील आंतरिक जोडणी आणि भारताबरोबरची जोडणी आमच्या सहकार्यातून प्रमुख पैलू आहेत.
अखौडा-आगरतळा या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर आमच्या सरहद्द पार दळणवळणात आणखी भर पडेल. या प्रकल्पात सहकार्यासाठी मी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांचे अभिनंदन करतो.
पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशच्या विकासासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. 2021 पर्यंत मध्यम उत्पन्न असलेला देश आणि 2041 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा त्यांचा निश्चय साकारण्यासाठी सहकार्य करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
जसजसे आमचे संबंध वृद्धींगत होतील आणि नागरिकांमधील नाते वृद्धींगत होईल तसतसे आपण विकास आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचू असा मला विश्वास आहे.
या कामात सहकार्य करण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मी पंतप्रधान शेख हसीना आणि प. बंगाल व त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.